Saturday 7 April 2018

मूल्याधिष्ठित राजकारण आणि समाजवादी विचारधारा!

*मूल्याधिष्ठित राजकारण आणि*
 *समाजवादी विचारधारा!*
"राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे आणि दाखविले जात आहे तेवढे वैचारिक मतभेद आता नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपेयी नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारे करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात येतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व- निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. हे आता सगळेच जाणतात. कोण कुठे होते नि कुठे पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुन्हा पुन्हा चाचपून भोके पडलेल्या विजारी घालणारे आपण म्हणजे कंडक्टरने बसचे तिकीट देताना साडेतीन रुपयाऐवजी तीन रुपये घेतले तर लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखर लॉटरी लागलीय त्यांच्याकडे बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा! अशावेळी प्रकर्षांनं आठवण येते ती मूल्याधिष्ठित राजकारण करणाऱ्या समाजवादी विचारांची आणि नेत्यांची!"
----------------------------------------------
 *ज्ये* ष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य गेले! त्यांच्या जाण्यानं मूल्याधिष्ठित आणि सकारात्मक राजकारणातील एक धुरंधर नेता हरपला. समाजवादी विचारसरणीत देश घडवू पाहणाऱ्या देशभक्तांपैकी ते एक होते. आज देश अडचणीत असताना ज्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे अशावेळी असे एक एक नेते कालवश होताहेत. भाईंच्या जाण्यानं आठवण आली ती जनता राजवटीची! देशात आणीबाणी लादली गेली,  लोकशाहीवर घाला घातला गेला, त्यावेळी लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा एकदा लोकजागृती केली होती. लोकशाही पुनर्स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नवनिर्माणाच्या संकल्पनेला सुरुवात केली. देशात असलेल्या सगळ्या पक्षांची त्यांनी मोट बांधली आणि जनता दलाची स्थापना केली. काँग्रेसला समर्थ पर्याय लाभला म्हणून देशवासियांनीही जनता दलाला भरभरून मतं दिली आणि सत्तेवर बसवलं. समाजवाद्यांच्या हातात देशाच्या सत्तेची सारी सूत्रं सोपविली. पण त्यांना ते काही झेपलं नाही. त्या जनता दलातल्या समाजवाद्यांच्या आता अक्षरशः चोथा झालाय. त्यातील काही धूर्त, व्यवहारी राजकारण्यांनी बुडता बुडता समाजवाद्यांच्या माथ्यावर पाय देऊन उभं राहण्याचा व्यवहार केला. भाईं वैद्य यांच्यासारखी काही मंडळी ही निष्ठावान, लढवय्ये, साधनसुचिता पाळणारे, त्यांनी साधायचे ठरविले असते, तर खूप काही साधून घेतलं असतं. व्ही.पी.सिंग यांच्या न्यायासाठी सर्वस्व पणाला लावण्याच्या निष्ठेचे वारेमाप कौतुक करणाऱ्या समाजवाद्यांना अखेर व्ही.पी.सिंगच भोवले! समाजवाद अस्ताला नेण्याला त्यांनीच हातभार लावला.

