Saturday 6 July 2024

शठ्यम प्रती शाठ्यम् ......!

"शठ्यम प्रती शाठ्यम् ......! हा जो मथळा या लेखाला दिलाय, ती संस्कृतमधली म्हण आहे. जशास तसं उत्तर देणं असा त्याचा अर्थ! नुकत्याच झालेल्या लोकसभा अधिवेशनात भाषणांची जुगलबंदी होईल असं वाटलं होतं. काही प्रमाणात ते झालंही. पण त्यात बाजी मारली ती राहुल गांधींनी! मोदींनी मात्र राहुलच्या चौफेर आरोपांवर, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्याऐवजी काँग्रेस आणि राहुल यांच्यावर व्यक्तिगत आक्रमक हल्ला चढवला. लोकसभेच्या या द्वंद्वात आगामी काळ अधिक टोकदार होईल असं चित्र निर्माण झालंय, हे मात्र निश्चित!"
------------------------------------------------
*भा* जपला जर  ४००हून अधिक जागा मिळाल्या असत्या तर मोदींचं प्रभामंडल म्हणजे ऑरा काही वेगळाच असता. तो ऑरा आता राहिलेला नाही. भाजपच्या धोरणांत, वागण्यात काहीही बदल झालेला नाही. त्यांच्या डोक्यात त्यांची 'कॅन्टीन्युटी' रुंजी घालतेय. ते 'एनडीएचं सरकार' असं जरी सांगत असले तरी सरकारातली महत्वाची खाती भाजपकडंच आहेत. यावरून दिसेल की, २०१९ पासून सुरू असलेलं सरकारचं पुढं सुरूय. मोदी आणि भाजपनं संदेश दिलाय की, आम्ही वाकलेलो, झुकलेलो नाही, तर आम्ही तुम्हाला वाकवू! राज्यसभेत मोदींनी 'भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही!' असा इशारा देतानाच 'आम्ही ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांना मोकळीक दिलीय,...!' याची आठवण करून दिलीय. संख्याबळ कमी झालं असलं तरी आम्ही कमकुवत झालोत असं नाही. आम्ही आमचं राजकारण बदलू, धोरण बदलू असं होणार नाही. हा संदेशही त्यांनी विरोधकांना दिला. म्हणजे भाजपच्या धोरणात, प्रशासकीय कामकाजात काहीही बदल होणार नाही हे स्पष्ट आहे. निवडणुकीत राममंदिर, मोदींची गॅरंटी असं नेरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो चालला नाही. मग नंतर त्यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि 'संविधान बदला'चा मुद्दा काढला. तो त्यांच्या अंगाशी आला. हेच नेरेटीव्ह मग काँग्रेसनं सेट केला, तो त्यांना कमालीचा फायदेशीर ठरला. त्यांच्या इंडिया आघाडीला २३६ जागा मिळाल्या, सरकार बनवता आलं नाही. पण गेल्या दहा वर्षात विरोधकांचं जे खच्चीकरण झालं होतं, त्यानं ते हतोत्साही झाले होते. आता ताकद मिळाली असताना जर मजबुतीनं ते ठाम उभे राहिले नाहीत तर मात्र भाजप त्यांना आणखी दाबून टाकेल, हे लक्षांत आल्यानं ते आक्रमक बनलेत. महाराष्ट्राबरोबरच हरियाणा आणि झारखंड इथल्या विधानसभेच्या निवडणुका होताहेत. पुढच्या वर्षी बिहारच्या निवडणुका आहेत. इथं काय घडतंय यावर भाजप आणि काँग्रेसचा आगामी काळ कसा असेल हे दिसून येईल. मोदी यांना वास्तवाचं भान आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करा, राग धरा वा विरोध करा. ते तसं दाखवणार नाहीत. पण राजकीय वारे कुठे वाहताहेत हे ते चांगलंच जाणतात. एक आधिक एक म्हणजे दोन नाही, तर अकरा होऊ शकतात, हे ते घडवू शकतात. मित्रपक्षाला एखादं पद देताना माझ्या पक्षाला, मला त्याचा काय फायदा होऊ शकतो हे त्यांच्या डोक्यात पक्कं असतं. ते त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसतंही. सत्तेत टिकून राहण्यासाठी जे काही करावं लागतं ते सारं काही ते करतात. कारण त्यांचं डोकं हे व्यावसायिक असल्यानं, सतत निवडणुकांच्या मानसिकतेत असल्यानं ते तसं चालतात. त्यांना जागा कमी मिळाल्या असल्या तरी त्यांनी सत्तेसाठी जे अन् जसं घडवलंय, नितीशकुमार, चंद्राबाबूना सोबत घेऊन सरकार बनवलंय, यावरून विरोधक कितीही आक्रमक झाले तरी ते बॅकफुटवर जातील असं काही होणार नाही. ते वैतागलेले, दबावाखाली येतील असंही नाही. गरज पडली तर स्वत:मध्ये बदल करून सत्ता टिकवणारा हा माणूस आहे. 
तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते बनलेले राहुल गांधी हे पाचव्यांदा खासदार आहेत. गेल्या दहा वर्षांत भाजपनं अगदी जाणीवपूर्वक राहुलना पप्पू म्हणून हिणवण्याचा, कमी लेखण्याचा, टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनातून त्यांची प्रतिमा डागाळेल, ती कशी कमी करता येईल यासाठी सारे फंडे अवलंबिले. पण राहूलनं त्या परिस्थितीवर मात करून आपण एक सक्षम जबाबदार नेते आहोत हे दाखवून दिलंय. भारत जोडो यात्रेमुळे त्यांना जनमानस कळलं असावं त्यामुळं एक परिपक्व नेता म्हणून ते समोर आल्याचं जाणवतं. तरीही त्यांच्या पहिल्या पदयात्रेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं नाही. त्यामुळं ही भारत जोडो यात्रा वाया गेली असं वाटलं होतं पण दुसऱ्या पदयात्रेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यश लाभलंय हे आपण पाहतोय. त्यांनी जागा वाटपात दुय्यम भूमिका घेतली, इंडिया आघाडी तयार केली. लोकांनी त्यांना प्रचारात आणि मतांमध्ये जो काही प्रतिसाद दिलाय त्यावरून त्यांचा आत्मविश्वास वाढलेला, परावर्तित झालेला दिसतोय. लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी ज्या तडफेनं बाजू मांडली याचं कौतुक करायलाच हवं. कारण आजवर त्यांनी पक्षात कायमच दुय्यम भूमिका घेतलेली होती. आता मात्र केवळ काँग्रेसचेच नव्हे तर इंडिया आघाडीचे आपण नेते आहोत हे त्यांनी सक्षमपणे दाखवून दिलंय. यापुढं त्याची खरी कसोटी लागणारंय. इंडिया आघाडीला कसे एकसंघ ठेऊ शकतात? पक्ष संघटना कसं चालवतात. आगामी विधानसभा निवडणुकांतून सशक्त भाजपला टक्कर देत कसं यश मिळवतात यावर त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. भाजपच्या मुद्द्यांवर, नेरेटिव्हवर कसं मात करतात यावर त्यांचं राजकीय स्पेस कशी असेल हे ठरेल! लोकसभेतल्या पहिल्या भाषणात त्यांनी काँग्रेस जनांना, इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना, विरोधकांना देखील एक आशावादी नेतृत्व, सक्षम विरोधी पक्षनेता असेल हे दाखवून दिलंय! असो, आता आपण संसदेच्या पहिल्या अधिवेशनात काय घडलं ते पाहू.
प्रधानमंत्री आणि विरोधीपक्ष नेता यांच्या भाषणांची मीमांसा करायची झाली तर वक्त्याचं भाषण, त्याचा विषय, भाषाशैली आणि प्रस्तुतीकरण या मुद्द्यांवर करावं लागेल. या तीन निकषांवर पाहिलं तर त्या दोघांत जमीन अस्मानचा फरक दिसलाय. राहूल गांधी प्रथमच विरोधीपक्ष नेता म्हणून संसदेला संबोधित करत होते. त्यांनी त्यांची भूमिका योग्यपणे बजावलीय. मीमांसाच्या तीनही निकषांवर ते संतुलित होतं. हिंदुत्वाच्या विषयावर जेव्हा प्रधानमंत्री उठून उभे राहिले तेव्हा त्यांनी लगेचच त्यांना प्रत्युत्तर दिलं. स्पष्टीकरण दिलं. प्रधानमंत्र्यांच्या भाषणात आदमखोर एनिमल, मुंहपर लहू लग जाता है, काँग्रेसके मुंह खून लग गया है, श्राप, तबाह, संविधान सरपर रखकर नाच रहे है, ड्रामा, तमाचा, गालिया, चोर, चोरी, अरे मौसी, परजीवी, आंख मारते है, तुमसे ना हो पायेगा, आणि बालक बुद्धी...! हे शब्द मोदींची निराशा, हताशा आणि अस्वस्थता दर्शवणारी होती. कदाचित अंधभक्तांना यात वैगुण्य आढळणार नाही, पण सर्वसामान्यांना हे लगेचच जाणवेल. प्रभावहीन असं ते भाषण होतं. त्यांनी झूठ हा असंसदीय शब्द किमान ३५-४० वेळा वापरलाय. लोकशाहीची जननी म्हणवणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्र्यांनी संसदेत केलेलं  गरिमाहीन, स्तरहीन, उथळ, भाषण हे सशक्त, स्वस्थ लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. सभागृहाची परंपरा, गरिमा, नियम, संकेत, परंपरा याची राहुलना सतत आठवण करून देणारे लोकसभाध्यक्ष बिर्ला मोदींना मात्र त्यांनी कितीही खालच्या दर्जाची, हीन भाषा, पदाची प्रतिष्ठा कमी करणारे शब्द वापरले तरी रोखलं नाही. उलट ते त्यांच्याकडं अगदी आशाळभूत नजरेनं पाहत होते. जणू ते आपल्या देवताचं प्रवचन ऐकताहेत. मात्र जेव्हा विरोधकांकडं पाहत, तेव्हा ते विकारक दृष्टीनं पाहत. बिर्ला यांची भूमिका स्पष्टपणे सत्तान्मुख दिसत होती. राहूल जेव्हा एखादा आरोप करत तेव्हा त्यांच्याकडं सत्यापन म्हणजे त्यासाठीचा पुरावा मागत. मोदींनी भाषणात शोले सिनेमाचे डायलॉग ऐकवले. मौसीच्या माध्यमातून जे सांगितलं त्याचा ते कोणता पुरावा देऊ शकतात? लहान मुलाची गोष्ट दोन, तीनदा ऐकवली, त्याला कुणी कुणी मारलं, त्याला ९९ मार्क मिळाले. याचा ते काय सत्यापन देऊ शकतात. त्यांनी जे अनेक आरोप केलेत त्याचा पुरावा काय, ते सत्यापन देऊ शकणार नाहीत. ही सारं जुमलाबाजी समजू या. पण मोदींनी एक अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसवर केलाय, ज्याच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या हेडलाईन्स बनल्या. 'स्वातंत्र्यानंतर, १९४७ नंतर काँग्रेसनं जल, स्थल, नभ सैन्य दलाचं मनोबल कमी करण्याचं, ते कमजोर करण्याचं काम केलंय...!'  ज्या भारतीय सेनेनं पाकिस्तानचे दोन तुकडे केले, तीन वेळा झालेल्या युद्धात पाकिस्तानला नमवलं. तिथं तिरंगा फडकवला. त्यांच्यावर सैन्य कमजोर करण्याचा आरोप करणं कितपत योग्य आहे. जगातली सर्वात मोठी शरणागती, समर्पण भारतीय सैन्यानं पाकिस्तानला करायला लावलं होतं आणि बांगला देशाची निर्मिती केली. अटलजींच्या कार्यकाळात कारगिल युद्धही जिंकलं. सैन्य कमजोर कोण कशाला करील? काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोपही त्यांनी केला. २०१४ पूर्वी जे घोटाळे झाले, ते सिद्ध झालेत का? कोणाला सजा झालीय का? डीएमकेच्या राजा यांनी आपल्या भाषणात याचा पर्दाफाश केला. २०१४ नंतर नोटबंदी, इलेक्टोरल बॉण्ड्स चे घोटाळे झालेत जे सुप्रीम कोर्टानं रद्द केले. सरकारवर नामुष्की ओढवली. त्यात कसे कोणाकडून पैसे घेतले आणि ठेके दिले, 'चंदा दो धंदा लो...!' असं घडवून आणलं. तपास यंत्रणांची भीती दाखवून देणग्या मिळवल्या. हा भ्रष्टाचार नाही का? मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत, ४ जून पूर्वी प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी लोकांना शेअर खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. ज्यामुळे ३० लाख कोटी रुपयाचं नुकसान सर्वसामान्यांना सोसावं लागलं. असा आरोप केला. हा देखील भ्रष्टाचारच! पण यांना कोण जाब विचारणार? आणखी एक, पंडित नेहरू यांचा आरक्षणाला विरोध होता. असा शोध त्यांनी लावला. दुसरं डॉ.आंबेडकरांना काँग्रेसनं निवडणुकीत हरवलं. आंबेडकर हे काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवत होते. मग त्यांच्या विरोधात काँग्रेस प्रचार करणारच. हिंदू महासभा, जनसंघ यांनी तरी कुठे त्यांना पाठींबा दिला होता? असं तथ्यहीन आरोप ते करत होते. खरं तर त्यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या  अभिभाषणावर बोलणं अभिप्रेत होतं. राहुलनं केलेल्या आरोपांना उत्तर द्यायला हवं होतं. अडीच तासाच्या भाषणात राष्ट्रपतींच्या भाषणावर ते केवळ दोन मिनिटंच बोलले. मणिपूरवर तर ते काही बोललेच नाहीत. नीट परीक्षा पेपरफुटी एका वाक्यात संपवलं. मणिपूरच्या सदस्याला एक मिनिट तरी बोलू द्यावं अशी मागणी करत इंडिया आघाडीचे सदस्य घोषणा देत होते, पण त्यांना बोलू दिलं नाही. उलट त्यांच्यावरच बिर्ला डाफरले. प्रधानमंत्र्यांचं भाषण हे तर्कहीन, उथळ, तथ्यहीन आपल्या पदाला न शोभणारं होतं, अशी नोंद संसदीय इतिहासात लिहिली जाईल. नेहरूपासून अटलजींपर्यंत, नरसिंह रावांपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाहून एक विद्वान प्रधानमंत्री यांची भाषणं देशानं ऐकली आहेत पण अशी जुमलेबाजी कधी कुणी केली नाही. सुशिक्षित, पाचवेळा खासदार राहिलेल्या विरोधीपक्ष नेत्यांची टिंगल टवाळी केली. संसदीय लोकशाहीत त्यांची एक वेगळी प्रतिमा, गरिमा, सन्मान आहे, त्याला बालबुद्धी, बालकबुद्धी म्हणत ट्रोलसारखी भाषा वापरत प्रधानमंत्री बोलू शकत नाहीत. त्यांचं भाषण हे एका अंधभक्ताच्या ट्रोलसारखी होतं. 
'नेता प्रतिपक्ष...!' विरोधी पक्षनेता काय असतो हे राहूल यांनी दाखवून दिलं. राहूलनं सरकारला धो धो धुतलं. राहूल म्हणाले, 'नरेंद्र मोदी, आरएसएस, बीजेपी म्हणजे हिंदू समाज नाही. बीजेपीला हिंदुत्वाचा ठेका दिलेला नाही. हिंदू समाज शांतता प्रिय आहे, हिंसा, नफरत आणि दहशत भाजपनं पसरविलेलीय...!' असं म्हटलं. अग्निवीर योजनेबद्दल राहूलनं सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, नोटबंदी ही करोडपतींसाठी होती हे ठणकावून सांगितलं. मणिपूरमध्ये 'सिव्हिल वॉर' सुरू करून मोदींनी त्याकडं दुर्लक्ष केलंय. ते मणिपूरला का गेले नाहीत? काय मणिपूर भारताचा भाग नाही का? हा सवालही त्यांनी ऐकवला. एक एक मुद्दा घेऊन राहूल सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत राहिले. राहूल याचं भाषण अभ्यासपूर्ण होतं, भाषणात आवेष, आक्रमकता होती आणि मोदींनी गेली दहा वर्षे ज्या मनमानी पद्धतीनं देश, सरकार चालवलं त्याबद्दल संताप होता. राहूल यांचा एक एक शब्द भात्यातून निघणाऱ्या बाणासारखा होता. त्यानं सत्ताधारी घायाळ होत होते. राहूल भाषण करीत असताना मोदींनी दोनदा, अमित शहांनी तीनदा, राजनाथसिंह यांनी दोनदा टोकलं, अडथळे आणले. मोदी उभे राहून अडथळा आणत असतानाचं दृश्य तर अद्भूत होतं. यातून त्यांची अस्वस्थता दिसत होती. मोदी कायम विरोधी पक्षाची टिंगल टवाळी करत आलेत. मात्र आज उभे राहून ते म्हणाले, 'लोकतंत्र और संविधानने मुझे सिखाया है की, विपक्ष के नेता को गंभीरता से लेना चाहिए..!' हा त्यांच्यातला बदल लक्षणीय आहे. राहूलनं  मोदींमध्ये हे परिवर्तन घडवून आणलंय. भक्तांना काहीही वाटो, पण राहूल लोकसभेत 'छा गये थे!' जे लोक मोदींना ईश्वराचा अवतार मानतात आणि अमित शाह यांना देशातली सर्वात ताकदवान 'महाशक्ती' मानतात त्यांना राहुल यांचं आक्रमक भाषण ऐकतांना काळजाला टोचल्यागत वाटलं असेल, स्वाभाविक आहे. भाषणादरम्यान अगतिक होऊन मोदींचं अचानक उभं राहणं आणि राहुलच्या भाषणातला हिंदूत्वाचा विषय भरकटत घेऊन जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं. एवढेच नाही तर अमित शहाचं हतबल होऊन सभापतिकडं 'हमे संरक्षित कीजिये' अशी विनंती करणं. राहुलनं भाषण थांबबावं, यासाठी प्रयत्न करणं. सारंच अद्भुत होतं! 
भाषणादरम्यान मोदी अकरा वेळा पाणी प्याले. बाकी भाषणात नवं काहीच नव्हतं. त्यांनी ७० वर्षात काँग्रेसनं कसं काहीच केलं नाही, अन आम्ही दहा वर्षात सारं कसं केलं. हे सांगताना ते थकले नाहीत. पण प्रथमच त्यांच्या भाषणात "राम" नव्हता तर 'जय जगन्नाथ' होता!काँग्रेसचा भ्रष्टाचार, अल्पसंख्यांकांचं तुष्टीकरण, काँग्रेस काळात देश कसा निराश झाला होता अन् 'इस देश का अब कुछ नही हो सकता...!' असं वातावरण झालं होतं, २०१५ पुर्वी आतंकवादी हल्ले व्हायचे, काश्मीर धुमसत होतं. काँग्रेस सलग तीन वेळा शंभर जागाही कशी मिळू शकली नाही. आणीबाणी, हिंदूंचा अपमान, हिंदूंना हिंसाचारी म्हणणं वगैरे. अपेक्षेप्रमाणे मोदी मणिपूर, शेतकऱ्यांचे प्रश्न, अग्निवीरबाबत बोललेच नाहीत. राहूल यांचे आरोप खोडले नाहीत, बेरोजगारी, महागाईनं होणारी होरपळ त्यांना आठवली नाही. नेहमीप्रमाणे मुळ मुद्याला बगल देत, अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर नेण्याचं स्वप्न दाखवायला मात्र ते विसरले नाहीत. त्याचा रोड मॅप काही सांगितला नाही. त्यांनी एकदाही राहूलचं नाव घेतलं नाही, किंवा त्यांचा विरोधीपक्ष नेता असाही उल्लेख त्यांनी केला नाही. कॉंग्रेसचा परजिवी असा उल्लेख करताना आपणही अल्पमतात आहोत, नितीशकुमार आणि चंद्राबाबूंच्या कुबड्यावर आपलं सरकार आहे हे ते विसरले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला कसा कौल मिळाला, मतांची टक्केवारी कशी वाढली हे सांगत आत्मसमाधान मानलं. काँग्रेसनं खटाखट साडे आठ हजार रूपये खात्यावर टाकले नाहीत हे सांगताना मोदी हे विसरले की, त्यांनी १० वर्षांपुर्वी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रूपये टाकण्याचा वादा केला होता. काँग्रेसबरोबर जे पक्ष जातात ते संपतात असा आरोप केला, पण भाजपनं हिंदू महासभा, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, अकाली दल, शिवसेना, राष्ट्रवादी आणि नुकतंच बीजु जनता दल असे अनेक प्रादेशिक पक्ष कसे संपविलेत यावर भाष्य केलं नाही. संपूर्ण भाषण विसंगतींनी भरलेलं होतं. भाषणात नेहमीचा आवेष नव्हता. आत्मविश्वास नव्हता. विरोधीपक्ष नेत्यांपेक्षा आपण जास्त वेळ बोललो ह्यासाठी विनाकारण भाषण लांबवलं. राहूलच्या भाषणानं आलेली अस्वस्थत: मोदींच्या भाषणात दिसत होती. प्रथमच विरोधक मोदींच्या भाषणाच्या वेळी आक्रमक दिसले. मग मोदींनीही विरोधकांवर कडक कारवाई करण्याचा "आदेश" ओम बिर्ला यांना दिलाच. 'ये तो सिर्फ ट्रेलर है, पुरा पिक्चर अभी बाकी है...!' अशी धमकी निवडणूक प्रचारात मोदींनी दिली होती. त्याचं प्रत्यंतर दिसून आलंय. तेव्हा पिक्चर सुरू झालाय...!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...