Saturday 10 February 2024

विस्कटलेली राष्ट्रवादी, शिवसेना...!


"महाराष्ट्रातल्या ठाकरे आणि पवार या दोन लोकनेत्यांचे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष दुभंगले गेलेत. दिल्लीतल्या डंकापतींच्या राक्षसी महत्वाकांक्षेला बळी पडून इथल्या फितूर सत्तापिपासूंनी त्यांना दिलेल्या सत्ताशय्यासोबतीसाठी पक्ष उध्वस्त करून टाकलेत. त्यांनी दोन्ही पक्षाच्या जन्मदात्यांनाच बेदखल केलंय. इथं मराठी माणसाची अस्मिता उधळून लावली गेलीय. केवळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची शकलं केली नाहीत तर मराठी स्वाभिमानाचीही शकलं झालीत! आता कसोटी आहे ती इथल्या मराठी माणसाची की, ते या फंदफितुरी करणाऱ्या एहसानफरामोष नेत्यांच्या, त्यांना खेळवणाऱ्या डंकापतींच्या मागे जाणार की, मराठी माणसांसाठी, त्यांच्या न्याहक्कासाठी, अस्मितेसाठी झटणाऱ्या, मराठीचं अस्तित्व, ओळख टिकवणाऱ्यांच्या मागे जाणार? हे लवकरच येणाऱ्या निवडणुकांमधून सिद्ध होईल...!"
---------------------------------------
*म* राठी साम्राज्याला फंदफितुरीेचा शाप आहे. याचे अनेक दाखले इतिहासात आहेत. यातून आपण फारसे शिकलो नाही हे स्पष्ट आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. तशी ती नुकतीच झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या संस्थापकाकडून हिरावून घेतलाय!महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकनेते आहेत. त्या दोघांना कायमच वडिलकीच्या मान मिळालाय. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दोघेही चलनी नाणे ठरलेत. दोघांची कार्यशैली वेगळी पण त्यांचं गारूड मराठी माणसांवर कायम राहिलेलंय. दोघांचा मोठा दरारा. चलनी नाण्याच्या भाषेत बोलायचं तर शिवसेनाप्रमुख काटा काढून छाप पाडायचे तर शरद पवार छाप पाडून काटा काढायचे...! त्यामुळं त्याचा सर्वत्र लौकिक होता. पण य साऱ्या लौकिकाला त्यांच्याच समर्थकांकडून छेद दिला गेलाय. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. अनेक निष्ठावंत तयार केले. ते करतानाच त्यांनी मराठा मराठेतर, शहाण्णवकुळी ब्याण्णवकुळी, ब्राह्मण ब्राह्मनेतर, घाटी कोकणी, साळी माळी, कोळी बारा बलुतेदारांची भक्कम एकजूट उभारली! शिवाय मराठी माणसांमध्ये  हिंदुत्वाचा हुंकार, स्वाभिमान जागृत केला त्यामुळं लोक त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणत. शरद पवारांनी मराठी माणसाला सहकाराच्या चळवळीतून राष्ट्रीय पातळीवर नेलं. ग्रामीण भागातल्या मराठी माणसाला सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सत्ता उपलब्ध करून दिली. दिल्लीत मराठी माणसाचं जबरदस्त वर्चस्व निर्माण केलं, त्यामुळं त्यांना दिल्लीतल्या माध्यमांतून मराठा स्ट्राँगमन म्हणून संबोधलं जातेय. या दोन लोकानेत्यांमध्ये वैचारिक विरोधाभास असला तरी ते एकमेकांचे घट्ट मित्र होते. यांची ही मैत्री राजकारणाच्या आड कधी आलीच नाही. पण ते दोघे राजकारणात कधी एकत्र आले नाहीत. ते दोघे जोवर महाराष्ट्रात एकत्र आहेत तोवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ, भाजप यांना शिरकाव करणं शक्य नाही याची जाणीव झाल्यानं हे दोन्ही लोकनेते एकत्र येणार नाहीत हे पाहिलं गेलं. तब्बल ७०-७५ वर्षे संघाचं मुख्यालय महाराष्ट्रात असलं तरी त्यांना महाराष्ट्रात हातपाय पसरता आलेलं नव्हतं. त्यासाठी मोठा डाव टाकला गेला. प्रमोद महाजनांनी संघ विचाराच्या पत्रकारांना शिवसेनाप्रमुखांना हिंदुत्वाच्या विचाराकडे वळविण्यासाठी पाठवले. त्यांच्या सततच्या भेटी वाढल्या, प्रमोद महाजन यात सामील झाले, मग त्यांनी भाजपशी शिवसेनेला युती करायला लावली. खुल्या मनाच्या शिवसेनाप्रमुखांच्या बोटाला धरून भाजपनं महाराष्ट्रात शिरकाव केला. सर्वत्र फिरले. दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांवर बेफाम आरोप करत त्यांना बदनाम करायचा जणू विडाच उचलला. भ्रष्टाचारापासून गुन्हेगारांच्या मैत्रीपर्यंत आरोप झाले. साहजिकच त्याचा परिणाम झाला. ठाकरे पवार एकत्र आले नाहीत. संघ भाजपनं आपला डाव साधला आणि महाराष्ट्रात शिवसेनेच्या साथीनं पाय रोवले.
आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत, पण शरद पवार शडडू ठोकून उभे आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेचं अस्तित्व राहणार नाही, असा कयास असल्यानं भाजपनं शिवसेनेसोबतची युती तोडली. पण उलटं घडलं, शिवसेना अधिक जागा घेऊन उभी ठाकली. उद्धव ठाकरे याचं नेतृत्व सर्वमान्य झालं. त्यामुळं शिवसेना फोडण भाजपला क्रमप्राप्त झालं. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीला फोडल्याशिवय आपलं वर्चस्व निर्माण होणार नाही. असं लक्षात येताच त्यांनी अजित पवारांना आपल्याकडे ओढून राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी करण्याचा प्रयत्न झाला पण ते साधता आलं नाही. अजित पवार परतले. आपल्या पराभवाचं शल्य उरी बाळगून ते शांतपणे वाट पहात आपलं लक्ष्य साधत राहिले. इकडे पवारांनी शिवसेनेला सोबत घेऊन सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन केलं. राज्यातलं नेतृत्व सत्तास्थापनेला कमी पडतेय हे लक्षांत येताच दिल्लीतल्या डंकापतींनी लक्ष्य घातलं. आधी मराठी माणसांचा स्वाभिमान असलेल्या शिवसेनेत खंडोजी खोपडे निर्माण केले. दिल्लीच्या तालावर नाचायला तयार झालेल्या बोलक्या बाहुल्यांनी मग शिवसेनेवरच घाला घातला. ज्या शिवसेनेनं गावच्या कुसाबाहेर राहणाऱ्यांना ओळख दिली, मानसन्मान दिला, पदं दिली, सत्ता दिली, अधिकाराची पदं दिली, त्यांनीच मातेसमान शिवसेनेची शकलं केली आणि भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले. ठाकरे सत्ताभ्रष्ट झाले अन् फंदफितुरीे करणाऱ्याला सत्ता मिळाली. दिल्लीच्या डंका पतींनी मग सोयीस्कररित्या सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेवर कुऱ्हाड चालवली. ज्या शिवसेनाप्रमुखांनी मेहनतीनं शिवसेना उभी केली ती हिसकावून फितुरांच्या एकनाथ शिंदे आणि टोळीच्या हाती सोपवली आणि शिवसेनेवरचं ठाकरेंचं वर्चस्व संपुष्टात आणलं. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार एकाकी झुंजत होते. पण त्यांच्यातही सर्व आयुधं वापरून राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. ज्या पुतण्याला मुलासारखं प्रेम दिलं त्या आपल्या काकांच्या पक्षावरच घाला घातला. पहाटेच्या शपथविधीनंतर पवारांच्या 'प्रतिभे ' नं समजावून अजित पवारांना परत आणलं. भाजपचा डाव उधळला गेला होता. जखमी झालेल्या दिल्लीतल्या डंकापतींनी कालांतरानं या अपमानास्पद घटनेचं उट्ट काढलं. इथंही फितुरी करायला लावून पक्षाची शकलं केली. अजित पवार आणि इतर सत्तेच्या वळचणीला गेले. इथं इतिहासाची पुनरावृत्ती झाली. ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला २५-३० वर्षे चालवला. तो पक्ष दिल्लीतल्या डंकापतींनी शरद पवारांकडून हिसकावून घेत अजित पवारांकडे सोपवला. शरद पवार जे संस्थापक इतकी वर्षे होते ते पक्षाचे साधे सदस्यही नाहीत असं सांगून टाकलं. जनसंघ भाजप यांची एक नितीच झालीय की, ज्या पक्षाशी युती करायची त्यांनाच संपवून टाकायचं. अशी अनेक उदाहरणं आहेत. प्रारंभी रामराज्य पक्ष, हिंदू महासभा संपवली. त्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, तेलुगु देशम, अकाली दल संपवलं. रामविलास पासवान यांच्या पक्षाची शकलं केली.
शरद पवार यांचं  राजकारण वयाबरोबरच उतरणीला लागलंय. या वयात त्यांच्या पुतण्यानेच जो त्रास दिलाय, त्यांच्या मृत्यूची वाट पहावी हे सारं अमानुष या सदरातच मोडतं. पण पवार असे सहजासहजी कोलमडणार नाहीत. या वयातच पुन्हा उभारी घेण्याची इर्षेनं पुन्हा पक्ष उभा करण्याची तयारी चालवलीय. उद्धव ठाकरेंनी ज्याप्रकारे पक्ष साकारण्याचा, लढा देण्याचा धडाका लावलाय तसाच प्रयत्न सुरू करून पवारांनी जुळवाजुळव सुरू केलीय. पक्षाची प्रतिमा अनेक काँग्रेस आमदार भाजपच्या गळाला लागले होते. त्यामुळं राज्यात काँग्रेस कमकुवत झाली. ही पोकळी भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता स्वत: शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पवार यांनी आतापर्यंत पक्षात वेगवेगळे प्रयोग केले. सत्ता येताच सर्व तरुण नेत्यांकडे मंत्रिमंडळातली महत्त्वाची खाती सोपविली. राजकीय सारीपाटावरील सोंगट्या अलगद हलविण्याचे कसब पवारांकडे आहे. यातूनच आताही पक्षात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत छगन भुजबळ हा पक्षाचा ओबीसी चेहरा होता, पण भुजबळ अडचणीत आल्याने जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणलाय. सहकार चळवळ आणि ग्रामीण भागावरच पक्षाची भिस्त आजवर राहिलेली आहे. त्यात भेग पडली असली तरी ते ती सांधण्याचा प्रयत्न करताहेत. त्यातच मराठा समाजाचा पक्ष म्हणून पक्षाची प्रतिमा कितीही प्रयत्न केले तरी अद्यापही पुसली जात नाही. हे वास्तव त्यांना माहीत असल्यानं त्यांनी तसे प्रयत्न सुरू केलेत.
 राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा संच, सारी ताकद, अनुभवी नेतेमंडळी फारसे उरलेले नाहीत, पण शरद पवार यांच्यासारखे चाणाक्ष आणि राज्याची नस ओळखणारे नेतृत्व आहे. तरीही राज्याच्या सर्व भागांतल्या मतदारांमध्ये राष्ट्रवादी पसंतीला उतरत नाही. हेच राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान आहे. राजकारणात येताना समाजकारणाचाही विचार केला पाहिजे, त्याची जोड असली पाहिजे असं पवार नेहमी जाहीर भाषणातून म्हणतात. परंतु त्यांचे हे बोल म्हणजे 'शब्द बापुडे केवळ वारा' असंच असल्याचं चित्र दिसतं. राष्ट्रवादीतले किती नेते राजकारणाबरोबरच समाजकारण करतात का? समाजकारणाचं भाषण करायचं आणि आपल्या पक्षातल्या चिल्लर नेत्यांच्या शंभर टक्के गावगन्ना राजकारणाला प्रोत्साहन द्यायचं, अशी पवारांची नीती आजवर राहिली आहे. तीच त्यांच्या अंगाशी आलीय. वयाच्या तरी वळणावर त्यांनी पक्षातल्या नेत्यांना वळण लावण्याचे प्रयत्न करायला हवं होतं. त्यांच्याकडे अध्यक्षपद होतं, तोपर्यंत ते शक्य होतं. आता अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडंच राहील असलं तरी पुन्हा उभारी मिळण्याची तेवढी शाश्वती नाही आणि त्यावेळी पक्षातले छोटे मोठे नेते त्यांना जुमानतील असंही नाही. पक्ष आणि पक्षातले नेते अनेक पातळ्यांवर बिघडत चालले आहेत, याची जाणीव होताच छडी हातात घेऊन त्यांनी वेळीच दुरुस्ती केली असती तर, पक्षाचे आणि राष्ट्रवादीच्या घड्याळात कधी बारा वाजले नसते, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मुळातच केडरबेस नाही. हा पक्षच साखरसम्राट, शिक्षणसम्राट, सूतसम्राट अशा सम्राट लोकांचा! सत्तेसाठी बांधलेली मोट असं त्याचं वर्णन राज ठाकरे करीत. मग अशा लोकांच्यामध्ये त्याग, सेवा, समर्पण भावना येणार कुठून? १९९९ ला पक्षाची स्थापना करताना पवारांनी राज्यातले सगळेच सम्राट उचलले आणि आपल्या दावणीला बांधले. ज्यांच्याकडे साखर कारखाने, शिक्षणसंस्था, सुतगिरण्या आहेत. ज्यांची संस्कृती ही वतनदार वा जहागिरदारांसारखी होती असेच लोक राष्ट्रवादीशी जोडले गेले. त्यावेऴी पवार हे नाव राज्याच्या राजकारणात चलणी नाणे होते. पवारांचा करिष्मा होता. त्यामुऴे हे सगळे सहकारी सम्राट त्यांच्या छत्रछायेखाली आले. सामान्य लोकांना या पक्षात थाराच नव्हता.
सोनिया गांधीच्या परदेशी मुद्द्यावर आणि त्यांना विरोध म्हणून स्थापन झालेला हा पक्ष! पण जेव्हा सत्ता उबविण्यासाठी पवारांनी काँग्रेसच्या सोनियांना पाठींबा दिला तेव्हाच हे सारे मुद्दे गैरलागू झाले. मग आज पक्षाचे अस्तित्व नेमकं कुठल्या आधारावर आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नक्की कुठला अजेंडा घेऊन लोकांच्या घरी जायचं? बेगडी पुरोगामीत्व घेऊन जायचं तर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्यावेळी साहेबांनी बिनशर्त पाठींबा देऊन भाजपेयींचं सरकार सत्तेत आणलं होतं. त्यापूर्वीही जनसंघाच्या पाठींब्यावरच पवार पहिल्यांदा पुलोदचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुऴे पुरोगामीत्व हा काही त्यांचा विचार नाही होऊ शकत. मग नेमका विचार काय राष्ट्रवादीचा? त्यांची वैचारिक भूमिका कोणती? राज्यातले सगळे सहकारी सम्राट, सगळे टगे या पक्षात एकवटले होते. त्यांची थाटामाटाची संस्कृती हीच पक्षाची संस्कृती झालीय. थाटमाट, बडेजाव, संपत्तीचा झगमगाट आणि दादागिरी या सगऴ्या गोष्टी राष्ट्रवादीला जन्मापासून चिकटलेल्या आहेत. पवार कार्यकर्त्यांना ध्येयवाद द्यायला कमी पडले. कमी पडले म्हणण्यापेक्षा त्यांनी तो दिलाच नाही. केवळ सत्ता हाच राष्ट्रवादीचा विचार आणि ध्येयवाद आणि आधार आहे. त्यामुळंच आजची ही स्थिती झालीय. पण त्यांची उभारी घेण्याची जिद्द कायम आहे.
“थकलो आहे जरी lअजून मी झुकलो नाही ll
जिंकलो नसलो तरी lअजून मी हरलो नाही ll
अरे संकटांनो,अजून दम लावा l
कारण कमी पडलो असलो तरी l
अजून मी संपलो नाही ll”
अशा काव्यमय शब्दांत शरद पवारांनी पक्षाच्या फुटीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्यात. पवारांसारख्या अनुभवी आणि कुशल नेतृत्वाची कारकिर्दीच्या अखेरच्या क्षणी इतकी वाईट अवस्था होणं हे खरं तर शोकांतिकेसारखेच! केवळ साखरसम्राट, शिक्षणसम्राटांच्या गढ्या सांभाळायच्या, जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने, कुरापती करायच्या आणि त्यावर राजशकट हाकायचं, हा पवारांचा आजवरचा खाक्या राहिलाय. आपल्या लावालावीच्या खेळ्या आताच्या काळात उपयोगाच्या नाहीत, हेही त्यांना समजलं नाही. ते आपल्या जुन्याच उद्योगांच्या आधारानं सत्तापदांवर पोहोचण्याची स्वप्नं पाहत राहिले आणि राष्ट्रीयच नव्हे तर राज्याच्या सत्ताकारणातूनही बेदखल झालेत. आपल्या पक्षाची आणि नेतृत्वाची ही दशा झाल्यावर हा दैवानं उगवलेला सूड म्हणायला हवा!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...