Thursday, 4 May 2017

नथुरामाचे नाटक व्हायलाच हवे!

*नथुरामचे नाटक व्हायला हवे!*


सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे राजकारणाला उधाण आलं आहे. इतके दिवस नथुरामाचे प्रयोग सुरु असताना, त्याला दररोज फाशी दिली जात असताना फारशी कुणी दखल घेतली नाही. पण अचानकपणे कोल्हापुरापासून नागपुरापर्यंत सर्वत्र या नाटकाला विरोध होतो आहे. नथुरामाचे प्रयोग होऊ नयेत म्हणून आंदोलन होताहेत. परंतु नथुरामाचे प्रयोग होणं आणि ते अधिकाधिक लोकांनी पाहणं समाजहिताचेच आहे. सडक्या विचाराला धर्मकृत्याचा, देशहिताचा टिळा लावत बुद्धिवान माणूस नि:शस्त्र माणसाचा खून करण्यापर्यंतचे पशुत्व कसे अंगिकारतो याची साक्ष देणारं हे नाटक आहे. मुस्लिम अनुनयाला कडवा विरोध करणारे भाजपेयींचे आजवरचे राजकारण पाहता नाटक बचाव ची जबाबदारी त्यांनीच घ्यायला हवी होती, अशी नथुरामवाद्यांची इच्छा होती. पण नथुरामला त्यांनी झटकले. ते शिवसेनेने उचलले.



निश्चय आणि निर्भयता म्हणजे गांधीजी! त्यांना महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याच बीज सापडलं. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे म्हणून गांधीजींनी गुजरातेतला साबरमतीचा आपला आश्रम बंद करून तो महाराष्ट्रात वर्ध्याला आणला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानलं. लोकमान्य टिळकांचा जयघोष करीत ते स्वातंत्र्याचा मंत्र देशाच्या खेड्यापाड्यात गेले , अशा नि:शस्त्र गांधींचा खून मराठी माणसाने करावा यासारखं अमानुष कृत्य अन्य नाही. हे भाकड विचाराने केलेलं भेकड कृत्य संतांची, वीरांची, बुद्धिमंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावरचा कलंक आहे या क्रूरकारम्याला आणि त्याच्या कृत्याची तरफदारी करणाऱ्यांना महाराष्ट्राने कधीच आपलं मानलं नाही.


न्यायदेवतेच्या दरबारात नथुरामला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली होती. तिथे नथुराम खुनी ठरलेला असतानाही त्याने 'गांधी वध' केला असा शंख करणारे नथुरामाचं भूत पुन्हापुन्हा उठवून हिंदुत्ववादी म्हणवणारयांच्या निष्ठेचा कस जोखत असतात. मुसलमानांना खुश करण्यासाठी गांधीजींनी हिंदुस्थानचे भारत आणि पाकिस्तान असे तुकडे केले. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला भारताला भाग पाडले. गांधींनी आपला जीव पणाला लावून स्वतःला देशापेक्षा मोठे केले. त्यामुळे फाळणी झाली. हिंदूंचे बळी गेले. हिंदूंवर अत्याचार झाले. हिंदू स्त्रियांवर अत्याचार झाले. या साऱ्याला गांघीच जबाबदार होते, म्हणून नथुरामाने त्यांना खतम केले, असा नथुरामवाद्यांचा युक्तिवाद असतो. नथुरामाचं हेच नाटक आहे. त्यात पाहणाऱ्याचा भावनिक उद्रेक होण्यासाठी गांधी द्वेषाचा मसाला मिसळला आहे. त्यातल्या काही भाकड संवादावर नथुरामभक्तांच्या टाळ्या पडतात. अर्थात या टाळीबाजांनी आजवर यापेक्षा कोणता पुरुषार्थ गाजवलाय?


महात्मा गांधींजींच्या राष्ट्रकर्तृत्वावर शिंतोडे उडविणारं नाटक आताच रंगभूमीवर आलेलं नाही, शिवसेना- भाजपची राजवट होती तेव्हाही १९९८ दरम्यान हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. काँग्रेसने गांधींना खुंटीला लावून गांधीवादाला आपल्यापासून दूर लोटलं असलं तरी लोक गांधींची काँग्रेस म्हणत काँग्रेसला मतदान करतात, जीवदान देतात. नेत्यांना बदनाम करून काँग्रेस संपणार नाही, हे स्पष्ट झाल्याने गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाची मापं काढण्याचा हा प्रकार सुरु असतो. ही विचारवादाची लढाई आहे. त्यात नेहमी गांधीवादाचाच विजय होतो, ही गांधीजींच्या देशत्यागाची किंमत आहे. ती काँग्रेसवाले वसूल करीत होते आता भाजपेयी करताहेत, तो त्यांचा नीचपणा आहे. गांधी बनिया होते , त्यांच्यामागे बहुजन समाज प्रचंड होता. त्यामुळे त्याचे राजकारण -समाजकारण प्रभावी होत होते. त्याचा सल बुद्धिबळावर राजसत्ता मिळवू पाहणाऱ्याच्या मनात होताच. कारण आपल्याच नादानीमुळे पेशवाई बुडाल्याने सत्तेचे चाटण मिळविण्याची त्यांना संधी हवी होती, परंतु गांधीजींनी राजकारणाचं सार्वत्रिकारण केल्याने सत्तेचे लगाम आपल्याहाती येणार नाहीत, याची खात्री पटल्याने त्यांनी गांधीद्वेषाचे विष पसरवायला सुरुवात केली.


फाळणीच्या वेदनेने आपण गांधींना मारले हे नथुरामाचे म्हणणे खोटारडेपणाचे आहे. गांधींना ३० जानेवारी १९४८ ला नथुरामने संपविले. पण त्यापूर्वी १४ वर्षे त्यांना मारण्याची संधी नथुरामीवृत्ती शोधात होती. जून १९३४ मध्ये गांधींवर पुण्यात बॉम्बहल्ला झाला होता. जुलै १९४४ मध्ये गांधींच्या अंगावर सुरा घेऊन जाणाऱ्या नथुराम गोडसेला पाचगणीला पकडले होते. ऑगस्ट १९४४ मध्येही असाच प्रसंग सेवाग्राम आश्रमात घडला. त्यानंतर २९ जून १९४६ रोजी गांधींच्या मुंबई-पुणे प्रवासात नेरळ-कर्जत दरम्यान रेल्वे मार्गावर अपघात घडवून आणण्यासाठी मोठमोठया दरडी टाकल्या होत्या. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला. गांधी बचावले, ह्या साऱ्या घातपातात नथुराम संशयित आरोपी असल्याचं सिद्ध झालं आहे. या काळात हिंदुस्तानच्या फाळणीची चर्चा सुरु नव्हती. त्यामुळे गांधींना फाळणीसाठी दोषी ठरवून त्यांचा खून करणाऱ्याच्या  फाशीला हौतात्म्याचा टिळा लावण्यासाठी आटापिटा करणे ही देखील नथुरामी विकृतीच आहे. नथुराम जिवंत असताना कुणी ऐकलं नाही, त्याच्या मागं कुणी जमलं नाही. अशांच्या खुनाशीपणाची पुस्तकं वाचून, नाटकं पाहून कोण नथुराम बनणार? गांधीवादाचा स्वीकार केल्याशिवाय कुठल्याही राजकीय विचाराला सत्तास्थान लाभणार नाही , सत्य आणि अहिंसा ही गांधीवादाची मूलतत्त्व आहेत. त्याचा धिक्कार करून कुणी राजकारण , समाजकारण, सत्ताकारण, करू शकत नाहीत. हाच गांधींचा विजय आहे. गांधींचा हा मोठेपणा पचत नाही, असे वांतीकारक काय क्रान्ती करणार? नथुरामही त्यातलाच! तो नीट कळण्यासाठी 'नथुराम'चं नाटक व्हायला हवं. त्यामुळे देशहिताच्या बुरखा घालून सत्य, अहिंसेचा खून करण्याची संधी शोधणारे आजचे छुपे नथुराम तरी ओळखता येतील.


नथुरामाच्या खुनशीपणामुळं नि:शस्त्र महात्म्याचा खून झाला तसा हजारो निरपराधांच्या संसाराचा नाश झाला. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची होरपळ झाली; वर महात्मा गांधींच्या खुनाचं पाप महाराष्ट्राच्या माथ्यावर राष्ट्राने थोपलं. एका गोळीत इतके ऐतिहासिक क्रौर्य करणाऱ्या नथुरामला नाटकातही फासावर लटकलेलं दाखवलं आहे. म्हणजे या नाटकाचे जेवढे प्रयोग होतील तेवढ्यांदा 'नथुराम' फासावर लटकलेला पाहायला मिळेल. तेव्हा याचे प्रयोग व्हायला हवेत.


-हरीश केंची

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...