Thursday, 8 October 2020

गांधी विचारांचा उलटा प्रवास


"दुर्दैवाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची खिल्ली उडवणाऱ्या सुमारांची बेसुमार वाढ झालेली दिसतेय. तोंडानं त्यांना प्रात:स्मर्णीय म्हणायचं, बाहेरच्या देशात त्यांचे गोडवे गायचे पण अंतःस्थ हेतू गांधींची टिंगलटवाळी करण्याचा ठेवायचा! मूहमें गांधींचा ‘राम’ आणि बगलमें ‘नथुराम’ अशी गांधी द्वेष्ट्यांची पाताळयंत्री चाल आहे. यात महिलाही दिसतात याची खंत वाटते. मध्यंतरी तर एका महिलेनं गांधीजींचा पुतळा बनवून त्याला गोळ्या घालण्याचा प्रमाद केला होता. गांधीद्वेष किती पराकोटीला पोहोचलाय, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण होतं. गांधीजींचे पुतळे पाडा, त्यांची चित्रे नोटांवरून हटवा असं म्हणत त्यांना गोळी घालणाऱ्या, नथुराम गोडसेला धन्यवाद देणाऱ्या निधी चौधरी नामक एक आयएएस महिला अधिकारीही आहेत. त्यांच्या पुतळ्याला गोळी घालणारी पूजा पांडेय ही एक महिला आहे. गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणारी प्रज्ञासिंह ठाकूर हीदेखील महिलाच आहे. ज्या महात्मा गांधींनी आयुष्य वेचलं, त्यांच्याविषयीच या महिलांनी असं कृत्य करावं, हे खूपच क्लेशदायक आहे!"

--------------------------------------------------
*भा* रतीय स्वातंत्र्यलढ्याचं अहिंसेच्या मार्गानं नेतृत्व करणारा नेता इतकीच आजच्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ओळख आहे. स्वातंत्र्य लढ्यातील गांधी हे हिमनगाच्या टोकासारखं आहेत. हिमनगाचा समुद्रातील अदृश्य भाग कैकपटीनं मोठा असतो. तो आपल्याला दिसतच नाही. गांधीजींचं अगदी तसंच आहे. त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद, सामाजिक अन्याय, अंधश्रद्धा, महिलांना मिळणारं दुय्यम स्थान, पडदा प्रथा, ग्रामीण विकास, स्वच्छता, कष्टकरी वर्गाची होणारी पिळवणूक यासाठी केलेला संघर्ष स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही खूप मोठा होता. देशाची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठीचा लढा परकियांशी होता, पण देशातील कुप्रथा, सामाजिक अव्यवस्था, भांडवलशाहीविरुद्धचा लढा त्यांचा स्वत:च्याच माणसांशी होता, त्यामुळं तो अधिक अवघड आणि कठीण होता. तरीही त्यांनी धर्ममार्तंड, वतनदार-जहागीरदारांविरुद्ध संघर्ष केला. एकाच वेळी ते अनेक पातळ्यांवर लढत होते. एखादी व्यक्ती म्हणून ते कदापि शक्य नव्हते. म्हणूनच गांधी ही व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता, एकाच वेळी सर्वच आघाड्यांवर विचारांच्या माध्यमातून त्यांचा संघर्ष सुरू होता. गांधी यांना जाऊन सात दशकं झाली, तरीही त्यांनी दिलेला विचार आजही जिवंत आहे. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देश आज गांधीजींनी दाखवलेल्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहेत. अमेरिका-ब्रिटनसारखी बलाढ्य राष्ट्रेही गांधी विचारांचं अनुकरण करताना दिसताहेत. गांधी आज जगभरातील शोषित-पीडित वर्गाच्या आंदोलनाचे प्रेरणास्रोत आहेत. विश्वशांतीच्या संकल्पनेचे ते उगमस्थान आहेत. महिला-मुलींच्या न्याय्य हक्कासाठी झगडणाऱ्या लोकांसाठी ते ऊर्जा आहेत. अवघ्या जगावर आज गांधी विचारांनी गारुड केलेलं असताना ज्या भारतात ते जन्मले, इथल्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, प्राणाची आहुती दिली, त्याच लोकांच्या पुढच्या पिढ्यांनी गांधींचा इतका द्वेष आणि तिरस्कार करावा, हा किती मोठा दुर्दैवविलास!

