Saturday, 5 October 2024

भाजपची दुधारी रणनीती...!

"केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नुकतंच मुंबईत येऊन भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात २०२९ मध्ये महाराष्ट्राची एकहाती राजसत्ता घ्यायचा निर्धार व्यक्त केलाय. त्यासाठी कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लागण्याचे आदेश दिलेत. त्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला राजसत्तेच्या मार्ग दाखवणाऱ्या शिदेसेना आणि अजित राष्ट्रवादी या सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. कारण आजवरचा भारतीय जनता पक्षाचा इतिहास हा सहकारी पक्षांना संपवणारा असाच राहिलाय. त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवायचंय की, सहकारी पक्षांना संपवायचंय हे य निवडणुकीतून दिसेल! स्वबळावर लढणं ही भाजपची रणनीती म्हणजे त्यांच्यासाठी दुधारी शस्त्र ठरणारंय. त्यानं त्यांची रक्षाही केली जाईल किंवा इजाही होऊ शकेल!
...........................................
महाराष्ट्रात १९९५ साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती. भारतीय जनता पक्षाहून काही थोड्याशा जादा जागा शिवसेनेला मिळाल्यानं शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंढे हे उपमुख्यमंत्री बनले. अल्पशा अपयशाचं शल्य भारतीय जनता पक्षाला सलत होतं म्हणूनच गोपीनाथ मुंढे यांनी पहिल्यांदा संभाजीनगर इथं एका कार्यक्रमात शत प्रतीशत भाजप असा नारा दिला होता. त्यांचा तो प्रयत्न आजवर कधीच यशस्वी झाला नाही. उलट शिवसेनेशी युती केली, मोडली तरी त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. युतीत असतानाही बंडखोरांना ताकद देण्याचा प्रयत्न झाला. एकमेकांचे उमेदवार कसे पराभूत होतील याकडे पाहिलं गेलं. त्यानंतर २०१९ पासून जे रामायण, महाभारत घडलं हे आपल्या समोर आहे. भारतीय जनता पक्षाचा आजवरचा इतिहास अशाच राहिलाय की, ज्यांच्यासोबत त्यांनी युती वा आघाडी केली त्यांचा तो पक्ष संपवून टाकलाय. जनसंघानं तत्कालीन रामराज्य परिषद नावाच्या पक्षाशी युती केली. आज त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. गोव्यात कायम सत्तेत राहिलेल्या बांदोडकर, काकोडकर, खलप यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती केली आज त्याची अवस्था काय आणि कशी आहे हे आपण जाणतोच. पंजाबला अकाली दल हा सत्ताधारी पक्ष होता. त्यांच्याशी युती झाली. आज त्यांची अवस्था दयनीय झालीय. त्यांचं अस्तित्वच संपलंय. दक्षिणेकडील तेलुगु देशम् आज सत्तेवर असला तरी कालपर्यंत त्यांची अवस्था काय होती ते आपण जाणतो. अभिनेते पवन कल्याण सोबत आले नसते तर त्यांचीही दयनीय अवस्था झाली असती. जशी गेल्या काही वर्षात झाली होती. जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस ही भाजपच्या सोबत होती. त्यांच्या प्रत्येक धोरणांना, विधेयकांना त्यांनी पाठींबा दिला होता त्यांना आज सत्ताभ्रष्ट व्हावं लागलंय. ओरिसातला बिजू जनता दल संसदेत कायम भाजप सोबत राहिला होता. त्यांची आज अवस्था काय झालीय हे आपण पाहतो. त्यांची तिथली सत्ताच गेलीय. बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात फूट पाडून काका आणि पुतण्याला अलग केलं. मोदींचा हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग पासवान यांनी आपली ताकद दाखवल्याने त्याला जवळ केलंय. महाराष्ट्रात शिवसेनेची अवस्था याहून वेगळी केलेली नाही. ती फोडून एकनाथ शिंदे आणि ४० आमदार फोडले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शकलं केली त्यांचे ४० आमदार अजित पवारांसह सोबत घेतलेत. आता त्यांचाही वापर करून त्यांना सोडुन देतील किंवा संपवून टाकतील. कारण त्यांनी ह्या दोन्ही कुबड्या टाकून देऊन एकट्याच्या बळावर सत्ता मिळविण्याचा निर्धार केलाय. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचे समर्थक बिथरले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याबद्दल जे विधान केलंय त्यावरून सध्या राजकीय वादंग माजलंय. २०२९ मध्ये भाजपला खरंच स्वबळावर लढणं शक्य होणार आहे का? हा प्रश्न आहेच. पण तरीही भाजपनं तसं ठरवल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील, याचीच चर्चा सध्या सुरू आहे. यामागचं अमित शहा यांचं राजकारण काय आहे? हाही प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या आता महाराष्ट्र वाऱ्या सुरू झाल्यात. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच वारंवार महाराष्ट्रात येताना दिसताहेत. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बातचीत करताना असं सांगितलं की, २०२९ पर्यंत भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीला पोहोचलेला असेल. यामुळं काहीशी खळबळ उडाली. अमित शहा यांनी हे विधान का केलं असावं? याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळालं. हे बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक घेतली आणि त्यात त्यांनी निवडून आलेल्या खासदारांना असं सांगितलं की, तुम्ही सर्वांनी आता आपापल्या राज्यात जाऊन 'शत-प्रतिशत भाजप!' या विषयावर काम करायचंय. याचा अर्थ मोदींनी असे आदेश दिले की, पुढच्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाची सत्ता ही एका हाती असली पाहिजे, विविध राज्यात वेगवेगळ्या छोट्या पक्षांबरोबर जी युती करण्यात आलीय ती भविष्यात फार काळ कायम ठेवली जाऊ नये. पक्षाच्या या कल्पनेनुसार भाजप कार्यकर्ते कामाला लागले आणि २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीतच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं शिवसेनेबरोबरची आपली युती तोडली. या गोष्टीला आता दहा वर्षे झालीत आणि आता चित्र काय आहे? तर भारतीय जनता पक्षानं केवळ शिवसेनाच नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही युती केलीय. म्हणजे 'शत-प्रतिशत भाजप' हा अजेंडा काही फारसा यशस्वी झाला नाही, असं दहा वर्षांनी दिसतंय. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अमित शहा नागपूरला आले असताना त्यांनी सांगितलं की, केवळ कमळ नव्हे तर धनुष्यबाण आणि घड्याळ ही सुद्धा आपली चिन्हं आहेत असं मानून कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. पण पक्षातल्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल काहीशी अस्वस्थता दिसतेय. कार्यकर्त्यांमधली ही भावना दिल्लीपर्यंत पोहोचल्यामुळेच या आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या आपल्या भाषणात अमित शहा यांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलून २०२९ मध्ये पक्ष स्वबळावर लढेल अशा तऱ्हेची घोषणा केली. कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यासाठीच ही घोषणा करण्यात आलीय, हे उघड आहे.
भारतीय जनता पक्ष खरोखरच स्वबळावर लढू शकेल का आणि त्याचं तसं प्लॅनिंग असल्यास आता ज्या मित्रपक्षांना बरोबर घेण्यात आलंय त्यांची या सगळ्या धोरणाबद्दल काय प्रतिक्रिया असेल, याबद्दल प्रसिद्धिमाध्यमात चर्चा सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी दुसऱ्या दिवशी खुलासा केला की, अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा सहयोगी पक्षांनी वेगळा अर्थ काढू नये आणि त्यांनी तसा तो काढलेलाही नाही. स्वबळावर लढण्याची घोषणा ही कार्यकर्त्यांचं मनोबल उंच ठेवण्यासाठी करण्यात आली होती. यावरून असं स्पष्ट दिसतं की, स्वबळावर पक्षानं लढणं ही कल्पना कशी दुधारी तलवारीसारखी असू शकते. एका बाजूला बहुसंख्य कार्यकर्त्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी पक्षानं स्वबळावर लढण्याबद्दलची भूमिका घेणं ही या तलवारीची एक धार आहे असं मानलं तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्षांमध्ये या भूमिकेवरून नाराजीची भावना व्यक्त होणं ही या तलवारीची दुसरी बाजू आहे! म्हणजे कार्यकर्त्यांचे मनोबल उंच ठेवायचं ही एक बाजू की मित्रपक्षांना खूश ठेवायचं ही दुसरी बाजू. या दोन्ही बाजूंमधील तारेवरची कसरत कोणत्याही युतीमध्ये मुख्य पक्षाला करावी लागते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून भारतीय जनता पक्षाच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांमध्ये, हितचिंतकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याबद्दल नाराजी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेल्या विवेक, ऑर्गनाईझर अशा काही प्रकाशनांमध्येही भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. या विषयावर स्पष्ट भूमिका घेताना गेल्या आठवड्यात अमित शहा यांनी नागपूरमध्ये बोलताना घड्याळ आणि धनुष्यबाण यासाठीही काम करावे असे सांगितले. पण कार्यकर्त्यांमधील नाराजीचा सूर कमी झालेला नाही याची जाणीव आता भाजपच्या नेतृत्वाला झाली आहे.
