Thursday 2 May 2019

राजकीय व्यासपीठावर तरुणांचा दबदबा

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकादरम्यान घटनेची चौकट, लोकशाही मार्गावर वाटचाल करीत काँग्रेसचे  राहुल गांधी, मनसेचे राज ठाकरे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैया कुमार अर्थातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या चौकीदाराच्या कामगिरीचे ऑडिट करणारे तीन तरुण तडफदार राजकीय व्यक्तिमत्व देशाच्या राजकीय व्यासपीठावर आपला दबदबा निर्माण करीत आहेत...!

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैया कुमार हे तीघे तरुण नेते आज देशाच्या प्रसिद्धीमाध्यमांच्या केंद्रस्थानी आहेत. सत्ताधारी राजाने आपल्या भोवती शस्त्रधारी सैन्याचा समर्थक आणि चौकीदार यांचा कडेकोट पाहारा ठेवावा. स्वयंप्रतिमा कुरवाळत सत्तेत मश्गूल राहावं. काही झाले तरी लढाई आपणच जिंकणार अशा स्वप्नात असताना कुठून तरी पाहरा देणाऱ्या सैन्याच्या वेढ्याला भगदाड पडावे आणि राजाला खडबडून जाग यावी. आता काही तरी करावे हे राजाला कळावे पण वेळ निघून गेलेली असावी. त्यामुळे तंद्री भंग पावलेल्या चेहऱ्यावर जे भाव दिसावे ते सध्या राजा आणि दरबारी मंडळीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. बारकाईने पाहिल्यास आपल्यालाही ते स्पष्ट दिसू शकतात बरं! अर्थात हे वेगळे सांगणे न लगे की, राजाने स्वत:हूनच स्वत:ला 'चौकीदार' अशी उपाधी बहाल केली आहे. 'राजा बोले कारभारी डोले' असे म्हणत मग राजाच्या आधाराने किंवा दबावाने सर्वच दरबाऱ्यांनी स्वत: स्वत:चे बारसे 'चौकीदार' असं केलं. असो. तर, सांगायचा मुद्दा हा की, असा स्वमश्गुल राजावर काँग्रेसच्या राहुल गांधी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैया कुमार या तिघांनी चांगलाच 'सर्जिकल स्ट्राईक' केला आणि तो निवडणूक प्रचारा दरम्यान कायम ठेवलाय. या तिघांच्याही सर्जिकल स्ट्राईकची परिमाणं आणि परिणाम वेगवेगळे आहेत. हे सारं अधोरेखीत करण्याचा आणि खास करुन लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा की, या तिघांनीही चौकीदाराच्या कामगिरीचे ऑडीट करताना घटनेची चौकट कुठेही, जराशीही मोडलेली नाही की, लोकशाही मार्गाचे अथवा संकेतांचेही उल्लंघन केलेलं नाही. त्यांच्या या तडफदार भूमिकांविषयी काही विचार!

*राज ठाकरे*

राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं खरं म्हणजे इथे राहुल गांधी यांचा प्रथम क्रमांक लागतो. मात्र, भाषण, त्यांची भाषणशैली आणि त्याला दिलेली तंत्रज्ञानाची जोड आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करू पाहता मनसेच्या राज ठाकरे यांचा प्रथम क्रमांक घ्यावा लागतो. संसदीय राजकारण करत असताना राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीत उमेदवार न उभं करणं ही तशी राजकीय चूक आणि त्याचबरोबरच खूप मोठी जोखीम. राज ठाकरे यांनी ही चूक करुन जोखीम उचलली आहेच. पण, जोखीम जेवढी मोठी तेवढं त्याच्या बदल्यात मिळणारं यश अपयशही मोठं! आपल्या गारुड टाकणाऱ्या वक्तृत्वाला ध्वनिचित्रफितीची जोड देत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशाच्या राजकारणावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. वास्तव असे की स्वत:च्या पक्षाचा उमेदवार नसल्यानं या निवडणुकीशी राज ठाकरे यांचं तसं देणे घेणे नाही. तरीही राज ठाकरे राज्यभर सभा घेत दौरे करत फिरताहेत. त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. निवडणुकीशी तसा कोणताही थेट संबंध नसणाऱ्या नेत्याच्या सभेला अशी गर्दी होणं म्हणजे अपवाद आणि तोही ऐतिहासिक अपवाद होय. आपल्या जाहीर सभांमधून राज ठाकरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष-एनडीएचे जाहीर वाभाडे काढताहेत. खास करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह ही जोडगोळी राज ठाकरे यांच्या रडारवर आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाला होणारी गर्दी आणि याच गर्दीचा राज यांनी भाषणादरम्यान मांडलेल्या मुद्द्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राज ठाकरे ही सर्वसामान्य जनतेच्या मनातील भाषा बोलताहेत हे स्पष्ट होतं. आपला मुद्दा स्पष्ट करताना ध्वनिचित्रफित दाखवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्व राजकीयदृष्ट्या किती दुटप्पी आहे हे लोकांना दाखवून देत आहेत. विशेष म्हणजे एरवी मोदींना देवत्व देणारी भक्त मंडळीही राज ठाकरे यांच्या या भाषणांच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे बॅकफूटवर गेली आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे हे राज ठाकरे यांना तोडकंमोडकं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात ही त्यांच्यादृष्टीनं टीका आहे. राज यांनी विचारलेल्या थेट प्रश्नाचे उत्तर नाही. राज ठाकरे नावाच्या वादळानं सुरु केलेला हा झंझावात या लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार किंमत मोजायला लावणार असं सध्याचं चित्र दिसतंय! भाषेवर असलेली पकड, अचूक शब्दफेक आणि संसदीय भाषेचा वापर करीत, आक्षेपार्ह शब्द, वाक्य, मिमिक्री कटाक्षाने दूर ठेवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीस तोड म्हणजे काकणभर सरसच गांभीर्यपूर्ण वक्तृत्व ही राज ठाकरे यांच्या भाषणाची काही वैशिष्ट्ये आहेत. दूरदृष्टी, तत्वज्ञान, अभ्यास, योग्य आणि अचूक संदर्भ हे सुद्धा राज ठाकरे यांच्या भाषणाचे खास असे वेगळेपण म्हणायला हवं.

*राहुल गांधी*

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देणारे एकमेव नेते. त्यांची सुरुवात जरी अडखळत झाली असली तरी, तो आता इतिहास झालाय. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या व्यक्तिमत्वात जो काही बदल झालाय तो स्वागतार्ह म्हणायला हवाय. आजवर पप्पू पप्पू म्हणून त्यांची हेटाळणी करणाऱ्यांनाही हा बदल अवाक करुन सोडणारा आहे. राहुल गांधी यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आकलन कमी असल्याचा अनेकदा त्यांच्यावर आरोप होतो. पण, समस्या, विषय जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास आणि कष्टाची त्यांची तयारी स्पष्ट दिसते. २०१४ पासून खरं म्हणजे २०१२ पासूनच केवळ नरेंद्र मोदी हेच देशाचा तारणहार असल्याचा जो अभास निर्माण करण्यात आला होता. त्याला राहुल गांधी यांनी मोठ्या कष्टानं आणि आश्चर्यकारकपणे छेद दिला आहे. खास करुन राफेल विमान खरेदी आणि इतर आर्थिक मुदद्यांवरुन त्यांनी पंतप्रधान मोदी आणि पर्यायानं भाजपच्या नाकात दम आणला आहे. राफेल मुद्द्यावरुन त्यांनी ''चौकीदार चोर है'' चा लावलेला सूर आता एका टीपेला गेला आहे. आता त्यात नाविऩ्य दिसणे गरजेचे आहे. तशा अर्थाने 'चौकीदार चौर है' ही राजकीय प्रचारात वापरण्याचा मुद्दा काहीसा वापरुन झालेला आहे. पण, भाजपभोवती संशयाचे मोहोळ निर्माण करण्यास नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जनतेसमोर ठेवलेला काँग्रेसचा जाहीरनामाही भाजप जाहीरनाम्याच्या कितीतरी पटीने सरस दिसतो. राहुल गांधी यांच्या भाषणाचे एक वैशिष्ट म्हणजे, जाहीर व्यासपिठावरून बोलताना ते कधीही कोणाचा उल्लेख एकेरी करत नाहीत. स्वत:च्या कुटुंबाचे खास करुन आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी हे दहशतवादाला बळी पडल्याचं सांगत लोकांना भावनिक करताना दिसत नाहीत. ते वास्तवातले बोलतात, वास्तव दाखवतात. त्यांच्या भाषणात सैन्य, धर्म, जात याचा उल्लेख फारसे शक्यतो आढळत नाहीतच.

*कन्हैय्या कुमार*

राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या तुलनेत कन्हैय्या कुमार या व्यक्तिमत्वाला वेगळ्या अर्थाने पाहायला पाहिजे. वैचारिकदृष्ट्या कन्हैयाची तार ना भाजपशी जुळते ना काँग्रेससोबत त्याच्या पक्षाचा आणि त्याचा स्वत:चा म्हणून एक स्वतंत्र अजेंडा आहे. आपल्या भाषणातून तो तरुण, शिक्षण, आरोग्य महिला, पर्यावरण आणि नोकरी, शेती, शेतकरी आदी प्राथमिक गरजांच्या गोष्टींची भाषा करतो. त्याचे विरोधक सत्ताधारी त्याला देशद्रोही म्हणून संबोधतात. पण, वास्तव असे की, ज्या प्रकरणात त्याच्यावर देशद्रोही म्हणून आरोप करण्यात आलाय त्याबाबत खटला दाखल करायला स्वत: सरकारलाच खूप काळ घालवावा लागला. त्याच्यावर झालेले आरोप हा वेगळा मुद्दा पण. संसदीय राजकारणात सत्ताधारी पक्ष हा विरोधक आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना, आरोपांना उत्तरे देण्यास जबाबदार आणि तितकाच कटीबद्ध असतो. कन्हैय्या सरकारला जे प्रश्न विचारतो आहे. ज्या मुद्द्यांवर बोलतो आहे, ते सर्व प्रश्न मुद्दे हे सरकारच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. सत्तेत कोणतेही सरकार असले तरी, ज्या सरकारमध्ये हिंमत असेल तेच सरकार त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. राज ठाकरे, राहुल गांधी यांच्या प्रमाणेच कन्हैय्या कुमार याच्याही भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याही भाषणात कधीही कोणावर व्यक्तिगत टीका नसते, कोणाचा एकेरी उल्लेख नसतो, सार्वजनिक जीवनातील संकेतांचे पूरेपूर भान राखत कन्हैय्या बोलत असतो.
-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आता लागणार साक्षमोक्ष...!

"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...