Tuesday 31 October 2023

टिळक : माय फादर...!

बापलेकाच्या नात्यातला, परस्पर संबंधातला तडा, संघर्ष हा इतरही अनेक थोरामोठ्यांच्या जीवनातूनही दिसून येतो. मग ते लोकमान्य टिळक आणि श्रीधरपंत टिळक असोत अथवा महात्मा गांधी आणि हरीलाल असोत! लोकमान्य टिळक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक भूमिका अजिबात पटत नसे. त्याचे पडसाद अगदी केसरी विरुद्ध मूकनायक अश्या स्वरुपातही उमटलेत. पण लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत हे मात्र बाबासाहेबांचे जीवलग मित्र बनले. डॉ.बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की बाळ गंगाधर टिळक हे खरे लोकमान्य नव्हेत, तर श्रीधरपंत हेच खरे लोकमान्य! श्रीधरपंत देखिल बाबासाहेबांना इतके जवळचे मानत की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचे पत्र लिहीलं ते डॉ.आंबेडकरांना! श्रीधरपंतांचं असं जाणं बाबासाहेबांनाही भावनिक स्तरावर फार हेलावून टाकणारं होतं. तीच गोष्ट गांधीजी आणि त्यांचा थोरला मुलगा हरीलालची. तुम्ही असाल जगासाठी बापू, महात्मा...पण माझे वडील कुठे आहेत? हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. आणि त्यांना तो प्रश्न पडायचे कारण सर्वात मोठा पुत्र असल्याने वडिलांचा आपल्या हातातून सुटत चाललेला हात त्यांनी अनुभवला होता. इंग्लंडला जाऊन वकिलीच्या उच्च शिक्षणाबाबत वडिलांनीच घेतलेली विरोधाची भूमिका ही स्वातंत्र्यसैनिक म्हणून घेतलेली होती. तो नकार एक तरुण, काहीतरी करुन स्वत:ला सिद्ध करायला धडपत असणारा मुलगा म्हणून हरीलाल यांच्या मनाला लागणं हे आपण समजून घ्यायला हवं. ह्या नात्यांच्या नाजूक गाठी हलक्या हातानेच सोडवाव्या लागतात. दोहोंची भूमिका समजून घ्यावी लागते. आज आपण लोकमान्य टिळक आणि त्यांचे पुत्र श्रीधरपंत यांच्यातलं द्वंद्व आणि त्याची झालेली परिणती समजावून घेऊ या...

---------------------------------

२५ मे १९२८ चा दिवस. वेळ संध्याकाळची. पुण्यातल्या भांबुर्डा म्हणजे आताच्या शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली झोकून देत तिशीतल्या तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाच्या आत्महत्येनं केवळ पुणे किंवा महाराष्ट्र नव्हे, तर संबंध भारत देश हादरला. कारण ही आत्महत्या कुणा साध्यासुध्या तरुणाची नव्हती, तर हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांना 'असंतोषाचे जनक' म्हटलं गेलं, त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र श्रीधरपंत बळवंत टिळक! आत्महत्येवेळी श्रीधरपंत अवघ्या ३२ वर्षांचे होते. पण या ३२ वर्षांत त्यांनी आपल्या स्वतंत्र विचारांची चुणूक दाखवली होती. या काळात प्रसंगी वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या भूमिकांपासून फारकत घेण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. अशा या धाडसी तरुणाच्या आत्महत्येनं भारताचं राजकीय, सामाजिक विश्व हळहळलं. श्रीधर बळवंत टिळक यांचा जन्म १८९६ तर मृत्यू १९२८ ते मराठी प्रबोधनातल्या सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते होते. श्रीधरपंतांचा जन्म १८९६ साली झाला असावा, असे अनुमान करता येते. कारण त्याकाळी अशी नोंद कुठे केल्याचं आढळत नाही. त्यामुळं आतापर्यंत त्यांची जन्मतारीख निश्चित स्वरूपात कुठेही आढळलेली नाही. तर २५ मे १९२८ साली त्यांनी शिवाजीनगर-भांबुर्डा इथं मुंबई-पुणे रेल्वे एक्स्प्रेस खाली आत्महत्या केली. वडील असूनही लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलावर श्रीधरपंतांवर फारसा विश्वास टाकला नाही. श्रीधरपंताना बापू या नावानं ओळखलं जाई. लोकमान्यांना बापू हा त्यांच्यासाठी कायम लहानच वाटत होता. लोकमान्यांशी श्रीधरपंताचे मतभेद हे मुख्यत्वे करून वैचारिक आणि सुधारणावादाच्या संदर्भात होते. बापलेकामधला संघर्ष तितकाच कटू नाट्यपूर्ण पण ते अहंकारासाठीचं नव्हतं तर तत्वासाठीचे भांडण होतं. श्रीधरपंतच खरे लोकमान्य असल्याचा डॉ.