Saturday 31 March 2018

धारकऱ्यांनो, समतेच्या वारकऱ्यांनो....जरा जपून!

*धारकऱ्यांनो, समतेच्या वारकऱ्यांनो…...जरा जपून!*

"भीमा कोरेगाव प्रकरणानंतर आव्हान-प्रतिआव्हान पाहायला मिळालं. प्रकाश आंबेडकरांनी मोर्चा काढून संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली तर संभाजी भिडेंच्या समर्थकांनीही आपली ताकद दाखवत प्रकाश आंबेडकरांना अटक केली जावी अशी मागणी केली. यासाठी निळा झेंडा फडफड फडकवीत मुंबईत सरकारला इशारा दिला. भगवा खांद्यावर घेऊन संभाजी भिडेंचे समर्थक राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले. दोघांनीही राष्ट्रपुरुषांच्या साक्षीनं महाराष्ट्रात जातीयवाद पेटविण्याचा प्रयत्न केलाय. भीमा कोरेगावात जे घडलं ते लवकर विसरलं जावं म्हणून सर्वांनीच प्रयत्न करायला हवा. दलितांमध्ये कटुता जरूर आहे. ग्रामीण भागातील दलित बांधव सैरभैर झालेत. दुष्टबुद्धीच्या लोकांना आवरण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यायला हवाय. एकमेकांचा आदर ठेऊन, एकमेकांचा विश्वास दृढ करायला हवाय. आपल्या भागात कुणी दुष्ट लोकांना चिथवण्याचं काम कुणी करत नाही हे बघायला हवंय. दुसऱ्याला दुखवणारी भाषा, हेटाळणी आणि प्रक्षोभ वाढेल असं कृत्य न करण्याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवीय. काहींना इतरांचं भवितव्य उध्वस्त करण्याची लालसा लागलीय. त्यांच्यापासून दूर राहायला हवंय. महाराष्ट्र हा राष्ट्राचा आधार आहे. तो कमकुवत करण्यात निदान आपला तरी सहभाग नसायला हवाय. एवढी खबरदारी प्रत्येकानं घेतली तर सामाजिक सौहार्द टिकून राहील. मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावचा प्रश्न  सामंजस्याने सोडवायला हवाय. समाजमन भंगलं आहे. भीमा कोरेगावचा प्रश्न ही महाराष्ट्राच्या राजकारणातली वेदनादायक पाचर ठरलीय. ती दूर करायला हवीय!"
--------------------------------------------
*भी* मा कोरेगावच्या प्रकरणानंतर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. एक मराठा लाख मराठा म्हणत...मराठा समाजाचे सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे मोर्चे निघाले! पाठोपाठ जय मल्हार म्हणत... धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा निघाला! बसवेश्वरांच्या जयघोष करीत लिंगायत समाज रस्त्यावर उतरला....! शेतकऱ्यांचं लाल वादळ सरकारवर आदळलं....! या साऱ्या लोकप्रक्षोभातून सरकार सावरतेय असं म्हणत असतानाच प्रकाश आंबेडकरांचा एल्गार मोर्चा निघाला भीमा कोरेगाव प्रकरणात मिलिंद एकबोटेला अटक झालीय पण संभाजी भिडेंना झाली नाही म्हणून हा 'नको पेशवाई, हवी लोकशाही' म्हणत निघालेला मोर्चा, आणि याला आव्हान देणारा शिव प्रतिष्ठान या संभाजी भिडेंच्या समर्थकांचा इशारा देणारा मोर्चा निघाला! हा वाद आता आणखी पेटणार असं दिसतंय. एकानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन लढा उभारलाय तर दुसऱ्यानं छत्रपती शिवराय यांच्या नावानं आपलं घोडं पुढं दामटण्याचा प्रयत्न चालवलाय. 'देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ माजवावा।।' या न्यायानं हे सारं चाललंय. जातीच्या अस्मितेनं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केलीय.

*सामाजिक सामंजस्य जाळणाऱ्या द्वेषाची आग*
भीमा कोरेगावची दुर्घटना हे एक राजकीय षडयंत्र होतं. या मागे निश्चित अशी योजना होती, राजकारण होतं. ते शोधण्यासाठी शांततामय मार्गानं आंदोलन झालं असतं तर पुढच्या घटना टळल्या असत्या. या दुर्घटनेमागचे समाजद्रोही हातही उघड्यावर आणणं सोपं गेलं असतं. पण असल्या सामंजस्याचा व्यवहार आपल्याला शोभत नाही असा बहुदा बऱ्याच राजकारण्यांचा समज आहे. या समजामुळेच सामाजिक सामंजस्य जाळणारी द्वेषाची आग भडकते आहे. त्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजणं हा राजकारण्यांचा धंदाच आहे. याची जाण छत्रपती  शिवाजीमहाराजांचं किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत मोर्चे काढणाऱ्यांमध्ये नसेल, तर ते या महापुरुषांचं नाव घेण्यास लायक नसतील वा मूर्ख तरी असतील. असंच म्हटलं पाहिजे. आपल्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींसाठी रस्त्यावर येऊ नि कायदा हातात घेऊ हा व्यवहार डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींना प्राणपणाने जपणाऱ्यांसाठी शोभादायी नाही. त्यामुळं बाबासाहेबांचा, त्यांच्या बुद्धिबळातून निर्माण झालेल्या राज्यघटनेचा, त्यातून तयार झालेल्या कायद्याचा अपमानच होतो. हे स्वतःला आंबेडकरी जनता म्हणवून घेणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. जे करायचं ते बुद्धिबळानेच, अशी जेव्हा निश्चयी कृती होईल, तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा सार्थ गौरव होईल. असाच गौरव छत्रपती शिवरायांचाही व्हावा. रणधुमाळीत धुळीत माखलेलं 'कुराण' सन्मानानं शत्रूंच्या छावणीत शिवाजी महाराजांनी धाडलं होतं, असा इतिहास आहे. अल्लाचं नाव घेत मंदिरं फोडली म्हणून 'हर हर महादेव' करीत छत्रपती शिवाजी महाराज मशिदींवर चाल करून गेले, असा इतिहास नाही. शिवाजी महाराजांनी शत्रुत्वातही माणुसकी जपली, स्वधर्माप्रमाणे परधर्माचाही आदर राखला म्हणून ते काळालाही पुरून साडेतीनशे वर्ष जगलेत. अजरामर झालेत. निर्बुद्ध दगडाला दगडाने उत्तर दिल्यानं शिवरायांच्या विचारांची ठिणगी पेटत नाही. अशा टक्करीनं अविचाराची आग मात्र जरूर पेटते.

*बुद्धीची दौलत गहाण टाकू नका*
राजकारणी हे मदाऱ्यासारखे आहेत. त्यांच्या स्वार्थासाठी आपण आणखी किती काळ माकड व्हायचं, याचा विचार जेव्हा सर्वच राजकीय पक्षातले कार्यकर्ते, अनुयायी करतील तेव्हा भीमा कोरेगाव सारख्या दुर्घटना चुकूनही घडणार नाहीत. त्यासाठी प्रत्येकानं आपण माणूस आहोत याची कायम जाणीव ठेवून, माणूस म्हणून मिळालेली बुद्धीची दौलत कुणाच्या पायाशी गहाण न ठेवता ती घडल्या घटनेचा, दुर्घटनेचा विचार करण्यासाठी वापरली पाहिजे. अशा विचारातूनच माणसाची माती करणाऱ्या पुतळ्यांच्या राजकारणाला मूठमाती मिळेल. दुर्दैवानं आज नेमकं हेच घडत नाही. महापुरुषांच्या, वीरांच्या स्मृती जागविण्यासाठी त्यांना मरणोत्तर पुतळे तयार करण्यात येतात. राष्ट्राच्या उद्धारासाठी अवघं आयुष्य झटणाऱ्या, झिजणाऱ्यांची याद चिरंतन राहावी यासाठी अशा प्रतिमांची आवश्यकता असते. आज देशात पुतळ्यांच्या काही कमी नाही. कमी आहे ती अशा स्मृती जागरणातून प्रेरणा घेऊन ऐतिहासिक कार्य करणाऱ्यांची!

*जातीचे पदर संपले नाहीत*
धर्मकर्मकांड गाडण्यासाठी जातीय अस्मितेच्या नावाखाली चाललेली उच्च-नीचता नष्ट करण्यासाठी समानतेचा गजर करीत वारकरी संप्रदायाची पताका फडकविण्यात आली. याद्वारे झालेल्या परिवर्तनातून सर्व जातीत संत निर्माण झाले. संत एका माळेत आले पण जातीचे पदर संपले नाहीत. पुतळा झालेल्या राष्ट्रपुरुषांची स्थिती संतांपेक्षा वेगळी नाही. त्यांनाही अस्मितेचा अहंकार सांगत कुणी कुणी वाटून घेतलंय. महाराष्ट्रात जागोजागी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे दिसतात. त्यातून या तिघांच्या विचारकार्याच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल चाललीय, असं मात्र दिसत नाही. या तिघांचीही वाटणी त्यांच्या तथाकथित समर्थकांनी संतांसारखी करून घेतलीय. ही वाटणी प्रतिपक्षाची छाटणी करण्यासाठी वापरण्यात कुणाला गैर वाटत नाही. याचं शल्य आहे.

*लोकनेतृत्वाला तत्वं सोडावी लागतात*
माणसाचा मोठेपणा त्याच्या सावलीवरून ठरतो. ही सावली ही त्याच्या कार्य-स्मरणाची असते, भारतीय राजकारणात अनंत व्यक्तिमत्वांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. परंतु त्या सर्वात छत्रपती शिवराय, महात्मा गांधी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव अजोड आहे. त्यांच्या केवळ स्मरणाने पिढ्यानपिढ्यांना सन्मानानं जगण्याचं बळ मिळतंय. राष्ट्रनिष्ठेचा संस्कार मिळतोय. या तिघांच्या नेतृत्वात, कर्तृत्वात असं कोणतं वेगळेपण होतं? हे तिघेही लोकनेते होते. तथापि त्यांच्या लोकनेतृत्वाला तत्वांची बैठक होती. आणि ती तत्वं प्रत्यक्षात आणण्याचा आग्रही ध्यास हा त्यांच्या कार्यातील विशेष होता. लोकनेतृत्व करायचं तर तत्वं प्रसंगी गुंडाळून ठेवावी लागतात. आणि तत्वांचा आग्रह धरायचा तर लोक मागे येत नाहीत, असा भारतीय समाजकारणाचा इतिहास आहे. वर्तमान त्याची साक्ष देण्यास पुरेसा आहे. परंतु शिवाजी महाराज, महात्मा गांधी, आणि डॉ. आंबेडकर या इतिहासाला अपवाद ठरले म्हणूनच ऐतिहासिक झाले.

*स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता महत्वाची*
छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी राज्याचीच नव्हे स्वराज्याची कल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना 'चलेजाव' म्हणतानाच येणाऱ्या स्वातंत्र्यात लोकस्वातंत्र्य असावं, हा आग्रह धरला. डॉ. आंबेडकरांनी तर सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी अवघ्या आयुष्याचाच होम केला. भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीचं सार या त्रिमूर्तींच्या स्वराज्य, स्वातंत्र्य, समता या तत्वांत आहे. राष्ट्र उभारणारी, घडवणारी ही तत्वंच राष्ट्रसूत्रं झाली आहेत. त्यात समाजाला संघटितपणे पुढे खेचण्याचं सामर्थ्य आहे. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता या तीन तत्वांची गुंफण आणि त्यातून निर्माण झालेली लोकशाही हेच ह्या त्रिमूर्तींचं लोकोत्तर कार्य आहे. परंतु प्रत्यक्षात हेच कार्य विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून पुजलं-भजलं जातंय. ते गैर आहे. या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या-मयंत्यांच्यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा लागतो, ही तर सगळ्यांच्यासाठी शरमेची गोष्ट आहे. राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा घोर अपमान आहे. स्वराज्यात स्वातंत्र्य हवं, स्वातंत्र्यात समता हवी आणि समता नसलेल्या स्वराज्याची किंमत ती काय? स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता या तत्वांची थोरवी जशी परस्परांवर अवलंबून आहे तशीच शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचीही ऐतिहासिकता परस्परांवर आधारलेली आहे. तेव्हा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणताना जय शिवाजी! जय गांधीजी असाही जयजयकार व्हायला हवा. कारण स्वातंत्र्य आणि समतेशिवाय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची महती स्पष्ट होऊ शकत नाही.

चौकट............

*'सेक्युलॅरिझम' एक भंपक शब्द!*
भारतीय राजकारणात 'सेक्युलॅरिझम' सारखा दुसरा भंपक शब्द नाही. मात्र हा शब्द तोंडात असला की, कुणावरही लोकशाहीद्रोहाची पिचकारी मारण्याचा जणू परवानाच मिळतो. सरकारच्या कामकाजात येणारे अडथळे दूर ठेवण्याऱ्या मोदींनाही या पिचकाऱ्यांची आफत टाळण्यासाठी 'आम्हीही सेक्युलर... सेक्युलर' असा जप करावा लागला. सेक्युलॅरिझम म्हणजे काय? सर्वधर्मसमभाव की निधर्मीवाद ते तरी एकदा स्पष्ट करा! धर्म, जाती, जमातींचा अहंकार फुलविणारा सर्वधर्मसमभाव हा कुठल्याही जातीय धर्मवादापेक्षा अधिक खतरनाक आहे. म्हणूनच खऱ्या लोकशाहीसाठी सर्वच जाती-धर्माचा अहंकार ठेचणारा, गाडणारा निधर्मीवादच हवा. अशा सेक्युलॅरिझमचा आग्रह जातीय-धर्मवादाला विरोध करणारे करतात का? भारतातल्या सर्वच राजकीय पक्षांचं-विचारवादाचं राजकारण जाती-धर्माच्या मतांचे हिशोब मांडून केलं जातंय. कुणी ह्या हिशोबात प्रांतिक अस्मिता मिसळवतो. सगळेच स्वार्थाच्या कोषात गुरफटलेले; पण आव असा आणतात की, हेच काय ते देशकल्याणाचा विचार करतात. जातीय-धर्मीय-प्रांतीय अस्मितांत गुरफटलेल्या या स्वार्थी कोषांना भाजपेयींनी आपलं सत्तावस्त्र तयार करण्यासाठी कामास आणलं. पूर्वी अशीच हिशोबी कामगिरी करून काँग्रेसवाले सत्ता मिळवायचे. आता तोच मार्ग भाजपनं वापरला तर सेक्युलरवाद्यांच्या मोटीने केवढा खडखडाट केला! तथापि या सेक्युलर खडखडाटाने आणि सत्ताबळ देणाऱ्या मित्रपक्षांच्या थयथयाटाने भाजपला आपल्या हिंदुत्वाला आग्रही पीळ देणारे मुद्दे जानव्यासारखे खुंटीला टांगावे लागलेत. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिराप्रमाणे काशी-मथुरा मुक्तीचा मुद्दा बासनात गुंडाळून ठेवावा लागला. काश्मीरला स्वायत्तता देणारं ३७० कलम रद्द करण्याचा आग्रह सोडावा लागला. देशभर समान नागरी कायदा लागू करण्याचा निश्चय मोडावा लागला. या तीनही मुद्द्यांवर भाजपने आपल्या परिवारासह अभियान छेडून जनमत तयार केलं होतं. ३७० कलम रद्द करण्यासाठी आणि समान नागरी कायदा लागू करण्यासाठी लोकसभेत दोन- तृतीयांश मतांची आवश्यकता आहे. मोदी सरकारकडं बहुमत असलं तरी मित्रपक्षाची या बदलास मान्यता दिसत नाही. भाजपला जी मतं मिळाली आहेत ती याच पिळदार हिंदुत्वाच्या मुद्यासाठी! ' सबका साथ सबका विश्वास, बरोबरच भय-भूक-भ्रष्टाचार निर्मुलन' ही देखील भाजपची निवडणुकीत घोषणा होती; तरी त्यावर विश्वास ठेवून कुणी भाजपला मतं दिलेली नाहीत. 'स्थिर सरकार' हा देखील भाजपचा एक मुद्दा होता. हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाताना मित्रपक्षांची साथ होती. त्यांच्या साथीनंच मोदींची सत्ताबारी सुरू झाली. मात्र आज एक एक करीत मित्र पक्ष साथ सोडतोय. त्याबाबत भाजपेयी गंभीर दिसत नाही. तो त्यांचा अंगीभूत स्वभावच आहे. मित्रपक्षाचं रूप धारण करून त्यांनाच संपवायचं हा त्यांचा डाव राहिलेला आहे. जनमताची माती करणारा हा खेळ अंगलट येऊ शकतो.

- हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...