Saturday 25 November 2023

गांधींचं व्यामिश्र, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व...!

"अंतर्यामी असणाऱ्या काळोखामुळं अनेकजण अंतर्यामी बघायचं टाळतात, अंतर्यामी बघायला घाबरतात, पण अंतर्यामीच्या या काळोखाला जो टाळू बघतो, घाबरतो त्याच्या जीवनात कधीच प्रकाश प्रकाशत नाही. जीवनात प्रकाश प्रगटायलाच हवा; यासाठी जीवनाची योग्य जाण असायलाच हवी; नाहीतर जे काही करण्याचं प्रयत्न करशील, ते व्यर्थ जातील. म्हणून म्हणतो, अंतर्यामी जा, जागेपणानं अंतर्यामी जा. ज्ञानाचा प्रकाश घेऊन अंतर्यामी जा. मग तुमच्यापुढं सारा जीवनमार्ग उजळलेलाच असेल, प्रकाश पुरेसा आहे की नाही, पावलात बळ आहे की नाही, ह्या फालतू गोष्टींत गुंतून बसू नका. पाऊल उचला, त्या पावलागणिक प्रकाश पडलेला तुम्हाला जाणवेल. तुम्ही चार पावलं टाकशील, तेव्हा प्रकाश तुमच्यापुढे चार पावलं पडलाय, असं तुम्हाला दिसेल. संविधान दिनाच्या निमित्तानं केलेलं हे गांधींचं स्मरण!"

----------------------------------------
*मे* रा मुल्क, मेरा देश, मेरा ए वतन l
शांती का, उन्नती का, प्यार का चमन l
जिसके पास बेमिसाल है l
मेरा तन, मेरा मन, l
ये वतन, ये वतन, ये वतन l
जाने मन, जाने मन, जाने मन ll
या गीतातल्या जानेमननं माझ्या मनांत सगळा गोंधळ केलाय आणि गाण्यातल्या मुल्क, देश, शांती, उन्नती, प्यार, चमन, तन-मन-वतन ह्या शब्दांचा मी भलताच अर्थ घेतलाय.
जिसका खून कभी ना हिला; ओ खून नही, पानी है l जो देश के काम न आये; ओ बेकार की जवानी है ll
आपल्या तरुण पिढीला 'रक्त आणि पाणी' ह्यातला फरक दाखवण्याची संधी आहे तरी कुठं? ३० जानेवारी १९४८ रोजी निःशस्त्र गांधीजींची नथुराम गोडसेनं गोळ्या घालून हत्या केली. त्या नथुरामच्या पानी-कम क्रूरतेला देशभक्तीचा मुलामा चढवण्याचं सध्याचे दिवस आहेत. त्यासाठी शरद पोंक्षे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातून रक्त आटवतोय; गल्ला जमवतोय. तर दुसरीकडं जगभरातले राष्ट्राध्यक्ष दिल्लीतल्या राजघाटावरचा गांधीजींच्या स्मृतिस्थळाला भेट देतात. तिथं माथा टेकवतात, नतमस्तक होताना म्हणतात, 'महात्मा गांधीजींचे विचार हीच भारताची ओळख असून, गांधी विचार ही जगाला मिळालेली एक देणगी आहे...!' यहुद्यांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवून ठार मारलं, पण मरणावर मात करून ख्रिस्त उठला; जगभर पोहोचला. जगातल्या दीनदुबळ्या, दुःखी-पीडितांच्या अंतःकरणात मिसळला. गांधीजीही असंच सगळ्या दीनदुबळ्या, दुःखी, पीडितांच्या अंतःकरणात मिसळणारे महात्मा आहेत. पण काहींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी गांधीजींच्याबद्धल गैरसमज पसरवून लोकांच्या अंतःकरणात नथुरामला जागा देण्याची नाटकं सुरू ठेवलीत. त्यांनी गांधीजींना विचार-कार्यातून दिसताक्षणी गोळ्या घालून संपवण्याचं सत्रच चालवलंय. त्यांना प्रेमाचं, बंधूभावाचं, शांतीचं, सत्याचं, मानवतेचं राज्य बहुधा नकोच आहे.
काँग्रेसीजनांना सत्तेवरून उतरल्यावर आलेलं शहाणपण समजून घेण्यासाठी समग्र गांधी चरित्र वाचायला हवंय. सानेगुरुजींनी सांगितलेल्या 'गांधीजींच्या गोड गोष्टी' आधी वाचल्या. मग त्यांचे सत्याचे प्रयोग वाचलं. माझं हे 'गांधी वाचन' पाहून मित्रानं त्याच्या संग्रहातलं गांधी विरुद्ध गांधी हे नाटकाचं पुस्तक दिलं. ते देताना म्हणाला, 'ह्यात तुला गांधीजी अधिक समजतील.' त्याचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं. माझं मन या नाट्यवाचनात खोल खोल गुंतलं. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या माणसानं आपल्या व्यक्तिगत जीवनात केवढ्या कठोरपणे स्वतःवर स्वतःच्या कुटुंबीयांवर काही निर्बंध घालून घ्यावे लागतात, हे समजून घ्यायचं, तर अजित दळवी यांनी लिहिलेलं गांधी विरुद्ध गांधी हे नाटक एकदा वाचायला हवंय. बायको, मुलगे, मुली, जावई, पुतणे, मेहुणे यांच्यासाठी आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा निर्लज्जपणे वाट्टेल तसा गैरफायदा घेणारे आणि लोककल्याणाच्या गोष्टी सांगत स्वतःच्या पुढच्या दहा पिढ्यांची तरतूद करणारे नेते आपण आजूबाजूला बघतोय. गांधीजींनी आणलेलं स्वातंत्र्य या स्वार्थी, मतलबी नेत्यांनी 'स्व'राज्य मानून फस्त करण्याचा उद्योग सगळ्यांच्या साक्षीनं चालवलाय. देशात आणि राज्यात कॉंग्रेस जाऊन भाजपची सत्ता आली; तरी ह्या 'स्व'राज्यातल्या स्वैराचारात काडीचाही फरक झाला नाही. गांधी विरुद्ध आपण सगळे असा जणू संघर्षच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झालाय की काय कळत नाही! या गांधी विरुद्ध गांधी नाटकात गांधीजी आणि त्यांचा संसार आहे. ज्या मुलीला आपल्या संसारात सर्वस्व समर्पित व्हायची इच्छा असेल, तिनं या पुस्तकातल्या 'बा'चा आदर्श ठेवायला हवा. बा म्हणजे कस्तुरबा गांधीजींची बायको. मेली बिचारी तुरुंगातच. गांधी झाले महात्मा!
गांधींना हरिलाल नावाचा मुलगा होता. गांधींवर खूप प्रेम करणारा, पण स्वतःवर अधिक प्रेम करणारा. आपलं स्वतःचं वेगळेपण जतन करू बघणारा. गांधींनी आपल्याला हवं तसं जगू द्यायला हवं, असं मानणारा. 'गांधींसारखाच बॅरिस्टर होईन आणि छोटा गांधी म्हणून लोक आपल्याला मानतील,' अशी स्वप्नं बघणारा हरिलाल होता. त्या स्वप्नांसाठी गांधीजींबरोबर झगडताना तो उद्ध्वस्त झाला. गांधी-हरिलाल कस्तुरबा यांच्यातला संवाद वाचताना डोळे भरून येतात! गांधी आणि कस्तुरबा यांचं सारं मोठेपण असं नाटकातून साकारणं, ही साधी गोष्ट नाही. पण नाटककारानं ते प्रचंड ताकदीनं लिहिलंय. गांधी विरुद्ध गांधी हे पुस्तक वाचून झाल्यावर मित्र म्हणाला, 'या पुस्तकाऐवजी तुला हे नाटक दाखवता आलं असतं, तर खूप बरं झालं असतं. मी १७-१८ वर्षापूर्वी हे नाटक पाहिलंय. तेव्हा त्यात गांधीजी आपल्या सोलापूरचा अतुल कुलकर्णी होता आणि कस्तुरबा भक्ती बर्वे होती. त्यांच्या गांधी आणि कस्तुरबा यांच्या पुढ्यात हरिलाल उभा करणं ही तर प्रत्यक्षातल्यापेक्षाही नाटकात अधिक कठीण गोष्ट होती, पण किशोर कदम या नटानं तेव्हा मोठ्या ताकदीनं हे काम केलं होतं! गांधी विरुद्ध गांधी हे नाटक पुन्हा नव्यानं रंगमंचावर यावं, ही आज काळाची गरज आहे!
गांधीजींना त्यांच्याच भक्तांनी आणि त्यांचं नाव घेत राजकारणात धुडगूस घालणाऱ्यांनी खूप मळवून टाकलंय. विद्रूप वाटण्याएवढं बदलून टाकलंय. मूळ मूर्तीवर शेंदुराची पुटं चढवून चढवून त्या मूर्तीची सारी मंगलता, प्रेरकता दडवून टाकण्याची घाणेरडी प्रथा आपल्या देशात आहे. आपण दगडांनाही देव बनवून त्याला विविध लेप लावून गुदमरून सोडतो. तिथं देवमाणसांची काय कथा? गांधींना तर खूपच ओंगळ बनवलंय. गांधीजींच्या खऱ्या तेजाचं दर्शन या नाटककारानं घडवलंय. आपण धर्माच्या खोट्या रूपात स्वतःला फसवून घेणारे हरिलालच आहोत. आपली धर्मनिष्ठा आपल्याएवढीच खोटी आहे. संयम, निष्ठा, विवेक यांच्या विरोधातला उतावळा अतिरेक, स्वार्थ आणि बेदरकारी यांनी पुकारलेलं युद्ध गांधी विरुद्ध गांधीमध्ये आहे. गांधी विरुद्ध गांधीमध्ये कल्पनाविलास फार थोडा आहे. सत्य मात्र भरपूर आहे. कैदेत असूनही संभाजीराजे औरंगजेबला इस्लाम स्वीकारणार नाही, असं ठणकावून सांगत बलिदानाला तयार होतात; म्हणून ते 'धर्मवीर' झाले. हरिलालही एकप्रकारे धर्मवीरच! गांधीजींची फजिती व्हावी, म्हणून त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला. मशिदीत त्यानं धर्मावर प्रवचनं दिली आणि मग पुन्हा काही काळानं मी पुन्हा मूळ धर्मात आलोय, आर्य धर्माचा सच्चा अनुयायी झालोय, असंही तो जाहीर सभा भरवून सांगू लागला. त्यानं आजच्या 'घरवापसी' वाल्यांसारखंच धर्मालाही आपल्या दावणीला जुंपलं होतं. हरिलालच्या या वर्तनानं गांधीजी अंतर्यामी विकल झाले; तर कस्तुरबा व्याकुळ झाल्या होत्या. पण दोघांनीही हरिलालचं स्वातंत्र्य मानलं होतं.
