Saturday 17 August 2019

उद्धवनीती !

"राजकारणात कधी, कोणता, कसा आणि काय निर्णय घ्यायचा याचं व्यवधान राजकीय नेत्याला असायला हवं तरच पक्ष, त्याचे नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना आपल्या नेतृत्वाशी जखडून ठेवता येतं. त्यात तेच यशस्वी होतात. स्व. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय होणार असं विचारणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या बुद्धी आणि व्यवहारचातुर्यानं परस्पर उत्तर देऊन टाकलंय. ती त्यांची 'उद्धवनीती'! शिवसेनेला यश देऊन गेलीय!"
----------------------------------------------
आज शिवसेना राज्यात अगदी योग्य मार्गावर यशस्वी घौडदौड करत आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शिवसेना भाजप यांची युती होणार की नाही ? शिवसेना स्वबळावर लढणार की युती करून ? जर युती केली तर शिवसेनेवर टिका होईल वगैरे वगैरे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय चाणक्यनितीने राजकारण केले. त्यांनी हवेचा प्रवाह ओळखला होता. देशातील सर्व मोठमोठे पक्ष नेस्तनाबूत होण्याच्या परिस्थितीत गेले. समोरून ५२ पक्षांची आघाडी असताना सुद्धा एकाही पक्षाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. भाजपच्या लाटेत विरोधी पक्षांची इतर राज्यात पुरती दाणादाण उडत असताना देखील महाराष्ट्र भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी नक्कीच चिंतेचं वातावरण होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच जाहीर केले होते की ते इथुन पुढे कुणाच्याही दारात युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाहीत. त्यांनी तो शब्द अगदी तंतोतंत पाळला आणि युतीसाठी भाजपच्या राज्यातील नेत्यांपासुन ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत सर्व नेत्यांना मातोश्री वारी करायला भाग पाडले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती करण्यासाठी तयार झाले पण त्यांनी शिवसेनेने उचलुन धरलेले सर्व मुद्दे आणि सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन भाजपकडुन घेतले आणि मगच युती केली. यामध्ये नाणार प्रकल्प रद्द करणे , शेतकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात पिकविमा केंद्र उघडून देणे , मुंबई महापालिकेचा मुंबईकरांसाठी ५०० चौ फुटाखालील घरांच्या करमाफीची मागणी मान्य करणे आणि गेल्यावेळपेक्षा लोकसभेत एक जागा वाढवून घेणे या सर्व अटी मान्य करायला भाजपला भाग पाडले आणि मगच युती केली.
आज सर्व पक्षांतील नेते पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश करत असताना आजच्या घडीला पक्ष टिकवणे आणि वाढवणे ही काळाची गरज ओळखून आणि भाजप सेनेच्या वादाचा फायदा कॉँग्रेस राष्ट्रवादीला होऊ नये यासाठी शिवसेनेने युती केली. आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेने युती केल्यानंतर भाजपचे खासदारकीचे सर्व उमेदवार ज्यांना स्वबळावर विजयाची शाश्वती नव्हती त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांना माहीत होतं की शिवसेना वेगळी लढली तर आपले निवडुन येणे खुप अवघड जाईल. अशा रीतीने उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य आणि यशस्वीरीत्या युतीचा प्रश्न सोडवला.
युती केल्यानंतर संपुर्ण २३ मतदारसंघ पिंजून काढले आणि शिवसेनेने १८ खासदार निवडून आणुन एनडीएमधील भाजपचा सर्वात मोठा मित्र पक्ष बनुण स्वताची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
आजच्या राजकारणात काही ठिकाणी यशस्वी तडजोड करण्याची गरज होती आणि त्यात जो यशस्वी झाला त्यांचाच पक्ष आज यशस्वी झाला हे लोकसभा निवडणुकीत दिसुन आलेच.
सत्ता आल्यानंतर देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शांत बसले नाहीत. ज्या ज्या ठिकाणी गरज आहे तिथे आपली संघटना रस्त्यावर उतरवुन त्यांनी जनतेची मनं जिंकायचे कार्य चालू ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत पिकविमा कंपन्यांविरोधात निघालेला मोर्चा हे त्याचेच एक उदाहरण. तो मोर्चा निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच पिकविमा कंपन्या भानावर आल्या आणि शेतकऱ्यांना रखडलेला पिकविमा मिळण्यास सुरुवात झाली.
शिवसेनेने सत्तेत असुनही असे आंदोलन करून प्रश्न सोडवण्याचा हा मार्ग अवलंबल्याने विरोधकांचा स्पेस देखील शिवसेनेनेच भरून काढला आहे. विरोधक अजुनही लोकसभेच्या पराभवातुन आणि पक्षाच्या गळतीच्या डोकेदुखीतुन बाहेर पडले नाहीत. म्हणुन शिवसेनाच रस्त्यावर उतरून विरोधकांचं देखील काम स्वत: करून सरकारला निर्णय घेतल्यास भाग पाडत आहे.
आज महाराष्ट्रात विरोधकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ६० वर्ष देशावर राज्य करणाऱ्या कॉँग्रेसचा आज राज्यात एक खासदार निवडून आला आहे. राष्ट्रवादीचे चेमतेम ४-५ खासदार निवडून आले आहेत. मनसेची तर एवढी बिकट अवस्था होती की लोकसभा निवडणुकीत ते मैदानात देखील उतरू शकले नाहीत आणि महाआघासाठी सभा घेण्याची वेळ आली आणि एवढं होऊनही महाआघाडीला महाराष्ट्रात यश मिळाले नाही. अशा वेळी सध्याची परिस्थिती बघुन उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे राजकारण खेळुन स्वताचा पक्ष टिकवुन ठेवला आणि यशस्वी विजय देखील प्राप्त केला.
आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशातच शिवसेनेकडुन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशिर्वाद यात्रा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळणारा उत्तुंग प्रतिसाद बघुन भाजप नेत्यांची देखील चिंता वाढली आहे. समोरून येणाऱ्या अडचणींना लगेचच मार्गी लावणे आणि जनतेची मनं जिंकणे हे काम आदित्य ठाकरे एवढ्या कमी वयात अगदी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना भाव खाऊन जाणार आणि यशस्वी विजय मिळवणार हे नक्की आहे.
आजपर्यंत कित्येक पक्षांची सत्ता आली आणि गेली. गेल्या ६० वर्षात शिवसेना १९९५ ते १९९९ चा काळ सोडला तर सतत विरोधी पक्षात असुनही पक्ष फुटला नाही ना पक्षाला उतरती कळा लागली नाही. २०१४ विधानसभेत तर मोदीलाटेवर अख्खा देश स्वार झालेला असतानाही शिवसेना स्वबळावर निवडणूक लढली आणि २००९ पेक्षा २१ आमदार जास्त निवडुन आणले आणि भाजपला महाराष्ट्रात कडवी झुंज दिली व भाजपला एकहाती सत्तेपासून वंचित ठेवले.
आजची परिस्थिती पाहता शिवसेनेची घौडदौड अतिशय योग्य मार्गावर चालु आहे. विरोधकांनी आणि भाजपवाल्यांनी कुणीही काहीही टिका केली तरी शिवसेनेचं हे यशस्वी आणि मुरब्बी राजकारण प्रत्येकाला मान्य करावेच लागेल.
बाकी प्रत्येक पक्षाच्या लाटेचा एक काळ असतो जो की त्या काळात त्या पक्षाला सर्वकाही देऊन जातो. शिवसेना याच काळाच्या वेट अँड वॉच मध्ये आहे. आणि तो काळही शिवसेनेला दुर नाही असेच सध्याचे चित्र आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमी शांत आणि चाणाक्ष हुशारीने जे राजकारण केलं आहे त्या राजकारणाला आज “उद्धवनिती” हा नविन शब्दप्रयोग चालू झाला आहे.

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...