Saturday 14 April 2018

माईसाहेब आंबेडकरांचे अस्वस्थ जीवन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अखेरच्या काळात त्यांची  सावली म्हणून वावरलेल्या डॉ.सविता आंबेडकर उर्फ माईंसाहेब यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व कमालीचं थक्क करणारं होतं. ते त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात कमावलेलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्या निधनानंतर माईंना डॉक्टरी व्यवसाय करणं कठीण नव्हतं. तो केला असता तर त्यांनी करोडो रुपये कमावले असते. आणि वृद्धत्वातली झालेली फरफटही त्यामुळं टळली असती. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन वैभवावर ओरखडाही उमटणार नाही, असं आयुष्य माईसाहेबांनी स्वीकारलं. वयाची नव्वदी त्यांनी पार केली होती. त्यातली शेवटची ४५ वर्षं तर त्यांचा जीवन प्रवास हा एकटीचाच होता. तो त्यांनी पतीनं दाखवलेल्या बौद्धधर्माच्या वाटेवरून पार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्यातला जिवाभावाचा अखेरचा दुवा म्हणजे माईसाहेब आंबेडकर! त्यांचं जीवन हे अस्वस्थ करणारं होतं. काल डॉ. बाबासाहेबांची जयंती होती त्यानिमित्तानं या माऊलींचीही आठवण करणं गरजेचं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच!"
------------------------------------------------

*डॉ.* सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांचं अवघं आयुष्य चक्रावून टाकणारं आहे. माईंचा डॉ. आंबेडकर यांच्याशी परिचय वैद्यकीय उपचाराच्या निमित्तानं मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळील डॉ. मालवणकर यांच्या रुग्णालयात झाला. तेव्हा बाबासाहेबांनी वयाची पन्नाशी गाठली होती. तर माई तिशीपार झाल्या होत्या. दिसायला देखण्या असलेल्या माई सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या. स्वभाव बंडखोर होता. त्यामुळं त्यांनी घेतलेला लग्नाचा विचार तसा दुय्यम ठरला. पण उपचाराच्या निमित्तानं बाबासाहेबांशी झालेल्या बोलचालीनं माईंच्या हृदयात प्रेमकमळ फुलू लागलं. ते वैचारिक ओढीचं होतं. प्रथम पत्नी रमाबाईंच्या निधनानंतर बाबासाहेबांचं सांसारिक जीवन संपलं होतं. तथापि विचारांचं आदान-प्रदान करणाऱ्या 'पार्टनर'ची उणीव बाबासाहेबांसाठी जुनीच होती. ती उणीव उपचारानंतर माईंशी होणाऱ्या भेटीगाठीतून भरून निघतेय, याची जाणीव बाबासाहेबांना होऊ लागली. बाबासाहेब उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. तेव्हा तिथल्या तरुणांत मनगटाभोवती सोन्याची चेन आणि त्याला पदक लटकविण्याची फॅशन होती. बाबासाहेबही तेव्हा पदकावर नांगर कोरलेलं ब्रेसलेट वापरीत. एकेदिवशी ते त्यांनी माईंच्या हातावर ठेवलं आणि त्या पदकावरील नांगरावर बोट ठेवीत म्हणाले, 'समुद्रात नांगर टाकल्यावर जहाज स्थिरावतं, तसं तुझ्या साथीनं माझं जीवन स्थिरावेल.' त्यानंतर दोघांनी पूर्ण विचार करून विवाहाचा निश्चय केला.

