Saturday 24 February 2024

शिवसेनेची प्रतिमा उंचावणारे : मनोहर जोशी

"स्वतःच्या असामान्य कर्तुत्वानं, अत्यंत गरीब घरातून ते एक समर्थ राजकीय नेता, महाराष्ट्रसारख्या देशाला दिशा दाखवणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेचे समर्थ सभापती...शिवाय अशी सर्व वाटचाल करत असताना काळाची पावलं ओळखून युवकांना तंत्रज्ञानातलं शिक्षण देणारी शिक्षण संस्था उभी करणं असं मनोहर जोशी सरांचं चतुरस्त्र आणि प्रेरणादायी जीवन होतं. शिवसेना म्हणजे गुंडाची सेना असं चित्र होतं त्यामुळं शिवसेनेकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन हा पूर्वग्रहदूषित असायचा. पण जोशी यांनी सुसंस्कृत वागण्यानं आपलीच नाही तर शिवसेनेची प्रतिमाही बदलली. शिवसेनेकडे पाहण्याची दिल्लीकरांची, विरोधकांची दृष्टी बदलून टाकली. शून्यातून विश्व निर्माण करणारे कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!"
--------------------------------------
१४ मार्च १९९५.... शिवसेनेच्या राजकीय जीवनातला सत्तारोहणाचा सुवर्णक्षण...! शिवसेनेचा एक नेता, शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाची विराजमान होणार होता. शिवाजी पार्कवर झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभाचं वृत्तांकन करण्यासाठी मी मुंबईत गेलो होतो. काम संपल्यानंतर पुण्याकडे परतत असताना माझ्या कारचा अपघात झाला. मला पुण्यात आणण्यात आलं. हे मनोहर जोशी यांना कळलं, त्यांनी लगेचच पुण्यात येऊन माझी विचारपूस केली आणि उपचारासाठी २५ हजार रुपयाची मदतही केली. त्यानंतर सतत भेटी होत राहिल्या. प्रत्येकवेळी त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू दिसून आले. पुण्यातल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना दादरच्या संमेलनाचे आमंत्रण देण्यासाठी आले असताना मी सामनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत होतो; त्यांनी पुण्यातल्या सर्व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रणे दिली. १९९९ मध्ये दादर इथं होणाऱ्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. तर संमेलनाध्यक्ष वसंत बापट होते. निमंत्रणे देऊन परतत असताना विमानतळावर नेमके त्याचवेळी मुंबईहून त्यांना फोन आला आणि मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. पण त्याच्या चेहऱ्यावर त्याची प्रतिक्रिया उमटू दिली नाही. स्थितप्रज्ञ होऊन ते सामोरं गेले याचा मी साक्षीदार आहे! १९९९ च्या जानेवारीचा शेवटचा आठवडा... शिवसेना-भाजपा युतीचं सरकार.... 'वर्षा' आणि 'मातोश्री' बंगल्यांमधला तणाव अगदी टोकाला गेलेला. वर्षा बंगल्यातल्या मुख्यमंत्र्यांना 'मातोश्री'मध्ये राहाणाऱ्या साहेबांकडून एक मोजक्या शब्दांतला संदेश आला आणि मनोहर जोशी यांनी आपलं पद सोडलं.... वरवर गिरीश व्यास प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला, असं चित्र उभं राहिलं तरी दोन्ही सत्ताकेंद्रांत त्याआधीपासून संघर्ष होत होताच. त्यातलं एक केंद्र होतं मुख्यमंत्र्यांचं आणि दुसरं होतं त्यांच्या पक्ष प्रमुखांचं! १९९५ साली विधानसभेत भाजप- शिवसेना युतीला सरकार स्थापन करता आलं. शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. जोशी यांनी अंतर्गत स्पर्धेतून मुख्यमंत्रीपद मिळवलं असलं तरी त्यांची पुढची वाटचाल तितकी सोपी नव्हती. एकाबाजूला युतीचं सरकार, दुसरीकडे निवडणुकीत दिलेली आव्हानात्मक आश्वासनं पूर्ण करणं आणि शिवसेनाप्रमुखांच्या अपेक्षा पूर्ण करणं अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्याकडे होती. युतीमधल्या भाजपलाही त्यांना सांभाळायचं होतं. शिवसेनाप्रमुखांशी त्यांचे अधूनमधून वादाचे प्रसंग उद्भवू लागले.
