Monday 4 July 2022

शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठीच....!

"राज्यात सत्तांतर नाट्य घडलंय, बहुमतही सिद्ध झालंय.! या सत्तांतरात लोकशाहीचे चारही स्तंभ गदागदा हललेत. आमदारांची फंदफितुरी, भाजपची सत्तालोलुपतेला, न्यायालयानं संविधानाचे काढलेले धिंडवडे, राज्यपालांची नियमबाह्य किळसवाणी कृती, गोदी मिडियाची चापलूसी आणि दिल्लीतल्या भाजप नेत्यांची कुटील, कपटी, नीच कारस्थानं दिसून आली. बंडखोरांनी उद्धव यांनी हिंदुत्व सोडल्याचा कांगावा केला, पण त्यांनी महाराष्ट्रधर्माचा, प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा स्वीकार करून काँग्रेस, राष्ट्रवादीला त्या मार्गावर यायला लावलं. हा बदल सहन न झाल्यानं संघ-भाजपनं शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आणि त्यांच्यात फूट पाडून सत्ता हस्तगत केलीय. आता त्यांचं लक्ष्य असेल मुंबई महापालिका आणि त्यासाठी खांदा असेल तो याच बंडखोरांचा!"
---------------------------------------------------

*स*त्तासंघर्षाच्या या नाट्यात मला आठवण झाली ती शिवसेना-भाजप युतीचे एक शिल्पकार प्रमोद महाजन यांची! १९८७ मध्ये भाजप शिवसेनेच्याविरोधात जनता पक्षासोबत असतानाही विलेपार्ले विधानसभेची पोटनिवडणुक 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यावरून जिंकली. डॉ रमेश प्रभू निवडून आले. त्यावेळी शिवसेनेनं हिंदुत्वावर मतं मागितली म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मताधिकार सहा वर्षासाठी गोठवला. 'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मिळतात' हे पाहून प्रमोद महाजन यांनी शिवसेनेपुढं युतीचा प्रस्ताव ठेवला. त्याआधी मराठी अस्मितेचा जागर करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना सोबतकार ग.वा.बेहरे, दि.वि.गोखले, विद्याधर गोखले आदि संघीय पत्रकारांनी घेरलं होतं. त्यांच्या गळी हिंदुत्व उतरवलं होतं. महाजनांनी केलेल्या प्रयत्नानंतर शिवसेना-भाजप युती कार्यरत झाली. पण भाजपतूनच विरोध झाला. सर्वश्री सूर्यभान वहाडणे, ना.स.फरांदे, वामनराव परब, मधु चव्हाण यासारख्या काही भाजप नेत्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख हे सतत संघ-भाजपवर उघडपणे टीका करत असतात, अशावेळी ही युती कशासाठी? असं म्हणत युतीला पक्षाच्या बैठकीत विरोध केला. त्यावेळी महाजनांनी या मंडळींना शांत करताना सांगितलं होतं की, 'आपल्याला शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे नकोत तर मोठ्यासंख्येनं तिथं असलेले शिवसैनिक आपल्याला हवेत; त्यासाठी ही युती करतो आहोत!' असा धुर्तपणे डाव टाकला. आज तीच भूमिका घेऊन भाजप वावरतेय. त्यांनी आता ठाकरे यांना दूर सारून शिवसैनिकांना जवळ घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना 'शत प्रतिशत भाजप' म्हणत एकहाती सत्ता आणायचीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या आमदारांनी ठाकरे यांच्याच विरोधात बंड करून 'बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वा'साठी भाजपला जवळ करत असल्याचं म्हटलंय. १९८८ साली प्रमोद महाजनांना जे काही अभिप्रेत होतं त्याला सुरुवात झालीय असंच म्हणावं लागेल. संघालाही शिवसेनेला संपवायचंय. 'हिंदुत्वा'च्या एका म्यानात शिवसेना आणि भाजप या दोन तलवारी राहणार कशा? त्यासाठी शिवसेनेला संपवणं क्रमप्राप्त आहे! उद्धव यांनी अलीकडंच्या भाषणातून संघावर टीका करताना 'संघ हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हता!' 'आमचं हिंदुत्व हे संघाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही!' आणि 'संघाची काळी टोपी का आहे!' असं म्हटलं होतं. या वक्तव्यानं रेशीमबाग दुखावली असणार. उद्धव यांची ही भूमिका त्यांचे वडील बाळासाहेबांची नाही; तर आजोबा प्रबोधनकारांची आहे. उद्धव हीच आजोबांची भूमिका घेऊन ब्राह्मणवादी हिंदुत्वाला विरोध करताहेत. तर बहुजनवादी हिंदुत्वाचा, शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या भूमिकेचा पुरस्कार करताहेत. संघाला हे सहन होत नाही, त्यामुळंच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय. संघाचं हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद आहे असंच म्हटलं जातं. त्यात उपयुक्ततेला जास्त महत्त्व आहे. म्हणजे ज्याचा उपयोग आहे, त्याला महत्त्व द्यायचं आणि ज्याचा उपयोग नाही, त्याला संपवायचं! त्यांच्यादृष्टीनं आज ठाकरेंचं महत्व संपलंय मात्र शिवसैनिकांचं अद्यापि आहे, म्हणूनच ठाकरेंना दूर सारून त्यांनी शिवसैनिकांना जवळ करणं चालवलंय. त्यांना मानाचं पान दिलं जातंय आणि ठाकरेंची मात्र अवमान, अवहेलना चालवलीय. आपल्यापेक्षा वेगळा विचार टिकूच द्यायचा नाही, ही संघाची भूमिका असते. त्यासाठी संघ कुठल्याही थराला जाऊ शकतो. शिवसेना संघाच्या या ब्राह्मणवादाला आडवी जाणार म्हटल्यावर तिला संपवली पाहिजे, असा कुटिल डाव संघानं टाकलाय. त्यासाठी उद्धव यांना दूर करायचं त्याचवेळी शिवसैनिकांना गोंजारत त्यांची ताकद वापरायची, त्यांची मतपेढी भाजपकडं वळवायची अशी त्यांची भूमिका आहे!

