Saturday 20 November 2021

राजकीय चाणक्य : प्रमोद महाजन

प्रमोदवर अनेकांचा राग होता आणि तो असणे काही अंशी वैधही होते. साध्य-साधन विवेकाचा फारसा विचार त्याच्या घाईत बसणारा नव्हता. मग रिलायन्स कंपनीला त्याने दिलेले झुकते माप उघडकीला आले. मंत्रिपदाच्या काळात त्याचे अनेक उद्योगपतींशी असलेले संशयास्पद संबंध वृत्तपत्रांनी उघड केले. त्याने अल्पकाळात मिळविलेल्या कथित अमाप संपत्तीची चर्चा झाली. संघाने त्याच्या राजकारणावर ते पंचतारांकित असल्याची टीका केली आणि अरुण शौरींनी त्याच्यावर आरोपांची फैर झाडली... यांतले सारेच खोटे वा खरे असे आज कोण सांगणार? एक मात्र खरे, जोवर प्रमोद पक्षासाठी फायदेशीर होता तोवर यातले काही कुणी कधी बोलले नव्हते. त्याचे किफायतशीरपण जसजसे संपत गेले तसतशी त्याच्याविषयी एकेक गोष्ट बोलली जाऊ लागली.   
1976 चा आरंभकाळ. नाशिक रोड केंद्रीय कारागृहातली तिसऱ्या क्रमांकाची बराक. तीत पंचवीस-तीस कॉट्‌स टाकलेल्या. उत्तरेच्या टोकावरल्या एका कॉटवर पंचांगकर्ते धुंडिराजशास्त्री दाते तर दक्षिणेकडच्या दुसऱ्या टोकाच्या कॉटवर माझी स्थानबद्धता. वेळ दुपारची. तीन वाजून गेल्यानंतरची. शास्त्रीबुवांच्या कॉटभोवती आठदहा स्थानबद्ध गोळा झाले आहेत. त्यांतल्या प्रमोद महाजनच्या उजव्या हाताचा तळवा शास्त्रीबुवा जवळच्या जाड भिंगातून पाहात आहेत... ‘तुम्ही म्हणता म्हणून मी हात दाखवतो. एरव्ही माझा या गोष्टीवर काडीचाही विश्वास नाही.’ प्रमोद त्यांना म्हणत असतो.

‘... शिक्षण पदवीपुरते. पण राजकारणात भविष्य आहे. सत्तेची मोठी पदे वाट्याला येतील एवढी उंची तुम्ही गाठणार आहात.’ शास्त्रीबुवा सांगत असतात.

‘एवढे सांगितले तर हेही सांगा, मी या देशाचा पंतप्रधान कधी होईन?’ प्रमोदच्या प्रश्नात दुर्दम्य आत्मविश्वास आहे.

‘ते मला सांगता यायचे नाही, पण तुमचे त्या क्षेत्रातले योग उच्चीचे आहेत.’ शास्त्रीबुवा सांगतात आणि त्याचा हात सोडतात. 

प्रमोद आणि त्याच्या सोबतच्यांचा मोर्चा माझ्याकडे वळतो. मी चहाचं सामान आणि स्टोव्ह आणला आहे. मग साऱ्यांचा चहा होतो... (पुढे 1990 च्या दशकात प्रमोद देशाचा संरक्षणमंत्री झाला. त्याला लिहिलेल्या अभिनंदनाच्या पत्रात त्याने दाते शास्त्र्यांना विचारलेल्या प्रश्नाची आठवण मी त्याला करून दिली. तू तुझ्या महत्त्वाकांक्षेच्या दोन पावलांएवढ्या अंतरावर पोहोचला आहेस असे त्यात मी लिहिले. त्याने पाठविलेल्या हस्तलिखित उत्तरात आभार होते. त्या प्रश्नाचा उल्लेख त्याने संकोचानेच बहुधा टाळला असावा.) 

त्या आधी शास्त्रीबुवांना त्यांच्या एका प्रवचनात प्रमोदनं अडवलं होतं. ‘सारे जीव त्यांच्या पूर्वसंचितानुसार जन्माला येतात’ असे त्यात शास्त्रीबुवा म्हणाले होते. त्यावर ‘मग जगाच्या इतिहासात जो पहिला जीव जन्माला आला तो कोणाच्या संचिताने’ असा निरुत्तर करणारा प्रश्न प्रमोदने त्यांना विचारला होता... 14 डिसेंबर 1975 या दिवशी मी तुरुंगात दाखल झालो. मोहन धारिया, अनंतराव भालेराव, बापू काळदाते, गंगाप्रसादजी अग्रवाल, प्रल्हादजी अभ्यंकर हे पक्षोपपक्षांचे नेते अगोदरच त्यात आले होते. गोपीनाथ मुंडेही त्यांच्या सत्याग्रही सहकाऱ्यांसह सेपरेट बराकमध्ये बंदिस्त होते... 

प्रमोद जरा उशीरा आला. तो भूमिगत असल्याचे सांगितले जात होते. तेव्हा तो फारसा प्रसिद्धही नव्हता. नंतर प्रवीण महाजनच्या पुस्तकातून पोलिसांच्या नजरा चुकवून तो घरीच राहिला होता, हे साऱ्यांना कळले. त्याला तुरुंगात प्रथम पाहिले तेच मुळी सळसळत्या चैतन्यासारखे. उंच, सडपातळ पण उत्साहाने भरलेली देहयष्टी. डोळ्यांत ज्ञानाचे तेज, अध्ययन व आकलनाचा अधिकार सांगणारी जाणीव. चेहऱ्यावर देखणा आर्जवी भाव. हालचालीत ऐट आणि प्रत्येक आविर्भाव आत्मविश्वासानं भारलेला. 

