Saturday 10 February 2024

नेहरूंचा दु:स्वास...!

"ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता आणि स्वातंत्र्यलढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्यलढ्याचे नायक नेहरूंनाच दूर केलं जातंय. नेहरू, त्यांचा काँग्रेस पक्ष याविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय, भूमिका कदाचित मान्य नसतील, पण स्वातंत्र्य लढ्यातलं नेहरूंचं स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणं हा स्वातंत्र्यलढ्यातल्या प्रत्येकाचा अपमान आहे, 'मला इंग्रजानी केलेली दीडशे वर्षांची घाण काढायची आहे...!' असं न म्हणता आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या नेहरुंवर ७० वर्षानंतरही टीका, चरित्र्यहनन करताना खोटे फोटो, कहाण्या, नेहरूंचं मूळ आणि कुळ याच्या अफवा पसरवल्या जातात. पण नेहरूंचं महत्त्व नाकारता येत नाही म्हणून ६० वर्षांनंतरही टीका करायला आणि खापर फोडायलाही नेहरुच लागतात!"
------------------------------------------
*न* रेंद्र मोदींचं सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून पंडित नेहरू हे कायम चर्चेत आहेत. निरीक्षण असं आहे की भाजपचे शीर्ष नेतृत्व, सामान्य कार्यकर्ते, समाजमाध्यमांवरचे समर्थक, या सगळ्यांनी नेहरुंवर सतत टीका केलीय. केवळ टीका नव्हे तर अनेकांकडून इतिहासातल्या निर्णयांबद्धल, घटनांबद्धल नेहरुंना जबाबदार धरलंय. नेहरूंची विचारसरणी ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे छेडली जातेय. समाजमाध्यमांच्या अतर्क्य व्हायरल कंटेटच्या काळात नेहरुंबाबतच्या अनेक अनैतिहासिक, चुकीची माहिती, जी कधीकधी चारित्र्यहननापर्यंत पोहोचते, तीही व्हायरल होतेय. त्यामागे राजकीय उद्देश आहे असा आरोपही होतो. त्याची शहानिशाही होते. पण मोदीच्या नेतृत्वातली भाजप सातत्यानं नेहरूंवर टीका का करते हा प्रश्न राजकारणात नेहमी चर्चिला जातो. सहा दशकांपूर्वी पंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीमुळे आजच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हा कुतुहलाचा विषय! कॉंग्रेस वा भाजपचे राजकीय, वैचारिक विरोधक, ते अशी टीका करतात की स्वत:च्या सरकारच्या सगळ्या चुका झाकण्यासाठी भाजप नेहरुंकडे बोट दाखवते आणि स्वत:ची सुटका करुन घेते. दुसरीकडे असंही म्हटलं गेलंय की नेहरुंचा आणि त्यांच्या वैचारिक, राजकीय धोरणांचा एवढा खोल परिणाम भारतावर आहे की, तो आजही विरोधकांना त्याला ओलांडून पुढं जाता येत नाही. ती राजकीय संस्कृती गेली तरच त्यापेक्षा वेगळा राजकीय विचार दीर्घकाळ तग धरू शकेल. नेहरुप्रणित समाजवादाचा राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांच्यावर एवढा प्रभाव राहिलाय की कम्युनिस्ट वा हिंदुत्ववादी विचारसरणी वा समाजवादाची इतर रूपं इथं बराच काळ तग धरू शकली नाहीत, विस्तारू शकली नाहीत. २०१४ नंतर हिंदुत्ववादी राजकारण देशात आलं, पण अजूनही नेहरुप्रणित व्यवस्थेचं आव्हान त्यांच्यासमोर आहे, म्हणूनच त्यांच्यावर आजही टीका पहायला, ऐकायला मिळतेय. मग असे कोणते ते प्रश्न आहेत जे वर्तमान राजकारणात भाजपला वारंवार नेहरुंवर टीका करायला भाग पाडतात? त्यापूर्वी अशी काही निवडक वक्तव्यं वा घटना पहायला हव्यात, ज्यावरुन गेल्या काही वर्षांत मोदींच्या नेतृत्वातल्या भाजपसाठी नेहरू हे राजकीय शत्रू आहेत अशी धारणा सर्वदूर पसरलीय
