Monday, 12 February 2018

हे खरे व्हॅलेंटाईन...!

*हे खरे व्हॅलेन्टाईन....!*

*को* णत्याही प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती डोळे असूनही आंधल्याप्रमाणे वागू लागते. मग ती नशा सत्तेची असो, संपत्तीची असो, धर्माची असो वा कामाची असो! म्हणूनच 'सत्तांध', 'धर्माध', कामांध, असे शब्द भाषेत रूढ झाले. 'प्रेम आंधळे असते' असे वचन सर्रास प्रचारात आले. पण प्रेमीजनांना ते कधीही मान्य होणार नाही. त्यांचे म्हणणे असे की, उत्कट प्रेमात गुरफटलेली व्यक्ती सरळधोपट मार्गाने जाण्याचा रुक्ष व्यवहाराकडे पाठ फिरविते. म्हणूनच व्यवहार पंडितांना ती आंधळी वाटत असावी; पण वस्तुस्थिती अशी आहे की, प्रेमात पडलेली माणसं सामान्यजनांच्या दृष्टीने अंध बनत असली, तरी त्यांना असामान्य दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते. त्यामुळेच प्रेमाची उंच-सखल नि काटेरी वाटही ते हसतमुखाने आक्रमू शकतात! जगाची नजर चुकवून मिलनाची नशा कशी लुटावी, अनेक अडथळे लीलया ओलांडून इष्काची मंजिल कशी गाठावी, ह्याबाबतच्या साऱ्या चोरवाटा प्रणयीजीवांना सहज दिसतात.

लग जा गलेसे, ताब अब।
अय नाजनीं नहीं।
है है खुदा के वासतें।
मत कर नही हैं।।
अशा बेफाम इशकबाज  कविता लिहीणार्या जुअरतला आंधळ्यांचे सोंग घेण्याची युक्ती सुचविणारे प्रेम आंधळे असते, असं कोण म्हणेल? आणि आता तर प्रेमाला अंधत्वाची बाधा होऊच शकत नाही हे सिद्ध करणारा आंधळ्यांचा प्रेमविवाह नुकताच संपन्न झाला.

त्या ह्या दिव्यदृष्टीमुळेच! सागराच्या प्रेमाने धुंद झालेली नि प्रणयाच्या महापुराने ओसंडून वाहणारी नदी आंधळी असावी, असे आपणास वाटते; पण नाही. मार्गात उभ्या ठाकलेल्या धिप्पाड पहाडांना कधी युक्तीने फोडून तर कधी शिताफीने वळसा घालून, अनेक वळणे घेऊन ती अखेर सागरालाच मिळते. हा प्रेमाच्या दिव्य दृष्टीचाच प्रभाव! अहो, फार काय सांगावे, आंधळ्यांचे सोंग घेऊन इश्कची सुरत लुटायला लावणारी बिलंदर दृष्टी ही प्रीतीच्या कैफातच प्राप्त होते. ह्याबाबत 'भावबंधन' मधील महेश्वराचे, कामण्णाचे उदाहरण आपल्या परिचयाचेच आहे. ह्या कामण्णांचा गुरू शोभावा असा एक शायर उर्दूत होऊन गेला. त्याचे नांव शेख कलंदर बख्श जुअरत. (१७३० ते १८१०). हा मूळचा दिल्लीचा. पण त्याच्या उत्तान शृंगारिक आणि चावट गझलांची कीर्ती लवकरच लखनौ रसिक नि विलासी अमीर-उमरावीत पसरली. तरुण वयातच हा रंगीला शायर लखनौत आला आणि तो संगीतनिपुण असल्याने त्यांच्या रंगेल गझल गायनाचा सर्वत्र बोलबाला झाला. अशा या काळात नवाबांच्या जनानखान्यातून अनिर्बंध संचार करायला मिळावा आणि विलासी लावण्यवतींचे सौंदर्य नि:संकोच पहावयास आणि हाताळावयासही मिळावं, या लोभापायी जुरअत  'आपले डोळे गेले' अशी खोटीच हुल उठवून दिली. मग काय, गरीब नि गुणी आंधळा म्हणून तो जनानखान्यात ठाण मांडून बसू लागला. पुढे त्याचे हे बिंग फुटले, हा भाग निराळा. पण परमेश्वराची करणी पहा कशी, तो काही दिवसाने खरोखरच आंधळा झाला!

