Friday, 23 October 2020

नाथा झालासे 'राष्ट्रवादी'...!

"देवेंद्र फडणवीसांशी पंगा म्हणजे दिल्लीशी पंगा हे खडसेंना कळलंच नाही. भाजप मंत्र्यांच्या आणि विशेषत: पक्षाचे असलेल्यांच्या व्यवहारांची आचारसंहिता मोदींनी ठरवून दिलेली आहे हेही समजून घ्यायला हवं होतं. झाडावर चढणं जमलं तसं उतरण्याचीही कला अवगत पाहिजे. नाही तर माणूस झाडावर लटकून राहण्याचीच शक्यता अधिक असतं. ‘भाजपबद्दल, मोदी-शहांबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. फडणविसांनी छळल्यामुळं मी भाजप सोडतोय’ हे खडसे यांचं विधान म्हणजे फडणविसांवर निशाणा साधताना पक्षातील इतरांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न दिसतो. मोदी-शहांशी आपण पंगा घेऊ शकत नाही आणि घेतला तरी त्यात आपलंच नुकसान होईल याचं राजकीय शहाणपण त्यांच्याकडं नक्कीच आहे. फडणवीस ‘सॉफ्ट टार्गेट’ आहेत असं त्यांना वाटलं असावं. मात्र, खडसेंच्या मुद्यावर मोदी-शहा भक्कमपणे फडणवीस यांच्या बाजूनं उभं राहिलं हे दिसलंच! राजकारण्यांमध्ये या घरात पटलं नाही तर, शेजारच्या घरात नांदायला जायचं. हा राजकीय व्याभिचार सर्रास चालतो. त्यामुळं नागरिकांनी कोण, कोणत्या पक्षात गेला. या घटनेनं हुरळून जायचं कारण नाही. पक्ष बदलला म्हणून तो काही देवाच्या आळंदीला गेला नाही. चोराच्या आळंदीतच जागा बदलून राहात आहे. -----------------------------------
‘मी देवेंद्रला मोठं केलं’ असं एकनाथ खडसे नेहमी सांगत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून खडसे बोलायचे तेव्हा त्यांच्या अगदी पाठीशी बसलेले देवेंद्र फडणवीस त्यांना एकेक मुद्दा आणि कागद पुरवायचे हे सगळ्यांनी पाहिलंय. राजकारण हा संधीचा खेळ असतो. मुख्यमंत्रिपदाची संधी फडणवीस यांना मिळाली. इतर काहींच्या मानानं ते ज्युनिअर होते हे खरंच; पण एकदा एक व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष आणि सरकारमधील लोकांनी त्या खुर्चीचा आदर करायचा असतो. सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे वा विनोद तावडे हे फडणवीसांचे निकटवर्ती कधीही नव्हते, प्रसंगी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असाच त्यांचा परिचय; पण खुर्चीच्या आदराचं भान त्यांनी सार्वजनिकरीत्या तरी नेहमीच ठेवलं. फडणवीसांशी त्यांचे खटके उडले तरी संबंध टोकाला गेले नाहीत. खडसेंकडून मात्र ते भान सुटत गेलं. ‘कालचा पोरगा मला शहाणपण शिकवतो काय?’ या तोऱ्यानं नाथाभाऊंमध्ये आणि फडणवीस यांच्यात दरी पडणं सुरू झालं. मुनगंटीवारांसारखे मंत्री अधिकृत वा खासगी बैठकीत एखाद्या मुद्यावर बोलताना, ‘मला मुख्यमंत्री साहेबांशी बोलावं लागेल’ असं म्हणायचे; पण ‘मला कोणाला विचारायची काय गरज आहे?’ असा दर्प नाथाभाऊंच्या बोलण्यातून जाणवायचा. मंत्रालयात अनेक जण या गोष्टीचे साक्षीदार आहेत. मंत्री कितीही ज्येष्ठ आणि महत्त्वाची खाती सांभाळत असले तरी अंतिम अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो हे लक्षात ठेवून मंत्र्यांनी काम करायचं असतं. येताजाता मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उद्धार करीत एकेरीत बोलणं कुठं तरी दिल्लीच्या कॅमेऱ्यात टिपलं गेलंच असेल ना! फडणवीस यांना मोदी-शहांनी नेमलेलं होतं. फडणवीसांशी पंगा म्हणजे दिल्लीशी पंगा हे खडसेंना कळलंच नाही. भाजप मंत्र्यांच्या आणि विशेषत: पक्षाचे असलेल्यांच्या व्यवहारांची आचारसंहिता मोदींनी ठरवून दिलेली आहे हेही समजून घ्यायला हवं होतं. झाडावर चढणं जमलं तसं उतरण्याचीही कला अवगत पाहिजे. नाही तर माणूस झाडावर लटकून राहण्याचीच शक्यता अधिक असतं. ‘भाजपबद्दल, मोदी-शहांबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. फडणविसांनी छळल्यामुळं मी भाजप