आज नेहरुविरोध दिसत असला तरी नेहरू आणि 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'शी संबंधित संघटना यांचा हा वैचारिक संघर्ष जुनाच आहे. या संघर्षानं मोठ्या कालखंडावर विविध रुपं धारण केलीत. आजचं हे रूप या काळातलं आहे. पण ते तसं का झालं यासाठी इतिहास धुंडाळावा लागेल. हा विरोध वैचारिक मतभेदाचा आहे. नेहरूंचं शिक्षण केंब्रिजमध्ये झालं होतं. त्यावेळी त्यांचा तत्कालीन आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहांशी, त्यांच्या विचारवंताशी, नेत्यांशी नेहरूंचा संबंध आला. त्यांच्यावर पाश्चिमात्य राजकीय, तत्वज्ञानिक, वैज्ञानिक संकल्पना आणि विचारांचा प्रभाव पडला. ते समाजवादानं प्रभावित झाले होते. त्यामुळं तीच विचारधारा ही पुढं 'नेहरुप्रणित समाजवादा'च्या स्वरूपात आली. ज्याचा परिणाम भारतीय राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, समाजकारण यावर झालाय, त्याचा प्रभाव आजही दिसून येतो. नेहरुंच्या या पाश्चिमात्य आधुनिक विचार प्रभावानं उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता ही तत्वं भारतीय राजकीय व्यवस्थांमध्ये आली. नेहरुंची ही वैचारिक बैठक, धारणा वा मूल्यांमध्ये 'भारतीयत्वा'ची कमतरता होती असा आक्षेप उजव्या विचारसरणीच्या संघटना-व्यक्तींकडून घेतला जातो. 'नेहरुंचं हे १९३० च्या आसपास 'डायहार्ड' समाजवादी होणं हे संपूर्ण कम्युनिस्ट होण्यापर्यंतचा अर्ध्याहून अधिक प्रवास पूर्ण होणंच होतं..!' असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी 'हिंदुत्व पॅराडाइम' नावाचं जे पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय, पुढं ते म्हणतात 'या संघर्षाची पहिली ठिणगी ही १९४८ मध्ये गांधींच्या हत्येनं पडली. नेहरूंनी हत्येचा दोष संघाला दिला आणि त्या संघटनेवर बंदी घातली. तपास यंत्रणांनी आणि न्यायसंस्थेनं जरी संघाला दोषमुक्त केलं, तरी हत्यारं उपसली गेली होती. हे शत्रुत्व असं १९६२ पर्यंत राहिलं. चीनच्या युद्धकाळात संघानं केलेल्या मदतीचा सकारात्मक परिणाम नेहरुंवर पडला. त्यांनी संघाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. पण या बाह्य सौहार्दाच्या दिखाव्यानं दोन बाजूंमधली जी खरी वैचारिक आणि तत्वज्ञानिक दरी होती ती कधीच बुजली नाही...!' 
नेहरुवादाचा हा वैचारिक आणि राजकीय प्रवास इंदिरा गांधी, राजीव गांधी, पुढं सोनिया गांधींच्या काळातही सुरू राहिला. या राजकीय विचाराला पहिला धक्का २०१४ मध्ये भाजप पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर बसला आणि पहिल्यापासून सुरू असलेलं हे जुनं वैचारिक युद्ध पुन्हा नव्या सुरात सुरू झालं. ते कसं झालं याविषयी लेख राजकीय पत्रकार स्मृती कोप्पीकर यांनी काही काळापूर्वी जेव्हा 'आय सी एच आर'च्या पोस्टर वादानंतर लिहिला होता. त्यात कोप्पीकर म्हणतात, 'नेहरूंची आंतरराष्ट्रीय प्रतिमाही एवढी मोठी होती की सगळ्या कोपऱ्यातून त्यांची प्रशंसा झाली. त्यांचं निधन झालं तेव्हा जगभरातल्या वृत्तपत्रांनी लिहिलं होतं. पण हिंदू महासभा वा संघ यांना ते कधीही पटलं नाही. त्यांनी नेहरूंचा द्वेषच केला. नेहरूंची 'आयडिया ऑफ इंडिया' आणि त्यांची 'हिंदूराष्ट्रा'ची कल्पना या परस्परविरोधी होत्या. नेहरुंच्या रस्त्यावर या देशानं चाललेल्या प्रत्येक वर्षासोबत त्यांचं स्वप्नं दूर जात होतं. संघाचे राजकीय नेत्यांना याची जाणीव असल्यानं ते अधून मधून नेहरुंबद्धल बरं बोलायचे, पण ते सगळं २०१४ मध्ये बदललं...!' 