Saturday, 5 May 2018

भल्याची मंदी, बुऱ्याची तेजी...!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाचे मुखपत्र फुटपाथवर विकत असताना लोक मारहाण करत, हातातले अंक फेकून देत, पण ती मारहाण सहन करून पुन्हा अंकाचे गठ्ठे उचलून आरोळ्या ठोकणारे चांगले सुशिक्षित कार्यकर्ते मी बघितलेत. संघासाठी घरदार सोडून कुठेतरी संघकार्य करायला जाणारे चांगले इंजिनिअर्स, पदवीधर, उच्चपदवीधर, असलेले कार्यकर्ते मी बघितलेत. बायका-मुलांना उपवास घडवत समाजवाद आणण्यासाठी फाटक्या पायजम्याने वणवण फिरून वठून मेलेले साथी मी बघितलेत. काँग्रेस माझी माय म्हणत गांधी टोपी डोक्यावर चढवण्यापूर्वी तिला नमस्कार करणारे सच्चे काँग्रेस कार्यकर्तेही मी बघितलेत. शिवसेनाप्रमुखांचा आदेश आला की, जीवाची पर्वा न करता बेधडक, दे धडक झोकून देणारे शिवसैनिक मी बघितलेत. आता असे कार्यकर्ते कुठल्याच विचारामागे नाहीत. विचार तरी कुठे आहे मागे झपाटून जावं असा? सर्व क्षेत्रातली भल्यांची मंदी आणि बुऱ्याची तेजी राजकारणात येणारच,...!"
----------------------------------------------------
*म* हाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील असं वातावरण आहे. राजकीय पक्षांनी तशी तयारी चालविलीय. मागच्यावेळेला विधानसभेत जाण्यासाठी पांच हजाराहून अधिक उमेदवार तयार होते, आताही तेवढी माणसं असणारच! सह्याद्रीची छाती असलेल्या या महाराष्ट्रात अशी उमेदीची माणसं असणारच. पांच हजार जसे मैदानात तसे पांच हजार मैदानाबाहेरही असणार. त्यांची उमेदसुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. बाहेर राहून आतल्याला बाहेर काढण्याचं काम हे बाहेरवाले अशा हुशारीने करतात की, देखते रहो....!

*या युतीतून त्या युतीत...!*
उमेदवारातले फक्त २८८ विधानसभेत जायचेत. त्यातले भगवे किती, निळे किती, हिरवेतांबडे किती, तिरंगी किती यावर सट्टे लागू लागलेत. आपलाच झेंडा फडकणार अशा डेंगा मारत असले तरी आतून सगळेच नेते टरकलेत. गळ्यात गळा घालून उभे असणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा कापायचा याची खलबते आपापल्या गोटात करत आहेत. ह्या युतीतून सुटून त्या युतीत जाण्याचेही बेत होत आहेत. शेवटी गोरगरिबांना तांदूळ, ज्वारी, मीठ, मिरची,तेल, साखर शक्य तेवढ्या स्वस्तात देण्याच्या बाबतीत सगळ्यांचे एकमत आहे.

*सारे एकाच माळेचे मणी*
झेंड्याचे रंगसुद्धा तसे फार वेगळे कुठे आहेत? सेनेचा भगवा तिरंग्यात वर आहेच की! भाजपमध्ये तो आडवा आहे. हिरवा सेनेच्या झेंड्यात नाही, नेते सत्तरीला आले तरी एव्हरग्रीन आहेतच! शिवाय येणारे नेतृत्वाचे दोन कोंब रसरशीत हिरवाईच म्हणायची ती! भाजपने भगवा हिरवा आडवा घातलाय. काँग्रेसनं त्यांना वरखाली ठेवून मध्ये पांढरा आणलाय. तिघांत भगवा कॉमन. उद्या भाजपला, शिवसेनेला वा काँग्रेसला आमदार कमी पडले तर ते एकमेकांकडे धावले तर आश्चर्य वाटायला नको. खरं म्हणजे निवडणुकांनंतर होणाऱ्या युत्या ह्याच महत्वाच्या. वेगवेगळ्या आघाड्यांपेक्षा निकालात चमकणार अपक्ष, इकडले-तिकडले बंडखोर. 'निवडून आलो आई, आता म्हणून नको नाही' असं आळवत काँग्रेस आयला लगटणाऱ्याला आय दूर सारत नाय! तेव्हा निवडणुकांच्या निकालानंतर होणारे नाटक अधिक रंगतदार. काँग्रेस, भाजप वा शिवसेना असो यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या म्हणजे झालं! 'शंभर जागा जिंकल्या तरी आम्हीच सरकार बनवू' असा विश्वास दाखवणारे आहेत. याचा अर्थ पन्नास आमदार पळण्याची म्हणजे पटविण्याची तयारी आहे.