*समाजवादी विचारांची अपेक्षा!*
राजकीय विचारसरणीत त्यावेळी समाजवादीचं वर्चस्व होतं. देशात सक्षम विरोधीपक्ष म्हणून समाजवादी पक्षांकडेच पाहिलं जातं होतं. त्यानंतरच्या काळात समाजवाद्यांचं हे पानिपत कशामुळे घडलं. याचा विचार या मंडळींनी करायला हवा होता. जनता पक्षात जाऊन समाजवाद्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं, याचा हिशेब करण्यात आजतरी काहीच अर्थ नाही. पण व्यक्तिदोषामुळे  'समाजवाद' वाऱ्यावर पडला! हे मान्यच करावं लागेल. सध्या 'समाजवादा'ची काँग्रेसनं सोडचिठ्ठी दिल्यासारखीच परिस्थिती करून टाकली आहे. आज सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाला तर समाजवादाचे सोयरसुतकच नाही. अशावेळी समतेचा, बंधुतेचा आग्रह धरून सगळ्या दबलेल्यांना, आजवर उपेक्षाच सहन केलेल्यांना एकत्र आणून, त्यांच्यात विश्वास जागवून त्यांना समाजवादी ताकद म्हणून उभं होण्याची हिंमत देऊन समाजवादी पक्ष पुन्हा उभा करण्याचा विचार समाजवाद्यांनी का करू नये? तिसरा पर्याय का उभा करू नये. लोकांच्या भावना आजतरी अशाच आहेत, त्यांना काँग्रेसी राजवट नकोय त्याहून अधिक भाजपेयी नकोत पण पर्याय नसल्यानं त्यांची घुसमट होतेय याला मार्ग मिळेल. पर्याय मिळेल.

*समाजवादी नेते आपसातच झुंजले*
उत्तरप्रदेशात कांशीराम-मायावती हे महाराष्ट्रातला फुले-शाहू-आंबेडकर यांचा समाजवादी  विचार घेऊन तिकडे तुफान उठवू शकतात. मग संघर्ष करण्याची इच्छा आणि ईर्षा असलेले समाजवादी आपसात झुंजण्याचा, आपलेच कपडे फाडण्याचा उद्योग सोडून एकत्र का येत नाहीत. भाईंनी असा प्रयत्न केला होता. ते स्वतः, किसन पटनाईक, केशवराव जाधव यांनी हैद्राबादेत समाजवादी दल निर्माण समितीच्यावतीने एक बैठक घेऊन समाजवादावर निष्ठा असणाऱ्या काहींना एकत्र आणलं होतं. 'सोशालिस्ट जन परिषद' अशा नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला समाजवाद्यांची साथ लाभली नाही. त्यांना इतर पक्षाच्या वळचणीला जाणं योग्य वाटलं असावं. भाईंच्या या प्रयत्नापासून दूर राहण्याचे व कुण्या नवागताकडून अपमानित व्हायचं कारणच नव्हतं. संधीसाधू, सत्तानिष्ठ राजकारणाच्या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी एकटे भाई वैद्य पुण्यातून समाजवादी जण परिषदेची आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असत. पूर्वी काकाकुवा मॅनशन येथे होणाऱ्या बैठका, चर्चा, परिषदा, सभा आज नवीपेठेतल्या एस.एम.जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होतात एवढाच काय तो समाजवाद्यांच्यात बदल झालाय.

*पक्ष बदललेल्यांचा भ्रमनिरास झालाय*
पक्ष सोडून गेलेल्या समाजवादी विचारांची मंडळी सध्या राजकारणात चाचपडताहेत. कुणी शरद पवारांना जवळ केलंय तर कुणी काँग्रेसवासी झालेत. आम आदमी पक्षाच्या निर्मितीनंतर तर उरले सुरलेले सारे समाजवादी त्यांच्यामागे गेले. पण इकडे तिकडे गेलेल्या साऱ्या समाजवाद्यांचा भ्रमनिरास झालाय. आप मध्ये गेलेल्यांची निराशाच झाली. अपेक्षाभंग झाला. पक्षाबदलाच्या अपराधीपणाच्या जाणिवेनं निष्ठावान समाजवाद्यांची घुसमट होते आहे. भाईंच्या जिवंतपणी जे होऊ शकलं नाही ते त्यांच्या मृत्यूनंतर का होईना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुन्हा एकदा समाजवाद्यांची भक्कम एकजूट झाली, तर समाजवादी राजकीय विचारांनी प्रेरित झालेल्यांना एक दिलासा मिळेल. आणि समाजवाद्यांनी भाई वैद्यांना आदरांजली वाहिल्याचे समाधानही त्यांना लाभेल! आणि लोकांना ज्यांना काँग्रेस नको आणि भाजपेयींही नकोत अशांना पर्याय मिळेल.

*ही घसट आणि घुसमट तेवढी सरळ नाही!*
देशातली सध्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही किंबहुना ती अस्वस्थ करणारी आहे. केंद्रात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपेयींनी आपल्या वागण्याने केवळ विरोधी पक्षांनाच नाही तर मित्रपक्षांनाही दुखावलं आहे. सुरुवातीपासून बरोबर असलेले शिवसेना, अकाली दल, तेलुगू देशम,यासारखे मित्र दूर जाताहेत. महाराष्ट्रातील लोकनेते म्हणून समजले जाणारे शरद पवार भाजपच्या पाठीशी उभे राहता राहता अचानक भाजपविरोधी पक्षाच्या आघाडीत सामील झालेत. एकीकडे शरद पवारांची लोकांना दहशत वाटावी अशी विकृत प्रतिमा उभी करायची दुसरीकडं त्यांच्याशी जमवून घेऊन नवी राजकीय समीकरणं बनविण्याचे प्रयत्न करायचे. असा सध्या प्रकार भाजपेयींकडून सुरू आहे. एखाद्याला कळपापासून फोडायचा, एकाकी पाडायचा आणि चट्टामट्टा करून संपवायचा 'लांडगे डाव' सध्या राजकारणात रंगविला जातोय. शरद पवारांची आजची भूमिका पाहता, शरद पवार डाव्यांच्या तावडीत सापडताहेत की, डाव्यांना पवार आपल्या राजकारणासाठी खेळवत आहेत, हे अजून ठरवायचंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवार यांची ताकद काय असेल, कशी असेल यावर सारे अवलंबून राहील. कारण ही घसट आणि घुसमट दिसते तेवढी सरळ नाही.

*अशाश्वत राजकारण सध्या सुरू आहे*
पुराणातली कथा आहे. महाभारतातली, भीम-जरासंघाची कुस्ती चालली होती. भीम पुन्हा पुन्हा जरासंघाला फाडत होता. पण जरासंघ पुन्हा पुन्हा साधला जात होता.भीमाची ताकद पुरेशी नव्हती. अशावेळी आखाड्यात नसलेल्या कृष्णाने भीमाला डाव सुचविला. जो पुन्हा पुन्हा जोडला जातो, त्याला न जोडण्यासाठी काय करायला हवं हे भीमाला कृष्णाने सुचविले आणि जरासंघ कायमचा भंगला! पवार, ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात काहीही झाले तरी त्याचा निकाल ह्या तिघांना हवा तसाच लागेल असं धरून चालणार नाही. काहीही घडू शकते, एवढं अशाश्वत राजकारण सध्याचं बनले आहे.

*भाजपची भगवी काँग्रेस बनलीय*
सर्वसत्ताधीश बनलेल्या भाजपेयींना काँग्रेससारखं सर्वसमावेशक बनण्याचा विचार दिसतो आहे. सध्याच्या त्यांच्या सर्व हालचाली या बाबी स्पष्ट करतात. जणू भगवी काँग्रेस असावी असं त्याचं रूप झालंय. काँग्रेस समाजवादी विचारापासून केव्हाच दूर झालीय. खासगीकरण, निर्गुंतवणूक हे त्यांनीच सुरू केलं. ज्याचा परिणाम आज दिसून येतोय. समाजवादासाठी कंबर कसून उभं व्हावं आणि सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी आजही समाजवाद प्रभावीपणे उपयोगी पडतो हे आव्हानपूर्वक दाखवावं अशी इच्छा असणारा काँग्रेसमध्ये कुणी नेता नसल्यानं सध्या ज्याच्या हातात पक्षाची सूत्रं आहेत, त्यांना टोचणीपुरतीच समाजवादी निष्ठा काही जण दाखवीत आहेत. समाजवादाचा ठेका घेतलेल्या साथीनी एकमेकांचे पाय ओढण्यातच आपला शक्तिपात करून घेतल्याने आणि मार्क्सवादाचे ठेकेदारही मर्यादीत क्षेत्रातली आपली मक्तेदारी शाबूत ठेवण्यातच गुंतून पडल्याने 'आई मेली, बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला!' अशी समाजवाद्यांची अवस्था झालीय!

*समाजवादी चळवळीला आत्मपरीक्षणाची गरज!*
समाजवादी चळवळीला ना राजकीय यश मिळाले, ना सामाजिक अभिसरणाच्या क्षेत्रात फारसा प्रभाव टाकता आला. असे का झाले, याचे आत्मपरीक्षण करणे ही काळाची गरज आहे. समाजवादी नेत्यांना राजकारणात पडण्याची पूर्वी घाई झाली होती. विचाराने कार्यकर्ता पुढे जावा, असे ठरविण्याऐवजी समाजवादी विचारांची टोपी आणि नारा निवडून येणाऱ्या माणसाच्या हाती दिला. ती चूक होती. इतिहासात अनेक मोठय़ा चुका चळवळीने केल्या आहेत. नव्या पिढीत अनेकांना त्या माहीत नसतील. पण जुनीजाणती माणसे प्रश्न विचारतील. त्यामुळे आत्मपरीक्षणाची गरज आहे. किमान स्वल्पविराम आणि शब्दरचनेवरून होणारे मतभेद टाळता आले तरी बरेच काही होऊ शकेल. समाजात समाजवादी चळवळीविषयी आस्था बाळगून असणारा मोठा वर्ग आहे. पण त्यांना जोडून घेण्यासाठीचा कार्यक्रम आपल्याकडे नाही. तो करता आला तरी पुरेसे होईल. सध्या लोकशाहीच्या शिखर संस्थांवर आपल्याच विचाराचे कार्यकर्ते बसविण्याचे काम चालू आहे. समाजवादी नेत्यांनी त्यांचे सरकार होते तेव्हा असे काही न करता विचाराने वागणाऱ्या कार्यकर्त्यांला लाभ दिला नाही, हा काय आपलाच आहे, त्यामुळे दुसऱ्यांनाच महत्त्व दिले गेले, त्यामुळे आपले कार्यकर्ते नेत्यांनी कुजविले!

*समाजवादाला 'हे राम' म्हणायला लागलंय!*
राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे आणि दाखविले जात आहे तेवढे वैचारिक मतभेद आता नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपेयी नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारे करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात येतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व- निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. हे आता सगळेच जाणतात. कोण कुठे होते नि कुठे पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ चाचपणारे आपण म्हणजे कंडक्टरने बसचे तिकीट देताना साडेतीन रुपयाऐवजी तीन रुपये घेतले तर लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! तिथं त्यांचं काय? सत्तानिष्ठ राजकारण्यांच्या या वातावरणात समाजवादाला हे राम म्हणायला लागलंय!

*सगळाच व्यवहार बिनधास्त झालाय!*
समाजवाद समाजाने नाकारलेलाच नाही तर समाजाचे ज्यांनी कधी सोयरसुतक ठेवलं नाही, अशा समाजवादी नेत्यांना समाजाने नाकारले आहे. या नेत्यांचे प्रताप लोकांना परवडत नाहीत. जर समाजवादी नेते तात्त्विक काथ्याकूटात न हरवत व्यवहाराशी सांगड घालून वागले असते तर ही अशी अवकळा त्यांना, त्यांच्या पक्षाला प्राप्त झाली नसती. हा व्यवहार काँग्रेसवाल्यांना चांगला जमतो. त्या भांडवलावर तर भल्या भल्या समाजवादी नेत्यांना पटवून शरद पवारांचा पुलोद प्रयोग महाराष्ट्रात झाला. आजही समाजवादात पवार नई रोशनी आणतील असा भाबडा विश्वास बाळगणारे बालबैरागी बरेच आहेत. आजवर मनाची नाही तर जनाची लाज बाळगून राजकारणात वावरण्याची काळजी नेते, कार्यकर्ते घेत असत. आता सगळाच व्यवहार बिनधास्त झालाय. आज समाजवाद पराभूत झालाही असेल; पण सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी सामर्थ्य समाजवादानेच प्राप्त झालं आहे, हे विसरून चालणार नाही.  समतेसाठी झुंजणाऱ्या मराठी माणसाला एवढ्या सहजपणे सोडचिठ्ठी देता येणार नाही. समाजवादी सामर्थ्यशाली फळी कशी कोसळली, का कोसळली, याचा शोध घेऊन जरूर ते बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आणण्याचा मार्ग आपल्याला शोधवाच लागेल!

चौकट........
*समाजवादानं उन्नत आणि समृद्ध समाजाचं स्वप्न दिलंय!*

महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असे आजवर मानले जात होते. महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी-परंपरा-कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणले. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसांमाणसात बंधुभाव जागवा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळेच महाराष्ट्रातील अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना खरोखरच  जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली.लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वराने आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपली वाट आपण शोधू, आपले भाग्य आपण घडवू या निर्धाराने गावोगाव नव जोमाने तरुण उभे झाले. गांधी टोपीबरोबरच मानवी समता, बंधुभाव सर्वसामान्य माणसाने स्वीकारला. अर्थात सर्वत्र शिवाशिव संपली. रोटी व्यवहार सुरू झाला आणि एकमेकांशी माणुसकीचे वर्तन सुरू झाले असा याचा अर्थ नाही. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही काही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीने आपले हक्क मिळवू शकतो, आपला विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाची परवानगी त्यासाठी आवश्यक नाही, कुणाच्या कृपेचीही आवश्यकता नाही हा विश्वास काही प्रमाणात तरी सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर व सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. इतिहास-पुराणांचा आधार घेऊन उभ्या झालेल्या नेत्यांचा प्रभाव यामुळे मर्यादितच राहिला. भारतामध्ये लोकशाही समाजवादी विचारसरणीची मूलतत्त्वे काँगेसांतर्गत स्थापन झालेल्या समाजवादी गटात आढळतात. १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव प्रभृतींनी हा गट स्थापन केला. पुढे १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर या समाजवाद्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना केली; मात्र त्यात पुढे एकजुट राहिली नाही आणि १९७७ मध्ये समाजवादी पक्ष तत्कालीन जनता पक्षात विलीन झाला. त्यानंतर त्यांना फारसे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १९४७ -६४ या कार्यकाळात त्यांची लोकशाही समाजवादावर निष्ठा आणि विश्वास होता. समाजवादी समाज स्थापन करणे, हे काँगेसचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचा समाजवाद इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या धाटणीचा होता. भारताच्या मूळ संविधानात समाजवाद या शब्दाचा उल्लेख नव्हता. तो पुढे १९७६ मध्ये झालेल्या बेचाळीसाव्या घटना दुरूस्तीव्दारा प्रथमच सरनाम्यात करण्यात आला. सरनाम्यातून भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या लोकशाही समाजवादाचा आशय व्यक्त होतो. विसाव्या शतकात समाजवादी विचार लोकप्रिय झाले. कम्यूनिस्ट पक्ष शासित साम्यवादी राजवटी, पश्चिम यूरोपातील कल्याणकारी राज्याची उत्तम प्रकारे अंमलात आणून जनतेला मोठया प्रमाणात सामाजिक सुरक्षा पुरविणाऱ्या लोकशाही समाजवादी राजवटी, भारतातील गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करीत केलेला कारभार, राज्य समाजवादास नकार देत जनतेच्या सहभागावर व विकेंद्रीकरणावर भर देणारे समाजवादी पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत; कारण समाजवादाने विविध देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत आणि समृद्ध समाजाची स्थापना करण्याचे स्वप्न दिले आहे.
.........................
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...