Monday 13 November 2023

सत्ताधारी मस्त, जनता त्रस्त, महाराष्ट्र संत्रस्त!

"सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! राज्यात एक फुल दोन हाफ सरकार अशी टीका होतेय. सामाजिक सौहार्दाचं वातावरण बिघडतंय. त्यांचे नेते म्हणवणारे मंत्री बाह्या वर करत एकमेकांविरोधात सरसावलेत. दोन हाफ पैकी एका हाफला राज्यातल्या समस्यांपेक्षा पक्षनिष्ठा, पक्षसेवा महत्वाची वाटतेय. त्यासाठी त्यांनी निवडणुक प्रचाराची धुरा सांभाळत परराज्यात प्रवास करताहेत. दुसरे हाफ आपण आजारी आहेत असं म्हणत आपलं अंग काढून घेतात. तर दुसरीकडे पक्ष बळकावण्यासाठी, आपलं स्थान टिकविण्यासाठी दिल्लीश्वरापुढे कुर्निसात करण्यातच ते मश्गूल आहेत. दिल्लीश्वरांनीच त्यांना सुभेदारी बहाल केली असल्यानं त्यांच्याशीच निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. बिचारे एक फुल दिल्लीश्वराचे 'मांडलिक' असल्यानं त्यांचा आटापिटा सुरू आहे. ते शेतीसाठी थेट गावीही जातात. साऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय. मराठी माणूस असाच दबला तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला!"
-----------------------------------

*बा* हुबली चित्रपट जवळपास सगळ्यांनीच पाहिला असेल. त्यात माहिष्मती संस्थानातल्या युद्धसदृश्य दृष्यात प्रभास हा नट धनुर्धारी अमरेंद्र बाहुबली बनलाय. तो अनुष्का शेट्टी, देवसेनेला आपल्या धनुष्यातुन एकाचवेळी तीन बाण कसे सोडायचे याचं प्रात्यक्षिक देताना एक मंत्र ऐकवतो. नाद्वे..... मणीबंधम.... बहिर्मुखम....! त्याच धर्तीवर आपल्या राज्यात दिल्लीतल्या डंकापती दिलीश्वरानं महाराष्ट्रावर चाल करताना एकाचवेळी तीन अस्त्र सोडण्याची किमया साधलीय! एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा ह्या एक फुल दोन हाफ 'एदेअ ' शस्त्रानं सत्तेबरोबरच महाराष्ट्रातलं राजकीय युद्ध आरंभलंय...! सत्तेसाठी सारं काही म्हटल्यावर राजधर्म, न्याय, नीती, हा सारा कलपनेचा खेळ वाटायला लागतो. मग या खेळासाठी नैतिकता पणाला लावली जाते. सत्य असत्याची चाड राहात नाही. अशीच स्थिती सध्या राज्यात आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या राहिलेला नाही. स्वतःच आसन स्थिर नसताना जनतेच्या स्थिरस्थावराचा विचार कुठे येतो. गरीब बिचारी मुकी जनता तिला तिला कुणीही आणि कसंही हाका. ती सहन करतच जगतेय! खरं तर दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहणारे आपण सारे उद्भवलेल्या परिस्थितीत नको ती दिवाळी म्हणण्याची वेळ आलीय. पावसानं ओढ घेतल्यानं दुष्काळी स्थिती निर्माण झालीय. जातीय विद्वेष भयानक रूप धारण करण्याच्या आवेशात आहे. महागाईचा आगडोंब उसळलाय. याची जाणीव सत्ताधाऱ्यांना नाही!
सध्या राज्यात राजकारणाचा तर खेळखंडोबा झालाय. विश्वस्त, प्रतिनिधी या शब्दांचा अर्थच राजकारणी लोक विसरलेत. आपण लोकसेवक आहोत याचं भानही त्यांना राहिलेलं नाही. केवळ स्वार्थ साधण्यासाठी त्यांना सत्ता हवीय. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढं एकच उद्दिष्ट ठेवून राजकारणी कार्यरत आहेत. आम्ही सेवक नाही, मालक आहोत, अशा अविर्भावात ते जगताहेत. अशांच्या मनात गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, गरजू यांच्या बाबतीत राजकारण्यांची मने संवेदनशील होतील का? दिवसेंदिवस माणूस जगणंच विसरून गेलाय. दुःख, अडचणी, समस्या, आजारपण, आर्थिक समस्या, बेरोजगारी, महागाई, वाहतुकीची कोंडी, फसवणूक, स्त्रियांवरील अत्याचार, जातपात, अवकाळी पाऊस, महापूर, घाणेरडं राजकारण अशा किती तरी समस्यांनी माणूस ग्रासलाय. कोरोनानं पिच्छा सोडलाय, असं अजून म्हणता येत नाही. रोज नवनव्या आजारांनी लोकांना घेरलंय. वयोवृद्धांच्या समस्या वेगळ्याच आहेत. गेल्या दोन वर्षात अनेक जिवाभावाची, जवळची माणसं कायमस्वरूपी मुकलीत. या साऱ्यांतून सर्वसामान्य माणूस सावरायचा प्रयत्न करतोय; पण माणूस आत्मविश्वास गमावून बसलाय. अशा आत्मविश्वास गमावून बसलेल्या लोकांना कुणाच्या तरी पाठबळाची अत्यंत गरज आहे. माणसाला सुख, शांती, समाधान, राहायला घर, पोटाला चार घास, स्वस्त औषधोपचार, हाताला यश, मुलाबाळांचे शिक्षण इतक्याच माफक अपेक्षा आहेत. तमाम बळीराजाचं दुःख, कष्ट यातून काहीही केलं तरी सुटका होतं नाही. कधी कमी पाऊस तर कधी तुफान पाऊस. होत्याचं नव्हतं करणारा पाऊस. एकदा पेरणी करताना नाकी नऊ येते. इथं तर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ येऊ लागलीय. पिकलंच तर माती मोल किमतीला विकावं लागत आहे. यंदा पावसानं ओढ घेतलीय, त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. शेतीत काही उगवलच नाही तर काय करावं त्यानं? विकास होतोय, चकचकीत रस्ते, पूल होताहेत. बुलेट ट्रेन, मेट्रो अनेक शहरात धावू लागल्यात. विमानतळ विकसित होताहेत. शहरांच्या हद्दवाढी करून सिमेंटची जंगले उभी राहाताहेत; पण माणूस स्वास्थ्य हरवत चाललाय. अभिमान, स्वाभिमान बाजूला ठेवून सुख, शांती समाधान शोधण्यासाठी धडपडतोय; मात्र त्याच्या नशिबात निराशेशिवाय काहीच पडत नाही. गेल्या काही वर्षात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिकच रुंदावत चाललीय. विकासाची गंगा काही मोजक्याच लोकांच्या घरात जातेय. त्यांच्या विकासाचा दर बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक आहे. माणूस निसर्ग नियमांना अनुसरून वागायचं विसरलाय. हवा, पाणी, ध्वनी अशा प्रत्येक गोष्टीचं प्रदूषण करतोय. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्यामुळं दिवसेंदिवस माणसाचा श्वास कोंडतोय. पर्यावरणाच्या संबंधी थोडं तरी शहाणपण माणसाला येईल का?
मराठ्यांनी सदैव राष्ट्राचा विचार केला. आपल्याबरोबर राष्ट्र मोठं व्हावं म्हणूनच मराठे धडपडले. पानपतावर अब्दालीची झुंड रोखण्यासाठी मराठ्यांची एक पिढीच्या पिढी मारता मारता मरावे अशी झुंजून मेली. अब्दालीला पुन्हा भारताकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही, असा चोप मराठ्यांनी दिला. मराठे पानपतावर मोडले, पण हे राष्ट्र, इथला समाज आणि धर्म त्यांनी सावरला. मराठ्यांची समशेर हा भारताचा आधार होता म्हणूनच मराठे मोठ्या ताठ मानेनं शिलंगणाला निघायचे. पण महाराष्ट्र धर्म आपण विसरलो. आपसातल्या लाथाळ्यात आणि कुणाचेतरी अनुयायीत्व मिरवण्यात आम्हाला समाधान वाटू लागले. मग आमच्या पाठ्यपुस्तकांतून मराठी माणसाचा मोरू प्रवेशला. 'नवरात्र संपले. दसरा झाला, दिवाळी आली. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, उठ... पालख्या उचलण्याचं, सतरंज्या घालण्याचं, मुजरे करण्याचं काम इमानदारीनं करायला तयार हो....!' महाराष्ट्रापेक्षा मोदी मोठे ही 'स्वामी'निष्ठा यातूनच निर्माण झाली असावी का? वास्तविक, हे राष्ट्र मोठं करण्याचे काम आम्ही करतो म्हणूनच मराठ्यांच्या भूमीला महाराष्ट्र हे नाव आहे, असं छातीठोकपणे सांगणारी आणि त्यानुसार विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवणारी माणसं महाराष्ट्रात झाली आहेत. त्या कर्तृत्ववान मराठी पुत्रांमुळेच 'महाराष्ट्र आधार या भारताचा' हा विश्वास निर्माण झाला. महाराष्ट्राचे वैभव तळपू लागले. त्याचा जेव्हा अभाव जाणवला तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय लादला गेला आणि त्या अन्यायानंच अंगार पेटावा तसा मराठा धगधगून उठला होता. महाराष्ट्र मिळाला, पण मराठी माणूस मात्र संपत गेला. आज त्याचीच अवहेलना होतेय. सत्तेवर बसलेल्यांना आपल्याच माणसाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. दिल्लीश्वरा पुढे कुर्निसात करण्यातच ते मश्गूल आहेत. दिल्लीश्वरांनीच त्यांना सुभेदारी बहाल केली असल्यानं त्यांच्याशीच निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. त्यांनी ज्या मराठी माणसाच्या जीवावर, त्यांच्या मतांवर वाटचाल आरंभली होती. त्याचा त्यांना विसर पडलाय. हिंदुत्वाचं ढोंग आणि अवडंबर माजवणाऱ्या, त्यातूनच रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेचा वडवानल पेटवून देणाऱ्या हिणकस राजकीयवृत्तीच्या भाजपसमोर काँग्रेस नेते, राहुल गांधींच्या नफरत छोड़ो, भारत जोड़ो यात्रेतून आपसूकच एक फार मोठं आव्हान उभं ठाकलेलंय. त्यामुळेच, या विषमता आणि विद्वेषवादी लोकांना, प्रथमच देशातल्या गरीबी, बेरोजगारी तरीही, अजून कंत्राटी-कामगार पद्धतीतल्या आणि 'अग्निपथा'तल्या 'अर्धरोजगारी'वर ते मूग गिळूनच आहेत, आर्थिक-विषमतेवर बोलण्यासाठी कंठ फुटलाय! लक्ष्मीपुत्र गुजराथ्यांच्या बुलेट ट्रेनसाठी भाजपच्या 'मांडलिक' मुख्यमंत्र्यांचा आटापिटा सुरू आहे. सदा खोत आणि गोपी पडळकर या भाजपवाल्यांच्या नादाने संप करणार्‍या मराठी एस.टी. कामगारांनो आता, फक्त छातीच पिटा! मराठी कामगारांचा आवाज जर, असाच दबला; तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला!