*सर्वच करताहेत वांझोटी राजकारण*
काँग्रेसनं ही पटवापटवी केली की, देवेंद्रच्या कार्यकर्त्यांनी, युती निकालानंतर ठेवायची ठरली तर आदित्य-उद्धव या जोडीनं संघर्ष यात्रा, भ्रष्टाचारविरोधी अभियान, कुजबुज सभा, महामेळावे यांचा भरगच्च तुफानी कार्यक्रम आखायला काही हरकत नाही. भाजपचं सरकार आलं तर ह्या नव्या सरकारला त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत अथवा आणखी कोणी ढवळपवळा असो. लोकांना समाधानकारक राजवट देता येणं एकंदरीने अशक्यच आहे. निवडणुकीसाठी उभे केलेले उमेदवार बघितल्यावर लोककल्याण करण्याची तळमळ सोडा; इच्छा असलेले यातील किती, असा प्रश्न पडतो. फारच थोडे निवडून येण्याची शक्यता आहे. टकुऱ्यावर कुणीतरी वरिष्ठ नेत्याचा शिक्का असलेलेच उमेदवार अधिक आहेत. कर्तृत्वाचा भरघोस पाया असणारे फारच थोडे आहेत. कोकणात सर्वच पक्षांनी सदैव दगडगोटे लोकांच्या पदरात बांधण्याचाच उद्योग केलाय. अंतुले-राणे सोडले तर दुसऱ्या कुठल्याही कोकणच्या आमदाराने-मंत्र्याने कधीही कोकणी जनतेच्या कल्याणासाठी कंबर कसून नेत्याने काम केलेले नाही. केलं ते वांझोटी राजकारण!

*शेणगोळे...! सारवायला उपयोगी!*
हाच प्रकार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ इथंही झालाय. तीन इंच टाचाचे बूट घातले की माणसं उंच वाटतात, त्यांची कुठलीच उंची वाढत नाही. ती मोठीही बनत नाहीत. उमेदवार निवडताना निश्चित उमेदवारांचे काय बघितलं? कुणाही फालतू शेणगोळ्याप्रमाणे इकडेतिकडे सारवायला उपयोगी पडणाऱ्या लोकांना केवळ उमेदवाऱ्यांच नव्हेत तर मंत्रीपदेही मिळतात. हे दिसल्यानेच सर्वच पक्षातील झुरळंसुद्धा उमेदवाऱ्या मागू लागलेत. आणि उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीही करायला लागलीत. उमेदवाऱ्या देताना जर उमेदवारांची बौद्धिक कुवत, कामाची तडफ, निष्ठा, आणि निस्वार्थी बुद्धीने वागण्याची वृत्ती बघितली असती तर आपोआपच इतर पक्षांनाही आपले उमेदवार निवडताना ह्याच गोष्टीचा विचार करावा लागला असता.

*भ्रष्ट-बेपर्वा-कुचकामी राजवटीचा पाया*
उमेदवार ठरवताना तो कुठल्या गटाचा, कुठल्या नेत्याचा, याला फार महत्व दिले जाते. आणि मग बंडखोरांच्या पेव फुटते. या बंडखोरांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन उमेदवार ठरवणाऱ्या नेते मंडळीपैकी कुणीतरी दिले असणारच! निवडून या, पक्ष तूम्हाला स्वीकारेल, इतपत आश्वासन तरी नक्कीच मिळालं असणारच! ही बंडखोरी आणि कामचलाऊ मंडळींना उमेदवारी देण्याची नेतेमंडळीची कारवाई  हा भ्रष्ट-बेपर्वा-कुचकामी राजवटीचा पाया आहे. नेत्यांना आपले सर्व उद्योग पार पाडण्यासाठी नंदीबैलांचा एक कळप हवा असतो. काही चलाख धूर्त, काही विरोधी गटातले उपद्रव देण्याचे सामर्थ्य असणारे आणि बाकी माना हलवणारे नंदीबैल घेऊन राज्य चालविण्याचा परिपाठ काँग्रेसनेच सुरू केला. मी समर्थ आहे असा आत्मविश्वास नेत्यांत असायलाच हवा, पण लोकशाही समर्थ व्हायची असेल तर मी समर्थ आहे असा आत्मविश्वास असणाऱ्यांची एक चांगली फळीच असावी लागते. अशी हुशार, निःस्वार्थी, कुठलेही काम करण्याची क्षमता असणारी अधिकाधिक माणसं विधानसभेत असावीत असा दृष्टिकोन ठेवूनच सर्व पक्षांनी आपले उमेदवार निवडायला हवेत. जे झेंडा फडकवायला उतावीळ झालेत ते सुद्धा करत नाहीत.