आंबेडकरांचा दावा यासंदर्भात महत्त्वाचा ठरतो. शालेय शिक्षण घेताना अभ्यासात कमकुवत वा 'ढ ' म्हणून हिणवल्या गेलेल्या श्रीधरपंतांनी लोकमान्य टिळकांच्या हयातीतच आम्हाला ‘लोकमान्य’ व्हायचे नाही, असं खुद्द लोकमान्यांना ऐकवण्याची हिंमत दाखवली होती. लोकमान्य आणि श्रीधरपंत यांच्यातला पहिला खटका श्रीधरपंतांच्या लग्नातच उडाला होता. परदेशगमन केलं म्हणून तत्कालीन ब्राह्मण समुदायाने लोकमान्यांना प्रायश्चित्त म्हणून पंचगव्यप्राशनाची सजा सुनावली होती. तेव्हा त्या ब्राम्हणांच्या आग्रहावरून टिळकांनी प्रायश्चित्त म्हणून पंचगव्यप्राशनाची तयारी केली. मात्र पुरोगामी विचाराच्या श्रीधरपंतांनी त्याला विरोध केला. 'माझ्या लग्नासाठी जर प्रायश्चित्त घेणं असेल, तर ते लग्नच न झालेले बरं...!’ पण श्रीधरपंतांचा हा विरोध फार काळ चालला नाही. अखेर पंचगव्यप्राशन करून लोकमान्यांनी प्रायश्चित्त घेतलं. पण पुढे टिळकवाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून श्रीधरपंतानी आपल्या पद्धतीने त्याचेही प्रायश्चित्त घेतले. समाज सुधारणेची त्यांची कळकळ फक्त बोलघेवडी नव्हती. टिळकवाड्यातले अस्पृश्यांसोबत सहभोजन, समता संघाची स्थापना तसेच गणेशोत्सवात बहुजन मेळाव्याचा कार्यक्रम घेणं ही पुण्यासाठी त्याकाळी एक क्रांतीच होती. पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये, असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सामाजिक सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. त्यामुळं डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर असे ब्राम्हणेतर चळवळीचे अनेक अध्वर्यू हे त्यांचे जवळचे मित्र होते.
श्रीधरपंत केवळ सामाजिक सुधारणावादी नव्हते तर प्रागतिक विचारांचेही होते. टिळकांनी आयुष्यभर महाराष्ट्रातल्या सनातनी विचारांच्या लोकांचं नेतृत्व केलं. म्हणजे वडिलांच्या आणि मुलाच्या वैचारिक जडणघडणीत आणि भूमिकांमध्ये परस्पर टोकाचं अंतर होतं. ज्या आगरकरांशी टिळकांनी उभा दावा मांडला होती तीच भूमिका श्रीधरपंतांनी आपल्या वडिलांच्या विरोधात स्वीकारली होती. ‘जातीयता शक्य तितक्या लवकर नष्ट व्हावी’ हे आणि अशाप्रकारचे विचार ते पुन्हापुन्हा आपल्या लेखांमधून मांडत होते. श्रीधरपंत महाविद्यालयीन जीवनापासूनच सुधारणावादी लेखन करीत आले होते. त्यातच त्यांना रुची होती. पुढे तर ‘ज्ञानप्रकाश‘, ‘विविधवृत्त‘ यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी भरपूर लेखन केलं. आपल्या निवडक लेखांचं पुस्तक करावं, असं त्यांना वाटलं. त्यांच्या या विचाराला त्यांचे बंधू रामभाऊ यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. ‘माझा व्यासंग‘ च्या प्रस्तावनेत श्रीधरपंतांनी यासंदर्भातला उल्लेख केलाय. ‘ती. लोकमान्य टिळकांचे पश्चात साहित्यसेवेचे कामी खऱ्या कळकळीने उत्तेजन देणारे असे माझे वडीलबंधूं खेरीज मला कोणी उरलेले नाही!‘ शिवाय ‘माझा व्यासंग‘ ला त्यांनी १९१८ ते १९२७ असा कालनिदर्शक मजकूर कंसामध्ये दिलाय. याचा अर्थ असा की, श्रीधरपंतांना पुस्तक काढण्याची घाई झाली होती आणि आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात तेव्हाही थैमान घालीत होते, हे स्पष्ट दिसते. कारण याच पानावर त्यांनी थॉमस हार्डीच्या कवितेतल्या काही ओळी उद्‌धृत केल्या आहेत.
Rose-leaves smell when roses thrive, Here's my work while I'm alive;
Rose-leaves smell when shrunk and shed, Rose-leaves smell when shrunk and shed, Here's my work when I am dead.
याशिवाय, this I saw and knew: this, if anything of mine, is worth your memory
रस्किनचे वाक्यही त्यांनी प्रस्तावनेच्या प्रारंभीच नोंदविलंय. पुढे ‘कोर्टाच्या भावनाशून्य वातावरणात नाइलाजास्तव गुरफटलो गेल्यामुळे यापुढे माझे हातून काही विशेष वाङ्‌‌मयसेवा होईल, अशी अपेक्षा करण्यात आता फारसे हंशील नाही,‘ असंही त्यांनी म्हटलंय. श्रीधरपंतांच्या मनात नैराश्येचे ढग १९२३ पासूनच जमू लागले होते आणि ‘मृत्यू‘ या एकाच विषयाने त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता, हे स्पष्ट करणारे पुरावे त्यांच्या लेखनात सापडतात; उदाहरणार्थ, दिनांक १३-१०-१९२३ च्या ‘ज्ञानप्रकाश‘ च्या पुरवणीत प्रसिद्ध झालेली त्यांची ‘माझी निराशा‘ ही कविता पाहावी-
‘गेला सर्व हुरूप, ओसरुनि ये बुद्धीवरी झापडे।
आता मी जगलो कशास न कळे, हृद्रोग चित्ता जडे।
लोकमान्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'असहकार-युगास अनुलक्षून‘ नावाची कविता त्यांनी लिहिली होती. तिच्या शेवटच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.