आपण इथले नाहीत, इथं थांबण्यासाठी आलो नाही, आपला खरा मुक्काम आणखी पुढे आहे आणि तिथवर मी लीलया पोहोचणारही आहे असा सर्वांगावर विश्वास... त्याच्या बोलण्यात तो जाणवायचा. वागण्यात दिसायचा आणि भाषणात तो सारे सभास्थान कवेत घ्यायचा. पाहाताक्षणी आवडणारी, असूयेनं नावडणारी आणि फार काळ सोबत राहिलो तर हा आपल्याला अनुयायी बनवील अशी भीती वाटायला लावणारी काही माणसं असतात. प्रमोद त्यांतला होता.

त्याच्या अगोदर आलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कहाण्या सांगितल्या होत्या. कार्यकर्ता म्हणून त्याने उपसलेल्या कष्टाच्या, वाट्याला आलेल्या अभावाच्या, विद्यार्थी परिषदेचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर सभोवती उभ्या राहिलेल्या वलयाच्या, वक्तृत्त्वाच्या बळावर संघटनेतील साऱ्या जुन्यांना मागे टाकण्याच्या, त्यातून अपरिहार्यपणे आलेल्या जबाबदारीच्या ओझ्याच्या, तोऱ्याच्या, संतापाच्या आणि माणसे जोडत जाण्याच्या हातोटीच्या... तुरुंगात असताना त्याच्या या साऱ्या पैलूंची ओळख पटत गेली.

त्याच्याहून वरचढ असलेली, संघ परिवारात दीर्घकाळ काम केलेली वडीलधारी माणसेही त्याला वचकून असायची. तो खालच्यांकडे फारसा पाहायचा नाही. वरच्यांना न्याहाळायचा आणि त्यांना आपण कधी व कसे मागे टाकू याचा ध्यास घ्यायचा... महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि भविष्याविषयीची स्पष्टता यांच्या जोडीला त्याला लागणारे नियोजन व वाटेल ती किंमत मोजून ते अमलात आणण्याची तयारी असे सारे त्याच्यात होते.

माणसे आणि वस्तू या प्रत्येकाला एक मोल असते. ते चुकविता आले पाहिजे. चुकविणे जमणार नसेल तर जमेल ते सारे करून ते कमी केले पाहिजे हा राजकारणातला व्यवहार त्याने आत्मसात केला होता. आपल्याहून वरचढ असणाऱ्यांच्या सामर्थ्यशाली व दुबळ्या बाजूंसोबतच त्यांच्या वयाच्या व टिकून राहण्याच्या क्षमतांचाही त्याला अचूक अंदाज होता... अशी माणसे थांबत नाहीत. त्यांना अडविता येत नाही. तसे करायचे तर मॅकेव्हिलीच्या शब्दात, त्यांना संपवावेच लागत असते.

संघ परिवारातील त्याला वरिष्ठ असणारी अनेक माणसे तुरुंगात होती. तो त्यांना क्वचित भेटायचा. आपल्या भाषणांना ती सारी हजर राहतील याची काळजी घ्यायचा. मात्र त्यांचा सल्ला वा अभिप्राय घेताना तो कधी दिसला नाही. सोबतची माणसे आणि हे वरिष्ठ आपल्या बोलांनी दिपलेच असणार याची त्याला तेव्हाही खात्री होती. तुरुंगात संघाची नियमित शाखा भरे.

राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्तेही दरदिवशी सायंकाळी एकत्र जमत. त्यात त्यांच्या नेत्यांची बौद्धिके व व्याख्याने होत. यातल्या कशात नसलेली माझ्यासारखी माणसे वाचनाचा वर्ग जमवीत आणि अगदीच कंटाळा आला तर त्या दोहोंतल्या एका गटातली व्याख्याने ऐकत. संघाच्या शाखेत प्रल्हादजी अभ्यंकरांपासून बाबासाहेब भिड्यांपर्यंत अनेकजण बोलत. सेवादलाच्या शाखेत बापू काळदाते, अनंतरावादिकांची व्याख्याने होत. मात्र त्यांतली नाव घेण्याजोगी भाषणे बापू काळदाते आणि प्रमोदची असत. प्रमोदने बापूंना आपला व्याख्यानगुरू मानले होते. तेव्हा आणि नंतरही तो त्यांच्या गुरुमाहात्म्याची जाहीर व गौरवाने कबुली द्यायचा... 

एखादेवेळी सारेच जेलकर एकत्र येत. त्यात वैचारिक अभ्यास वर्गापासून वादविवाद, परिसंवादासारखे कार्यक्रम होत... अशा एका वर्गात मी फ्रान्सच्या राज्यक्रांतीवर आणि प्रमोद मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वचिंतनावर बोलला होता. अतिशय थोड्या शब्दांत विषयाची पद्धतशीर मांडणी करतानाच त्याचे अतिशय सखोल विश्लेषण कसे करायचे हे त्याच्या व्याख्यानाने तेव्हा साऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. 

अफाट वाचन, एकपाठी स्मरणशक्ती, डोक्यात विश्लेषक यंत्र असावे असे कोणत्याही विषयाचे त्याच्या सर्व बाजूंसह स्वतंत्र आकलन आणि त्याच्या गुणदोषांची स्वतः निश्चित केलेली मांडणी. तर्कशुद्धता, भाषाप्रभुत्व आणि खेचून नेणारे वक्तृत्त्व असे सारेच प्रमोदजवळ होते. तुरुंगातल्या त्याच्या व्याख्यानांनाही एक प्रचारकी थाट होता. स्पर्धा जिंकण्याची जिद्द होती. आपण साऱ्यांहून चांगली मांडणी करतो याची जाण त्याच्या वाक्यावाक्यांतील ओजात दिसायची.

