Sunday 25 March 2018

संघ, महात्मा गांधी आणि सावरकर

 *संघ, महात्मा गांधी आणि सावरकर...!*

"महात्मा गांधी यांच्या खुनाबाबत आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जबाबदार धरलं जातंय, पण त्यांच्या भूमिका काय होत्या. महात्मा गांधी हे रा.स्व.संघ, सावरकर आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी निर्माण केलेल्या जातीय विद्वेषी वातावरणाचा बळी होते की, हिंदुस्तानच्या फाळणीच्या वैफल्याचे ते बळी होते? भाजपेयींच्या प्रात:स्मरणीय नेत्यांमध्ये सावरकर समाविष्ट झाले आहेत. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञानवादी विचारतत्वांशी विसंगत अशी भूमिका भाजपेयी आज घेताहेत. त्यांनी अंधश्रद्धा, वेदप्रामाण्य पुराणातील भाकडकथा त्यावरील व्रतवैकल्ये, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, स्पृश्य-अस्पृश्य, गोहत्याबंदी, जातीयता याचा आयुष्यभर विरोध केला, कडक शब्दात त्यावर टीका केली. पण आज भाजपेयी आपल्या सत्ताकांक्षी भूमिकेसाठी सावरकरांचा सोयीस्करपणे कसा वापर करताहेत. त्याचबरोबर पाठयपुस्तकांत हिंदुत्ववादी विचार कसे घुसविले जाताहेत, ह्या साऱ्यांचा घेतलेला हा वेध...!"
----------------------------------------------

*म* हात्मा गांधींचा खून झाला त्याला सत्तर वर्षाचा काळ लोटला, पण अजूनही या घटनेबाबत चर्चा होत असते. मध्यंतरी कुणीतरी गांधींचा खून खटला पुन्हा चालवावा,त्याचा तपास पुन्हा नव्याने करण्यात यावा. यासाठी न्यायालयात धाव घेतली, पण न्यायालयानं तो अर्जच फेटाळला. नुकत्याच झालेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला कौरवाची उपमा दिलीय. संघाला लक्ष्य करताना काँग्रेसी मंडळी नेहमीच  महात्मा गांधी यांच्या खुनाचा विषय पुढे करतात. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा महात्मा गांधींजींचा खुनी आहे असं वक्तव्य यापूर्वी केलं होतं आणि न्यायालयीन कचाट्यात ते अडकले. पण अधूनमधून ते असं सूचक वक्तव्य करीत असतात.काँग्रेसी मंडळी देखील संघ आणि भाजपेयींना खुनशी दाखविण्यासाठी उठसुठ गांधींच्या खुनाचा उल्लेख करत असतात.

*मतभेदातून संघ परिवार विस्तारला*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महात्मा गांधींचा खुनी म्हणणं, हा काँग्रेसीजनांचा अतिरेकीपणा आहे. रा.स्व.संघाच्या विषमतावादी चातुर्वणी बनेल विचारधारेबद्धल अथवा भावनिक भडका उडवत आपला कार्यभाग उरकणाऱ्या कार्यपद्धतीबद्धल मतभेद असू शकतात. असे मतभेद खुद्द संघ परिवारात आहेत. तथापि या मतभेदांचा परिणाम संघाला हानिकारक ठरण्याऐवजी फायदेशीर ठरलाय. अशा मतभेदांतूनच नवे नवे मुद्दे पुढं आले आणि या मुद्द्यावर स्वतंत्रपणे कार्य-संघटन करण्याची मुभा संघ नेतृत्वाने दिली. त्यांच्या सेवा-संस्था-संघटन कार्याला सहकार्य दिलं. त्यातूनच संघ परिवार विस्तारला. केंद्रासत्तेपर्यंत पोहोचला. संघ खुनशी विचाराचा असता तर संघ परिवार विस्तारणं, सत्ताधारी होणं शक्य नव्हतं. लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्षपणे वावरणाऱ्या कुठल्याच संस्था-संघटनांची विचारधारा खुनशी असू शकत नाही.

*स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणारे मुस्लिमविरोधी*
भारतात संसदीय लोकशाही आहे. संघ अध्यक्षीय लोकशाहीचा आग्रह धरणारा आहे. ही मतभिन्नता पद्धतीबाबत आहे. पण त्यात लोकशाहीचाच पुरस्कार आहे. यामुळेच राहुल गांधी आणि त्यापूर्वी अर्जुनसिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली गेली, खटले दाखल केले गेले. काँग्रेसीजनांचा संघावरचा आरोप काही नवा नाही. महात्मा गांधी खून खटल्याच्या वेळेस या आरोपांच्या अनुषंगाने चर्चाही झाली होती. त्यावेळी रा.स्व.संघ आणि हिंदू महासभेला बंदीचा फटका बसला होता. सावरकरांवरही आरोपांचा ठपका होता. कारण गांधींजींचा खून करणारा नथुराम गोडसे हा संघ आणि हिंदू महासभेशी संबंधित होता. तो संघाचा बौद्धिक कार्यवाह होता. पुढे सावरकरांच्या गांधीविरोधी विचारांनी भारावून हिंदू महासभेत दाखल झाला. या दोन संघटनांप्रमाणे अन्य काही संघटना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असल्या, तरी त्याची मूळ भूमिका मुस्लिमविरोधी अशीच होती. हा विरोध केवळ राजकीय सत्तेसाठी आहे; धर्मासाठी नाही.