सोडतोय’ हे खडसे यांचं विधान म्हणजे फडणविसांवर निशाणा साधताना पक्षातील इतरांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न दिसतो. मोदी-शहांशी आपण पंगा घेऊ शकत नाही आणि घेतला तरी त्यात आपलंच नुकसान होईल याचं राजकीय शहाणपण त्यांच्याकडं नक्कीच आहे. फडणवीस ‘सॉफ्ट टार्गेट’ आहेत असं त्यांना वाटलं असावं. मात्र, खडसेंच्या मुद्यावर मोदी-शहा भक्कमपणे फडणवीस यांच्या बाजूनं उभं राहिलं हे दिसलंच. खडसेंनी पक्षांतर्गत पुनर्वसनासाठी दबावाची भाषा सातत्यानं केली; पण पक्षश्रेष्ठींनी त्यास दाद दिली नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शेवटपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला; पण पुनर्वसन कसं करणार याबाबत कुठलाही शब्द दिला नाही; कारण, ते त्यांच्या हातातच नव्हतं. ते ज्यांच्या हातात होते त्या मोदी-शहा-नड्डांनी खडसेंचं पुनर्वसन कोणत्याही परिस्थितीत नाही, असा ठाम निर्णय घेतलेला होता. हे लक्षात आल्यानंच खडसेंना हातात घड्याळ बांधावं लागलं असं दिसतं. तोडपाणीचा आरोप करणाऱ्यांबरोबर खडसे नारळपाणी प्यायला निघाले आहेत. खडसेंच्या पक्षांतराचा थोडाबहुत फटका भाजपला खान्देशात नक्कीच बसेल. मोदीलाटेत त्यांच्या सूनबाई मोठ्या फरकानं लोकसभेवर निवडून गेल्या; पण स्वत: खडसे २०१४ च्या निवडणुकीत कमी मताधिक्यानं जिंकले. २०१९ मध्ये कन्या रोहिणी यांना ते जिंकून आणू शकले नाहीत ही दुसरी बाजू आहेच. खडसे यांच्या निमित्तानं फडणवीस यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा एक एक्का राष्ट्रवादीच्या हाती लागलाय. खानदेशात त्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसला आपलं बस्तान बसवण्याची मोठी संधी मिळालीय. आधी मंत्रिमंडळातुन बाहेर काढणं आणि नंतर मंत्रिमंडळ विस्तार करतांना देखील खडसे यांना वगळणं त्यानंतर वेळोवेळी सर्व बाबतीत खडसे यांना डावलणं, विधानसभेत त्यांची तिकीट कापून मुलीला देणं, आणि त्यांच्या मुलीचा पराभव घडवून आणण्यात योगदान देणं या सर्व गोष्टी फडणवीस यांना आता भोवलेल्या दिसताहेत. खडसे यांना योग्य स्थान राष्ट्रवादीत दिला जाईलच पण यात फडणवीस यांचं पण राजकीय नुकसान आहे; तरीही सतत खडसे यांना गृहीत धरल्या गेलं, सतत अपमान, सतत डावलणं यातून त्यांनी शेवटी ज्या पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं त्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची वेळ खडसेंवर आणली गेलीय. याला भाजपपेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. हा सदरचा सगळा घटनाक्रम लक्षात घेतल्यास दिसून येतं. या सर्व बाबतीत शरद पवार यांचा विचार केल्यास "सो सुनार की एक लोहार" की ही म्हण शंभर टक्के पवार यांना लागू होते, म्हणूनच खडसे यांच्या निमित्तानं फडणवीस यांना देखील स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि खडसे पक्षामुळं नाहीतर आपल्यामुळं गेले हे कबूल करण्याची पण आत्तापर्यंतचा फडणवीस यांचा प्रवास बघितल्यास या दोन्ही गोष्टींची शक्यता शून्य आहे हे लक्षात येतं. फडणवीस दुसऱ्यावर फेकण्यासाठी केलेल्या आपल्याच चिखलात रुतू लागलेत. भाजपचे विधासभेतील १०५ आमदार हे फडणवीस यांचं यश नाही. फडणवीस हे लोकनेतेही नाहीत. मुख्यमंत्री झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून फडणवीस हे सर्वसमावेशक नेते कधी भासले नाहीत, तसं वागताना दिसले नाहीत. महत्वाकांक्षी प्रत्येक जण असतो, असावं मात्र एवढी घाई, एवढा उतावीळपणा राजकारणात चालत नसतो. मात्र डोईवर मोदी, शहा यांचे आशीर्वाद, सोबत सेनेची साथ यामुळे जे यश मिळत गेले, फडणवीस त्याला आपले कर्तृत्व समजत गेले. खरेतर लोकसभा, विधानसभेत भाजपला जे यश मिळालं त्याला कारणीभूत मुख्य ३ घटक मानता