Tuesday 27 September 2022

सत्यशोधक समाजाची शताब्दी

सामाजिक समता आणि समताप्रधान समाज निर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक क्रांतीकारक पंथ. समाजाच्या आमूलाग्र मौलिक परिवर्तनाकरता हिंदू समाजरचनेतल्या माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातल्या काही समविचारी मंडळींच्या सहकार्यानं २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी, तात्त्विक बैठक, कार्य आणि उपक्रम यांसंबंधी माहिती म. फुले आणि त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या प्रासंगिक निबंध आणि छोटीखानी पुस्तिका 'सार्वजनिक सत्यधर्म' यातून मिळते.
---------------------------------
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास पाश्चात्त्य सुधारणांच्या स्वागताचे तीन प्रवाह महाराष्ट्रात स्वतंत्ररित्या प्रभावीपणे वाहताना दिसतात. पहिला प्रवाह, धार्मिक सुधारकांचा असून तो मुख्यत्वे बाह्मो समाज (स्थापना १८२८) आणि प्रार्थनासमाज (स्थापना १८६४) यांत व्यक्त झाला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामचंद्र गोपाळ भांडारकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर इ. मंडळी यात अग्रणी होती. दुसरा प्रवाह, बुद्धीवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. आगरकरांसारखे जडवादी किंवा अज्ञेयवादी त्यात अग्रेसर होते. तिसरा मोठा प्रवाह, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरूद्ध बंड करणाऱ्या बाह्मणेतरांच्या, बहुजनसमाजाच्या चळवळीचा होता. याचे आद्यजनक महात्मा जोतीराव फुले होते. या तिन्ही सुधारणा प्रवाहांची सर्वसंमत वैशिष्टये अशी होती. पाश्चात्य विज्ञान पूर्णतः स्वागतार्ह आहे. धर्माशी प्रत्यक्ष सोयरिक नसलेले आधुनिक शिक्षण हाच खरा सुधारणेचा पाया आहे. आणि चातुर्वण्याचे तत्त्वज्ञान किंवा जातिभेद ही संस्था व्यक्तिविकासाला मारक आणि एकात्म समाजाच्या घडणीत अडसर असल्यामुळं तिचं समूळ उच्चटन व्हावं, कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या पायावर लोकसत्ताक राज्यव्यवस्था भारतात निर्माण होण्याची गरज आहे. मात्र तत्पूर्वी सामाजिक परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. या सर्व तत्त्वसूत्रांचा प्रारंभ कुटुंबसंस्थेत आणि विवाहसंस्थेत बदल करण्यापासून होतो. त्याकरिता स्त्री-शिक्षण आणि स्त्री-स्वातंत्र्य यांचा पुरस्कार अपरिहार्य ठरतो. ही सर्वसंमत वाई या तिन्ही सुधारणा प्रवाहांत, चळवळीत असली, तरी महाराष्ट्रातल्या बहुजनसमाजातल्या सुधारकांचे, ब्राह्मणेतर सुधारकांचे प्रश्न मागासलेल्या बहुसंख्य जनतेच्या जीवनाशी निगडित, तर ब्राह्मण सुधारकांचे प्रश्न पांढरपेशा उच्च्वर्णीयांच्या जीवनाशी संबंधित होते. त्यामुळं हिंदू धर्माच्या पूर्वपरंपरेवर मूलोच्छेदी प्रहार करण्याची तीव्र आणि कठोर प्रवृत्ती निर्माण झाली. साधारणतः प्रार्थनासमाजाच्या धर्तीवर पण शूद्रातिशूद्रांच्या खास उद्धारार्थ सत्यशोधक समाजाची स्वतंत्र, स्वावलंबी आणि पुरोगामी विचारांची संघटना स्थापन करण्यात आली.

महात्मा फुले यांच्या या उच्छेदक प्रवृत्तीला अनेक कारणं आहेत. त्यातल्या अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पेशवाईच्या उत्तरार्धामधल्या ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ. या काळात, ब्राह्मणी राज्यात जातिभेदाची तीव्र अंमलबजावणी, ब्राह्मणेतर जातींना दडपण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती, शूद्राति-शूद्रांची बेफाट पिळवणूक, कायद्याच्या अंमलबजावणीतला ढळढळीत पक्षपात, बेसुमार भ्रष्टाचार आणि लाचलूचपत अशी बेबंदशाही आणि अनागोंदी होती. साहजिकच त्याकाळी महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि नागरी सामाजिक जीवनात ब्राह्मणांचं धार्मिक आणि प्रशासकीय क्षेत्रांत पूर्ण वर्चस्व होतं. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज गुरफटला होता. त्याचा प्रवर्तक आणि समर्थक वर्ग विशेषकरून ब्राह्मण वर्ग होता. ह्या चौकटीविरूद्ध बंड करणारी प्रवृत्ती, सत्यशोधक समाजाच्या रूपानं जागृत झाली आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या रूपानं धगधगणाऱ्या बंडाचं निशाण हाती घेतलं. धर्माचे मनुजवैरी गुंतवळ आणि ते जपणारे समाजघटक यांच्या अनिष्ट प्रवृत्तींविरूद्ध, जवळजवळ सर्व आघाड्यांवर त्यांनी युद्ध पुकारलं होतं.

महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केलीय. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरुद्ध महान सत्य कोणतं, असा प्रश्न उपस्थित करून महात्मा फुले यांनी म्हटले आहे, ‘‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचं एक कुटुंब निर्माण करणं, हेच मनुष्यतत्त्वाचं सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरूष यांचे हक्क सारखे आहेत. मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसऱ्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही. राजकीय आणि धार्मिक मतांमुळं कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणं, म्हणजे सत्याचा द्रोह करणं होय. प्रत्येकाला स्वमताचा प्रसार करण्याचा हक्क आणि अधिकार आहे. सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे. शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामं माणसाला हीनपणा आणत नसून त्यातून त्याची थोरवीच सिद्ध होते. सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणं, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्य होय. या विश्वात जगण्याकरता आणि उपभोगाकरता वस्तू उत्पन्न करणं किंवा मिळवणं, हे माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणं, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे एवढंच नव्हे, तर ही ईश्वराची पूजा आहे. भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही कारण तो सर्व विश्वाचा स्वामी आहे. त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही. 'बायबल ' मध्ये येशू ख्रिस्तानं माणसानं माणसाशी कसे वागावे, यासंबंधी केलेला उपदेश माणसानं अंमलात आणला, तर मनुष्यजातीचं जीवन पूर्ण सफल झालं असं समजावं!’’. महात्मा फुले यांनी विशद केलेलं हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमानं संपादन केलेल्या संस्कृतीचं आणि ज्ञानाचं सार आहे. त्यांनी सत्यज्ञानाचं साधन किंवा प्रमाण कोणतं, यासंबंधी समग्र चर्चा केलीय. ‘‘शुद्ध सत्य हे धर्मग्रंथात किंवा ऋषी, गुरू, अवतार आणि ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीत वास करते. निसर्गातलं सत्य आणि नैतिक सत्य ही दोन्ही प्राप्त करून देणारी बुद्धी मनुष्यात स्वाभाविकपणे वसत असते. सृष्टिकर्त्यानंच मनुष्यजातीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे. ईश्वरानं, निर्मिकानं मानवाला एकदाच एकच एक ज्ञानाचा दिव्य ठेवा दिला आहे तो म्हणजे बुद्धी होय!’’. महात्मा फुले यांची सत्यशोधक समाजाविषयीची ही तात्त्विक बैठक पूर्णतः बुद्धीवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नाही मात्र ‘निर्मिका’चं म्हणजे सृष्टिनिर्मात्याचं अस्तित्व ते मान्य करतात. निर्मिकाचं सर्वन्यायीपण सिद्ध करण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेला सज्जड युक्तिवाद मात्र विज्ञानाच्या कसोटीवर कितपत उतरेल याबद्दल शंका आहे.

सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी महात्मा फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगानं नियमावली तयार केली. मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता 'सार्वजनिक सत्यधर्म' या ग्रंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यानुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरूवातीला महात्मा जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्धतीनं कार्यकारी मंडळाची निवड आणि बहुमतानं निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रं होती. सुरूवातीला दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडं अनौपचारिकरित्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय आणि सद्यस्थिती याविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे.

सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे. (१) ईश्वर-निर्मिक एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार आणि सत्यरूप आहे. सर्व माणसे त्याची लेकरं आहेत. या निर्मिकाशिवाय, निर्मात्याशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. (२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. (३) माणूस जातीनं श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो. (४) निर्मिक सअवयव रूपाने अवतरत नाही. (५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. (७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि (८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन. सर्व सभासदांनी सत्याचा प्रसार आणि सद्विचार लोकांत प्रसृत करून मानवी हक्क आणि कर्तव्ये यांचा प्रसार-प्रचार वृत्तपत्रे, व्याख्यानांव्दारे करावा. महात्मा फुले यांनी दलितांना, स्त्रियांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोकशिक्षणाचा उपक्रम प्राधान्यानं हाती घेतला. शिक्षण सर्वांना सहजलभ्य व्हावं आणि सर्वांनी शिक्षण घ्यावं म्हणून प्रयत्न केला. विद्येची महती त्यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथात चपखल शब्दांत वर्णन केलीय. ते म्हणतात,
“विद्येविना मति गेलीl मतिविना नीति गेलीl
नीतिविना गति गेलीl गतिविना वित्त गेलेl
वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केलेl“
अज्ञानगस्त शूद्रातिशूद्रांच्या शाळांबरोबरच त्यांनी मुलींसाठीही शाळा काढल्या. त्यासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन अध्यापनही केले. ज्ञानवृद्घिकारक उपायांना बळकटी देण्यासाठी त्यांनी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना विद्यावेतने आणि हुशार विद्यार्थ्यांना बक्षिसे ठेवली. निबंधलेखन आणि वक्तृत्वस्पर्धा यांना उत्तेजन दिलं. वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे एक सहकारी कृ. पां. भालेकर यांनी वसतिगृह सुरू करून परगावच्या गरीब विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली. महात्मा फुले यांनी १८८२ मध्ये हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. पाझरणीच्या सिद्धांताला कडाडून विरोध केला. त्यासाठी लोकहितकारक असे उपायही सुचविले.

