Monday 13 November 2023

राजकीय धडाऽऽम धूऽऽम.....!

"सध्या दिवाळीचे दिवस त्यात आज लक्ष्मीपूजन म्हणजे फटाक्यांचा जल्लोष! पण सगळ्याच शहरात हवेचं प्रदूषण वाढलंय. आपल्या सोलापुरात कोरड्या हवेत त्याचं परिणाम जाणवत नसला तरी दिल्लीपासून पुण्यामुंबईपर्यंत शहरातली हवा प्रदूषित झालीय. तशीच राजकीय हवा देखील काही वर्षापासून प्रदूषित झालीय. दिवाळीचा मूड, फराळाची चव, नव्या कपड्यांची धूम अशात विनोदाची पखरण असेल तर मजाच होईल. हे जाणून राजकीय फटाक्यांची धडाऽऽम धूऽऽम आम्ही सादर करतो आहोत. पण ती जरा लाईटली घ्या. आम्हाला कुणाला दुखावण्याचा वा त्यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. केवळ गंमत म्हणून हे लिहिलंय... सांभाळून घ्या!"
------------------------------------

*स* र्वप्रथम वाचकांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा! पर्यावरणाचं भान ठेवूनच आणि सरकारनं केलेल्या विनंतीनुसार यंदाची दिवाळी सर्वांनी साजरी करायचीय, असं आम्ही या ठिकाणी आवाहन करु. सरकारमधल्या मंत्र्यांनी मोठी आतषबाजी चालली असली तरी आपण आपले सर्व आदरणीय नेते पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची विनंती करताहेत, त्यांचं ऐकावं! देशातलं आणि राज्यातलं राजकारणातलं वातावरण बिघडलेलं असलं तरी आपल्याला तसा काही फरक पडत नाही. पण शहरातली हवा प्रदूषित झाली असल्यानं आपण आपल्यासाठी, पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करावं? असं आम्ही काही सुजाण व्यक्तींना विचारलं तर कुणी सांगितलं, फटाके उडवू नयेत. कुणी सांगितलं, आवाज करणारे, ध्वनी प्रदुषण करणारे फटाके उडवू नयेत. कुणी म्हणालं, दिवे जरा कमी लावा. कुणी म्हणालं आतिषबाजी आणि रोषणाई कमी करा, आणि त्यातून वाचलेला पैसा शिल्लक ठेऊन तो विकासकामांसाठी वापरा. एका सुजाण गृहस्थानं ‘चकल्या कमी खा’ असे उत्तर दिल्यानंतर आम्ही विचारणं बंद केलं. असो. पर्यावरणपूरक दिवाळीसाठी आम्ही काही फटाक्यांचे काही नवीन प्रकार इथं देत आहोत. त्यातले काही फटाके नेहमीप्रमाणे फुसके निघण्याची शक्यता आहे. काही उगाचच जोरात आवाज करतील. पण ते सारे कोण, किती आवाजात आहेत हे निवडणुकीच्या काळातच प्रचारादरम्यान कळेल!
कधीकाळी राजकीय अस्पृश्य असलेला, कोणीही फारसा हातात न घेणारा कमळ ब्रँड सुतळी बाँम्ब! आज मात्र देशात आणि राज्यात खूपच डिमांडमध्ये आहे. गेली दहा वर्षे मार्केटमध्ये तेजीत असलेला हा आयटम आहे. आता फारसं कुणाला जवळ करायच्या मूड मध्ये नसतो. पण निवडणुक जवळ आल्यावर तो सर्वानाच मिठी मारण्याच्या प्रक्रियेत असतो. असा हा कमळ ब्रँड सुतळी बॉम्ब ! काही लोक तो वाड्यात, चाळीच्या जिन्यात मडक्यात वा डब्यात लावून आहे त्यापेक्षा मोठा आवाज करतात. हा कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली पेटवण्यासाठी उपयुक्त ठरतो आहे.
