Saturday 28 April 2018

विचार आणि विकास...!

एकाच निश्चयासाठी जीवनाचे समर्पण करणाऱ्याला कालांतरानं अनेक सिद्धी प्राप्त होतात. आचाराशिवाय विचार कितीही सुंदरसा असला तरी तो माणसांवर अत्याचार करतो आणि परिणामी त्याची कार्यशक्ती मारून टाकतो. त्यामुळं कृतिशील विचारधारणाच जगाला तारू शकते. कृतिशीलतेनचं माणसाचा वैचारिक, भौतिक, आणि लौकिक विकास होऊ शकतो. याच दिशेनं गौतम बुद्धानं वाटचाल करीत माणसांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माणूस आपल्या स्वार्थापुरतंच आणि फायद्यापुरतंच स्वीकारत असल्यानं हा विचारांचा विकास आणि विकासाचा विचार हा माणसापासून दूर जाऊ लागला. भगवान बुद्धानं आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून हा विचार मांडला. पण याचा विसर आताशी पडू लागलाय. म्हणून आचारामध्ये फरक पडू लागलाय. कोणतीही बाब ऐकण्याऐवजी ऐकविण्याचीच संवय त्याला लागलीय. सकारात्मक विचार हीच विकासाचीच जननी आहे. आश्वासन देणाऱ्यांना याची जाणीव कधी आणि कशी होणार? हाच खरा प्रश्न आहे. उद्या बुद्धजयंती! या महामानवाच्या अमोल विचारांवरून खरी तर वाटचाल व्हायला हवी आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. याचेच वाईट वाटते. बुद्धजयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचं आणि आचारांचं मनन-चिंतन आणि आचरण व्हावं ही अपेक्षा! त्या महामानवाला विनम्र अभिवादन...!"
-----------------------------------------------
*स* ध्या सगळीकडे आश्वासनाचाच जमाना आहे. आश्वासन देण्याची भूमिका आजवर नेहमीच राजकारण्यांची ही संवय आता सगळ्याच स्तरांवरील लोकांना लागलीय. प्रत्येकाचं जगणं हे वेगळ्या कारणासाठी असतं. पुष्कळ माणसं ही केवळ मनोरथावर जगत असतात. तर त्यापैकी काही स्वप्नावर जगत असतात. आज अमुक अमुक करायचं, अमुक वेळात ही गोष्ट पार पाडायची. अशा विचारांचं भरतकाम चालूच असतं. पण या दुरंगी दुनियेत राहणाऱ्या माणसांत एक खास खुबी असते. निश्चय केल्यावर काम करण्यासाठी जे बळ लागतं, ते त्यांच्यापाशी नसते आणि एकच काम घेऊन त्यात आरपार शिरण्याची ताकद नाही. मनोरथाला रचनात्मक शक्तीची चाकं असावी लागतात. ती नसली तर रथ पुढं जात नाही. मनाच्या रेशमी पडद्यावर भले अनेक प्रकारची चित्रं आकार घेतात पण जोवर चित्रकार हातात कुंचला घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, तोवर त्याची कोणी किंमत करत नाही. अंतरातील तारांमधून काव्याचा झणत्कार निघतो आहे. पण कवी जोवर शब्दांची सुरावट जमवत नाही तोवर ओठ त्याला ओळखू शकत नाहीत. प्रेरणेतून परसेवेचं पाणी बरसले नाही, तर त्या प्रेरणेचं वाळवंट व्हायला वेळ लागत नाही. बरीच माणसं असा बहाणा करतात की, आमच्या योजना महान आहेत. आमचे विचार जग उजळून टाकतील असे आहेत. पण काय करणार? संधी नाही. अनुकूल वातावरण नाही नि आम्हाला प्रोत्साहन द्यायला कोणी नाही. बुद्धिमान आहेत ते काही करू इच्छित नाहीत, अगर करायला भितात. तेच सत्वहीन शब्द उच्चारतात आणि हात जोडून एका कोपऱ्यात बसतात. खरी गोष्ट अशी आहे की, महान कार्य करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. तशी परिस्थिती कधीच मिळत नाही. उलट सृजनशीलता नेहमी प्रतिकूल परिस्थितीत उफाळून येत असते. जेव्हा जेव्हा आपत्तीचे डोंगर कोसळतात तेव्हा तेव्हा सृजनशील माणसांची शक्ती प्रचंड रूप धारण करून कार्यसिद्धीसाठी झुंजते.

*प्रतिकूल परिस्थिती नमवू शकत नाही*
पर्वतावरून नदी निघते तेव्हा ती कधी म्हणत नाही की, माझ्या वाटेत दगड आहेत, मी पुढं कशी जाऊ? ती तर वाटेतल्या दगडांशी टकरा देत हैराण होते. आपला वेग वाढवते आणि अखेर वाटेतल्या खडकांना भेदून सागराची भेट घ्यायला जाते. किनाऱ्यावर काळाकभिन्न कडा उभा आहे. हे पाहून समुद्राच्या लाटा परत गेल्याचं कधी ऐकलं नाही. आकाशात चौफेर घनघोर वादळ घोंघावत आहे आणि त्यातून आपला प्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही. या भीतीनं सूर्य काही तोंड लपवत नाही. आपण फुललो तर, माळी आपल्याला खुडून नेईल या भयानं गुलाब कळी बनून राहत नाही. ज्याला काही करून दाखवायचं आहे. प्रकाशित व्हायचं आहे, उमलायचं आहे, पुढं जायचं आहे. त्याला प्रतिकूल परिस्थिती कधी नमवू शकत नाही. ते जय पराजयाची पर्वा न करता आपली प्रचंड शक्ती पणाला लावतात.

*विचार कृतीत आणणं हा कल्याणाचा मार्ग*
 इतिहासाच्या पानावर नोंदलेल्या किती पुरुषांच्या मार्गात गुलाबांच्या मुलायम पायघड्या घातलेल्या होत्या, हे कुणी सांगेल? गौतम बुद्ध मध्यरात्री संसाराचा त्याग करून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी असा विचार केला नव्हता की, बाहेर पौर्णिमेचं शुभ्र चांदणं पसरलेलं असेल तर बरं! जीझस ख्राईस्ट, महंमद पैगंबर, महावीर प्रभू यांनी प्रथमपासूनची परिस्थिती अनुकूल होती, असं कोण म्हणू शकेल? असं केलं तर लोक हसतील, तसं केलं तर आणखी कुणी शिव्याशाप देतील, असा विचार करणारा कधीच कल्याणयात्रा सुरू करू शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक कार्यामध्ये पावलोपावली अडचणी उभ्या राहायच्याच. संकटांनी गडबडून जाणारा कितीही बुद्धिमान असो, त्याचे विचार कितीही सुंदर असोत, तर तो निकामीच समजला पाहिजे. त्याचे विचार अगदी कागदी फुलांसारखे. त्यात सौंदर्य असते पण सुगंध नसतो. विचारांमध्ये थोडी कृती घातल्याशिवाय त्यांना सुगंध येत नाही. बियाणे कितीही चांगलं असलं तरी त्याची मशागत केली नाही, तर त्यातला अंकुर कधी प्रकाश पाहू शकत नाही. अनेक प्रकारचे विचार करीत नुसतं बसण्यापेक्षा एकच विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करणं हा कल्याणाचा मार्ग होय!

*कृतिशील विचारधारणाच तारू शकेल*
 एकाच निश्चयासाठी जीवनाचे समर्पण करणाऱ्याला कालांतरानं अनेक सिद्धी प्राप्त होतात. आचाराशिवाय विचार कितीही सुंदरसा असला तरी तो माणसांवर अत्याचार करतो आणि परिणामी त्याची कार्यशक्ती मारून टाकतो. त्यामुळं कृतिशील विचारधारणाच जगाला तारू शकते. कृतिशीलतेनचं माणसाचा वैचारिक, भौतिक, आणि लौकिक विकास होऊ शकतो. याच दिशेनं गौतम बुद्धानं वाटचाल करीत माणसांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माणूस आपल्या स्वार्थापुरतंच आणि फायद्यापुरतंच स्वीकारत असल्यानं हा विचारांचा विकास आणि विकासाचा विचार हा माणसापासून दूर जाऊ लागला. भगवान बुद्धानं आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून हा विचार मांडला. पण याचा विसर आताशी पडू लागलाय. म्हणून आचारामध्ये फरक पडू लागलाय. कोणतीही बाब ऐकण्याऐवजी ऐकविण्याचीच संवय त्याला लागलीय. सकारात्मक विचार हीच विकासाचीच जननी आहे. आश्वासन देणाऱ्यांना याची जाणीव कधी आणि कशी होणार? हाच खरा प्रश्न आहे.

*दुःखाचं मूळ गौतम बुद्धांना सापडलं*
जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आरंभीचा प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.

*तृष्णा हेच साऱ्या दुःखाच मूळ आहे*
दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.

*प्रतीत्य आणि समुत्पाद याचं ज्ञान झालं*
हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावरविश्वास नाहीे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.
बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी  सामूहिक प्रार्थनाकरण्याची प्रथा आहे.

- हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट......

*मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म!*

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा प्रमुख सण आहे. हा सण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वांत महान महापुरुष होते, असे मानलं जातं. आज बौद्ध धर्माला मानणारे, प्रामुख्यानं भारत, चीन, नेपाळ, सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, पाकिस्तान इत्यादी देशांतील दोनशे कोटींहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी तिथं सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यानंतर त्यांना एकाबोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर इथं महापरिनिर्वाण विहार एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी आजूबाजूच्या परिसरातीला हिंदू लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात. येथील बौद्ध विहारात हिंदूही आस्थापूर्वक पूजा करण्यास येतात. या विहाराचे महत्त्व तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील म्हणजेच भू-स्पर्श मुद्रा ६.१ मीटर लांब अशी मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जिथून मूर्तीसाठी माती काढली आहे तिथंच हे विहार तयार केलं आहे.विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले. असं मानलं जातं.
श्रीलंका तसेच अन्य दक्षिण-पूर्व आशियायी देशात हा दिवस 'वेसाक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे. या दिवशी तिकडं बौद्ध अनुयायी घरावर दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. जगभरातून या दिवशी अनुयायी बोधगया इथं येतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केलं जातं. विहार तसंच घरातील बुद्धाच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते.वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांना दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...