Saturday 6 July 2024

‘आषाढस्य प्रथम दिवसे...!’

"आज शनिवारी आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मेघदूत हे त्याचं महान काव्य. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे...!’ अशी होते. कालिदासाची जन्मतिथी माहिती नसल्यानं त्याच्या काव्यातल्या या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी 'कविकुलगुरू कालिदास दिन' साजरा केला जातो. त्या निमित्तानं त्यांच्या मेघदूताविषयी…!"
------------------------------------------------- 
महाराष्ट्र नव्याने हिरवागार होत असतानाच पंढरीच्या वाटेवर भक्तीचा मळा फुलतोय. ही आषाढाची ओळख आहे. आषाढ हा भक्तीचा मास. हिंदूजीवन पद्धतीतल्या अनेक व्रतांचा प्रारंभ आषाढात होतो. गुरुभजनाची पौर्णिमा आणि दीपपूजनाची अमावस्या ह्याच महिन्यात येते. गुरू आणि दीप, अंधाऱ्या आयुष्याला प्रकाशमार्गावर आणतात. म्हणूनच भारतीय समाज जीवनात त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. वर्षातल्या २४ एकादशीत श्रेष्ठ मानली जाणारी 'शयनी एकादशी'ही आषाढातच येते. ह्या आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात आणि चातुर्मासास प्रारंभ होतो. आषाढात अथवा त्यापूर्वी थोडेच दिवस सूर्याचे कर्कसंक्रमण होऊन दक्षिणायन  सुरू होते. धुवांधार पावसामुळे 'देवाचा धावा' करावा लागावा अशी महापूर, साथीचे रोग यासारखी संकटंही आषाढात कोसळतात. अशा आषाढाचा प्रारंभ मात्र कविकुलगुरू कालिदासाच्या स्मरणाने होतो. त्याच्या कल्पनाविलासाची अमर साहित्यकृती असणाऱ्या 'मेघदूत' ह्या खंडकाव्याची आठवण होते. त्यातील *आषाढस्य प्रथमदिवसे...* ह्या ओळी मनाला खेळवू लागतात. तथापि, हा काही मेघदूतचा प्रारंभ नाही. ते १२५ श्लोकांच्या संस्कृत खंडकाव्याचं, दुसऱ्या श्लोकाचं तिसरं चरण आहे. परंतु मेघदूत म्हटलं की तेच प्रथम आठवतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मेघदूतात विरह आणि शृंगार यांचा अप्रतिम संगम आहे. *मेघदूत* ही एका शापित यक्षाची विरह कथा आहे. अलकानगरीतील यक्षाच्या हातून काही चूक झाल्याने त्याला वर्षभराच्या शिक्षेसाठी रामनगरीला धाडलं जातं. तिथे तो एकटाच राहत असतो. प्रियाविरहाच्या दु.खाने तो खंगतो. आपल्यासारखी अवस्था आपल्या प्रिय पत्नीचीही झाली असेल, ह्या विचाराने तो अधिक अस्वस्थ होतो. शिक्षेचे आठ महिने सरलेले असतात. आषाढ सुरू झालेला असतो. 'नभ मेघांनी आक्रमिले...!' असे वातावरण असते. त्यातल्या एका मेघाला म्हणजे ढगाला तो रोखतो आणि मनातली अस्वस्थता आपल्या प्रिय पत्नीकडे पोहोचवण्याची विनंती त्याला करतो. तिचा ठावठिकाणा सांगताना दरम्यानच्या प्रवासातील खाणाखुणांचे बहारदार वर्णन करतो. हा प्रसंग आषाढातल्या पहिल्या दिवशी घडतो. त्याचे वर्णन कालिदासाच्या शब्दात आहे. मेघदूतात विरह आणि शृंगार यांचा अप्रतिम संगम आहे. तसाच तो प्रवासवर्णनाचाही ललितरम्य नमुना आहे. संस्कृतातील ह्या ऐतिहासिक साहित्यकृतीचे अलौकिकत्व आपल्याही भाषेत उजळावे, ह्या हेतूने अनेकांनी त्याचे भाषांतर केले आहे. बहुतांश भारतीय भाषात मेघदूत अवतरलंय. उर्दूतही मेघदूत आहे. एच. एच. विल्सनने इंग्रजीत (१८१३), मॅक्स म्यूलरने जर्मनीत (१८४७) आणि ए. ग्वेरिनॉटने फ्रेंच भाषेत (१९०२) मेघदूताचा पद्यानुवाद केलाय. मराठीत हे काम कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी (१८६५) प्रथम केलं. त्यांच्यानंतर बा. ल. अंतरकर, हवालदार, कात्रे, रा. चिं. श्रीखंडे, रा. प. सबनीस, ना. ग. गोरे, कुसुमाग्रज, वसंत पटवर्धन, बा. भ. बोरकर, सी. डी. देशमुख, शान्ता शेळके, कोल्हापूरच्या मंदाकिनी कदम आदींनी मेघदूताला मराठीत आणलंय. यातील कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर आणि शान्ता शेळके हे तिघेच कालिदास कुळातले म्हणजे कवी आहेत. बाकीचे रचनाकार संस्कृत साहित्याचे अभ्यासक, आस्वादक आहेत. सी. डी. देशमुख आणि वसंत पटवर्धन अर्थतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते, तर नानासाहेब गोरे यांचा समाजवादी नेते म्हणून राजकारणातही दरारा होता. मात्र या सर्वांनाच मेघदूताने आपल्या प्रेमपाशात अडकवलं होतं. हे प्रेमही विविधरंगी होतं. ते जसं ज्याला भावलं, तसं त्याने मराठीत आणलंय.
आषाढ महिन्याचा पहिला दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. ‘मेघदूत’ हे त्याचं महान काव्य. पत्नीविरहामुळे व्याकुळ झालेला एक यक्ष मेघाबरोबर स्वतःच्या पत्नीला संदेश पाठवतो, या कल्पनेवर मेघदूत हे काव्य रचलेलं आहे, हे सर्वश्रुत आहे. मंदाक्रांता वृत्तात केलेल्या या रचनेत प्रत्येकी चार चरणांची १११ कडवी आहेत. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत हे काव्य विभागलेलं आहे. या काव्यानं अनेक कवी-लेखकांना भुरळ पाडलीय, प्रेरणा दिलीय. इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकात या काव्याची निर्मिती झाली असावी, असा अंदाज आहे. या काव्यावर सुमारे नव्वद भाष्यं किंवा टीका प्रसिद्ध झाल्या आहेत. मेघदूतात वर्णन केलेल्या मेघाच्या मार्गावरून विमानानं प्रवास करून निरीक्षणं नोंदवणारे कॅप्टन आनंद जयराम बोडस, डॉ. सुरेश विश्वनाथ भावे यांच्यासारखेही काही विद्वान आहेत. एकंदरीतच, मेघदूत हे प्रेमाविषयीचं प्रेमात पाडणारं काव्य आहे. मेघदूताच्या ‘पूर्वमेघ’ या भागातल्या दुसऱ्या कडव्याची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या तीन शब्दांनी होते. ते खूपच प्रसिद्ध झाले आहेत. खरा आस्वाद घेण्यासाठी मेघदूत संपूर्णच वाचायला हवं. ‘मेघदूताचे मराठी अनुवाद’ या नावाचं पुस्तक डॉ. अरुणा रारावीकर यांनी लिहिलं असून, त्यात प्रमुख अनुवादांचा परामर्श घेतलाय. अनेकांना प्रेरणा देणारं असं महान काव्य रचणाऱ्या कालिदासाला वंदन. कालिदासाची महती सांगणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे.  
पुरा कविनां गणनाप्रसंगेl
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासःll
अद्यापि सार्थवती बभूव ll 
त्याचा भावार्थ असा : पूर्वी एकदा महान कवींची गणना करण्याचे काम सुरू झालं. हाताच्या बोटांवर करंगळीपासून ते मोजायला सुरुवात झाली. पहिलं नाव अर्थातच महाकवी कालिदासाचं होतं; मात्र त्यानंतर अजूनही त्याच्या तोडीचा असा कोणी कवी सापडलेला नाही. त्यामुळे ‘अनामिका’ करंगळीनंतरचं बोट हे नाव सार्थ झालं.
