Saturday, 27 May 2017

दार उघड, बाबा दार उघड...!

*दार उघड, बाबा दार उघड...!*

इन्ट्रो......
" नमोजींच्या छावणीचा हा दरवाजा असा तसा नाही. नागपूरच्या रेशीमबागेतील मोहनराज वृक्षापासून बनवलेला आणि गुजराती कच्छी बुट्टया बुट्टयांनी शोभिवंत केलेला भव्य सुंदर दरवाजा, साक्षात भूलोकीच्या स्वर्गाचाच दरवाजा म्हणा ना! ह्या दरवाज्यातून जे भाग्यशाली भाविक आत जातील, ते आपली अस्मिता गमावून....अभिमान गमावून.... स्वतंत्रता गमावून 'स्वर्गस्थ' होतील! ह्या भव्य दरवाज्यावर प्रगतीच्या पर्वातील पराक्रमाची चित्रे कोरलेली असून त्यात कोठे कोठे रक्ताचा लाल रंग भरला आहे.गुजरातच्या सुवर्ण रसांनी, विधायक विचारांची स्वप्ने दरवाजावर रेखाटली आहेत. ह्यावरील एक चित्र आहे विकासपर्व-मन की बात सांगणाऱ्या अक्षरांनी, शब्दांनी अंकीत झालेल्या मजबूत राजदंडाचे...!"

सध्या भाजपेयींकडे उभ्या महाराष्ट्रातून 'इनकमिंग' मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणताही विधिनिषेध न पाळता, सर्व पक्षातील गणंगांना, आयारामांना पायघड्या घातल्या जात आहेत. समाजातल्या साऱ्या वाल्यांना वाल्मिकी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने सारे वाल्यांना आता भरते आले आहे. त्यांच्या या आगमनासाठी 'नमो दरवाजा' ठोकून ठाकून उभा केला आहे आणि या दरवाज्याबाहेर 'दार उघड बये दार उघड' अशी आळवणी करीत दार ठोठावले जात आहे. अनेकांनी अशी अनेक दारे पाहिली असतील. काही शरदाच्या चांदण्यातील दरवाज्यातील असतील तर काही सोनियांच्या दरवाज्यातील असतील. अशा 'दारकरीं'ची सोय लावताना 'नमो दरवाजा'ही अडचणीत येऊ शकतो. याचं भान राहिलेलं नाही.

तुम्ही तुमच्या जीवनात नानाप्रकारचे दरवाजे पाहिले असतील. शनिवारवाड्यासारख्या जुनाट वाड्याचे, रायगडासारख्या दणकट किल्ल्याचे..! काही भक्कम लाकडी तर काही आधुनिक लोखंडी! काही दोन पंख्याचे तर काही चार पंखाचे तर काही बिन पंखाचे.... नाटकाच्या पडद्याप्रमाणे गुंडाळले जाणारे! आत काय चालले आहे ह्याचा मुळीच थांगपत्ता न लागू देणारे, मुरब्बी राजनीतिज्ञासारखे मख्ख; तर काही आपल्याच फटी फटीतून आतला तमाशा पाहू देणारे चहाडखोर! काही दरवाजे उदार, नेहमी खुले राहणारे तर काही खाशांनाच प्रवेश देणारे.

पण हा अलीकडेच वृत्तपत्रात गाजत असलेला नमोजींच्या छावणीचा दरवाजा असा तसा नाही. हा 'नागपुरी रेशीम बागे'च्या मोहनराज वृक्षापासून बनवलेला आणि गुजराती कच्छी बुट्टया बुट्टयांनी शोभिवंत केलेला भव्य सुंदर दरवाजा, साक्षात भूलोकीच्या स्वर्गाचाच दरवाजा म्हणा ना! ह्या दरवाज्यातून जे भाग्यशाली भाविक आत जातील, ते आपली अस्मिता गमावून...अभिमान गमावून...स्वतंत्रता गमावून...'स्वर्गस्थ'च होतील! ह्या भव्य दरवाज्यावर प्रगतीच्या पर्वातील पराक्रमाची चित्रे कोरलेली असून , त्यात कोठे कोठे रक्ताचा लाल रंग भरलेला आहे. गुजरातच्या सुवर्णरसांनी विधायक विचारांची स्वप्ने दरवाज्यावर रेखाटली आहेत. ह्यावरील एक चित्र आहे 'जग हे बंदिशाला' हा महान वेदांत सूचित करणाऱ्या दृश्याचे चित्र, दुसरे चित्र आहे 'विकासपर्व-मनकी बात' सांगणाऱ्या अक्षरांनी अंकित झालेल्या मजबूत राजदंडाचे! औद्योगिक प्रगती सूचित करणाऱ्या एका मोटारीच्या कारखान्याचे चित्र या दरवाज्यावर शोभते आहे...! हा पश्चिमपथावरील दगडाच्या पायावर दक्षिणेला उभा असलेला उत्तराभिमुखी असून दिल्लीकडे नजर रोखीत आहे! नमोजींचा दुर्ग जसा गुजरात-महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील कारागिरांनी मुख्यतः बांधला, हा दरवाजाही राजस्थानी, उत्तरप्रदेशींनी तयार केला, असा हा आगळा वेगळा दरवाजा! विरोधकांचा काटा काढण्यात कुशल असलेल्या फत्तेहपुर शिक्रीचा 'बुलंद दरवाजा' ज्याच्यापुढे ठेंगणा वाटेल असा हा दरवाजा!

या दरवाज्याच्या देवडीवर काही दिवसांपूर्वी बराच शुकशुकाट होता. पण आता त्याला पुनश्च 'अटल वैभव' येऊ लागले असल्याने देवडीवर याचकांच्या टोळ्या झांजा वाजवत भजन म्हणताहेत....
जय देव जय देव।
जय साहस चतुरा।
सत्तादायक देई।
आम्हा हार तुरा।।
महंमद गझनीने सोरटी सोमनाथच्या मंदिराची दुर्दशा केली, पण येथे ते शक्य नाही. कारण नमोजींच्या केसाला साक्षात शत्रूनेच नव्हे तर न्यायदेवतेने जरी थोडासा धक्का लावला, तरी सारा मुलुख पेटवून देण्याची प्रतिज्ञा केलेले वीर हातात पेटते पलिते घेऊन दरवाजावर पहारा देत खडे आहेत! इतका आकर्षक दरवाजा ह्यापूर्वी कोणत्याही दुर्गाला, देवळाला, महालाला किंवा मंदिराला लाभला असेलसे वाटत नाही. मग नवल कसले की, उर्दू शायरीतील आशिकाप्रमाणे बिस्तर बिच्छा दिया है।
तेरे दरके सामने।।
असे गर्जत शेकडो महाभागांनी ह्या दरवाज्यासमोरच्या पायऱ्या पायऱ्यावर आपले बाड बिस्तारे ठेवले आहेत!
खरोखरच
नमोजींच्या दारी।
उभा क्षणभरी।
तेणें मुक्तीचारी।
मिळविल्या।।
अशा भावनेने ज्या दरवाज्यापुढे याचकांच्या झुंडी लोटत आहेत.

त्याला उर्दू शायरीच्या नायिकेच्या दरवाज्याची शान प्राप्त झाल्यास आश्चर्य नाही. उर्दू शायरीतील लाचार प्रेमीक कित्येकदा म्हणतो, 'तुझ्या मैफिलीत', 'तुझ्या इन्नर केबिनेट'मध्ये मला प्रवेश मिळाला नाही तर हरकत नाही, मला तुझा द्वारपाल तर करशील ना? करून तर पहा. मग....
गैर को आने न दू।
तुंमको कहीं जाने न दू।
काश! मिल जाये तुम्हारे।
दरकी दरबानी मुझे।।
(कोणत्याही गैर माणसाला, पुरोगामी व्यक्तीला आंत येऊच देणार नाही. भाग्यवशात तुमच्या दरवाजाचा दरबान झालो तर!)
साधारणतः ही अशीच लाचारी ह्या नमोजींच्या दरवाज्यापुढे घोंघावत आहे.... अरे पण हे काय? ह्या दरवाज्यापुढे कणखर सह्याद्रीचे नरशार्दूल?  अश्वमेघाचा घोडा अडविण्याची ज्यांची ताकद, ते देखील ह्या दरवाज्यापुढे जमा होऊन दीनवाणी आराधना करताहेत, दार ठोठावत आहेत! आणि म्हणताहेत....
'दार उघड बाबा दार उघड...!'
तुमच्यापाशी एकरूप एकदिल होण्यासाठी आम्ही आलो आहोत, दार उघड बाबा दार उघड! एकट्याच्या बळावर शत्रूचा नि:पात करणे शक्य होणार नाही, तुझ्या पाठबळाची आम्हास जरुरी आहे, म्हणूनच दार उघड बाबा दार उघड! कोणत्याहि ऐहिक लाभासाठी नव्हे, तर देशाच्या परमकल्याणासाठीच आम्हास तुझ्या दिलाजमाईची प्यास लागली आहे. हे लक्षात घे अन दार उघड बाबा दार उघड!... काय? तुझे खासे खासे भक्तशिरोमणी... तुझे औरस भक्त म्हणताहेत, दिलजमाई नको, ऐक्य नको, काहीही नकोच संपूर्ण शरणागती हवीय? तो पर्यंत दरवाजा बंद?... छे... छे, हे खरे वाटत नाही. खरेच का तुम्ही दरवाजा खोलणार नाहीत! कोणी म्हणताहेत,... तुम्ही दरवाजा बंद केलात, अगदी आतून कडी लावून बंद केलाय. कारण तुम्हाला ऐक्यभावाची तळमळच नाही, स्वतःचा भाव वाढवून घेण्याची हाव आहे! तुला समान दर्जाची सन्मान्य मैत्री नकोच आहे. अशांना तुम्ही आंत घेताय जे तुमचे कायमचे बंदे गुलाम होऊन, आपले सारे व्यक्तिमत्व विलीन करण्यास सिद्ध होतील! मोठया मासळीने छोटी मासोळी गिळणे म्हणजेच खरी एकरूपता, अशी एकरूपतेची तुमची व्याख्या आहे!.. पण या कुत्सित टीकेवर आम्ही विश्वास का ठेवावा? तुम्ही तुमचा शानदार दरवाजा कायमचा बंद केलात, ह्यावर आमचा विश्वासच बसत नाही. आमचे काही व्यवहारपंडित आम्हास धीर देताहेत. 'निराश होऊ नका, नमोजी दिलदार आहेत, समंजस आहेत, ऐक्यभावाचे ते स्वागत करणारे आहेत. त्यांचा दरवाजा बंद असतो, वस्तुत: तसा तो बंद नाही, केवळ 'जयघोषा'चा त्रास होऊ नये म्हणून तो लोटून घेतलाय, इतकंच! भक्तांची दिंडी आत घेण्यासाठी दिंडी दरवाजा खचितच उघडा, खुला होईल...! ह्या आमच्या पंडित मित्रांचा आशावाद सार्थ करण्यासाठी दार उघड बाबा दार उघड..! किमानपक्षी दिंडी दरवाजा तरी उघड...!

जर तुम्ही खरोखरीच दरवाजा कायमचा बंद केलास तर....!
आमच्या नशीबाचाच दरवाजा बंद झाला, असं म्हणणं भाग आहे. पण आमच्या नशीबाची बात राहू द्या, आम्हास वैयक्तिक स्वार्थ कसा तो ठाऊक नाही. गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आम्हास सहकार्य द्या, दार उघड बाबा दार उघड...! तुम्ही दीर्घद्वेषी ठरू नयेत म्हणून, यासाठी तरी दार उघड बाबा दार उघड...! तुम्ही सदभावनेला सदभावनेनं प्रतिसाद देत नाहीत, आपला हेका सोडत नाहीत. अशी तुमची बदनामी टाळण्यासाठी तरी दार उघडा...! ऐक्यभावाची तुमची गंगा आमच्या आदरभावाच्या यमुनेला मिळावी आणि साऱ्या दुनियेचे प्रयाग क्षेत्र व्हावं याकरिता हे दलितदैन्य दाहक, हिंदुजन त्राता सहकार्याचा दरवाजा उघडा...!
ओम नमोजी आद्या।
संघ प्रतिपाद्या ।।

- हरीश केंची

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...