रामकृष्ण आणि सुशीला हे अंध युवक युवती यांचा हा विवाह केवळ प्रेमविवाहच नव्हे, तर आंतरजातीय विवाह होय! रामकृष्णाने अंधशाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि लॉटरीची तिकिटे विकण्यास प्रारंभ केला. तोच त्याच्या प्रारब्धाची लॉटरी खुलली. तो या अंध युवतीचा प्रेमात पडला. ब्रेल लिपीतून तिला प्रणयपत्रे लिहू लागला. 'माझी होशील का?' असा त्याने सवाल विचारला आणि मग सुशिलेने त्याला होकारार्थी जवाब दिला. जातीपातीचे बंधने ओलांडणाऱ्या या अंध युगुलांचे प्रेम आंधळे आहे, असं कोण म्हणेल? जातीयतेचा विरोधात घोषणा करणाऱ्या हजारो डोळसांना जे साधले नाही ते या अंधांनी साधले. हे आंधळे प्रेमीजन जातीधर्मापलीकडे असलेली मानवता पाहू शकले! मग डोळे नसूनही ते अधिक डोळस होते असंच म्हणणं योग्य नाही काय? 'प्रेम आंधळं असतं' ह्या भ्रमाचा भोपळा ह्या अंध युगुलाने सहज फोडला! आंधळ्यांचे प्रेम अधिक उच्च दर्जाचे असणे क्रमप्राप्त आहे. कारण 'लव्ह ऐट फर्स्ट साईट' असं ते असूच शकत नाही. ते बहिरंगावर अवलंबून नसते. आपली प्रिया चंद्रमुखी आहे की रुद्रमुखी आहे? ती मीनाक्षी आहे की हरिणाक्षी? तिचा केशविलाप काळाभोर आहे की पिंगट? तिला नथ खुलून दिसते की चमकी? तिचा बांधा नऊवारीत अधिक खुलतो की पाचवारीत? लुंगी कुडत्यात, सलवार कमीजमध्ये की बेलबोटम जीन्समध्ये? हे अंध प्रियकराला कसे कळणार? आणि अंध प्रेयसीला प्रियकराचे रंगरूप आकलन होणं शक्यच नसतं. तो काळा सावळा असला काय अन गोरागोमटा असला काय, तिला त्या बाह्यरंगाचे ज्ञान अशक्यच! म्हणूनच अंध युगुलांचे प्रेम बाह्यरंगावर नव्हे, तर अंतरंगावर अधिक आधारलेले असणार! केवळ स्पर्शानं जी काही शरीरसौंदर्याची कल्पना करता येणं शक्य आहे. तेवढंच अंधजनांच्या हाती असतं. कारण चर्मचक्षूंना ते पारखे झालेले असतात. आंधळेपणाचे, चर्मचक्षूंच्या अभावाने अनेक तोटे असले तरी हा एक फायदाच म्हणावा लागेल की, 'उप्परकी टामटूम' नव्हे तर 'अंदरका राम' च अंधजनांना अधिक लक्षात घ्यावा लागतो. देहापेक्षा हृदयाचे सौंदर्याच अनुभवाच्या चक्षूंनी आकलन करावं लागतं! साहजिकच त्यांची दृष्टी बाह्य जगताकडून आंतरिक मनोव्यापाराकडे अधिक वळते.ते अधिक अंतर्मुख होतात आणि मग अशा अंधजनांना ह्या जगातील अंधारात खरेखुरे प्रेमच मार्गदर्शन करू शकते. 'प्रेमभावे जीव जगी या नटला' हे सनातन सत्य कोणत्याही ऐक्यापेक्षा अधिक उत्कटतेने परत असावं. हमदर्दीने ओथंबलेल्या, दुसऱ्याच्या दुःखाने कळवळणाऱ्या सहानभूतीने काठोकाठ भरलेल्या शुद्ध प्रेमाची अंधांना अतीव आवश्यकता असते आणि म्हणून त्यांनाच अशा प्रेमाची महती अधिक कळते. 'प्रेम' ना वसे बहिरंगी हे सांगण्याची त्यांना आवश्यकता उरत नाही.

- हरीश केंची
९४२२३१०६०९
फोटो प्रतिकात्मक आहे.
नावे बदलली आहेत

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...