एका सायंकाळी ‘मी आणि माझा पक्ष’ असा परिसंवाद रंगला. काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीमुळे सारे तुरुंगात आले असल्याने त्या पक्षाची विश्वसनीय वाटावी अशी दमदार बाजू मांडायला कुणी तयार नव्हते. ती जबाबदारी साऱ्यांनी माझ्यावर टाकली. प्रमोदने जनसंघाचा तर एका समाजवादी तरुणाने त्या पक्षाचा किल्ला लढविला. संघटन काँग्रेस, लोकदल असे बारके पक्षही त्यात होते. परिसंवाद रंगला आणि तुरुंगातली बडी माणसे श्रोत्यांत होती. शेवटी निकाल लागून मला पहिले तर प्रमोदला दुसरे पारितोषिक मिळाले... प्रल्हादजी अभ्यंकरांनी मला प्लास्टिकची एक थाळी तर प्रमोदला एक कप बक्षीस म्हणून दिला. त्या दिवसापासून त्याची आणि माझी गट्टी जमली व ती त्याला गोळ्या लागून तो इस्पितळात दाखल होतपर्यंत कायम राहिली.

तुरुंगात असतानाच प्रमोदने राज्यशास्त्र या विषयाची एम.ए.ची परीक्षा दिली. मी त्याच विषयाचा प्राध्यापक असल्याने त्याच्या नोट्‌स तो कधीतरी मला आणून दाखवायचा. त्यातून त्याने मला सर म्हणायला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत मला कधी ‘अहो-जाहो’ करू दिले नाही.  जेलमधून बाहेर पडल्यानंतर स्थापन झालेल्या जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीवर प्रमोदसोबत मला काही काळ काम करता आले. 78 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांशी केलेल्या समझोत्यात प्रदेशाध्यक्ष एस.एम. जोशी यांनी मित्रांसाठी जास्तीच्या जागा सोडल्या म्हणून त्या समझोत्याला विरोध करायला आम्ही दोघेही एकाच वेळी उभे राहिलो.

त्या निवडणुकीत जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी शरद पवारांना मुख्यमंत्रिपद देऊन राज्यात आघाडीचे सरकार बनविले गेले. त्या सरकारात पवारांचा वरचष्मा होता आणि जनता पक्षाचे स्थान दुय्यम होते. या काळात दौऱ्यावर असताना एकदा प्रमोद माझ्याकडे मुक्कामाला होता. ‘आमच्यासोबत या’ एवढेच तेव्हा त्याने मला त्या भेटीत सुचविले. त्या आधी वसंतराव भागवतांची तशी सूचना मी नम्रपणे नाकारली होती. 

‘तुमच्या पक्षावर बाहेरच्या संघटनांचा वरचष्मा मोठा आहे’ असे मी तेव्हा प्रमोदला म्हणालो होतो.

‘संघाचा म्हणता ना? पण तेवढी मोठी संघटना पक्षाला आपसूक वापरायला मिळते त्याचे काय? त्यांची हिंदुत्वनिष्ठाच तेवढी जपायची असते. माझ्यासाठी तो व्यक्तिगत निष्ठेचाही भाग आहे ती गोष्ट  वेगळी.’ हे त्यावरचे त्याचे उत्तर होते. पुन्हा त्याने तो विषय कधी काढला नाही. 

... 80 मध्ये जनता पक्ष तुटला आणि मी राजकारणापासून दूर झालो. त्यातले मित्र मात्र कधी दुरावले नाहीत. प्रमोदही त्यांतलाच.  नंतरच्या काळातील त्याचा राष्ट्रीय राजकारणातला उदय, वाढ व प्रभाव असे सारेच कुतूहल जागविणारे आणि त्याच्या बौद्धिक क्षमतेएवढाच संघटनकौशल्याविषयीचा आदर वाढविणारे होते. 

प्रमोद भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश शाखेचा सरचिटणीस झाला. वसंतराव भागवतांएवढीच पक्ष संघटनेवर आपली पकड त्याने थोड्या काळात उभी केली. काही दिवसांतच तो पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस झाला. लगेच त्याची राज्यसभेवर निवड झाली. त्याने लोकसभेच्या दोन निवडणुका लढविल्या. त्यांतल्या एकीत (1996) तो विजयी तर दुसरीत (1998) पराभूत झाला. मात्र ‘अखेरचे जहाज बुडत नाही तोवर युद्ध संपत नसते’ असे म्हणणाऱ्या प्रमोदचा त्या पराभवाने पाडाव केला नाही.

या सबंध काळात राज्यातील पक्ष संघटनेएवढीच देशातील संघटनेवर त्याची पकड मजबूत होत गेली. त्याचे वक्तृत्व बहरत गेले. एकेकाळी केवळ मराठीत प्रभावी भाषणे करणारा प्रमोद प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीत सभा गाजविताना दिसू लागला. वाजपेयींच्या पाठोपाठ त्याच्याच वक्तृत्वाला त्या पक्षात खरी धार व परिणामकारकता होती.  पाहता पाहता भाजपामधील दुसऱ्या पिढीचा सर्वांत समर्थ नेता अशी त्याची प्रतिमा तयार झाली. पक्षासाठी अनेक मोहिमा त्याने हाती घेतल्या व त्या यशस्वी करून दाखवल्या. 

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा युतीचा तोच शिल्पकार होता. ही युती घडवून आणताना त्याने पक्षातील व संघ परिवारातील अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. मात्र या युतीने राज्य विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा स्वतःला आपणच बांधून घेतेलल्या कुंपणाआड ठेवणे यापुढे शक्य होणार नाही हे त्या परिवारालाच स्पष्टपणे कळून चुकले. नंतरच्या काळात भाजपाने अन्य पक्षांशी केलेल्या आघाडीचे मोठे श्रेयही प्रमोदकडेच जाणारे आहे. पक्षातील वाद आणि आघाडीतील भांडणे सोडविण्याची कामगिरीही बरेचदा त्याच्याकडे पक्षाने सोपविल्याचे या काळात दिसले. 