‘कंटाळून निराश जीव विटला या सर्व गोष्टींप्रति।‘
या साऱ्याचा इत्यर्थ असा की, श्रीधरपंतांचा मनःपिंड कमकुवत होता आणि हळूहळू त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार बळावू लागले होते. ‘माझा व्यासंग‘ मध्ये १५ लेख, आठ कविता आणि तीन परिशिष्टे आहेत. त्यापैकी दोन लेख इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत. श्रीधरपंतांचे सुरुवातीचे लेखन ‘केसरी‘ त प्रसिद्ध व्हायला हवे होतं. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्यांनी जे लेखन केलं, त्यापैकी पुष्कळसे लेख इथं निवडलेले आहेत. याशिवाय ‘ज्ञानप्रकाश‘ आणि अन्य नियतकालिकांमधल्या लेखनाचा समावेश केलेला असला, तरी त्यांची संख्या फार कमी आहे. श्रीधरपंतांच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करताना असं जाणवतं की, एकाच वेळी त्यांच्या मनात मृत्यूविषयी विचार असले तरी त्यांच्याकडे उपजत विनोदबुद्धीही होती. A Midsummer Nights dream! किंवा ‘ऐन उन्हाळ्यातील एक स्वप्नदृश्य!‘ हे आणि ‘मराठी शाकुंतलाचे परीक्षण‘ हा लेख वाङ्‌‌मयसमीक्षेचा नमुना म्हणता येतो. ‘बादरायण संबंध‘, ‘एक चुटका‘, ‘सामूहिक आरोग्य ' आणि 'नागरिकांची कर्तव्ये!‘, ‘नवरात्रातील फेरफटका‘, ‘कलमबहादुराचे शेलापागोटे!‘, ‘कोंढाणा म्युनिसिपालिटीचा कारभार‘ या लेखांचे स्वरूप विनोदी आहे. तर ‘एका असामान्य चित्रकाराचा गुणगौरव‘, ‘लोकमान्यांचे निधन‘, ‘टिळकांचा एक स्वभावदोष‘ हे लेख व्यक्तिचित्रणात्मक आहेत Which first -Politics or Social Reform? आणि ‘हिंदूंच्या धर्मक्रांतीचा उषःकाल‘ या दोन लेखांमध्ये त्यांची सामाजिक मतं व्यक्त झाली आहेत. लोकमान्य टिळक हयात असताना श्रीधरपंत कॉलेजच्या नियतकालिकामधून लेखन करीत होते. स्वतः लोकमान्य त्यांच्याकडून कवितांचे अनुवाद करून घेत असत. हे पाहता श्रीधरपंतांचे कोणत्याही स्वरूपाचे लेखन ‘केसरी‘ त का प्रसिद्ध होऊ शकलं नाही, याबद्दल कुतूहल वाटते. याचं कारण कदाचित असं असू शकेल की, लोकमान्यांचा ‘केसरी‘ असला तरी उत्तरोत्तर त्यांना स्वतःला त्यात लक्ष घालायला वेळ मिळत नव्हता. त्यांच्या राजकीय कार्याची व्याप्ती वाढली होती. कारणे काही असली तरी ही काहीच अडचण नव्हती. पण तसं घडलं नाही आणि लोकमान्यांच्या मृत्यूनंतर तर केळकर-विद्वांस मंडळींनी त्यांना गायकवाडवाड्यात पाय ठेवायला परवानगीच नाकारली. काकासाहेब लिमये यांनी मात्र ‘ज्ञानप्रकाश‘ मध्ये लिहायला त्यांना मोकळीक दिली, त्याचा परिणाम असा झाला की, त्यांच्याकडून थोडेफार लेखन झाले.
१९२५ नंतर श्रीधरपंत डॉ.आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृत मध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लो. टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर डॉ.आंबेडकरांना भेटल्याशिवाय पुण्याला परतत नसत. डॉ.बाबासाहेब पुण्याला आले तर डॉ.बाबासाहेबांना गायकवाडवाड्यातल्या आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असं त्यांना समजावून सांगून डॉ.बाबासाहेब त्यांना परत पाठवीत. १९२५ साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यातल्या वास्तव्यात श्रीधरपंत टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली. त्या भेटीत मागास, बहुजन समाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी प्रबोधनकार यांच्याकडे मनमोकळी व्यक्त केली होती. श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर हजर होते. समता संघाच्या स्थापनेच्या वेळी झालेल्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां. ना. राजभोज तिथं होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाज समता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला होता. त्यांनी अनेक तर्‍हेने श्रीधरपंतांना त्रास द्यायला सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकर यांच्यासह सहभोजन आनंदाने पार पडलं. शिवाय यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला कंदील आणायचं आवाहन केल्यानं साऱ्यांनी सोबत कंदील आणले त्यामुळं गायकवाड वाडा झळाळून निघाला होता.
