Thursday, 15 October 2020
*प्रबोधन'ची शताब्दी...!
समाजकारयी स्वधर्मतत्वी सदा शिलेदार।
प्रजापक्ष नवसंवादी राजस सरदार ।।
विशिष्टपंथप्रवर्तकाची व्यर्थ न करी पूजा।
व्यक्तीचा नच मिंधा, बंदा सत्याचा काजा।।
विश्व निर्मिले जये दयाळे त्या जगदिशाला।
भिऊनी केवळ, नच अन्यायाला, लागे कार्याला।।
प्रबोधनकार म्हणून ख्यातकीर्त असलेले केशव सीताराम ठाकरे यांचं 'प्रबोधन' नावाचं वृत्तपत्र अल्पकाळ चाललं पण त्याचं बिरुद कायमचं चिकटून हयातभर त्याच नावानं ओळख उभ्या महाराष्ट्राला राहिलीय! के.सी.ठाकरे हे प्रबोधनकार म्हणून ओळखले जात असले तरी केवळ पत्रकार एवढीच त्यांची प्रतिमा नाही. तर पत्रकारिता हा ठाकरे यांच्या बहुरंगी, बहुढंगी आणि बहुरूपी जीवनाचा केवळ एक भाग होता. जिनगर, छायाचित्रकार, तैलचित्रकार, शिक्षक, नाटककार, टंकलेखक, पटकथा-संवाद लेखक, ग्रंथलेखक, इतिहासकार, प्रचारक, पत्रकार, इत्यादी अनेक भूमिकांत ठाकरे वावरले. समाजसुधारणा, चळवळ आणि वक्तृत्व ही देखील त्यांच्या जीवनाची महत्वाची अंगं होती. ब्राह्मणेतर चळवळीतही ठाकरे यांनी सक्रिय भाग घेतला होता. १८८५ मध्ये जन्मलेल्या प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीनं, वक्तृत्वानं आणि कर्तृत्वानं महाराष्ट्राच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलं आहे. १६ ऑक्टोबर १९२० रोजी 'प्रबोधन' पाक्षिक जन्माला आलं पण त्यापूर्वीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा बोलबाला झालेला होता. ठाकरे यांनी पहिला लेखन हल्ला चढविला तो इतिहास संशोधक राजवाडे यांना! त्यासाठी 'कोदण्डाचा टणत्कार' हा ग्रंथ लिहला. ऐतिहासिक पुराव्यानिशी राजवाड्यांची विधानं खोडून काढली. यानिमित्तानं ठाकरेंचा ब्राह्मणेतर चळवळीशी ऋणानुबंध जुळून आला. या चळवळीतूनच त्यांचे वृत्तपत्र जन्माला आलं. चळवळी, प्रचार आणि इतरांना उत्तरं देण्यासाठी हाती वृत्तपत्र असलं पाहिजे या जाणिवेतून 'प्रबोधन' सुरू झालं. प्रबोधनचं ब्रीद काय होतं ते या लेखाच्या प्रारंभी उदृत केलंय. ते त्यांनी अभिमानानं मिरवलं होतं.