तो पक्षाचा सरचिटणीस होता आणि तरीही त्याचे नाव वाजपेयी आणि अडवाणी यांच्या पाठोपाठ देशात घेतले जाऊ लागले होते. देशाचा भावी पंतप्रधान अशीच त्याच्याविषयीची अनेकांची तेव्हा धारणा होती. राजस्थानच्या वसुंधरा राजे किंवा मध्यप्रदेशचे बाबूलाल गौर यासारखे मुख्यमंत्री प्रमोदच्या आग्रहावरून पक्षाने निवडले. सुषमा स्वराज यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध केंद्रीय राजकारणातून काढून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर बसविण्याची व पुढे सोनिया गांधींविरुद्ध बेल्लारी मतदार संघात उभे करण्याची खेळी त्याची आणि उमाभारतींना मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या त्यांच्या गच्छंतीनंतर वाट्याला आलेला विजनवास भोगायला लावण्याची किमयाही त्याचीच. 

स्वतंत्र भारताच्या राजकारणात एवढी महत्त्वाची भूमिका त्याअगोदर दुसऱ्या कोणत्याही मराठी नेत्याला बजावता आली नाही. एका राष्ट्रीय नियतकालिकाने प्रमोदची पंतप्रधानपदाच्या दहा संभाव्य उमेदवारांत निवड करावी एवढे राजकीय माहात्म्य अल्पवयात त्याच्या वाट्याला आले. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यासोबत तो सहजगत्या वावरायचा. त्याचा तसा वावर राजीव गांधींपासून शरद पवारांपर्यंत, चंद्रशेखरांपासून लालूप्रसादांपर्यंत आणि टाटांपासून अंबानींपर्यंत, सर्व राष्ट्रीय दिग्गजांमध्येही होता.

ही कमाई केवळ आपल्या बुद्धिचातुर्याच्या व समयसूचक नेतृत्वगुणाच्या बळावर त्याला मिळवता आली होती. देशाच्या पंतप्रधानपदावर मराठी माणूस कधी जाऊच शकणार नाही ही महाराष्ट्राची तोवरची धारणा चुकीची ठरविण्याची क्षमता आपल्यात असल्याचे त्याने साऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. मुरली मनोहर, खुराणा, जेटली, स्वराज या साऱ्यांच्या अगोदर त्याचे नाव पक्षात घेतले जायचे आणि त्याचा शब्द संसदेतही आदराने ऐकला जायचा. प्रमोदच्या व्यक्तिमत्त्वाने अनेकांना नुसती भुरळच घातली असे नव्हे तर पार दिपवून टाकले होते. या दिपवण्याला एका भयसूचक दराऱ्याची किनारही होती. देशाचा पहिला मराठी पंतप्रधान होण्याचा मान त्याला मिळेल हीच त्याच्या चाहत्यांची त्याच्याविषयीची तेव्हाची भावना होती. अंबाजोगाईसारख्या मराठवाड्यातील आडगावात एका सामान्य शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाने स्वकर्तृत्वाने गाठलेली ही उंचीच त्याचे वेगळेपण सांगणारी होती. 

साऱ्या क्षेत्रांत असतात तसे राजकारणात काम करणाऱ्या माणसांचेही दोन वर्ग असतात. एक, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य तो वापर करून निर्णय घेणारा आणि ते आपल्या सहकाऱ्यांच्या व अनुयायांच्या गळी उतरविणाऱ्यांचा. तर दुसरा, नेत्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे कामाला लागणाऱ्या सश्रद्धांचा. प्रमोद यांतल्या पहिल्या वर्गात मोडणारा नेता होता. तो स्वतः निर्णय घ्यायचा आणि आपला निर्णय पक्ष संघटनेत राबवूनही घ्यायचा. वाजपेयी आणि अडवाणी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांशी तो चर्चा करायचा, प्रसंगी वाद घालायचा आणि वरिष्ठांचा शब्द अखेरचा मानला तरी आपले मत त्यांना ऐकवायला तो कधी बधायचा नाही. आपली विचारशक्ती व बुद्धी स्वयंभू असल्याचा त्याचा आत्मविश्वासच भाजपमधील इतर पुढाऱ्यांहून त्याचे स्थान आणि व्यक्तिमत्त्व वेगळे असल्याचे दाखवून देणारा होता.

... बाकीचे सारे अनुयायी तर प्रमोद हा नेता होता. नेतृत्व करणे ही बाब सोपी नाही. त्यातून राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व करणे व ते साऱ्यांना मान्य करायला लावणे ही कमालीची अवघड बाब आहे. मागे कोणतेही वलय नाही, राजकारणाची वा नेतृत्वाची परंपरा नाही, घरच्या पैशाचे पाठबळ नाही आणि मराठी माणसांविषयी दिल्लीच्या राजकारणात नेहमीचे संशयाचे वातावरण आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रमोदने स्वतःला राजकारणाच्या राष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन त्याच्या मध्यभागी उभे करणे हाच मुळात एक चमत्कार होता. या वाटचालीत त्याने नमते घेतल्याचे व मनाला न पटणाऱ्या तडजोडी केल्याचे कधी दिसले नाही. तडजोड करणारी माणसे मनातून वाकलेली व डोळ्यांतली जरब हरवून बसलेली असतात.

प्रमोदच्या मनाची उभारी नेहमीच उंच राहिलेली आणि त्याच्या डोळ्यांतली चमक दरदिवशी आणखी दीप्तिमान होताना देशाला  दिसली. त्याच्या वागण्याबोलण्यात नाटकीपण नव्हते. असलीच तर एक विलक्षण भुरळ होती. साध्याही बोलण्यात तो आपले स्थान आणि उंची कधी विसरत वा हरवत नसे. संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेताना, तंत्रविज्ञानाचे खाते सांभाळताना, निवडणूक जिंकताना आणि हरताना, सामान्य कार्यकर्ता असताना आणि तुरुंगात राजबंदी असताना तो कधी वेगळा दिसला नाही आणि तसा वागलाही नाही. 

जन्माला येतानाच आपण एक मोठे उत्तरदायित्व सोबत आणले आहे असा स्वतःविषयीचा विश्वास बाळगणाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक अवजड पण अदृश्य अशी मौल्यवान चौकट असते. त्यांच्या लक्षात येत नसली तरी अवतीभवती वावरणाऱ्यांना ती जाणवत असते. ही चौकट त्यांना लोकांत वावरू देत असली तरी लोकांहून वेगळीही राखत असते. 

प्रमोद भाजपात होता आणि त्या पक्षाच्या चौकटीबाहेरही होता. तो संघाच्या परिवारात होता आणि त्या परिवाराबाहेरही त्याचा एक विस्तारित परिवार होता. अशी माणसे साऱ्यांत मिसळतात आणि तशी मिसळली तरी आपले स्वतंत्रपणही त्यांना कायम ठेवता येते. साऱ्यांत असण्याची आणि तरीही साऱ्यांहून वेगळे असण्याची ही किमया प्रमोदला साधली होती. 

तो पक्षाचे अंतर्गत राजकारण जसे सांभाळायचा तसे त्याचे मित्रपक्षांशी असलेले नातेसंबंधही जपायचा. जयललिता ते करुणानिधी, पासवान ते ममता बॅनर्जी आणि ठाकरे ते पवार अशी त्याची राजकारणातील फिरस्ती होती.  तो असामान्य वक्ता होता. मात्र कोणतीही संघटना नुसत्या भाषणबाजीवर उभी होत नाही. त्यासाठी आपल्या शब्दामागे मनुष्यबळ आणि अर्थबळ उभे करावे लागते. प्रमोदचे संघटनकौशल्य मनुष्यबळ उभे करणारे, तर त्याच्या व्यक्तिगत संबंधातील आपलेपण अर्थबळ जोडणारे होते. या अर्थाने प्रमोद हा भारतीय जनता पक्षाचा गृहमंत्री, परराष्ट्रंत्री आणि अर्थमंत्री होता व तरीही तेवढ्यावर त्याची क्षमता व भूमिका संपणारी नव्हती. 

वरिष्ठ नेत्यांचा तो सहकारी व सल्लागार होता. सोबतच्या सहकाऱ्यांचा मार्गदर्शक व सूत्रचालक होता आणि अनुयायी व कार्यकर्त्यांचा विश्वासू नेता होता. आपला आदर्श दुसरा कोणीही नसतो, आपणच आपल्या व्यक्तिमत्त्वातून आपला आदर्श घडवायचा असतो या स्वयंभू जाणिवेचे तो मूर्तिमंत प्रतीक होता. 

पत्रकारांशी बोलताना भलेभले बिचकतात, गडबडतात आणि प्रसंगी नको ते बोलतात. प्रमोदला त्याचा आत्मविश्वास डळमळायला लावणे हे कोणत्याही पत्रकाराला कधी जमले नाही. त्याच्यावर टीका झाली व ती सातत्याने होत राहिली. त्याची वक्तव्ये खूपदा त्याच्या वयाच्या मानाने मोठी असत. अनेकदा ती अंगावर आल्यासारखी वाटत. हा कालचा मुलगा असे आणि एवढे बोलतो याचाच काहींना राग यायचा. त्यातून प्रमोदच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची माहिती व अंदाज नसणाऱ्या मराठी पत्रकारांना तो त्याचा हुच्चपणा वाटायचा. 

पत्रकारांनाच नव्हे तर तो ज्या संघ परिवाराचा सभासद होता त्यातल्या वडीलधाऱ्यांनाही त्याचे तसे वागणे बोलणे त्यांच्या शिस्तीबाहेरचे वाटायचे. मग पत्रकार व संपादक त्याच्याविषयी आकसाने लिहायचे आणि त्याच्या परिवारातील वडीलधारी माणसे त्याच्याविषयी कुरबूर करताना दिसायची. आपण जे गाठू वा करू शकलो नाही ते हा परवाचा पोरगा गाठू वा करू शकतो याच्या अचंब्यातून अनेकांची असूया जन्माला यायची. प्रमोदवर राग धरणाऱ्या टीकाकारांची अशी शहानिशा कधीतरी व्हायला हवी. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमोदला ज्या गोष्टी अतिशय प्रतिकूल होत्या त्यांत या राज्याच्या राजकारणात अतिशय प्रबळ असलेले जातिकारण ही एक आहे. 

बाकीचे काही लक्षात घेण्याआधी मराठी माणूस पुढच्या माणसाची जात विचारात घेतो आणि त्याचे वैचारिक विश्लेषण पूर्ण केल्यानंतरही ती त्याला बाजूला सारावीशी वाटत नाही.  प्रमोदने त्याच्या राजकारणाला जातिविद्वेषाच्या जंजाळात अडकू दिले नाही. राष्ट्रीय पातळी गाठू इच्छिणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी पुढाऱ्यांनाही जाति-पंथांच्या मेळाव्यांचे मोह आवरता न येणे हे दुर्दैवाने आपले आजचे राजकीय समाजकारण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे क्षितिज मागे टाकून प्रमोदने देशाचे राजकारण आपले केले आणि त्या साऱ्या प्रवासात जाति-पंथाच्या राजकारणाचे झेंगट स्वतःला वा स्वतःच्या विचारांना कधी चिकटू दिले नाही. 

आणीबाणीत तुरुंगवास पत्करणाऱ्या प्रमोदची लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य आणि समतेसारख्या मूल्यांवरची निष्ठा जशी लखलखीत होती तशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ.आंबेडकरांचे नाव देण्यासाठी झालेल्या विराट आंदोलनात तुरुंगवास पत्करून त्याने आपली समाजनिष्ठाही ठसठशीतपणे साऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिली होती. तेवढ्यावरही ज्यांना त्याचे महाजन असणे विसरता आले नाही त्यांचा विचारही मग त्याने केला नाही.  कोणतीही मान्यता मिळविण्यासाठी वाकणे वा वळणे हा त्याचा स्वभाव नव्हता आणि तरीही महाराष्ट्रातील अठरापगड जातीची माणसे भाजपच्या राजकारणात आणून त्याचे राजकीय नेतृत्व बलशाली बनवण्यात त्याने अतिशय मोठी भूमिका बजावली. 