गांधी विरुद्ध गांधीमध्ये गांधीजींचा दुसरा मुलगा मणीलालही आहे. गांधीजींच्या आश्रमात राहाणाऱ्याला कसं मऊ मेणाहून विष्णुदास बनावं लागायचं, हे ह्या मणिलालच्या व्यक्तिरेखेतून छान दाखवलंय. मणिलालचं चालणं, बोलणं, वागणं अगदी गांधीजींसारखं! साच्यातला गणपती दुकानात विकायला मांडून ठेवतात, तसाच हा साच्यातला गांधी. पण गांधींमध्ये जे चैतन्य-प्रेम होतं; त्याचा पूर्ण अभाव असल्यासारखा लिबलिबीत मणिलाल नाटककारानं छान रंगवलाय. मणिलालची ही कठपुतळी रंगमंचावर अधिक प्रभावीपणे उभी राहिली असेल. गांधीजी असताना आणि ते गेल्यावरसुद्धा असे अनेक 'लिबलिबीत गांधी' गांधीचे चेले म्हणून वावरत होते, असं म्हणतात. गांधीजी जे करायचे ते सर्वस्व पणाला लावून करायचे. यशापयशाचीही पर्वा न करता करायचे. जाणीवपूर्वक करायचे आणि होणाऱ्या भल्याबुऱ्या परिणामाला अत्यंत धीटपणे सामोरं जायचे. राजकारणात, समाजकारणात आणि स्वतःच्या संसारातही! समाजकारणातले, राजकारणातले गांधीजी आपल्याला अॅटनबरो यांच्या 'गांधी' चित्रपटातून दिसतात. गांधी विरुद्ध गांधीमध्ये या महात्म्याच्या संसाराचं दर्शन घडतं. आजच्या किडलेल्या नीतिमत्तेबद्दल लोकात तिडीक निर्माण करण्याची ताकद ह्या नाटकात आहे. हे नाटक आजच्या मुलामुलींनी आवर्जून वाचायला हवं. नव्यानं रंगमंचावर आलं, तर नक्की पाहायला हवं.
देशासाठी तुरुंगात गेलेल्या दोघा देशभक्तांच्या मुली गांधीजींच्या आश्रमात राहात असतात आणि मणिलालबरोबर त्यांना तारुण्यसुलभ वागावंसं वाटतं. त्या तशी संधी घेतात. म्हणजे एकदा मणिलाल त्यातल्या एकीचे मोकळे केस ती पाठमोरी असताना हातात घेऊन हुंगतो. दुसरीला तिच्या सुंदर केसांबद्दल काही चावटसं ऐकवतो. गांधीजींच्या कानावर हे जातं आणि गांधीजी त्या दोन्ही मुलींची आणि मणिलालची कानउघाडणी करतात. प्रायश्चित्त म्हणून त्या मुलींचे ते सुंदर केस कापून टाकतात आणि स्वतः तीन दिवस अन्नपाणी न घेण्याचं ठरवतात. त्या मुली आणि मणिलाल रडून क्षमा मागतात, पण गांधी कठोरपणे आपला निर्णय अंमलात आणतात. आश्रमात मुली ठेवून जे देशभक्त कारागृहात गेले आहेत, त्यांच्या मुलींशी माझा गांधींचा मुलगाच जर प्रेमाचे खेळ खेळायला लागला, तर आश्रमाची काय स्थिती होईल? विश्वासानं मुली इथं ठेवणाऱ्या त्या देशभक्तांना केवढा धक्का बसेल? हे असं काही पुन्हा कधी घडू नये म्हणून गांधीजींनी कठोर होणं, हाच मार्ग होता. हा प्रसंग वाचताना मी थरारून गेलो. गांधीजींचं हे वागणं आपल्याला कासावीस करतं. आज देशभरात फोफावलेली वासनाकांडी वृत्ती रोखायची असेल, तर अशा कठोरपणे लोकनेत्याला वागणं भागच आहे, हे मानायलाच हवं. स्वतःशी प्रामाणिक असेल, त्याच नेत्याला एवढं कठोर होणं शक्य आहे. गांधी हे गांधी होते. त्यांनी ब्रह्मचर्याचा स्वीकार करण्यासाठी, नरेंद्र मोदींनी जसं जशोदाबेनला वाऱ्यावर सोडलंय; तसं गांधीजींनी कस्तुरबाला सोडलं नव्हतं.
नथुराम गोडसेला 'देशभक्त' करण्याचा डाव आता संसदेपर्यंत पोहोचला असताना गांधी विरुद्ध गांधीसारखं पुस्तक माझ्या हाती यावं, हा चमत्कार नाही; आपल्या अंतरीच्या आवाजाला लाभलेला हा प्रतिसाद आहे, असंच मला वाटतंय. लोकांना आता उथळता नकोय, अथांगता हवीय. आपण सगळेच हरिलाल, मणिलाल होतोय. खोट्या विजयाचं, खोट्या सत्तेचं, खोट्या शूरतेचं, खोट्या स्वच्छतेचं, खोट्या नीतिमत्तेचं नाना नमुने बघून बावरलेल्या आपल्या मनाला आधार देण्यासाठी 'अच्छे दिन' ऐवजी गांधीजींसारख्या महात्म्याचीच देशाला जरुरी आहे. त्या महात्म्याकडं हे नाटक आपलं लक्ष वेधतं. हे नाटक नव्याने रंगमंचावर आलं तर ते आपल्या तरुण पिढीसाठी उपकारक ठरेल. मला ठाऊक आहे, काही वाचकांना हे गांधीपुराण आवडणार नाही. हे गांधीपुराण नाही, हे तुमचं माझं पुराण आहे. गांधी हे केवळ निमित्त आहे. मला तुम्हाला जागवायचंय. जीवनाचा अर्थ समजावून घेण्याची ओढ तुमच्यात निर्माण करायचीय. सॉक्रेटिसनं म्हटलंय, जे जीवन नीट जाणलं गेलं नाही, ओळखलं गेलं नाही ते जीवन जगणं व्यर्थच गेलं. जीवनाला अर्थ हवा. कशासाठी आपण जगतोय? या प्रश्नाचं उत्तर आपल्यापाशी हवं. ज्यांच्यापाशी हे उत्तर नसतं, ते हरिलाल होतात. मोहामागे धावतात. व्यसनात गुरफटतात. आपलं खोटेपण आपल्यापासूनच छपवण्यासाठी अधिक खोटेपणानं वागतात! आणि ज्यांच्यामध्ये असं भरकटण्याएवढं साहस नसतं, ते लिबलिबीत मणिलाल बनतात! स्वतःला मारून मढ्यासारखं जगतात. तुम्हाला तुमच्या अंतर्यामी बघायला लावण्याचा माझा हा प्रयत्न आहे. अंतर्यामी असणाऱ्या काळोखामुळं अनेकजण अंतर्यामी बघायचं टाळतात, अंतर्यामी बघायला घाबरतात, पण अंतर्यामीच्या या काळोखाला जो टाळू बघतो, घाबरतो त्याच्या जीवनात कधीच प्रकाश प्रकाशत नाही. जीवनात प्रकाश प्रगटायलाच हवा; यासाठी जीवनाची योग्य जाण असायलाच हवी; नाहीतर जे काही करण्याचं प्रयत्न करशील, ते व्यर्थ जातील. म्हणून म्हणतो, अंतर्यामी जा, जागेपणाने अंतर्यामी जा. ज्ञानाचा प्रकाश घेऊन अंतर्यामी जा. मग तुमच्यापुढं सारा जीवनमार्ग उजळलेलाच असेल, प्रकाश पुरेसा आहे की नाही, पावलात बळ आहे की नाही, ह्या फालतू गोष्टींत गुंतून बसू नका. पाऊल उचला, त्या पावलागणिक प्रकाश पडलेला तुम्हाला जाणवेल. तू चार पावलं टाकशील, तेव्हा प्रकाश तुझ्यापुढं चार पावलं पडलाय, असं तुम्हाला दिसेल!