*विमानातून मेघदूत प्रवास....!*
पुण्याचे डॉ.भावे यांना मेघदुताच्या या काव्यानं भलतंच वेड लावलंय. त्यांनी एका वृत्तपत्रात लेखात मेघदुताच्या मार्गात येणाया नद्या, पर्वत इ. च्या सौंदर्याचा उपयोग काव्यात कालिदासानं कसा करुन घेतला याबाबत त्रोटक वर्णन आहे. डॉ.भावे यांना ही सौंदर्यस्थळे भलतीच भावली आणि त्यांनी कालीदासाच्या मेघदुताचा वेगळ्या पध्दतीनं अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. व्यवसायानं सर्जन असणारे डॉ.भावे उत्कृष्ट वैमानिकही होते. त्यांनी विमानानं प्रवास करत मेघदूताच्या प्रवासाच्या मार्गानं आणि त्या वेगानं प्रवास करत या मार्गाचं चित्रिकरण करत अवलोकन केलं. एक अदभुत निष्कर्शाप्रत डॉ.भावे पोहोचले तो असा की, कालीदासाच्या या मेघदुताचा निर्मिती काळ एक हजार वर्षांपुर्वीचा आहे, हे गृहीत धरलं असता त्या काळात एक हजार फूट उंचीवरुन उडणारी विमानं नव्हती. अशा काळात जे दृश्य डॉ.भावेंना एक हजार फ़ुट उंचीवरुन विमान प्रवास करताना जी दृष्ये दिसली तशीच्या तशी कालीदासानं एक हजार वर्षांपुर्वी आपल्या काव्यात वर्णन केलेली आहेत. उदा. नर्मदा नदीचं वर्णन आणि एक हजार फूट उंचीवरुन तिचा दिसणारा आकार इ. याचा अर्थ कालीदासाला उच्च प्रतीची प्रतिभा तर होतीच याशिवाय एक तर दिव्य दृष्टी होती किंवा आकाश गमनाची सिध्दी सुध्दा असावी. अन्यथा एक हजार फूट उंचीवरुन दिसणारे विहंगम दृश्य कालीदासाला काव्यात्मक लिहिणं आणि जे आजच्या काळात प्रतित होणं कसं संभव झालं असतं? याबाबतचे सारे अनुभव डॉ.भावे यांनी लिहलं होतं तसंच त्यांची मुलाखत सुध्दा दूरदर्शनवर झाली होती. त्यांनी हा सर्व प्रवास त्यांनी एका पुस्तक रुपानं प्रसिध्द केलाय.
ढगाळ वातावरण निर्माण होताच त्या यक्षाला आपल्या पत्नीची जास्तच प्रकर्षानं आठवण येते. कांही करून आपण तिच्याबरोबर संपर्क साधलाच पाहिजे असं त्याला तीव्रतेनं वाटू लागतं. पण तो काय करू शकणार होता? त्या काळात मोबाईल फोन, एसटीडी, आयएसडी, इंटरनेट चॅटिंग, ईमेल, स्क्रॅप असलं कांही नव्हतं. चिठ्ठी नेऊन पोचवणारा पोस्टमन नव्हता. सांडणीस्वार, संदेशवाहक कबूतरं वगैरे साधनं एका यःकश्चित सेवकाला परवडणारी नव्हती आणि असली तरी त्यांची रेंज हिमालयापर्यंत असणार नाही. अशा अवस्थेत आकाशमार्गे उत्तरेच्या दिशेनं जात असलेल्या मेघाला पाहून यक्षाच्या मनात आशेचा किरण फुटला. 'हा निर्जीव वाफेचा पुंजका मला काय समजून घेणार आहे आणि माझा कोणता संदेश घेऊन जाणार आहे...?' असली शास्त्रीय शंका त्याच्या हळुवार मनाला शिवली नाही कारण 'मदनबाणांनी विध्द झालेल्या पुरुषाची विवेकबुध्दी जागेवर नसते...!' असं कालिदासानंच पुढं नमूद केलंय. त्यामुळं असला रुक्ष विचार करत न बसता त्या मेघालाच दूत ठरवून आपलं मनोगत त्याच्यापुढं व्यक्त करायचं आणि हा संदेश अलकापुरीमध्ये रहात असलेल्या आपल्या प्रिय पत्नीला