राजकीय क्षेत्र हे जणू भंगाराचं दुकान झालेलंय. कोणीही लोकप्रतिनिधी येतो आणि तागड्यात बसून स्वतःला भंगार भावात विकतो. मतदारांना स्वतःची लाज वाटते की नाही ठाऊक नाही. कारण आपण अशा लोकप्रतिनिधींना मतं दिली आहेत; पण हे लोकप्रतिनिधी मात्र बेशरम आहेत. ऊरुसाच्या आधी तमासगीर मैदानात छावण्या टाकून रंगीत तालमी करतात. कोणाला कोणती भूमिका द्यायची ठरवतात. बाहेरुन कलाकार पळवून आणतात. प्रत्यक्ष तमाशाच्या आधीचा तमाशा त्या मैदानावर होतो. आधी आदर करणाऱ्याची नंतर निंदा होते. ऊरुस संपला की सगळे थकून भागून गारेगार होतात. आपसात लग्नही जुळवून आणतात. पुढच्या ऊरुसापर्यंत छान संसार करतात. पटलं नाहीतर शेजारच्या छावणीत जातात. त्याला व्याभिचार नाही म्हणत. घरवापसी म्हणतात. सध्या राजकीय फडावर हाच भंगार मालाचा लिलाव सुरु आहे. मतदारांचं या दलालांना काही घेणं देणं नाही. त्याला गृहीत धरुन सगळा नासवा-नासवीचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे मतदार थिएटरमध्ये बसल्यासारखं हे बघतोय टाळ्या पिटतोय. कपट कारस्थानाला हुशारी, चाणक्यनीती समजतोय. कोणाला तरी शिव्या घालतोय. कोणाला तरी मत देतोय. पुन्हा पुढच्या खेळाचं तिकीट काढतोय. आपल्या समाजाची मनोदशाच समजत नाही. सकाळी उठून पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची रोजगार यात्रा सुरु होते. तो मजूर अड्डयावर स्वतःला भाकरीच्या भावात भाड्यानं देतो. आणि राजकारणी तिकडं तारांकित हॉटेलात जनतेच्या पैशावर डुकरासारखे चरताहेत गाढवासारखे लोळताहेत. आपला समाज पराभूत मनोवृत्तीचा आहे लढाईच्या आधीच हत्यारं खाली ठेवणारा. कितीही दुर्धर प्रसंग आला तरी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जागा करून राहणारा. पण मानेवरचं जोखड भिरकावून देत नाहीत. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान!' अशा परिस्थिती शरण समाजाचा निस्तेज चेहरा पाहावत नाही. गलितगात्र लोळागोळा झालेल्या समाजात दंगली घडविण्यासाठी प्राण कोण फुंकतो कोण जाणे. पण तो नक्कीच देशाचा हितचिंतक नाही. सामान्य नागरिक जोपर्यंत लोकशाहीतल्या मतांचं मूल्य समजत नाही. राज्यघटनेबाबत साक्षर होत नाही. तोपर्यंत फडावर अशाप्रकारच्या तमाशाची रंगीत तालीम होतच राहणार. राजनेत्यांची, लोकप्रतिनिधींची दलाली आणि लिलावही होत राहतील. कोणीही शहाजोग नाही. त्यांची संस्कृतीही एकच आहे. हे आम्ही नेहमीच म्हणतो आणि मतदार जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत म्हणत राहणार. ब्रिटीश काळात गुन्हेगारांची वस्ती गावाबाहेर होती. स्वातंत्र्यानंतर आता ती आत आली आहे, एवढाच काय तो फरक.
परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥
सौख्य-भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥
मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...