Friday 3 May 2019

हमीदभाईंच्या विचारांचा जागर!


"सध्या मुस्लिम महिलांच्या बुरखाबंदीची चर्चा देशात सुरू आहे. श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिथं आणीबाणी जाहीर झाली पाठोपाठ सरकारनं तिथं बुरखाबंदी लागू केली. भारतातही अशाप्रकारे बुरखाबंदी करावी अशी मागणी होऊ लागलीय. ज्यादिवशी ही मागणी केली गेली त्या दिवशी अशाप्रकारे मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या हमीद दलवाई यांचा स्मृतिदिन होता. त्यांच्या विचारांचा जागर त्यानिमित्तानं पुन्हा एकदा झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर तोंडी तलाक देण्याला कायद्यानं बंदी आणली गेली. आता बुरखाबंदीची चळवळ जोर धरतेय. मुस्लिम महिलांच्या न्यायहक्कासाठी नव्यानं येणारं सरकार काय करणार ही उत्सुकता आहे. यानिमित्तानं हमीदभाई यांची जागवलेली स्मृती आणि त्यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या चळवळीचा हा जागर!"
------------------------------------------------
 *श्री* लंकेतल्या बॉम्बस्फोटानंतर तिथं बुरखाबंदी आणली गेली. आता भारतातही अशी मागणी होतेय. खरं तर  मुस्लिम जगतात मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी चार दशकांपूर्वी एक क्रांतिकारी घटना घडली. रूढीचुस्त समजल्या जाणाऱ्या  मुस्लिम समाजातील सुशिक्षित तरुणांनी साथी हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात 'भारतीय मुस्लिम सत्यशोधक मंडळा'ची स्थापना केली आणि केवळ मुस्लिम समाजाच्या दृष्टीनेच नव्हे तर भारताच्या दृष्टीनेही आवश्यक असलेल्या अशा एका महत्वपूर्ण कार्याचा शुभारंभ केला होता. वास्तविक १९४७ साली देशाची फाळणी होऊन केवळ मुस्लिम भागाचे पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र निर्माण झाल्यानंतर निधर्मी राजवटीचा डांगोरा पिटणाऱ्या भारतात हिंदू-मुस्लिम हा प्रश्नच निर्माण व्हायला नको होता. परंतु धर्माध मुस्लिम नेत्यांचे वाढते हट्ट आणि मतांच्या प्रलोभनापायी त्यांना सदैव झुकते माप देणारे स्वार्थी राज्यकर्ते, यांच्यामुळेच हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र आणि गुंतागुंतीचा होत गेला. अशा परिस्थितीमुळे 'इथल्या मुस्लिमांची कधीही प्रगती होणे शक्य नाही, ते नेहमीच मागासलेले राहणार'. हे शल्य हमीदभाई व त्यांच्यासारख्या तरुणांना सलत होतं. हे सारं मळभ दूर करण्यासाठी मुस्लिम समाजातल्या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ह्या 'मुस्लिम सत्यशोधक मंडळा'ची स्थापना केली.

*जगात पहिल्यांदा तलाकपीडित महिलांचा मेळावा*
 'देशात समान नागरी कायदा त्वरेने झाला पाहिजे. मुस्लिम स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळायला हवेत. सवत आणणं आणि तोंडी तलाक देणं या गोष्टी कायद्यानं बंद झाल्या पाहिजेत. याशिवाय भारतीय समाजात प्रबोधनाच्या मार्गानं इहवादाची, सेक्युलॅरिझमची मूल्ये रुजवली पाहिजेत!' अशाप्रकारे या पांच महत्वाच्या गोष्टींची पूर्ततेसाठी झटण्याचे कार्य मंडळाने स्थापनेपासून हाती घेतलेलं आहे. प्रारंभीच्या काळात बुरखाबंदीची मागणी त्यात नव्हती पण कालांतरानं ती झाली. पूर्णतः अडाणी समाज, धर्माध नेत्यांची हुकूमशाही, आर्थिक सहाय्य कुठूनही नाही. शारीरिक हल्ल्याची दहशत, अशा बिकट परिस्थितीत दलवाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं काम जिद्दीनं उभारलं होतं. त्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तलाकपीडित महिलांचे मेळावे घेऊन त्यातून त्यांच्या वेदना बोलक्या केल्या.  अशा परिषदा जगात पहिल्यांदाच झाल्या असाव्यात. कुटुंबनियोजनाचा प्रचार मुस्लिम महिला कार्यकर्त्यांनीच सनातन्यांच्या हल्ल्यांना तोंड देऊनही सातत्यानं जारी ठेवला होता.

