Tuesday, 31 October 2017

फसनविस सरकारची तीन वर्षे!

*'फसनविस' सरकारची तीन वर्षे*

*दि*वाळी....! सणासुदीचे दिवस पूर्वीच्या काळी ती मोठ्या उत्साहानं साजरी होई. आज मात्र त्याची चाहुलदेखील नकोशी झालीय. शेतकरी नागवलाय, उद्योग अडचणीत आलेत, व्यापार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळतेय. अशावेळी समाजातील सर्व घटकांना सांभाळणारा, काळजी वाहणारा राज्यकर्ता, *जाणता राजा* कुठे दिसतच नाही. सगळीकडे बेफिकिरी, बेपर्वाई अराजक सदृश्यस्थिती जाणवू लागली आहे. एकीकडे रयतेच्या हातात पैसा येईनासा झालाय तर दुसरीकडे त्याच्या हातातला पैसा हिसकावण्यासाठी सरकार सरसावले आहे. आजवर आस्मानी संकटांना पुरून उरलेली रयत आता सुलतानी संकटाशी झुंजते आहे. राजकीय फटाक्यांच्या दारुकामात  इथल्या रयतेकडं मात्र कुणाचं लक्षच नाही. ती मरणासक्त झालीय, राज्यकर्त्यांकडून तिला सहाय्य मिळावं तिला जगण्याची ताकद मिळावी असं वाटतं पण ती मानसिकता कोणत्याच राजकारणात दिसतच नाही. सगळेच सत्तेच्या वाटमारीत मदमस्त आहेत! शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी, कामगार नोकरदार सारेच अस्वस्थ आहेत. हवालदिल झाले आहेत. त्यांना कुणीच वाली राहिलेला नाही. ही अस्वस्थता,उद्विग्नता वाढली तर वैफल्यग्रस्त लोक काय करतील हे सांगता येत नाही अशी भयावह स्थिती निर्माण झालीय

*मांड ठोकल्याचे दिसत नाही*
सध्या सरकारच्या तृतीय वर्षपूर्ती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती सर्वच दैनिकात आणि न्यूज चॅनल्सवर प्रसिद्ध होत आहेत. मुलाखती घेणारे अनेकजण असले तरी मुलाखत देणारे मात्र एकच जण! विचारले जाणारे प्रश्न तेच जणू कॉपीपेस्ट ! त्या साऱ्यांची उत्तरे न थकता,न कंटाळता उडवाउडवीची वा थातुरमातूर उत्तरे न देता ज्या तडफदारपणे देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखती गेल्या काही दिवसात दिल्या आहेत ते पाहता त्यांच्यातला विरोधीपक्ष अद्याप शिल्लक असल्याचं जाणवतं. अद्यापी आपण शासक आहोत. आपण ठरवू ते व्हायलाच हवं असा आग्रह, असा दबाव वा वेगळ्या भाषेत सांगायचं तर राज्याचा प्रमुख म्हणून असलेली प्रशासकीय दहशत यांच्यात दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या कुबड्या घेऊनच राज्य शकट हाकला जातोय. त्यामुळं लोकाभिमुख राज्यकारभार होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या क्लिष्ट आणि अगम्य कारभारातच मराठी माणूस गुरफटलेला आहे. शिवरायांचा आशीर्वादानं राज्यकारभार करायचा असं त्यांनी म्हटलं असलं तरी तसं ते प्रत्यक्षात दिसत नाही. त्यांची पकड प्रशासनावर दिसत नाही. फडणवीसांनी मांड ठोकलीय असं जाणवत नाही.

*भाजपेयी सरकार मातले आहे*
राज्यात सत्ता येऊन तीन वर्षे उलटली. रयतेच्याच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या पदरातही काही पडलं नाही, जे काही झिरपलं ते सारं 'आयारामां'नी गिळलं. राज्यातल्या सरकारनं आपल्या कार्यकाळातला निम्म्याहून अधिक टप्पा ओलांडलाय, काहीसा उरलाय. शिवरायांच्या शिवशाहीला साडेतीनशेहुन अधिक वर्षे उलटली पण आजही त्या राजवटीची आठवण काढली जातेय. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली ती पहिली शिवशाही. आज राज्यात छत्रपती शिवरायांच्या नावाने महाराष्ट्राचा कारभार चालतो, असं मुख्यमंत्री म्हणतात. मंत्रालयाची पायरी चढल्यावर समोरच छत्रपतींचे भव्य तैलचित्र आहे. महाराजांना मुजरा करूनच प्रत्येक राज्यकर्त्यास आणि नोकरशहास पुढे जावे लागते. छत्रपतींना लवून मुजरे करणाऱ्यांनी छत्रपतींसारखे शुद्ध आचरण ठेवावे असे सामान्य जनतेस-रयतेस वाटते. शिवरायांनी आपल्या सैनिकांवर जे निर्बंध लादले होते ते शेतकरी आणि रयतेची काळजी करणारे, कदर बाळगणारे होते. सैनिकांना त्यांची सक्त ताकीद असे की, 'दाणागोटा वगैरेची व्यवस्था आम्ही पुरेशी केली आहे, मात्र तो जपून वापरीत जा. नाहीतर आहे तोपर्यंत उधळेगिरी कराल आणि मग तुटवडा पडला म्हणजे घोडी उपाशी माराल किंवा *शेतकऱ्यांना* छळाल. मग कुणी कुणब्यांकडे जातील, कोणी दाणे, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कुणी पाते असे करू लागतील. तर जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरू लागतील. म्हणजे त्यांना असं होईल की, *मोगलांपेक्षा हेच लोक अधिक वाईट! असा तळतळाट होईल*' शिवाजीराजांनी त्यांच्या शिवशाहीत प्रामुख्याने कोणत्या गोष्टी केल्या ते पहा- आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली, जमीनदारांचे उच्चाटन करून रयतवारी जारी केली. अष्टप्रधान संस्थापना करून राज्याला स्थैर्य व राज्यकारभाराला व्यवस्थितपणा आणला. न्यायदानाची उत्कृष्ट पद्धत घालून दिली. किल्ल्यांचा कारभार योग्यप्रकारे चालावा म्हणून नियम करून दिले. हिंदूंना आपल्या राज्यात व काही अंशी बाहेरही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. राज्य शासनाचे सर्व व्यवहार मराठीत चालवेत म्हणून राज्यव्यवहार कोश तयार करविला. थोडक्यात असे की, शिवाजीमहाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. ते टिकविले आणि वाढविले. 'हे तो श्रींची इच्छा' असं सांगत रयतेचे राज्य म्हणून ते चालविले. ही ती शिवशाही...! आजची काय स्थिती आहे? शिवरायांच्या आशीर्वादानं आम्ही राज्य करू असं म्हणत मतांचा जोगवा मागणारे भाजपेयी सरकार मातले आहे असं वातावरण आहे.

*शिवरायांचा आदर्श कुठेय?*
काँग्रेसने महाराष्ट्रात आणि देशात साठ वर्षे वतनदारी केली. त्यांची वतनदारी जनतेनं उलथवून टाकली. तीन वर्षांपूर्वी देशात आणि अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रयतेनं अशीच काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली ती शिवरायांच्या नावानं! सत्तेवर आलेल्या भाजपेयींनी शिवशाहीचा आणि शिवशाहीतल्या आज्ञापत्रांचा अभ्यास करावा अशाप्रकारच्या अनेक आज्ञापत्रातून 'शिवशाही'च्या कारभाराची दिशा स्पष्ट होते. शिवरायांचे मन उघड होते. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं म्हणतात; पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे महाराजांनी राष्ट्र निर्माण केलं. रयतेच्या ठायी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली.राजकारणातील आजचे चित्र भयावह आहे. जनतेची काळजी नसलेले राजकारण आणि सत्ताकारण सर्वच स्तरावर सुरू आहे. दिल्लीतील राजकारण्यांनी तर रयतेलाच वेठीला धरले आहे.
'रयतेच्या शेतातील भाजीच्या देठालाही धक्का लागू नये' याची काळजी घेणारी शिवशाही कुठे अन शेतकऱ्यांना संपावर जाण्याची पाळी यावी हे कशाचे द्योतक आहे?

*सत्ता कार्यकर्त्यांपर्यंत झिरपलीच नाही*
आता काय तर म्हणे सरकारच्या कारभाराची प्रसिद्धी करण्यासाठी तब्बल तीनशे कोटी रुपयांची उधळण सोशल मिडियासाठी केली जाणार आहे. ज्या सोशल मीडियानं सत्तेचा मार्ग सुकर केला त्याच तोच सोशल मीडिया आता बुमरेंगसारखं उलटतेय त्यासाठी ही तरतूद केल्याचं म्हंटलं जातंय. सरकारच्या अखत्यारीतील प्रसिद्धी आणि माहिती संचलनालय हाती असताना खासगी संस्थेला हा निधी दिला जाणार आहे. लोककल्याणकारी निर्णयांसाठी तिजोरीतील खडखडाट दाखविला जात असतानाही, स्वतःची टिमकी वाजविण्याची खमखुमी शमविण्यासाठी केली जाणारी ही उधळण कितपत योग्य आहे याचा विचार मुख्यमंत्र्यानी करावा. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही सत्ता उपभोगताहात त्या कार्यकर्त्यांच्या पदरात काय पडलंय! महामंडळ सोडा ते खूप लांब राहिलं साधं एसईओ केलं गेलेलं नाही. ही सत्ता त्यांच्यापर्यंत झिरपलीच नाही मग आगामी निवडणुकीत काय आणि कसं होईल याचाही विचार केला गेला पाहिजे.

- हरीश केंची, पुणे

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...