*घटना निर्मिती, धर्मांतरात मोलाची साथ*
भारत सरकारचे पहिले कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्या दिल्लीत राहू लागल्या. माईंची ही साथ बाबासाहेबांच्या 'राज्यघटना' निर्मितीच्या कामात आणि धर्मांतराच्या कार्यात मोलाची ठरली. या काळात माईंनी बाबासाहेबांच्या तब्येतीची काळजी घेतली नसती तर बाबासाहेबांनी हाती घेतलेलं कार्य तडीस जाणं अवघड होतं. यासाठी माईंनी बाबासाहेबांच्या कट्टर कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घेतली. त्याचा फटका माईंना बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर बसला. उच्चविद्याविभूषित माईंनी अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीतील डॉ. आंबेडकरांशी केलेला विवाह ही त्या काळातली मोठी समाज क्रांती होती. तो आदर्श आंतरजातीय विवाह ठरला. परंतु त्यानं डॉ. आंबेडकरांचे आप्त-अनुयायी दुखावले होते. परिणामी बाबासाहेबांच्या निधनानंतर उपेक्षेचं जिणं माईंच्या नशिबी आलं. ज्यांना सूड घ्यायचा होता त्यांनी माईंनाच बाबासाहेबांच्या मृत्यूला जबाबदार धरणारी अफवा उठवली. त्यामुळं बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांकडील पाहुणचार झोडण्यात, त्यांच्याबरोबर समारंभात जाण्यास प्रतिष्ठेचं मानत; तेच माईंच्या माहेरकडील लोक माईंवरील किटाळाचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून माईंना टाळू लागले. इतकंच नव्हे तर त्या किटाळाला पूरक ठरणाऱ्या गोष्टी पेरू लागले.

*आप्तांनी नातेवाईकांनी देखील टाळलं*
डॉ.आंबेडकर यांच्या नातेवाईकांनी तर त्यांना कधीच आपलं मानलं नाही. १९७२पर्यंत माई दिल्लीतील नेहरोली भागात एकाकी जीवन घालवत होत्या. त्यानंतर दलित पँथरच्या चळवळीने जोर धरला तसं राजा ढालेंनी त्यांना मुंबईत आणलं. तिथं त्या भावाकडे दादरला राहत. त्यानंतरच्या काळात त्या बेस्ट बसेस मधून प्रवास करताना अनेकांना दिसल्या. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या बळकट होत्या, तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वाभिमानाला साजेल अशा हिंमतीने त्या परिस्थितीला सामोऱ्या जात होत्या. त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही हलाखीच्या फेऱ्यात जखडलेला नाही. बहिणींची घरं तर करोडपती उद्योगपती आहेत. पण माईंना दिल्लीत जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघाताची माहिती समजूनही कुणी दिल्लीला धडकलं नाही. त्यानंतर मुंबईत असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. बाबासाहेबांच्या विचारांमुळे माईंचं निकटवर्ती झालेल्यांनी त्यांना दादरच्या शुश्रूषा हॉस्पिटल्स मध्ये दाखल केलं. त्याची माहिती आप्तांना दिली, पण कुणीही आलं नाही. त्यांची एक श्रीमंत  बहीण हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आली, पण प्रकृतीच्या अस्वास्थाचं कारण देऊन तिनं तिसऱ्या मजल्यावर उपचार घेणाऱ्या माईंना भेटण्याचं टाळलं.

*बाबासाहेबानंतर अकारण माईंना बदनाम केलं गेलं*
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत जीवनातील अखेरचा दुवा म्हणजे सविता उर्फ माई आंबेडकर! डॉ.आंबेडकर हे अतिविशाल वृक्षांसारखे होते! ज्याप्रमाणे विशाल वृक्षाची छाया घनदाट असते, आश्रयाला येणाऱ्या प्रत्येकाला कोणताही भेदभाव न ठेवता विश्व, सावली देते, आपल्या अंगावर ऊन, पाऊस, वर सोसून इतरांना शीतल छाया देण्याचं काम आपल्या अवयवांच्या सिंचनातून करीत असतो.  त्याप्रमाणे बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांना आश्रय दिला, त्यांचा उद्धार केला. अनेक नेते कार्यकर्ते निर्माण केले. त्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. झीज सोसली, पण ज्यावेळी विशाल वृक्ष उन्मळून पडला त्यावेळी त्याच्या आश्रयाने संरक्षणासाठी वाढत चाललेली लहान लहान झुडपं डोकं वर काढतात आणि एकमेकांवर कुरघोडी करून आपला मोठेपणा दाखवतात, अगदी असाच प्रकार डॉ. आंबेडकरांच्या आश्रयाखाली निर्माण झालेल्या नेत्यांबाबत घडला. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर नेतृत्वाबाबत प्रत्येकालाच हवं सुटली होती, पण त्याआधी डॉ. आंबेडकरांच्या वारसांना समाजापासून दूर ठेवणं त्यांना अधिक गरजेचं वाटलं. म्हणून ज्या माई आंबेडकरांनी बाबासाहेबांवर मनापासून जीवापाड प्रेम केलं, त्या माईंना खोटे आरोप करून अकारण बदनाम केलं गेलं.