टिळक बंधू यंदा गणेशोत्सवात अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात घेऊन येणार अशी बातमी पुण्यात पसरली होती. आणि ती खरीही होती. एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधूंचा हा उपद्व्याप! या प्रकाराने ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. ब्राम्हणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे, त्यांनी त्यासाठी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम कोर्टाकडून बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा यापूर्वीही दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल लढवली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांचा स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी तरी गायकवाड वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा, रेलिंग उभारुन त्याला भलेभक्कम कुलूप ठोकलं. पण हे कुलूपही त्यांनी फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला होता. सकाळी एक दोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊ नि बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलेस तर याद राख....!, असं धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेले. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असं दिसताच, ट्रस्टींपैकी एकानं कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणलं. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेनं आणि शांततेनं चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या मंडपाजवळच चालला होता. रामभाऊंनी येताना सोबत एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाले, अहो नाझर साहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केलीत ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच...! असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार ? आला तसा निमूट परत गेला. याच दिवशी संध्याकाळी पांडुरंग ना. राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे इथं, खबरदार...!' असं बजावून रामभाऊने श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे प्रबोधनच्या कार्यालयात जाऊन बसायला सांगितलं. वाड्यात काय चाललंय याची माहिती श्रीधरपंतांनी प्रबोधनकारांना दिली. श्रीधरपंत संपूर्ण दिवस ठाकरे यांच्या प्रबोधन कार्यालयात बसून होते.
संध्याकाळी दिवेलागणी होताच श्रीधरपंत पुणे कँप परिसरातल्या भोकरवाडीला गेले. तिथून रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन ते ठाकरेंच्या प्रबोधन कचेरीवर परतले. तिथं सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. प्रबोधन कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राम्हणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती. मेळा तिथून थेट गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता. इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्या सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिस पार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटेच शतपावली घालीत फिरत होते. प्रबोधनकार यांच्याकडून एक सायकलस्वार ५-५ , १०-१० मिनिटांनी गायकवाड वाड्याला फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता. खुशाल या ...!, असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची ही गर्दी होतीच. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती. मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू श्रीधरपंत टिळक आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून 'यू कॅनॉट एंटर द वाडा...!' असा दम भरला. रामभाऊनं एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारलं आणि पोलिसांची फळी फोडून रामभाऊ आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड मोठ्या जनप्रवाहाला पाहून पोलिस नि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य गायनाला जोरात सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर गुलाल, प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा वाड्याबाहेर निघून गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हालवीत श्रीधरपंताजवळ आला. त्यांनी त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितलं. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा श्रीधरपंताजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालंच होतं. श्रीधरपंतानी नोटिशीचा कागद हातात घेतला आणि तो टराटरा फाडून टाकला. मेळा गेल्यावर श्रीधरपंत आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत ठाकरे यांच्या भेटीसाठी आली. तो शुक्रवारचा दिवस होता. प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याबाबत श्रीधरपंतानी सांगितलं होतं. मंडळी छापखान्यात येताच श्रीधरपंतानी झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंदे यांच्या चिरंजीवाने माधवरावने लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, 'गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी', या मथळ्याखाली लोकहितवादी साप्ताहिकात संपूर्ण पानभर हकीकत वृत्त छापून वक्तशीर बाहेर पडली.
१९२७ मध्ये महात्मा फुले जयंतीचे शताब्दीवर्ष होतं. त्यानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत होते. अशाप्रकारच्या कार्यक्रमांत श्रीधरपंतांचा सहभाग होता. मुंबईत गिरगाव आणि परळ या भागांमध्ये सभा झाल्या. त्यामध्ये श्रीधरपंतांची उपस्थिती लोकांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात व्यक्त केलेल्या विचारांमुळे त्यांची जनमानसातली प्रतिमा अधिकच उजळून निघाली. त्यांच्या भाषणांचा विविधवृत्ता मध्ये आलेला गोषवारा असा.
सत्य, न्याय व समानतेच्या सर्वमान्य तत्त्वांवर हिंदू समाजाची पायाशुद्ध नवी उभारणी करण्याचा सत्यशोधक समाजाचा हा प्रयत्न होता. ब्राह्मणेतर समाजाला आपल्या हक्कांची जाणीव प्रथम जोतिरावांनीच करून दिली. या दृष्टीने विचार केल्यास मागासलेल्या वर्गावर व अस्पृश्य समाजावर त्यांचे अलोट उपकार आहेत. महात्मा फुले हे आपल्या हिंदुधर्मीयांचे मार्टिन ल्युथर होत. ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध म्हणजे ब्राह्मण्याविरुद्ध त्यांची तक्रार हा आपल्याकडील प्रोटेस्टॅन्टिझम होय. आणि गेल्या दहा वर्षातील सत्यशोधक समाजाची चळवळ ही आमच्याइकडील रिफॉर्मेशनची चळवळ होय , हे तरुण पिढीने लक्षात ठेवावे... सरते शेवटी मला माझ्या ब्राह्मणेतर बंधूंना एवढेच सुचवायचे आहे की , सामाजिक व धार्मिक वादग्रस्त प्रश्न व त्यावरील मतभेद राजकीय चळवळीच्या आड येऊ देऊ नका.
