Thursday, 4 May 2017

उद्भवजींच्या स्वयंतेजाची पुनरपरिक्षा

*उद्धवजींच्या स्वयंतेजाची पुनर्परीक्षा*

गोरेगावच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळातील ऐतिहासिक निर्णय घेतला. आगामी काळात स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २५ वर्षांपूर्वी घेतलेला युतीचा निर्णय आज त्यांनी मोडून  टाकला. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात घेतलेल्या ह्या धाडसी निर्धाराने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचे 'शिवसेना पक्षप्रमुख' पण सिध्द झालं आहे. या सिद्धतेला विधानसभा निवडणुकीत कस लागला होता. त्या सत्वपरिक्षेत त्यांचं स्वयंतेज झळाळून आलं होतं. महापालिकेच्या निवडणुकीत या स्वयंतेजाची पुनः परीक्षा होणार आहे.

शिवसेनेतच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. बाळासाहेबांच्या राजकारणाचा स्वतःचा असा खास ठाकरे टच होता, त्याची उणीव जाणवू न देता शिवसेनेची वाटचाल होणे अवघड काम होतं. ते आव्हान उद्धव ठाकरे यांनी त्याच ताकदीने पेलेल्याचं आज दिसून आलं. प्रजासत्ताकदिनी उद्धवजींचं भाषण हे थेट बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करून देणारे होते. त्याच धाटणीचे होते. नेमके शब्द, ठोस निर्णय, तोच प्रहार,  घणाघाती टीका जसं शिवसैनिकांना हवं अगदी तसं तडाखेबाज असं त्यांचं भाषण झालं.
भाजपने युती तोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत जे यश बाळासाहेबांच्या पश्चात मिळवलं,त्या यशाने ते मस्तावले नाहीत; तर अधिक सावध झाले. म्हणूनच २५ वर्षांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने यशाच्या मस्तीत शिवसेनेला चेपण्याचा डाव टाकला. पण राजकीय अनुभवाने समृद्ध असलेल्या उध्दव ठाकरे यांनी तो शिवसैनिकांच्या आणि नेत्यांच्या सांघिक बळावर उधळून लावला. बाळासाहेब असते तर जसे वागले असते तसे उध्दव ठाकरे यावेळी वागले. असं शिवसैनिकांना जाणवले . पक्षप्रमुखाचं तेज त्यांनी आपल्या निश्चयी वाणीने आणि राजकीय खेळीनं बावनकशी असल्याचं दाखवलं.
भाजप संधी मिळेल तेव्हा 'शत प्रती शत' चा नारा लावते. भाजपेयीत झालेला हा बदल अनपेक्षित नाही. कारण आपल्या विचारांची सत्ता निर्माण होण्यासाठी आपदधर्म म्हणत कुणाशीही दोस्ती करण्याची तयारी ठेवूनच भाजप मोठा झाला आहे. भाजप कितीही डांगोरा पिटत असला तरी, हा काही स्वतःच्या विचारावर विस्तारलेला पक्ष नाही. सत्तेपासून कटाक्षाने दूर राहून दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाचा ध्यास जपणारा संघ ते सत्तेसाठी सुखराम बुटासिंग पासून एन.डी.तिवारींपर्यंतच्या भ्रष्टाचारी लोकांची साथ घेणारा असा भाजप असा प्रवास आहे. या प्रवासात शिवसेनेनं दिलेली साथ तशी महत्वपूर्ण आहे. रा.स्व.