'आज लोकशाहीतला ‘संवाद’ हरवलाय, माजलाय तो कर्णकर्कश्श कलकलाट! राजकारण्यांची बेताल, बेछूट, असंस्कृत ‘मुक्ताफळं’ ऐकताना उबग आलाय. सध्याचा ढळलेला राजकारणाचा तोल, वाढलेली मग्रुरी, चंगळवाद, हरवलेला सुसंस्कृतपणा, सौजन्य हे कुणाही संवेदनशील लोकशाहीवाद्याला अस्वस्थ करणारंय. यामुळं लोक उद्या मतदानालाच बाहेर न पडण्याची भीती आहे. असं जर घडलं, तर मात्र लोकशाहीत लोकच नसतील! आज लोकशाहीतला सुसंवाद, सुसंस्कृपणा लोप पावतोय. राजकारण्यांची भाषा, वागणं, राहणी हे सारं चिंताजनक बनलंय. दिवसेंदिवस राजकारणाचा स्तरही खालावतोय. राजकारण सुधारणासाठी सुशिक्षितांनी राजकारणात यायला हवंय. सज्जनांचा, सुशिक्षितांचा, शहाण्या माणसांचा वावर वाढायला हवाय. राजकारणातली गटारगंगा साफ करण्यासाठी, सारे भ्रष्ट आणि दुष्ट संहारण्यासाठी सुष्टांना सज्ज व्हावं लागेल...!'
----------------------------------------------------
*लो*कशाहीचा उत्सव आरंभला गेलाय. एव्हाना उमेदवारांनी मतदारांभोवती फेर धरून नाचायला सुरुवात केलीय. सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विचका झालाय. त्याला केवळ राजकारणीच नाही तर तुम्ही आम्ही सारेच कारणीभूत आहोत. सर्वच राजकारणी स्वछंदी बनलेत, त्यांच्या वागण्याला आपण कधीच आक्षेप घेत नाही. नाना पाटेकर यांनी एका समारंभात राजकारण्यांना चांगलंच धुतलं. लग्न एकाशी केलं अन् संसार मात्र दुसऱ्याशीच आरंभलाय..! मग आम्ही मतं दिलेल्या मतदारांनी काय करायचं...?' असा सवाल विचारला. पण या सत्तालोलूप माणसांना मतं कुणी दिली? आपणच ना? त्यांना निवडताना पाहून, पारखून का घेतलं नाही. या राजकारण्यांनी आपल्या सहनशीलतेनं परमोच्च बिंदू गाठलाय. शहाणी, सुशिक्षित मंडळी राजकारणापासून सतत लांब राहण्याचा प्रयत्न करतात. ते असं का वागतात? याचाही विचार करायला हवाय. सज्जन माणसं दूर गेल्यानंच अशा स्वार्थी, सत्तालोलुप, दुर्जन, भ्रष्ट माणसांचा संचार राजकारणात होऊ लागलाय. सभा, समारंभ, खासगी बैठक वा अगदी सहज गप्पा मारतानाही आपण, राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याचं रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा, शहाण्या माणसांचा वावर राजकारणात वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतःशी आणि आपल्या राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखं आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण त्यात उतरणार असू, तर या गटारगंगेतले काही शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे, नाही का? शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं ही पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला, तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडं निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या अनेक दुर्जनांची असते, म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीनं आणि निर्धारानं सज्जनांनी राजकारणात उतरणं हे आपलं कर्तव्य ठरतं. कोट्यवधी मराठी माणसांचं दैनंदिन जीवनही आजकाल सर्वंकष राजकारणाशी निगडित झालंय. असं एकही क्षेत्र नाही की, ज्यांच्याशी राज्यकर्त्या शासनाशी आपला संबंध आलेला नाही. पण तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या सामान्य रयतेला 'राजकारण कसं असतं, वा कसं असावं?' ह्या परिसंवादाशी फारसं कर्तव्य नाही. त्यात रस घ्यायला त्यांना फुरसतही नाही. सामान्य माणूस काकुळतीनं इतकंच म्हणेल, की.... 'बाप हो, राजकारण करा, बेरजेचं करा, नाहीतर वजाबाकीचं करा, त्रैराशिकाचं करा, नाहीतर मग पंचराशिकाचं करा, पण करा म्हणजे झालं...!' परंतु सामान्यांप्रमाणे राजकारणाची अथवा कोणत्या 'कारणा'ची उपेक्षा करुन बुद्धिमंतांचं, इंटेलेक्च्युअल्सचं कसं चालेल? अतिशहाणपणामुळे त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतःला क्रियाशील राजकारण फारसं जमलं नाही; तरी राजकारणावर चर्चा हा त्यांचा खास प्रांत बनलाय. प्रत्यक्ष राजकारण आणि राज्यकारण करणाऱ्या मंडळींना 'गाईडलाईन्स' पुरविणाऱ्या यथार्थदीपिका उजळणं हे त्यांचं 'मिशन' आणि कधीकधी कमिशनही असतं. कोणत्यातरी शिवबाचं गागाभट्ट वा रामदास होण्याची अथवा कुण्या चंद्रगुप्तांचं आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते. त्या बुद्धिमंतांतला एक पोटवर्ग आहे, तो आम्हा पत्रकारांचा! आम्हाला कामाच्या निमित्तानं जीवनातल्या सर्व विषयात रस घ्यावाच लागतो. त्यातही विशेषत: राजकारणात! राज्यकर्त्यांची आणि राजकारणाची संगत नको रे बाबा... असं आम्हाला म्हणताच येत नाही. शासनकर्त्यांना ऐकवणं आणि त्यांचं ऐकणं, त्यांच्या मुलाखती घेणं, त्यांच्याशी प्रश्नोत्तरं करणं हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग!
राजकारण गरजेचं असतं हे राजकारण्यांचं म्हणणं फार महत्वाचं असतं, हे आपल्याला सहज लक्षांत येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, कधी तडजोड, कधी कुरुक्षेत्रावरची झोडाझोडी, कधी समझौता, तर कधी निव्वळ दमबाजीनं बाजी मारणं! असं राजकारणाचं स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीनुसार पालटत राहतं. 'गरजेचे राजकारण' हे एकदा मान्य केलं म्हणजे ते सदैव बेरजेचंच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढं बेरजेचं तेवढंच वजाबाकीचं; जेवढं गुणाकाराचं तेवढंच भागाकाराचं...! राजकारण किंबहुना कोणतंही काम, कार्य एकंदरीत बेरजेनं, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचं झाल्यास 'लोकसंग्रहा'नं साध्य होतं हे खरं; पण कधी कधी वजाबाकीनंही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे' हा समर्थांचा संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणं देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरतं. समर्थ रामदासांनी 'राखावी बहुतांशी अंतरे' या आशयाचा उपदेश अनेकदा केला असला तरी, 'दासबोधा'तलं 'राजकारण' नामक निरुपण, त्यातल्या समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडलीय.
'जो बहुतांचे सोसेना l त्यास बहुत लोक मिळेना ll'
एवढं सांगून ते थांबले नाहीत तर,
'अवघेचि सोसिता उरेना l महत्व आपुले ll'
अशी जोडही दिलीय. पुष्कळांना आपलंस करावं हे सांगतानाच समर्थांनी म्हटलयं,
'हिरवटाशी दूरी धरावे l युद्ध कार्यास ढकलावे l
नष्टासी नष्ट योजावे l राजकारणामध्ये ll'
असा इशाराही त्यांनी दिलाय.
सारांश, जीवनाप्रमाणेच राजकारणाचं ध्येय देखील आपल्याला निश्चित ठरविता येईल; त्या ध्येयाच्या गरजेनुसार उपायही योजावं लागतील. वेगवेगळ्या प्रकारे गणितं मांडावी लागतील. पुष्कळदा बेरजेचं, गुणाकाराचं, वेळप्रसंगी वजाबाकीचं आणि भागाकाराचं देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची आणि नरेंद्र मोदींची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, बेरजेप्रमाणेच वजाबाकीचे पाठही त्यांनी अनेकदा गिरवलेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघार तर कधी पुढाकार, कधी तह, तर कधी तलवार, कधी संधी तर कधी विग्रह, कधी बेरजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणं घेत त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडं गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणं... वळणंच ती! तेव्हा ती वक्रच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गानं सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणं मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणं सोपं नाही. राजकारणाचं गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत, विचारवंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवत नाही. म्हणूनच या वर्गातली शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत. इतकंच काय त्यावर भाष्य करणंही टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीनं आणि राष्ट्राच्याही दृष्टीनं हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी ही मंडळी कधी करणार आहेत?
राजकीय नेत्यांच्या चारित्र्याचा प्रश्न नेहमीच दबक्या आवाजात चर्चिला जातो. भ्रष्टाचार हा आताशी शिष्टाचार झालाय. किंबहुना त्याचं उदात्तीकरण करण्यातच राजकारणी मश्गूल आहेत. दिल्लीतल्या राजकारण्यांपासून गल्लीतल्या पुढाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच चारित्र्याची उठाठेव सुरु असते. काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय चारित्र्याची पुन्हा एकदा चर्चा झाली. त्यांनी आपल्या अनौरस पुत्राला नाकारणं, डीएनए टेस्टचं आव्हान, मग तिवारींची शरणागती, त्यानंतर पुत्राचा आणि पत्नीचा स्वीकार या सगळ्या घटना तेव्हा पुन्हा उजळल्या गेल्या. अशा चारित्र्यहीन माणसाची 'पार्टी विथ डिफरन्स' असलेल्या भाजपला गरज का लागावी? सत्तेसाठी काहीही केलं जातंय, कुणालाही स्वीकारलं जातं, याचा कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही. अनेक विटाळलेली मंडळी राजकारणात पवित्र होताना आपण पाहतो. सत्ताकारणातलं हे धुलाईयंत्र अशांना पावन करताना बेरजेचं राजकारण पाहावं लागतंय. देशात आणि राज्यात बहुविध पक्षांची संमिश्र सरकारं आलीत आणि सत्तेसाठी म्हणून सर्वच पक्षांना आपली धेय्य, धोरणं, तत्त्वं गुंडाळून ठेवावी लागलीत. सत्ताधारी पक्षाला सत्तासाथीदार असलेल्या इतर पक्षांना सांभाळत, तारेवरची कसरत करत कारभार करावा लागल्यानं त्यांना कोणत्याच पक्षावर, त्याच्या ध्येयधोरणावर टीका करता येत नाही. केवळ सत्ता आणि त्यासाठीची खुर्ची हेच अंतिम लक्ष्य बनल्यानं साऱ्याच राजकारण्यांना त्यामुळं लोकांसमोर जाताना कशा पद्धतीनं जावं ही एक समस्यांचं निर्माण झालेली दिसते. यावर तोडगा म्हणून आपली सत्ता आली तर, पहा हा आमचा 'सत्तासाईबाबा' असं सांगून आपल्या नेत्यांच्या छब्या लोकांसमोर धरल्या जाऊ लागल्यात. मग विरोधी पक्ष त्या सत्तासाईबाबाच्या विरोधात चारित्र्यहनन करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उरत नाही. मग त्या छबीवर, त्याच्या चारित्र्यावर चिखलफेक ही आता नित्याचीच बाब झालीय. वास्तविक चारित्र्य आणि भ्रष्टाचार या दोनही बाबी व्यक्तीकडून सार्वजनिकतेकडं जात असतात. चारित्र्य ही काही पेहरावासारखी किंवा प्रसाधनासारखी बाहेरून स्वीकारण्याची अथवा वापरायची चीज नव्हे. चारित्र्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो म्हणून तो त्याच्या जीवनाचाही भाग असतो. माणसाच्या नीती-अनितीच्या कल्पना या साऱ्यातून माणसाचं चारित्र्य आकार घेत असतं. केवळ स्त्री पुरुष संबंधापुरती चारित्र्याची कल्पना अथवा व्याख्या सीमित असत नाही. आणि ती असूही नये. त्या साऱ्याला पुन्हा समाजानं ठरवलेल्या निकषांची परिमाणं आहेत. आणि ते निकष त्या समाजात वावरणाऱ्याला, त्या समाजाचा घटक असलेल्यांना मान्य असावं लागतात आणि सहसा ते सर्व असतातही. या कारणांमुळे प्रचाराचा दर्जा खालावलाय. केवळ चारित्र्यहनन नव्हे तर निंदानालस्तीही केली जाते हे तर भयानक आहे. राज्याची सांस्कृतिकता, नैतिकता, सौजन्य, सहिष्णुता, आपपरभाव संपुष्टात आलाय. राजकारणात दुसराही राजकीय विचार असू शकतो हे आपण विसरून गेलोय. त्यामुळंच आताशी विरोधकांच्या सभा उधळण्याचा प्रकार वाढीला लागलाय. हे थांबायला हवंय.
दोन व्यक्तिमधले विवाहबाह्य संबंध हा व्यक्तिगत चारित्र्यहीनतेचा भाग झाला. पण त्यासाठी सत्तास्थानाचा अथवा अधिकाराचा गैरवापर करणं, हा सार्वजनिक चारित्र्यहीनतेला प्रवृत्त करतो. तीच गोष्ट सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याबाबत. जी वस्तू माझी नाही, मी ती वापरू नये. जी दुसऱ्याची आहे, ती त्याच्या परवानगीनंच वापरायला हवी, एवढी साधी सभ्यता ज्यांच्यापाशी नसेल तर तो माणूस सर्वत्र आपला हक्कच प्रस्थापित करू पाहतो आणि हळूहळू सार्वजनिक जीवनात सुद्धा करू पाहतो! त्याचा साऱ्या समाजावर अनिष्ट परिणाम घडत असतो. हे लक्षांत घ्यायला हवं. अढीतल्या आंब्याप्रमाणे समाज मग हळूहळू नासायला लागतो. चारित्र्यहीनतेकडं, भ्रष्टतेकडं वळू लागतो. हे आपण अनुभवतोय. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या 'वाटा तुझ्या माझ्या' या पुस्तकातला एक विचार आठवतो. ते म्हणतात, 'वैयक्तिक जीवनातील शील आणि चारित्र्य ही एक फार मोठी जबाबदारी आहे. कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा कार्यकर्ता जर विद्यार्थी असेल तर तो इतरांपेक्षा अधिक नियमित असला पाहिजे. शालेय अभ्यासात अधिक चोख असला पाहिजे. त्याचे स्वतःचे जीवनमान आणि वैयक्तिक खर्च उधळपट्टी नसलेला तसाच जबाबदारीचा असला पाहिजे. असा कार्यकर्ता समाजावर एक नैतिक दडपण असतो. म्हणजेच चारित्र्यसंपन्न व्यक्तीचा इतरांवर प्रभाव पडतो अथवा सार्वजनिक चारित्र्य चोख असण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्य स्वच्छ असणं आवश्यक आहे...!' आज समाजावर असं दडपण आणू शकणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजातून आपल्याला शोधाव्या लागतील, कारण शील आणि चारित्र्य याबाबतच्या जबाबदारीची उणीवच कमी अधिक होऊ लागलीय. इतरांपेक्षा अधिक नियमित, अधिक चोख असण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातून कमी कमी होऊ लागलीय. याउलट 'याचं जसं पचलंय, तसं माझंही पचेल, तो करतो, हा करतो, ते करतात मग मी का नको...?' अशी एक निर्ढावलेली प्रवृत्ती सार्वजनिक जीवनात प्रतीत होतेय आणि ही प्रवृत्ती त्यांचं पचलं मधला तो आणि माझंही पचेल मधला मी या दोन व्यक्तीकडूनच सार्वजनिक जीवनातलं चारित्र्य, नैतिकता, सहिष्णुता ही सर्व स्वभाववैशिष्ट्ये उलटलीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्याच्या शुद्धतेची चाड असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिगत चारित्र्याची चाड जो समाज बाळगील, सार्वजनिक चारित्र्याच्या शुद्धतेची जोपासना जो समाज करील, त्या समाजाला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची गरजच भासणार नाही. मध्यंतरी राज्यात सार्वजनिक चारित्र्याबाबत आणि भ्रष्टाचार याबाबत आंदोलनं झाली. अण्णा हजारे यांच्यासारखी चारित्र्यवान मंडळी या आंदोलनाच्या अग्रभागी होती. पण ही आंदोलनं काही दिवसांनी थंडावली. कारण या आंदोलनात जे सहभागी झाले, अन् सामील होत गेले, त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. पूर्वी श्रद्धेची जी ठिकाणं होती, ती आता धूसर बनलीत. राजकारणात चारित्र्यवान माणसं अभावानंच आढळू लागलीत. मात्र भ्रष्टाचारांचा, भ्रष्टाचारींचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावलीय, आता तर ती नष्ट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय विचारसरणीची सरमिसळ झालीय, यात सर्व राजकीय पक्ष अडकलेत. विविध वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्यानं लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झालीय आणि या साशंकतेतून नेतृत्वावरचाच विश्वास उडालाय. धेय्य, धोरणं, वैचारिक बैठक, तत्व, मूल्य, निष्ठा, आचार, विचार हे सारं साफ बुडालंय, उरलीय फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी वाट्टेल ती तडजोड, लांगुलचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती वाढीला लागलीय, सार्वजनिक जीवनातला हा व्याभिचार आता थांबायला हवाय. असं झालं तर चारित्र्यहीनता आपोआपच जाईल. देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीनं ते एक आशादायक चित्र असेल, सारं मळभ दूर होईल. मात्र त्यासाठी सुष्टांना पुढं यावं लागेल. अशी माणसं आली तर राजकारण स्वच्छ होऊ शकतं. त्याच प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे? 'नॉट द फेल्युअर, बट लो एम इज क्राईम...!' केवळ अपयशच नाही तर संकुचित विचार हा देखील अपराध आहे...! यानुसार सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवाय. भ्रष्ट राजकारण्यांची गळाभेट ही सत्तेसाठी गळा घोटणारी ठरली तर आश्चर्य वाटायला नको.
- हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment