Saturday 17 August 2019

पुनरागमनायच...!

"लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसपक्ष सैरभैर झाला. पुन्हा सोनियाजींकडं पक्षाची तात्पुरती सूत्रं सोपवली, त्यामागं काँग्रेसच्या संरचनेत जी प्रचंड उलथापालथ सुरू झालीय त्यावर नियंत्रण आणण्यासाठीची ही उपाययोजना दिसते. जी नवी रचना त्या उभी करतील त्यावर पक्ष नव्यानं उभा राहू शकेल असं नेत्यांना वाटतं. इथं चिंतन शिबिरांची परंपरा नाही पण जय-पराजय झाल्यास पक्षनेतृत्वाकडं बोट दाखवलं जातं. यातून नेते स्वत:ची सुटका करून घेतात. श्रेष्ठी मात्र टीकेचे धनी होतात. हा इतिहास आहे. नेहरू, इंदिराजींनी पक्षाची सूत्रं हाती येताच जुन्यांना दूर सारून नव्याची साथ घेतली होती पण सोनियाजी आणि राहुलनं तसं केलंच नाही. कार्यकर्त्यांशी, लोकांशी थेट संपर्क नसलेल्या वाचाळ आणि हुजऱ्यांनाच सोबत ठेवलं, त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. राहुलनं पक्षालाच झटका देत, ज्येष्ठ नेत्यांच्या सुमार कामगिरीवर बोट ठेवत राजीनामा दिला, त्यानं नेते खडबडून जागे झाले. राहुलच्या राजीनामा मागे न घेण्याच्या निर्धारानं तर नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय!"
-------------------------------------------------

*प्र* त्येकवेळी इतिहासाची पुनरावृत्ती होतेच असं नाही. त्यासाठी राजकीयदृष्ट्या व्यवहारचातुर्य हवंय जे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याकडं होतं. त्यांनी पक्षाची आणि सत्तेची सूत्रं हाती येताच आपल्या जुन्या सहकाऱ्यांना दूर सारलं. इंदिराजींनी तर जुन्या खोंडांना जाणीवपूर्वक हटवलं. पण राजीवजी त्याच इंदिराजींच्या सहकाऱ्यांवर विसंबून राहिले, त्यांच्या मृत्यूनंतर त्याच नेत्यांची सोनियाजींना साथ घेतली. या नेत्यांनी अनेकदा सोनियांना अडचणीत आणलं होतं. राहुल गांधींनी पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षहिताऐवजी सत्तेसाठी हपापलेल्या राजीवजींच्या काळातील नेत्यांना दूर सारणं गरजेचं होतं आणि आपल्या समवयस्क, तरुण, नव्या दमाच्या ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, मिलिंद देवरा यासारख्यांना सोबत घ्यायला हवं होतं. पण ते झालं नाही, कदाचित त्यांच्या नेतृत्वक्षमतेची राहुलना भीती वाटली असावी. त्याचा परिणाम काँग्रेसच्या अधोगतीत झालाय. असं घडलं असलं तरी आजही जनाधार नसलेली, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नसलेली किंबहुना कार्यकर्त्यांचं पाठबळ नसलेल्या मणिशंकर अय्यर, चिदंबरम, सॅम पिट्रोडा यासारख्या वाचाळ नेत्यांनी पक्षाला घेरलंय तेच पक्षाला रसातळाला घेऊन जाताहेत! 

