Saturday, 28 October 2017

एक होते जॉर्ज...!


*एक होते जॉर्ज......!*

'स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. फडणविसांना नेमकं कुणावर शरसंधान साधायचं आहे, हे लोकांच्या लक्षांत आलंय. शरद पवारांचं कौतुक करताना आपण केवळ मित्रालाच टोमणे मारतोय असं नाही तर हा टोमणा आपल्याच भाजपेयीं मित्रांना कसा चपखल बसतोय याचाही अनुभव मुख्यमंत्री घेत असावेत. भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्तेचा सोपान तयार करणारी शिवसेना असो वा केंद्रातील सत्ता भाजपेयींच्या हाती देणारा जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा बहुआयामी नेता असो भाजपेयींनी आपल्या मित्रांना नेहमीच स्वार्थ साधल्यानंतर दूर लोटलं आहे. एकाशी संसार करतानाच दुसऱ्याला डोळा घालण्याची 'भाजपेयींवृत्ती' यापूर्वी गोव्यातल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने, हिंदू महासभेने,  पंजाबातील अकाली दलानेच नव्हे तर सगळ्या मित्रांना त्यांनी अशीच वागणूक दिलीय. केंद्रात सत्ताधारी बनविणाऱ्या मित्र जॉर्ज यांना तर इतकं दूर लोटलं आहे की, ते या जगात आहेत की नाहीत एवढ्या विस्मृतीत गेले आहेत. याबाबत आपण गेल्या रविवारच्या अंकात वाचलंच आहे. आजच्या अंकात त्याचा उत्तरार्ध...!
-------------------------------------------
 *निष्ठा बदलत गेल्या*
भाजपेयींना सत्तेवर नेऊन अटलबिहारी वाजपेयींना प्रधानमंत्रीपदावर बसविताना जॉर्ज यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे भाजपेयींना अंतरबाह्य बदलायला लावलं. जे विषय खास भाजपेयींची आयुध म्हणून ओळखली जात होती ती ३७० वं कलम, हिंदुत्व, समान नागरी कायदा, रामजन्मभूमी सोडून द्यावी लागली. केशरी काँग्रेस व्हायला लावलं. वैचारिक निष्ठा बदलायला लावलं. हे सारं जॉर्ज यांच्या स्वभावानुसारच होतं. ज्या स.का.पाटील वा त्यांचे नेते मोरारजी देसाई यांना जॉर्जसारख्यांनी कडवा विरोध केला, त्यांनाच त्यांच्या धोरणासकट जनता पक्षाच्या प्रयोगात त्यांना स्वीकारावं लागलं. जातीयवादी आणि भांडवलवादी हे देशाचे समान शत्रू आहेत. ते आमच्यापासून समान अंतरावर आहेत, असं जे अनेक साथी वा साम्यवादी म्हणत होते, त्यांनी त्यापूर्वी १९६७ मध्ये आणि त्यानंतर ,१९७८ मध्ये त्यांच्या हातात हात घालून जनसंघाला राज्यघटनेद्वारा स्थापित सत्तेची चव चाखू दिली. त्यावेळच्या जनता पक्षात इतर अनेक पक्ष आपापले अस्तित्व विसर्जित करून सामील झाले होते. मात्र जनसंघाचे सदस्य रा.स्व.संघाचेही सदस्य होते. मधु लिमये आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी याच मुद्यावर जनता पक्ष फोडला. पुढे दहा वर्षांनंतर पुन्हा त्याच जनसंघीय व द्विसदस्यत्व   पॉलिसीवालीवाल्या लोकांच्या पाठींब्यावर जॉर्ज फर्नांडिस ज्या पक्षात होते, त्या जनता दलाचे सरकार सत्तेत आलं. ज्या जनता पक्षात असताना त्यांनी कोकोकोला, आयबीएम सारख्या कंपन्यांना उद्योगमंत्री या नात्यानं देशाबाहेर घालावलं होतं, त्यासारख्या हजारो कंपन्यांनी त्यानंतर लगेचच देशात धुमाकूळ घातला. त्यांना इथं रुजण्यापाडून ना जनता पक्ष रोखू शकला, ना त्यांची वाढ रोखण्यास जनता दलाला यश आलं. साथी जॉर्ज अणुबॉम्बच्या विरीधात अखंड भाषण करीत असत. 'राजस्थानच्या वाळवंटात बुद्ध हसला नव्हता; तर बुद्धाचा बाईंनी विध्वंस केला' अस ते म्हणत. मात्र त्याच जॉर्जना, दुसरी अणूुचाचणी करणाऱ्या 'भाजप आघाडीच्या सत्तेत सामील असल्यानं सामुदायिक जबाबदारीचं तत्व म्हणून ते पाप वाहावं लागलं. त्यापूर्वी सारं धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान त्यांनी गंगा-यमुना नदीत फेकून दिलं होतं.

