Thursday 4 July 2024

ऑर्गनायझर, भाजप आणि मनसे...!

"मनसे आता पुन्हा मराठी मतदारांना आवाहन करीत असेल तर फसेल. मराठी तरुण बेरोजगार आहे, पण अजून इतका विवेक गमावला नाही, की तो विध्वंसक कृतीला ओ देईल. राज ठाकरे यांच्याकडं नेतृत्व, वक्तृत्व हे गुण असूनही ते सतत "टूल" म्हणून वापरले जातात. त्यांचं व्यक्तीमत्व हे इतर कोणत्याही नेत्यापेक्षा उजवं आहे. तरुणांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे, तरीही संघटनेला संसदीय राजकारणात अपयश का येतं? याचं आत्मपरीक्षण करावंच लागेल...!" 
---------------------------------------------
ऑर्गनायझर या संघाच्या नियतकालिकानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गदारोळ उडवून दिलाय. त्याआधी मोहन भागवत यांनी 'मणिपूर घटने'ला शिलगावलं होतं. नव्या सरकारनं शपथविधी उरकला. विशेष लोकसभा अधिवेशनात नव्यानं निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधीही झाला. केंद्रात सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. अखेरचं निवडणुकीपूर्वीचं विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. भाजपनं आपले केंद्रीय प्रभारी बदललेत. त्यांचं चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. उध्दव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेतली. मनसे नेते राज ठाकरे यांनीही मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यांनी तर लोकसभा निवडणुकी आधीच नेत्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असं सांगितलं होतं. त्यावर आज 'एकला चलो रे...!' यावर शिक्कामोर्तब झालंय. ठाकरे यांनी मोदी-शहांवर टीका करताना इतरांचं पक्ष फोडल्याची कृती मतदारांना आवडलं नसल्याचं सांगितलं. मनसे हे इंजिन इंधनाअभावी रुतून बसलंय. जागेवरुन हलेना, नाटकात पडदा हलवून चित्र पळत असल्याचा भास निर्माण केला जातो. तसं राज ठाकरे दर एका निवडणूकीला कोणाची तरी बाजू घेतात आणि आम्ही रेसमध्ये आहोत, असा आव आणतात. गाडीतल्या गाडीत धावून मुक्कामाच्या ठिकाणी पोचता येत नाही. त्यासाठी इंजिनच पळायला हवं. २०१९ साली मोदी-शहांवर तोंडसुख घेणारे, 'लाव रे तो व्हिडिओ..!' राज ठाकरे यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीनं वापरून घेतलं होतं. ते कष्ट गिळून राज यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. प्रचारही केला होता. तरीही त्यांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस किंवा नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन ठाकरे यांना निमंत्रण देणं आवश्यक होतं. परंतु महाराष्ट्रातला भाजपचा पराभव जिव्हारी लागलेल्या मोदी-शहांना वाटलं असावं की, ठाकरे यांची उपयुक्तता संपलीय. मनसे सल्लागार प्रकाश महाजन यांनी फारच सौम्य प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महाजन यांची गम्मत आहे. ते कधी म्हणतात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. तर कधी म्हणतात सेना-मनसेचं नेतृत्व राज ठाकरे यांनी करावं. राज ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. चिडून, चवताळून आपलंच नुकसान होतं. राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना मराठी मतदारांनी मतदान केलं नव्हतं. मोदी विरोधी मतदान त्यांना झालं होतं, असं म्हटलं. याचा अर्थ मोदीविरोधी रोष आहे. हे राज ठाकरे मान्य करतात. मग त्यांनी युतीचा प्रचार करुनही रोष कसा ओसरला नव्हता? त्यांनी असं म्हटलं होतं की, मराठी मतदारांनी उध्दव ठाकरे यांना मतदान केलं नव्हतं. मग कोणाला केलं होतं? भाजपला केलं असेल तर त्यांच्या जागा तेवीसवरुन आठवर कशा काय घसरल्या? राज ठाकरे संतापले आहेत. त्यांना सगळेच वापरुन घेत आहेत. मात्र त्यांना सहकार्य कोणीच करीत नाहीत. यामुळं ते घायकुतीला आले आहेत. आता ते मराठी मतदारांना साकडं घालणार आहेत. मतदार देशाचा नागरिक असतो, मतदान करताना तो ना धर्माचा असतो ना भाषेचा असतो. राज ठाकरेंसारखी माणसं अशा प्रादेशिक अस्मिता तयार करून संकुचित राजकारण करतात. मनसेला मतदार उरलेला नाही. सर्वांनी आपापले मतदार वाटप करुन घेतलंय. मनसे समाजातील भुसभुशीत शिल्लक मतदार शोधत आहे. त्यासाठी त्यांची चाचपणी सुरू आहे. मनसेचं रचनात्मक कार्य काय आहे? विध्वंसक कृतीला बेरोजगार तरुणाई कधीतरी वैतागून प्रतिसाद देते, नाही असं नाही. पण तीचं रुपांतर मतदानात होत नाही. २००९ साली मनसेला विधानसभेत तेरा जागांवर विजय मिळाला होता. नासिक महापालिकेत सत्ताही मिळाली होती. पुणे-मुंबई महानगरपालिकेत उल्लेखनीय यश मिळालं होतं. तो मतदार कायम राखण्यासाठी मतदारांना काय हवंय, याचा कानोसा घेतला नव्हता. कानोसा घेऊन पाठपुरावा केला पाहिजे होता. त्याआधी मतदारांना विचारायला हवं होतं की, तुम्ही आम्हाला मतदान केलंत तुमच्या अपेक्षा काय होत्या? तेराच्या आकड्यानं हुरळून गेलेल्या मनसेला हवेतून खाली येता आलं नाही. टोलनाका मशिदींवरील भोंगे एका मर्यादेपर्यंत ठिक होतं. पण ते काही आपलं रचनात्मक कार्य नव्हे. नम्रता, विवेक, मानवतावादी दृष्टिकोन ही मूल्ये आहेत. तो शेळपटपणा नव्हे. कधी बिहारी, कधी युपी, कधी गुजराती, तर कधी दक्षिण भारतीय लोकांना लक्ष्य करुन मराठी मतं खेचायची. एक काळ असा होता की, मुंबईत प्रादेशिक अस्मितेला नागरिक प्रतिसाद देत होते. जागतिकीकरणामुळं नागरिक वैश्विक बनलाय. तो आता संकुचित राष्ट्रवादाला प्रतिसाद देणार नाही. आदरणीय प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं नाव पुढील शतकातही घेतलं जाईल. त्यांचं कार्य कालबाह्य होणार नाही. मनसे आता पुन्हा मराठी मतदारांना आवाहन करीत असेल तर फसेल. मराठी तरुण बेरोजगार आहे, पण अजून इतका विवेक गमावला नाही, की तो विध्वंसक कृतीला ओ देईल. राज ठाकरे यांच्याकडं नेतृत्व, वक्तृत्व हे गुण असूनही ते सतत "टूल" म्हणून वापरले जातात. त्यांचं व्यक्तीमत्व हे इतर कोणत्याही नेत्यापेक्षा उजवं आहे. तरुणांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे, तरीही संघटनेला संसदीय राजकारणात अपयश का येतं? याचं आत्मपरीक्षण करावंच लागेल. 
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाची ताकद विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. तीचं हस्तांतर राज ठाकरे यांच्याकडं होण्याची शक्यता नाही. तशी अपेक्षा भाजपच्या मोठ्या नेत्यांची आहे. जसं अजित पवार यांच्याकडं राष्ट्रवादीचं हस्तांतर निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलं होतं. पण सर्वांचाच खरा कस विधानसभा निवडणुकीत लागणार आहे. केंद्रीय नेतृत्वाचा अहंकार भागवत उतरवतील, अशी अपेक्षा आहे. ऑर्गनायझर च्या कानपिचक्या काही बदल घडवतील, अशीही अपेक्षा आहे. भाजपच्या काही मनुवादी नेत्यांनी राज्यघटना बदलाचा सुतोवाच केला होता. त्या पार्श्वभूमीवर 'अब की बार चारसौ पार...!' हा नारा अंगाशी आला होता. त्यामुळं दलित आणि अल्पसंख्याक मतदारांनी भारतीयत्वाला मतदान केलं होतं. वैदिकवादाला-मनुवादाला धिक्कारलं होतं. आज संस्कृती बदलली आहे. १९६६ चा शिवसेनेचा मराठी नारा आता कालबाह्य झाला आहे. पियुष गोयल, जसवंतीबेन मेहता, संजय निरुपम, किरिट सोमय्या ही, बिगर मराठी मंडळी मुंबईतून निवडून आलेली होती. दक्षिण मुंबईतून फर्नांडिस यांनी तर, स.का.पाटील यांच्यासारख्या मराठी मातब्बराला चीत केलं होतं.
ऑर्गनायझर नियतकालिकानं भाजपची ब्रॅण्ड व्हॅल्यू, अजित पवारांनी कमी केल्याची टीका आताच का केली आहे? अजित पवारांना सरकारमध्ये शपथ घेण्याआधी गप्प का बसले होते? अजित पवार लोकसभा निवडणुकीत चांगले चालले असते आणि भाजपचा फायदा झाला असता तर, ऑर्गनायझरने टीका केली असती काय? एकट्या अजित पवारांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे पापाचे वाटेकरी नाहीत काय? आरएसएस च्या मुखपत्राचं खरं दुखणं हे आहे की, संघाला दहशतवादी संघटना म्हटलं होतं. त्याचा राग आता निघत आहे. पण अजित पवार फायद्याचे ठरले असते तर, याची वाच्यताही केली नसती आणि रागही व्यक्त केला नसता. उपयुक्तता संपली, की फेकून द्यायचं. बलराज मधोक, सिकंदर बख्ट, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशीं अशी अनेक उदाहरणं देता येतील. जर पक्षाच्या फाऊंडर नेत्यांची ही अवस्था तर कोण अजित पवार आणि कोण राज ठाकरे?

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...