*राहुल यांचं यश दिसलं, पण.....!*
राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असताना बिहारमध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जाऊन भाजपला रोखलं होतं. नंतर काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा त्यांनी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारला पुरतं घायाळ केलं होतं. ती किमया त्यांनी गुजरातमधल्या नव्या नेतृत्वाला पुढे आणून साधली होती. पुढं त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसनं पंजाब, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इथं यश मिळवलं होतं. दरम्यानच्या काळात कर्नाटकात जेडीएससोबतचा प्रयोगही करून पाहिला होता. तो काही काळ यशस्वी झाला होता. त्यांनी नेतृत्व सोडल्यानंतर कर्नाटक काँग्रेस सैरभैर झाली आणि ते राज्य हातातून गेलं.  लोकसभा निवडणुकांत त्यांनी नोटबंदी, राफेल अशा मुद्द्यावरून देशभर वादळ निर्माण केलं त्या मोहिमेत बरेच ज्येष्ठ नेते मागं होते. या नेत्यांनी तिकिटं मिळवताना पक्ष नेतृत्वाच्या निर्णयांत अडचणी आणल्या. काही राज्यांमध्ये आघाडी करण्याचे प्रयोग उधळून लावले. आपल्याच नातेवाईकांमध्ये तिकिटं जातील याची खबरदारी घेतली होती. आपल्या नेत्यांचे असे कारनामे राहुलना माहीत असल्यानं त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा तर दिलाच पण आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचं प्रतिपादन करून ट्विटरवर त्यांनी चार पानी पत्र प्रसिद्ध केलं होतं.
या पत्रात त्यांनी “काँग्रेसला भविष्यात प्रगती करायची असेल तर पक्षाला यापुढे कठोर निर्णय घेण्याची गरज असून २०१९ च्या पराभवाची जबाबदारी काहींनी घेण्याची वेळ आलीय. भारतानं आता लोकशाही संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी, त्यांच्या पुनर्उभारणीसाठी सज्ज राहिलं पाहिजे आणि हे साध्य करण्यासाठी पक्ष तयार आहे. यासाठी काँग्रेस पक्षानं स्वत:च्या रचनेत पूर्णपणे बदल केले पाहिजेत. आज भाजप सामान्य लोकांचा आवाज दाबत आहे. आपलं कर्तव्य हे आहे की सामान्य लोकांच्या आवाजासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे. भारत हा कुणा एकाचाच आवाज नाही तर अनेकांचा आहे. या अनेकांच्या आवाजात येणारी समता हेच भारतमातेचं सार आहे,” अशी भूमिका मांडली होती. राहुल यांची या पत्रामागची भावना पाहिल्यास आणि आता ३७० कलम रद्द केल्यानंतर काँग्रेसमधले काही नेते पक्षाच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका मांडत असल्याचं पाहता, काँग्रेस नेत्यांना एकतर राहुल गांधी यांची पक्ष सोडण्यामागची भूमिका लक्षात आलेली नाही किंवा ते पराभवातून काहीच शिकलेले नाहीत, असं म्हणण्यास वाव आहे. हे नेते भाजपच्या पूर्ण दबावाखाली आल्यासारखं वाटतात. अशा बड्या नेत्यांची संभ्रमावस्था निश्चितच पक्षाच्या दृष्टीने चिंतेची आहे आणि हे दिसूनही येते. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीला आपल्या पक्षातील मतमतांतरांचं गांभीर्य लक्षात आल्यानं त्यांनी निर्णय ढकलला असावा, अशीही एक शक्यता आहे. दुसरा एक धोका पक्षात आलेल्या शैथिल्याचाही आहे. संसदेत माहिती अधिकाराचा कायदा, तिहेरी तलाक कायदा आणि ३७० कलम रद्द करण्याचा कायदा संमत होऊनही राज्याराज्यातील काँग्रेसचा एकही नेता रस्त्यावर उतरला नाही कि, त्यांनी या कायदाचा निषेध वा त्याला विरोध करणारा मोर्चा काढलेला नाही. माहिती अधिकारात दुरुस्त्या करून जनतेचं सत्तेला जाब विचारण्याचं हक्क कसं नाकारलं आहे त्याची साधी सोप्या भाषेत माहितीही काँग्रेस नेते मतदारांपुढे मांडताना दिसत नाहीत. असा पक्ष वेगानं निष्प्रभ अवस्थेत जात असेल तर त्याला संजीवनी आणण्यासाठी शस्त्रक्रियेची जरूरी आहे. ती शस्त्रक्रिया सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असेल तर तो एकप्रकारे सूज्ञ निर्णय म्हणावा लागेल. राहुल गांधी यांना पक्षात व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आधुनिकता, सेक्युलरिझम, समता, न्याय्य अशा वैचारिक मूल्यांशी सतत प्रामाणिक राहणारे नेते हवेत आणि तसं मिशन प्रत्येकानं हाती घ्यायला हवं असं आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटलं होतं. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी एकप्रकारची गद्दारीच केली. हे नेते लोकांपासून दूर राहिले. मतदारांशी संवाद ठेवला नाही. काँग्रेसच्या विरोधात केलेल्या अप्रचाराला सडेतोड उत्तर दिलं नाही. आता त्यापुढं जात काँग्रेसचे काही नेते भाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाकडंही आकृष्ट होऊ लागलेत. हा धोका काँग्रेस कार्यकारिणीला अध्यक्षीय निवडीत वाटत असेल तर तो खरा आहे.

*नेतृत्वसमस्येवर उपाय सापडला नाही*
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या आणि आजवर प्रचंड जनाधार लाभलेला काँग्रेसपक्ष हा देशात सर्वाधिक जुना पक्ष असूनही त्यांना नेतृत्व करण्यासाठी सध्या  सक्षम असं व्यक्तिमत्व सापडत नाहीये. नुकत्याच झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत तरुणांपासून वयोवृद्ध नेत्यांपर्यंतच्या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा झाली. पण पक्षाध्यक्ष व्हायला कुणीही तयार झाला नाही. आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तरी पक्षाचा लगाम गांधी परिवाराच्या हातातच राहील. याची जाणीव असल्यानंच कुणीही पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारायला कुणी तयार झालं नाही. त्यामुळं नवा पक्षाध्यक्ष नेमण्यासाठी निष्फळ ठरलेल्या काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींनाच शरण जावं लागलंय! एकाबाजूला सत्ताधारी भाजपेयीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडीनं एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका लावलाय. तर देशातल्या प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र 'नेतृत्व समस्ये'वर अद्याप उपाय सापडलेला नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत त्यांनी तो मागे घ्यावा यासाठी त्यांना मनधरणी, मिनतवारी करण्यात आली. पण राहुल गांधी यांनी आपला राजीनाम्याचा निर्धार व्यक्त करत स्पष्ट शब्दात इन्कार केला. त्यामुळं पक्षध्यक्ष निवडीचा प्रश्न टांगताच राहीला. परिणामी नव्या पक्षाध्यक्षाची निवड होईपर्यंतच्या काळासाठी 'इंटरीम अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीं'चीच निवड करण्यात आलीय.

*व्ही.पी.सिंग यांच्यापासून पक्षाला उतरती कळा*
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी सर्वाधिक १९ वर्षे पक्षाची धुरा सांभाळलीय. जवाहरलाल नेहरू ११ वर्षे, इंदिरा गांधी ७ वर्षे, राजीव गांधी ६ वर्षे आणि मोतीलाल नेहरू २ वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राहुल गांधींचा कार्यकाळ जवळपास दीड वर्ष चालला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दारुण पराभवानंतर राहुलनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण तब्बल दीड महिना काँग्रेसचे नेते राहुलनं राजीनामा मागं घ्यावं म्हणून विनवणी करत होते. पण ते आपल्या निर्धारापासून जराही विचलित झाले नाहीत. काँग्रेसपक्षाची ही अपरिहार्यता राहिली आहे की, त्यांना नेहमीच गांधी-नेहरू परिवाराचीच आवश्यकता राहिलीय. स्वातंत्र्योत्तर काळात देशात काँग्रेसचं एकहाती सत्ता राहिलीय. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेससमोर कोणाचाच आव्हान नव्हतं. राजीव गांधींच्या काळापर्यंत पक्ष अत्यंत मजबूत स्थितीत होता. पण राजीवजींच्या मंत्रिमंडळात असलेल्या व्ही.पी.सिंग यांनी पक्षांत फूट पाडल्यापासून पक्षाला उतरती कळाच लागली. त्यानंतर एकापाठोपाठ एक पक्षातले दिग्गज नेते पक्षापासून दूर जाऊ लागले. महाराष्ट्राच्या शरद पवार, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे वायएसआर रेड्डी यासारख्या नेत्यांनी काँग्रेसपक्षाशी फारकत घेत आपापल्या राज्यात नवा पक्ष उभा केला.

