Friday 19 July 2024

संघ भाजपची नुरा कुस्ती

"आज भाजपच्या प्रांतिक कार्यकारिणीची पुण्यात चिंतन बैठक होतेय. त्याला अमित शहा अन् केंद्रीय नेते सहभागी होताहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पराभवाची कारणमीमांसा, विधानसभेसाठी व्यूहरचना ठरविण्यात येणार आहे. याशिवाय संघ विचारानं प्रेरित असलेल्या ऑर्गनाईझर आणि विवेक साप्ताहिकाने केलेली टीका यावरही विचारमंथन होईल. त्यांनी टीका केली असली तरी ते केवळ दाखविण्यापुरतं आहे. त्यांच्यातली ही कुस्ती ही नूरा कुस्ती आहे. ती केवळ लोकरंजनासाठी केली जातेय! संघ स्वयंसेवकांनी पूर्वीप्रमाणेच कामं केलीत. यापुढंही ते करतील. ते नाराज वगैरे नाहीत. अपेक्षित यश, सत्ता मिळत असेल अन् मोक्याच्या जागा हाती येत असतील तर ते का नाराज होतील?"
__________________________________
*लो* कसभेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं नाही. सत्ता मिळाली पण संख्या घटली. मोदींचा प्रभाव कमी झालाय असं दिसून आल्यानंतर संघाशी संबंधित प्रसिद्धीमाध्यमांनी आपला आवाज करायला सुरुवात केलीय. सर्वात जास्त अपयश झोंबलं ते उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातलं! त्यामुळं गेल्या दहा वर्षातल्या 'मोदी आणि कंपनीचा कारभार, कार्यपद्धती ' याचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न चालवलाय. मोदींना थेट लक्ष्य करण्याऐवजी नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सरसंघचालक मोहन भागवत यांची अलीकडची भाषणं पाहिली तर आपल्याला हे सहज लक्षांत येऊ शकेल. संघाचं मुख्यालय नागपुरात, महाराष्ट्रात असल्यानं तिथलं अपयश संघाला डाचणारा ठरलाय म्हणून त्यांचा तिळपापड झालाय. त्यामुळं इंग्रजी ऑर्गनाईझर आणि मराठी विवेक साप्ताहिकाने भाजप नेतृत्वावर टीकेची झोड उठवलीय. या दोन्ही साप्ताहिकांचा एकूण सूर हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांशी केलेल्या युतीच्या विरोधात दिसून आला. भाजपचा नैसर्गिक साथीदार असलेल्या शिवसेनेच्या फुटीर गटाशी युती करून सत्ता स्थापन केली याचं संघाला जसं कौतुक होतं तेवढाच तिरस्कार आणि राग हा अजित पवारांशी केलेल्या युतीसंदर्भात होता. कारण अगदी आठ दिवसांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या टीमवर भ्रष्टाचाराचा आरोप खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भोपाळच्या जाहीर सभेत केला होता. राज्य सहकारी बँक आणि सिंचन प्रकल्पात हा ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप निवडणूक प्रचारादरम्यान केला होता. त्यानंतर लगेचच आठ दिवसात कोणतीही गरज नसताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेतलं गेलं. हे संघ स्वयंसेवकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपप्रेमी मतदारांना आवडलं नाही त्याचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणूकीतल्या अपयशावर झाला. असा काहीसा सुर हा या दोन्ही ऑर्गनाईझर आणि विवेक साप्ताहिकांचा होता. अर्थातच त्याचा परिणाम भाजपच्या नेतृत्वावर झाला, असं म्हणण्याचं वा समजण्याचं काही कारण नाही. हे संघाचं वर्तन काही नवं नाही. यश मिळालं तर आमच्यामुळे आणि अपयश आलं तर तुमच्यामुळे असं म्हणण्याची त्यांची जुनी परंपरा आहे. संघ पुढच्या वर्षी शताब्दी साजरा करणार आहे. गेली १०-१५ वर्ष सोडली तर त्यापूर्वी जवळपास ८०-८५ वर्षे मुख्यालय नागपुरात महाराष्ट्रात असतानाही संघ-भाजपला महाराष्ट्रात यश मिळालेलं नव्हतं. त्यांचा विचार हा पुरोगामी महाराष्ट्रानं स्वीकारलेला नव्हता. किंबहुना त्यांना मराठी माणसानं दूर ठेवलं होतं. पण प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती केली. शेठजी आणि भटजी यांच्यापर्यंत मर्यादित असलेला विचार हा शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून, त्यांच्या माध्यमातून थेट महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या बहुजन समाजापर्यंत नेला. हे त्यांचे उपकार असतानाही भाजपनं नेतृत्व बदल झाल्यानंतर त्याचं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर घाला घातला. त्यांची शकलं केली. हे मराठी माणसाला रूचलं नाही, पचलं नाही. तेव्हा संघानं चुप्पी साधली होती. साधी नाराजी व्यक्त केली नव्हती. मात्र अपयश पदरात पडताच अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीकेचा भडिमार करायला सुरुवात केलीय. भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्यासाठी केलेली ही खेळी होती असंच इथल्या मतदारांचं मत बनलंय. भाजप अजित राष्ट्रवादीला दूर करणार नाही. उलट मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी घट्ट मैत्री कायम ठेवील. शिवाय शिवसेनेच्या फुटीर गटाशीही सौख्य कायम ठेवील. सध्या ज्या चिंतन बैठका होताहेत त्यातून हेच प्रतिबिंबित होतंय. कारण १०५ आमदार असलेल्या भाजपच्या नेतृत्वाऐवजी केवळ ४० आमदार असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्धार भाजपनं केलाय! हे कशाचं द्योतक आहे? हे सारा महाराष्ट्र जाणतो. आपल्या साप्ताहिकांतून संघानं टीका केलेली  असली तरी भाजप नेतृत्वानं ते गांभीर्यानं फारसं घेतलेलं दिसत नाही. कारण कालपरवापर्यंत राज्यातल्या विविध जिल्ह्यातून आणि मुंबईत झालेल्या प्रांतिक कार्यकारिणीच्या चिंतन बैठकांनंतर आता राज्यस्तरीय चिंतन बैठक पुण्यात म्हाळुंगे बालवाडीतल्या स्टेडियमवर आज होतेय. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची नेतेमंडळी येणार आहेत. खुद्द गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दारूण पराभव झालेल्या भाजपचे पुण्यात आज रविवारी २१ जुलैला अधिवेशन भरणार आहे. महाळुंग्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात भरणाऱ्या या अधिवेशनाला मोदींच्या मंत्रिमंडळासह राज्यातले भाजपचे सारेच बडे नेते हजेरी लावणार आहेत. भाजपनं या अधिवेशनाचे दणक्यात 'इव्हेंट' करायचं ठरवलंय. याला अधिवेशन 'चिंतन' बैठक असं नाव दिले असलं, तरी त्यात निवडणुकीत पडझडीवर 'चिंतन' होण्याची शक्यता अधिक आहे. मग हे 'चिंतन' ग्रँड 'इव्हेंट' व्हावा याकरिता पुण्यातल्या नव्या दमाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रचंड ताकद लावलीय. दरम्यान, 'चिंतन' बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून शहरभर 'बॅनर'बाजी केलीय. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत. 'चिंतन' बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातले सर्व खासदार, आमदार, शहर आणि जिल्हाप्रमुख सहभागी होताहेत. विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतल्या निकालामुळे भाजपच्या विरोधकांच्या ताकद वाढलीय. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचं महाविकास आघाडीचं तगडं आव्हान असणार आहे. राज्यातल्या बदललेली राजकीय परिस्थिती, भाजपविरोधी पक्षांची झालेली एकजूट, लोकसभा निवडणुकीतला धक्कादायक निकाल लक्षात घेता विधनसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्यादृष्टीनं या बैठकीत व्यूहरचना आखली जाणार आहे. ऑर्गनायझर आणि विवेक नियतकालिकानं भाजपची ब्रॅण्ड व्हॅल्यू, अजित पवारांनी कमी केल्याची टीका आताच का केली आहे? अजित पवारांना सरकारमध्ये शपथ घेण्याआधी गप्प का बसले होते? अजित पवार लोकसभा निवडणुकीत चांगले चालले असते आणि भाजपचा फायदा झाला असता तर, ऑर्गनायझरने टीका केली असती काय? एकट्या अजित पवारांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे पापाचे वाटेकरी नाहीत काय? संघाच्या मुखपत्राचं खरं दुखणं हे आहे की, संघाला दहशतवादी संघटना म्हटलं होतं. त्याचा राग आता निघतोय. पण अजित पवार फायद्याचे ठरले असते तर, याची वाच्यताही केली नसती आणि रागही व्यक्त केला नसता. उपयुक्तता संपली, की फेकून द्यायचं. बलराज मधोक, सिकंदर बख्ट, यांच्यापासून लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशीं अशी अनेक उदाहरणं देता येतील. जर पक्षाच्या फाऊंडर नेत्यांची ही अवस्था तर कोण अजित पवार आणि कोण राज ठाकरे? ऑर्गनायझर या संघाच्या नियतकालिकानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गदारोळ उडवून दिलाय. त्याआधी मोहन भागवत यांनी 'मणिपूर घटने'ला शिलगावलं होतं. नव्या सरकारनं शपथविधी उरकला. विशेष लोकसभा अधिवेशनात नव्यानं निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधीही झाला. केंद्रात सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. अखेरचं निवडणुकीपूर्वीचं विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. भाजपनं आपले केंद्रीय प्रभारी बदललेत. त्यांचं चिंतन बैठका सुरू होत्या. 
दुसरं म्हणजे, पक्षाच्या थिंक टँकनं मुख्यत्वे राज्याची तयार केलेली रोडमॅपचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतलाय, केंद्रीय नेतृत्वानं यात लक्ष घातलंय, स्थानिक पक्षनेतृत्वाचं दोषांचं विश्लेषण करण्यासाठी आयोजित केलेल्या राज्याच्या भाजपशी संबंधित सदस्य, त्यांनी निष्कर्ष काढला की केंद्रीय नेतृत्व हे नुकत्याच जबाबदार पक्षाचं अपयशी घटक होतं. "केंद्रातून स्क्रिप्ट आलीय. आमची भूमिका फक्त ती अक्षरश: अमलात आणण्याची होती. आम्ही देखील मोदी घटक झालो आणि स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष केलं...!" असे भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं. आता आपल्या केडरमध्ये विश्वाससंचय आणि केडरमध्ये 'संवाद आणि समन्वय पुनर्निर्माण' यावर लक्ष केंद्रित करत आहे. सर्व निर्णय महिलाशी सल्लामसलत न करता केडरवर लादले जातात. भाजपच्या कोर्स करेक्शन चा एक भाग म्हणून, पक्षाचे नेते सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांना भेट देतील आणि त्यांच्या खराब प्रदर्शनाची कारणे शोधून काढतील आणि भविष्यासाठी कृती आराखडा देखील तयार करतील. सूत्रांनी सांगितलं की, पक्ष आपल्या रणनीतीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पुढील महिन्यात आणखी एक बैठक घेणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला तगडे आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची जाणीव करून देण्यात केलीय. सर्व आघाड्यांवरच्या समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना आधीच केल्या गेल्या पाहिजेत. संघटन, आघाड्यांशी संबंधित समस्या सोडविल्या जाताहेत.  विधानसभा निवडणुक निर्दोष बनवू आणि एक टीम म्हणून काम करू, असा विश्वास व्यक्त केलाय. १०५ आमदारांसह २८८ सदस्यीय विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही, पक्षाच्या नेत्यांना याची जाणीव आहे की, त्याच्या युती भागीदारांसोबत जागावाटप हा अवघड मुद्दा आहे. महायुतीत फूट पडल्याने भाजपला आणखी पिछाडीवर पडेल याची जाणीव पक्षनेतृत्वाला असल्यानं शिंदे आणि अजित यांच्याशी बोलणी करण्यास भाजप तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर, भाजप अभ्यासक्रम दुरुस्त करण्यासाठी झटतोय. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत महायुतीच्या भागीदारांशी चर्चा करण्यापूर्वी राज्य भाजप प्रथम आपलं घर व्यवस्थित करू पाहतेय. भाजपनं आपलं वर्चस्व पुनर्संचयित केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-सत्ताधारी महायुतीतल्या आपल्या भागीदारांशी चर्चा करून स्वत: आधी स्वत:चं घर मजबूत ठेवण्याचा आणि अंतर्गत कलह सोडवण्याचा निर्णय घेण्यात येईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश असलेली विरोधी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत महायुतीला तगडे आव्हान देण्याच्या तयारी भाजपनं केलीय. सर्व आघाड्यांवरील समस्या ओळखून त्याचं निराकरण करण्यासाठी उपाययोजना आधीच केल्या आहेत. 'संघटन, आघाड्यांशी संबंधित समस्या सोडविल्या जाताहेत विधानसभा निवडणुक निर्दोष बनवू आणि एक टीम म्हणून काम करू, असा निर्धार व्यक्त केलाय. १०५ आमदारांसह २८८ सदस्यीय विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही, पक्षाच्या नेत्यांना याची जाणीव आहे की, त्याच्या युती भागीदारांसोबत जागावाटप हा अवघड मुद्दा आहे. महायुतीत फूट पडल्यानं भाजपला आणखी पिछाडीवर पडेल याची जाणीव पक्ष नेतृत्वाला असल्यानं शिंदे आणि अजित यांच्याशी बोलणी करण्यास भाजप तयार असल्याच सूत्रांनी सांगितलं. काही सुधारात्मक उपाय आम्हाला परत येण्यास मदत करतील. प्रत्येक पक्ष आपल्या चुकांमधून धडा घेत असतो. जर आम्ही आमच्या मूळ मतांच्या आधाराच्या ३% ज्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमव्हीएला अनुकूलता दर्शविली होती, ती बळकट करण्याच्या दिशेनं काम केलं तर आम्ही विधानसभा निवडणुकीत स्वीप करू शकतो, असा दावा भाजपच्या आणखी एका वरिष्ठ नेत्यानं केलाय. आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' ठरू शकतात. भाजप दणक्यात परत येईल, असा विश्वास व्यक्त करून पुढील आव्हानं आपल्याला तगड्या मार्गावर चालण्यास भाग पाडतील.
संघ भाजपची मातृ संघटना असल्यानं त्यांचा भाजपवर प्रभाव असणं स्वाभाविकच आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींवर टीका करताना नुकतंच सुपरमॅन, अवतारी पुरुष अशी टीका केलीय. त्याचा असा अर्थ होता की, ही माझी सेना आहे आणि मीच नियंत्रक आहे. सर्वांना शिस्तीत राहावं लागेल. कारण अशीही भीती आहे की, आज निर्माण झालेली ऊर्जा पाहता, अयोध्येसारखं इतर ठिकाणीही घडलं तर त्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवलं कठीण होईल. भागवत यांना असं म्हणायचंय की, ठरल्यानुसार कार्यक्रम सांगावं आणि कार्यकर्त्यांनी तेवढंच करावं. सांस्कृतिक पुनरुत्थानबद्दल जे बोलत आहेत ते स्वतःच मशीद आणि मजारींच्या नावावर आपसांत भिडायला नको. आज कार्यकर्त्यांवर तर संघाचं नियंत्रण आहे. त्याबद्दल कुणालाही गैरसमज असता कामा नये. संघाचा प्रत्येक शब्द तर वाजपेयीही ऐकत नव्हते, पण स्क्रिप्ट त्यांच्याकडूनच येत होती. सर्वांची भूमिका आधीच ठरलेली असायची. आज मात्र मोदी तसं काही करत नाहीत पण संघाला जे अपेक्षित असतं ते विनासायास ते करत असल्यानं संघाला हस्तक्षेप करायची गरजच पडत नाही! इंद्रश कुमार यांनीही जी काही मतं व्यक्त केली त्यालाही भाजपच्या पातळीवर विशेष महत्व दिलेलं नाही. लोकसभा निवडणूक दरम्यान भाजप पक्षाध्यक्ष नड्डा यांनी आता 'आम्ही सक्षम झालो आहोत. जेव्हा अक्षम होतो तेव्हा संघाची आम्हाला गरज होती. आतावती राहिलेली नाही!' असं म्हटल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नव्हती. मोदी आणि अमित शहा हे संघ स्वयंसेवक असतानाही नड्डा यांनी असं म्हणणं हे स्वयंस्फुर्तीने नाही तर नड्डा यांच्या या वक्तव्याला त्यांची मूक संमती असली पाहिजे. लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्याने आजवर मतप्रदर्शन न करणारे संघाचे नेते भाजपच्या प्रचार यंत्रणेवर टीका करताहेत. खरंतर संघाच्या घटनेनुसार संघ एक सांस्कृतिक संघटना आहे. राजकारणात आम्ही ढवळाढवळ करत नाही असं मत त्यांनी यापूर्वी व्यक्त केलं होतं. संघावर जेव्हा बंदी घालण्यात आली होती त्यावेळी संघाकडे लिखित घटना नव्हती. ती लिहायला सरकारनं भाग पाडलं. त्यानंतर घटना लिहिली गेलीय. त्यात त्यांनी हे स्पष्ट केलंय. त्यामुळं आज संघाचं भाजपवर होणारं मतप्रदर्शन हे संघाच्या घटनेच्या विरोधातच आहे, असं म्हणता येईल. शिवाय भाजपच्या संघटना सचिव हे संघातूनच नेमले जातात. त्यामुळं राजकारणही त्यांचा हस्तक्षेप असतोच. महाराष्ट्रातल्या राजकारणावर त्यांचं बोलणं हे अपेक्षितच होतं. त्यासाठी अजित पवारांना लक्ष्य करणं गैर आहे. कारण अजित पवारांचा समावेश हा त्यांच्याच संमतीने झालेला होता. केवळ शरद पवारांना पराभूत करण्यासाठीच त्यांचा वापर करायचा असा त्यांचा डाव होता. हे चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं हे आपल्याला आठवतच असेल. त्यासाठीच अजित पवारांना त्यांच्या बायकोला निवडणूक लढवायला भाग पाडलं गेलं. आणि पराभूत झाल्यावर त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं. यातच सारं आलं. त्यामुळं आता अजित पवारांवर सुरू असलेली कोल्हेकुई ही अवाजवी वाटते. केवळ लोकांना दाखविण्यासाठी असं वक्तव्य करून संघ  यापासून दूर आहे. भाजपवरील टीका केली तरी त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे केवळ मी मारल्या सारखं करतो तू रडल्यासारखं कर अशातला हा प्रकार. ही त्यांच्यातली नूरा कुस्ती दुसरं काय?
हरीश केंची
९४२२३१०६०९.






No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...