*सत्य आणि अहिंसा हेच गांधींजींचं विचारतत्व*
गांधीजी हिंदू-मुस्लिम आणू अन्य धर्म-जातीत समन्वय साधणारे नेते होते. सत्य आणि अहिंसा या दोनच विचारतत्वांनी बनलेलं त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व होतं. आपल्या या जीवनतत्वांशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले.म्हणूनच
ईश्वर अल्ला तेरो नाम।
सबको संमती दे भगवान।।
हे भजन ते सर्वांच्या गळ्यातून गाऊन घेऊ शकले. देशाच्या फाळणीने स्वातंत्र्य मिळू नये, याबाबत गांधीजी आग्रही होते. परंतु मोहम्मद जिनांच्या कट्टर इस्लामवादी भूमिकेमुळे फाळणी अटळ आहे हे स्पष्ट होताच, ते सत्य सांगण्यास गांधीजी डरले नाहीत. या फाळणीविरोधात आज गलबलून बोलणाऱ्या, फाळणीचे पाप गांधीजी आणि काँग्रेसच्या माथी थापत तरुणांना चिथावणाऱ्यांचे वैचारिक बाप तेव्हा विटाळशीसारखे कोपऱ्यात बसले होते. फाळणी रोखण्यासाठी त्यांनी प्राणाची बाजी लावली नाही. मात्र गांधीजी आणि काँग्रेसविरोध ते पेटवत बसले. याउलट, फाळणीनंतर नौखालीत उसळलेल्या आगडोंबात उद्ध्वस्त झालेल्यांचे अश्रू पुसायला गांधीजी गेले. त्यांचे शिव्याशापही खाल्ले.

*आजही गांधीजी चिडीचा, टवाळीचा विषय*
हिंदुस्तानच्या फाळणीनंतरच्या विद्वेषात होरपळणाऱ्यातल्या एखाद्याने गांधीजींची हत्या केली असती, तर त्याला भावनिक उद्रेक म्हणता आलं असतं. परंतु नथुरामचं हे नीच कृत्य फाळणीविरोधी विचाराशी जोडलेलं असल्यानं, त्यानं वैचारिक संबंध जोडलेल्या संघ आणि हिंदू महासभा या संघटनांवरही गांधीजींच्या खुनाचा ठपका बसला. हे केवळ नथुरामचे या संघटनांशी असल्यामुळे घडलेलं नाही. संघ, हिंदू महासभा आणि त्यांच्या मित्र-पक्ष संघटनांच्या लेखी आजही गांधीजी चिडीचा आणि टवाळीचा विषय आहे. या द्वेष भावनेतूनच 'दक्षिण आफ्रिकेत गांधींना ट्रेनमधून ढकललं नसतं, तर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नसता. महात्मा झाले नसते.  बॅरिस्टरीच करत बसले असते.' अशी वाक्ये निपजतात. तथापि, संस्था-संघटना-पक्षाने केलेला ठरावाने अथवा नेतृत्वाने दिलेल्या आदेशाने झालेलं नसतं, तोपर्यंत तो व्यक्तिगत मामला असतो.

*विद्वेषी वातावरणाने गांधीजींचा बळी घेतला.*
गांधीजींचा खून करावा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अथवा हिंदू महासभेने ठराव केलेला नव्हता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी  महात्मा गांधीजींना मारा, असा आदेश दिला नव्हता. परंतु मुस्लिमद्वेषावर आधारित कट्टर हिंदुवादाचा व्यापक प्रचार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेने देशात जो जातीय, धार्मिक विद्वेष निर्माण केला होता, त्या वातावरणाने गांधीजींचा बळी घेतला, हे सत्य आहे. हे सत्य कायद्याच्या कसोटीला उतरलं नाही. म्हणूनच रा.स्व.संघ-हिंदू महासभा-सावरकर गांधी खून खटल्यात निर्दोष ठरले. परंतु त्याने सत्य बदललं अथवा संघ प्रवृत्तीत, कार्य प्रणालीत बदल झाला, असं नाही. गेल्या काही वर्षांत देशात अनेक दंगली झाल्या. त्यात गुंतलेल्या अनेक व्यक्ती संघ परिवाराशी संबंधित होत्या. हे बऱ्याचदा सिद्ध झालं आहे. परंतु संघाने संबंधीत दंगल-कृत्यासाठी कोणतेही आदेश न दिल्याने अथवा ठराव न केल्यामुळे संघ नेहमीच नामानिराळा राहिला. अशीच चलाखी काँग्रेसजन दाखवीत असतात.

*गांधीजींच्या विचारतत्वांची महानता पोहोचलीच नाही*
गांधीजींच्या खुनाबाबत संघाला जबाबदार धरण्याचं राहुल यांचं वक्तव्य त्यांना न्यायालयीन कारवाईला सामोरं जाणारं ठरलं. त्यांत राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. पण :'माफी मागणार नाही त्या ऐवजी संघातर्फे टाकण्यात आलेल्या मानहानी खटल्याला सामोरं जाईन' असं त्यांनी म्हटलं, हा न्यायालयीन वाद न्यायालयात पडून आहे. राहुल गांधींनी ही बहादूरी देखील संघासारखीच बनावट आहे. कारण अशा मानहानी खटल्याचा निकाल वीस पंचवीस वर्षे काही लागत नाही, त्यावेळी जी काही परिस्थिती असेल तशी त्यावेळी भूमिका घेता येईल असं त्यांचं म्हणणं असतं. पण काँग्रेसीना सत्यापर्यंत जायचं असेल, तर प्रथम त्यांनी सत्य समजून घ्यावं. ते गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी सांगितलं आहे. त्यांचं म्हणणं, 'आरएसएसवाल्यांनी खुद्द बापूजींचा खून केला. पण काँग्रेसनं बापूजींच्या तत्वांचाच खून केलाय. गांधी नावाचा वापर तेवढा त्यांनी करून घेतला. गांधीवादाच्या स्तोमाबद्धल ते म्हणतात, 'गांधीवादी कंपूंनी बापूजींचा खासगी क्लब करून टाकलाय. सत्य कडू असतं ते पचवण्याची ताकद गांधीजींच्या विरोधकांत नव्हती, म्हणून हिंदुस्तानच्या फाळणीचं निमित्त साधून गांधीजींच्या जीवावर उठण्याचा डाव खेळला गेला. गांधीजींचा खून एकदाच झाला. मात्र त्यांच्या विचारतत्वांचा खून संधी मिळताच पुन्हा पुन्हा काँग्रेसीच नव्हे तर गांधींचं नाव घेणाऱ्यांकडून केला जातोय. गांधीजींच्या हत्येबाबत त्यांच्या विचारवादाचा कृतिशील विकास प्रसार थांबवण्यात आला. त्याला काँग्रेसीच अधिक जबाबदार आहेत. लोकांपर्यंत बापूंच्या विचारतत्वांची महानता पोहोचविण्यात त्यांना अपयशच आलंय!'

*सावरकरांच्या विज्ञानवादाची गठडी वळली*
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतही संघ परिवाराने असाच व्यवहार केलाय. सावरकरांचा हिंदूराष्ट्रवाद भेदनीतीनं भारलेला आहे. पण त्यांच्या विचारात देशभक्ती खच्चून भरलेली आहे. सावरकर हे गांधीजींचे आणि काँग्रेसचे कडवे विरोधक होते. म्हणून त्यांची देशभक्ती बेगडी ठरत नाही. सावरकरांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी ब्रिटिश सरकारकडे माफीचा अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची शिक्षा रद्द झाली. पण तोपर्यंत त्यांनी अकरा वर्षाची काळ्या पाण्याची सजा भोगली होती. याकडं दुर्लक्ष करून त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीची मापं काढणं, हा खोटारडेपणा आहे. तथापि हा खोटारडेपणा खोडून काढणारे तरी कुठं खरे आहेत? मध्यंतरी अंदमानात स्वातंत्र्यज्योतीवर सावरकरांची वचने लावण्यावरून मणिशंकर अय्यर यांनी काढलेले उदगार चुकीचे होते, संतापजनक होते. याविरोधात भाजप-सेनेच्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवला. संसदेचं कामकाज बंद पाडलं होतं. परंतु संघ परिवाराने आणि त्यांच्या बगलेत अडकलेल्यांनीच सावरकरांच्या हयातीत आणि पश्चात त्यांच्या विचारांची विशेषतः त्यांच्या विज्ञानवादाची गठडी वळून धार्मिक-जातीय उन्मादाला प्रोत्साहन दिलं.

*सावरकरांचा विचार बावनकशी होता*
स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ विज्ञानवादी नव्हते. ते अंधश्रद्धा निर्मूलक होते. वेदप्रामाण्य पुराणातल्या भाकडकथा आणि त्यावर आधारलेली व्रत-वैकल्ये, ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, जातीयता, स्पृश्य-अस्पृश्यता, धर्माणधता याचा त्यांनी कठोर शब्दात समाचार घेतला आहे. आज त्यांच्या विचारांची पाईक असल्याचा आव आणणाऱ्या  भाजप सरकारनं देशभरात गोहत्याबंदी कायदा केलाय पण सावरकर गोहत्याबंदीचे विरोधक होते. 'गाय कुणाची महामाता असेल, तर ती बैलाची होय,' अशी टिंगल ते करीत. 'गोरक्षण न करता गोभक्षण का करू नये,' असा प्रश्न ते विचारीत.'ब्रह्मवादानुसार रक्षण-भक्षण ह्यात भेद नाही. दोन्ही व्यवहार सारखेच खोटे आणि खरे आहेत. त्यानुसार, गाढव आणि गाय समानच आहेत. एकवेळ गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होऊ नये,' असे कठोर विचार सावरकरांनी सांगितले आहेत.  सत्तेवरच भाजपेयी, बजरंगी आणि त्यांची पिलावळ आज याच विषयावर देशातलं वातावरण बिघडवताहेत, याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय. सत्ताधारी असलेल्या भाजपेयींना सावरकरांचे हे विचार मान्य आहेत का? ते पचवून, लोकांना पटवून मतं मिळवण्याचं धाडस ते करतील का? हाच खरा प्रश्न आहे. गांधीजींना जसा गांधीबाबा-महात्मा करून काँग्रेसनं आपल्या राजकारणासाठी त्यांना वापरलं; तसाच सावरकरांचा वापर होतोय. त्यात सावरकरांच्या विचारांचा जिव्हाळा अजिबात नाही. सावरकरांच्या विचारांना मर्यादा होत्या. पण त्यांचा विचार-आग्रह त्यांच्यापुरता बावनकशी होता. ते राजकीय ढोंग नव्हतं. तथापि राजकीय ढोंगाच्या साठमारीत विरोधकांच्या टीकेसाठी आणि मतांच्या भिकेसाठी सावरकरांचा वापर व्हावा, हे पटणारं नाही.


चौकट.....

*पाठयपुस्तकातल्या हिंदुत्वानं विद्यार्थी हिंदुत्ववादी होतील हा भ्रम*

शिक्षण राजकारणापासून आणि राजकारण धर्मवादापासून दूर राहिलं तर आणि तरच लोकशाहीला वैभवशाली करणारे नागरिक तयार होऊ शकतात. भारतीय राजकारण धर्मवादात आणि शिक्षण धर्मवादग्रस्त राजकारणात फसलं आहे. हा सर्वपक्षीय नेत्यांचा करंटेपणा आहे. भारताच्या इतिहास लेखनाला प्रदीर्घ परंपरा आहे. तथापि, ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी आपल्या जातीवर्चस्वाचा टेंभा जागता ठेवण्यासाठी सोयीचं लेखन केलं. चातुर्वण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यासाठी हिंदू राजवंशांना अधिक महत्व दिलं. इतर राजसत्तांना कायम शत्रूपक्षात ठेवलं. स्वातंत्र्यानंतर इतिहास लेखनात डाव्या विचारवाद्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यामुळं दडपलेल्या इतिहासाला उजाळा मिळाला. शिवराय मुस्लिमविरोधी नव्हते; रामदास शिवरायांचे गुरू नव्हते आदि संशोधन यामुळेच पुढं आलं. इतिहास हा गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. त्यामुळेच इतिहासाच्या पाठयपुस्तकात केवळ विचार भिन्नतेमुळे होणारे बदल घातक ठरणारे असतात. ह्याचं भान सरकारनं ठेवायला हवंय. मुलांना शालेय पुस्तकांतून जे वाचण्या-शिकण्यासाठी दिलं जातं, त्यामागे चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्न असतो, हे खरं आहे. परंतु मुलं आज टीव्ही चॅनल्स, चित्रपट पाहतात. इतर पुस्तकं वाचत असतात, त्याचाही मुलांच्या विचार प्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. परिणामी पाठयपुस्तकाची किंमत कमी झाली. साठ वर्षे काँग्रेसची सत्ता होती या सत्तेच्या इशाऱ्यावर बनवलेल्या पाठयपुस्तकामुळे काँग्रेसच्या समर्थकात वाढ झाली, असा इतिहास नाही. उलट ती पुस्तकं वाचूनही काँग्रेस विरोधी मतात वाढ झालीय. त्यामुळं पाठयपुस्तकातून हिंदुत्वाचा डोस घेणारे विद्यार्थी हिंदुत्ववादी होतील हा भ्रम आहे. भ्रमात केलेलं राजकारण-समाजकारण-धर्मकारण लोकांत संभ्रम निर्माण करू शकत. पण यशस्वी होऊ शकत नाही.


-हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...