संघ परिवाराचा विचार महाराष्ट्राच्या मातीत उगवला पण कधी फोफावला नाही, विस्तारला नाही. अशा संघ विचाराच्या शाखांना बहर आणण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय हे विसरून चालणार नाही. ठाकरे यांचा ऋण भाजप आता आपल्या प्रकृती धर्मानुसार फेडतोय. भाजपच्या या प्रकृती धर्माचे मर्म सांगणारी बोधकथा कदाचित आपल्याला माहिती असेल पण ती आज आठवणीसाठी पुन्हा सांगतो. कारण ज्या पक्षाशी युती करायची त्यालाच खाऊन त्याच्यासारखं व्हायचं, त्याच रूप धारण करायचं, हे भाजपचं वैशिष्ठय झालंय. गोष्ट पुराणातली आहे. भाकड असली तरी बोधप्रद आहे. त्या कथेत एक प्राणी होता. तो ज्याला खायचा त्याचा आकार धारण करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झाली होती. मुळात हा प्राणी शेळपट पण बुद्धीचातुर्याने त्यानं आपलं सामर्थ्य वाढवलं. तो आपल्यापेक्षा ताकदवान असलेल्या प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठया प्राण्याचं भय दाखवायचा आणि आपण दोघे एकत्र आलो तर मोठ्या प्राण्याला गारद करु अशी खात्री त्याच्यात निर्माण करायचा. दोघांची युती व्हायची मग संधी मिळताच हा पुराणोक्त प्राणी दोस्तालाच गिळायचा आणि त्याच्या सारखा आकार धारण करायचा. असं खात खात शेळीच्या वाघोबा झाला. अशाप्रकारे प्रादेशिक पक्षांना काँग्रेसचे भय दाखवीत त्याच्याशी दोस्ती करीत, त्याचे गुण अवगुण आपल्यात भिनवीत भाजपने आपली ताकद वाढविलीय. या शक्तीवर्धनासाठी भाजप गांधीवादी झाला, समाजवादीही झाला. सर्व राजकीय पक्षांचे गुणावगुण आपल्यात भिनवून भाजप आज अंतरबाह्य काँग्रेस झालाय. अगदी भगवी काँग्रेस बनलाय. शिवसेनेच्या दोस्तीने भाजपने आपली संघटनशक्ती वाढविली त्यासाठी भाजपने आपल्यात शिवसेना रुजविली.
कालपर्यंत शेळी असलेला भाजप आज डरकाळी फोडत आपण वाघ झाल्याचे साक्ष देतोय.
सत्तेचं चाटण मिळालेल्या भाजपने 'शत प्रति शत' बरोबरच 'अब सब महाराष्ट्र' अशा घोषणा द्यायला सुरुवात केलीय. भाजपने शिवसेनेला जी वागणूक दिली ते पाहता बाळासाहेब असते तर, त्यांनी हा कमळातला भुंगा भुणभुण सुरु करतानाच चेचला असता, तसा तडाखा उध्दव ठाकरे यांनाही देता आला असता, पण त्यातून फक्त शिवसेनेची ताकद दिसून आली असती. पण उध्दव ठाकरेंनी प्रचंड संयम दाखवला. त्यासाठी प्रसिद्धीमाध्यमातून टीकाही सहन केली. शिवसेनेच्या कार्यपद्धती आणि विचारांबद्धल मतभेद असतील; पण त्यांच्या अशा या स्वतंत्र स्टाईलमुळेच गेली काही वर्षे शिवसेनेची ताकद वाढतेय. विधानसभेच्या निवडणुकीत जे यश मिळालं ते पाहता बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेची ताकद टिकून राहावी हा मतदारांचा अट्टाहास दिसून येतो. हे महाराष्ट्राचं जनमत उध्दव ठाकरे यांनी ओळखलं; म्हणूनच त्यांनी कशाचीही फिकीर न करता युती तोडण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपच्या स्वार्थीपणावर, विश्वासघातकीपणावर कठोर शब्दात टीका करु शकले. त्यांची ही भाजपवरची टीका मराठी, महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान दाखवणारा ठरला. युतीला २५ वर्षे झाली तरी जिथे शिवसैनिकांनी स्वीकारली नाही तिथे मुंबईकर कशी स्वीकारणार? बाळासाहेब ठाकरे यांनी जिवंतपणी मिळवलेलं प्रेम आणि लोकांची साथ आपल्या नंतर अधिक वाढविली. ती वाढती राहणार आहे, या वाढीला प्रबोधनकार ठाकरे यांचा समाज सुधारणेचा वसा आणि वारसा आहे. शिवसेना नेतृत्वाने दणका भाजपला चांगलाच लागलाय, ते हा दणका विसरणार नाहीत महापालिका निवडणुकीत परतफेड करतील. त्यावेळी शिवसेना नेतृत्व त्याचा कसा बंदोबस्त करते यावर शिवसेनेची भाजपवरची सरशी अवलंबून आहे. सत्ता ही त्यापुढची गोष्ट आहे.

-हरीश केंची.

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...