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटलं होतं की, “ज्या सर्व वाईट गोष्टींसाठी पुरुषानं स्वतःला जबाबदार धरलं त्यापैकी कोणतीही गोष्ट इतकी अपमानजनक, इतकी धक्कादायक किंवा क्रूर नाही जितकी त्यानं एखाद्या स्त्री अत्याचार केला ही आहे.” महात्मा गांधींचे हे बोल आजच्या काळात विशेषतः आजच्या देशातील स्थितीत अत्यंत समर्पक ठरतायत. उत्तर प्रदेशच्या हाथरस इथल्या दलित मुलीचं जे काही झालं त्या अशा भारताची आपल्या राष्ट्रपित्यांनी  कल्पनाही केली नसेल. मात्र, आजपासून जवळपास शंभरवर्षांपूर्वी महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारे महात्मा गांधींचे विचार आज नीट समजून घेणं आणि आचरणात आणणं महत्वाचं आहे. गांधीजींनी नेहमीच महिलांना समान आणि सन्मानाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचे महिलांबद्दलचे विचार ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून समोर आलंय. त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी महात्मा गांधींचे विचार अगदी दृढ होते. यासाठी एक उदाहरण म्हणून आज बापूंच्या विचारांची उजळणी करण्याची वेळ आली आहे. अशावेळी देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेलेला असताना तब्बल ९९ वर्षांपूर्वी १५ सप्टेंबर १९२१  रोजी यंग इंडियामधील बापूंचे विधान आजच्या स्थितीतही चपखल बसत आहे. महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशावेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.

गांधी विचाराचे एक तत्त्वज्ञान आहे. परदेशातल्या अनेक देशांनी या गांधीवादाच्या तत्त्वज्ञानाने अचंबित होऊन गांधींना विश्वपुरुष मानले. त्या महात्माजींना आपल्या देशातील जनता मात्र फार झपाटय़ाने विसरलेली दिसते आहे. गांधीजींना ज्याने मारले, त्या प्रवृत्तीचा गौरव होताना दिसतो आहे. त्या मारेकऱ्याची स्मारके करण्याची चर्चा होते. त्यावर नाटके येतात आणि एका खलनायकाची प्रतिमा नायकामध्ये परावर्तीत करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न होतो. दुर्दैवाने आजचे सरकार हेसुद्धा गांधीवादी विचारांना संपवण्याच्या मागे आहेत. या सरकारला आणि या प्रवृत्तीला ही गोष्ट स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, असा प्रयत्न करणारे संपतील; पण गांधीवाद नावाचा विचार कधीही संपू शकणार नाही. गांधींना मारणारे मेले; पण गांधींजी विचारांच्या रूपाने जिवंत आहेत. गांधीजींनी देशाला जो महामंत्र दिलेला आहे, त्या महामंत्रातून या देशाला मिळणारी स्फूर्ती आणि ऊर्जा ही देशाची शाश्वत ऊर्जा आहे. म्हणूनच आजही समाजमाध्यमावर ‘Knowing Gandhism’ या नावाने तरुणांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असलेला ग्रुप कार्यरत आहे. ह्या तरुणांनी गांधीजींना प्रत्यक्ष पाहीले नसले तरी त्यांच्या चित्रफितीतून, पुस्तकातून त्यांची भेट घडली आहे. त्यामुळे या तरुणांच्या जीवनात समाजकारणाची एक नवी उर्मी संचारली आहे. त्यांनी गांधी पचवल्यामुळे ते गांधीजींचा द्वेष करणाऱ्यांशीही प्रेमाने आणि करुणेनेच बोलतात, पण त्याचवेळेस गांधी विचार ठामपणे मांडतात. यावरून गांधी विचार किती शाश्वत आहेत हेच सिद्ध होते. अनेक विद्यापीठात गांधी विचाराचा अभ्यास नव्याने सुरू झालाय. त्याचे महत्त्व नवीन पिढीत रुजेल आणि समजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालून उपयुक्तता तपासली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतही वेळोवेळी गांधी विचाराला महत्त्व देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेच निश्चित केलेले ‘सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट गोल्स’चा आधारही गांधी विचारातच दडला आहे.