मनातला, जीवनातला अंधार संपवून टाकायची इच्छा करून तुम्ही ध्येयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाका. 'मी वेडा आहे' असं नेहमीच म्हटलं जातं. माझा वेडेपणा तुम्हाला शहाणं बनवत असेल, तर मला त्यात आनंद आहे. अभिमानही आहे. तुम्हाला एका शहाण्या वेड्याची गोष्ट सांगतो. वेड्यांच्या एका इस्पितळाच्या खिडकीत हातात मासे पकडायचा गळ घेऊन एक वेडा बसला होता. एक शहाणा त्या इस्पितळाजवळून जात होता. त्याला त्या वेड्याची गम्मत करायची हुक्की आली. त्यानं विचारलं, 'काय, किती मासे पकडले?' वेड्यानं उत्तर दिलं, 'तू धरून अकरा!' आणि त्यानं त्या शहाण्याला प्रश्न केला, 'तू का नाही इस्पितळात दाखल होत?' शहाण्यानं फणकाऱ्यानं म्हटलं, 'मी कशाला वेड्याच्या इस्पितळात दाखल होऊ?' वेड्यानं त्याला उलट प्रश्न केला, ' इथं पाणी नाही, मासेही नाहीत, तरी तू मला कसं विचारलंस, किती मासे पकडले म्हणून?' शहाण्यानं तोऱ्यानं म्हटलं, 'मग तू गळ टाकून कशाला बसला आहेस?' वेड्यानं हसून म्हटलं, 'हो, तुझ्यासारख्या वेड्यांना पकडण्यासाठी हा गळ आहे. म्हणून तर म्हटलं ना, तू धरून अकरा लागले गळाला! आता बस विचार करत शहाणा कोण आणि वेडा कोण?' कदाचित, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गांधी विरुद्ध गांधी नाटकात मिळेल. म्हणून त्याचं पुस्तक मी तुम्हालाही वाचण्यासाठी आग्रह करतोय. त्यानं तुमच्या मनावरची खूपशी जळमटं साफ होतील. बाकीच्या स्वच्छतेसाठी 'मोदींची स्वच्छता मोहीम' आहेच!
जी २० देशांच्या नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहत महात्मा गांधींचे आवडते भक्तिगीत 'वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड पराय जाने रे...' हे गायल्याचं पाहायला मिळालं. जगात बायबल नंतर सर्वाधिक ग्रंथ लिहिले गेलेत ते महात्मा गांधींवर. त्यामुळं देशात गांधींच्या खून्याचे गोडवे गायले जात असतील, मात्र जगभरातल्या मान्यवरांना गांधीजींसमोर नतमस्तक होताना त्यांना धन्यता वाटते, जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं, यातच सारं आलं. म्हणूनच वाटतं की, गांधीजी हाच सकारात्मक जीवनाचा मंत्र आहे....! देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हा गांधींच्या ध्येयाचा एक भाग होता. खरं तर त्यांना चांगल्या मानवी जीवनाचं मर्म शोधून काढायचं होतं. स्वत:तलं हिणकस वजा करत करत कोणताही सामान्य माणूस दिव्यत्वापर्यंत पोहोचू शकेल अशी त्यांची धारणा होती. त्या प्रवासाची दिशा आणि मार्ग शोधून काढण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. या सगळ्याची झळ कुटुंबाला लागणं अपरिहार्य होतं! ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकामधल्या बाप-मुलाच्या नात्याचं वैशिष्ट्य हे आहे, की वडिलांची फारशी चूक दिसत नसतानाही मुलाचं दु:ख तुम्हाला स्पर्श करून जातं. त्या काळी किती वडिलांचा मुलांशी संवाद होता? गांधींसारख्या नित्यनव्या उद्योगांत, चळवळीत गुंतलेल्या माणसाला मुलासाठी किती वेळ देता येणार? गांधींच्या शब्दाखातर फिनिक्स आश्रमात किंवा टॉलस्टॉय फार्मवर येऊन राहणारे, काम करणारे कितीतरी जण होते. त्या सर्वाना डावलून इंग्लंडमधल्या शिक्षणासाठी स्वत:च्या मुलाचं नाव गांधींनी पुढं करायला हवं होतं का? किंवा कौटुंबिक मालमत्तेवरचा हक्क सोडल्यावरही हरिलालला पेढीवर बसू द्यायला हवं होतं का? मग आजच्या राजकीय पुढाऱ्यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला असता? काल संविधान दिन झाला. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेत, कर्तव्य दिलीत ते अधिकार जसे काढून घेतले जाताहेत. तसंच आपण आपली कर्तव्यही विसरत चाललो आहोत. संविधान दिनाच्या निमित्तानं केलेलं गांधींच्या विचारांचं स्मरण....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९



No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...