फिफ्टी शॉट्स धनुष्यबाण बॉम्ब, हा नवा आयटम गेल्याच वर्षी बाजारात आला! हा तसा अत्यंत डेंजरस!! एकाच वातीवर सलग एकापाठोपाठ पन्नास फटाके धडामss धुम असा आवाज करत फुटतात. हा खोक्यात मिळतो! किंवा खोक्यावरही सहज मिळतो. त्यामुळं त्याला खोक्याचा बॉम्बही म्हणतात. मात्र यात एक दक्षता घ्यायला हवीय ती म्हणजे त्याची वात नीट पेटवता आली पाहिजे. अनेकदा असं होतं की, तो नीट पेटला नाही, असं वाटून फटाकेवादक म्हणजे आपल्याकडे जसे पेटी वाजवणारा पेटीवादक, तबला वाजवणारा तबलावादक तसा फटाके वाजवणारा फटाकेवादक हा त्याच्या जवळ जातो, आणि त्याची दाढी नसली तरी ती जळते!
मशाल अग्नीबाण, याचं नाव तुम्हाला जपानी वाटत असलं तरी अस्सल मऱ्हाठी फटाका आहे हा! पूर्वी तो फार चांगला चालत असे. तो ज्याचा जवळ आहे असं म्हटलं तर त्याचा रुबाब असायचा. अर्थात दहशत असायची मात्र हल्लीच जरा प्रॉब्लेम झालाय. फिफ्टी धनुष्यबाण शॉट्सनं त्यांचं मार्केट खाल्लंय. शिवाय गेल्या पावसाळ्यात कंप्लीट माल सर्द झाल्याची तक्रार होलसेल विक्रेते करत आहेत. तेव्हा तो खरेदी करताना नीट बघून घ्यावा. घरी आणल्यावर थोडं ऊन दाखवावं! पण एकदा का तो पेटला की कुठल्याही दिशेनं जाऊ शकतो. त्याचा काहीही भरोसा देता येत नाही. हा बाण पेटवण्यासाठी घड्याळछाप फुलबाजीच लागते.
घड्याळछाप फुलबाजी हा अतिशय उपयुक्त फटाका आहे. किंबहुना तो धड ना फटाका, धड ना अगरबत्ती असा हा मधला प्रकार आहे. परंतु, कुठल्याही प्रकारचा फटाका नीट शिलगावण्यासाठी ही फुलबाजी उपयुक्त ठरते. तो हमखास पेटवणार! तसा फार काही धोकादायक नाही. विशेषत: हात भाजण्याची भीती तर अजिबात नाही.
हात छाप भुईचक्कर हे स्वत:भोवतीच गोलगोल फिरणारा आतषबाजी फटाका आहे. जळून गेल्यानंतरही बराच वेळ गरगरत राहातो. अतिशय स्वयंकेंद्रित असा हा फटाका आहे! सुतळी बॉम्बचा धमाका झाला की मात्र हे फिरायचेच थांबत. पेटायला बराच वेळही लागतो. गुळगुळीत पृष्ठभागावर चांगला पेटतो. घड्याळ छाप फुलबाजीची आग नसेल तर हे भुईचक्कर काहीही कामाचे राहात नाही.
नवनिर्माण आपटबार हा धर की आपट, धर की आपट! असा फटाका आहे. डझनाच्या हिशेबात सहज मिळतात. फुटल्यावर खळ्ळ किंवा खट्याक असा आवाज निर्माण करतात. हा हाताळायला एकदम सोपा आहे! पण त्याला डिमांड फार कमी!! कारण शिवाय फुटेलच याची काहीही ग्यारंटी नाही. याखेरीज लवंगी, डांबरी माळ, पोपटबार, टेलिफोन, प्यारेशूट, चम्मनचिडी, सापगोळ्या, टिकल्या असेही अनेक फटाक्यांचे प्रकार आहेत. त्यांची ओळख यथावकाश करुन दिली जाईल.