*अल्पायुष्यात मुस्लिम जगताविरुद्ध झगडले*
हिंदू आणि मुस्लिम यांच्या वागणुकीबद्धल मुस्लिम सत्यशोधक विचारवंत लेखक, कार्यकर्ते हमीद दलवाई म्हणतात, 'मुसलमानांना माझं म्हणणं पटत नाही, तोपर्यंत ते माझा मुडदा पाडण्याचा प्रयत्न करतील. पण पटलं तर मग त्या विचारांचा ते संपूर्ण आचारात स्वीकार करतील. हिंदू मात्र, तुम्ही कितीही बोंबला; तुमचं म्हणणं मान्य आहे, असं म्हणणार. पण परत वागण्यात जुनंच चालू ठेवणार. मुसलमानांत असं ढोंग नाही!' हमीद दलवाई यांचं ४१ वर्षांपूर्वी किडनी रोगानं निधन झालं. त्यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ तर मृत्यू ३ मे १९७७ जवळपास ४५ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या हमीद दलवाई यांना उमेदीच्या केवळ १५-२० वर्षेंच त्यांच्या वाट्याला आली. ती त्यांनी मुस्लिम कट्टरतेची पाळंमुळं जगजाहीर करण्यासाठी घालवली. त्यासाठी धोका पत्करून मुस्लिम समाजात शिरून धर्मांधता ढिली करणारी 'मुस्लिम सत्यशोधक संघटना' बांधली. त्यासाठी ते भारतभर फिरले. इस्लामच्या ठेकेदारांना भिडले.

*अनेक वैचारिक लेखनाचे ग्रंथ प्रकाशित*
दैनिक 'मराठा'कार आचार्य अत्रे यांचे ते पत्रकार म्हणून सहकारी होते. हिंदू-मुस्लिम दंगल कशी घडते आणि घडविली जाते, ह्याचं नेमकं चित्रण करणारी 'इंधन' कादंबरी त्यांनी लिहिली. ती १९६५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद दिलीप चित्रे यांनी केलाय. त्याचं शीर्षक होतं 'Fuel'. त्यापूर्वी 'लाट' हा कथासंग्रह १९६१ मध्ये प्रकाशित झाला. 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' हा वैचारिक ग्रंथ. त्यांच्या मृत्यूनंतर खूप उशिरा म्हणजे २००२ मध्ये साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलाय. ह्या ग्रंथात त्यांनी भारतीय इस्लाम, मुस्लिमांच्या धार्मिक चळवळी, पाकिस्तानची निर्मिती, भारत-पाक संबंध, पाकिस्तानची उद्दिष्ट्ये, हिंदुत्ववाद आदि मुद्द्यांचं उदाहरणांसह सखोल विश्लेषण केलं आहे. ते भारताला आज त्रस्त करणाऱ्या धार्मिक दहशतवादाचं स्वरूप, कारणं आणि उपाय समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.

*वैचारिक ठामपणामुळे मृत्यूच्या छायेत वावरले*
हमीद दलवाई यांनी आपल्या समाजकार्याच्या सुरुवातीपासून 'महंमद पैगंबर हा माणूस होता. त्यानं त्यावेळच्या समाजसुधारणेसाठी 'कुराण' हा ग्रंथ लिहिला. त्या काळात त्या समाजाला ते नियम आवश्यक वाटले तरी, कालमानानुसार त्यातील नियम चुकीच्या पायावर आधारलेले आहेत, ते रद्द व्हावेत,' अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली होती. त्यात लपवाछपवी नव्हती की कुठं तडजोडही केली नाही. या ठामपणामुळे त्यांच्या मागे शेकडो सत्यशोधक, सुधारणावादी मुस्लिम कार्यकर्ते तयार झाले. तलाकपीडित मोर्चा निघाला. हमीद दलवाई यांच्या विचार-कार्यामुळे इस्लाम जगतात खळबळ उडाली. त्यांना गद्दार ठरवून संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. हमीदभाई अखेरपर्यंत मृत्यूच्या छायेतच वावरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर मुस्लिम पुढाऱ्यांनी उपचार म्हणून देखील दुःख प्रदर्शन केलं नाही. इतकंच नव्हे तर, पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आलेल्या दुखवट्याच्या ठरावलाही मुस्लिमांनी विरोध केला.

*मृत्यूनंतरही त्यांच्याबद्धल विरोध कायम राहिला*
पुण्याच्या मोमीनपुरा भागात राहणाऱ्या मुस्लिमांना हमीदभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना प्रचंड मारहाण झाली. रक्तबंबाळ झाले. पण त्यांनी आपलं म्हणणं सोडलं नाही. तिथं जमलेल्या मूठभर मुस्लिमांसमोर आपलं म्हणणं निर्धारानं मांडलं. असेच हल्ले देशातील इतरत्र त्यांच्यावर आले पण त्यांनी घेतलेला वसा टाकला नाही. उलट मोठ्या जोमानं त्यांनी त्याचा विस्तार केला. हमीदभाई यांचं ४२ वर्षांपूर्वी झाला पण त्या आघातानं खचून न जाता कार्यकर्त्यांनी आपलं काम जोमानं सुरूच ठेवलंय. बाबूभाई बँडवाले, सय्यदभाई, रशीद शेख, प्रा.तांबोळी यासारख्या अनेकांनी ही चळवळ जोमानं चालवलंय. या चळवळीला वाहिलेलं मराठीतलं 'मुस्लिम सत्यशोधक पत्रिका' पुण्यातून तर अमरावतीहून उर्दूतलं 'बागवान' ही नियतकालिक निघत. मुस्लिम धर्माच्या स्थापनेपासून तेराशे वर्षाच्या काळात जे कधीही घडून आलं नव्हतं, ते हमीदभाई यांनी घडवलं होतं. त्यांच्या माध्यमातून एक पणती पेटवली गेलीय, तिच्यातून अनेक पणत्या पेटवल्या जाऊन त्याचा प्रकाश मुस्लिम जगतावर उजळो अशी हमीदभाई यांची इच्छा असे!

*संकुचित विचारांना राजकारण्यांचा पाठींबा*
हमीदभाई यांच्या प्रयत्नानं मुस्लिम समाज राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी सुरुवात झाली. आज महाराष्ट्रातच नाहीत तर देशभरात हे दिसून आलंय. 'शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचेच नव्हेत तर ते आमचेही आहेत', असं म्हणत शिवजयंतीच्या दिवशी मिरवणुकीत रस्त्यावर येणारी भगवे ध्वज खांद्यावर घेणारी हजारो मुस्लीम मंडळी पहिली की, मुस्लिम समाजात होणारा बदल लक्षात येईल. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं म्हणावा तसा, म्हणावा तेवढा प्रतिसाद त्यांना मिळत नाही. अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करतात. आजवर देशात असलेल्या मुस्लिम समाजाकडे 'व्होट बँक' म्हणून पाहिले गेले. किंबहुना त्यांची ओळख तशीच असावी यासाठी  प्रयत्न झालेत, असं खेदानं म्हणावं लागतं. पण त्यांना समान दर्जा देऊन राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला नाही. राजकीय स्वार्थासाठी,  मतलबासाठी मुस्लिमांना धर्माध बनवून त्यांना अलग ठेवलं गेलं. याला सगळ्याच राजकीय पक्षानी त्याला हातभार लावलाय.

*राष्ट्रीय सुरक्षेच्या आड धर्म येऊ नये*
धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले आहे. भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी केली जातेय.  श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी भारतालाही याचे हादरे बसत आहेत. जम्मू आणि कश्मीरलाही दहशतवादाने ग्रासले आहे. श्रीलंका, फ्रान्स आणि ब्रिटनसारखे देश कठोर पावले उचलत असतानाच आपण तशी पावले कधी उचलणार?, असा सवाल उपस्थित होतोय. मोदी सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी जोर धरू लागलीय. बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व भारतातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली. राज्यातही पारा चढतो त्यावेळी तरुणी चेहर्‍यास ओढणी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडतात. हे तेवढ्यापुरतेच असते. मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत असल्याचं दिसून येतंय.
तिहेरी तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची आवई उठवली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही. मुसलमानांत कोणी फुले, शाहू, आंबेडकर निर्माण झाले नाहीत. किंबहुना ते होऊ दिले गेले नाहीत. हमीदभाई सारख्या नेत्यांवर हल्ले केले गेले. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या यासारख्यांचे फावले आहे.

*मुस्लिमांचं 'भारतीयकरण' व्हायला हवं!*
देश खरोखरच निधर्मी असेल तर केवळ राज्यकर्त्यांनीच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचं वर्तन शुद्ध ठेवायला हवंय. न्यायालयानं तलाकपीडित महिलांना दिलासा दिलाय पण त्यालाही विरोध होताना दिसतो. समान कायदा करताना सक्तीचं कुटुंबनियोजन व्हायला हवंय. अनेक मुस्लिम राष्ट्रांनी ते धोरण स्वीकारलं आहे. सर्वच नागरिकांना समान दर्जा मिळाला तर जात आणि धर्माचं अवडंबर कमी होईल. राजकीय पक्ष या विचारानं जाताना दिसत नाहीत. यातच दुहीची बीजं आहेत ही मुस्लिमांची धर्माधता, शिक्षण, त्यांच्यातील अज्ञान आणि बेरोजगारी जोडलं गेलं आहे, ते दूर झालं तर मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना कोणाचंच पाठबळ नाही. वास्तविक अशा पुरोगामी आणि प्रागतिक मुस्लिम नेत्यांच्या पाठीशी राजकीय पक्षांनी खंबीरपणे उभं राहायला हवंय. आज ते एकाकी लढताहेत एकात्मतेसाठी, राष्ट्रीयत्वासाठी आणि मुस्लिमांचं 'भारतीयकरण' करण्यासाठी!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

2 comments:

  1. हरीश जी, हमीद दलवाई यांच्या जीवनावरील घटनांच्या पाश्र्वभूमीवर आपण त्यांचे विचार सादर करून मोठे सत्कार्य केले आहेत. आपल्या लेखणीतून असे विचार धन वाचायला मिळते म्हणून आनंद वाटतो

    ReplyDelete

'राजा'ज्ञा : भ्रम आणि संभ्रम....!

"अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी भाजप वा महायुतीला पाठिंब्याचा ब्रही न काढता 'कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा....