Monday 30 September 2019

राष्ट्रवादीचं 'शुक्लकाष्ठ'...!

"राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी 'राष्ट्रवादींच्या मागे शुक्लकाष्ठ लागलेलं आहे...!' असं वक्तव्य केलंय. पक्षाची होत असलेली पडझड कमी होते म्हणून की आजवर त्यांचा वारस समजल्या जाणाऱ्या अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा देत काकांना धक्का दिलाय. बंड उभारल्याची चर्चा आहे. राज्यात पुतण्याचं बंड काही नवं नाही. राज ठाकरेंनी काका बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं होतं. धनंजय मुंडे यांनीही काका गोपीनाथ मुंडे यांना आव्हान दिलं होतं. पूर्वी 'काका मला वाचवा!' अशी आरोळी ठोकत पुतणे काकांना आळवत. सध्या पवारकाकांना पुतण्याची मनधरणी करावी लागतेय. ही नाराजी का कशी आणि कधीपासूनची आहे हे पाहणं गरजेचं आहे. या नाराजीचा संबंध थेट पद्मसिंह पाटलांच्या भाजप प्रवेशाशी लावणं हे गैरलागू नाही. अजितदादांची खदखद काकांना तसंच पक्षाला अडचणीत आणणारं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे 'पेल्यातील वादळ' ठरणारं चिन्ह दिसतंय!"
------------------------------
*दि* वसभर शरद पवार ईडीच्या चौकशीला जाणार असं प्रसिद्धी माध्यमं कंठरवानं सांगत असतानाच संध्याकाळी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचा वृत्तानं सर्वांनाच धक्का दिला. राजीनामा दिल्यानंतर लगेचच अजितदादा 'नॉट रीचेबल' झाले. त्यामुळं त्यांनी राजीनामा का दिला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शरद पवारांना छेडल्यानंतर त्यांनी अगदी उद्वेगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागं 'शुक्लकाष्ठ' लागल्याचं म्हटलं! या राजीनाम्यामागे अनेक कारण चर्चिले जाताहेत. त्यातलं एक प्रमुख कारण हे कौटुंबिक असल्याचं जाणवतं. पक्षात सुप्रिया सुळे यांचं वाढलेलं वर्चस्व, शरद पवारांचा वारस म्हणून रोहित पवारांचं केलं जाणारं प्रमोशन, पक्षात अजितदादांचं कमी होत चाललेलं महत्व, त्यांच्या हातून सुटत चाललेली सत्ताकेंद्र या साऱ्या प्रकारानं अजितदादांची कोंडी झाली होती त्याची परिणती ही आमदारकीच्या राजीनाम्यात झाल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. हे सारं जाणण्यासाठी थोडंस मागं जावं लागेल. अजित पवार यांनी राजीनाम्याचं कुठलंही कारण दिलेलं नाही. एवढंच नाही तर पक्षातल्या नेत्यांना देखील कल्पना दिली नाही. त्यामुळे आता वेगवेगळ्या शक्यता समोर येत आहेत. मुलगा पार्थ याच्या राष्ट्रवादीतल्या भवितव्यावरून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या नाराज होत्या, असंही बोललं जातंय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडालीय. अजित पवार मुंबईतच असल्याची बातमी मिळाली. पण त्यांचा फोन लागला नाही. याविषयी अजित पवार यांनी कुठलंही कारणही दिलेलं नाही. थेट विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा संदर्भातला ई मेल केला आणि क्षणाचाही विलंब न लावता बागडे यांनी तो मंजूरही केला. ईडीच्या चौकशीआधीच राजीनामा दिल्यानं गूढ वाढलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना या राजीनाम्याची कल्पना नव्हती. ईडी ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे त्यात दिसले नाहीत. किंबहुना त्यांना सोबत घेण्याचं टाळलं गेल्याचं दिसतं. त्याऐवजी रोहित पवार मात्र सावलीसारखे शरद पवारांबरोबर होते. हे प्रकर्षानं जाणवत होतं. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली, तेव्हापासूनच पवार कुटुंबीयांतले मतभेद उघड होत गेले. गेले काही दिवस अजित पवार निर्णय प्रक्रियेपासून दूर होते.
