Saturday 21 September 2019

दुर्गोत्सव की मतोत्सव...!

"बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या दोघांचे हसरे फोटो मीडियात व्हायरल झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकी दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजपेयींशी, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी व्यक्तिगत वैर घेतलं होतं. मग ममता बॅनर्जी यांना अचानक काय झाले की ते आता पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेत आहेत? त्यावर कडी म्हणजे ममता बॅनर्जी या गुरुवारी थेट अमित शहा यांनाही भेटल्या. त्याचे कारण त्यांनी एनआरसी यादी सांगितले असलं तरी प्रत्यक्षात वेगळं काहीतरी दिल्लीत शिजतेय आणि त्याचा सुगावा लागल्यामुळं ममता बॅनर्जी या थेट दिल्लीत पोहचल्या, अशी चर्चा आता सुरू झाली आहे."--------------------------------------------------

*सुदिप्ता सेन यांच्यावरील कारवाईचा परिणाम*
ममता बॅनर्जी या शारदा चिटफंड प्रकरणात अडकल्या आहेत. त्यांचा विश्वासू सहकारी सुदिप्ता सेन हे या चिटफंड प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. सीबीआयनं त्यांना अटक केल्यास ममता बॅनर्जी यांनाही जेलमध्ये जावं लागणार आहे. तर दुसर्‍या बाजूला ईडीनंही सुदिप्ता सेन यांच्याविरुद्ध पाश आवळत आणले आहेत. त्यामुळे सेन यांचा जीव गुदमरायला लागलाय. परिणामी सेन यांच्यात जीव असलेल्या ममता बॅनर्जी याही सध्या अस्वस्थ झाल्या आहेत. सीबीआय आणि ईडीची कारवाई रोखायची असेल वा प्रलंबित करायची असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मनधरणी करायला हवी. त्या हेतूनंच ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या वारीवर असल्याचं सूत्रांकडून समजतंय. स्वत: ममता बॅनर्जी यांनी या भेटीचं कारण एनआरसी यादी सांगितलं असलं तरी त्यांच्या पाठिशी बसलेलं  चिटफंडचं भूत उतरवण्यासाठीच त्यांनी मोदी, शहांची भेट घेतल्याची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. आपल्या राज्यातील कोळसा खाण प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी निमंत्रण दिलं. या निमित्तानं या दोन नेत्यांमध्ये एक बैठक झाली आणि त्यानंतर ममतांचा नूरच पालटल्याचं मत अनेकांचं झालंय. मोदींना भेटल्यानंतर त्यांनी अमित शहा यांचीही भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या काही वेगळ्याच ममता असल्याचं मत राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात आलं. खासकरून भाजपेयीं नेत्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना राष्ट्रीय राजधानीतील ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी वेगळ्या असल्याचा भास झाला नसल्यास नवल नाही. आता ममतांचा हा अवतार लोकांना कितपत मानवेल, हा खरा प्रश्न आहे.

*एनआरसीचा मुद्दा सोडून दिला*
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या बॅनर्जी यांनी सातत्यानं भाजपविरोधी भूमिका घेतलीय. फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांनी स्वतःची ओळख विकसित केलेली आहे. अशा परिस्थितीत मोदी-शहा दुकलींबाबत त्यांनी दाखवलेली ‘ममता’ कोणाच्याही पचनी पडलेली नाही. हे म्हणजे ममतांनी आत्मसमर्पण केल्यासारखे आहे, अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केलीय. “हे म्हणजे ममता बॅनर्जींनी वरिष्ठ डॉक्टरांची भेट घ्यावी, त्यांची मदत घ्यावी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी तिला कनिष्ठ डॉक्टरांकडे पाठवावं, असा प्रकार झाला,” अशा शब्दांत काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या घटनेचं वर्णन केलंय. त्यांचा संदर्भ अर्थातच बॅनर्जी यांनी शहा यांना भेटण्याच्या निर्णयाशी होता.
बुधवारी मोदींची भेट घेतल्यानंतर आपण शहांना भेटण्यास उत्सुक असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं. ‘मला वेळ मिळाला तर मी उद्या श्री. शहा यांना भेटेने’, असं त्या म्हणाल्या.
“पंतप्रधानांना भेटल्यानंतर ममता बॅनर्जींना फक्त विकासाच्या मुद्द्यांवर  चर्चा करायची असेल तर सामान्यपणे त्यांनी त्यांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे जायला हवं. त्यामुळे हा विषय वेगळा आहे,” असं चौधरी म्हणाले. चौधरी यांच्या प्रमाणेच अन्य अनेक नेत्यांनीही ममतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केलंय. मोदींची भेट घेताना ममतांनी राष्ट्रीय नागरिकता नोंदवहीच्या - एनआरसी अंमलबजावणीबाबत चर्चा का केली नाही, असा प्रश्न बंगालमधील डाव्या नेत्यांनी केला. “बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच कोलकात्यात रस्त्यावर आंदोलन केलं आणि त्या बंगालमध्ये एनआरसीला परवानगी देणार नाहीत, असं म्हणाल्या होत्या. मात्र जेव्हा त्यांनी मोदींची भेट घेतली तेव्हा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यानंतर एनआरसी हा केवळ आसाम राज्याचा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. मग कोलकात्यात त्या निषेध का करत होत्या,” असा सवाल माकपचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी केला. याचं कारण म्हणजे मोदींना भेटल्यानंतर बॅनर्जी म्हणाल्या होत्या, एनआरसी हा १९८५ मध्ये झालेल्या आसाम करारावर आधारित असा आसाम राज्यापुरता मुद्दा होता. त्यामुळे तो चर्चेत आला नाही.

*सारं काही सारदा चिटफंड कारवाईसाठीच*
विरोधी पक्षांना भेडसावणाऱ्या या शंकांमागं एक कारण असं आहे, की ममतांच्या या घुमजाव मागं 'सारदा चिट फंड' प्रकरणाची चौकशी असल्याचा संशय त्यांना आहे. या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठीच त्यांनी हा ‘स्वार्थी’ पवित्रा घेतल्याचा आक्षेप या नेत्यांनी घेतलाय. काही दिवसांपूर्वी सारदा चिट फंड प्रकरणी केंद्रीय अन्वेषण खात्यानं कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना जवळजवळ अटक केली होती. सध्या हे राजीव कुमार गेल्या काही दिवसांपासून पोलिस फरार आहेत. राजीव कुमार हे ममतांचे यांच्या जवळचे समजले जातात आणि म्हणूनच ममतांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जुळवून घेण्याचे धोरण आखलंय. खासकरून पी. चिंदबरम आणि डी. के. शिवकुमार यांना ज्या पद्धतीनं तुरुंगात जावं लागलंय त्यानंतर त्यांच्या आक्रमक पावित्र्यात खूप बदल झालाय. म्हणूनच बुधवारी त्यांनी पंतप्रधानांना बीरभूम जिल्ह्यातील कोळसा खाणीच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं आणि बंगालच्या नामांतराबाबत त्यांना पूर्ण मोकळीक दिली. अर्थात त्यांच्या या बदलाला खूप उशीर झालाय, असं बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष म्हणाले. बंगालचेच आणखी एक भाजप नेते राहुल सिन्हा यांनीही त्यात भर टाकलीय. “ममता बॅनर्जी राज्याशी संबंधित कोणत्याही कामांसाठी प्रधानमंत्री मोदींना भेटल्या नाहीत.  केवळ सारदा चिटफंड प्रकरणात आपल्या पक्षाला वाचविण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली,” असं ते म्हणाले. याबाबत मत-मतांतरं व्यक्त होत राहतीलच. मोदी आणि शहांच्या एका प्रमुख विरोधकाच्या या बदलाला कोणीही खुल्या मनानं स्वीकारणार नाही, हेच त्यातून अधोरेखित होत राहील! ममतांच्या या दिल्लीवारी आपण पाहिली आता बंगालमधलं राजकारण पाहिलं तर समजून येईल की, हे सारं सत्ता टिकवण्यासाठीची धडपड आहे!
*दुर्गोत्सव की मतोत्सव...!*
दुर्गामाता कुणाची...? असा प्रश्न आजवर बंगालमध्ये कधीच उभा राहिला नव्हता. दुर्गापूजा ही बंगालची ओळख आहे. दुर्गामातेची पूजा केवळ हिंदूच करू शकतात अशी भूमिका घेऊन कलकत्त्याच्या बजरंग दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढं आव्हान उभं केलंय. भाजपेयींशी संबंधित संस्था, संघटना यांनी बंगालमधला संपूर्ण दुर्गापूजा महोत्सव हायजॅक करायचं ठरवलेलं दिसतं. दुर्गापूजेचा उत्सव करणाऱ्या मंडळांना जेवढी मदत ममता सरकार करते त्याहून अधिक मदत करण्याची ऑफर भाजपेयीं करताहेत. भाजपेयीं आजवर धार्मिक सणांचा उत्सवांचा उपयोग मतं मिळविण्यासाठी करत आले आहेत. हे लपून राहिलेलं नाही.  यंदाचा हा दुर्गापूजा उत्सवात ज्याप्रमाणे तृणमूल काँग्रेस आणि भाजपेयीं यांच्यात रस्सीखेच सुरू आहे हे पाहता दुर्गोत्सव मतोत्सव होण्याची चिन्हं आहेत. ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजा साजरा करणाऱ्या मंडळांना खास सबसिडी आणि रोख रक्कम देत आपल्या पक्षाच्या बाजूला त्यांना वळविण्याचा प्रयत्न चालवलाय. पण लोकसभा निवडणुकीत ४२ पैकी १८ जागा मिळवणाऱ्या भाजपेयींनी यावेळी दुर्गेला आपल्याकडं खेचून घेण्याचा प्रयत्न चालवलाय. गृहमंत्री अमित शहा हे अनेक मंडळांच्या उदघाटनाला येणार असल्याचं जाहीर झालंय. शिवाय केंद्रीय मंत्र्यांना स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत की, दुर्गोत्सवात त्यांनी तिथं एखाद दुसऱ्या मंडळाला भेट दिलीच पाहिजे.

*दुर्गोत्सव हायजॅक करण्याचा भाजपचा प्रयत्न*
प्रत्येकाला माहिती आहे की, भाजपेयींना दुर्गोत्सवाऐवजी बंगालची सत्ता मिळविण्यात त्यांना विशेष रस आहे. त्यासाठी त्यांना कब्जा मिळवायचा आहे. कोणताही धार्मिक उत्सव हा भाजपेयींसाठी सफलतेचा मार्ग ठरलेला आहे नि नेहमीच ते लाभदायक ठरलेलं आहे. दुसऱ्या बाजूला दुर्गोत्सवाच्या काळात अधिक सरकारी सुट्ट्या जाहीर करून लोकांना आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी करताहेत. तसं पाहिलं तर सुरू दुर्गोत्सवाला मतोत्सव बनविण्याचा खेळ ममता बॅनर्जी यांनीच सुरू केलाय. बंगालमध्ये जेव्हा डाव्यांचं सरकार होतं तेव्हा कोणत्याही डाव्या नेत्यांच्या नावाचं मंडळ नव्हतं. ममतांचं शासन आल्यानंतर ममतांच्या नेत्यांच्या नावानं मंडळं उभी राहायला लागली. ममतांनी अशा मंडळांना आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली. ममता केवळ मदरसांनाच मदत करते असं वाटू नये म्हणून मग दुर्गोत्सव करणाऱ्या मंडळांनादेखील आर्थिक मदत सबसिडी द्यायला सुरुवात केलीय. पण त्याकाळी ममतांना बंगालमध्ये कुणी प्रतिस्पर्धी नव्हता. त्यामुळं त्या जे काही करत ती सेवा समजली जात असे. पण धर्माच्या नावानं सर्वाधिक राजकारण करणाऱ्या भाजपेयीं कट्टर प्रतिस्पर्धी बनलेला आहे. आणि सत्ता खेचून घेण्याचा प्रयत्न चालवलाय. यंदाचा हा दुर्गोत्सव धर्मिकपेक्षा राजकीय टच असलेला होणार आहे. डाव्यांचं सरकार ३५ वर्षाहून अधिक काळ बंगालमध्ये होतं. त्याकाळी आपल्याकडं जसं गणेशोत्सवात वर्गणी मागून उत्सव साजरा करतो अगदी त्याच धर्तीवर लोकवर्गणीतून दुर्गोत्सव होत असे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची सत्ता येताच लगेचच त्यांच्या नेत्यांच्या नावांची मंडळं उभी राहायला लागली. तृणमूल काँग्रेसला जे वाटेल त्याच नेत्याला तिथं बोलावलं जात असे. पण आता हे वातावरण बदललंय. बाजी उलटलीय. यंदा भाजपेयीं प्रत्येक लहान लहान गावांत दुर्गापूजा करणार आहे. त्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधणार आहे. याच काळात भाजपशी संबंधित  योगी, संत, धार्मिक गुरू यांना बंगालच्या रणभूमीवर उतरवणार आहे; आणि संपूर्ण दुर्गोत्सव हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या बंगालमध्ये भाजपचे केवळ तीन आमदार आहेत. पण लोकसभेतील १८ जागा जिंकल्यानंतर त्यांच्यातला आत्मविश्वास वाढलाय. तीन आमदार असलेल्या भाजपेयींची ममतांनी कधी फारशी दखल घेतली नव्हती. त्यामुळं ममता ह्या अंधारात राहिल्या आणि भाजपेयींनी लोकसभेच्या १८ जागा खेचून नेल्या. त्यानंतर त्या खडबडून जाग्या झाल्या. भाजपेयीं म्हणतात लोकसभेसारखंच वातावरण राहिलं तर २९४ पैकी २०० जागा आम्ही सहज जिंकू आणि ममतांना घरी पाठवू. असं घडलं तर तो एक इतिहास असेल! निवडणुकीचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ममतांना सांगितलं आहे की, जर दुर्गापूजा हातून गेली तर विधानसभाही हातून जाईल. त्यामुळं ममतांनी दुर्गापूजेवर विशेष लक्ष घातलंय. गेल्यावर्षी मंडळांना २५ हजार रुपयांची मदत ममतांनी केली होती ती आता वाढविली जाणार आहे.  वीजबिलात २५ टक्के सबसिडी होती ती आता ५० टक्के केली जाणार आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...