Friday, 9 February 2018

शापित त्रिपुरा...!

*शापित त्रिपुरा...!*

पश्चिम बंगाल आणि केरळमधील पडझडीच्या पार्श्वभूमीवर त्रिपुरामध्ये सलग पाचव्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आलेलं आहे. तर माणिक सरकार हे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. आता त्रिपुराच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रधानमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवलाय. 'माणिक काय निवडताय? संधी आलीय, आता भाजपचे रत्न निवडा...!' असा प्रचार चालवलाय. तेव्हा या निवडणुकीत काय होईल हे लवकरच कळेल. भाजपेयींची आणि प्रधानमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. देशभरात १९ राज्यात भाजपेयींची सत्ता आहे, आता २०वं सरकार ताब्यात घेण्याची तयारी चालवलीय. कम्युनिस्टांना देखील छोटंसं का होईना आपलं राज्य टिकवायचंय!
--------------------------------------------

सध्या अस्तित्वात असलेल्या त्रिपुरामध्ये कम्युनिस्टांनी एकहाती सत्ता आहे. ६० जागांच्या विधानसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ४९ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एक, अशा ५० जागा मिळाल्या आहेत. त्रिपुरामध्ये १९७८ पासून डाव्या आघाडीची सत्ता आहे. अपवाद फक्त १९८८ ते ९३ या पाच वर्षांचा. मुख्यमंत्री माणिक सरकार हे सहावेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. आता सातव्यांदा ते निवडणूक लढवताहेत. माणिक सरकार हे अत्यंत साधे गृहस्थ असून त्यांच्या बँक खात्यावर फक्त दहा हजाराची शिल्लक आहे. मिळणारं वेतन ते पक्षांकडं जमा करतात. आणि पक्षाकडून मिळणाऱ्या दरमहा पांच हजारांमध्ये खर्च भागवतात. त्यांची पत्नी सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी असून त्यांच्या पेन्शनवर घरखर्च चालतो. आपल्याकडं हा साधेपणा कुणालाही दंतकथा वाटेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे.

*८४ टक्के सीमा बांगलादेशाशी*
त्रिपुरा हे गोवा आणि सिक्कीमनंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचं छोटं राज्य आहे. परंतु एखाद्या प्रदेशाला शाप असतो म्हणतात, तसंच त्रिपुराच्या बाबतीत आहे. त्रिपुरा राज्याच्या एकूण सीमेची ८४ टक्के सीमा बांगलादेशाशी संलग्न आहे. त्यामुळं या राज्याच्या विकासाच्या सगळ्या वाटाच अडवल्या गेल्या आहेत. आणि जिथं राज्याबाहेर जाण्यासाठी तसंच राज्यात येण्यासाठी ८४ टक्के सीमारेषा बंद राहते. यानं काय अनुभव येतो, ते इथल्या राज्यकर्त्यांनाच ठाऊक! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्रिपुराचं हे दु:स्वप्न तसंच गोठून राहीलंय. कधीतरी दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार होईल आणि या वाटा खुल्या होतील, अशा भाबड्या आशेवर त्रिपुराची जनता दिवस, महिने, वर्ष ढकलत आहे. पण भाजपेयी सरकारनं बांगलादेशाला वादग्रस्त जमीन देऊन टाकली पण त्रिपुराच्या समस्यां सोडविण्यासाठीच्या प्रकाशाचा किरण अद्याप दिसत नाही.

*दळणवळणाची समस्या*
भारताला स्वातंत्र्य मिळालं, ही त्रिपुराच्या दृष्टीनंही ऐतिहासिक घटना होती. म्हणून तिथं राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेवर स्वातंत्र्याचे दीर्घकालीन परिणाम झाले. फाळणीनंतर तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून म्हणजेच आताच्या बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे लोंढे त्रिपुरात आले. कमालीचं दारिद्र्य घेऊन आलेल्या या लोकांमुळे त्रिपुराच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्यात रेल्वेमार्ग सुरु नाही. फाळणीच्यापूर्वी कोलकात्यापासून आगरतळ्यापर्यंतचं अंतर ३५० किलोमीटर होतं. कोलकात्याहून आगरतळ्याला येणारा रस्ता बांगलादेश मधून येत असल्यानं फाळणीनंतर तो बंद झाला. त्यामुळं आता कोलकात्याहून त्रिपुराला रस्तामार्गे यायचं असेल तर १७०० किलोमीटर अंतर पार करून यावं लागतं. रस्तामार्गे अंतर पांचपट वाढल्यानं आपोआप आगरतळ्याकडं देशातून येणारी वर्दळच कमी झाली आणि त्रिपुराचा पर्यटनदृष्ट्या विकास हवा तसा होऊ शकला नाही.

*त्रिपुरसुंदरीचं वास्तव्य*
ययाती वंशाचा ३९ वा राजा त्रिपुर याच्या नावावरुन त्रिपुरा हे नांव पडल्याचं सांगितलं जातं. परंतु दुसऱ्या एका संदर्भानुसार त्रिपुरसुंदरी या स्थानिक देवीच्या नावावरून त्रिपुरा हे नांव पडलं, असं मानलं जातं. आगरतळ्यापासून ५० किलोमीटर दूर असलेल्या उदयपूर येथील टेकडीवर त्रिपुरा मंदिर आहे हिंदुधर्मातील ५१ शक्तिपीठांपैकी एक म्हणून त्रिपुरसुंदरीचं मंदिर ओळखलं जातं. त्रिपुरा या नावसंदर्भात आणखी एक संदर्भ दिला जातो. इतिहास संशोधक कैलाश्चंद्र यांच्या म्हणण्यानुसार त्रिपुरा हा शब्द स्थानिक कोकबोरोक भाषेतील दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झालाय. 'त्वि' आणि 'प्रा' असे ते दोन शब्द. त्वि म्हणजे पाणी आणि प्रा म्हणजे निकट. प्राचीन काळी हा प्रदेश बंगालच्या खाडीच्या खूप निकटपर्यंत होता, म्हणून त्याचं नाव त्रिपुरा असं पडलं. कोणत्याही शहराच्या किंवा गावाच्या अशा दोन तीन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. लोक आपापल्या सोयीनं त्यातील एक स्वीकारत असतात. या न्यायानं आजच्या संदर्भात पाहिलं, तर 'त्रिपुरसंदरी' हे राज्यातलं प्रमुख देवस्थान आहे. आणि या देवस्थानावरूनच हे नांव पडलं असावं. असं मोठ्याप्रमाणात मानलं जातं.

*इथलं लोकजीवन, संस्कृती भिन्न*
त्रिपुराचा इतिहास खूप प्राचीन आहे. इथलं लोकजीवन आणि संस्कृतीही भिन्न स्वरूपाची आहे. काही पुराणकाव्यांमध्ये दिलेल्या संदर्भानुसार त्रिपुराच्या राजाला 'फा' या नावानं बोलावलं जातं. त्याचा अर्थ पिता असा होतो. १४ व्या शतकात बंगालच्या राज्यकर्त्यांनी त्रिपुराच्या राजाला मदत केल्याच्या नोंदीही आहेत. त्रिपुराच्या राजाला मोगलांच्या सातत्यानं होणाऱ्या आक्रमणालाही तोंड द्यावं लागत होतं. अनेक लढायांमध्ये त्रिपुराच्या राजांनी बंगालच्या सुलतानाला हरवलं होतं.

*ब्रिटिशांसारखी प्रशासकीय यंत्रणा*
एकोणिसाव्या शतकात महाराजा वीरचंद्र किशोर माणिक्य बहाद्दूर यांच्या कार्यकाळात आधुनिक त्रिपुराची पायाभरणी झाली, असं मानलं जातं. त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे आपल्या राज्यातील प्रशासकीय रचना केली. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी १९४९ पर्यंत त्रिपुरावर राज्य केलं. १५ ऑक्टोबर १९४९ रोजी त्रिपुराचा भारतात समावेश झाला. १९६३ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेत केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. आणि २१ जानेवारी १९७२ रोजी त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. त्रिपुरा सध्या चार जिल्हे, १७ विभाग, आणि ४० तालुक्यांमध्ये विभागलं गेलं आहे.

*निसर्गाची मुक्त उधळण*
घनदाट वनराईनं नटलेला समृद्ध जंगलांचा प्रदेश असलेल्या त्रिपुरामध्ये भ्रमंती करताना कोकणची आठवण आल्यावाचून राहत नाही. निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केली असली, तरीही मागासलेपणाच्या खुणाही ठळकपणे जाणवतात. भातशेती, नारळ-सुपारीच्या बागा, केळी-फणसाची झाडं इथं आहेत. शिवाय अनेक फुलझाडंही फुललेली दिसतात. बांबू हे इथलं खास उत्पादन असून रबर शेती, चहाचे मळे, टेकड्या आणि जंगलाने वेढलेला हा प्रसन्न प्रदेश मनात रुतून बसल्याशिवाय राहत नाही. आगरताळा हे राजधानीचं शहर असलं, तरी ते जुनाट किंवा उत्तरेतल्या एखाद्या मागास शहरासारखं वाटतं. सप्टेंबर ते मार्च हा पर्यटकांसाठी सर्वोत्तम हंगाम मानला जातो. १९ जमाती आपापल्या संस्कृतीचं जतन करून इथं गुण्यागोविंदानं राहतात. बंगाली, कोकबोरॉक आणि मणिपुरी या भाषा अधिक प्रमाणात बोलल्या जातात. मात्र हिंदीही सर्रास बोलली जाते. हिंदीचं वावडं कुणाला नाही.

*रवींद्रनाथांचं आवडतं स्थान*
रवींद्रनाथ टागोर त्रिपुराच्या प्रेमात पडले होते. इथल्या बांबूच्या वनातून येणारा वारा त्यांना साद घालत असे. या वाऱ्याचा प्रियसखा म्हणून ते त्रिपुरात येत. आगरतळयाचं सध्याचं राजभवन असलेल्या पुष्पावती पॅलेसमध्ये एक कक्ष रवींद्रनाथांच्या नावानं आहे. रवींद्रनाथ इथं येत तेव्हा या कक्षात उतरत असत. त्यांच्या अनेक रचनांची इथं झाल्याचं सांगितलं जातं. १९३० मध्ये महाराजा वीर विक्रम किशोर माणिक्य यांनी उन्हाळी वास्तव्यासाठी रुद्रसागर तलावात महाल बांधला. या महालाचं रवींद्रनाथानी नीरमहाल असं नामकरण केलं. या महालाला भेट देण्यासाठी होडीचा पण रमणीय प्रवास आहे. अनेक स्थलांतरित, रंगीबेरंगी पाणपक्षी या प्रवासात आपलं मन वेधून घेतात. १९०१ मध्ये महाराजा राधाकिशोर माणिक्य यांनी बांधलेला उज्जयंता पॅलेस हे या शहरातलं एक प्रेक्षणीय स्थळ आहे.

*सीमेवर लष्करी संचलन*
गोमतीच्या किनारी असलेल्या भुवनेश्वरी मंदिराचा रवींद्रनाथ टागोरांच्या कादंबऱ्यांमध्ये आणि नाटकात संदर्भ आहेत. सौंदर्याचा अप्रतिम नमुना असलेलं जगन्नाथ मंदिर पहातच राहावं वाटतं. कमळासागर तलावाच्या काठी कालीमातेचं मंदिर आहे. छोट्याशा टेकडीवर १५ व्या शतकात महाराजा धन्यमाणिक्यानं याची उभारणी केली. या कालिमातेला स्थानिक लोक कुसुबेश्वरी या नावानं ओळखतात. हे मंदिर बांगलादेश हद्दीजवळ आहे. बाजूच्याच शासकीय अतिथीगृहाच्या टेरेसवरून हाकेच्या अंतरावर असलेलं बांगलादेशातलं कोबरे हे रेल्वेस्टेशन दिसतं. ढाक्यातून चितगावला जाणारी रेल्वेगाडी भारतातून पाहायला मिळते. आगरतळयालाही भारत-बांगलादेश सीमा आहे आणि तिथंही वाघा बॉर्डरसारखं रोज संध्याकाळी लष्कराचं संचलन होत असतं. फक्त वाघा बॉर्डरसारखी इथं गर्दी नसते.

*डी. वाय. पाटील राज्यपाल होते*
असं देखणं पण शापित त्रिपुरा राज्य. ईशान्येकडील राज्ये अशांत म्हणून ओळखली जातात. परंतु ईशान्येकडे असूनही शांततेचे वारे वाहात असलेलं त्रिपुरा हे खूप वेगळं राज्य आहे. तसा असपन कधी त्रिपुराचा विचारच केला नसता, किंवा निवडणुकीसारखा अपवाद वगळता त्रिपुराची आठवण काढली नसती. परंतु मध्यंतरीच्या तीन वर्षे त्रिपुरा महाराष्ट्राशी जोडून होता तो राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यामुळे! यानिमित्तानं का होईना महाराष्ट्रातील जनतेला त्रिपुराची कायम आठवण राहील.

-हरीश केंची, ९४२२३१०६०९.

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...