"मराठी माणसांसमोर मोठी जबाबदारी येऊन ठेपलीय. राज्याची कोसळलेली अर्थव्यवस्था, उन्मत्त नोकरशाही, उध्वस्त राज्यव्यवस्था, विस्कटलेलं सामाजिक सौहार्द, लाडवलेली नोकरशाही, भडकलेलं समाजमन, भडकलेली महागाई, उसळलेली गुंडगिरी, अक्राळविक्राळ बेकारी, घसरलेली राजकीय भाषा, उफाळलेला खुनशीपणा, पसरलेला धार्मिक द्वेष, एवढंच नाही तर सत्तेसाठीचं सत्ताधाऱ्यांनी स्वीकारलेलं 'दग्धभू धोरण' यानं कधीकाळी सशक्त, सधन, समृद्ध, सुसंस्कृत, सुशासित, विकसित महाराष्ट्र आज कुठे पोहोचलाय, याचा विचार तुम्हाआम्हाला करावा लागणारंय. महाराष्ट्र सावरण्यासाठी, गतवैभवासाठी पुन्हा सारं काही विसरून कंबर कसावी लागणारंय. 'गर्जा महाराष्ट्र माझा..!' म्हणत उभं ठाकावं लागणारंय. चला, नवमहाराष्ट्र घडवू या...!
...................................................
*'रा*ज्यात एक फुल, दोन हाफ सरकार!' अशी टीका होतेय. सामाजिक सौख्य, सौहार्द बिघडलंय. मंत्री बाह्या वर करत सरसावलेत. दोन हाफपैकी एक हाफला राज्यातल्या समस्यांपेक्षा पक्षनिष्ठा, पक्षसेवा महत्वाची वाटतेय. दुसरे हाफ गुलाबी जॅकेट घालून लाडक्या बहिणीला साद घालताहेत. आपलं स्थान टिकविण्यासाठी दिल्लीश्वरापुढे कुर्निसात करण्यात मश्गूल आहेत. दिल्लीश्वरांनीच सुभेदारी बहाल केली असल्यानं तिथं निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. बिचारे एक फुल हे दिल्लीश्वराचे 'मांडलिक'! निवडणुकांसाठी हाती राजसत्ता असल्यानं घोषणांचा पाऊस त्यांनी पाडला. राष्ट्रपुरुषांचा पुतळा कोसळला पण त्यातही यांना राजकारणच दिसलं. साऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय. मराठी माणूस असाच दबला तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला! बाहुबली चित्रपटात माहिष्मती संस्थानातल्या युद्धसदृश्य दृष्यात प्रभास हा नायक धनुर्धारी अमरेंद्र बाहुबलीची नायिका अनुष्का शेट्टी म्हणजेच देवसेनेला आपल्या धनुष्यातून तिरंदाजी करताना एकाचवेळी तीन बाण कसं सोडायचं याचं प्रात्यक्षिक देताना एक मंत्र ऐकवतो. नाद्वे..... मणीबंधम्.... बहिर्मुखम्....! त्याच धर्तीवर आपल्या राज्यात डंकापती दिलीश्वरानं महाराष्ट्रावर चाल करताना तीन अस्त्र सोडण्याची किमया साधलीय! एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा ह्या एक फुल, दोन हाफ 'एडीए' शस्त्रानं सत्तेसह राजकीय युद्ध आरंभलंय..! सत्तेसाठी सारं काही म्हटल्यावर राजधर्म, न्याय, नीती, हा सारा कल्पनेचा खेळ वाटायला लागतो. मग या खेळासाठी नैतिकता पणाला लावली जाते. सत्य-असत्याची चाड राहात नाही. सध्या राज्यात कुणाचा पायपोस कुणाला राहिलेला नाही. स्वतःच आसन स्थिर नसताना जनतेच्या स्थिरस्थावराचा विचार कुठं येणार? गरीब बिचारी मुकी जनता तिला कुणीही आणि कसंही हाका. ती सहन करतंच जगतेय! खरं तर सणांची आतुरतेनं वाट पाहणारे आपण उद्भवलेल्या परिस्थितीत नको ते सण म्हणण्याची वेळ आपल्यावर आलीय.
राज्याला धुवांधार पावसानं झोडपल्यानं पिकं नष्ट होण्याची स्थिती निर्माण झालीय. जातीय विद्वेष तर भयानक रूप धारण करण्याच्या आवेशात आहे. महागाईचा आगडोंब उसळलाय. मात्र याची जाणीव सत्ताधाऱ्यांना नाही! फितुरीनं मिळालेली राजसत्ता टिकविण्यासाठी लाडकेपणाचा पूर आणलाय. लौकिक अर्थानं विश्वस्त समजले जाणारे सत्ताधारी 'प्रतिनिधी ' या शब्दांचा अर्थच विसरलेत. आपण राजसत्तेचे विश्वस्त आहोत, लोकसेवक आहोत याचं भानही त्यांना राहिलेलं नाही. केवळ स्वार्थ साधण्यासाठीच त्यांना सत्ता हवीय. त्यासाठी नाती लाडकी दोडकी बनवलीत. ते करताना राष्ट्रपुरुषांचा अवमान देखील काहीच वाटेनासा झालाय. अजाण बालिकेवरचा अत्याचारही संवेदनाहीन बनलाय. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढं एकच उद्दिष्ट ठेवण्यात राजसत्ता कार्यरत आहे. आम्ही सेवक नाही, तर मालक आहोत, अशा अविर्भावात ते सर्वत्र वावरताहेत. अशांच्या मनात गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, गरजुंच्या बाबतीत मनं संवेदनशील होतील का? दिवसेंदिवस माणूस जगणंच विसरून गेलाय. दुःख, अडचणी, समस्या, आजारपण, आर्थिक समस्या, बेरोजगारी, महागाई, वाहतुकीची कोंडी, फसवणूक, स्त्रियांवरचे अत्याचार, जातपात, अवकाळी पाऊस, महापूर, घाणेरडं राजकारण अशा किती तरी समस्यांनी ग्रासलाय. साथीच्या आजारानं पिच्छा सोडलाय, असं अजून म्हणता येत नाही. रोज नवनव्या आजारांनी लोकांना घेरलंय. या साऱ्यांतून माणूस सावरायचा प्रयत्न करतोय; पण तो आत्मविश्वासच गमावून बसलाय. अशा आत्मविश्वास गमावून बसलेल्या लोकांना पाठबळाची अत्यंत गरज असते. माणसाला सुख, शांती, समाधान, राहायला घर, पोटाला चार घास, स्वस्त औषधोपचार, हाताला यश, मुलाबाळांचे शिक्षण इतक्याच माफक अपेक्षा आहेत. तमाम बळीराजाचं दुःख, कष्ट यातून काहीही केलं तरी सुटका होतं नाही. कधी कमी पाऊस तर कधी तुफान पाऊस. होत्याचं नव्हतं करणारा पाऊस. एकदा पेरणी करताना नाकी नऊ येते. इथं तर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ येऊ लागलीय. पिकलंच तर माती मोल किमतीला विकावं लागतंय. यंदा पावसानं बरसात केलीय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. पण शेतीत उगवलेलं सारं पीक भुईसपाट होतंय! विकासाच्या नावाखाली चकचकीत रस्ते, पूल होताहेत. विमानतळ विकसित होताहेत. वंदेभारत श्रीमंती थाटाची रेल्वे धावतेय. पण पॅसेंजर रेल्वेत लोक एकमेकांच्या उरावर बसून प्रवास करताहेत. शहरांच्या हद्दवाढीनं सिमेंटची जंगले उभी राहाताहेत; पण माणूस स्वास्थ्य हरवत चाललाय. अभिमान, स्वाभिमान बाजूला ठेवून सुख शोधण्यासाठी तो धडपडतोय; मात्र त्याच्या नशिबात निराशेशिवाय काहीच पडत नाही. गेल्या काही वर्षात श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी अधिकच रुंदावत चाललीय. विकासाची गंगा काही मोजक्याच लोकांच्या घरात वाहतेय. त्यांच्या विकासाचा दर बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक आहे. माणूस निसर्ग नियमांना अनुसरून वागायचं विसरलाय. हवा, पाणी, ध्वनी अशा प्रत्येक गोष्टीचं प्रदूषण करतोय. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्यामुळं दिवसेंदिवस माणसाचा श्वास कोंडतोय.
२०२४ ची विधानसभा निवडणूक ही १९६२ नंतरची महत्त्वाची आहे.! २०१९ नंतरची महाराष्ट्राची ही पाच वर्षे 'अनागोंदी', राजकीय चिखलफेक, कोविडचा फटका बसलेलं राज्य, ढासळलेली अर्थव्यवस्था, उध्वस्त झालेलं प्रशासन यामुळं राज्याचा पाया या पाच वर्षांत कमकुवत झाला. बेजबाबदार नेत्यांनी वाढवलेल्या जातीय आणि धार्मिक तणावामुळे सामाजिक सलोखा, सौहार्द धोक्यात आलाय. आता निवडणुक होणार असल्यानं या पाच वर्षाचं नीट अवलोकन करून येत्या निवडणुकांचं महत्त्व समजून घेण्याची गरज आहे...! गेल्या पाच वर्षात राजकीय डावपेचांची मोठी किंमत महाराष्ट्रानं चुकवलीय. ही किंमत तीन पातळ्यांवर आलीय. एक राजकीय अनिश्चितता, दुसरी आर्थिक घसरण आणि तिसरा मुद्दा आहे बिघडलेल्या सामाजिक सलोख्याचा! आमदारांची पळवापळवी, पक्षांतर, पक्ष चोरणं आणि या सगळ्यात घसरलेल्या राजकीय व्यवहारासोबत रसातळाला गेलेली राजकीय भाषा, यांनी महाराष्ट्रानं आजवर ज्या बंधुत्वाच्या, लोकशाहीपूर्ण राजकीय संस्कृतीचा अभिमान देशात सांगितला, मिरवला, तो अभिमानच धुळीला मिळालाय. या राजकारणाची सुरुवात झाली ती २०१९ पासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या एकसंघ शिवसेनेनं भाजपसोबत फारकत घेतली. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकारात सामील झाले. खरं तर, उद्धव यांनी काँग्रेससोबत येणं, हीच एक अभूतपूर्व घटना होती. १९९५ साली युती सरकार येईपर्यंत काँग्रेसचा वरचष्मा होता, त्याला तडा गेला तो १९९५ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेना-भाजप युतीमुळे! त्यानंतर राज्यात काय घडलं आणि कसं घडलं हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही. तो सारा इतिहास आपण अनुभवलाय!
मराठ्यांनी सदैव राष्ट्राचाच विचार केलाय. आपल्याबरोबर राष्ट्र मोठं व्हावं म्हणूनच मराठे धडपडले. पानिपतावर अब्दालीची झुंड रोखण्यासाठी मराठ्यांची एक पिढीच्या पिढी मारता मारता मरावं अशी झुंजून मेली. अब्दालीला पुन्हा भारताकडं वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही, असा चोप मराठ्यांनी दिला. मराठे पानिपतावर मोडले, पण हे राष्ट्र, इथला समाज आणि धर्म त्यांनी सावरला. मराठ्यांची समशेर हा भारताचा आधार होता म्हणूनच मराठे ताठमानेनं शिलंगणाला निघायचे. पण महाराष्ट्र धर्म आपण विसरलोत. आपसातल्या लाथाळ्यात आणि कुणाचं तरी अनुयायीत्व मिरवण्यात आम्हाला समाधान वाटू लागलंय. महाराष्ट्रापेक्षा पक्षनेते मोठे ही 'स्वामी'निष्ठा यातूनच निर्माण झाली. वास्तविक, हे राष्ट्र मोठं करण्याचं काम आम्ही करतो म्हणूनच मराठ्यांच्या भूमीला महाराष्ट्र हे नाव आहे, असं छातीठोकपणे सांगणारी आणि कर्तबगारी गाजवणारी माणसं महाराष्ट्रात झालीत. त्या कर्तृत्ववान मराठी पुत्रांमुळेच 'महाराष्ट्र आधार या भारताचा' हा विश्वास निर्माण झाला होता. महाराष्ट्राचं वैभव तळपू लागलं होतं. त्याचा जेव्हा अभाव जाणवला तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय लादला गेला आणि त्या अन्यायानंच अंगार पेटावा तसा मराठा धगधगून उठला होता. महाराष्ट्र मिळाला, पण मराठी माणूस मात्र संपत गेला. आज त्याचीच अवहेलना होतेय. सत्तेवर बसलेल्यांना आपल्याच माणसाकडं लक्ष द्यायला वेळ नाहीये. दिल्लीश्वरापुढं कुर्निसात करण्यातच ते मश्गूल आहेत, त्यातच धन्यता मानताहेत दिल्लीश्वरांनीच त्यांना सुभेदारी बहाल केली असल्यानं त्यांच्या चरणी निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. त्यांनी ज्या मराठी माणसाच्या जीवावर, मतांवर वाटचाल आरंभली. त्याचा त्यांना विसर पडलाय. हिंदुत्वाचं ढोंग आणि अवडंबर माजवणाऱ्या, त्यातूनच रक्तपिपासू शोषक व्यवस्थेचा वडवानल पेटवून देणाऱ्या हिणकस राजकीय वृत्तीसमोर 'नफरत छोड़ो'तून आपसूकच एक फार मोठं आव्हान उभं ठाकलंय. त्यामुळंच, या विषमता आणि विद्वेषवादी लोकांना देशातल्या गरीबी, बेरोजगारी तरीही, अजून कंत्राटी-कामगार, अर्धरोजगारीवर ते मूग गिळूनच आहेत, आर्थिक-विषमतेवर बोलण्यासाठी कंठ मात्र फुटलाय! लक्ष्मीपुत्र गुजराथ्यांसाठी भाजपच्या 'मांडलिक' मुख्यमंत्र्यांचा आटापिटा सुरूय. मराठी कामगारांनो, आता, फक्त छातीच पिटा! कामगारांचा आवाज जर, असाच दबला; तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला!.
महाराष्ट्राची १९६० मध्ये स्थापना झाली त्यानंतर पहिली निवडणूक १९६२ मध्ये झाली. मुंबई आणि मध्य भारतातल्या दोन प्रांतांतून महाराष्ट्राची निर्मिती झाली. नव्या राजकीय व्यवस्थेचा स्वीकार १९६२ मध्येच पणाला लागला होता. त्यानंतर महाराष्ट्रात १२ विधानसभा निवडणुका झाल्या पण आजच्यासारखी गंभीर परिस्थिती कधीच नव्हती. २०२४ मध्ये हे महान राज्य, कष्टानं मिळविलेलं वैभव गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. आताची ही निवडणूक महाराष्ट्राचं, ते वैभव पुन्हा मिळविण्यासाठीची निवडणूक आहे. थोडाथोडका नाही, तर हा गेल्या दोन हजार वर्षाचा इतिहास आहे की, जेव्हा जेव्हा या देशावर संकट आलं तेव्हा तेव्हा हा माझा महाराष्ट्र छातीचा कोट करून त्या संकटासमोर उभा राहिलाय. त्याच या माझ्या महाराष्ट्रावर आता स्वतःलाच वाचवायची वेळ आलीय, है दुर्दैव आहे. पण म्हणून हतबल होऊन बसायला आता वेळ नाहीये. हे राष्ट्र वाचेल तेव्हाच हा महाराष्ट्र वाचेल आणि त्यासाठीच, या देशासाठी महाराष्ट्र मजबूत करायला हवाय. ही निवडणूक विस्कळीत कमजोर होत चाललेला महाराष्ट्र सावरणारी आणि पुन्हा योग्य मार्गावर आणणारी ठरली पाहिजे, ही निव्वळ इच्छा नव्हे, एक मराठी माणूस म्हणूनही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे!
महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले l
मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले ll
खरा वीर वैरी पराधीनतेचा l
महाराष्ट्र आधार या भारताचा ll
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
*सत्तेसाठीचं दग्धभू धोरण!*
'दग्धभू धोरण' ही एक युद्धनीति! जिचा वापर करून मोठीमोठी आक्रमणं परतविलीत. शत्रूनं हल्ला केला तर आपण प्रजेसह मागे जायचं आणि जाता जाता ती जमीन नापीक करायची म्हणजे उभी पिकं आडवी करायची, विहिरीचं पाणी विषारी करायचं, अन्नधान्याची इतर स्रोतं उद्ध्वस्त करायची. ज्यामुळे शत्रूची अन्नान्न दशा होऊन शेवटी उपासमारी, महामारी आणि रोगराईला कंटाळून तो परत फिरेल मग पुन्हा आपण आपलीच जमीन पादाक्रांत करून ती पूर्ववत सुपीक करायची. याचाच उपयोग करून बुंदेलखंड चंदेल राजांनी महमूद गझनीला परतवून लावलं, महाराणा प्रतापसिंहानीही याच्या बळावर मुघलांशी यशस्वी संघर्ष केला. रशियाच्या स्टॅलिननंसुद्धा दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या आक्रमणाला असंच तोंड देत रशियाचं रक्षण केलं होतं. जानेवारी १७७९ मध्ये महादजी शिंदे यांनी 'दग्धभू तंत्र' इंग्रजांविरुद्ध वापरलं. डिसेंबर १७७८ च्या अखेरीला इंग्रज सैन्य खंडाळ्याच्या घाटात पोचलं. इंग्रजांशी लढणं कठीण होईल, हे महादजींनी ओळखलं. तेव्हा त्यांनी गनिमी काव्याचा वापर करायचं ठरवलं. इंग्रजांना कुठलीही रसद मिळू नये म्हणून मराठ्यांनी इंग्रजांच्या मार्गातल्या बाजारपेठा जाळून टाकल्या. पुणे शहर इंग्रजांच्या ताब्यात जायची वेळ आली, तर ते सुद्धा जाळून टाकण्याची तयारी मराठ्यांनी केली होती. मराठे गनिमी काव्यानं इंग्रजांवर सर्व बाजूनी हल्ले चढवत होतं. सरदार भीमराव पानसे यांच्या तुकडीनं इंग्रजांचे तीनशे सैनिक मारले. मराठे इंग्रज फौजेचा पाठलाग करीत होते. इंग्रज फौजा कशाबशा तळेगावला पोचल्या. परंतु मराठ्यांनी आजूबाजूचा मुलुख जाळून टाकल्यानं इंग्रजांना रसदच काय, पण पाणीसुद्धा मिळणं कठीण झालं. त्यातच शिंदे - होळकरांसह सर्व मराठे एकदिलानं लढताहेत, हे पाहून इंग्रजांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी माघार घेऊन मुंबईला परत जायचं ठरवलं. परंतु मराठ्यांनी परतीचा मार्ग सुद्धा अडवला होता. शेवटी इंग्रजांना शरणागतीशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तहाच्या वाटाघाटी सुरु असताना इंग्रजांनी कोंडी फोडून मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांनी तोही प्रयत्न विफल केला. तेव्हा जनरल फार्मर यानं घायकुतीला येऊन कोऱ्या कागदावर सही करायची तयारी दाखवली. शेवटी मराठे आणि इंग्रज यांचा १६ जानेवारी, १७७९ रोजी वडगावला तह झाला! हा झाला इतिहास...! असाच प्रयत्न आज सरकारनं आरंभलाय. सामाजिक, राजकीय, आर्थिक, प्रशासकीय, सारा राज्यव्यवहारकोश 'दग्धभू धोरण' स्वीकारून सारं काही उध्वस्त केलंय. जेणेकरून विरोधकांना सत्ताकारण करणं अशक्य होईल!
No comments:
Post a Comment