*भुरट्या राजकारण्यांचीच चलती आहे*
राजकारणात काही घडू शकते इतकी अस्थिरता आहे. आणि दाखवले जात आहे तितके वैचारिक मतभेद आता नाहीत. आज सर्वत्र भुरट्या राजकारण्यांचीच चलती आहे. सगळ्यांचा पोत एकच आहे हे कळल्यावर आडवे कुणाला घालायचे, उभे कुणाला करायचे हे ठरवायला विशेष अडचण पडू नये. उभे आडवे धागे गुंफले की वस्त्र होते. उगाच अटीतटी ताणून आणि भरमसाठ बोलून काही साधत नाही. नेते वाट्टेल ते बोललेले विसरून वाट्टेल ते करतात. कार्यकर्ते ता अटीतटीने बरबाद होतात. निष्कारण भांडणे वाढतात. हाणामाऱ्या कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव झालीय. या निवडणुकीनंतर आक्रस्ताळे राजकारण बाजूला पडेल.

*शहरी आणि ग्रामीण यांचा समन्वय हवा*
कुठलेही जनकल्याणाचे काम  जिद्दीनं, ईर्षेनं करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा मन राखून त्याला विश्वास देऊन धडाक्याने विकासाची कामे करणारे कल्पक, विवेकी, विधायक, सुशील वृत्तीचे नेतृत्व ही युती महाराष्ट्राला स्थैर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य देऊ शकेल. ग्रामीण भागात शिकलेली, नवी दृष्टी लाभलेली, आपल्या भागाचा कायापालट करण्याची ईर्षा असलेली, त्यासाठी पाय रोवून गावातच राहायची तयारी असणारी आणि शहरातल्या लोकांचे रितभात, हुशारी, चलाखपणा याला तोडीस तोड ठरणारी तरुणांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. या तरुणांना एकमेकांना शह-काटशह देत, एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम राबवू न देता त्यांना विविध पातळीवर विविध क्षेत्रात विविध सत्तास्थानांवर एकमेकाला पूरक  असे काम करण्याची गोडी लावायला हवी.

*बोलघेवड्यांना लोक बधत नाहीत*
राजकारण बदलते आहे. आता जंगी सभा आणि फर्डे वक्तृत्व, हंशा, टाळ्या आणि 'आवाज कुणाचा' या आरोळ्या यांनी लोक बधत नाहीत. सभांचा प्रभाव आता दिवसेंदिवस मर्यादित होणार. आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाचा जमाना येतोय. ज्यांच्याबद्धल लोकांना हा माणूस काम करतो असा विश्वास आहे तो कसा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता लोक मतदान करतील. आता मतदान करून लोक आपल्याला हवा असलेला प्रतिनिधी पाठविण्यात यशस्वी होऊ असा विश्वास लोकांमध्ये आला आहे. भरमसाठ भाषणबाजी करणाऱ्या भाकड नेत्यांना आपले भाग्यविधाते बनवायला तयार नाहीत. भाषणांनी लाटा उठत नाहीत. आणि एखाद्या व्यक्तीला बदनाम करून उठवण्याचा अतिरेकही उलटतो. भ्रष्टाचार, गुन्हेगारी  यावर सोवळेपणाने बोलणाऱ्यांच्या बुडाखाली केवढे डबोले आणि केवढी घाण आहे याची कल्पना सर्वांना आहे.

*तुमच्याही बुडाखाली हे सारं*
सोवळ्यात पावित्र्य असते असं मी मानत नाही. सोवळं पावित्र्यासाठी वापरलं जातही असावं, पण पावित्र्याचा
आणि सोवळ्याचा संबंध दाखवण्यापूरताच उरलाय याचं प्रत्यंतर देणारे महाभाग भेटल्यानंतर, अशी सोवळी मिरवण्यापासून दूर राहणेच बरे असे लोक मानू लागले तर तो लोकांचा दोष नाही. भारतीय जनता पक्ष असा सोवळं मिरवणाऱ्यांचा गड्डा किंवा अड्डा आहे. राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव, सचोटी, सभ्यता, सहजीवन कुठं असेल तर ते इथंच असाही टेंभा मिरवणारे आहेत. पण या सोवळ्याआड जे आहे ते काँग्रेसपेक्षा वेगळे नाही. असं स्पष्ट करणाऱ्या घटना पुन्हा पुन्हा  घडतात. त्यावर का बोलायचं नाही? लिहायचं नाही? भाजपमध्येही भरपूर भ्रष्ट आहेत. भरपूर तत्वशून्य आहेत. भरपूर गुंडप्रवृत्तीचे आहेत, भरपूर संधीसाधू आहेत आणि जातीयतेची कीड वळवळणारे आहेतच आहेत. काँग्रेसमधली घाण काढायचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या बुडाखालची घाण दाखवली तर मग कळवळता का?