शिवसेना संपवायची असेल तर शिवसेना आणि ठाकरे हे नातं संपवलं पाहिजे! त्यातून हा अनैतिक खेळ एकनाथ शिंदेंवर राज्य देऊन भाजपनं खेळलाय. त्यांना केवळ शिवसेनेची सत्ता संपवायची नव्हती, तर शिवसेनाच संपवायचीय. पण हा प्रयत्न अधिक कपटी, धोकादायक आहे. यापूर्वी झालेल्या बंडखोरीत आमदारांच्या इतक्या संख्येनं शिवसेना कधीच फुटली नव्हती आणि दुसरं म्हणजे थेट 'शिवसेना आमचीच' असा दावा कुणीही केला नव्हता! म्हणूनच या बंडाकडं शिवसेनेला अत्यंत गांभीर्यानं पाहावं लागेल. मुळातच इतकं मोठं षडयंत्र उभं करणं हे शिंदेंच्या आवाक्यातलं नाही. त्यांचा बोलविता धनी दुसराच आहे. शिवसेनेनं घडवलेले हे आमदार सामान्य कुटुंबातले सरळ आणि रांगडे शिवसैनिक आहेत. ते शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर श्रद्धा ठेवणारे आहेत. पण उद्धव हे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करून संपवत आहेत. त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलंय. ही आघाडी अनैसर्गिक आहे. तर शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती आहे वगैरे मुद्द्यांनी आमदारांना भावनिक केलं गेलं. आमदार या जाळ्यात अलगद अडकले. त्यांना सर्वात मोठा दिलासा हा दिला गेला की, तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच राहाल आणि तुम्हालाच खरी शिवसेना वाचवायची आहे! अर्थात या आमदारांना बैलगाडीखाली चालणाऱ्या 'कुत्र्याच्या' भुमिकेत आणले गेलं. हा कुत्रा अत्यंत इमानदार असतो. त्याचा हा भ्रम असतो की, बैलगाडी त्याच्या खांद्यावर चालली आहे. जर आपण बाजूला गेलो तर बैलगाडीचं आणि मालकाचं काही खरं नाही! त्यामुळं तो बैलगाडीच्या खालून चालत राहतो. आता अशा भावनेत अडकलेल्या आमदारांना आपण आपल्याच पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करत आहोत याचं भान राहीलं नाही. त्यात सर्वात मोठे षडयंत्र म्हणजे, संख्याबळावर त्यांनी केलेला शिवसेना संघटनेवर केलेला दावा होय! संघ आणि भाजपच्या आसुरी राजकिय खेळांत अनेक प्रादेशिक पक्षांचे बळी जात आहेत. 'शत प्रतिशत भाजप!' ह्या रोगानं भाजपनं नैतिकतेचा निघृण खुन केलाय. अनेक बंड होऊनही शिवसेना कधी संपली नाही. मग शिवसेना संपवायची असेल तर शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवलं पाहिजे! हा अनैतिक खेळ शिंदेंवर राज्य देऊन भाजपनं खेळलाय. 'पानिपत झालं तर मराठ्यांचं, आणि अटकेपार झेंडे लावले तर पेशव्यांनी!' असा हा त्यांचा जुना खेळ आहे!' आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेना संपणार की वाचणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, ५६ वर्षांपूर्वी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर शिवसेनेचा ठसा आहे. या काळात शिवसेना तीन वेळा सत्तेवर आली. पण शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी अन्य पक्षांशी युती करावी लागली, त्यात दोन वेळा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं, सत्तेत नसतानाही शिवसेनेचे बऱ्यापैकी संख्येने आमदार निवडून आले होते. याचा अर्थ असा की, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही दशकं शिवसेनेचा प्रभाव आहे. तो आता पुसला जाणार नाही शिवसेनेचं भवितव्य शिवसैनिकांवर अवलंबून राहणार आहे. कारण यापूर्वीही जी बंडं झाली तेव्हा बंड केलेल्या त्या आमदारांचं एखाददुसरा अपवाद वगळता राजकीय आयुष्य संपुष्टात आलं आहे. हा इतिहास आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्याचं राजकीय भवितव्य अवघड आहे.

सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या राजकारणात नैसर्गिक अनैसर्गिक असं काही नसतं, त्यात नाममात्र विचार आणि बहुतांश स्वार्थ असतो. तो घडवून आणलेला एक कृत्रिम व्यवहार असतो, त्याचा सौदा 'समान किमान कार्यक्रम-कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' नावानं केला जातो. त्यासाठीच युत्या आघाड्या बनतात आणि सोयीनं मोडतातही. अगदी भिन्न विचाराच्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशीही भाजपनं युती केली होती. अटलजींच्या मंत्रिमंडळात फारुख अब्दुल्ला होतेच की! असं असताना शिवसेनेतले बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार हिंदुत्वासाठी भाजपशी युती हवी, असं म्हणताच, स्वयंभू राजकीय विश्लेषकांनी शिवसेनेच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या महाविकास आघाडीला अनैसर्गिक ठरवलं. किंबहुना, इतिहास तपासल्यास शिवसेना-भाजप युती हीच अनैसर्गिक ठरते. भाजप हा १९८४ पर्यंत पूर्वावतारी जनसंघासारखा तत्त्वनिष्ठ आणि समाजवाद्यांच्या भाषेत सांगायचं, तर साधनशुचिता अर्थात साधनांची पवित्रता मानणारा, सोप्या शब्दांत सोवळं जपणारा पक्ष होता. आता ते दाखवण्यापुरतंही उरलेलं नाही. सत्ताप्राप्तीच्या उद्दिष्टासाठी वाट्टेल ते करणाऱ्या मंडळींचा भाजप झालाय. या मंडळींच्या आधीच्या पिढीनं ३० वर्षांपूर्वी अयोध्येतला मंदिर मशीद वादाचा वापर करीत हिंदुत्वनिष्ठ पत्रकारांच्या माध्यमातून भाबड्या अशिक्षित आणि देव-धर्मभोळ्या सुशिक्षित हिंदूंच्या डोक्यात हिंदुत्व भरण्यासाठी नाना युक्त्या केल्या. हिंदू शिवसेना ही आजच्याप्रमाणे सुरुवातीपासून मराठी माणसांचीच संघटना होती आणि आहे. पण भाजप-संघ परिवाराच्या सापळ्यात फसून शिवसेनेनं हिंदुत्वाचा सूळ खांद्यावर घेतला. पण त्यानं मुंबईतल्या गुजराती आणि उत्तर भारतीय हिंदूंनी शिवसेनेला आपलं मानलं नाही. मुंबईसह महाराष्ट्रातल्या अमराठींचा अग्रक्रम भाजपलाच राहिलाय. भाजप-शिवसेना युती असेल तरच ही मंडळी भाजपला स्मरून शिवसेनेला आपलं मानतात. ह्याचा अनुभव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसैनिक घेत आहेत. शिवसेनेची नाळ मराठी माणसाशी जुळलेली आहे, ह्याचं विस्मरण मुंबईतल्या अमराठी माणसांना होत नाही. उलट, त्याची खंत त्यांना सतत सलत असते. हा आटापिटा मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठीचा आहे. पूर्वी मुंबई काँग्रेसमध्येही अमराठी शक्ती होती. तिला रोखण्याचं काम महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्यानं केलंय. शिवसेना मुंबईत वाढली तरी ती काँग्रेसच्या मुळावर येणार नाही; काँग्रेसला ज्या गोष्टी उघडपणे करता येत नाहीत, त्या शिवसेनेमार्फत करून घेता येतील; आणि मुख्य म्हणजे, मुंबईचे मराठीपण शिवसेनेच्या माध्यमातून राखता येईल. अशी काँग्रेसची त्याकाळी भूमिका होती. एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या राजकारणासाठी शिवसेनाला भाजपशी जोडण्याचा आपला अट्टहास असल्याचं सांगतात. भाजपच्या बरोबरीनं हिंदुत्वाचं राजकारण करून शिवसेनेनं कमावलं काय, हा खरा प्रश्न आहे. ज्या शिवसैनिकांनी हातात हात घालून भाजपला मुंबईसह महाराष्ट्रात गल्लोगल्ली नेलं, त्या शिवसेनेलाच मुंबई-ठाण्यातले आमदार फोडून गारद करण्याचा डाव भाजपनं खेळलाय. काँग्रेस आणि भाजप यांच्या गुणवत्तेत तसा काहीच फरक नाही. ह्याचाही विचार शिंदे आणि त्यांचे साथीदार करणार नाहीत. ते सत्तेचे गुलाम आहेत. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचा 'हिंदूहृदयसम्राट' असा गौरव करत त्यांनी वाढवलेल्या शिवसेनेत बंडखोरीचा उद्योग त्यांच्याकडून झालाय!