*एकमेव संरक्षणमंत्री*
जॉर्ज फर्नांडिस हे एनडीए या राजकीय आघाडीचे अनेक वर्षे निमंत्रक होते. त्यापूर्वी त्यांनी कितीतरी पक्ष फोडले; स्थापन केले याची गणना नाही. सत्तेवर आल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस विविध खात्याचे मंत्री राहिले. मात्र त्यांची कारकीर्द  लक्षात राहिली ती संरक्षणमंत्री म्हणून. सियाचिनच्या आघाडीवर १८ वेळा ते गेले. आजपर्यंत कोणताही संरक्षणमंत्री तिथे एवढ्यावेळा गेला नव्हता. त्यांनी या खात्याचं काम सैनिकांच्या लक्षात राहील असं केलं. मात्र विष्णू भागवंतांना अडमिरल पदावरून घालवून देण्याचं त्यांचं कृत्य हे त्यांच्या अनेक विसंगत वर्तनापैकी एक होतं. त्यानंतर तहलकाने त्यांचं बिंग फोडलं. त्यांच्या घरातून चालणारे घोटाळे बाहेर आणले. जॉर्ज यांच्या बाकी कुटुंबाचा थांगपत्ता नाही; मग ज्या जेटली या त्यांच्या कोण? आणि त्या काय म्हणून त्यांच्या घरात राहतात? अशी चर्चा-टीका स्वतःच्या हाताने कपडे धुणाऱ्या व साधं वर्तन असणाऱ्या जॉर्ज यांच्यावर त्यावेळी झाली होती. जॉर्ज त्याकाळात प्रचंड बदनाम झाले. अनेक बदमाशांची आणि बदमाशांच्या समूहाची त्यांना कळत नकळत वकिली करावी लागली. १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांची जी प्रतिमा होती ती जॉर्ज यांनी स्वतःच छिन्नविच्छिन्न करून टाकली. पुढे एनडीएची सत्ता गेली. त्यांच्या समता पार्टीची सत्ता बिहारात आली. मात्र जॉर्ज यांची उपयुक्तता तोवर संपली असल्याचं त्यांच्याच चेल्याचं म्हणजे शरद यादव आणि नितीशकुमार यांचं मत बनलं. त्यांनी जॉर्जना केराच्या टोपलीतच काय ते टाकायचं बाकी होतं. ज्या मुजफ्फरपूरमधून ते सहा वेळा निवडून आले होते, तिथून त्यांच्या चेल्यांनी साधी लोकसभेची उमेदवारीही दिली नाही. एव्हाना जॉर्जना वार्धक्यानं घेरलं होतं. वय ८० च्या आसपास पोहोचलं होतं. जॉर्जच्या सुंभ जळला होता; मात्र पीळ कायम असल्यानं त्या वृत्तीनं त्यांना त्या वयात अपक्ष म्हणून लोकसभेसाठी अर्ज भरायला लावला. जॉर्ज साहेबांची तेव्हा अनामत रक्कमही राहिली नाही. त्यांना पक्षातूनही बाहेर जावं लागलं. जॉर्जच्या राजकीय नाटकाचे तिन्ही अंक संपले होते.पण ती शोकांतिका तेवढयावरच थांबली नाही. राजकीय जीवनाचे तीन अंक संपले तरी ते बाजूला जायला तयार नव्हते. त्यांनी नितीशकुमार सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी, रस्त्यावर उतरण्यासाठी, आरोपांचा भडिमार करण्यासाठी नितीशकुमार यांचे विरोधक आणि पक्षातील मान्यवरांची बैठक दिल्लीत आयोजित केली. नितीशकुमारांनी आपल्या विरोधातलं हे षडयंत्र रोखण्यासाठी जालीम उपाय शोधला. त्यांनी आपल्या दूतामार्फत जॉर्ज यांना बिहारमधून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या जागेचे उमेदवार म्हणून नियोजित केलं. ज्या जेटलींचा जॉर्जच्या या पुनर्रप्रतिष्ठापनेला विरोध होता. मात्र तोपर्यंत जॉर्ज आपल्या चेल्याला हो म्हणाले होते. चेल्याला एका दगडात अनेक पक्षी घायाळ करायचे होते. जॉर्जचे नवे हनुमान दिग्विजयसिंग, जेटलीताई, आणि शरद यादव यांना परस्पर शह मिळाला. जॉर्ज सर्वांनाच परम आदरणीय! त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले.

*असहाय जॉर्ज*
जॉर्ज यांचा आजार बळावलाय.अल्झायमरच्या सहाव्या स्टेजवर आलाय. या आजाराच्या केवळ  सात स्टेज असतात. त्यांना या आजारात भेटायला येणारे शेवटचे राजकीय नेते होते ते नितिन गडकरी! ते जेव्हा भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले त्यावेळी. त्याला आज सात वर्षांहून अधिक काळ लोटलाय. तेव्हा जॉर्ज आणि गडकरी हे जॉर्ज यांच्या बंगल्याच्या लॉनवर काही काळ हिंडले फिरले आणि मराठीत गप्पा मारल्या. त्यानंतर आजतागायत कुणी फिरकलेच नाही. या काळात जया जेटली ह्या जॉर्जसोबत होत्या आणि त्या जॉर्ज यांची एखाद्या लहान मुलासारखी देखभाल करीत होत्या. जॉर्ज देखील आपल्या लहानमोठ्या बाबींसाठी त्यांच्यावरच अवलंबून होते. एम्स रुग्णालयातील दोन डॉक्टर्स गेली दहा वर्षांहून अधिक काळ उपचार करीत आहे.

*लैलाने घेता ताबा*
बंगलोरमध्ये जॉर्जच्या आईच्या नांवे एक प्लॉट होता. तो अशासाठी खरेदी केला होता की, निवृत्तीनंतर जॉर्ज यांनी इथं येऊन त्यानं समाजसेवा केंद्र सुरू करावं, अशी तिची इच्छा होती. जॉर्ज यांच्या भावांनी आईची इच्छा म्हणून तिच्या निधनानंतर त्या प्लॉटवरील आपला हक्क सोडला, त्यामुळे तो प्लॉट जॉर्जच्या नावे झाला. तो प्लॉट १६ कोटी रुपयाला विकला गेला, टॅक्स कापल्यानंतर १३ कोटी रुपये जॉर्जच्या खात्यात जमा झाले. जॉर्ज आता करोडपती बनले होते पण त्यांची स्मृती त्यांची साथ सोडायला सुरुवात झाली होती. मग अचानकपणे त्यांच्या पत्नी लैला कबीर या लैला फर्नांडिस बनून भारतात आल्या. त्यावेळी जॉर्ज असहाय बनले होते. हे त्यांचे सारे राजकीय मित्र जाणत होते. जॉर्जच्या घरात भांडण झालं. लैला कबीर यांचे बंधू अल्तमश कबीर सुप्रीम कोर्टात जज होते. त्यानंतर जे घडलं ते पूर्वार्धात लिहलं आहे. जॉर्जचा ताबा घेतल्यानंतर लैला कबीर यांनी जॉर्ज यांना घेऊन रामदेवबाबा यांच्या आश्रमात गेल्या. तिथं जॉर्ज काही दिवस राहिले. त्यावेळी रामदेवबाबा यांनी जॉर्ज आता बोलू शकतील असा विश्वास दिला. मग लैला कबीर यांनी जॉर्जना दिल्लीत परत आणलं आणि आपल्या घरात ठेवलं.

*लोकसंपर्क ठेवलाच नाही*
जॉर्ज यांच्यासाठी हे सारं अनोळखी होतं. ज्या दिल्लीत त्यांनी २५हून अधिक काळ काढला त्या काळात त्यांच्यासोबत असलेले लोक आता नव्हते. त्यांचा बिछाना नव्हता, त्यांची पुस्तकं नव्हती, त्यांचे संख्येसोबती पाळीव प्राणी नव्हते, इथं होत्या त्या लैला ज्यांना जॉर्ज यांनी आपल्या जीवनातून दूर केलं होतं त्या! त्यांच्यावर दहावर्षांहून अधिककाळ उपचार करणारे डॉक्टर्स बदलण्यात आले होते. आज कोण डॉक्टर उपचार करताहेत हे माहीत नाही. जॉर्जना आज कुणी भेटू शकत नाही. त्यांची मानसिक शारीरिक अवस्था काय आणि कशी आहे, ते रडताहेत की हसताहेत? हे त्यांच्या सहकाऱ्यांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांना समजतच नाही. त्यांना समजतच नाही की काय करावं?

*जॉर्जवर अत्याचार ?*
हे सारं डॉक्टरांच्या सल्ल्याचा विरोधात नाही? जॉर्जवर हा अत्याचार नाही का? हा मानवाधिकाराचं उल्लंघन नाही का? जॉर्जना सोडून २५ वर्षांहून अधिक काळ अलग राहिलेल्या पत्नीचा हा बदला तर नाही? घटस्फोट न देण्याची सजा तर जॉर्जना मिळतेय का? जॉर्ज यांच्या सहकाऱ्यांना का भेटू दिलं जात नाही?

*कोर्टात जाण्याचा मित्रांचा मानस*
जॉर्ज यांचे काही सहकारी या परिस्थितीच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या विचारात आहेत. पण या निमित्तानं जॉर्जच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न तर सुरू होणार नाही ना!  आजीवन देशाच्या राजकारणात राहिलेला, देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा महत्वाचा भाग बनलेला हा नेता आज इतका असहाय झाला आहे की, त्यांचे जुने काही सहकारी सत्तेच्या ठिकाणी असतानाही जॉर्ज असहाय आणि एकटे झाले आहेत. राजकारणात जॉर्ज यांनी आपला खास असा परिवार जमवलाय, ज्यांनी कालपर्यंत त्यांना साथ दिलीय. तो परिवार आज रडतोय, व्यथित झालाय. जॉर्ज फर्नांडिस यांच्या असहाय जीवनाची ही शोकांतिका आजवर कुणी पाहिली नाही की बघितली नाही. मुलायमसिंह यादव, शरद यादव, नितीशकुमार, ब्रजभूषण तिवारी, यासह शरद पवारांसारखे अनेक मित्र समाजवादी आणि मानवाधिकारावर विश्वास ठेवणारे लोक आज गप्प का आहेत? सरकार लक्ष देत नाही आणि न्यायालयही दाद देत नाही त्यांना ह्या परिस्थितीची जाण राहिलेली नाही. ते दखल घेत नाहीत. ईश्वर, अल्लाह, आणि गॉड यांच्याकडे प्रार्थना की, शत्रुलाही जॉर्जसारखी परिस्थिती दाखवू नको. जॉर्जवर उपचार व्हायला हवेत आणि महत्वाचं म्हणजे जॉर्जना त्यांच्या सहकाऱ्यांची, मित्रांची भेट घालून द्यायला हवीय! आम्हाला विश्वास आहे की असं काही होणार नाही. ते लोकसभेचे, राज्यसभेचे सदस्यही होते, तेव्हा संसद जॉर्जसाठी काही करणार आहे की नाही?

-हरीश केंची, ९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...