शहानवाज आणि नकवी यांना पक्षात महत्त्वाची पदे देण्यातील पुढाकार त्याचा होता. ज्यांना आपल्याच जातीच्या चौकटीवर उठणे कधी जमले नाही त्यांनी प्रमोदविषयीचा जातीय आकस बाळगला असला तर ते त्या माणसांचे लहानपण आहे हे अशावेळी काहीशा कठोरपणे का होईना, नोंदविलेच पाहिजे. दूरदृष्टी आणि विश्लेषणाची क्षमता, धैर्य आणि कर्तबगारी, वक्तृत्व आणि विद्वत्ता, उक्तीत असेल ते कृतीत आणण्याची धमक व या साऱ्यांच्या जोडीला एक देखणे आणि उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेला हा मराठी तरुण महाराष्ट्राने देशाला दिला आणि देशानेही महाराष्ट्राच्या या दानतीचे सोने केले.

अव्वल दर्जाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेत तो होता आणि आपल्या बुद्धिचापल्याच्या व प्रातिभदृष्टीच्या बळावर त्याने त्याही पातळीवरील अनेकांची झिलई कमी करून टाकली होती. कुटुंब, समाज, भाषा आणि प्रदेश या साऱ्यांना आपला अभिमान वाटायला लावणारी आणि अवतीभवतीच्या साऱ्यांना नम्र व्हायला लावणारी विलक्षण उंची त्याला गाठता आली. त्याच्या या वाटचालीत त्याचा पक्ष आणि परिवार त्याच्यासोबत होता हे मान्य केले तरी पक्ष व परिवारातील साऱ्यांना असे उंच होणे जमत नाही.

जात-पात, धर्म-पंथ यांसारखेच पक्ष आणि त्याचा विचार यांच्या  चौकटीवर उठण्याचे व त्यांच्या पलीकडे जाण्याचे उत्तुंगपण फार थोड्यांना लाभत असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मग देशाच्या मर्यादाही बाधा आणू शकत नाहीत. अशी माणसे कोणत्याही एका परिवाराची, धर्माची वा प्रदेशाची नसतात. ती सगळ्या माणसांची, माणसांच्या जातीची व मनुष्यधर्माची होत असतात. त्यांचा विचार माणसांपाशी सुरू होतो व माणसांपर्यंतच पोहोचत असतो. पक्ष वा जातीची कुंपणे त्यांच्यासमोर फार क्षुद्र होतात. एवढे मोठे होणे ज्या थोड्या मराठी नेत्यांना जमले त्यांत प्रमोद अग्रेसर होता.

राजकारण हे प्रत्यक्षात सत्ताकारणच असते. ते कमालीचे निर्दय असते. राजकारणात प्रमोदही संवेदनशून्य म्हणावा एवढा कठोर होता. नको ती माणसे दूर करताना, प्रसंगी तोडून टाकताना तो सहजसाधा व निर्विकार असायचा. एका मराठी आयपीएस अधिकाऱ्याने भाजपात प्रवेश केला तेव्हा त्या पक्षाच्या मराठी राजकारणाची सारी सूत्रे प्रमोदच्या हातात होती. या अधिकाऱ्याने मनोहर जोशींसोबत ते मुख्यमंत्री असताना सहकारी म्हणूनही काम केले होते. त्याला पुण्याचे लोकसभेचे तिकीट प्रमोदने अखेरपर्यंत, म्हणजे त्याच्या व त्याच्या चाहत्यांच्या पदरी पूर्ण निराशा येईपर्यंत मिळू दिले नाही. पुढे एका भेटीत मी त्याला या अन्यायाविषयी छेडले तेव्हा अत्यंत निर्विकार शब्दांतले त्याचे उत्तर होते, ‘त्याला तिकीट देऊन गोपीनाथसमोर मला एक प्रतिस्पर्धी उभा करायचा नव्हता....’ 

राजकारणातला प्रत्येकजण त्याचा स्वतःचा असतो. तो स्वतःसाठी राजकारण करतो. त्याच्या चौकटीत बसणार असेल तेव्हाच तो दुसऱ्यासाठी काही करायला तयार होतो. स्वतःचा संकोच करून घेणारे राजकारण कोणताही पुढारी करीत नाही... नेमकी ही गोष्ट लक्षात न घेणारे अनुयायी मग पुढाऱ्यावर राग धरत असतात. वाजपेयींच्या पहिल्या, तेरा दिवस टिकलेल्या सरकारात संरक्षणमंत्री म्हणून प्रमोदचा समावेश झाला. शपथ विधीनंतरच्या पहिल्याच तासात सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याने कामाला सुरुवात केली. प्रमोदने युद्धशास्त्राचा तपशीलवार अभ्यास कधीच केला होता. त्याच्या युद्धविषयक जाणकारीने ते अधिकारीही चपापले असणार... 

या काळात त्याच्या हातून झालेल्या एका प्रमादावरून त्याच्याशी माझा खटका उडाला. संरक्षण साहित्य तयार करणाऱ्या (आयुध निर्माणी) कारखान्यांभोवती काही किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही खाण उद्योगाला परवानगी मिळता कामा नये हा नियम तेव्हा होता व आजही आहे. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शास्त्रज्ञांच्या समितीचे त्यावर शिक्कामोर्तब आहे. तो नियम डावलून प्रमोदने भद्रावतीच्या आयुध निर्माणी लगत एका खाणीला परवानगी दिली. त्याच्याच पक्षाच्या एका खासदाराने या परवानगीला हरकत घेतली तेव्हा ‘ते तेरा दिवस’ या शीर्षकाचा अग्रलेख लोकसत्तात लिहून मी प्रमोदच्या हडेलहप्पीवर टीका केली होती. त्या वेळी संतापून जाऊन लोकसत्ताच्या चालकांकडे त्याने माझी तक्रार केली होती... पुढे प्रत्यक्ष भेटीत मात्र त्याचा राग निवळलेला दिसला. तशीही राजकारणातली माणसे, त्यातल्या एकदोघा दीर्घद्वेष्ट्यांचा अपवाद सोडला तर फार काळ रागलोभ धरून ठेवीत नाहीत. तसे करणे त्यांना परवडणारेही नसते. 

आपला निर्णय अचूकच असेल याविषयीचा नको तेवढा आत्मविश्वास नंतरच्या काळात प्रमोदच्या आड येत गेला. आपल्या टीकाकारांकडे व असूयाकारांकडे त्याने केलेले तुच्छतापूर्ण दुर्लक्षही त्याच्या राजकारणाआड येत राहिले. संघ परिवारात त्याचे विरोधक उभे झाले. त्याच्या वक्तव्यांवर उठलेल्या वादळांविषयी खुलासा करावा असेही त्याला कधी वाटले नाही. यवतमाळमध्ये त्याने सोनिया गांधींविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य, चंद्रशेखर यांना ‘तुम्ही फारसे चांगले पंतप्रधान नव्हता’ हे संसदेत ऐकवण्याचे त्याचे धाडस आणि संघाचे वयोवृद्ध नेतृत्व संतप्त झाल्यानंतरही त्याला यत्किंचित भीक न घालण्याचे त्याचे साहस या साऱ्यांचा संबंध त्याच्या काहीशा अहंकारी वाटाव्या अशा या आत्मविश्वासाशी होता. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यातील तणावाच्या काळात प्रमोदने त्यांच्यातील संवाद व सौहार्द कायम राखले. त्यासाठी कधी एकाचा तर कधी दुसऱ्याचा रोष ओढवून घेण्याची जोखीमही पत्करली.

राम जन्मभूमीच्या प्रश्नावर सोमनाथ ते अयोध्या ही राजकीय यात्रा काढण्याचा अडवाणींना दिलेला सल्ला प्रमोदचा. त्या यात्रेची आखणी करण्यापासून तिचे सारथ्य करण्यापर्यंतचे कामही त्याचे. त्या यात्रेत वाट्याला आलेला तुरुंगवास अडवाणींसोबत अनुभवणेही त्याचेच. वाजपेयींनी स्वतःला त्या यात्रेपासून दूर ठेवले होते. तेवढ्यावर न थांबता तिच्याविषयीची आपली नाराजी त्यांनी अनेकांजवळ बोलूनही दाखविली होती. त्या काळात मला दिलेल्या एका मुलाखतीत ‘मला हा प्रकार जराही आवडलेला नाही, माझे दुर्दैव हे की माझे पक्षात कोणी ऐकत नाही’ असे ते म्हणाले होते.

हा वाजपेयींच्या प्रमोदवरील रोषाचा काळ होता. नंतरच्या काळात त्याने अडवाणींचाही रोष ओढवून घेतला. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव वाट्याला आल्यानंतर प्रमोदने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला व तो मुंबईचे विमान गाठायला पालम विमानतळाकडे निघाला होता. वाटेत पंतप्रधान वाजपेयींचा फोन आल्याने तो परत फिरला आणि त्यांना भेटला. या वेळी वाजपेयींनी त्याला आपले राजकीय सल्लागार बनण्याची व त्या पदाला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा देण्याची गोष्ट त्याला बोलून दाखविली. त्याने ती मान्य केली व तसा त्याचा शपथविधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडला.

हे पद स्वीकारण्याआधी मी अडवाणींचा सल्ला आणि परवानगी घेतली नाही याचा त्यांनी राग धरला व तो आजपर्यंत कायम ठेवला’ ही गोष्ट खुद्द प्रमोदनेच मला त्याच्या दिल्लीतील निवासस्थानी सांगितली. अडवाणींचा हा राग 2004 मधील भाजपच्या पराभवानंतरही कायम राहिला. वाजपेयी निवृत्त होते आणि पक्षाची सारी सूत्रे अध्यक्ष व विरोधी पक्ष नेते या नात्यांनी अडवाणींच्या हाती आली होती. येथून प्रमोदचे पंख कापण्याचे काम पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने पद्धतशीरपणे हाती घेतले. 

अडवाणींनी चालविलेल्या कोंडीच्या काळात, 2004 च्या नोव्हेंबरात मी त्याला त्याच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेटलो होतो.  तासाभराच्या जुन्या नव्या गप्पांत त्याने अडवाणींच्या त्याच्यावरील रोषाविषयी सांगितले... वेंकय्या आणि जेटलींसारखी प्यादी या काळात अडवाणींनी पुढे रेटली. मुरली मनोहरांसारखी क्षीण पण महत्त्वाकांक्षी आणि मदनलाल खुराणांसारखी बोलभांड पण परिणामशून्य माणसे त्याच्यावर कुरघोडी करताना याच काळात दिसली... 

जरा वेळाने तो म्हणाला, ‘आता थोड्या वेळात महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नितीन गडकरीची नियुक्ती जाहीर होईल.’

मी चकित होत म्हटले, महाराष्ट्राचे प्रभारी पद त्याच्याकडे असताना एवढ्या महत्त्वाच्या घोषणेच्या वेळी तो घरी माझ्याशी गप्पा मारत कसा? 

‘ती नियुक्ती मला आवडणारी नाही म्हणून.’ तो शांतपणे म्हणाला. 

वाजपेयी सरकारच्या अखेरच्या काळात दिल्ली, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यांची आखणी व प्रचाराची धुरा पक्षाने त्याच्याच खांद्यावर सोपवली. त्यांतला दिल्लीचा अपवाद वगळता तीनही विधानसभा भाजपा-आघाडीने जिंकल्या. त्या बळावर लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक जिंकण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रमोदने लोकसभेच्या विसर्जनाची खेळी पक्षाच्या व रालोआतील इतर नेत्यांच्या गळी उतरवली. परिणामी 2004 मध्ये लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक झाली... प्रमोदचा अंदाज चुकला.

