Thursday, 31 October 2024

आनंददायी दीपोत्सव...!

हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीला आनंदकारक घटना घडल्यानं या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावानं हा सण ओळखला जातो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आलंय. नवं धान्य तयार झालेलं असतं, म्हणून हा कृषिविषयक आंनदोत्सवही आहे. दिवाळीच्या पाचही दिवसांचं माहात्म्य सांगणाऱ्‍या अनेक कथा पुराणांत आहेत. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गोवत्सद्वादशी असते. याला वसुबारस म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. दिवाळीसंबंधी भिन्नभिन्न लोकाचार दिसून येतात. वर्षात ओळीने पाच दिवस येणारा हा दीपोत्सव असतो.
.................................
*दि*व्यांचा सण असलेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाचं महत्त्व मोठं आहे. भारतीय कॅलेंडरप्रमाणे आश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. एरवी अमावस्या हा दिवस अशुभ मानला जातो. परंतु, आश्विन अमावस्येचा दिवस मात्र सर्वांत शुभ मानला जातो. लक्ष्मी ही हिंदू देवतांमधली, ऐश्वर्य, समृद्धी, सौंदर्य यांची अधिष्ठात्री मानली जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून तिची उत्पत्ती झाली. समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांमधल्या एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला. या रत्नांचं देव आणि दानवांनी आपापसांत वाटप केलं. त्यात भगवान विष्णूनं लक्ष्मीला आपल्या अर्धागिनीच्या रूपात स्वीकारलं. तेव्हापासून तिला विष्णुप्रिया, विष्णुवल्लभा या नावांनी संबोधण्यात येऊ लागलं, विष्णूच्या रामावतारात लक्ष्मीनं सीता म्हणून, तर कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्म घेतला, असंही म्हटलं जातं. लक्ष्मीची आद्रा आणि हिरण्मयी ही आणखी काही नावं आहेत. लक्ष्मीच्या परिवारामध्ये अदिती-निर्ऋती, पृथिवी, शची, राका, कुहू, सरमा, देवसखा कुबेर, कीर्ती, आणि मणी यांचा समावेश आहे. चिबलीत आणि कर्दम हे तिचे पुत्र होत.
लक्ष्मीच्या उपासनेला आपल्याकडं वेदकाळापासून सुरुवात झाली. वेदातल्या श्रीसूक्तात लक्ष्मीचा उल्लेख आहे. शौनकऋषी यांनी लिहिलेल्या वृहतदेवता या ग्रंथामध्ये श्रीसूक्तावर टीका आहे. लक्ष्मीच्या आश्रयानं अलक्ष्मीचा नाश व्हावा, असं सूक्तकारांनी म्हटलं आहे. मार्कण्डेय पुराणातल्या दुर्गासप्तशती मध्ये भीमा या महालक्ष्मीच्या अवताराचं वर्णन आहे. खिलसुक्तातही विष्णूपत्नीचा उल्लेख आहे. घुबड हे वाहन असलेली लक्ष्मी ही अतिशय चंचल देवता मानली जाते. त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी तिची पूजा करण्याची प्रथा पडली असावी काय? पुराणातल्या कथेनुसार आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते. जिथं स्वच्छता, सौंदर्य, रसिकता आणि उद्योगप्रियता असेल, तिथं ती आकर्षित होते. म्हणून या दिवशी विष्णू, कुबेर आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते.
'भारतीय संस्कृतीकोश'च्या चौथ्या खंडानुसार, विष्णूनं या दिवशी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केलं. त्यानंतर सगळे देव क्षीरसागरात जाऊन झोपले. म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा, या हेतूनं लक्ष्मी आणि कुबेरपूजनाची पद्धत सुरू झाली असावी. या रात्री जागरण करून अलक्ष्मीला घरातून हाकलून देण्याचीही प्रथा आहे. या सगळ्या प्रथांमागे नेमकं काय कारण आहे. यावर प्रकाश टाकताना संशोधक वात्सायनाच्या कामसूत्राचा दाखला देतात. कामसूत्रात यक्षरात्री म्हणजे दीपावली, असं म्हटलं जातं. यशोधनानं केलेल्या कामसुत्रा वरच्या टीकेत यक्षरात्रीला सुखरात्री संबोधण्यात आलं असून तिचा यक्षपूजा आणि घुतक्रीडा यांच्याशी संबंध जोडला आहे. यक्षसंस्कृतीचा प्रमुख कुबेर मानला जातो. प्रारंभी कुबेराचीच पूजा होत असल्यानं दीपावलीला यक्षरात्री असं म्हटलं जात असे. कालांतरानं यक्षपूजेचं स्थान लक्ष्मीपूजेनं घेतलं. तसंच या सणाला लक्ष्मीपूजन असं नाव पडलं, गुप्त काळात वैष्णव पंथाची वाढ झाली. विष्णूचं महत्त्व वाढल्यावर या सणात लक्ष्मीलाही महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. लक्ष्मीपूजनाच्या मंत्रामध्ये ही गोष्ट स्पष्ट जाणवते. ती अशी
नमस्ते सर्व देवांना वर दासी हरे: प्रिया l
या गतिस्त्वतप्रपन्नाना सामे स्यात्तव दर्शनात ll 
अर्थ : हे लक्ष्मी, तू सर्व देवांना वर देणारी विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते, ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो. 
या प्रकारे दीपावलीच्या सणात कुबेराची जागा लक्ष्मीनं घेतली. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे. तीच खरी या सणाची दाखला देतात. काम सणाची इष्टदेवता असल्याचंही म्हटलं जातं. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही संबोधलं जात असे. निर्ऋती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीनं अलक्ष्मी म्हणून तिरस्कारलं असलं तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असं देव मानत असल्याचे उल्लेख काही ग्रंथांत आहेत. दुर्गासप्तशतीमध्ये या अर्थाचा एक श्लोक आहे.
कल्याण प्रणतां वृद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः । 
 नैर्ऋत्यै भूभृतां लक्ष्मै शर्वाण्ये ते नमो नमः
राक्षसांची लक्ष्मी निर्ऋती, असा याचा अर्थ. त्यावरून  राक्षस-असुर हे इथल्या मूलनिवासींच्या वैभवाचं प्रतीक असलेल्या निर्ऋतीची पूजा करत असत, असं लक्षात येतं. कालांतरानं तिची जागा विष्णूपत्नी लक्ष्मीनं घेतली आणि निर्ऋतीच्या निवासस्थानाला नरक मानलं जाऊ लागलं. अमरकोशामध्ये तिला नरकदेवता असं म्हटलं आहे. भारतातल्या मूलनिवासींना नर या नावानं ओळखलं जातं. त्यांच्या निवासस्थानाला पुढे उच्चवर्णीयांनी मृत्युलोक असं नाव दिलं. या मृत्युलोकाचा राजा नरकासुर होता. असुर म्हणजे प्राणरक्षक, आर्यपूर्वानी त्याला ती पदवी दिली होती. या नरकासुराचा वध कृष्णानं केला, अशी महाभारतात कथा आहे. पण तो निर्ऋती या नरकदेवी भूमातेनं केला. असं संशोधक मानतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराचीही पूजा केली जाते. कुबेर म्हणजे धनाची देवता. वैदिक साहित्य आणि पुराणात कुबेराचा उल्लेख पिंगळीन असा केला आहे. पिंगळा म्हणजे लहान घुबड, घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे, असं मानलं जातं. लक्ष्मी आणि घुबड़ अर्थात कुबेर यांचा परस्पर संबंध संपत्तीशी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुगार खेळण्याची प्रथाही काही समाजात आहे. त्यामागे संपत्ती मिळवणं हा हेतू असावा, असं वाटणं स्वाभाविक आहे. परंतु यामागे गणभूमीचं विभाजन करणं, हा आपल्या पूर्वजांचा हेतू होता. बलीप्रतिपदेच्या दिवशी चौपट खेळण्याच्या परंपरेतून ही गोष्ट स्पष्ट होते. बळी किंवा बली या शब्दांचा एक अर्थ भाग असा आहे. लक्ष्मीपूजनाची परंपरा आज भारतीय समाजात इतकी रूढ आहे की, केवळ हिंदूच नव्हे, इतर धर्मीयही तिची पूजा करतात. यादिवशी व्यापारी चोपडापूजनही करतात. एकूणच आर्थिक व्यवहारावर लक्ष्मीचा वरदहस्त राहावा, हा त्यामागचा हेतू आहे. आजच्या काळात अर्थव्यवहार, श्रीमंती यांच्या व्याख्या पार बदलल्या आहेत. तरीही लक्ष्मी ही ऐश्वर्य, समृद्धी यांचं प्रतीक म्हणून कायम राहिली आहे. म्हणूनच सण-उत्सवाचं स्वरूप बदललं, त्यांना नवे अर्थ प्राप्त झाले, तरी लक्ष्मीपूजनाचं महत्त्व कमी झालं नाही. उलट, ते वाढतच आहे.
नाण्यांची लक्ष्मी
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मीच्या चांदीच्या किंवा इतर धातूच्या नाण्यांच्या पूजा करण्याची जुनी परंपरा आहे. विशेषत: व्यापारी लोक लक्ष्मीच्या जुन्या नाण्यांची पूजा हमखास करतात. अनेकांच्या घरांत एखाद तरी लक्ष्मी किंवा गणेश यांची प्रतिमा असलेलं चांदीचं नाणं असतं. भारतात सोन्या-चांदीच्या मोहरांची जुनी परंपरा आहे. अर्थात, भारतात, तांबे, चांदी, पितळ, मिश्रधातू अशी अनेक प्रकारची नाणी जुन्या काळात मिळायची. गिनेस बुकच्या एका जुन्या आवृत्तीत असा उल्लेख आहे की, 'जगातलं सगळ्यात मौल्यवान नाणं १२५४ मध्ये मुंबईत बनलं. त्याची किंमत आता आठवत नाही, पण आज जुनी दुर्मीळ नाणी विकायला काढल्यास त्याची किंमत लाखोंच्या घरात जाईल...!' जुन्या काळी नाणी, मोहरा जगभर सगळीकडे प्रचलित होत्या. परंतु लाओस, उराग्वे यासारख्या देशात तीस- चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत धातूची नाणी उपलब्ध नव्हती. लिडिया नावाच्या देशात प्राचीन काळी केवळ वारांगनाच धातूची नाणी बनवत आणि नर्तकी त्यांचा व्यापार करत. भारताचं चलन रुपया असं आहे. इंग्रजांच्या काळापासून चलन म्हणून आपण रुपयाला स्वीकारलं आहे, पण मोगल बादशहा खुशमशाहबुद्दीन याने सर्वप्रथम ३० औंस वजनाचं रुपयाचं नाणं प्रचलित केलं. या प्रकारचं अखेरचं नाणं पाटणामध्ये पाहायला मिळालं होतं. पाटण्याच्या संग्रहालयात आज ते पाहायला मिळत नाही. पण तिथं जुनी नाणी बनवण्याचा प्लॅस्टरचा साचा आहे. तर पहिला रुपया ब्रिटिश म्युझियममध्ये पाहायला मिळतो. शेरशहा सुरीनं f१५४० मध्ये हुमायूनला गादीवरून हटवल्यानंतर भारताच्या चलनी नाण्यांमध्येही खूप बदल केला, परंतु १७८ ग्रेन वजनाचा चांदीचा रुपया बदलला नाही.
चांदीच्या नाण्यांची पूजा करायची पद्धत कशी चालू झाली? याचं एक कारण म्हणजे, या नाण्यांवर देवदेवतांची चित्र-प्रतिमा असतात. त्यामुळे प्रवासात ती घेऊन जाता येतात आणि त्यांची पूजा करता येते. भारतात धातूची नाणी व्यवहारात आली, तेव्हा जनसामान्यांमध्ये काशाची - ब्राँझ नाणी प्रचलित होती. राजे-सम्राट तेवढे सोन्या- चांदीची नाणी बाहेर काढत. १८४० मध्ये हैद्राबादच्या निजामानं पी.एम. अशी अक्षरं असलेली चांदीची नाणी काढली होती. पेस्तनजी महेरजी या पारशी गृहस्थाच्या नावावरून ती काढली होती. निजामाला पैशाची गरज असली की, हा पारशी त्याला पैसे पुरवत असे. त्यामुळे निजामानं ही नाणी काढली होती. अलीकडे दिवाळीनिमित्त खास सोन्या-चांदीची नाणी बँकांकडून बाजारात आणली जातात. ही नाणी भेट देण्याचा प्रघात आहे. ही नाण्यांची पूजा अनेक अर्थाने लक्ष्मीची पूजा ठरते.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बोलघेवड्यांना आवरा....!

"आता लोकशाहीच्या या उत्सवात काहींच्या अंगात शिमगा संचारलाय. मुद्दे नसल्यानं गुद्देही उपसले जाताहेत. कुणीही, काहीही बरळत राह...