*अशीही सारवासारवी...!*
कालपासून नॉट रीचेबल असलेल्या अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेची सारवासारव केल्याचं दिसलं. शरद पवारांचं ईडीत आपल्यामुळं गोवलं गेलंय. माझ्यामुळं त्यांची बदनामी का? त्रास का? मी माझा राजीनामा हा सद्सदविवेककबुद्धीला स्मरून घेतल्याचं म्हटलं. हे सांगताना भावूक झाल्याचं जाणवलं. पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो त्यामुळं संपर्कात नव्हतो. शरद पवारांनी सांगितलं म्हणून आपण पत्रकार परिषद घेत असल्याचं सांगितलं. मी विश्वासात न घेता राजीनामा दिला याबद्धल मी माफी मागतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला यावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, ते राज्य बँकच नव्हे तर कोणत्याही सहकारी संस्थेचे सदस्यही नाहीत मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला असा प्रश्न केला. पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ कुणी बरखास्त केलं? त्यावेळी कोणते आरोप झाले होते. नाबार्डनं काय म्हटलं होतं? याला सोयीस्कररीत्या बगल दिली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.आर.पाटील यांनी राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला होता. जर तिथं काहीच गैरव्यवहार झाला नव्हता तर मग संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय का घेतला हे त्यांनी स्पष्ट करायला हवं होतं ते त्यांनी केलं नाही. १०० कोटीहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार हा ईडीच्या कक्षेत जातो म्हणून तो तिकडे गेला आणि त्यांनी उशिरा जा होईना ती सुरू झाली तीही न्यायालयाच्या आदेशानं. सर्वोच्च न्यायालयानं कारवाई रोखण्याला मनाई देण्यास विरोध केलाय. गुन्हा कालबद्ध कारवाईचा आदेश न्यायालयानं दिल्यानं ईडीनं कारवाई केलीय. यात महत्वाचा मुद्दा शरद पवारांवर कारवाईचा. कृषिमंत्री म्हणून शरद पवार हे नाबार्डचे चेअरमन असतात. नाबार्डनं कर्ज वाटपात आक्षेप घेतला असताना चेअरमन म्हणून त्यांनी त्यात हस्तक्षेप केला नाही म्हणून याचिकाकर्त्यांनी पवारांना दोषी धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली ती न्यायालयानं ग्राह्य धरत शरद पवार यांच्यावर कारवाई करावी असं सांगितलं आहे. हे सोयीस्कर लपवलं जातंय. ईडीच्या कारवाईचा कांगावा अजित पवार करतात पण सिंचन घोटाळ्याचं काय झालं ह्याकडं मात्र डोळेझाक करतात. आता आगामी काळात शरद पवार देतील ती जबाबदारी स्वीकारून काम करू असं सांगत आपल्या निष्ठा त्यांनी व्यक्त केल्या. पण अजित पवारांची ही खेळी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे काळच ठरवील.
*कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याची शंका*
पार्थ पवार यांच्या राष्ट्रवादीतील राजकीय भवितव्याविषयी अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार चिंतित होत्या, असं बोललं जातं. पार्थला विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठीही त्या आग्रही होत्या असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांचं शरद पवारांच्या जवळ असणं आणि त्यांचं पक्षातलं वाढतं महत्त्व, माध्यमांमधून मिळणारी प्रसिद्धी हेही कारण या राजीनाम्यामागे असू शकेल का याविषयी चर्चा होत आहेत. या राजीनाम्याला तसा काही तांत्रिकदृष्ट्या अर्थ नाही तरीही...
राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला माहिती न देता अजित पवार यांनी अचानकपणे राजीनाम्याचा निर्णय घेतला. ते उदयनराजेंविरोधात लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभे राहणार का की आणखी कुठली जबाबदारी त्यांना मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली. वास्तविक अगदी काही दिवस आधी राजीनामा दिला हे अनाकलनीय आहे. पक्षातल्या काही घडामोडींमुळे ते नाराज असल्याची चर्चाही आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. पवार कुटुंबीयांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये मतभेद होते अशी चर्चा आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारी आणि पराभवातून हे मतभेद अधिक गडद झाल्याचं बोललं जातं. राणा जगजितसिंह आणि पद्मसिंह पाटील यांचा भाजप प्रवेश सुनेत्रा आणि अजित पवार यांच्या सल्ल्यानेच झाल्याचीही चर्चा आहे. पार्थ पवार यांनी मात्र या निर्णयाविषयी आपल्याला काही माहिती नाही असं सांगितलं. पवार कुटुंबीय एकत्र येऊन गर्दी करत नाहीत. त्यामुळे ते आंदोलनापासून लांब राहिले असावेत. मरगळ आलेला पक्ष चर्चेत ठेवण्यासाठी पवारांचा काही मास्टरप्लॅन असू शकतो, असंही काही समर्थक म्हणत आहेत. पण तशी शक्यता दिसत नाही. *संख्याबळ घटत चाललंय!*
पक्षाची अवस्था तर फारच बिकट होत चाललीय. पडझड रोखण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पक्षांतर करणारे नेते हे आपण शरद पवार यांची भेट घेऊनच पक्षांतर करतो आहोत असं सांगताहेत. त्यामुळं नेत्यांमध्येच नाही तर कार्यकर्त्यातही संभ्रमावस्था आणि अस्वस्थता निर्माण झालीय. पक्षाच्या स्थापनेनंतर सुरुवातीचे चार महिने वगळता पावणेपंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या सत्तेत सहभागी होता. २०१४ च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा  नुकत्याच २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाचा जबरदस्त फटका बसला. लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीने सावरण्याचा बराच प्रयत्न केला, पण जनतेच्या मनातून उतरल्यानं किंवा मोदी लाटेत काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. राज्यात तर राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर मागं पडला. स्थापनेनंतर पक्षानं विधानसभेत स्वबळावर लढण्याचा दुसऱ्यांदा प्रयोग केला, पण पक्षाला यश मिळालं नाही. अगदी पक्षाचं वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ५८ जागांपैकी फक्त १५ जागांवरच विजय मिळाला. शरद पवार ही राज्याच्या राजकारणातील एक शक्ती असं मानलं जातं. दोन दशकांपेक्षा जास्तकाळ राज्याच्या सत्तेत पवार हे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पवार यांच्याशिवाय राज्याच्या राजकारणाची पाती हलत नाही, असं नेहमी बोललं जातं. परंतु गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकीत पवार यांच्याच नेतृत्वाखाली लढताना पक्षाला प्रथमच खूपच कमी यश मिळालं. पवार यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत राज्यात चार वेळा पक्ष स्वबळावर निवडणुकांना सामोरा गेला. १९८० मध्ये अरस काँग्रेसच्या वतीने पवार लढले तेव्हा ४७ जागा मिळाल्या होत्या. १९८५ मध्ये समाजवादी काँग्रेसला ५४ जागा, १९९९ मध्ये राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये मात्र पक्षाचं संख्याबळ घटत ते ४१वर आलं. २०१९ च्या तयारीला ते लागलेत. त्यासाठी काँग्रेसशी आघाडीही त्यांनी केलीय १२५ जागा लढविणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पण या चर्चेत अजित पवारांना फारसं विचारलं गेलं नाही.
*पक्षाची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न*
विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी कमकुवत झालेत. ही पोकळी भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता स्वत: शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पवार यांनी आतापर्यंत पक्षात वेगवेगळे प्रयोग केले. सत्ता येताच सर्व तरुण नेत्यांकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती सोपविली होती. राजकीय सारीपाटावरील सोंगट्या अलगद हलविण्याचे कसब पवारांकडे आहे. यातूनच आताही पक्षात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत छगन भुजबळ हा पक्षाचा ओबीसी चेहरा होता, पण भुजबळ अडचणीत आल्याने जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणला. पण तोही आता बदललाय अमोल कोल्हे त्यांच्याकडं ते सोपवलंय. सहकार चळवळ आणि ग्रामीण भागावरच पक्षाची भिस्त आजवर राहिलेली आहे. त्यातच मराठा समाजाचा पक्ष म्हणून पक्षाची प्रतिमा कितीही प्रयत्न केले तरी अद्यापही पुसली जात नाही.
अल्पसंख्याक किंवा दलित समाजात राष्ट्रवादीबद्दल आपुलकी नाही. आजवर मराठा राजकारणावर भर असल्याने इतर मागासवर्गीय समाजाची मतं हवी तेवढी मिळत नाहीत. यामुळेच चौकशीची टांगती तलवार असतानाही इतर मागासवर्गीय समाजाच्या सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद  ठेवण्यात आलं होतं पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने दणका दिल्यानं आता पुन्हा पक्षाचं नेतृत्व मराठा समाजाकडे दिलं गेलंय. तसेच पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्यात प्रयत्न केला जाईल. तरुण वर्गात पक्ष वाढविणे व सर्व समाजांचा पाठिंबा मिळेल, असे प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा संच, सारी ताकद, अनुभवी नेतेमंडळी तसेच शरद पवार यांचासारखे चाणाक्ष आणि राज्याची नस ओळखणारे नेतृत्व आहे. तरीही राज्याच्या सर्व भागांतील मतदारांमध्ये राष्ट्रवादी पसंतीला उतरत नाही. हेच राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान आहे. असं आव्हान असताना अजित पवारांचा राजीनामा कार्यकर्त्यांचा उत्साह कमी करणारा ठरतोय.
*सत्ता हाच राष्ट्रवादींचा विचार*
पवारांनी मध्यंतरी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांसारखे वागायला राष्ट्रवादी पक्षाचा नेमका कोणता ध्येयवाद आहे? पक्ष स्थापनेमागची नेमकी भूमिका, धोरण, तत्व, धारणा आणि उद्देश काय? संघाने त्यांच्या कार्यकर्त्यांना वैचारिक अधिष्ठान दिलंय. भले मग तो चुकीचा असेल पण राष्ट्रवादीचा विचार, धोरण ते काय? सोनिया गांधीच्या परदेशी मुद्द्यावर आणि त्यांना विरोध म्हणून स्थापन झालेला हा पक्ष! पण जेव्हा सत्ता उबविण्यासाठी पवारांनी काँग्रेसच्या सोनियांना पाठींबा दिला तेव्हाच हे सारे मुद्दे गैरलागू झाले. मग आज पक्षाचे अस्तित्व नेमकं कुठल्या आधारावर आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नक्की कुठला अजेंडा घेऊन लोकांच्या घरी जायचं? बेगडी पुरोगामीत्व घेऊन जायचं तर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्यावेळी साहेबांनी बिनशर्त पाठींबा देऊन भाजपेयींचं सरकार सत्तेत आणलं होतं. त्यापूर्वीही जनसंघाच्या पाठींब्यावरच पवार पहिल्यांदा पुलोदचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुऴे पुरोगामीत्व हा काही त्यांचा विचार नाही होऊ शकत. मग नेमका विचार काय राष्ट्रवादीचा? त्यांची वैचारिक भूमिका कोणती? राज्यातले सगळे सहकारी सम्राट, सगळे टगे या पक्षात एकवटले आहेत. त्यांची थाटामाटाची संस्कृती हीच पक्षाची संस्कृती झालीय. थाटमाट, बडेजाव, संपत्तीचा झगमगाट आणि दादागिरी या सगऴ्या गोष्टी राष्ट्रवादीला जन्मापासून चिकटलेल्या आहेत. पवार कार्यकर्त्यांना ध्येयवाद द्यायला कमी पडले. कमी पडले म्हणण्यापेक्षा त्यांनी तो दिलाच नाही. केवळ सत्ता हाच राष्ट्रवादीचा विचार आणि ध्येयवाद आणि आधार आहे.
१९५६ पासून शरद पवार राज्याच्या राजकारणात आहेत. १९६७ ला ते पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत राज्याच्या राजकारणाचा तेच केंद्रबिंदू आहेत. आजवर राज्याच्या राजकारणाचा पटच त्यांच्याभोवती फिरत राहिलाय. नंतर ते राष्ट्रीय राजकारणाचा हिस्सा झाले. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, सर्व क्षेत्रातला अभ्यास, व्यासंग, काम करण्याची तळमळ, चिकाटी असे अनेक दुर्मिळ गुण त्यांच्या ठायी आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक प्यादी, उंट, हत्ती आले आणि गेलेही!  पण पवार वजीर ते वजीरच राहिले! पवारांना वगऴून राज्याचे राजकारण आणि राज्यकारण कधी झालंच नाही किंवा करताच आलं नाही. सत्तापालट झाला तरी विरोधकांना पवारांना निस्तेज करता आलेलं नाही. हा इतिहास आहे!
पक्षाची ही अवस्था असताना अजित पवारांसारखा तडफदार, कार्यक्षम आणि सडेतोड नेत्याला पक्षांत अशी वागणूक मिळत असेल तर त्यांच्या समर्थकांनी कुणाकडं पाहायचं? २००९ च्या विधानसभेत काँग्रेसहून अधिक जागा मिळाल्या असताना त्यांनी दुय्यम भूमिका घेतली. त्यामुळं मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळू शकलं नाही. त्यामुळं अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. ही खंत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली. ५२ आमदारांपैकी ५० जणांनी अजित पवारांना पाठींबा दिला असतानाही त्यांना डावलून छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडं सूत्रं दिली गेली. सतत अजित पवारांवर अन्याय होतोय ही भावना त्यांच्या मनांत निर्माण झाली तेव्हा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पृथ्वीराज चव्हाणांच्या मध्यस्तीनंतर शरद पवारांनी अजितदादा यांची समजूत काढली आणि त्यांनी पुन्हा मंत्रिपद स्वीकारलं. हे शल्य शरद पवारांना सतत सलत असणार त्यामुळं त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अजितदादांना दूर ठेवलं. सध्याच्या सत्ताहीनतेच्या काळात, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता येण्याची चिन्हं नसताना. ईडी वा तत्सम चौकश्या होऊ शकतात ही भीती त्यांच्या मनांत असावी त्यातूनच राजीनाम्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. ते जेव्हा प्रकट होतील तेव्हाच काय ते लोकांसमोर येईल. तोपर्यंत आपण पाहात राहावं!

 चौकट....
*आजोबा आता रिटायर व्हा...!*
आई रिटायर होतेय....असं एक नाटक काही वर्षांपूर्वी रंगमंचावर आलं होतं. ते खूप चाललं. या नाटकावर मला काही लिहायचं नाही. पण एक आजोबा आता रिटायर का होत नाहीत? असा मला प्रश्न पडलाय. बरंच कर्तृत्व गाजवून झालंय. मुलं-पुतणे विविध क्षेत्रात नावांजलीत.  आपल्या विचारानं आचार करू लागलीत. परिवार चांगला फळफळलाय, पण आजोबांना स्वस्थ बसवत नाही. आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रम सांगितलाय. आजोबा मात्र उगाचच बाळसं आल्यासारखं दाखवत मुलांच्याच पायात लुडबुड करताहेत. वयोपरत्वे आजोबांचे काही निर्णय चुकताहेत असं दिसून येतंय. ज्यांनी आजोबांच्या कुटुंबाला आपलंसं मानलं, त्यांच्या वाढविस्तराला हातभार लावलाय, त्या कौटुंबिक संबंधाची जाणीव न ठेवता, आजोबांनी नातवालाच दूर लोटलंय! यानं केवळ घराण्याचंच नव्हे तर राजकीय पक्षाचं, वैचारिक बांधीलकीचं, मूल्याधिष्ठित राजकारणाचं खूप मोठं नुकसान झालंय. त्याची आजोबांना जाणीव झालेली नाही, त्यामुळं आजोबांना आता सांगावं लागतंय की, बस्स झालं आता तरी रिटायर व्हा...!! 'जातीयवादी गिधाडं गावाच्या वेशीवरच अडवा, त्यांना गावात येऊ देऊ नका...!' असा पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यांनी रुजवला, त्या आजोबांनीच आता नातवंडांवर या जातीयवादी गिधाडांचे भोई होण्याची वेळ आणलीय. राज्यातील अनेक वजनदार घराणी मोहिते पाटील, विखे पाटील यांनी, त्यांच्या नातवांनी तर कधीच भाजपत प्रवेश केलाय. त्यालाही आजोबांचं कारणीभूत ठरलेत. आता तर त्यांनी हद्दच केलीय. सगळ्यांनाच संघाचं अनुकरण करायला सांगितलंय. हे आजोबा आहेत...आपले शरद पवार साहेब!
आजोबांनी आपले स्नेही असलेल्या  विखेपाटलांच्या नातवाला, मोहिते पाटलांच्या नातवाला भाजपेयीं व्हायला भाग पाडलं गेलं. आजोबांनी मावळ मतदारसंघात असाच घोळ घातला. आपला नातू पार्थ याला आधीपासून तयारी करायला सांगितली. नंतर मात्र आपण स्वतः माढा मतदारसंघातून उभं राहणार असल्यानं पवार घराण्यातून केवळ एकचजण उभं राहील असं सांगून पार्थला उमेदवारी नाकारली. पुतण्या अजित पवारांनी पार्थची उमेदवारी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला. अखेर त्यांनाच माघार घ्यावी लागली आणि पार्थला उमेदवारी देण्याची नामुष्की ओढवली.
माढा आणि मावळ या दोन्ही मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं. आजोबांच्या या चुकलेल्या निर्णयानं सुजय आणि रणजित यांना भाजपात जावं लागलं. पार्थला उमेदवारी मिळून पराभूत व्हावं लागलं. शरद पवारांवर त्यांची आई शारदाबाई पवार यांचे संस्कार झालेले आहेत. त्या शेतकरी कामकरी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांची विचारसरणी ही पुरोगामी होती. मूल्याधिष्ठित राजकारण हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. हे सारं पाहून शरदराव घडले. महाराष्ट्र हा शरद पवारांकडे पुरोगामी नेता म्हणूनच ओळखतो. त्यामुळंच महाराष्ट्रातला तरुण त्यांच्याकडं आकर्षिला गेला. पण त्यांच्या काही निर्णयांनी अनेकांना भाजपेयीं जाण्यास भाग पाडलं. आता विधानसभेच्या निवडणुकांच्यावेळीही याचीच पुनरावृत्ती होईल! आता आपलं राजकारण बस्स झालं...! आता रिटायर व्हा...!

-हरीश केंची.
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...