पीडब्ल्यूडी मधील नोकरी सोडून त्यांनी हे पत्र मुंबईतून सुरू केलं. पहिल्या अंकात 'प्रबोधन' या नावाबरोबरच 'उतिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।' असं वचन लिहिलेलं होतं. याशिवाय Prabodhan - A Fortnightly Journal devoted to the Social , Religious, and Moral Regeneration of the Hindu society या इंग्रजी मजकुरात सामाजिक, धार्मिक आणि नैतिक उत्थानाचं उद्दिष्ट सांगितलं होतं. पण राजकारणाचा त्यात उल्लेख नव्हता. पहिल्या अंकात लिहिताना प्रबोधनकार लिहितात.…"प्रबोधन हा पक्का नवमतवादी आहे. नवयुगात या अफाट हिंदी राष्ट्राने सर्व जगाला चकित करून सोडण्यासारखी अननुभूत कर्तबगारी, उदात्त प्रगमनशीलता आणि विश्वव्यापक धर्माचे साम्राज्य प्रसृत करण्याची प्रेमपूर्ण तडफ दाखवावी, अशी प्रबोधनाची महत्वाकांक्षा आहे. ही साध्य होण्यासाठी हिंदू समाजाच्या धार्मिक व सामाजिक जीवनात उदारपणा, लवचिकपणा व 'आत्मवत सर्व भूतेशु' असला भ्रातृभाव याची खरीखुरी जाणीव उत्पन्न करण्याची कामगिरी प्रथमा चोखाळण्याचे प्रबोधनने ठरविले आहे... राजकीय सुधारणा झाली म्हणजे इतर सर्व सुधारणा आपोआप होतील, या गोंडस तत्वावर प्रबोधनाचा मुळीच विश्वास नाही.... प्रबोधनाचा जन्म ज्या कलमातून झाला आहे त्या कलमाने यावज्जन्म कधी स्वराज्यद्रोह केलेला नाही. स्वराज्यद्रोह हे या कलमाची ब्रीदच नव्हे व तसे त्याचे बीजही नाही...हे कायस्थाचे कलम आहे.... जेथे जेथे सत्य दिसेल, तेथे तेथे प्रबोधनाचा माथा अत्यंत उत्कट उमाळ्याने सर्वांच्या आधी विनम्र होईल. सर्व सज्जनांचा प्रबोधनाला आशीर्वाद असावा...!
'प्रबोधन'ला राजकारणाचं वावडं नव्हतं, पण मूलभूत सुधारणा व्हावी म्हणून सामाजिक सुधारणांना प्राधान्य देण्याचं त्याचं उद्दिष्ट होतं. आगरकरांच्या 'सुधारक'नंतर सामाजिक सुधारणांना वाहिलेलं हे पत्र असल्यानं त्याला समाजसुधारकांचा पाठिंबा मिळत गेला. 'प्रबोधन'चा अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसार झाला. पण जाहिरातीपासून अलिप्तच राहिला. वर्गणीदारांच्या वर्गण्या, ठाकरेंच्या पुस्तकांची विक्री आणि देणग्या यावरच 'प्रबोधन' चालला होता. १९२३ साली 'प्रबोधन' मुंबईहून साताऱ्याला स्थलांतरित झालं ते उद्योगपती मित्र कूपर यांच्या आग्रहानं आणि भाऊराव पाटील यांच्या मध्यस्थीनं. पण कूपर यांच्याच राजकीय चालीनं वैतागलेल्या ठाकरेंनी साताऱ्याहून पुण्यात 'प्रबोधन' पुण्यात आणलं. त्यावेळी इथं ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद पेटलेला होता. त्यात ठाकरेंना ब्राह्मणांनी डिवचल्यानंतर 'प्रबोधन' मासिक स्वरूपात तर 'लोकहितवादी' साप्ताहिक सुरू केलं. पुण्यातल्या वादात 'प्रबोधन' आणि 'लोकहितवादी'सह ठाकरे उतरले. आपल्या परखड शैलीनं त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. पण सतत चालणाऱ्या उघड्या नागड्या जातीयवादाला कंटाळून त्यांनी पुणं सोडलं.
पुण्यात असेपर्यंत 'प्रबोधन' सुरू होतं. नंतर बंद पडलं. पण त्यांनी त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून लेखन केलं. ठाकरे यांच्या 'प्रबोधन' पत्राची कारकीर्द अवघी पाच-सहा वर्षांचीच होती. पण तेवढ्या अल्पावधीतच त्यांनी केलेल्या वृत्तपत्रांच्या आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील कामगिरी न विसरता येण्यासारखी आहे. ठाकरेंच्या 'प्रबोधन'चं स्वरूप राजकीय प्रश्नांवर भर देणारं नव्हतं ते सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारं होतं. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा शास्त्रशुद्ध पाया होता मात्र तो पांढरपेशा वर्गात पुरताच मर्यादित होता. त्यांचा सुधारणावाद बहुजनांपर्यंत पोहोचलाच नाही. महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य याची दखल त्यांनी घेतलेली नव्हती. त्यादृष्टीनं ठाकरे यांनी 'प्रबोधन'द्वारे या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. त्या अधिक व्यापक होत्या. फुले यांच्या विचारांनी आणि चळवळीनं प्रचलित झालेल्या नव्या प्रवाहाशी ठाकरे यांचा परिचय होताच त्यात ते सहभागी झाले. ठाकरे यांचं लेखन अधिक कडवं आणि त्वेषपूर्ण होतं. त्यांचं लेखन आक्रमक आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडणारं होतं. त्यांच्या वाणीच्या आणि लेखणीच्या शैलीला महाराष्ट्रात जोड सापडणं त्याकाळी कठीण होतं. ते वाद काढण्यात पटाईत होते आणि त्याचे शब्द अगदी रक्तबंबाळ करणारं असत, त्यांचा नुसता टोला नव्हे तर सणसणीत प्रहार असे. वाद घालणाऱ्याच्या अंगाचा तिळपापड व्हावा अशी त्यांची भाषा असे. शिवाय ती भाषा अधिक बाळबोध सोपी आणि अस्सल मराठमोळी वळणाची होती. ठाकरे यांना मुळातच वादविवादाची हौस होती. अरे म्हटले की नुसतं कारे म्हणून ते थांबत नसत; उलट दोन टोले स्वतः लगावून विरोधकांना निरुत्तर करण्याचं त्यांचं कसब कमालीचं होतं. वादविवाद करत असतानाही प्रतिपक्षाची विधानं खोडून काढण्यासाठी ते तेवढेच जोरदार पुरावे सादर करीत. नुसते पट्ट्याचे हात फिरवण्यात त्यांना समाधान होत नसे. आपलं म्हणणं सप्रमाण मांडण्यासाठी ठाकरे कमालीची मेहनत घेत. तपशिलाचा कंटाळा न करता आपली बाजू ते पुरेपूर पुरावे देऊनच मांडीत. एकदा वादाला सुरुवात केल्यानंतर अगदी फटकळपणानं ते मारा करीत. मग त्यात कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. भल्याभल्यांना लोळवताना त्यांनी मागेपुढं पाहिलं नाही. शाहू महाराजांवर त्यांची भक्ती होती, पण क्षात्र जगद्गुरु पीठ त्यांनी निर्माण करताच ठाकरे यांनी स्पष्टपणे त्यांच्यावर टीका केली. आपलं स्वत्व आणि स्वतंत्र बाणा त्यांनी कधीच सोडला नाही. अपमान जरासाही झाला तरी प्रबोधनकार ताडकन संबंध तोडून टाकून बाजूला होत. ठाकरे यांचा हा बाणा शेवटपर्यंत कायम होता. आयुष्याच्या अखेरीला आचार्य अत्रे यांच्यासारख्या जहांबाज माणसाची टक्कर देऊन त्यांना नामोहरम करण्याचा विक्रम प्रबोधनकारांनी केला. ठाकरे यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाचं खरं दर्शन 'प्रबोधन'तून झालं. तीच वृत्ती अखेरपर्यंत कायम राहिल्यानं 'प्रबोधनकार' हे त्यांना कायमचं चिकटलेलं बिरुद सार्थ ठरलं. एक तडफदार परखड आणि तत्त्वनिष्ठ असं बहुजनांच्या भल्यासाठी झटणारे पत्र ही 'प्रबोधना'ची प्रतिमा सतत कायम राहिली. ते पत्र नावाप्रमाणेच 'प्रबोधन' करणारं तर होतंच पण वाचकाला कृती प्रवण करण्याची ताकद त्यात होती. हे 'प्रबोधन' खडबडून जागे व्हावं असं धक्का देणारं होतं...!
हरीश केंची
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
दान पावलं....देवा दान पावलं...!
"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment