Saturday 3 August 2019

भरलीय यात्रांची जत्रा...!

"विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना सर्वच राजकीय पक्षांना अचानक पुतना मावशीचे प्रेम दाटून आलेय. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी 'जनआशीर्वाद यात्रा' काढलीय. त्यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी 'महाजनादेश यात्रे'ची सुरुवात केलीय. यात्रेची सुरुवात होत नाही तोच, या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने 'शिवस्वराज्य यात्रे'ची घोषणा केली. पाठोपाठ शिवसेनेने महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात 'माऊली संवाद यात्रे'ची घोषणा केलीय. श्रावणाला सुरुवात झालीय. तसंही श्रावणात यात्रांना महत्त्व असतंच. हे लक्षात घेता सर्वच पक्षांनी आता जनता जनार्दनाला मतांचे साकडे घालण्यासाठी राजकीय यात्रा सुरू केल्या आहेत. लोक आताशी सभांना येतच नाहीत. वक्त्यांची वानवा आहे. अशावेळी मतदारांकडे जाण्यासाठी यात्रा हा एकच पर्याय उरल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक काळात यात्रांची जत्रा भरवलीय!"
-----------------------------------------------
*ह* जारो वर्षाची अध्यात्मिक वारसा, परंपरा असलेल्या भारतात 'यात्रा' हा प्रकार भारतीयांसाठी काही फारसा नवीन नाही. इथल्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा तो एक अविभाज्य भाग बनलेला आहे. पूर्वीच्याकाळी काशीयात्रा करणं म्हणजे सकल यात्रांचा परमोच्च बिंदू गाठणं असं समजलं जाई. त्याचबरोबर, नुकतीच पार पडलेली पंढरपूरची वारी असो, चारधाम यात्रा असो नाहीतर दहशतवाद्यांच्या दबावाला बळी न पडता सध्या चालू असलेली काश्मीरमधल्या 'अमरनाथ यात्रा' असो, भारतीय जनजीवनाशी त्यांचा अतूट असा संबंध आहे. पण राजकारणी मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी जेव्हा ‘यात्रे’ला निघतात तेव्हा स्वाभाविकपणे जनसामान्यांच्या भुवया उंचावतात. अर्थात याला अपवाद महात्मा गांधींच्या दांडीयात्रेचा! गांधीजींच्या कल्पक नेतृत्वातून १९३० साली निघालेल्या या प्रतीकात्मक मिठाच्या सत्याग्रहानं स्वातंत्र्याच्या आंदोलनाला निर्णायक वळण दिलं. गेल्या सुमारे ३०-३५  वर्षांत मात्र निरनिराळ्या राजकीय नेत्यांनी आपले छुपे-उघड अजेंडे घेऊन वेगवेगळ्या ‘यात्रा’ काढल्यात. त्यामध्ये अर्थातच भारतीय जनता पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी हे ‘यात्रा स्पेशालिस्ट’ ठरले आहेत. पण अन्यही काही नेत्यांनीही व्यापक जनसंपर्कासाठी या यात्रा माध्यमाचा आपापल्या परीनं वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

*लालकृष्ण अडवाणी हे तर 'यात्रापुरुष'*
लोकसभेतलं भाजपचं संख्याबळ दोनवरून नव्वदपर्यंत नेण्याचा आणि पुढे सत्तास्थापनेचा चमत्कार केलेल्या ‘यात्रापुरुष’ लालकृष्ण अडवाणी यांची बहुचर्चित ‘सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा’ जी २५ सप्टेंबर १९९० ते ३० ऑक्टोबर १९९० दरम्यान निघाली होती ती सर्वज्ञात आहे. पण त्यानंतरही  त्यांनी कोणता ना कोणता विषय घेत ही यात्रा मोहीम चालूच ठेवली होती. घटनेच्या ८०व्या कलमामध्ये दुरुस्ती करणारं विधेयक आणि लोकप्रतिनिधी कायदा दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात त्यांनी ११ सप्टेंबर १९९३ रोजी ‘जनादेश यात्रा’ काढली होती. या यात्रेचं वेगळेपण म्हणजे, एकाच वेळी देशाच्या चार कोपऱ्यांमधून भाजपचे ज्येष्ठ नेते त्यामध्ये सहभागी झाले आणि २५ सप्टेंबर १९९३ रोजी भोपाळमध्ये तिची सांगता झाली. त्यापाठोपाठ देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त मे ते जुलै १९९७ या काळात काढलेल्या 'सुवर्ण जयंती यात्रे'द्वारे अडवाणींनी त्या काळातल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपेयींना मिळाला. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार ‘इंडिया शायनिंग’च्या लाटेवर असताना येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी वातावरणनिर्मितीचा भाग म्हणून २००४ मध्ये ‘भारत उदय यात्रा’ आणि त्या निवडणुकीतल्या धक्कादायक पराभवानंतर खचून न जाता सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात ६ एप्रिल ते १० मे २००६ या काळात ‘भारत सुरक्षा यात्रा’ अडवाणींनी काढली होती, हे अनेकांच्या आता स्मरणातही नसेल. पण अशा प्रकारच्या यात्रा कार्यक्रमांवर अढळ श्रद्धा असलेल्या लालकृष्ण अडवाणीजींनी या मालिकेतल्या अखेरच्या ‘जनचेतना यात्रे’चा ऑक्टोबर २०११मध्ये शंख फुंकला होता. अडवाणी-नरेंद्र मोदी यांच्या संबंधांमधले तणाव याच यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने सर्वप्रथम उघड झाले होते. अर्थात 'रामरथ यात्रा' वगळता उरलेल्या कोणत्याच यात्रेला कर्तव्याचा भाग म्हणून सहभागी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांव्यतिरिक्त फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १९९० मधल्या रथयात्रेच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या मंडल राजकारणाला शह देण्याच्या ईर्षेनं पेटलेले अडवाणी आक्रमकपणे व्यक्त होत होते. याउलट, २०११ मध्ये स्वत:च्याच राजकीय कारकिर्दीतली चेतना हरपत असल्याच्या जाणिवेनं ते मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं. 

*अशा यात्रेचे प्रणेते एन.टी. रामाराव*
काही असले तरी राजकारणातल्या या  रथयात्रा म्हणजे अडवाणी, हे जणू समीकरण होऊन गेलं होतं. त्यामुळे या रथयात्रेचे प्रणेते असलेले आंध्रप्रदेशचे ‘प्रभू रामचंद्र’ एन. टी. तथा नंदमुरी तारक रामाराव हे होते, हे अनेकांना सांगूनही खरं वाटणार नाही. देशाच्या दक्षिणेतल्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये चित्रपटातल्या तारे-तारकांबद्दलचं असलेलं वेड जगजाहीर आहे. रामाराव यांची रुपेरी पडद्यावरची प्रभू रामचंद्राची भूमिका अतिशय लोकप्रिय अशी ठरली होती. त्याचा फायदा उठवत त्यांनी प्रादेशिक अस्मितेला फुंकर घालणाऱ्या 'तेलुगु देसम' या पक्षाची १९८३ मध्ये स्थापना केली होती आणि जानेवारी ते जून १९८३ या सहा महिन्यांच्या कालावधीत ‘चैतन्य रथा’वर आरूढ होत संपूर्ण राज्य त्यांनी पिंजून काढलं. त्यासाठी जुन्या शेव्हर्ले गाडीचं या रथामध्ये रूपांतर करण्यात आलेलं होतं आणि रामारावांचा अभिनेता असलेला मुलगा नंदमुरी हरीकृष्णा हा या रथाचा सारथी बनला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘रामराज्या’च्या आशेनं तेलुगू जनतेनं रामाराव यांच्या तेलुगु देशम पक्षाला प्रचंड बहुमतानं निवडून दिलं. १९८४ च्या सप्टेंबरमध्ये आंध्रात राजकीय उलथापालथ झाली त्यावेळी अस्मादिकांना या कलियुगातल्या रामचंद्राच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता. भव्य कपाळ, विरळ होत चाललेले, पण मागच्या बाजूला लांब राखलेले केस, भगव्या रंगातलं धोतर आणि झब्ब्यातल्या रामारावांची संपूर्ण देहबोली कायम प्रभू रामचंद्राच्या भूमिकेत असल्यासारखी असायची. काहीवेळा त्यांची मिरवणूकही कोदंडधारी रामाच्या अवतारात निघायची आणि भोळीभाबडी जनता अहल्येच्या भावनेनं त्यांच्या पायावर लोटांगण घालायची. जातिवंत अभिनेता असलेल्या रामारावांनी त्या वेळच्या राजकारणात जबरदस्त नाट्यमय रंगत आणली होती. विधानसभेत स्पष्ट बहुमत असूनही तत्कालीन राज्यपाल रामलाल यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर केलं होतं. त्याचा विषाद व्यक्त करताना ते आपल्या अभिनयाची उत्कृष्ट झलक दाखवत असत. अशा प्रकारे रामारावांपासून सुरू झालेला हा या रथयात्रेचा फार्म्युला भाजप नेत्यांनी हायजॅक केला आणि आज ती जणू त्या पक्षाची मिरासदारी बनलीय. काश्मीरच्या प्रश्नावर १९९३ मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनीही या फार्म्युलाचा वापर केला होता. पण अडवाणींच्या अन्य यात्रांप्रमाणे तोही लोकांच्या विस्मृतीत गेला आहे. 

*चंद्रशेखरांची पदयात्रा खूपच गाजली*
राजकारणातल्या या यात्रेकरूंच्या जथ्यामध्ये वेगळेपणानं उठून दिसणारे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या ‘भारत यात्रे’चा इथं आवर्जून उल्लेख करावा लागेल. इंदिराजींच्या काळात काँग्रेसमधले तरुण तुर्क म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर आणीबाणीनंतर जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. जुलै १९७९ मध्ये जनता सरकार कोसळल्यानंतर ते काहीसे बाजूला पडले. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारी १९८३ रोजी त्यांनी कन्याकुमारीहून पदयात्रा सुरू केली आणि देशाच्या विविध राज्यांमधून पायी फिरत, सभा-बैठका घेत २५ जून रोजी दिल्लीतल्या राजघाटावर या यात्रेची सांगता झाली. सुमारे चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चाललेला स्वातंत्र्योत्तर काळातला हा एकमेव राजकीय नेता म्हणावा लागेल. देशातल्या सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेऊन सामाजिक विषमतेच्या विरोधात जनजागृती, हे या यात्रेचं मुख्य उद्दिष्ट होतं. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य या संपूर्ण काळात त्यांच्याबरोबर राहिले होते. यात्रेच्या पुणे जिल्ह्यातल्या टप्प्यात त्यामध्ये सहभागी होण्याचा योग आला. उंच, मजबूत बांध्याचे चंद्रशेखर झपाझप पावले उचलत वेगानं चालत असत. चालता चालता बरोबरच्या स्थानिक मंडळींबरोबर त्या परिसरातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीची माहिती घेत असत. खेड्यातली चावडी सभा असो किंवा शहरातल्या मोठय़ा जाहीर सभा, ते सारख्याच पोटतिडिकीने देशापुढचे प्रश्न मांडत असत. या यात्रेचा त्यांना लगेच राजकीय लाभ झाला नाही तरी संसदेतल्या त्यांच्या अतिशय प्रभावी वक्तव्यांना व्यापक स्वानुभवाची जोड मिळाली. ते भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयींना प्रेमादराने ‘गुरुदेव’ असं संबोधत भाजपच्या दुहेरी नीतीवर ते घणाघाती हल्ला चढवत असत. शिवाय, पुढं १९९१ मध्ये पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली तेव्हा चंद्रशेखर हे नाव देशात देवेगौडा किंवा गुजरालांइतके अपरिचित नव्हते, हे त्याचेच फळ म्हणता येईल.