येतील. पैकी एक म्हणजे जनतेवर असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा प्रभाव, दुसरं म्हणजे शिवसेनेसह काही मित्रपक्षाची मिळालेली साथ आणि तिसरा महत्वाचा घटक होता तो म्हणजे दबाव टाकून, निवडून येण्याची क्षमता असलेले आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतुन आयात केलेले ४५ ते ५० आयाराम. मात्र फडणवीस या सगळ्या भेळ मिसळीला स्वतःचं बळ, स्वतःचा करिष्मा, स्वतःचा राजकीय प्रभाव समजून बसले. पक्षाच्या यशात, उभारणीत, वाटचालीत ज्यांनी मोठं योगदान दिलं त्यांना बाजूला सारत पुढं गेले. नाथाभाऊ सोडा, पंकजा मुंढे, गिरीश महाजन, अगदी विनोद तावडे यांच्या एवढा सुद्धा त्याना जनाधार नाही. तरीसुद्धा शरद पवार यांच्यासारख्या सध्याच्या राज्यातील लोकनेत्याचे राजकारण आपण संपवल्याची भाषा करू लागले. मागील ५ वर्षे मोदी, शहा आणि संघाची सगळी भक्कम यंत्रणा पाठीशी असल्यानं फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करू शकले. अन्यथा त्यांच्याकडे एक प्रशासक म्हणूनही काही गुण दिसत नाहीत. कसलाही अनुभव नसलेले उद्धव ठाकरे फडणवीस यांच्यापेक्षा किती तरी अधिक चांगले सरकार चालवत आहेत. आज नाथाभाऊ गेले. फडणवीस यांच्यात काही सुधारणा नाही झाली तर पंकजा मुंढे जाऊ शकतात. विनोद तावडे सुद्धा सेनेला जवळ करू शकतात. काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेलं सत्ताअभिलाशी लोक कधीही भाजपला जय श्रीराम करू शकतील. अशा वेळी मग एकटे फडणवीस पुन्हा १०५ सोडा, ५० जागाही जिंकू शकणार नाहीत. त्यामुळं राज्यात नेतृत्व बदल करणं हाच भाजपासाठी एकमेव पर्याय उरतो आहे. नितीन गडकरी हे सध्या सक्षम पर्याय आहेत. तो तपासून पहायला हरकत नसावी. कारण फडणवीस दुसऱ्यावर फेकण्यासाठी तयार केलेल्या आपल्याच चिखलात रूतू लागले आहेत. कोण एकनाथ खडसे? सामान्य माणसाचा आणि त्यांचा संबंध कायॽ राजकारणी माणसं, सरकारी खजिने ढापतात. सामान्य माणसापर्यंत, रुपयातले पंधरा पैसे पोचतात. हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदावर असताना सांगितले होतं. एखादा नेता पक्षबदल करुन गेला तर, केवढा बोभाटा होतो. सामान्य माणूस पुलाखाली राहतो आणि पुलाखालीच मरतो. भारतीय सामाजिक वातावरण संपूर्णपणे राजकारणानं व्यापलं आहे. माणसं गुंगी आल्याप्रमाणं राजकारणाची चर्चा करतात. स्वत:च्या बापाला चहा देत नाहीत पण नेत्याच्या फोटोला पाचशे रुपयाचा हार घालतात. हा देश सरंजामशाहीची चादर ओढून जीवन जगतोय. पावसाळ्यात गळणाऱ्या झोपडीत नेत्यांच्या श्रीमंतीचं गुणगान गाणारा देश आहे. माणसं दारिद्र्यातही, लुटणाऱ्या नेत्यावर प्रेम करतात. बलात्कारी साधुचा वाढदिवस साजरा करतात. आपला देश धर्मधुंदीत आहे. सगळ्याच धर्माची नशा नागरिकांना चढली आहे. त्याचा फायदा राजकारणी उचलतात. धुंदी महाराज आणि राजकारणी यांची अभंग युती आहे. याला कम्युनिस्ट सोडला तर कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. राजकारणी दलाल असतात. जर कमिशन खाल्ले नाही तर, चड्डीही अंगावर राहणार नाही. त्यामुळं जनतेनं या कमिशन एज़टांना ओळखावं. सगळे राजकारणी एका आळीत आणि एकाच चाळीत राहतात. त्यांची खोड एकच आहे. जनतेचा खिसा कापायचा. पूर्वी गावाबाहेर लफंग्यांची वस्ती असायची. आता ते गावात राहतात. ओळखू येत नाहीत. त्यांची घरं एकमेकांना चिकटून आहेत. त्यामुळं या घरात पटलं नाही तर, शेजारच्या घरात नांदायला जायचं. हा राजकीय व्याभिचार सर्रास चालतो. त्यामुळं नागरिकांनी कोण, कोणत्या पक्षात गेला. या घटनेनं हुरळून जायचं कारण नाही. पक्ष बदलला म्हणून तो काही देवाच्या आळंदीला गेला नाही. चोराच्या आळंदीतच जागा बदलून राहात आहे. हरीश केंची ९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...