*विखुरलेली काँग्रेस सोनियांनी सावरली*
राजीवजींच्या मृत्यूनंतर सोनियाजींनी राजकारणात यायला स्पष्ट इन्कार केला होता. सोनियजींच्या नकारानंतर गांधी-नेहरू परिवाराशिवाय पक्षानं काही काळ वाटचाल केली, पण त्यांचा प्रभाव लोकांवर पडला नाही. त्यामुळं पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. राजीव गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर पक्ष पुन्हा सत्तेवर आला आणि ज्येष्ठ नेते पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री बनले. पण बाबरी पतनाच्या काळात ते निष्क्रिय राहिल्याचा त्यांच्यावर आरोप झाला त्यामुळं पक्षात त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आलं. त्यानंतर सोनिया गांधींना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी आग्रह होऊ लागला. दरम्यान सीताराम केसरी यांना अध्यक्ष बनविण्यात आलं. तर दुसरीकडं काँग्रेसमध्ये फूट पडायला लागली. नारायणदत्त तिवारी, अर्जुनसिंह यासारखे उत्तरप्रदेशातील  दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडले. त्यांनी 'तिवारी काँग्रेस'ची स्थापना केली. तामिळनाडूतील प्रभावी नेते जी.के.मुपनार यांनी पी.चिदंबरम यांना सोबत घेऊन 'तमिळ मनीला काँग्रेस' आरंभली. मध्यप्रदेशातून माधवराव शिंदे हेही काँग्रेसपासून अलग झाले.
विखरत जाणारी, विस्कटलेली काँग्रेस पुन्हा एकसंघ राखण्यासाठी नेहरू-गांधी परिवारातील कुणा सदस्याचीच गरज असल्यानं पक्षातल्या काही दिग्गज नेते सोनियाजींवर राजकारणात येण्याचं, पक्षाची धुरा सांभाळण्याचं साकडं घालू लागले. ज्या पक्षावर आजवर आपल्या कुटुंबियांची नेतृत्व होतं त्याच पक्षाची होत चाललेली दारुण अवस्था, याशिवाय पक्षातील नेत्यांच्या आग्रहाखातर सोनियांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि पक्षांत नवसंजीवनी आणली. त्यानंतर २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या 'शाइनिंग इंडिया' आणि 'फील गुड' यासारख्या प्रभावी प्रचारासमोर सोनियांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून काँग्रेसप्रणित युपीएला सत्ताधारी बनवलं. त्यानंतर २००९ मध्येही काँग्रेसनं जबरदस्त आणि मजबुतपणे देशाच्या राजकारणात पुनरागमन केलं ते सोनियांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली! सोनियाजींच्या निवृत्तीनंतर राहुलशिवाय दुसरा चेहराच पक्षासमोर आला नाही. खरोखर नेहरु-गांधी परिवाराशिवाय इतर कुणाचं नेतृत्व स्वीकारण्याची मानसिकताच पक्षाची, पक्षातल्या नेत्यांची राहिलेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराजयानंतर हे स्पष्ट झालं की, काँग्रेसला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. पूर्वीच्या काळात पक्षात असे अनेक नेते होते की, ज्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच लोकांपर्यंत थेट संपर्क होता. अशा नेत्यांचा आपापल्या राज्यातील लोकांवरही जबरदस्त पकड होती. जी निवडणुकांच्या काळात राज्यातील मतं पक्षांकडं वळवीत असत. सध्या अशा नेत्यांचा काँग्रेस पक्षांकडं दुष्काळ जाणवतोय. आज तर काँग्रेसपक्ष जणू गांधीपरिवाराचा 'आश्रित' बनलाय. शिवाय स्वतःला बुद्धिजीवी म्हणवणाऱ्यानी, ज्यांचा तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी कोणताच संपर्क राहिलेला नाही, अशा तथाकथित नेत्यांनी पक्षाला वेठीला धरलंय! यामुळं काँग्रेसच नेते हे सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांपासून  दुरावलेत, ते त्यांच्यापासून अलग पडलेत.