दुसरा विषय आहे तो हिंदुत्व या मुद्द्यावर किती कट्टर बनायचं हा. गेल्याच आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात १४ जागांवर ‘व्होट जिहाद’चा प्रकार झाला, असं सांगितलं. त्यांनी वापरलेल्या या शब्दामुळे बराच वादंग झाला असला तरी त्यांच्या या बोलण्यातून भाजपला आपली कट्टर हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवायचीय, ते लोकांसमोर आणायचंय, हे दिसून येते. अखंडित शिवसेनेची हिंदुत्वाची आग्रही भूमिका होती. ठाणे कल्याण परिसरातल्या सर्व लोकनियुक्त नागरी स्वराज्य संस्था यावर भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा होता. तिथली सारी पदे ही त्यांच्याचकडे होती. पण आनंद दिघे यांनी भारतीय जनता पक्षाहून अधिक आक्रमक हिंदुत्व स्वीकारून तिथला जनमानस, हिंदुत्वाची मतं आपल्याकडे म्हणजेच शिवसेनेकडे वळविली होती. ती मतं आपल्याकडेच राहावीत असा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी धर्मवीरच्या माध्यमातून आरंभलाय. त्यामुळं भाजप अस्वस्थ आहे. एका बाजूला भाजपनं कट्टर हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवायचं ठरवलं असलं तरी अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यातल्या अल्पसंख्यांक समाजाची मतं मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. जिथं जिथं अल्पसंख्यांक मतं आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार उभे करायचेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंदुत्वाशी फारशी सलगी नाही. ही स्थिती लक्षात घेता महायुतीमध्ये दोन्ही बाजूंनी राजकीय तणावाचं वातावरण तयार होऊ शकतं. एका बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या पक्षासाठी काम करणं अवघड वाटतंय, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना भाजपची हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरतेय. अजित पवार यांनी अशी घोषणा केलीय की, त्यांच्या पक्षातर्फे दहा टक्के जागा अल्पसंख्यांक समाजासाठी दिल्या जातील. अजित पवार यांचा फोकस हा पूर्णपणे अल्पसंख्यांक समाजाची मतं मिळवण्यावर आहे. या परिस्थितीत अजित पवार यांचं धोरण आणि भाजपचं हिंदुत्वाचं धोरण यामध्ये विसंगती होणार नाही काय, हा सुद्धा मुद्दा आता चर्चेत आलाय. शिवाय निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित पवार यांना जर जास्त जागा मिळाल्या तर त्यांची भूमिका काय असेल? असाही प्रश्न चर्चेत आलाय. 
पण ही भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची व्यूहरचना वाटतेय. हिंदूंच्या मतांसाठी आम्ही आहोत आणि अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. हे मतदारांसमोर आणायचं आहे. दुसरं आणखी महत्वाचं असं की,  भारतीय जनता पक्षाला विधानसभेत राजसत्ता मिळविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जी मतं मिळाली आहेत त्याला छेद द्यायचाय. म्हणूनच लोकसभेला भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठींबा देणारे राज ठाकरे आणि त्यांचा मनसे यांनी विधानसभेत सर्वच्यासर्व जागा लढविण्याचा निर्धार केलाय आणि त्यासाठीची मोर्चेबांधणी सुरू केलीय. याचा अर्थ असा दिसून येतोय की, जी मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जी मतं मिळालीत त्यांची ती मतं कशाप्रकारे फोडता येईल आणि उद्धव सेनेची मतं कमी होऊन त्यांचे लोक कसे निवडून येणार नाहीत याकडे पाहिलं गेलंय. दुसरीकडे अजित पवारांना कदाचित स्वतंत्र लढविण्यास अखेरच्या क्षणी सांगितलं जाईल त्यासाठी अजित पवार मुस्लिमांचा अनुनय करताहेत असा ठपका त्यांच्यावर ठेवला जाईल. अजित पवार हे राज ठाकरे यांच्याप्रमाणेच स्वतंत्र लढले तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या मतांमध्ये छेद करतील. जेणेकरून त्यांच्या जागा घटतील. उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार हे जे प्रादेशिक पक्ष स्थानिक अस्मितेच्या प्रश्नावर उभे आहेत त्यांचं कंबरडं मोडायचं हाच उद्देश भारतीय जनता पक्षाचा असल्यानं ही रणनीती आखल्याचं जाणवतं. पण  स्वबळावर लढणं त्यांची ही रणनीती म्हणजे भाजपसाठी दुधारी तलवार ठरणार आहे. त्यानं त्यांची रक्षाही केली जाईल किंवा इजा होऊ शकेल!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बोलघेवड्यांना आवरा....!

"आता लोकशाहीच्या या उत्सवात काहींच्या अंगात शिमगा संचारलाय. मुद्दे नसल्यानं गुद्देही उपसले जाताहेत. कुणीही, काहीही बरळत राह...