गांधी ही भारताची ओळख आहे, मागील काही वर्षांतील घटनाक्रम पाहता गांधींची ही ओळख पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू नाही ना? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या गांधी विचारांवरच आधुनिक भारताचा पाया आहे. धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, परोपकार, स्त्री-पुरुष समानता या गांधींच्या तत्त्वांनाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जातोय. गांधींविषयी अपप्रचार करून त्यांच्याविषयी आजच्या पिढीत कमालीचा द्वेष भरण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. भारताची प्रगल्भ विचारसरणी संकुचित होत चालल्याचं हे निदर्शक आहे. आपल्या देशातील आजच्या तरुणाईनं यापासून वेळीच सावध होण्याची गरज आहे. गांधीजींचे विचार तिमिराकडून तेजाकडे नेणारे आहेत. त्यामुळेच अवघ्या विश्वाला आज गांधी विचारांची आस लागलीय. विदेशातील युवक गांधी विचारांनी भारावून जात आहेत. प्रत्येक देशात गांधींचा नामघोष सुरू आहे. याचाच अर्थ या विचारांत नक्कीच काहीतरी जादू आहे. परिवर्तनाची क्षमता आहे. हे नवयुवकांनी जाणलं पाहिजे. मात्र त्यासाठी गांधी अभ्यासावा लागेल. नुकतंच महात्मा गांधींचं १५० वे जन्मशताब्दी वर्ष संपलंय. त्यासाठी ही एक पर्वणीच होती. त्यांच्याविषयीच्या अभ्यासातून निश्चितच गांधींचं बहुआयामी रूप उलगडेल. त्यांच्या विचारांचा अनमोल खजिना गवसेल आणि तो नक्कीच डोळे दिपवणारा असेल. त्यातून गांधींचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व दृष्टीस पडेल तेव्हा निधी, प्रज्ञा, पूजा किंवा त्यांच्यासारखे गांधींचा द्वेष करणारे लोक किती खुजे आहेत, याचा प्रत्यय आलेला असेल. समाजातील एक वर्ग गांधीजींचा कमालीचा द्वेष करताना दिसून येतोय. त्यातून मागील एक-दोन दशकांत गांधीजींचा अनादर-अवमान करण्याचं प्रमाण वाढलंय. गांधींपासून प्रज्ञापर्यंतचा मागील सात दशकांतील प्रवास भारतीय विचारांच्या अधोगतीचं द्योतकच म्हणावे लागेल.गांधी नसते तर याच पूजा किंवा प्रज्ञासारख्या कोट्यवधी महिला आजही सामाजिक संहितेच्या नावाखाली चार भिंतीत बंदिस्त असत्या, स्वत:चा चेहरा उघड करण्याचेही त्यांना स्वातंत्र्य नसते. त्यांची बुद्धिमत्ता पुरुषी अहंकाराच्या टाचेखाली चिरडून टाकली गेली असती. १८-१९ व्या शतकातील महिलांसारख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत त्या नरकयातना भोगत खितपत पडल्या असत्या. याचेही त्यांना भान नसावे, याचेच मोठे दु:ख आहे. तहहयात महात्मा गांधींनी अहिंसेचा पुरस्कार केला असला तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांप्रसंगी महिलांनी या तत्त्वाला तिलांजली द्यावी, अशी त्यांची भूमिका होती. एखादी महिला अत्याचाराची शिकार होत असल्यास तिला आत्मरक्षणाचा अधिकार आहे, त्यासाठी तिनं नखं, दात या आयुधांचा वापर करून समोरच्यावर हल्ला करीत स्वत:चं रक्षण करावं, या मताचे गांधी होते. यावरून गांधी महिलांविषयी किती संवेदनशील होते, यांचा अंदाज येतो. महिला सशक्त आणि सुशिक्षित झाली तरच राष्ट्र बलशाली बनू शकतं, हे गांधीजींनी १०० वर्षांपूर्वी जाणले होतं आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्नही केले होते. त्यामुळं महिलांमध्ये गांधीजींचं स्थान पूज्यनीय आहे, असं असताना आज काही महिला गांधीद्वेष का करताहेत, हेच मोठे कोडे आहे.

हरीश केंची
९४२२३१०६०९

2 comments:

  1. सुंदर व विचार करायला लावणारा लेख.

    ReplyDelete
  2. सुंदर व विचार करायला लावणारा लेख.

    ReplyDelete

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...