*काँग्रेस नेते-कार्यकर्ते सैरभैर झालेत*
सध्याचा काळ हा काँग्रेससाठी अत्यंत कठीण काळ समजायला हवा. एकाबाजूला लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर नवा पक्षाध्यक्ष नेमण्याऐवजी छोट्यापासून दिग्गज नेत्यांपर्यंत साऱ्यानी राहुलना राजीनामा मागे घेण्याची गळ घालायला सुरुवात केली. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अद्याप देशातील स्वातंत्र्यलढ्यातील अग्रेसर आणि सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. भाजपेयींच्या धडाकेबाज निर्णयासमोर काँग्रेसची अवस्था सुकाणू नसलेल्या जहाजाप्रमाणे हेलकावे खातेय. पक्षाध्यक्ष निवडीत संभ्रमावस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षाकडून एकापाठोपाठ राज्ये निसटली जाताहेत, दुरावली जाताहेत. खरं तर लोकसभेच्या पराभवानंतर त्याबाबत आत्मचिंतन करून पक्ष सावरण्याऐवजी राजीनामा देण्याचं राहुल गांधीचं पाऊल पक्षाला नुकसानकारक ठरतंय! त्यामुळं काँग्रेस सैरभैर झालीय! पक्षाला सावरण्याची गरज आहे. पक्षाच्या अडचणीत सोनियजींकडं सूत्रं सोपवून पुन्हा सत्ता हाती येईल असं वाटणाऱ्या स्वार्थी नेत्यांनी पुन्हा एकदा जुना खेळ आरंभलाय; पण सध्याच्या राजकीय वातावरणात ते होण्याची शक्यता नाही.

चौकट.....!
*सोनियाजींवरचा चित्रपट आलाच नाही!*
सोनियाजींचं प्रभावशाली व्यक्तिमत्व सिनेमाच्या पडद्यावर आणण्यासाठी लंडनमधील सिनेनिर्माता जगमोहन मुंदडा यांनी 'सोनिया गांधी' नावाच्या चित्रपटाची तयारी केली. या चित्रपटात सोनियाजींचे जीवनचरित्र मांडलं जाणार होतं. मात्र तो चित्रपट वादात सापडला. कुण्या नसीम खान ह्यांनी नेहरू-गांधी परिवाराशी जवळीक असल्याचा दावा करत मुंबईच्या सेशन कोर्टात चित्रपट निर्मितीला विरोध दर्शविणारा अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, 'भारतीय राजकारण्यांचं चित्रपटात अयोग्य चित्रण करण्याची फॅशनच आलीय. सोनियाजींबाबत असंच होण्याची धास्ती मला वाटते. देशासाठी अपरिमित त्याग करणाऱ्या सोनियाजींचा राजकीय पराभव करण्यासाठी उत्सुक असलेल्या विरोधकांना अशी फिल्म म्हणजे एक कोलीतच मिळेल.' चित्रपटाच्या चित्रीकरणाला न्यायालयातून मनाई आल्यानं पुढं काही घडलंच नाही! मुंदडा यांनी सोनियाजींच्या भूमिकेसाठी 'मोनिका बलुची' या इटालियन अभिनेत्रीची निवड केली होती. मुंदडा यांना सोनियांनी भारतासारख्या खंडप्राय देशाचं 'प्रधानमंत्रीपद नाकारण्याचं धाडस' दाखविण्याच्या त्यांच्या कृतीनं प्रभावित केलं होतं. त्यांनी पत्रकार रशीद किडवाई लिखित 'सोनिया अ बायोग्राफी' या पुस्तकावरून फिल्म बनविण्याचं जाहीर केलं होतं. पण तो सेटवर जाऊच शकला नाही!
सोनियाजींच्या भूमिकेसाठी कार्ला गुगिनो, ऐश्वर्या रॉय, प्रीती झिंटा, आणि इटालियन अभिनेत्री मोनिका बलुची या अभिनेत्रींचा विचार झाला. मोनिका बलुची ह्या सोनियांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतील असं वाटल्यानं मुंदडा यांनी तिच्याशी स्क्रिप्टविषयी चर्चाही केली. सोनियाजींचं चित्रण राजकारणी व्यक्तीऐवजी, पतिप्रेमासाठी भारतात येणाऱ्या आणि पतीच्या मृत्यूनंतर भारतातच ठामपणे उभं राहून समाजजीवनात भाग घेणाऱ्या धैर्यवान महिला, असं करण्यात येणार होतं. या चित्रपटाची सुरुवात २००४ मध्ये सोनियाजींनी भारताचं प्रधानमंत्रीपद नाकारल्याच्या त्या ऐतिहासिक क्षणापासून होणार होती. त्यानंतर केंब्रिज इथं शिकताना राजीवजींनी सोनियांना 'पेपर नॅपकिन'वर पहिला प्रेमसंदेश कसा पाठवला, अशा अनेक घटना चित्रपटातून उलगडणार होत्या. प्रधानमंत्र्यांचा मुलगा असूनही सोनियांना स्कुटरवरून इंडिया गेटजवळ आईस्क्रीम खायला घेऊन जाणारे राजीवजी यात दिसणार होते. अशा विविध प्रसंगाचं चित्रण त्यात होतं, त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचं बजेट होतं. याचं चित्रण इटली, ब्रिटन आणि भारतात होणार होतं.
कुटुंबातील तिघांचा धक्कादायक मृत्यू सोनियाजींना पाहावा लागला होता. दीर संजय गांधी विमान अपघातात गेले तर इंदिराजी, राजीवजी यांची निर्घृण हत्या झाली. कौटुंबिक धक्क्यातून धैर्यानं बाहेर पडून, भाजप आघाडीचा पराभव करण्याचं यश प्राप्त करणाऱ्या आणि चालून आलेलं प्रधानमंत्रीपद नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या सोनिया गांधी या चित्रपटात दिसणार होत्या. त्याचबरोबर राजीवबरोबरचे कॉलेजमधले दिवस, इंदिराजींची पहिली भेट हे प्रसंग त्या स्क्रिप्टमध्ये लिहलेलं होतं. इंदिराजी आणि राजीवजी यांच्या हत्येनंतर सोनियांना राजकारणात का यावं लागलं, हे सर्व घटनाचक्र चित्रपटातून समोर येणार होतं.
सोनिया गांधी यांची भूमिका करायला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री तयार झाल्या होत्या. पण शेवटी मोनिका बलुची याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली. त्यावेळी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्माते मुंदडा यांनी सांगितलं होतं, की 'या चित्रपटाविषयी माझी मोनिकाशी प्रदीर्घ चर्चा झालीय. तिलाही या चित्रपटात काम करण्याचा जबरदस्त उत्साह आहे.' यातील इतर महत्वाच्या भूमिका म्हणजे इंदिराजी आणि राजीवजी. इंदिराजींची भूमिका अभिनेत्री पेरिझाद झोराबियन या साकारणार होत्या तर राजीवच्या भूमिकेत संजय सूरी. संजय गांधींची भूमिका झायेद खान याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेसाठी अभिषेक यांची निवड करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी राजीव आणि सोनिया यांची एंगेजमेंट झाली होती; ते ही या चित्रपटात दाखविण्यात येणार होतं. स्टारकास्ट निश्चित होण्यापूर्वीच मुंदडा यांनी सोनियाजींचं इटलीमधलं जन्म घर आणि राजीवजींची हत्या श्रीपेरूम्बदूर शहरात ज्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी जाऊन शुटिंगची तयारीही केली होती.
सोनियाजींची भूमिका करणाऱ्या मोनिकाचा जन्मही १९६८ मध्ये इटलीत झालेला. कायद्याची सल्लागार म्हणून करिअर सुरु करणाऱ्या मोनिकानं मॉडेलिंग व्यवसायात प्रवेश केला. १९८८ पर्यंत मोनिका प्रसिद्ध मॉडेल झाली आणि नंतर अभिनयाच्या क्षेत्रातही उतरली. पण सोनियाजींचा चित्रपट करण्याची तिची इच्छा काही पूर्ण झाली नाही.

-हरीश केंची
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...