या सगळ्या धामधूमीत १९९८ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातल्या प्रभात रोड वरच्या एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेला आता निर्णायक वळण मिळालं होतं. मनोहर जोशी यांना आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा देऊनच मला भेटायला या, असा निरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवला आणि मुख्यमंत्री बदलण्यात आले. 'जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर...' मनोहर जोशी यांच्यानंतर शिवसेनेचे नारायण राणे युती सरकारचे दुसरे मुख्यमंत्री झाले. नारायण राणे यांनी आपल्या 'नो होल्ड्स बार्ड' या पुस्तकात मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याआधीच्या काळाचं वर्णन केलंय. 'मनोहर जोशी स्वतःला वेगळं सत्ताकेंद्र मानत आहेत' अशी भावना साहेबांच्या मनात निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलं असं राणे लिहितात. राणे पुस्तकात सांगतात, "एका रात्री बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला मातोश्रीवर बोलावून घेतले. तिथं उद्धवजीही उपस्थित होते. तेव्हा साहेब स्पष्टपणे म्हणाले, जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर तू सरकार चालवणार का? मी म्हणालो, साहेब फक्त चालवणार नाही, दौडवणार." राणे पुढं लिहितात, दुसऱ्या दिवशीही साहेबांनी हाच प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही नेहमी जोशीच्या जागी मला घेण्याचं बोलता पण कधीही शेवटचा निर्णय घेत नाही असं का? तेव्हा त्यांनी आपले सचिव आशीष कुलकर्णी यांना बोलावून पत्राचा मजकूर सांगितला. आपलं मुख्यमंत्रिपद गेलं तेव्हा काय वाटलं होतं, हे सुद्धा सांगितलं होतं. ते म्हणाले होते, "१९९९ साली अशाच एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेलं. माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केलं तेव्हा का केलं असं विचारलं नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिलं तेव्हा तात्काळ राजीनामा दिला. १९९५ साली मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केलं? बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतली सर्व पदे मला मिळाली. उद्धव यांचंही माझ्यावर प्रेम आहे. तथापि वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन गॅपही असू शकते. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो.!"
शिवसेनेची स्थापना ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. या संघटनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वानं प्रभावीत झालेल्या जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात स्वतःला झोकून दिलं. २ डिसेंबर १९३७ रोजी नांदवी या रायगड जिल्ह्यातल्या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. गरीबीमुळे 'कमवा आणि शिका' या तत्वानं लहानपणापासून जगण्याचा संघर्ष नशिबी आला. भिक्षुकीकरुन पैसा मिळवीत शिक्षण सुरु ठेवलं. इयत्ता चौथी पर्यंत नांदवी, पाचवीला महाड, सहावीनंतर मामाकडे पनवेलला, मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करीत मित्राबरोबर भाड्याच्या घरात राहिले. वार लावून जेवण केलं. मग मुंबईत बहिणीच्या घरी अकरावीच्या शिक्षणासाठी आले. सहस्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नौकरी करुन शिक्षण पूर्ण केलं. कला शाखेची पदवी कीर्ती महाविद्यालयातून मिळविली. वयाच्या २७ व्या वर्षी एम.ए., एल.एल.बी. झाले. मुंबई महापालिकेत लिपिकाची नौकरी करता करता १९६४ साली विवाहबद्ध झाले. मनोहर जोशी यांना उन्मेष हा मुलगा तर अस्मिता आणि नम्रता या दोन मुली आहेत. चिरंजीव उन्मेष हे 'कोहिनूर' उद्योजक आहेत. जोशी यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून काही व्यवसाय केले, पण दूध, फटाके, हस्तीदंती वस्तूच्या विक्रीमध्ये अपयश आलं.  मग जोशी यांनी २ डिसेंबर १९६१ 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट' सुरू केलं. स्वतः गरीबीची झळ सोसली असल्यानं गरीब विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची दिशा दिली. 'नोकरी मागणारे नव्हे तर नौकरी देणारे व्हायला हवे...!', हा मूलमंत्र जोशी यांनी दिला. महापालिकेची निवडणूक लढवली. नगरसेवक म्हणून पाऊल टाकलं. १९७६ ते १९७७ या वर्षी मनोहर जोशी हे महापौर झाले. त्यांनी 'सुंदर मुंबई, हरित मुंबई' ही संकल्पना राबवितांना 'एक पाऊल पुढे' हा स्वच्छतेचा मंत्र दिला. महापालिकेकडून त्यांनी आपला मोर्चा विधानभवनाकडे वळविला आणि विधानपरिषदेवर सदस्य म्हणून तीन वेळा निवडून गेले. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी ही त्रिमूर्ती इथून पुढे गाजू लागली. 
 प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेना भाजप युती घडवून आणली. त्यामुळे १९९० साली शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ आमदार विधानसभेत निवडून आले. शिवसेनाप्रमुखांनी त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. १९९१ साली छगन भुजबळ यांच्या समवेत १५ आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला, त्यामुळं विधानसभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते पद भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेलं. १९९०-१९९१ हे एक वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेल्या जोशी यांना उच्च न्यायालयातला निकाल विरोधात गेल्यामुळे आमदारकी सोडावी लागली. १९९० साली थोडक्यात हुकलेली युतीची सत्ता १९९५ साली आली. १४ मार्च १९९५ रोजी अरबी समुद्राच्या आणि  विराट जनसागराच्या साक्षीनं वाजपेयी, अडवाणी, ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर जोशी यांनी मुख्यमंत्री तर मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रात १९७८ नंतर पुन्हा एकदा बिगर काँग्रेसचे शिवशाही सरकार आलं. संयुक्त महाराष्ट्र जरी १ मे १९६० रोजी स्थापन झाला असला तरी महाराष्ट्रातलं प्रशासन चालविणाऱ्या मंत्रालयात कामकाजाची भाषा म्हणून 'मराठी' भाषेला स्थान मिळालं नव्हतं. राज्याचा प्रत्येक मुख्यसचिव मराठी भाषेत कामकाज करण्यासाठी मुदतवाढ मागत होते आणि दरवेळी ती मिळत होती. परंतु अशीच एक फाईल जोशी यांच्यासमोर येताच ती त्यांनी भिरकावून देत १ मे १९९५ पासून मराठी भाषेत कामकाज सुरु झालंच पाहिजे, असा सुस्पष्ट आदेश दिला. जोशी-मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं 'बॉम्बे'चं 'मुंबई' करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मंजूर केला. १९७४ साली कृष्णा खोऱ्याचं ५४० टीएमसी पाणी अडविण्यासाठी करार होऊनही १९९५ पर्यंत हा करार प्रत्यक्षपणे पुढं सरकू शकला नव्हता. पण जोशी-मुंडे यांच्या सरकारनं पाचहजार कोटी रुपयांचे रोखे काढून स्वतंत्र कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करुन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल टाकलं. मुंबईत पंचावन्न उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू असे अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प जोशी-मुंडे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मार्गी लावतांना मुंबईत पायाभूत सुविधांचा पाया रचला. 'महापौर परिषद' संबंधी निर्णय घेऊन राज्यातल्या महानगरपालिकेच्या महापौरांच्या अधिकाराचा एक चांगला निर्णय घेतला. गोरगरिबांच्या भूकेची काळजी घेतली आणि एक रुपयात झुणका भाकर ही योजना अंमलात आणली.
जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले. १९९२-९३ च्या मुंबईतल्या दंगल आणि बॉम्बस्फोट याची चौकशी करणाऱ्या न्या. श्रीकृष्ण यांचा अहवाल विधिमंडळात मुख्यमंत्री जोशी यांनी टराटरा फाडून फेटाळून लावला. अयोध्येतलं राममंदिर प्रकरणात सुद्धा जोशी उत्तरप्रदेशमध्ये पोहोचले होते. महाराष्ट्रातली राजकीय चौकट जोशी यांच्या प्रभावशाली राजकारणी नेत्याला अपुरी पडू लागली आणि राष्ट्रीय राजकारण खुणावू लागलं. जोशी यांना १९९९ साली दिल्लीच्या राजकारणात जाण्याची संधी मिळाली. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योगमंत्री म्हणून जोशी यांची वर्णी लागली. दुर्दैवानं लोकसभेचे अध्यक्ष बालयोगी यांचं निधन झालं. प्रमोद महाजन यांनी वाजपेयी आणि ठाकरे यांच्या समवेत सल्ला मसलत करुन जोशी यांना थेट लोकसभेच्या अध्यक्षपदी, संसदीय लोकशाहीच्या सर्वोच्च स्थानी बिनविरोध विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दादासाहेब मावळणकर, शिवराज पाटील यांच्या रांगेत मनोहर जोशी यांना स्थान मिळालं. 
अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत जोशी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं तैलचित्र लावून ऐतिहासिक भूमिका पार पाडली. शिवसेना या एकचालकानुवर्ती समजण्यात येणाऱ्या आणि गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आलेल्या संघटनेच्या 'शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरुप, यशापयश आणि भारतीय राजकारणातले शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी मुंबई विद्यापीठाकडे प्रबंध दिला, पीएचडी पूर्ण केली आणि प्रिन्सिपॉल मनोहर जोशीचे डॉक्टर मनोहर जोशी झाले. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात डॉ. मनोहर जोशी यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न असो की शिवसेनेचं कोणतंही आंदोलन, त्यात जोशी यांनी ठाकरे यांच्या बरोबर प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे आदी पहिल्या फळीतल्या नेत्यांच्या समवेत हिरीरीनं भाग घेतला. ठाकरे यांच्याबरोबर तुरुंगवास सुद्धा भोगला. आपल्या मितभाषी स्वभावामुळे मनोहर जोशी यांनी सर्वपक्षांमधले नेते मित्रत्वानं जोडले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत डॉ.मनोहर जोशी हे शिवसेनेतील 'चाणक्य' म्हणूनच ओळखण्यात येत होते. संघर्षाच्या भट्टीत  तावूनसुलाखून निघालेले हे हिंदुस्थानातले सच्चे निष्ठावंत राजकीय नेते म्हणून डॉ. मनोहर जोशी यांनी आपला ठसा निश्चितच उमटविला आहे. मनोहर जोशी सुसंस्कृत राजकारणी म्हणून कायम लक्षांत राहतील. एकाच वेळी प्रशासनाची उत्तम समज, आवाका आणि कार्यक्षमता असणारे मंत्री, अत्यंत चतुर, कुशल, मुरब्बी राजकीय नेता, एक प्रेमळ पिता, एक दूरदृष्टी असलेला यशस्वी उद्योजक आणि अत्यंत शिस्तप्रिय स्वभाव...अशा सर्व रूपांमध्ये ते दिसले. वेळोवेळी अतिशय गुंतागुंतीचे राजकीय प्रसंग समोर आले, तरीही अत्यंत हसतमुखपणे आणि अर्थातच कसलेल्या मुरब्बी राजकीय नेत्याप्रमाणे त्यांनी त्या गुंतागुंतीमधून मार्ग काढले. सरांकडे अत्यंत उत्तम अशी विनोद बुद्धी होती. सरांच्या वागण्या बोलण्यात कधीही सत्ता, पद, मी किती मोठा असा कोणत्याही प्रकारचा भाव दिसून आला नाही. उलट मुळात सर्वांशी अत्यंत सलगीनं वागत- जगत, माणसं जोडत सर स्वतःच्या कर्तुत्वावर मोठे झाले. मूळची घरातली अत्यंत गरिबी. पूर्वी महाराष्ट्रात वार लावून जेवण्याचा प्रकार असायचा. मुलगा शिक्षणासाठी पुण्या-मुंबईत गेला तर घरात गरिबी इतकी त्याच्या जेवणाखाण्याच्या, राहण्याच्या व्यवस्था करता यायच्या नाहीत. तर पद्धत ही होती की सोमवारी एका घरी जेवायचं; पण जेवण्यापूर्वी त्यांच्या घरचं काही काम करायचं आणि मग जेवायचं. असं प्रत्येक वारी. मुळातला त्यातला खरा संस्कार आहे की कुणाचे उपकार घ्यायचे नाहीत. करायचं ते स्वतःच्या कर्तुत्वावर आणि बळावर. मनोहर जोशी सर असे लहानाचे मोठे झाले. सर्वार्थानं कर्तृत्वानं मोठं होतानासुद्धा त्यांनी अनेक क्षेत्रांमधलं आपलं असामान्य कर्तृत्व दाखवून दिलं आणि आज जीवनाशी जे युवक संघर्ष करत असतील, अशा सर्वांनी खरोखर प्रेरणा आणि आदर्श घ्यावा, असं जीवन त्यांनी जगून दाखवलं.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...