Saturday 10 February 2018

राजकीय व्हॅलेन्टाईन...!

 *राजकीय 'व्हॅलेन्टाईन'....!*

*प्रेम म्हणजे प्रेम असतं।*
*तुमचं आमचं सेम असतं।।*
हे कवी मंगेश पाडगावकर यांची सर्वश्रुत कविता आहे. पण राजकारणात मात्र तसं :सेम नसतं'. ते व्यक्त करायचं कसं याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. राजकीय पक्षाची जशी प्रकृती तशी त्यांची पद्धत! हे सारं आठवायचं कारण नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जे सध्या तुरुंगात सडताहेत..त्या छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची भेट घेऊन भुजबळांची सुटका व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनवणी केली. आता प्रश्न असा निर्माण होतो की, राज यांच्याकडे कोणता अधिकार आहे की ज्यानं भुजबळांची सुटका होऊ शकेल! पण ही त्यासाठीची भेट दाखविली जात असली तरी यांत काही वेगळंच असावं अशी शंका येते. आगामी निवडणुकीसाठीची ही खलबतं तर नाहीत ना? अशी शंका येणं साहजिक आहे. भुजबळ यांच्याशिवाय शिवसेनेतून बाहेर पडलेले नारायण राणे, गणेश नाईक व इतर सध्या अस्वस्थ आहेत. या साऱ्यांची मोट बांधण्याच्या प्रक्रियेला ही सुरुवात तर नाही ना!
-------------------------–------------------

राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांचे पडघम वाजू लागलेत, मग प्रत्येक पक्षाकडून ‘मतदारसंघाची’ फ़ेरमांडणी सुरू होत असते. हा ‘मतदारसंघ’ कुठल्या एका उमेदवाराचा किंवा पक्षाचा नसतो, तर सत्ते़ची गणिते जुळवणारा मतदारसंघ असतो. म्हणजे जो समाज विविध समाजघटकात किंवा राजकीय गटात विभागलेला असतो, त्याचे तुकडे जोडून कुठली गोधडी शिवता येईल, त्याची चाचपणी सुरू होत असते. त्यात अर्थातच पराभूत वा नामोहरम झालेल्यांची मोठी गर्दी असते. प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीनं अनेक जुनी राजकीय समीकरणं उध्वस्त करून टाकलेली आहेत. गेल्या दोन दशकातल्या अनेक राजकीय गणितांचा बोर्‍या वाजवलेला आहे. साहजिकच त्या मांडणीला विचारधारा वा वैचारिक भूमिका असं नाव देऊन आपापले तंबू थाटुन बसलेल्यांना उघड्यावर पडण्याची वेळ आणली.

*नव्या सोयरिकीचे प्रयत्न*
 महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी वा बहुजन नेत्यांचे किंवा त्यांच्या समिकरणाचं तेच झालंय. त्याला आता साडेतीन चार वर्षे होत आली असून नव्या निवडणूक मोसमाचे वेध सर्वांनाच लागलेले आहेत. त्यातून नव्या सोयरिकी जमवण्याचेही प्रयत्न सुरू झालेत. त्याचाच एक भाग म्हणून भुजबळ समर्थकांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतलीय यादृष्टीनं त्याकडं बघणं भाग आहे. अशा भेटीगाठी सुरू झाल्या, म्हणजेच त्या त्या नेत्यांना आणि गटांना निवडणूकीचे वेध लागलेत म्हणून समजायला हरकत नाही. गेले २१ महिने तुरूंगात जामिनाच्या अभावी खितपत पडलेले छगन भुजबळ यांचा अपराध इतका भयंकर नाही, की त्यांना सुनावणीशिवाय गजाआड इतके दिवस डांबून ठेवायला हवंय, पण तसं झालंय. आणि कोणाला त्यांची फिकीरही उरलेली नाही. साहजिकच त्यांच्या ज्येष्ठ पक्षनेत्यांकडे पाठ फिरवून अशा समर्थकांनी आपापले प्रयास भुजबळ सुटकेसाठी आरंभलंय. याचा एक अर्थ भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांचा आता 'साहेबां'वर विश्वास उरलेला नसावा. भुजबळ 'प्रचंड निराशावादी' झाल्याची ही खुण असावी. असं दिसतंय.

*भुजबळ समर्थकांची राज भेट*
राज ठाकरेंची अशा भुजबळ समर्थक शिष्टमंडळानं घेतलेली भेट, म्हणूनच तितक्याच कारणास्तव असेल असे मानायचं कारण नाही. भुजबळ तुरूंगात खितपत पडल्यानं निराश आहेत, तसेच खुद्द राज ठाकरे गेल्या विविध निवडणूकीतल्या पराभवांनी मागं पडलेले आहेत. अर्थात अशा पराभवांनी निराश झाल्याची कुठलीही खुण त्यांनी आजवर दाखवलेली नाही. पण आरंभापासून त्यांच्या सोबत राहिलेल्या अनेक निष्ठावंतांनी साथ सोडल्यानं आणि मतदारांनीही काहीशी पाठ फिरवल्यानं राज प्रचलीत राजकारणात मागं पडलेले दिसताहेत. त्यातून त्यांना नव्याने सावरून उभं राहायचं आहे आणि भुजबळ यांना तर बंदीवासातून बाहेर पडायचंय. पण त्यांचा यथेच्छ राजकीय वापर करून घेतलेले शरद पवार त्यासाठी कुठलीही हालचाल करीत नाहीत. याची खात्री पटल्यावरच भुजबळांनी आपल्या समर्थकांना अन्य प्रयत्न करण्यासाठी बाहेर काढलेलं असावं.

*पवार, सुळेचे शब्द हवेत विरले*
पावणे दोन वर्षापुर्वी प्रथम भुजबळ यांना अटक झाली, तेव्हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी फोडलेल्या डरकाळ्या हवेत विरून गेल्या असून भुजबळांना त्यांचाच राष्ट्रवादी पक्ष पुरता विसरून गेलाय. पण भुजबळ असोत, गणेश नाईक असोत किंवा नारायण राणे असोत, हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आपला लढावू बाणा गमावून बसलेले नाहीत. त्यांना थोडी संधी मिळाली तरी पुन्हा उफाळून राजकारणात झेपावण्याची क्षमता त्यांच्यात उरलेली असते. त्याच भावनेतून भुजबळांनी आपले समर्थक मनसेच्या प्रमुखांकडे पाठवलेले नसतील, अशी हमी कोणी देऊ शकत नाही. शिवाय व्यंगचित्रकार म्हणून 'पंचलाईन'मध्ये भाष्य करणार्‍या राज यांचं त्याविषयीचे विधानही तसं ‘भूमिका’ स्पष्ट करणारंच आहे. त्यांनी 'भुजबळ छोडो आंदोलन' हा शब्दप्रयोग योजला हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसर्‍या बाजूला त्याचा अर्थ भुजबळ -मनसे जोडो  असाही काढला जाऊ शकेल. तशी शक्यताही राजकारणात वेगळा संदर्भ देखील निर्माण करू शकेल.

*राज यांचा करिश्मा कायम*
नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक अशा अनेक तरूणांना बाळासाहेबांनी उचलून थेट लढाईच्या रणांगणात सोडलेलं होतं. पाठीशी नुसते बाळासाहेब आहेत, इतक्या बळावरच या तरूणांनी मैदान गाजवलेलं होतं. आपल्या पाठीशी पक्षप्रमुख ठामपणे उभा असला, तर कुठलंही मैदान मारायला धडक देऊन पुढाकार घेणार्‍यात अशा नेत्यांची गणना होत असते. खुद्द राज ठाकरेही त्याला अपवाद नाहीत. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर कुठलाही नाव घेण्यासारखा नेता हाताशी नसताना राज यांनी आलेल्या प्रत्येक  निवडणूकीत जाणत्यांचे डोळे दिपवणारी झेप घेतली होती. राज्यातील एक स्वयंभू नेता म्हणून मजल मारलेली होती. मध्यंतरीच्या मोदीलाटेनं त्यांचाही धुव्वा उडालेला असला म्हणून त्यांची किमया संपली, असं कोणी समजण्याचे कारण नाही.

*तिसरा पर्याय निर्माण होईल*
राज यांच्याबरोबर, भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक शिवसेनेचं हे त्रिकुट मुसंडी मारण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि राज यांच्या सोबत भुजबळ वा राणे यांनी हातमिळवणी करायची ठरवली, तर महाराष्ट्रामध्ये भाजपा व शिवसेना यांच्या पलिकडे तिसरा मजबूत पर्याय उभा राहू शकतो. मरगळलेली काँग्रेस आणि दिशा हरवून बसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांच्या निष्क्रीयतेनं राजकारणात विरोधी पक्षाच्या जागेसाठी मोठी पोकळी निर्माण करून ठेवलेली आहे. ती भरून काढणारा कोणी राजकीय पक्ष समोर येण्याच्या प्रतिक्षेत लोकही आहेत.

*भुजबळ:ओबीसी चेहरा*
राजनी मनावर घेतले तर 'भुजबळ छोडो' हा मोठा राजकीय मुद्दा होऊ शकतो आणि त्यातून वेगळ्याच राजकीय समिकरणाला महाराष्ट्रात आरंभ होऊ शकतो. कारण आजही भुजबळ हाच महाराष्ट्रातला 'ओबीसी चेहरा' आहे आणि त्याच भुजबळांचा तुरूंगवास हा राज्यव्यापी कळीचा मुद्दा करणं सोपे काम आहे. त्यात मनसे व भुजबळ समर्थक उतरले, तर राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांना आपला ओबीसी मतदारसंघ आवाक्यात राखणं अशक्य होईल. पण हा जरतरचा विषय आहे आणि तो या दोन्ही गटांच्या मनात आहे किंवा नाही, याची आज तरी तशी कोणी हमी देऊ शकत नाही.

*राणे:दुखावलेला जखमी वाघ*
दुसरीकडं नारायण राणे यांची भाजपाच्या बोटचेप्या डावपेचांनी कोंडी करून टाकलेली आहे. तोही दुखावलेला जखमी वाघ या विषयात उडी घेऊन पुढे आला, तर मराठी राजकारणाला वेगळे वळण लागण्यास हरकत नाही. या तिन्ही राजकीय नेत्यांना आजतरी गमावण्यासारखे काही नाही. विधानसभा असो वा लोकसभा, पालिका असोत की विविध स्थानिय संस्था असोत. त्यात या तिन्ही नेत्यांना गमावण्यासारखे काहीच नाही. पण वेगवेगळे त्यांचे विखुरलेले राजकीय बळ व इच्छाशक्ती एकत्र आली, तर मोठा राजकीय धमाका व्हायला वेळ लागणार नाही. अर्थात त्यांचे रसायन जुळायला व एकजीव व्हायला, काही अवधी द्यावा लागेल. कारण नुसती आघाडी करून चालणार नाही, तर त्यांनी एक पक्ष व एक भूमिका म्हणून एकत्र यायला हवंय.

*राजकीय जुळणी होईल?*
लोकसभेच्या निवडणुकांना अजून १५ महिने शिल्लक आहेत आणि विधानसभेला २० महिने बाकी आहेत. जुन्या शिवसैनिकांची अशी जुळणी यशस्वी व्हायला पुरेसा अवधी आहे. म्हणूनच अचानक भुजबळ समर्थक कृष्णकुंजावर पोहोचण्याला राजकीय अर्थ असू शकतो. भुजबळांना विचारल्याशिवाय समर्थक असं  काही पाऊल उचलण्याची बिलकुल शक्यता नाही आणि 'भुजबळ छोडो' हे राजचे शब्द सुचक आहेत. त्यातच राणे यांची घालमेल भर ठरायला वेळ लागणार नाही. आज विरोधी राजकारणात जी मोठी पोकळी तयार झाली आहे, ती भरून काढण्याची धडपड शरद पवार करीत आहेत. पण वय व प्रकृती त्यांच्या विरोधात आहे आणि अनेक गटात विखुरलेली विरोधी शक्ती एकत्र करण्याची क्षमता त्यांच्यापाशी उरलेली नाही. भुजबळांनाही त्याची जाणीव झालेली असल्याखेरीज त्यांनी असा पवित्रा घेतलेला नसावा. राज, भुजबळ, नाईक आणि राणे यांनी एकत्र येण्याची कल्पना जरी मांडली गेली, तरी मराठी राजकारणात भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्या दिशेनं पाऊल उचलण्यासाठी वेळ फार कमी शिल्लक उरलाय, हेही विसरता कामा नये.

*...तर राजकीय भूकंप!*
शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या शिवसैनिकांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. पण त्या साऱ्यांनी आपापल्या भागात कामाचा दबदबा कायम राखला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेविरोधात लोकांची नाराजी दिवसेंदिवस वाढती आहे. ही नाराजी निवडणुकांपर्यंत आणखी वाढेल. याची चाहूल लागल्यानं आता भाजपला आपणच पर्याय देऊ शकतो अशा अविर्भावात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप-बहुजन, हे विरोधीपक्ष म्हणून सरसावले आहेत. शिवसेनेनं सत्तेत राहून चालवलेली विरोधीपक्षांची भूमिका लोकांच्या पचनी पडत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची अद्याप आपण विरोधीपक्ष आहोत, सत्ताधारी नाही, हे मानायला ते तयारच नाहीत. भीमा-कोरेगाव प्रकरणी झालेल्या बंदमुळे आता आपणच सुप्रीमो बनलो आहोत असं प्रकाश आंबेडकर यांना वाटू लागलंय. हे जरी असलं तरी आज राज्यात विरोधीपक्ष म्हणून कुणी अस्तित्वातच नाही. ही मोठी पोकळी आहे. अशावेळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिवसैनिकांनी जर राज ठाकरे यांच्याबरोबर येऊन ही पोकळी भरून काढली तर महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण तयार होईल. आणि भाजपला आव्हान देणारी ताकद उभी राहील.

-हरीश केंची
९४२२३१०६०९.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...