Wednesday, 14 February 2018

बाबा, रिटायर कधी होता?

*बाबा रिटायर कधी होणार?*

*'आ* ई रिटायर होते' असं एक नाटक मराठी रंगभूमीवर खूप चाललं होतं. भक्तीचा हा प्रभाव होता. म्हणजे भक्ती बर्वे आणि मराठी माणसाची मातृभक्ती. 'नाटक छान होतं. खूप खूप रडायला येतं,' असं कौतुकानं सांगणारा उदंड प्रेक्षक असल्यावर कुठलीही आई थोडंफार यश पदरात बांधून घेणारच! या 'आई रिटायर होते' नाटकावर मला काही लिहायचं नाही, पण एक बाबा आता रिटायर का होत नाहीत? असा प्रश्न मला सतत पडतो. बरंच कर्तृत्व गाजवून झालंय, मुलं विविध क्षेत्रात नावांजली, आपल्या विचारानं आचार करू लागली. परिवार चांगला फळफळला, पण बाबांना स्वस्थ बसवत नाही. आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रम सांगितलाय. बाबा मात्र उगाचच बाळसं आल्यासारखं दाखवत मुलांच्याच पायात लुडबुड करत आहेत. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवार याबद्धल म्हणतोय.

*दुहेरी निष्ठेचा खेळ सुरू आहे*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाच्या मार्गातली अडचण बनली आहे. रा.स्व. संघाला भारतीय जनता पक्षाकडून राजनीती संघ विचारानुसार राबविली जात नाही असं वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उघडपणे राजकारणात प्रवेश करावा. जरूर तर भाजपच्या सध्याच्या सर्व नेत्यांना 'रिटायर' करून आपल्या नेत्यांना त्यांच्या जागी बसवावे. हा काठावर बसून उपदेश आणि उपद्व्याप करण्याचा प्रकार आता पुरे झाला. अर्थात आपण नामानिराळे राहून आपल्याला जे हवं ते आपल्याच परिवारातल्या अन्य मंडळींकडून करून घेण्याचे हे राजकारण असण्याची शक्यता आहे. संघ नेहमीच असा 'दुहेरी निष्ठे'चे डाव आजवर खेळत आलाय. एकीकडे उदारता-समरसता दाखवायची, दुसरीकडे कट्टरता आणि कर्मठता कुरवाळायची. स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणत केरसुणीसारखी वापरण्याचा प्रकार हा यातलाच. संघ या अशा करणीने बदनाम झालाय म्हणूनच वेगवेगळी रूपं घेऊन लोकांपुढं येण्याची आणि संघाबरोबरचे संघटन दडवून वावरण्याची जरुरी त्याला भासली. समरसता मंच, वनवासी कल्याण, बजरंग दल हे बुरखे कशासाठी? विश्व हिंदू परिषद, स्वदेशी मंच ही सोंगे का? भारतीय जनता पक्ष तरी कशासाठी?

*गुरुजींनी युवाशक्ती कुजविली*
सत्ता राबवणं हे सत्ता मिळवण्यापेक्षा अवघड असतं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींना उमजलेलं नाही. प्रत्येक गोष्टीत 'तिथं आम्ही होतो' असं बऱ्याच काळानंतर म्हणण्याची चतुराई आता लोकांना उमजली आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जी संघटना उभी केली गेली ती कधी स्वातंत्र्य आंदोलनात उतरलीच नाही. संघटना म्हणून हा इतिहास आहे. सावरकरांना मानणारे सर्वस्व उधळून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. महात्मा गांधींनी काँग्रेसद्वारा सामान्यातल्या सामान्यांपर्यंत स्वातंत्र्यलढा पोहोचविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नुसताच दंड हाताळत बसला. अनेक स्वयंसेवकांनी आपल्याला योग्य वाटेल त्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, पण संघटना म्हणून संघ कधीही स्वातंत्र्यलढ्यात नव्हता. त्यांची तयारीच चालली होती. स्वातंत्र्यानंतर संघ बदलेल असं वाटलं होतं. काही मूल्य संघाने हजारो तरुणांत निश्चितच रुजविली होती पण गोळवलकर गुरुजींच्या काळात संघाने युवाशक्ती कुजविली. अनेक तरुणांनी संघाचे ऋण मानत संघापासून वेगळं होऊन संघविचार पुढं नेण्याचे प्रयत्न केले. ते लोकमान्य झाल्याचे दिसल्यावर त्यावर नेहमीप्रमाणे हक्क सांगायला संघधुरीण पुढं सरसावले.

*संघामुळे भाजप सांप्रदायिक*
आज भारतीय जनता पक्षाला जे काही यश प्राप्त झालं आहे, त्यामध्ये संघाचा काही वाटा निश्चित आहे, पण केवळ संघामुळेच हे यश या भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे असे मानता येणार नाही. साधूसंन्यासी आणि कर्मठता मानणाऱ्या हिंदूंना आवरण्याचा, अल्पसंख्यांकांचा मनात विश्वास निर्माण करण्याचा, निदान त्यांच्या मनातला अविश्वास कमी करता येईल असा एक धोरण म्हणून प्रयत्न आजही सत्ताधारी भाजपकडून होत नाही. भाजप सांप्रदायिक आहे. असा समज होण्याला संघाचे हे असले विविध उद्योगच कारणीभूत आहेत. यापूर्वी केंद्रीय सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी जे विविध पक्ष एकत्र आले होते ते सारे कुठल्या मुद्द्यांवर एकत्र आले? याचा विचार संघ नेतृत्वाने करायला हवा. पण असा विचार करण्याऐवजी भाजपला नको त्या फंदात गुंतवण्याचा उद्योगच संघ करतो आहे.

*काही मंडळी निष्कारण फुरफुरतात*
भारतीय जनता पक्षानं देशभरात अनेकांशी जमवून घेतलं आहे. तिहेरी तलाक, रामजन्मभूमीचे विषय हाताळते आहे. पण संघाचं नेतृत्व आणि काही मंडळीं निष्कारण फुरफुरत असतात. भाजप आणि मुस्लीम-दलित यांच्यात तेढ निर्माण व्हावी अशी आगंतुक वक्तव्य केली जातात. काँग्रेसनं आजवर मुसलमानांपुढं लोटांगणवृत्ती पत्करली असं संघाला वाटत असेल, पण संघ ज्या तऱ्हेनं मुसलमानांचा प्रश्न सोडवू बघतो त्यानं हा प्रश्न अधिकच चिघळणार आहे. भाजपनं अल्पसंख्यकांचा प्रश्न उदारतेने सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी आपल्याबरोबर असलेल्या अल्पसंख्याकांना स्वाभिमानपूर्वक, सन्मानपूर्वक काम करू द्यायला हवे. त्यांचा विचार घेऊन धोरणं ठरवायला हवीत. मात्र संघाचं नेतृत्व आणि स्वयंसेवक गोरक्षा, लव्हजिहाद अशा बाबत अत्यंत उन्मादक होत असल्याचं दिसतं.

*संघ'प्रेमीं'चे नको ते उद्योग*
महाराष्ट्रात संघाचा विरोध असताना महाजन-मुंढे यांच्या आग्रहानं शिवसेनेबरोबर जाण्याचं धाडस भाजपनं केलं म्हणूनच सत्तेपर्यंत पोहोचणे भाजपला शक्य झाले. पंजाबात अकाली दलाबरोबर जाण्याचं धाडस भाजपनं केलं होतं म्हणूनच पंजाबात भाजप सत्तेपर्यंत गेला होता. उत्तरप्रदेशातही कांशीराम-मायावती बरोबर तेच घडवलं. हे संघ करू शकला नसता. संघानं जे काही केलं त्याची फळं गुजरातेत भाजपला भोगावी लागलीत. राजस्थानात आणि दिल्लीत असेच नको ते करण्याचा उद्योग संघ'प्रेमी' करत आहेत. संघाचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय विपरीत असं वक्तव्य करताना दिसतात. यातून जे निष्पन्न होईल ते निस्तरावं लागेल ते भाजपच्या नेत्यांनाच!

*विविध संस्थानं विलीन करा*
संघानं आपले काही उद्योग आवरायलाच हवेत. विश्व हिंदू परिषदेत हिंदुधर्माच्या एकता-समता आणण्यासाठी खूप काही करण्याजोगे आहे. आहेत ती मंदिरे भक्ताला दर्शन घ्यावे वाटण्याइतपत चांगलं ठेवायचं काम जरी या परिषदेनं केलं तरी ३३ कोटी देव प्रसन्न होतील.  देवळांचा बाजारच नव्हे, अक्षरशः उकिरडा करण्याचं पुण्यकर्म सध्या अनेक ठिकाणी चालू आहे. उद्योगपती बिर्ला आपली मंदिरे जशी ठेवतात तशी सर्व मंदिरे ठेवण्यासाठी काही करणं विश्व हिंदू परिषदेला का जमत नाही? सर्व हिंदूंना सुटसुटीतपणे धर्मकृत्ये करता येण्यासाठी काही नियम एकमताने करण्याचा आणि सर्वसामान्य माणसालाही धर्माबद्धल अभिमान, आपलेपणा वाटेल असे 'धर्मकार्य' करून समाज मानस जोडण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषदेला का करता येत नाही? राजकारणातच नाक खुपसण्यात या परिषदेला उत्साह का वाटतो? संघानं यावर विचार करावा. नाना रूपाने उभी केलेली संस्थाने विलीन करावीत. भाजपला सर्व भारतीयांचा  विश्वास मिळवण्यात यश मिळेल ह्यासाठी आपल्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा कसा उपयोग करता येईल हे बघावे. संघानं आपलं तारुण्य स्वप्नात घालवलं, आता नव्वदाव्या वर्षी काही करून दाखविण्याची उबळ येऊन काय उपयोग!

*आता याला काय म्हणावं....!*
संघाच्या नेतृत्वाला भाजपच्या कारभारात खोडा घालायचा असतो. मोदी आणि शहा हे स्वयंसेवक असले तरी आज सर्वसत्ताधीश आहेत. सत्ता भाजपच्या हाती आली ती मोदीं यांच्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. पण संघाला हे मान्य नाही. आमच्यामुळेच सत्ता आलीय असं संघाचं म्हणणं. पण जिथे अर्ध्या चड्डीतून फुलपँट मध्ये यायला संघाला ९० वर्षे लागली. सत्ता मिळवणं तर दूरच राहिलं. या वैयक्तिक असूयेपोटी नेमके निवडणुकांच्या काळातच असं काही वक्तव्य ही मंडळी करतात की त्यांना निस्तरता निस्तरता नाकी नऊ येतात. बिहारच्या निवडणुकीत असंच 'मागासवर्गीयांच्या राखीव जागांबाबत पुनर्विचार करावा लागेल!' या वक्तव्यानं बिहारची सत्ता गेली. आता कर्नाटकच्या निवडणुका होताहेत, भाजपेयींनी त्या जिंकाव्यात म्हणून चंग बांधलाय, मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांच्या लष्करातील जवानांबाबत केलेल्या वक्तव्याने भाजपेयींवर देशभरातून टीकेचा भडीमार होतोय. स्वतः भागवत झेड प्लस बंदोबस्तात फिरत असतात त्यासाठी संघ स्वयंसेवक नाहीतर शिपाईच लागतात. तेव्हा तीन दिवसात स्वयंसेवक लष्करी सैनिक बनतील, तर यासाठी इतरांना सहा महिने लागतील हे म्हणणं किती पोकळ आहे हे दिसून येतं. त्यांचं हे वागणं म्हणजे म्हातार चळ दुसरं काय...!

*'थंडीतलं एक उबदार स्वप्न...!*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी त्यांच्या मर्मभेदी व्यंगचित्रांनं संघाच्या या बेताल वक्तव्यावर नेमकं बोट ठेवलंय. 'थंडीतलं एक उबदार स्वप्न' त्यांनी रेखाटलंय. ठाकरी परंपरेतील ह्या व्यंगचित्रानं अवघं सोशल मीडियातलं विश्व व्यापून टाकलंय. याच्या मथळ्यात काहीतरी चुकल्याचं जाणवतंय. पण राज ठाकरे यांचे हे फटकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि भाजपेयींना बसताहेत. लोकांच्या मनातल्या भावनाच या व्यंगचित्रातून व्यक्त होताहेत. प्रत्येक जण हेच म्हणतोय...'मला हेच म्हणायचं होतं!'

-हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

  1. आदरणीय केंची साहेब,
    राजकीय मुद्दे, खुमासदार शैलीत मांडण्यात, आपला हातखंडा आहे..!

    ReplyDelete

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...