'मोदी आणि शाह यांनी तो तात्पुरता बुरखा फेकून दिला आणि मूळातला द्वेष प्रत्यक्षात दाखवला. त्यांच्या 'कॉंग्रेस मुक्त भारत' अभियानात नेहरूकाळ पूर्ण पुसायचा हेही अध्याहृत होतं. त्यानंतरच नेहरुंच्या आयुष्याबद्धल खोट्या बातम्या पसरवणं सुरु झालं. अजेंडा स्पष्ट होता, 'नेहरूंना पुसून टाका आणि स्वतंत्र भारताचा इतिहास पुन्हा नव्यानं लिहा. हे सरकार तसंही हुकूमशाही वृत्तीचं आहे आणि अशा वेळेस संस्थांवर दबाव आणणं सहज शक्य असतं. तेच या पोस्टर वादातही दिसलं...!' पण नेहरुंना होणारा विरोध हा कुठल्यातरी राग वा द्वेष यातून होतोय हे भाजपला मान्य नाही. 'वैचारिक राग वा द्वेष हा मुद्दाच नाही. एक तर वैचारिक विरोध असतो अथवा वैचारिक समर्थन असतं. हे जे राग, द्वेष असे शब्द वापरले जातातहेत ते डाव्या इकोसिस्टिमचे शब्द आहेत. कारण त्यांना दुसऱ्या कोणत्याच विचाराचं अस्तित्व मान्य नसतं. जगात जिथं जिथं डाव्यांना सत्ता मिळाली तिथं तिथं दुसरा विचार अस्तित्वात राहिलेला नाही. हे वास्तव आहे. त्यामुळे वैचारिक राग वगैरे काही नाही...! असं भाजपचं मत आहे. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतरही सातत्यानं नेहरुवर टीका केलीय. कारण कॉंग्रेसमध्ये ही घराणेशाही नेहरुंपासून सुरू होते. त्यामुळेच जेव्हा नेहरूंचा उल्लेख होतो, तेव्हा एकाच घराण्याच्या हाती पक्षाची आणि देशाची सत्ता हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित होतं. नुकतंच संसदेमध्ये मोदींनी ही टीका पुन्हा केली तेव्हा काँग्रेसच्या गौरव गोगाई यांनी प्रथमच भाजपमध्येही घराणेशाही आहे हे नावानिशी दाखवून दिलं त्यावेळी मोदी गडबडले हे आपण पाहिलंय!
सहकारी नेत्यांचं नेहरूंशी काही मुद्द्यांवरचे मतभेद हे जगजाहीर आहेत. शिवाय कॉंग्रेसवर हाही आरोप आहे की नेहरूंची पक्षावरची पकड घट्ट करण्यासाठी इतर सर्व नेत्यांचं महत्व जाणीवपूर्वक कमी केलं. हे सारं नेहरूंच्या हयातीतच झालं. त्यामुळं जेव्हा त्यांच्या मोठेपणाचा उल्लेख होतो तेव्हा नेहरुंवरही टीका करण्याची संधी त्यांना मिळते. पटेल आणि नेहरूंच्या मतभेदांवर भाजपच्या वक्तव्यांवरुन वाद झालेत, चर्चा झालीय. खरंतर पटेल आणि नेहरू यांच्यात सत्तालोभ संघर्ष नव्हता. तर वेगवेगळ्या पद्धतीनं सत्याकडे जाण्याचां विचार आणि भारत घडवण्याची स्पर्धा होती. जे सुभाषबाबू आणि नेहरूंच्या बाबतीत सत्य आहे तेच पटेल आणि नेहरूंच्या बाबतीतलं आहे, मोदींनी २०१४ पासून आपल्या किती सहकाऱ्याचं कौतुक केलंय? वरिष्ठांची स्मृतिस्थळे, पुतळे उभे केलेत, जे मोदी स्वतःची बरोबरी नेहरूंशी करू इच्छितात! या प्रश्नाच्या उत्तरातच नेहरूंची महानता आणि आजच्या अतिरेकी हिंदुत्ववादी सत्ताधिशांची क्षुद्रता दिसून येते. पटेलांचं योगदान जगासमोर आणणं यात कोणालाही राजकारण का दिसावं? उलट 'कॉंग्रेसनं हे आतापर्यंत का केलं नाही? पटेल हे कॉंग्रेस नेते होते, महात्मा गांधींचे निकटचे सहकारी होते. त्यांचं योगदान लोकांसमोर आणायला कॉंग्रेसला कोणी अडवलं होतं का? यात जर आज कोणाला गैर वाटत असेल, त्यात राजकारण दिसत असेल तर त्यांची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे असा त्याचा अर्थ आहे!' असं भाजप नेते म्हणतात. राजकीय वा वैचारिक विरोधक असल्यावर टीका ही होणारच.
नेहरू हे केवळ पंतप्रधान नाहीत. ते एक राजकारणी, एक विचारसरणी, जणू एक जिवंत शाळाच...! नेहरू हे एक असं स्थान आहे ज्यावर कोणत्याही भारतीय नेत्याला दीर्घकाळ सत्तेत राहिल्यानंतर स्वतःला पाहायचं असतं. खरं तर नेहरूंना आव्हान देणं हा देखील त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा मोठा दिसण्याचा प्रयत्न आहे. पण नेहरू होण्यासाठी किंवा त्यांना आव्हान देण्यासाठी आंतरिक प्रकाशाची गरज असते. त्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास हवा. तुटलेल्या देशाच्या लाखो जीवांना, त्यांचा बुडालेला आत्मविश्वास आणि रिकामा खिसा असूनही, त्यांना अनंताच्या प्रवासावर नेण्यासाठी प्रकाशाची गरज आहे. जनतेवर विश्वास आणि त्यात सहभाग आवश्यक आहे. हे नेहरूंना चांगलंच माहीत होतं. अँटी नेहरूंशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न वाळवंटात नेतो. नेहरूंच्या विरुद्ध दिशा हा अविश्वासाचा मार्ग आहे. हा संशयाचा, अहंकाराचा आणि मक्तेदारीचाही मार्ग आहे.
नेहरू युगाची सुरुवात ही फाळणी आणि गांधींच्या मृतदेहानं झाली. त्या १६ वर्षात नेहरूंनी ती फूट साधण्याचा, एकत्र आणण्याचा आणि सर्वांना भारताच्या कल्पनेत आणण्याचा प्रयत्न केला. आपण भारताचे सुपुत्र असल्याचं सर्वांना आश्वस्त केलं. त्यांच्या हाताला धरून त्यांना मिठी मारलीय. अँटी नेहरूंनी ती प्रक्रिया पूर्णपणे उलटवलीय. भूतकाळ विसरून कामात मग्न असलेला देश पुन्हा विभाजनाच्या चव्हाट्यावर आलाय. नेहरूंची स्वतःची राजकिय भूमिका, नेहरूंची राजधानी नष्ट करण्यात त्यांचा वेळ गेला. पण, गाई, गुजरात आणि शेणाच्या निवडणुकीतल्या विजयाशिवाय आणखी काही इतिहासाच्या पानात लिहावं, अशी त्यांची इच्छा होती. तो प्रयत्न नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कायदा आणि इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून आला. दिल्लीच्या भूमीवर काही नवीन चिन्हे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. देश-विदेशातले मेळावे आणि कार्यक्रमांच्या टाळ्यांच्या कडकडाटात मोठेपणा शोधला. पण टॅलेंटच्या कमतरतेनं त्यांना हास्यास्पद बनवलं. अहंकारानं आपल्याला आंधळं केलं आणि फायनान्सर्सच्या दबावानं सर्वत्र चोर निर्माण केले. त्यामुळं अनेक सुधारणा झाल्या, पण अर्थव्यवस्था सुधारली नाही. ना गुंतवणुक आली, ना बाजारात गजबज. तोच गुंतवणूकदार होता, तोच कामगार होता. तो भारत होता...तीच भारतमाता होती. आता त्यांच्याकडे वेळ कमी आहे. म्हातारपणी आणि सत्तेच्या शेवटच्या टप्प्यात जनतेच्या कमी होत चाललेल्या सकारात्मक भावनांमुळे त्यांना त्यांचा भावी वारसा स्पष्टपणे दिसतो. अभूतपूर्व लोकप्रियता, निवडणुकीतला विजय, चुका पुन्हा पुन्हा माफ करून त्यांनी दिलेला वेळ वाया घालवल्याचं दिसतं. निवडणुका जिंकणं, भाषणं करणं, गर्दी जमवणं यासाठी पंतप्रधानांची आठवण होत नाही, हे आपण जाणतो. भावनेनं त्याची आठवण येते. सहिष्णुता, एकता आणि विश्वास या भावना नेहरूंशी निगडित होत्या. द्वेष, विभागणी आणि कटुता या त्यांच्याशी निगडित भावना आहेत. ही स्लाईड थांबवण्याचं धाडस त्यांच्यात नाही. अंतिम चित्र खराब होईल. इतिहासाच्या आरशात नेहरूंप्रमाणेच ते दिसणार नाहीत. भारतीय वातावरणात प्रतिनेहरू होणं हे मोदींचं भाग्य आहे. गंमत म्हणजे एकेकाळी ‘नव्या युगाची आशा’ म्हणून पाहिलेला हा माणूस भारताची हुकलेली संधी म्हणूनही लक्षात राहील. जी व्यक्ती खूप प्रेम आणि संधी मिळूनही नेहरू होऊ शकली नाही. एकमात्र निश्चित की, टीका असो वा कौतुक एक दिसतंय की, पंडित नेहरूंच्या प्रभावाचं कवित्व अद्यापही भारतीय राजकारणात कायम राहणार आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०


No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...