विस्कटलेल्या महाराष्ट्रातले विस्कटलेले, सटकलेले राजकारण डोक्यावर टांगती तलवार ठेऊनच वावरतेय. पण आता आता कुठे हे अस्ताव्यस्त पसरलेले सर्व राजकीय नेते घरी थोडे स्थिरस्थावर होताहेत. नाहीतर केवढी धावपळ होती त्यांची. कुणी सुरत-गुवाहाटी-गोवा, कुणी नाशिक-नागपूर-औरंगाबाद तर कुणी मुंबई-कोकण अहोरात्र फिरत होते. एकूणच 'आठशे खिडक्या नऊशे दार....!' तालावर अठराशे बस. सतराशे कार्यकर्ते. छप्पन नेते आणि प्रत्येकाचे वेगवेगळे गट असला पारदर्शी राजकीय प्रवास सुरू होता. तो कुठं स्थिरस्थावर होतो न होतो तोच घड्याळ उलटे फिरलं. आणि सत्तेच्या खुर्चीला चिकटलं! मात्र दिवाळी आलीय आता कुठं थोडं थोडं क्लिअर व्हायला लागलंय की कोण नक्की ‘कुठेय’ ते. पण तरीही आईशप्पथ सांगतो आज रात्री बारा वाजेनंतर काय होईल याची शास्वती मी देऊ शकत नाही. एकूणच या सत्तांतराच्या राजकीय दिवाळीत बरेच फटाके ‘फुटले’. काही ‘फोडले’. काही नुसतेच ‘उडाले’. काहींनी लोकांच्या कानठळ्या फोडल्या तर काही फुटतील फुटतील म्हणता म्हणता ‘फुस्स’ झाले! काहींनी तर प्रमाणापेक्षा जास्त ‘फाऽऽट-फूट’ करत आवाजाच्या डेसीबलच्या मर्यादा ओलांडल्या. धनुष्यबाण तुटणार वाटत असतानाच तो सत्तेकडे सरकला. वाघाचं विभाजन झालं, मग मशाल पेटली म्हणून या दिवाळीत आवाज कमी होईल असं सर्वांनाच वाटलं होतं. पण झालं उलटच! काही जुने आजवर फारसे कधीही ‘न वापरले गेलेले’ फटाके एकदम खतरनाक धडाऽऽम धूम आवाज करत फुटायला लागलेत. त्यांचा आवाज गल्लीपासून चक्क दिल्लीतल्या काहींच्या ‘मनातल्या मनात फुटणार्‍या’ फटक्यांनाही ऐकू गेलाय! अशाच काही टिपिकल राजकीय फटाक्यांची आज आपण ओळख करून घेऊ. पण विनंती एवढीच की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व जरा ‘लाईटली’ घ्या..!
मातोश्री मशाल, हा एक टिपिकल सुतळी बॉम्ब आहे. अगदी साधा सरळ शांत संयमी दिसत असला तरी अगदी मोक्याच्या वेळी हा प्रचंड मोठ्या आवाजानं फुटून महाराष्ट्र दणाणून सोडतो. मग त्याच्या आवाजानं भलेभले गांगरून दिल्लीपर्यंत हेलपाटे मारून येतात. हा फटाका शक्यतो ऑनलाईन फुटतो, कारण त्याला फेसबुकी सवय लागली होती. पण दसर्‍या मेळाव्यात हा स्टेजवर नुसता उभा राहिला तरीही प्रचंड मोठा आवाज होऊन विरोधकांच्या कानठळ्या बसतात.
नागपुरी कमळ बॉम्ब, दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिमाखाने वावरणारा, फुटणारा इतरांनाही ‘फोडणारा’ हा एक स्टँडर्ड फटका आहे. फुटेल फुटेल म्हणता म्हणता सर्वांनी कानात बोटं घातली, डोळे गच्च मिटले; तर तेव्हा मात्र हा चतुरपणे थोडा पॉज घेतो अजून का फुटतं नाहीये म्हणत लोकांनी कानातून बोटं काढून जरा डोळे उघडले की हा धूमधडाक्यात फुटतो! समोरच्याला हँग करून देणारे हे धक्कातंत्र वापरण्यात हा ‘फटाका’ टरबूज सॉरी तरबेज आहे.
बारामतीचा भुईनळा, दिल्लीतल्या ‘महाभयंकर’ मोदीशा फटाक्याला लहानपणी ‘बोट’ धरून अख्खी सहकारी शिवकाशी फिरवून आणणारा हाच तो ‘ब्रँडेड’ फटाका. इतर फटाके साध्या पावसाळी वातावरणातही वाती साधळून फुस् होऊन जागेवर पडत असले तरी याची ‘खुबी’ मात्र निराळीच आहे. भर पावसातही हा प्रचंड ताकदीनं आपला ‘जलवा’ दाखवत मोठमोठा आवाज करत आणि इतर फटाक्यांच्या ‘वाती सोलत’ फुटत असतो. ‘समआवाजी’ फटाक्यांना सोबत घेऊन सर्वांचा ‘दारू-गोळा’ एकत्र करून हा मोठा हायड्रोजन बॉम्बही साकारू शकतो. अशी याची ख्याती त्यामुळं सर्वत्र याला डिमांड नेहमी असते. चर्चा असते.
हात छाप नाना फटाका, हा फटाका ‘ऑलवेज’ फुटतो. फक्त फुटण्याच्या ‘टायमिंग’मध्ये थोडी गडबड करतो. पण म्हणून हा कधी माघार घेत नाही. पेटत्या कमळ छाप सुतळी बॉम्बला स्पर्श करून दिमाखात पुन्हा सहीसलामत ‘रिटर्न’ येत हा कारण नसताना नागगोळीजवळ उभा राहून स्वतःचा चेहरा ‘काळा’ करून घेतो. पण तरीही पुन्हा दुसर्‍या दिवशी स्वच्छ चेहर्‍ यानं हा मैदानात हजर असतोच असतो..!
बारामतीची तडतडणारी फुलबाजी, या फटाक्याची तर बातच निराळी आहे. याला तडतडायला ‘दिवाळी’ लागत नाही की ‘दसरा’ लागत नाही. हा एखाद्या सर्वसामान्य दिवशीही भल्या ‘पहाटे’ सहज तडतडू शकतो. या फटाक्याची फुटण्याची पद्धत पाहता याची धास्ती गल्लीतल्या ‘समोरच्या’ लोकांना तर असतेच त्यापेक्षा जास्त त्याच्या ‘घरातल्या’ लोकांनाही असते. धरण कोरडे पडू लागले की मग लोकांना या फटाक्याची आवर्जून आठवण येते. वादाच्यावेळी याचा आवाजच येत नाही. आणि आजारातून उठताच दिल्ली गाठतो. महाभयंकर मोदीशा बॉम्बशी सलगी साधतो तसं आपलंही साधतो!
ठाण्याचा सातारी फटाका, ठाण्याच्या गल्लीबोळात फुटणारा हा फटाका ‘रागाच्या भरात’ धनुष्यबाण ही ‘तोडूफोडू’ शकतो. हा खरं तर फटाका नसून ‘भुई चक्कर’ अर्थात ‘भुईनळ’ आहे. महाराष्ट्राची भुई ‘दिवसभरात’ पिंजून काढत हा ‘रात्रीत’ दिल्लीत जावून ‘लखलखून’ येतो. सुरत-गुवाहाटी-गोवा फिरता फिरता तो आता आता ‘सोबत’ आलेल्यांच्या ‘गल्लीबोळातही’ फिरून येतो. तेरावा खेळाडू म्हणून खेळता खेळता तो अचानक ‘कॅप्टन’ होऊन जातो. ‘विकेट किपरच्या’ सांगण्यानुसार तो मग ‘फिल्डींग’ही सेट करतो. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये हा समोरच्याला धडाकेबाज फोडतो आणि त्यांचाच आवाज एन्जॉय करतो. स्वत: मात्र ‘वात विझवून’ दिवाळी एन्जॉय करतो.
शिवतीर्थ कृष्णकुंजी फटाका, तुम्ही कितीही दिवाळीचे सोहळे साजरे करा. कितीही फटाक्यांच्या स्पर्धा भरवा. स्वतः जावून याची ‘वात पेटवा’ किंवा याला धगधगत्या ‘चुलीत टाका’ हा त्याची इच्छा नसेल तर फुटणार नाही म्हणजे नाहीच! पण जेव्हा याला फुटण्याची इच्छा होईल; मग मात्र विचारूच नका! हा तेव्हा स्वतः फुटायचं सोडून ‘लाईनीत’ सर्वांना उभं करून उभा, आडवा, तिडवा फोडतो! फोडतो तर फोडतो वरून उरलेली फटाक्यांची दारूही पुन्हा जमा करून त्यांचीही ‘पद्धतशीर विल्हेवाट’ लावतो. हा फटाका शक्यतो कुणी ‘विकत’ आणत नाही. पण ‘समोरच्याच्या अंगणात’ हा फुटत असतांना सर्व गल्ली ‘आपल्याच फटाक्यासारखी’ त्याची ‘एन्जॉयमेंट’ करून घेते अन् नंतर गुपचूप आपापल्या घरी येऊन झोपून जाते.