श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली गायकवाड्यातच व्हायच्या. टिळकवादी आणि श्रीधरपंतांच्या संघर्षाचे कारण केसरीवरचा ताबा हा होता. केसरी च्या ताब्यावरूनच कोर्टकज्जे झाले. 'केसरी ताब्यात आला की महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन...!', अशी श्रीधरपंतांची मनीषा होती. तर न. चिं. केळकर आणि केसरीच्या अन्य ट्रस्टींना हा बापूंचा टिळकद्रोह वाटत होता. त्यामुळे चांगला व्यासंग आणि तर्कशुद्ध लेखनशैली असूनही त्यांचे लेखन कधी केसरीत छापून आलं नाही. त्यांच्या मृत्यूचीही बातमी फक्त एका छोट्या चौकटीत होती. त्या चौकटीत त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक करण्यात आलं होतं. श्रीधरपंतांनी आत्महत्येआधी तीन पत्र लिहिली होती; त्यापैकी एक पुण्याच्या कलेक्टरांना , दुसरे विविधवृत्त साप्ताहिकाला आणि तिसरं पत्र होतं ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना! कलेक्टरांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितलेय.
'... मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता... एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो.'
त्यावेळी केसरी चे ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी, बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या राजकारणामुळे श्रीधरपंत नेहमी वैतागलेले असत. 'केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दखवीन...!' असं त्यांचं म्हणणं असल्याचा उल्लेख प्रबोधनकार ठाकरे करतात. श्रीधरपंतांचा स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता. मनातली खळबळ, संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे काम ते प्रबोधनलारांकडे करत, श्रीधरपंतांना अवघ्या पुण्यात प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे बिर्‍हाड हे एकच असं ठिकाण होतं जिथं ते असं वागू शकत होते. गायकवाड वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली, तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झालं की, श्रीधरपंत तडक उठून प्रबोधनकार ठाकरेंकडे यायचे. अगदी मध्यरात्रीसुद्धा! पुणेरी ब्राह्मणी राजकारणाच्या त्रासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून ठाकरे दादरला आले नसते, तर कदाचित श्रीधरपंतानी आत्महत्या केलीच नसती. कारण त्यांची समजून प्रबोधनकार काढत असत. असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्यांना बिलकूल सहन होत नसे. ते एकदम उखडायचे. त्यांच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने ठाकरे यांच्यापुढे वाचला की, प्रबोधनकार धीराच्या नि विवेकाच्या चार उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून ते त्यांना शांत करीत असत, समजूत काढत. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्यांच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला, म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच श्रीधरपंत टिळकांची आत्महत्या झाली, ही दुदैवी घटना घडली!
२५ मे १९२८ हा दिवस श्रीधरपंतांसाठी नेहमीसारखाच उजाडला होता. फरक इतकाच होता की, हा दिवस मावळला तो श्रीधरपंतांचा जीव घेऊन! दररोज संध्याकाळी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज, भांबुर्ड्याकडे श्रीधरपंत नेहमी फिरायला जात. तसंच ते २५ मे रोजीच्या संध्याकाळीही फिरायला गेले. त्यामुळे त्यात कुणाला काही वावगं वाटलं नाही. पण त्या दिवशी फिरायला जाताना त्यांनी पैशांचं पाकीट किंवा इतर कुठल्याही गोष्टी सोबत नेल्या नव्हत्या. भांबुर्डा रेल्वेस्थानकाच्या दिशेनं निघण्याआधी त्यांनी तीन पत्र लिहिली, एक जिल्हाधिकाऱ्यांना, दुसरे विविधवृत्तचे संपादकांना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना! आणि ती पत्रं त्यांनी टपालपेटीत टाकली. घरातून बाहेर पडण्याआधी श्रीधरपंतांनी मुलं आणि पत्नीला डोळेभरून पाहिलं. ते घरातून निघाले आणि थेट भांबुर्डा रेल्वेस्थानकाजवळील रूळापाशी जाऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाट पाहू लागले. रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येताच ते सावध झाले. गाडी जवळ आल्यावर श्रीधरपंतांनी रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिलं. क्षणार्धात सारं काही संपलं! घटनास्थळी लोक जमले, श्रीधरपंतांच्या मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. 'लोकमान्यांच्या लहान्या मुलाची आत्महत्या...!' ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पुण्यात पसरली. श्रीधरपंतांनीच स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते घटनास्थळाकडे धावले. पोलीस पोहोचले आणि पंचनामा झाला. पार्थिव टिळक कुटुंबीयांच्या गायकवाड वाड्यात आणलं गेलं. श्रीधरपंतांच्या पत्नी शांताबाई आणि तिन्ही लेकरं टाहो फोडत होती. थोरला मुलगा जयंत सात वर्षांचा होता. त्यापाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती. चौथ्या बाळासाठी शांताबाईंना दिवसही गेले होते. टिळक कुटुंबीयानं आपला तिशीतला मुलगा आणि समता संघासह समाजसुधारकांच्या वर्तुळानं आपला सच्चा साथी गमावला होता. महाराष्ट्राच्या आभाळात दु:खाचं सावट पसरलं होतं.
श्रीधरपंत टिळकांच्या आत्महत्येबाबत त्यांचे बालमित्र नानासाहेब चापेकरांनी नमूद करून ठेवलंय की, "पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधले माझे वर्गबंधू श्रीधरपंत ऊर्फ बापूराव टिळक यांनी पुण्याच्या मुळामुठेच्या संगमावरल्या, पूर्वी सेशन्स कोर्ट असलेल्या बेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या रेल्वेलाईनवर आगगाडीखाली पडून आत्महत्या केल्याची दु:खद वार्ता समजली...!"
श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली, याचं उत्तर त्यांनी लिहिलेल्या त्या तीनपैकी एका पत्रात आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे विविधवृत्त मासिकाचे संपादक श्री. प्रधान, पुण्याचे जिल्हाधिकारी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा तिघांना हे पत्र श्रीधरपंतांनी लिहिले. यातल्या एका पत्रात श्रीधरपंतांच्या आत्महत्येचं कारण दडलेलं असल्यानं या पत्रांना त्यांच्यानंतर अत्यंत महत्त्व आलं. या तिन्ही पत्रांमध्ये नेमकं काय होतं, हे आपण एक एक पत्रांमधल्या सविस्तर मजकुराद्वारे जाणून घेऊ.
यातलं पहिलं पत्र होतं विविधवृत्त मासिकाच्या संपादकांना. या पत्रात लिहिलं होतं :
"कृ. सा. न. वि. वि.
शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविधवृत्तच्या अंकात छापून येईलच. तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारातही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे. तरी ही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच. कारण आपला मजवर फारच लोभ होता. इतका की, त्यातून उतराई होणे या जन्मी तरी मला शक्य नाही. या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही. मित्रमंडळींस नमस्कार कळवावा. कळावे, हे विनंती.
आपला,
श्री. ब. टिळक"
हे पत्र २६ मे १९२८ रोजी सकाळी म्हणजे श्रीधरपंतांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विविधवृत्तच्या संपादक प्रधानांच्या हाती पडलं. तोवर श्रीधरपंतांचं निधन झालं होतं. मग हे पत्र जसंच्या तसं विविधवृत्त मासिकानं पुढील अंकात म्हणजे ३ जून १९२८ च्या अंकात प्रकाशितही केलं होतं.
यातलं दुसरं पत्र होतं, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना. श्रीधरपंतांच्या निधनानंतर 'विविधवृत्त' आणि 'दुनिया' या मासिकांनी विशेषांक काढले. यातल्या विविधवृत्त मध्ये 'कै. श्रीधर बळवंत टिळक...!' मथळ्याचा लेख डॉ.आंबेडकरांनी लिहिला. हा अंक २ जून १९२८ रोजी प्रकाशित झाला. या लेखात बाबासाहेबांनी सांगितलंय की, २६ मे १९२८ रोजी ते जळगावात बहिष्कृत वर्गाच्या सभेसाठी उपस्थित होते. तिथं त्यांना श्रीधरपंतांच्या निधनाची बातमी कळली. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर कुठलीतरी मोठी दु:खद घटना घडल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. त्यांनी उपस्थितांना ही बातमी सांगितली आणि आदरांजली वाहण्यासाठी उपस्थितांना उभे राहण्यास सांगितलं. नंतर बाबासाहेब सभा सोडून मुंबईत दाखल झाले. दादरला कार्यालयात पोहोचले. कार्यालयात पोहोचल्यावर समोर टेबलावर 'टाईम्स'चा अंक होता. तो हाती घेताना त्यांना बाजूला एक पत्र दिसलं. ते पत्र होतं श्रीधरपंतांनी पाठवलेलं. बाबासाहेबांनी टाईम्सचा अंक तिथेच टाकला आणि श्रीधरपंतांचं पत्र हाती घेतलं. त्या पत्रात लिहिलं होतं :
"स. न. वि. वि.
हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच बहुदा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल! आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा.
कळावे, लोभ असावा ही विनंती.
आपला नम्र,
श्रीधर बळवंत टिळक"

श्रीधरपंतांनी तिसरं पत्र लिहिलं ते, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना. हे पत्र श्रीधरपंतांच्या आत्महत्येचं कारण सांगणारं आहे. त्यामुळे या पत्राला त्यांच्या निधनानंतर अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. या पत्रात श्रीधरपंतांनी लिहिलं होतं :

"मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता. एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो."
या तिसऱ्या पत्रातला 'माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता...!' हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या वाक्याचा संबंध 'केसरी' वृत्तपत्राच्या मालकीचा वाद आणि इतर मालकी हक्कांच्या वादाशी संबंध आहे आणि या गोष्टींमुळे श्रीधरपंतांना कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागले होते. परिणामी त्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता.
वारसाहक्काचा वाद १९२४ नंतर सुरू झाल्याचे दिसून येतं. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपत्राबाबत त्यांचे जावई केतकर वकिलांनी माहिती दिली की, मृत्यूपत्रानुसार टिळकपुत्रांना केसरी आणि मराठा च्या ट्रस्टवर राहता येणार नाही. टिळकपुत्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढील कारवाई केली. मात्र, पुढे दोन्ही टिळकपुत्र आणि त्यातही श्रीधरपंत हे पुरोगामी वर्तुळात वावरू लागल्यानं नवे साथीदार लाभले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, 'केसरी' आणि 'मराठा' ट्रस्टबाबत लोकमान्यांचे भाचे विद्वांस आणि अन्य मंडळींनी आपल्याला फसवलंय. त्यात हे धोंडोपंत विद्वांस हे लोकमान्य टिळकांचे भाचे होते. टिळक स्वातंत्र्य चळवळीच्या विविध कामानिमित्त आणि विशेषत: मंडालेच्या तुरुंगात असताना, घराकडे दुर्लक्ष होत असे. त्यात टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यासुद्धा आजारी असत. म्हणून टिळकांनी धोंडोपंत विद्वांस यांच्याकडे घराची जबाबदारी दिली होती. परिणामी रामभाऊ आणि श्रीधरपंत यांना लोकमान्य टिळक हयात असल्यापासूनच लहान-सहान गोष्टींसाठीही विद्वांसांवर अवलंबून राहावं लागत असे. याबाबत दोन्ही टिळकपुत्रांच्या मनात त्यांच्याबद्दल रागाची भावना होती. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर दुखवट्याचे दहा दिवस संपले आणि श्रीधरपंतांचे थोरले बंधू रामभाऊ आणि श्रीधरपंतांचा धोंडोपंत विद्वांसांवरचा अनेक वर्षांपासून असलेला राग उफाळून आला. परिणामी रामभाऊ आणि श्रीधरपंतांनी धोंडोपंत विद्वांसांना संसार आणि कुटुंबासह गायकवाड वाड्याबाहेर काढलं. टिळकांच्या मुलांचे हे कृत्य विद्वांसांच्या वर्मी लागलं. जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हीच मनोवस्था नमूद केलीय.
लोकमान्य टिळकांना तीन मुली आणि तीन मुलं होते. त्यातला थोरला मुलगा विनायक फार कमी वयातच प्लेगच्या साथीत वारला. त्यामुळे पाच अपत्यं राहिली. तिन्ही मुलींचे टिळकांनी आपण हयात असतानाच लग्न लावून दिलं होतं. उरलेली दोन मुलं म्हणजे रामभाऊ आणि श्रीधरपंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते. ते वयाने लहान होते. यातले श्रीधरपंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हते. मात्र, टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. वयाच्या ३२ व्या वर्षी श्रीधरपंतांची जीवनयात्रा संपली. तोवर त्यांनी प्रबोधनकार ठाकरें यांच्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांशी मैत्री केली होती. त्यांचा स्वभाव आणि विचार पाहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना भाऊ मानू लागले होते. इतकी ही जवळीक होती. ज्या लोकमान्य टिळकांशी बाबासाहेबांचा वैचारिक वाद झाला, दर दोन दिवसांआड बाबासाहेबांनी 'मूकनायक' मधून लोकमान्य टिळकांवर सडेतोड टीका केली, त्याच लोकमान्य टिळकांच्या मुलाशी बाबासाहेबांची मैत्री ही त्यावेळी केवळ चर्चेचीच नव्हे, तर त्यांच्या विरोधकांमध्ये टीकेचीही लक्ष्य असे. श्रीधरपंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा स्नेह होता. त्यांनी आत्महत्येआधी शेवटचं पत्र आंबेडकरांना पाठवल्याचं वर नमूद केलंच आहे.
श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर मामा वरेरकरांच्या 'दुनिया' साप्ताहिकानं 'टिळक अंक' प्रसिद्ध केला होता. त्यात बाबासाहेबांनी श्रीधरपंतांवर लेख लिहिला होता. अनंत देशमुखांनी श्रीधरपंतांवरील चरित्रात हा लेख समाविष्ट केलाय. बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधरपंत टिळक यांच्यातील स्नेह या उताऱ्यातून सहज लक्षात येतो. डॉ. आंबेडकर लिहितात,
'कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे...!'
याच लेखात बाबासाहेबांनी केसरी संदर्भातल्या वादाचाही उल्लेख केलाय. त्या उल्लेखेत बाबासाहेब म्हणतात की,
'माझ्या मते श्रीधरपंतांना 'केसरी'त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. 'केसरी' पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती 'केसरी' गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने 'केसरी' च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे, तर भारदस्त लेखक या दृष्टीने 'केसरी' च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता...!'
'राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने 'केसरी' ला काही धोका नव्हता, असे असताना त्यांना 'केसरी' त जागा मिळाली नाही. यांचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. 'केसरी' त जागा मिळाली असती तरीही 'केसरी' कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज 'केसरी' कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण 'केसरी' कंपूला असती तर बरे झाले असते...!'
श्रीधरपंतांचा संबंध केवळ बाबासाहेबांशीच नव्हे, तर प्रबोधनकार ठाकरेंसह अनेक पुरोगामी व्यक्तींशी पुढे येत गेला. पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये, असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अर्ध्वयू त्यांचे जवळचे मित्र होते.
प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या 'माझी जीवनागाथा' या आत्मचरित्रात श्रीधरपंतांबाबत लिहिलंय. त्यांच्या आत्महत्येनं प्रबोधनकारांना मोठा धक्का बसला होता. प्रबोधनकारांनी 'माझी जीवनगाथा' मधील लेखाचा शेवट करताना त्यांनी म्हटलंय की,
'असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने माझ्यापुढे ओकला की धीराच्या नि विवेकाच्या इतर उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करीत असे. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला, म्हणजे ते लोक मनातल्या मनात कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली...!'
१५ मे १९२० रोजी विनायक विष्णू बापट यांच्या भाचीशी म्हणजे शांताबाईशी श्रीधरपंतांचं लग्न झालं. पुण्यातल्या तुळशीबागेजवळील भाऊमहाराजांच्या वाड्यात हा सोहळा पार पडला. लग्नावेळी श्रीधरपंत बीएच्या वर्गात शिकत होते. लग्नानंतर शांताबाईंचं नाव लक्ष्मी असं ठेवण्यात आलं. श्रीधरपंतांचे वैवाहिक जीवन सुखाचं होतं. जयंत, कालिंदी, रोहिणी अशी अपत्ये श्रीधरपंत हयात असताना, तर श्रीधरपंतांच्या आत्महत्यावेळी शांताबाई गरोदर होत्या. श्रीधरपंतांच्या निधनानंतर काहीच दिवसात श्रीकांत हा मुलगा झाला. अशी एकूण चार मुलं श्रीधरपंतांना झाली. २५ मे १९२८ रोजी आत्महत्येचं पाऊल उचलण्यापूर्वी घरातून निघताना तीन मुलांना आणि पत्नीला त्यांनी डोळे भरून पाहिले आणि घराबाहेर पडले, ते कायमचेच!
माझी जीवनगाथा या आत्मचरित्रातून प्रबोधनकार ठाकरे जसे भेटले. तसेच तत्कालीन सामाजिक, राजकीय चळवळीचा एक खजिनाही भेटतो. त्यात प्रबोधनकारांनी आपल्या अनेक दोस्तांचीही गाठ घालून दिलीय. श्रीधरपंत टिळकही त्यातलेच एक. लोकमान्यांचा हा बंडखोर मुलगा अवघ्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ट्रेनखाली आत्महत्या करतो, हे वाचून धक्का बसला. यात वैचारिक, भावनिक मोठाच संघर्ष. पण कधी त्यावर कुणी कादंबरी लिहिली नाही, कधी कुणी नाटक लिहिलं नाही. सिनेमा तर दूरच. तुम्हाला आम्हाला हरीलाल गांधी माहितेय, महात्मा गांधींचे थोरले चिरंजीव. त्यांच्याविषयी बरंच लिहिलं गेलंय. नाटक येऊन गेलंय, 'गांधी...माय फादर ' नावाचा सिनेमाही येऊन गेलाय. आणि श्रीधरपंत टिळक?... हो, लोकमान्यांचे धाकटे चिरंजीव. या बापलेकांमधला संघर्षही तितकाच कटू आणि नाट्यपूर्ण. पण हे अहंकारासाठीचं नाही, तर तत्त्वांसाठीचं त्यांचं भांडण होतं. शिवाय हा संघर्ष आपल्या आजच्या जगण्याशीही अधिक निगडीत असलेला होता. तरीही का कोण जाणे, टिळकवादी म्हणवून घेणाऱ्यांच्या छळाला कंटाळून वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी रेल्वेखाली जीव देणाऱ्या या लोकमान्य टिळकांच्या पुत्राविषयी महाराष्ट्र आजपर्यंत तसं मौनच बाळगून आहे. अख्ख्या हिंदुस्थानाला आपल्याबरोबर खेचण्याची धमक असणाऱ्या आपल्या हिमालयाएवढ्या उंचीच्या वडिलांच्या प्रभावातून बाहेर पडणं, ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. अभ्यासात कमकुवत म्हणून हिणवल्या गेलेल्या श्रीधरपंतांनी टिळकांच्या हयातीतच हे करून दाखवलं होतं. आम्हाला 'लोकमान्य' व्हायचे नाही...! असं खुद्द लोकमान्यांना ऐकवण्याची छाती श्रीधरपंतांकडे होती. त्याच छातीने ते हरेपर्यंत टिळकवाद्यांशी निकरानं लढत राहिले...! तळमळत आत्महत्या करण्यापेक्षा आपली तत्त्वे बाजुला ठेवून टिळकवाद्यांशी जमवून घेणं श्रीधरपंतांसाठी सोपं होतं. त्यात व्यावहारिक हीत देखील होतंच शिवाय काँग्रेसमधली टिळकांचा राजकीय वारशाची वस्त्रेही सहज त्यांच्यापर्यंत पोहोचली असती. पण या सिंहाच्या छाव्याने कठीण मार्ग पत्करला. आपल्या तत्त्वांसाठी तळमळत आपला जीव दिला. महाराष्ट्रातल्या सनातनी ब्राम्हणांना सुधारणेची संथा देण्याचं मोठं काम श्रीधरपंत करू शकले असते. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. पण त्याकाळच्या महाराष्ट्राला तसं वाटलंच नाही आणि आताच्या महाराष्ट्राला त्याचा काहीच पत्ताच नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९ 



No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...