Friday 23 October 2020

'प्रबोधन'च्या निमित्तानं ठाकरेंचं हिंदुत्व...!

"असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थाने समजण्यापेक्षा उनाडटप्पूंचे पांजरपोळ मानायला हरकत नाही. आणि असल्या या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फर्लांगदर्शन दगडधोंड्यांपेक्षा फाजील महत्त्वही कोणी देऊ नये. ज्या अंबाबाईला भिक्षुकांची कैद झुगारून देता येत नाही. ती अंबाबाई आम्हा दीनदुबळ्यांचे भवपाश तोडणार ती काय! ही शोचनीय दुःस्थिती पाहिली म्हणजे हिंदू देवळे जमीनदोस्त करणारे अफझुलखान, औरंगजेब एकप्रकारे मोठे पुण्यात्मा होऊन गेले, असे वाटू लागते....!" हा उतारा आहे, `प्रबोधन`मधल्या `अंबाबाईचा नायटा` या गाजलेल्या अग्रलेखातला! हात लावला तर चटका बसेल, असे हे प्रबोधनकारांचे धगधगते शब्द. ठाकरी शैलीचा अस्सल हिंदुत्ववादी पुरावा. आज कोरोनाकाळात ज्यांना देवळं उघडण्याचा पुळका आलाय, त्यांच्या तोंडावर हा फेकायला हवा. आणि समोरचा कोश्यारी आजोबांसारखा बेगडी हिंदुत्वाचा कैवार घेणारा उपटसुंभ असेल, तर त्यासाठी प्रबोधनकारांचं अख्खं पुस्तकच आहे, `देवळांचा धर्म, धर्माची देवळं`! हिंदू धर्म वाचवायचा असेल, तर देवळांचं उच्चाटन करा, असं त्यात सांगितलंय. हे पुस्तकही `प्रबोधन`मधूनच जन्माला आलंय. त्या `प्रबोधन`चा पहिला अंक ९९ वर्षांपूर्वी म्हणजे १६ ऑक्टोबर १९२१ ला निघाला होता. नुकतीच त्याची शताब्दी वर्ष सुरू झालीय. ----------–------------------------------------
*प्र*बोधनकार हिंदुत्ववादी होते. त्याचवेळेस प्रबोधनकार कट्टर बहुनजवादीही होते. आजचा हिंदुत्ववाद पाहिला की, या दोन गोष्टी आपल्याला परस्परविरोधी वाटतात. कारण आजचा हिंदुत्ववाद ब्राह्मणवादाची थुंकी झेलत जन्माला आलाय. प्रबोधनकारांचा हिंदुत्ववाद तसा नाही. तो सर्वप्रकारच्या जातीय, धार्मिक, भाषिक शोषणाच्या आणि अन्यायाच्या विरोधात एल्गार पुकारतो. तरीही तो हिंदुत्ववादच राहतो. आज उद्धव ठाकरे अनेकदा बाळासाहेबांचं एक वाक्य सांगतात, `आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही!' मग हे कसलं हिंदुत्व आहे? याचं उत्तर हवं असेल तर सावरकर आणि गोळवलकरांचं हिंदुत्व उपयोगी नाही. त्यासाठी प्रबोधनकारच हवेत. प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही. आपल्या सगळ्यांचाच आहे. देशाचा आहे. फक्त सेक्युलॅरिजमनं मोदींच्या हिंदुत्वाला उत्तर देता येणार नाहीय. त्यासाठी प्रबोधनकारांचा `हिंदवी नीळकंठीझम` पाहिजे. प्रबोधनमधलाच दोन तुकड्यातला हा लेख प्रबोधनकारांचं हिंदुत्व समजावून सांगतो. तो मुळातून वाचायला हवा. सांगायचं इतकंच की `प्रबोधन` आजही महत्त्वाचं आहे. ते नऊ वर्षं चाललं. या नऊ वर्षांत त्याचे शंभरही अंक निघाले असतील. तरीही त्यातला काळाच्या कसोटीवर उतरलेला ऐवज आपल्याला आजही नव्या लढाईची प्रेरणा देऊ शकतो. `प्रबोधन`नं केशव सीताराम ठाकरेंना प्रबोधनकार बनवलं. सत्यशोधकी विचारांना एक पाऊल पुढं नेलं. मराठी पत्रकारितेवरच्या एका जातीच्या मक्तेदारीला सुरुंग लावून तिला नवं वळण लावलं. 