सिंधुदुर्गचा नानिनी लड, हे स्वतः ‘तडतडे फटाके’ असले तरी हे स्वतःच्या खिशातही सदासर्वदा लवंगीची लड ठेवून असतात. ‘दिसला पत्रकार की फोड लवंगीची लड’ असा यांचा ‘रेग्युलर’ कार्यक्रम असतो. नाहीच दिसला कॅमेरा तर मग यांच्या ‘तडतडण्याचा’ आवाज हॅशटॅगसह ट्विटरवर घुमतो राहतो. शक्यतो यापैकी एकाच्या वातीला अगरबत्ती लावली तरी त्याच्या आधी यांच्यातला ‘दुसराच’ फुटतो.
समतावादी आर्मस्ट्राँग बॉम्ब, ‘एकमेकांच्या’ पेटलेल्या वाती ‘विझवायच्या’ नादात हे तीघेही पाहिजे तसा आवाज करत, प्रकाश पाडत अजून तरी ‘फुटू’ शकलेले नाहीत. कुण्या एके काळचे माझगावचे नंतर नाशिकचे झालेले ‘ट्रिपल बार’ असलेले सध्या फुटण्यापेक्षा साध्या पेटण्यावरही ‘इंटरेस्ट’ घेताना दिसतात. अधूनमधून आवाज काढत दणाणूनही सोडतात. तिकडे पलीकडे आंतरवाली फटाका, मात्र ‘भूकंपसदृश’ हादरे देत, सदासर्वदा पेटलेलेच रहायचा प्रयत्न करत विझायचा विषयही घेत नाहीत..!
रामदासी बॉम्ब, ‘फुटण्या’पासून या फटाक्यानं स्वतःला आवरून आता ‘उडण्याच्या’ कॅटेगरीत शिफ्ट केलंय. कानठळ्या बसवणार्‍या आवाजापेक्षा ‘सुमधूर साऊंड’ काढत समोरच्याचे मनोरंजन करण्यात या फटक्याला जास्त ‘इंटरेस्ट’ आहे. सुसाट उडणार्‍या बाणाची चपळाई याच्या अंगात आहे. आपल्या अंगणातली दिवाळी संपली की मोठ्या चपळाईने हा कधी समोरच्याच्या अंगणातली दिवाळीत जाऊन ‘जॉईन’ होतो हे आपल्याला समजतसुद्धा नाही. हा ‘बाय चान्स’ फुटलाच तर नेहमी ‘चारोळी’त फुटतो. कधी त्याच्या अशा फुटण्याने भयंकर ‘मनोरंजन’ होते तर कधी उगाचच या फटाक्यासाठी पदरचे पैसे मोडले एवढा हा निराश करून जातो.
नव्यानं बाजारात आलेला अंधारी बॉम्ब हा स्पेशियल ‘लक्ष्मी’ आकाराचा बॉम्ब जरी दिसायला ‘नॉर्मल साईजचा’ दिसत असेल पण तरीही हा जेव्हा फुटतो तेव्हा तो नावाप्रमाणेच समोरच्याच्या डोळ्यांसमोर ‘अंधार्‍या’ आणून सोडतो. कधीमधी फोडायला ‘उपलब्ध नसलेल्या’ अलिबागी संजय ‘विस्फोटक फटाक्याची’ कमतरता हा बॉम्ब जाणवू देत नाही. एकामागे एक ‘असंख्य शॉट्स’ आकाशाच्या पाठीवर उडवत हा मनसोक्त फुटतो आणि फोडतोही..!
गद्दारी फटाका, या फटाक्याचं थोडं ‘विचित्रच’ काम आहे. ज्यानं हा फटाका आठवणीनं बाजारातून ‘सोबत’ आणला हा कधी कधी ‘त्याच्याच’ हातात फुटून त्याला ‘जखमा’ देतो. याला फोडायला कुणी अगरबत्ती जवळ घेऊन जायचीही गरज नाही. हा स्वतःच अगरबत्ती आपल्याच हातात घेऊन फिरत असतो. मग त्याच्याही नकळतच तो अचानक पेटतो.. फुटतो आणि कारण नसताना इतरांनाही फोडतो, तोडतो, अन् मोडतोही.
वाघाचा विचित्र फटाका, हा पूर्वी फारसा आवाज करत नसे पण कमळ सुतळी बॉम्बच्या सानिध्यात आल्यापासून नुसता धूमधडाका सुरू असतो. याच्याच संगतीला मागोठ्ण्याचा प्रवीण फुलबाजी, लाडाचा प्रसाद कंत्राटी सुरसुरी फटाका, नागोठ्ण्याची शीतल लवंगी फटाका हेही चर्चेत असतात.
- पुणेरी उदबत्ती

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...