पोचवण्याची विनंती त्याला करायची असं तो यक्ष ठरवतो. आधी त्या मेघाची तोंडभर स्तुती करून त्याला आपला मित्र बनवतो. आपल्या मनातल्या पत्नीबद्धल वाटणाऱ्या प्रेमभावनांना शब्दात व्यक्त करतो. विरहामुळे आपण किती व्याकुळ झालो आहोत ते सांगतो. रामगिरीपासून अलकापुरीचा मार्ग कसा कसा जातो, वाटेत कोणते पर्वत, नद्या, अरण्ये, कोणकोणती रम्य नगरे आणि स्थळे लागतील त्यांचं रसभरित वर्णन करतो. वाटेत कांही सुंदर कृषीवल कन्या तुला पाहून हर्षभरित होतील, पण तू मात्र त्यांच्या नादी लागून आपल्या मार्गावरून विचलित व्हायचं नाहीस अशी त्याची थट्टा करतो. अखेरीस अलकापुरी आल्यानंतर ती सुंदर नगरी कशी दिसेल याचं सुरेख वर्णन करतो. तिथं आपली पत्नी आपल्या वाटेवर डोळे लावून बसलेली असेल असं सांगून तिच्या मनात कोणत्या भावनांचं वादळ उठलेलं असेल याचं वर्णन करतो. तिच्या रूपाचं वर्णन तर आलंच. अखेर आपला निरोप तिला देऊन तिचं कुशल मंगल वृत्त माझ्यापर्यंत आणून पोचव अशी परोपरीनं त्या मेघाची विनवणी करतो. तसंच तू माझ्यासाठी हे नाजूक काम करशीलच असा विश्वास दाखवतो.
अशाप्रकारे हे कथाकथन नसलेलं विशुध्द काव्य आहे. मेघाला दूत बनवून त्याच्यामार्फत संदेश पाठवण्याची कल्पनाच भन्नाट आहे. तिचा विस्तार करतांना निसर्गातली सौंदर्यस्थळे आणि मनातल्या नाजुक तसंच उत्कट भावना यांना कालिदासानं आपल्या अलौकिक प्रतिभेनं शब्दबध्द केलंय. या काव्यातली एक एक उपमा, उत्प्रेक्षा, रूपकं पाहता 'उपमा कालिदासस्य'  असं कां म्हणतात ते पटतं. या काव्यासाठी कालिदासानं मंदाक्रांता हे वृत्त निवडलंय. आजच्या काळातले संगीतकार मेघदूतातल्या नादमय शब्दांना यमन, केदार आदि रागांच्या सुरात गाऊन अधिकच मजा आणतात. हजार वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेली मेघदूताची जादू पुढंही अनंत काळपर्यंत रसिकांच्या मनाला मोहिनी घालत राहील यात शंका नाही.
मेघदूत हे महाकवी कालिदासाचे संस्कृत खंडकाव्य. त्याची श्लोकसंख्या निरनिराळ्या प्रतींत ११०, १११, ११७, ११८, १२० अशी वेगवेगळी आढळते. तथापि अधिकृत प्रतीप्रमाणे ती १११ आहेत. कोणा यक्षाला कर्तव्यच्युतीमुळं कुबेरानं शाप देऊन एका वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा केली. रामगिरीवर विरहाचे आठ महिने त्यानं कसंबसं काढले. आषाढाच्या प्रथमदिनी वर्षामेघाला पाहून आपल्या पत्नीकडं संदेश पाठविण्याची कल्पना त्याला आली. या भूमिकेवर मेघाला विनंती, प्रवासमार्ग, अलकापुरीतल्या घराच्या खाणाखुणा आणि विरहव्यथित यक्षपत्नी यांचं वर्णन, तिला धीराचा संदेश, अशी काव्यकथेची मांडणी आहे. रचनेची ही सरलता भावदर्शनाला पोषक झाली आहे. संदेशाची मूळ कल्पना रामायणावरून सुचली असावी कारण पवनतनयानं मैथिलीकडं नेलेल्या रामसंदेशाचा उल्लेख काव्यातच आहे. कदाचित कालिदासाच्या वैयक्तिक अनुभूतीमधूनही या काव्याचा जन्म झाला असेल.
मेघाला संदेशवाहक बनविण्याची कविकल्पना भामहाला सदोष वाटली आधुनिकांना अशक्य वाटेल. विरहाला कारण होणारा शाप असाच असंभाव्य. त्याहून, विरहाचा मर्यादित अवधी आणि त्यानंतर होणारे निश्चित पुनर्मीलन वेदनेची धार बोथट करून यक्षाच्या शोकाला भाबडा भावनातिरेक बनवितात, असं काही टीकाकारांना वाटतं. कालिदासाला हे कच्चे दुवे दिसले आहेत. शापाचा हेतू त्याच्या काळी संभाव्य वाटण्यास अडचण नव्हती आणि कामार्तांना चेतना अचेतनांचा विवेक कसा सुचावा? ही यक्षानं मेघाला केलेल्या विनवणीची त्याची संपादणी आहे. खरं म्हणजे, या भावकाव्याकडं प्रखर वास्तवाच्या दृष्टीतून पाहणं हाच प्रमाद होईल, यक्ष आणि त्याची अद्‌भूत नगरी, विरहाचं कारण, मेघाचं मानुषीकरण इत्यादी तपशील काव्यदृष्ट्या साधन आहे त्याचा कोटेकोरपणा कवीनं राखला नाही. कवीचं साध्य आहे, प्रेमविव्हळ विरही मनाची नाजूक व्यथा. मेघदूतात कविमनाचा कानोसा आहे, एका चिरंतन अनुभूतीची काव्यात्म अभिव्यक्ती आहे. पूर्वार्धात रामगिरीचं अलकापुरी या प्रवासमार्गाचं वर्णन करताना अनेक भौगोलिक प्रदेश, शहरे, नद्या, पर्वत, पक्षी इत्यादींची चित्रं अचूक रेखीव तपशील भरून कालिदासानं साक्षात उभी केली आहेत. या वर्णनातले वास्तव, अलकापुरी आणि यक्षभूमी यांच्या अद्‌भुत रम्यतेमध्ये हरवतं पण यक्षपत्नीची मानवी मूर्ती आणि तिची बोलकी विरह व्यथा भावसत्याशी पुन्हा हातमिळवणी करतात. संवेदनशील मानवी हृदयाचं हे भावनिक सत्य हेच मेघदूताचं काव्यरूप सत्य म्हटलं पाहिजे. मेघदूतातला एकेक श्लोक स्वयंपूर्ण चित्रासारखा आहे. संकल्पित मेघप्रवासात निसर्गचित्रं रंगविली आहेत पण त्यांना मानवी भावांची चौकट आहे. यक्षपत्नीच्या चित्रणात निसर्गरंगाची चौकट भावमूर्तीला घातलेलीय. अनिवार्य प्रेमाची उत्कटता आणि विरहाची जीवघेणी व्यथा इथं भावाची मृदुता, अर्थान्त न्यासाची विश्वात्मता आणि शब्दार्थाचे लाघव घेऊन प्रकटलीय. इथं विरहाचं आक्रंदन नाही पण शृंगाराचे रंग मात्र मधूनच उत्तान होतात. विरहित पतीनं चिरयौवना पत्नीच्या केलेल्या अहर्निश चिंतनातून ते आलेले आहेत. मुख्य चित्र अर्थात विरहव्यथेचे आहे. त्याला साजेशी मंदाक्रांता वृत्ताची संथ धीरगंभीर चाल म्हणजे सुरावट आणि लय यांचा युगुलबंधच!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...