'प्रबोधन' पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्तानं ठाकरे फॅमिलीच्या, शिवसेनेच्या हिंदुत्वाचा आढावा घ्यायला हवाय! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंचे वडील. उद्धव आणि राज ठाकरेंचे आजोबा. स्वतःला सापडलेल्या काळाच्या तुकड्यावर या चार ठाकरेंनी स्वतःची लहानमोठी मुद्रा महाराष्ट्रावर उमटवलीय. त्यामुळं ही उत्तरं स्वाभाविक आहेत. फक्त प्रबोधनकार ठाकरे यांची ही ओळख तिथंच थांबणं चुकीचं आहे एवढंच. त्यांच्या 'प्रबोधनकार' असण्याबद्धल आदर असणाऱ्यांना त्यांच्या ठाकरे असण्याचं वावडं आहे आणि त्यांच्यावर ठाकरे म्हणून प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या 'प्रबोधनकार' असण्याचा विटाळ आहे. त्यामुळे आपापल्या चौकटीत त्यांना बसवण्यासाठी आटापिटा करणाऱ्यांची प्रबोधनकारांना अख्खं स्वीकारण्यात अडचणच होते. मग आपापल्या सोयीच्या प्रबोधनकारांचा तुकड्या तुकड्यातला वारसा पुढं नेला जातो. सगळ्याच महापुरुषांचं असं होतं. पण प्रबोधनकारांच्या बाबतीत ते अधिक ठळक आहे. कारण अगदी टोकाचे विचार त्यांच्या लिखाणात आणि जगण्यातही सहज एकत्र बागडताना सापडतात. आजवरचा अनुभव पाहता त्यात प्रबोधनकारांचा उल्लेख `थोर समाजसेवक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, कलावंत, तैलचित्रकार, वादविवादपटू, प्रभावी वक्ते, झुंझार पत्रकार' असा असतो. ही विशेषणं आज आपल्या सगळ्यांच्याच सोयीची आहेत. पण 'बहुजनवादी विचारवंत' आणि 'विद्रोही इतिहासकार' ही त्यांची ओळख त्यांच्या व्यक्तित्वाशी अधिक जुळणारी आणि जास्त महत्त्वाची आहे. त्याच भूमिकेतून प्रबोधनकारांनी महाराष्ट्राचे विचार आणि कृती, इतिहास आणि भूगोल याला नवं वळण दिलंय. बाळासाहेबांमुळं प्रबोधनकारांची आठवण महाराष्ट्रात जागती राहिलीय. तसं झालं नसतं तर प्रबोधनकार सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीतल्या त्यांच्या इतर सवंगड्यांसारखेच विस्मृतीत हरवले असते, हे निश्चित! पण त्यांनी महाराष्ट्रावर टाकलेला वैचारिक प्रभाव मात्र गेला नाही. प्रबोधनकारांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यात महाराष्ट्राच्या समाजजीवनातील मोक्याच्या ठिकाणी गाठी मारून ठेवल्यात. त्यामुळं वरवरच्या मलमपट्ट्या सोडून महाराष्ट्राला वारंवार मुळातल्या जातिभेदांच्या जखमांचा शोध घेत खोलात जावं लागतं. धर्मचिकित्सा हा प्रबोधनकारांच्या लिखाणाचा मूळ गाभा आहे. त्यांनी हिंदू धर्माची जितकी चिरफाड केलीय, तितकी फार कमी जणांनी केली असावी. अत्यंत निर्दय शब्दांत त्यांनी हिंदू धर्मातल्या ब्राह्मणी जातवर्चस्ववादी मानसिकतेवर टीका केलीय. "आजचा धर्म हा हिंदूधर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म हा बुळ्याबावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे!" या त्यातल्या त्यात सोबर वाक्यातून प्रबोधनकारांच्या ब्राह्मणशाहीवरील हल्ल्याची कल्पना येऊ शकते. पुरोहितशाही हे हिंदू धर्माच्या आणि पर्यायानं देशाच्या अवनतीचं सर्वांत महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी वारंवार मांडलंय. तीच प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाची मांडणी आहे. स्वतः हिंदू आणि हिंदुत्ववादी बनून हिंदू धर्मातल्या ब्राह्मणी वर्चस्वावर कोरडे ओढण्याचा प्रबोधनकारांचा पवित्रा अनेक हिंदुत्ववाद्यांसाठी अडचणीचा आहे. 'बहुजनवादी हिंदुत्वाचे मूळपुरुष' म्हणूनच प्रबोधनकारांचा शोध घ्यायला हवा. या हिंदू धर्माचा खूनच करायला हवा, इथपर्यंत टोकाचा विचार मांडूनही प्रबोधनकार हिंदुत्ववादी राहतात. कारण ते ना हिंदू धर्माचा विरोध करतात, ना हिंदुत्ववादाचा. ते विरोध करतात, हिंदुत्वाच्या नावानं बहुजनांचं शोषण करणाऱ्या ब्राह्मणी पुरोहितशाहीचा! ही सारी मांडणी निव्वळ अचाट आहे. हे करताना ते कुठंच ब्राह्मणी हिंदुत्ववादाच्या वळचणीला गेलेले नाहीत. छत्रपती शाहूंच्या नंतर ब्राह्मणेतर चळवळीत मराठ्यांच्या दादागिरीला कंटाळून किंवा इतर कुठल्या कारणांमुळं 'प्रभात'कार वा.रा.कोठारी, रावबहाद्दूर सी.के.बोले यांच्यासारखे ब्राह्मणेतर आंदोलनातले मोठे नेते हिंदूमहासभेत जाताना दिसतात. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे प्रबोधनकार त्या वाटेकडे ढुंकूनही बघत नाहीत. उलट न. चिं. केळकर, सावरकर या हिंदू महासभेच्या अध्यक्षांवर अनेकदा टीका करतात. बाळासाहेबांनी तोच धागा पकडून ब्राह्मणी हिंदुत्ववादाला केवळ वापरलं. संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. संघवाल्यांना आपल्या जवळही येऊ दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपला संघटन बांधणीतला सर्वांत मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्कं माहीत होतं. त्यामुळंच बाळासाहेब असेपर्यंत संघ कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. पण आता पारडं पूर्ण फिरलंय. प्रबोधनकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांचं टीका करण्यासाठी आवडीचं गिऱ्हाईक असावं, असं त्यांचं लिखाण वाचताना वाटतं. विशेषतः गोळवलकर गुरुजींनी गोहत्येविरुद्ध केलेल्या आंदोलनावर प्रबोधनकारांनी जळगावच्या 'बातमीदार' साप्ताहिकात लिहिलेली लेखमाला आजच्या संदर्भात महत्त्वाची आहे. बाळासाहेबांनी तोच धागा पकडून ब्राह्मणी हिंदुत्ववादाला केवळ वापरलं. संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. संघवाल्यांना आपल्या जवळही येऊ दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपला संघटन बांधणीतला सर्वांत मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्कं माहीत होतं. त्यामुळेच बाळासाहेब असेपर्यंत संघ कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. पण आता पारडं पूर्ण फिरलंय. भाजपच्या यशस्वी झंझावातात टिकून त्याला उत्तर द्यायचं असेल तर उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार शोधावे लागतील. अफाट यश मिळवल्यानंतर आज आपल्याबरोबर कोणीही का नाही, हे समजून घ्यायचं असेल तर राज ठाकरेंना देखील प्रबोधनकारांकडं जावं लागेल. मनसेच्या झेंड्यावरचे रंग केव्हाचेच उडून गेलेत. त्या झेंड्यात अपेक्षित 'सोशल इंजिनिअरिंग' हवं असेल तर राज ठाकरेंना बाबासाहेब पुरंदरे नाही, तर प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला इतिहास समजून घ्यावा लागेल. बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेली मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादाची चलनी नाणी सहज उचलली. पण प्रबोधनकारांच्या जहाल बहुजनवादाचा वारसा बाळासाहेबांनी पुढे चालवला नाही. तो त्यांनी चालवण्याचा थोडाफार प्रयत्नही केल्याचे संदर्भ सापडतात. पण तो बहुधा त्यांना पेलवला नसावा. प्रबोधनकारांनी बहुजनवादापायी स्वतःला पणाला लावून आयुष्याची ससेहोलपट करून घेतलेली त्यांनी जवळून पाहिली होती. त्याचा तो परिणाम असावा. बाळासाहेब स्वतः जातनिरपेक्षच जगले. याचा अर्थ त्यांना जात माहीत नव्हती असं नाही. महाराष्ट्रातल्या जातींचा इतिहास आणि भूगोल तळहातावरच्या रेषांपेक्षाही चांगला माहीत असलेल्या प्रबोधनकारांचे ते सुपुत्र होते. शिवसेनेच्या राजकीय प्रवासात त्यांनी जातीची ही समज नीट वापरली. काँग्रेसनं मराठा, मुस्लिम आणि महार या 'थ्री एम'चं राजकारण केलं. मात्र याच तीन समाजघटकांना विरोध करत बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्रात पसरवली. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबेंनी शिवसेनेच्या जातीय बांधणीची नस बरोबर पकडलीय. ते सांगतात, 'मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपापल्या जातिसमूहांविरुद्ध केलेलं बंड म्हणजेच शिवसेना!' पण राजकारणात यशस्वी होण्यासाठी बाळासाहेबांना प्रबोधनकारांच्या विचारांपासून दूर जाण्याची किंमत मोजावी लागली. बाळासाहेबांनी जेव्हा 'रिडल्स'ला विरोध केला तेव्हा शिवसेना प्रबोधनकारांच्या धर्मचिकित्सेपासून तुटली. तरीही ती शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करू शकत होती. शिवसेना महाड अधिवेशनापासून रामजन्मभूमी आंदोलनात उतरली, तेव्हा तिने 'देवळाचा धर्म, धर्माची देवळे' या पुस्तकातल्या प्रबोधनकारांच्या विचारांवर हक्क सांगण्याचा अधिकार तिथंच गमावला. तेव्हाही बाळासाहेब राममंदिराच्या जागी शौचालय बांधा असं सांगू शकत होते. स्वतः भगवी शाल पांघरून रुद्राक्षाची माळ हातात घेणारे बाळासाहेब आध्यात्मिक बुवांवर हमखास टीका करत राहिले. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वात त्यांच्या सामाजिक विचारांची बैठक नेहमीच झाकली गेली. त्यात त्यांच्या राजकारणातल्या यशाचं रहस्य आहे. इतकी वर्षं टिकून राहण्यामागे त्यांची सामाजिक समज कारणीभूत आहे. उद्धव किंवा राज ठाकरे यांना मराठी अस्मितेचं राजकारण टिकवून ठेवायचं असेल तर जातजाणिवांशी ट्युनिंग जुळवावंच लागेल! प्रबोधकारांच्या मार्गावर वाटचाल करावी लागेल. हरीश केंची ९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...