याशिवाय या सगळ्या सत्तांतरात दिल्लीतल्या गुजराथ्यांचं लक्ष्य आहे ते मुंबईवर! मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे! संपूर्ण देशात आपली सत्ता असली तरी जगातलं महत्वाचं उद्योग केंद्र, आर्थिक राजधानी असलेली मुंबई आपल्या हातात नाही याचं शल्य केंद्र सरकारला आणि तिथं सत्तेवर असलेल्या गुजराथ्यांना नक्कीच आहे. तसं पाहिलं गेलं तर देशात जी चार महानगरं आहेत, मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई इथंही त्यांची सत्ता नाही. त्यामुळं केंद्राचे अनेक उद्योग, व्यापार, कार्यालये, ही गुजरातला नेलीत. आणखी काही घेऊन जायची तयारी चालवलीय. त्यासाठी आडकाठी आहे ती शिवसेनेची इथं जवळपास ५५० हून अधिक कार्पोरेट क्षेत्रातली मुख्यालये आहेत. यांच्याकडून देशातल्या राजकीय पक्षांना आर्थिक रसद पुरवली जाते. ती रोखण्यासाठी मुंबई त्यांना हाती हवीय त्यासाठी जीवाचा आटापिटा चाललाय. विरोधकांची आर्थिक स्थिती एवढी कमकुवत करायची की, त्यांना निवडणूक लढावताना अडीचणी याव्यात त्यांचं खच्चीकरण व्हावं यासाठी मुंबईची सत्ता हवीय. विरोधी पक्षांना इथून मिळणारी आर्थिक रसद त्यांना तोडायचीय म्हणून मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मराठी माणसाच्याच गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न होतोय. मात्र या गद्दारांना याची जाणीवच नाही. देशाची आर्थिक स्थिती नाजूक बनलेली असताना अवैध धंद्यांनी अक्राळविक्राळ पाय पसरलेत याकडं लक्ष नाही. रोजगार देणारे उद्योगधंदे भुईसपाट होताहेत त्यामुळं बेकारी वाढतेय. मात्र मुंबईतले उद्योगधंदे, बॉलीवूड, आयपीएल, या माध्यमातून आर्थिक भरभराट होतेय. या साऱ्यांच्या नाकदूऱ्या काढण्यासाठी, मुंबईतल्या सत्ताधारी शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारच्या पोलीस, सीबीआय, ईडी, एनसीबी, एनआयए, कस्टम, एक्साईज एवढंच नाही तर इकॉनॉमिक्स ओफेन्स ब्युरो अशा तमाम तपास यंत्रणा इथं मुंबईत वेगवेगळ्या निमित्तानं तळ ठोकून बसल्या होत्या पण हाती काहीच लागलं नाही. इथं संघर्ष पेटलाय तो मुंबईवरच्या वर्चस्वाचा! त्यासाठी तमाम तपास यंत्रणांना कामाला लावलंय आणि एकनाथ शिंदे आणि या गद्दारांसारख्या काही प्यादांना पुढं करून मुंबईतली ही सारी व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतोय....! त्यासाठी शिवसेनेच्या मुसक्या आवळायला हव्यात म्हणूनच साम, दाम, दंड, भेद ही सारी आयुधं घेऊन शिवसेनेवर हल्ला चढवलाय. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय करणार, शिवसेनेच्या पाठीशी राहणार की, एकाकी पाडणार? पण एक मात्र निश्चित की, आजवरचे बंड शिवसैनिकांनी मोडून काढलेत, त्यांनी बंडखोरांना राजकारणातून बाद केलंय, तेवढी हिम्मत आणि जिद्द त्यांच्यात नक्कीच आहे! अभी देखते रहो आगे आगे होता हैं क्या....! आज तरी महात्मा फुले यांची क्षमा मागून म्हणावंस वाटतं
सत्तेसाठी मती गेली l
मतीविना निष्ठा गेली ll
निष्ठेविना प्रतिष्ठा गेली l
इतुके अरिष्ट मात्र सत्तालोभाने आले ll
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...