*'बंडखोर तितुका मेळवावा!'*
जनता पक्ष जेव्हा आकाराला आला, तेव्हा 'ही परस्परविरोधी विचारांच्या पक्षांची खिचडी आहे, एकेकाळी पराभूत झालेल्या बड्या आघाडीची सुधारून वाढवलेली नवी आवृत्ती आहे, आणि 'इंदिरा हटाव, काँग्रेस बचाव', हेच तिचे नकारात्मक ध्येय आहे.' असा प्रचार सत्ताबाज काँग्रेसजन करीत होते. तथापि, सत्तेचे सिंहासन बळकविण्यासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगता कोणत्याही पक्षाशी शय्यासोबत करणाऱ्या काँग्रेसवाल्यांच्या ह्या प्रचाराचा विशेष परिणाम जनमानसावर झाला नाही. जनता पक्ष हा हुकूमशाहीचा पाडाव करून लोकशाही नी स्वातंत्र्य ह्यांना प्रतिष्ठा आणणारा नि लोकशाही मार्गाने भारतात सर्वांगीण क्रांती करू इच्छिणारा पक्ष आहे.' हा जनता पक्षाचा दावा जनताजनार्दनाने मानला आणि त्याला भरघोस यश दिले. केवळ सत्ता संपादनार्थ काँग्रेसला विरोध एवढेच जनता पक्षाचे नकारार्थी ध्येयधोरण आहे, असे लोकांना वाटले असते तर एवढे देदिप्यमान यश जनता पक्षाला लाभले नसते. म्हणूनच, सत्ता संपादनाखेरीज अन्य कोणतेही उद्दिष्ट नसलेला, अतएव काँग्रेसचीच नवी कार्बन कॉपी बनलेला पक्ष अशी प्रतिमा होऊ न देण्याची खबरदारी जबाबदार भाजपेयी नेत्यांनी घेतली पाहिजे. केंद्राप्रमाणेच राज्या-राज्यांतही काँग्रेसला सत्ताभ्रष्ट करणं हे साधन आहे, साध्य नव्हे, ह्याची जाणीव जराही पुसट होऊ नये. अन्यथा लोकांचा अपेक्षाभंग ठरलेला!


चौकट.....!
*साध्य, साधन, विवेक लुप्त तर झाला नाही ना!*
तथापि कर्नाटकात त्यापूर्वी गुजरातेत, उत्तरभारतात विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळी जे वर्तन काही भाजपेयींकडून घडलं त्यावरून आणि महाराष्ट्रात काँग्रेसी बंडखोरांच्या स्वागताचा जो उल्हास भारतीय जनता पक्षात ओसंडून चालला आहे त्यावरून उपर्युक्त साध्य-साधन-विवेक लुप्त तर झाला नाही ना असं चित्र उभं राहतेय. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आणि ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या भाषणातून भाजपेयी धुरिणांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सत्तालंपट लोकांसाठी त्यांच्या स्वागतासाठी ज्या शब्दसुमनांच्या पायघड्या पसरल्या आहेत आणि होत्या ते अधिक चिंताजनक आहे. महाराष्ट्रात सत्ता टिकविण्यासाठी, एकहाती सत्ता घेण्यासाठी भाजपेयींनी सारं बळ एकवटू नये असं नाही. किंबहुना, जी सर्वांगीण लोकशाहीवादी क्रांती भाजपेयींच घडवू इच्छितात, तिच्या पूर्ततेसाठी आणि केंद्रीय भाजपच्या प्रगतीपथावरील अडथळे दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते याचा विसर पडत चाललाय! उत्तरभारताप्रमाणेच दक्षिण भारतातही विशेषतः कर्नाटकात, महाराष्ट्रात एकच पक्ष विधानसभेत यशस्वी होणं ही कालोचित क्रमप्राप्त निकड आहे. असंच सामान्य जनतेचं मत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे ह्यांत सुसंवाद निर्माण होण्यासाठी कोणत्यातरी एकाच पक्षाचं बळ वाढणे गरजेचं आहे. त्यांच्या यशाचे ध्वज डौलाने फडकले पाहिजेत! अन्यथा लोकांच्या नशिबी पुन्हा कडबोळी सरकारं आलेली पाहावी लागणार!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

  1. अतिशय परखड विचारांचा, आत्मचिंतन करायला लावणारा अप्रतिम लेख..!

    ReplyDelete

शिवसेनेचे मित्र आणि महाराष्ट्रधर्म...!

"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...