*यात्रा काढणारे फडणवीस हे पाचवे नेते*
निवडणुकीच्या हंगामात राज्यव्यापी यात्रा काढणारे फडणवीस हे देशातील पाचवे नेते आहेत. गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी 'जनआशीर्वाद यात्रा', राजस्थानात वसुंधराराजे यांनी 'गौरवयात्रा' आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांनी 'विकासयात्रा' काढल्या होत्या. भाजपच्या तीन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी यात्रा काढल्या होत्या. याबरोबरच आंध्र प्रदेशमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी 'प्रजा संकल्प यात्रा' या नावाने पदयात्रा काढली होती. मतदारांशी संपर्क साधून आणि केलेल्या कामांची माहिती जनतेला सादर करण्याच्या उद्देशानं भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या यात्रांचा राजकीय फायदा त्यांना फारसा झाला नाही. कारण मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपेयींना आपली सत्ता गमवावी लागली. भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यात्रा काढूनही त्याचा निवडणुकीत फारसा उपयोग झाला नाही. शिवराजसिंह चौहान यांना तर आपली यात्रा गुंडाळावी लागली होती. वसुंधराराजे यांच्या यात्रेवरून वाद निर्माण झाला होता. याउलट आंध्रप्रदेशात माजी मुख्यमंत्री राहिलेले वडील वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या प्रमाणेच निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी पदयात्रा काढलेल्या जनगमोहन रेड्डी यांना त्याचा फार मोठा फायदा झाला. आंध्रप्रदेशात जनगमोहन यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसला तीन चतुर्थाश बहुमत मिळाले. देशात यात्रांचा मोठा राजकीय इतिहास आहे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांची 'दांडीयात्रा' किंवा 'चंपारण्ययात्रा' प्रसिद्ध आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळे १९९०च्या दशकात देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला होता. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची भारत यात्रा गाजली होती. पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी थैमान घातले असताना चित्रपट अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांनी काढलेल्या शांतीयात्रेची बरीच चर्चा झाली होती. अशा काही ज्या यात्रा निघाल्या त्या राष्ट्रीय, सामाजिक विषयांशी निगडित अशा राहिल्या. पण सध्या ज्या यात्रांची जत्रा भरवली जातेय ती निव्वळ राजकीय स्वार्थासाठीच!

*मतदारांकडे जाण्यासाठी यात्रांचं आयोजन*
यात्रांचा सुकाळ झाला असला तरी सर्वच पक्षांत कार्यकर्त्यांची वानवा आहे. केवळ त्यांचा वापर केला जातोय हे लक्षांत आल्यानं कार्यकर्ते अशा नेत्यांपासून यात्रांपासून दूर झालेत. त्यातच निवडणुकांच्या वातावरणात उमेदवारी आणि आयाराम-गयाराम यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेत्यांनी आपल्या मुलांना, नातवांना उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानलीय. अशावेळी कार्यकर्त्यांचा त्यांना  सोयीस्कररित्या विसर पडलाय. पण आज सर्वच पक्षात कार्यकर्ते हे अभावानेच कार्यरत असल्याचं दिसून येतंय. नेत्यांना ही परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे का? हाच सवाल आहे.  पण कोणताच राजकीय पक्ष व त्यापक्षाचे नेते 'कार्यकर्ता' जिवंत राहावा यासाठी प्रयत्नशील दिसत नाहीत. केवळ आपल्या सग्यासोयऱ्यांचीच सोय लावली जावी यासाठीच प्रयत्नशील दिसताहेत. त्यामुळं सर्वच पक्षात कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसतेय. उपलब्ध कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी मग पक्षांत वेगवेगळे सेल-विभाग काढून त्याचे पदाधिकारी त्यांना केले जाताहेत. त्यामुळं सगळ्याच पक्षात पदाधिकाऱ्यांचा सुकाळ झालाय. मात्र कार्यकर्त्यांचा दुष्काळच जाणवतोय! आज तरुणांचा कोणत्याच राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही; आजचा तरुण हा राजकीयदृष्ट्या भांबावल्यासारखा, दिशाहीन झालाय.  तरुणांना तर कुणाचातरी आदर्श आपल्या जीवनात घ्यावा असं नेतृत्वही त्यांना दिसत नाही. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते, त्यांना अण्णांसारखा साधासुधा माणूस आकर्षित करू शकला. इतका स्वच्छ निस्वार्थी माणूस असू शकतो याचं आश्चर्य आणि कुतूहल त्यांना वाटलं होतं. पण कधीकाळी आपल्याकडं अशी माणसं शेकड्यांनीच नव्हे तर हजारोंनी होती; त्यावेळी त्यांनाच कार्यकर्ते संबोधले जाई. त्यांच्याकडे कोणी त्यागी, निस्वार्थी म्हणून आदरार्थी बघत असला तरी त्यांना कोणी साधुसंत समजत नव्हते. आपण प्रामाणिक असावं ही भावना समाजात सर्वत्रच रूढ होती. यावेळी अशी निस्वार्थी माणसं ही 'कार्यकर्ते' म्हटली जायची. आज अशी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. तसे आदर्श आमच्या पिढीसमोर नाहीत व त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय कसे समजावं असा प्रयत्न होताना राजकीय पक्षांकडून व नेत्यांकडून होताना दिसत नाही. अशामुळे सभा, बैठकांसाठी मतदारांना एकत्र एकत्र करणारे कार्यकर्ते दुरावलेत त्यामुळं नेत्यांना मतदारांना आपल्याकडं बोलावण्याऐवजी मतदारांकडेच जाण्यासाठी नेत्यांना यात्रांची गरज निर्माण झालीय!

चौकट....
*यात्रा हे मार्केटिंगचं फॅड...!*
शिवसेनेचं नेतृत्व घडविण्यासाठी आदित्य ठाकरेंना शिवसेनेनं 'जनाशीर्वाद यात्रा',पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश यात्रा' आरंभलीय. सत्तेसाठी वा मुख्यमंत्रीपदासाठी नव्हे तर रयतेचं राज्य यावं यासाठी म्हणून अमोल कोल्हे, उदयनराजे भोसले यांनी 'शिवस्वराज्य यात्रा' काढण्याचं जाहीर केलंय. खरंच याची गरज आहे का? याचं आत्मचिंतन सगळ्यांनी करायला हवंय. लोकांना हवं असेल तर आदित्य ठाकरेंचं नेतृत्व लोक स्वीकारतील ना! त्यासाठी हा आटापिटा कशासाठी? मुख्यमंत्र्यांनी लोकोपयोगी कामं केली असतील आणि त्याचा थेट फायदा लोकांना झाला असेल तर लोक त्यांच्याचकडं सत्ता पुन्हा सोपवतील, त्यासाठी या यात्रेचा घाट कशाला घालायला हवाय? लोक आपल्या कामावर मतं देतील असा आत्मविश्वासच नसल्याचं हे लक्षण म्हणावं लागेल! अमोल कोल्हे यांची सध्याची भाषणं पाहिली की त्यांचा दांभिकपणा जाणवतो. पक्षांतर करून खासदारकी मिळवलेल्या कोल्हे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची शपथ द्यावी हा तर मोठा विनोदचं! रंगभूमीवरची वाक्यं फेकून मतं मिळत नाही. त्यांच्या पक्षाचं राज्य हे रयतेचं राज्य नव्हतं का? मग लोकांनी ते का नाकारलं याचा विचार ते करणार आहेत का? आणखी महत्वाचं असं की, रंगभूमीवरच्या शिवाजी-संभाजीच्या नेतृत्वाखाली थेट शिवरायांचे वंशज उदयनराजे यात्रेत सहभागी होणार हे तर अतिच झालं! असो. राजकीय स्वार्थासाठी विधिनिषेध गुंडाळून ही राजकीय मंडळी लोकांसमोर येताहेत. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. या मार्केटिंगला साजेसं उपक्रम ही मंडळी राबवताहेत. त्याला लोक किती भुलणार.... किती बळी पडणार हे निवडणुकीनंतरच समजेल...!
- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...