*त्यांच्या पत्रव्यवहारातून निस्सीम प्रेमाचं दर्शन*
बाबासाहेबांनी डॉ. शारदा कबीर - सविता आंबेडकर यांच्याशी लग्नापूर्वी २५ जानेवारी १९४८ ते ९ एप्रिल १९४८ या काळात आपल्या वाग्दत्त वधूशी पत्रव्यवहार केला या पत्रातून त्यांच्या मनाचा उमदेपणा, भव्य-दिव्य कल्पनाशक्ती आणि बाबासाहेब यांच्यातील लग्नाच्या पूर्वीचे आणि नंतरचे परस्पर संबंधही त्यावरून स्पष्ट होतात. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'जुन्या हिंदू कल्पनेनुसार विवाहानंतर स्त्री आणि पुरुष दोन व्यक्ती राहतच नाहीत. ते एकाच अस्तित्वात विसर्जित होत असतात. तो माझा विवाह म्हणजे काय याचा आदर्श आहे. एकमेकांत विसर्जित होण्याची ही कल्पना रूथ नावाच्या मुलीनं आपली आई नाओमी हिला फार अनुरूप शब्दात सांगितली आहे. जुन्या करारात त्यांची कथा आढळेल. ते म्हणत , 'मी तुला कधीही चिडून जाऊ नये, तुझे अनुसरण करण्यापासून परावृत्त होऊ नये, कारण तू जिथं जाशील तिथंही मी जाईन आणि जिथं तू राहशील तिथंच मीही राहीन. तुझी माणसं ही माझी माणसं असतील आणि तुझा ईश्वर तो माझाही ईश्वर असेल!'

*बाबासाहेबांनी लिहलेल्या पत्रात उत्कट प्रेमाची अनुभूती*
आणखी एका पत्रात बाबासाहेब म्हणतात, 'तू मला स्वीकारीत आहेस, असं लिहिलं होतं, त्याचा अर्थ मी काय घ्यावा? तू माझा स्वीकार करीत आहेस ते काय म्हणून? एक थोर माणूस म्हणून, विद्वान म्हणून की देखणा दिसणारा माणूस म्हणून? तुझी प्रेरक भावना काय आहे? एका कवीनं म्हटलं आहे त्याप्रमाणे, 'जे प्रेम सौंदर्यावर आधारित असेल ते सौंदर्य संपताच संपुष्टात येईल'. तेच थोरवी किंवा विद्वत्ता यावर उभारलेल्या प्रेमाबद्धलही म्हणता येईल. या गोष्टी कालांतरानं क्षीण होत असतात. त्या काही विवाहाचा पाया ठरू शकत नाहीत. विवाह फक्त प्रेमावरच आधारित असू शकतो आणि त्याचं वर्णन 'परस्परांचं होऊन राहण्याची कांक्षा!' असेच केले जाऊ शकते. तू अशा भावनेनं प्रेरित झालेली आहेस कांस्य? तू कुंकू सिनेमा पाहिला आहेस का?, किंवा 'वुमन दाऊ गेवेस्ट मी' ही टॉमस हार्डी यांची कादंबरी वाचली आहेस की नाही, मला माहित नाही, दोन्ही ठिकाणी विवाह ही एक औपचारिकता होती. त्यामुळं ते किती दुःखद आणि शोकपर्यवासी ठरले होते! ते शोकात होण्याचं मुख्य कारण त्यात परस्परांचे होऊन राहण्याची कांक्षा नव्हती. आपला विवाह तशा प्रकारचा व्हावा, असं मला वाटत नाही. तुझ्या ठिकाणी जर परस्परांचे होऊन जाण्याची कांक्षा नसेल तर आपण त्यासंदर्भात काहीही न बोललेलं बरं. आज आणि इथून पुढं मृत्यूपर्यंत, बऱ्यासाठी आणि वाईटासाठी, समृद्धतेचा आणि दारिद्र्यात, अनारोग्यात आणि निरोगीपणात, प्रेमासाठी आणि प्रतिपालनासाठी ईश्वराच्या पवित्र आज्ञेबरहुकूम आपणही एकत्र येत आहोत.

*प्रेमाच्या व्याख्येनं बाबासाहेबांची प्रेमानुभती*
आपल्या ९ एप्रिल १९४८ च्या पत्रात आंबेडकरांनी प्रेम आणि द्वेष यांची व्याख्या केली असून एकमेकांशी वागताना आणि एकमेकांना समजून घेताना ते परस्पराबद्धल कसं निर्माण होतात याचे सुंदर वर्णन केलेलं आहे. हे त्यांनी आपल्या नियोजित वधूला आपल्या दुसऱ्या लग्नाच्या फक्त पांच दिवस आधी लिहिलं होतं, हे लक्षात घेण्यासारखं आहे.' .....तू मला विचारतेस की, मी जर माझ्या मुलावर एवढं प्रेम करीत असेल तर तुझ्यासाठी माझ्याजवळ एवढं प्रेम कुठून असेल? या प्रश्नाला माझं उत्तर अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुलावर प्रेम करणं आणि तुझ्यावर प्रेम करणं यात मुळीच अंतर्विरोध नाही. प्रेम ही जर अशी व्यावर्तक गोष्ट असती तर मग असा निष्कर्ष काढता आला असता की, एकावर प्रेम करायचं आणि इतर सर्वांचा द्वेष करायचा. तू तुझ्या वडिलांवर, भावांवर आणि बहिणींवर प्रेम करतेस म्हणून तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, असं मी म्हणू शकेन का? हे किती मूर्खपणाचं होईल? एखादी व्यक्ती सर्वांवर प्रेम करू शकते आसनी खरं तर तिनं ते करावंच! पण एक गोष्ट अशी आहे की, सर्वांशी प्रेम करणं याचा अर्थ आपल्याला जी माणसं प्रिय असतात त्या सर्वांमध्ये आपल्याला एकाच प्रकारचा वा समान असतोच असा आहे.'

*एकमेकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं*
डॉ. बाबासाहेब आजारी पडल्यानंतर मुंबईत आले. १९३४ सालापासून ते या ना त्या आजाराने आजारी होते. पुढे न्यूरायटीस, डायबेटीस, संधिवात, श्वसनाचा त्रास, हृदयविकार आशा दुर्धर रोगानं त्यांना ग्रासलं होतं. डॉ. मावळणकर यांच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉ. आंबेडकर यांना भेटायला येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता तिथं इतर रुग्णांना आणि रुग्णालयाला आणि व्यवस्थापनाला त्रास होत होता म्हणून त्यांना घरीच सुश्रुषेखाली ठेवण्याचे ठरविलं आणि देखभालीसाठी डॉ. शारदा कबीर यांची नेमणूक डॉ. माधव जी. मावळणकर यांनी केली. जातीनं सारस्वत ब्राह्मण असलेल्या डॉ. शारदा कबीर आंबेडकरांना भेटल्या. त्यांची देखभाल करण्यासाठी त्या तयार झाल्या. पुढं दिसणारं अंधःकारमय भवितव्य आणि पोक्तपणे विचार केल्यानंतर बाबासाहेबांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा मोडली आणि पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. डॉ शारदा कबीर यांच्याशी दिल्लीच्या त्यांच्या १, हार्डीज अव्हेन्यू या त्यांच्या निवासस्थानी ५ एप्रिल १९४८ साली सिव्हिल मॅरेज कायदेनुसार अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांचा विवाह झाला. त्यानंतर डॉ. शारदा कबीर या डॉ. सविता आंबेडकर झाल्या. माई आंबेडकर यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले होते. वैद्यकीय शिक्षण जे.जे. मेडिकल कॉलेजमध्ये झाले. त्या सुविद्य आणि सुशिक्षित अशा परिवारातून आल्या होत्या. त्या दोघी पतीपत्नीतील पत्रव्यवहार पाहता बाबासाहेबांनी माईंना आणि माईंनी बाबासाहेबांना तळहातावरच्या फोडासारखं जपलं.

*जिवंत असतानाच दूरचित्रवाणीवर निधनाचे वृत्त*
बाबासाहेबांच्या निधनानंतर माईंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं, म्हणू  तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला. माईंना आंबेडकरांच्या निधनानंतर झालेल्या आरोपांमुळे जणू अज्ञातवासाचीच शिक्षा भोगावी लागली. या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी तज्ज्ञांची समिती नेमली समितीनं माईंना सर्व आरोपातून मुक्त केलं. बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी आणि जवळच्या अनुयायांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. आपले स्वार्थ त्यांनी साधले. पण माईंनी भोगलं, सोसलं ते अत्यंत कठीण होतं. पण दलित पँथरच्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माईंना आदरानं वागवलं, सन्मान दिला. रिडल्सप्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका ही तमाम दलितांना आपलंसं करणारी होती. त्यांची ती भूमिकाच त्यांना सन्मान देणारी ठरली. दलितांच्या मनातून पेरलेले विष दूर करणारी ठरली. बाबासाहेबांना विष देऊन मारल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता ते उघडे पडले. दलित समाजाच्या मनात याबद्धलची अपराधीपणाची भावना आजही आहे. जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांच्यावर झालेले आरोप आणि झालेली बदनामी दूर झाली. यांतच माई धन्यता मानत गेले. अखेरच्या काळात रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना दूरचित्रवाणीवरच्या जीवघेण्या स्पर्धेत उतावीळ झालेल्या काही वाहिन्यांनी त्या गेल्याचं वृत्त दिलं होतं. जनतेत संतापाची लाट उसळली होती. त्या जाण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करणं हे माईंबद्धल असलेला आदर आणि प्रेम यांची थट्टा करणारं होतं.


चौकट......

*बाबासाहेबांनंतर माईंच्या जीवनात अपमान उपेक्षा आणि अवहेलनाचं!*
भारत सरकारचे पहिले कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्या दिल्लीत राहू लागल्या. माईंची ही साथ बाबासाहेबांच्या 'राज्यघटना' निर्मितीच्या कामात आणि धर्मांतराच्या कार्यात मोलाची ठरली. या काळात माईंनी बाबासाहेबांच्या तब्येतीची काळजी घेतली नसती तर बाबासाहेबांनी हाती घेतलेलं कार्य तडीस जाणं अवघड होतं. यासाठी माईंनी बाबासाहेबांच्या कट्टर कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घेतली. त्याचा फटका माईंना बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर बसला.

उच्चविद्याविभूषित माईंनी अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीतील डॉ. आंबेडकरांशी केलेला विवाह ही त्या काळातली मोठी समाज क्रांती होती. तो आदर्श आंतरजातीय विवाह ठरला. परंतु त्यानं डॉ. आंबेडकरांचे आप्त-अनुयायी दुखावले होते. परिणामी बाबासाहेबांच्या निधनानंतर उपेक्षेचं जिणं माईंच्या नशिबी आलं. ज्यांना सूड घ्यायचा होता त्यांनी माईंनाच बाबासाहेबांच्या मृत्यूला जबाबदार धरणारी अफवा उठवली. त्यामुळं बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांकडील पाहुणचार झोडण्यात, त्यांच्याबरोबर समारंभात जाण्यास प्रतिष्ठेचं मानत; तेच माईंच्या माहेरकडील लोक माईंवरील किटाळाचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून माईंना टाळू लागले. इतकंच नव्हे तर त्या किटाळाला पूरक ठरणाऱ्या गोष्टी पेरू लागले.

डॉ.आंबेडकर यांच्या नातेवाईकांनी तर त्यांना कधीच आपलं मानलं नाही. १९७२पर्यंत माई दिल्लीतील नेहरोली भागात एकाकी जीवन घालवत होत्या. त्यानंतर दलित पँथरच्या चळवळीने जोर धरला तसं राजा ढालेंनी त्यांना मुंबईत आणलं. तिथं त्या भावाकडे दादरला राहत. त्यानंतरच्या काळात त्या बेस्ट बसेस मधून प्रवास करताना अनेकांना दिसल्या. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या बळकट होत्या, तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वाभिमानाला साजेल अशा हिंमतीने त्या परिस्थितीला सामोऱ्या जात होत्या. त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही हलाखीच्या फेऱ्यात जखडलेला नाही. बहिणींची घरं तर करोडपती उद्योगपती आहेत. पण माईंना दिल्लीत जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघाताची माहिती समजूनही कुणी दिल्लीला धडकलं नाही. त्यानंतर मुंबईत असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. बाबासाहेबांच्या विचारांमुळे माईंचं निकटवर्ती झालेल्यांनी त्यांना दादरच्या शुश्रूषा हॉस्पिटल्स मध्ये दाखल केलं. त्याची माहिती आप्तांना दिली, पण कुणीही आलं नाही. त्यांची एक श्रीमंत  बहीण हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आली, पण प्रकृतीच्या अस्वास्थाचं कारण देऊन तिनं तिसऱ्या मजल्यावर उपचार घेणाऱ्या माईंना भेटण्याचं टाळलं.

माईंचं इंग्रजीवरचं प्रभुत्व कमालीचं थक्क करणारं होतं. ते त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात कमावलेलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्या निधनानंतर माईंना डॉक्टरी व्यवसाय करणं कठीण नव्हतं. तो केला असता तर त्यांनी करोडो रुपये कमावले असते. वृद्धत्वातली फरफटही त्यामुळं टळली असती. पण बाबासाहेबांच्या जीवन वैभवावर ओरखडाही उमटणार नाही, असं आयुष्य त्यांनी स्वीकारलं. वयाची नव्वदी त्यांनी पार केली होती. त्यातली शेवटची ४५वर्षं तर त्यांचा प्रवास एकटीचाच होता. तो त्यांनी पतीनं दाखवलेल्या बौद्धधर्माच्या वाटेवरून पार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्यातला जिवाभावाचा अखेरचा दुवा म्हणजे माईसाहेब आंबेडकर! त्यांचं जीवन हे अस्वस्थ करणारं होतं. काल डॉ. बाबासाहेबांची जयंती होती त्यानिमित्तानं या माऊलींचीही आठवण करणं गरजेचं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

4 comments:

  1. सर लेख वाचला
    खूप महत्त्वपूर्ण मांडणी केलीत

    ReplyDelete
  2. छान माहिती दिली सर

    ReplyDelete

अखेर राज 'लवंड'ले.....!

"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं, पण कधी कधी  आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. अशीच अ...