त्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पराभूत होऊन देशात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आले. हा पराभव प्रमोदच्या जिव्हारी लागला. त्याची संपूर्ण जबाबदारी माझी एकट्याची आहे हे त्याने प्रांजळपणे पक्षात व मित्रपक्षांजवळ बोलून दाखविले... प्रमोदच्या मावळतीला सुरुवात झाली होती. येथून वाजपेयी राजकारणातून मनाने निवृत्त होत गेले आणि अडवाणींचा पक्षावरचा वरचष्मा वाढत गेला. परिणामी त्या दोघांतल्या मध्यस्थाची भूमिका निकालात निघाली. 

पक्षातल्या अनेकांना महाजनमाहात्म्य तसेही खुपतच होते. प्रमोदवर अनेकांचा राग होता आणि तो असणे काही अंशी वैधही होते. साध्य-साधन विवेकाचा फारसा विचार त्याच्या घाईत बसणारा नव्हता. मग रिलायन्स कंपनीला त्याने दिलेले झुकते माप उघडकीला आले. मंत्रिपदाच्या काळात त्याचे अनेक उद्योगपतींशी असलेले संशयास्पद संबंध वृत्तपत्रांनी उघड केले. त्याने अल्पकाळात मिळविलेल्या कथित अमाप संपत्तीची चर्चा झाली. संघाने त्याच्या राजकारणावर ते पंचतारांकित असल्याची टीका केली आणि अरुण शौरींनी त्याच्यावर आरोपांची फैर झाडली...

यांतले सारेच खोटे वा खरे असे आज कोण सांगणार? एक मात्र खरे, जोवर प्रमोद पक्षासाठी फायदेशीर होता तोवर यातले काही कुणी कधी बोलले नव्हते. त्याचे किफायतशीरपण जसजसे संपत गेले तसतशी त्याच्याविषयी एकेक गोष्ट बोलली जाऊ लागली. त्या आरोपांना उत्तर द्यायला नियतीने त्याच्याजवळ वेळ ठेवला नाही हे त्याचे व त्याच्या चाहत्यांचेही दुर्दैव.

...या अवस्थेत असतानाच 20 एप्रिल 2006 या दिवशी सकाळी प्रवीण या त्याच्या धाकट्या भावाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पुढचे 13 दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. प्रवीणने लिहिलेले ‘माझा अल्बम’ हे पुस्तक त्याच्या प्रकाशनपूर्व काळातच मी वाचले. त्याची पत्नी सारंगी ही माझ्या एका ज्येष्ठ स्नेह्याची मुलगी. नवऱ्याच्या परीक्षेच्या काळात त्याच्यासोबत एखाद्या ढालीसारखी उभी राहिलेली. प्रवीणचे दोष तिने दडविले नाहीत आणि गुण सांगायलाही मागेपुढे पाहिले नाही. प्रवीणने प्रमोदचा केलेला खून न्यायालयाने ‘हेतूशून्य हत्या (motiveless murder)’ या सदरात जमा केला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षेचा काळ प्रवीणने मनाला जराही कमकुवत न बनविता घालवला. खटल्याच्या सुनावणीच्या वेळीही त्याची मान अपराधाच्या भावनेने वाकलेली दिसली नाही... समाजाएवढेच घरच्यांचे शिव्याशाप या काळात त्याने अनुभवले. त्याची बाजू मात्र जगासमोर कधी आली नाही...

प्रवीण पदवीधर होता. त्याचे वाचन चांगले होते... सारंगीच्या सोबतीवर त्याची अखेरच्या क्षणापर्यंत अविचल निष्ठा होती. काही इंग्रजी नियतकालिकांनी तिच्याविषयीच्या वावड्यांना आपल्या गुळगुळीत पानांवर जागा दिली तेव्हाही ते दोघे एकमेकांना धरून सारे सहन करताना दिसले...

...या साऱ्यांहून प्रमोद आणि प्रवीण यांच्या आईची वेदना मोठी होती. त्यांच्या वादात तिने सर्वस्व गमावले होते... प्रमोदच्या पत्नीसमोर तर सारा अंधारच उभा राहिला होता. असे का झाले असावे याविषयीचे तर्क बांधणेच त्या साऱ्यांविषयी आपलेपण असणाऱ्यांच्या हाती उरले. प्रवीणने आपल्या पुस्तकात प्रमोदवर अनेक आरोप केले असले तरी त्याच्या गुणवत्तेचा मात्र त्याने अनादर केला नाही. नेमका हाच त्याच्या लिखाणाचा भाग त्याच्या मानसिकतेविषयीचे तर्क बांधायला उपयोगाचा होता... 

आपल्या पुस्तकात त्याने सुरेश भटांच्या दोन ओळी उद्‌घृत केल्या आहेत. 

मी सुखवस्तू करुणेचे पाहिले हिशेबी डोळे 
तेव्हा मी त्यांच्या दारी शरमिंदा रडलो आहे...

प्रमोद दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्या साऱ्या घटनांचा परामर्श घेणारा ‘दिव्याखालच्या अंधाराची गोष्ट’ हा अग्रलेख मी लोकमतमध्ये लिहिला. तीन वर्षांची शिक्षा भोगून झाल्यानंतर प्रवीणला पॅरोल मिळाला तेव्हा पत्रकारांनी त्याला त्याची बाजू सांगायला विनवून पाहिले. त्यांना त्याने दिलेले उत्तर होते, ‘लोकमतने लिहिलेला माझ्यावरील अग्रलेख पहा. तीच माझी बाजू.’ आपली ती प्रतिक्रिया त्याने मला फोनवर कळविलीही होती.  पॅरोल संपता संपता मेंदूतील रक्तस्रावाने प्रवीणलाही मृत्यू आला.  प्रमोदसारखीच त्याचीही दशक्रिया करण्याचे दुर्दैव प्रकाश या त्या दोघांच्या तिसऱ्या भावाच्या वाट्याला आले. ती संपताना प्रकाश फोनवरून बोलताना मला म्हणाला ‘मी सारेच गमावले आहे.


















 












































No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...