सत्यशोधक समाजानं लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार आणि सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले.  'दीनबंधू ', 'दीनमित्र 'वगैरे वृत्तपत्र, मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीनं मांडली.  'शेतकऱ्याचा आसूड 'मधून महात्मा फुले यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘डेक्कन ॲगिकल्चर रिलिफ ॲक्ट’ संमत झाला. 'दीनबंधू ' वृत्तपत्रानं गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला. नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘मिलहँड असोसिएशन’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढं कामगारांची बाजू मांडली. तसंच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. जातिभेद खंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे 'जातिभेद विवेकसार ' परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित 'धर्मदर्शक' आणि महात्मा फुलं यांचे 'सार्वजनिक सत्यधर्म ' ह्या ग्रंथाचा सत्यशोधक चळवळीनं मार्गदर्शनपर उपयोग केला. तसंच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रचार केला. १८७९ मध्ये पुण्यातल्या एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्धल आणि पिळवणुकीबद्धल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचं शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. एवढंच नव्हे, तर भालेकर यांनी ते, विदर्भ आणि मध्यप्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तिथं सत्यशोधक समाजाचं प्रचारकार्य केलं. महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांतून समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या उपकमाला काही अंशी यश लाभलं.

महाराष्ट्राबरोबरच बृहन्महाराष्ट्रातल्या काही शहरांतून महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या, लोकशिक्षणाच्या चळवळीला वेग आला. कृष्णराव पांडुरंग भालेकर, स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावरू, डॉ. विश्राम रामजी घोले, डॉ. संतुजी रामजी लाड, सावळाराम दगडूजी घोलप, महादेव गणेश डोंगरे, हरिश्चंद्र नारायण नवलकर, महादेव राजाराम तारकुंडे, आण्णा बाबाजी लठ्ठे, ज्ञानगिरी बुवा, तात्या पांडुरंग सावंत, वा. रा. कोठारी, सखाराम पाटील, मुकुंदराव गणपत पाटील, ॲड. गणपतराव कृष्णाजी कदम, भास्करराव जाधव, हनुमंतराव साळुंखे-पाटील, दांडेगावकर, ॲड. केशवराव बागडे, आनंदस्वामी, रामचंद्र आसवले, केशवराव विचारेगुरूजी, ज्योत्याजीराव फाळके-पाटील, रामचंद्र बाबाजी जाधव उर्फ ‘दासराम’, सदोबा गावडे, बंडोबा तरवडे, धोंडीराम नामदेव कुंभार, रामचंद्र गोविंद जामदार, भोसले–सावंत, भाई माधवराव खंडेराव बागल, 'पुढारी 'कार ग. गो. जाधव, ‘सत्यवादी’ कार बाळासाहेब, 'समाज 'कार सर्जेराव पाटील, बाळासाहेब देसाई, रायभान जाधव, ॲड. झुलाल पाटील, दौलतराव गोळे, व्यंकटअण्णा रणधीर, नलिनीताई लढके, ॲड. एकनाथराव साळवे, प्राचार्य गजमल माळी, ल. ब. मिसाळ, रामभाऊ फाळके, ॲड. पी. बी. कडू पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, ॲड. डी. एस. खांडेकर, माधवराव मुकुंदराव पाटील, ॲड. द. रा. शेळके, ॲड. ना. ह. सावंत, जी. ए. उगले, ग. पां. लोके, बाबा आढाव, हरिभाऊ मुळे, उत्तम नाना पाटील आणि ॲड. वसंतराव ऊर्फ भाऊ फाळके पाटील यांसारख्या मोजता येणार नाहीत अशा अनंत छोट्यामोठया निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळ नेटानं पुढे नेली. आजही प्रयत्न चालू आहेत. परिणामी, संपूर्ण समाजक्रांतीचं युग अवघ्या महाराष्ट्रात सळसळून उभं राहिलं. मध्ये काही काळ, विशेषतः महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर (१८९०) तसंच भारताला स्वातंत्र्याची प्राप्ती झाल्यानंतर (१९४७) सत्यशोधक चळवळ खूपच मंदावली, उपेक्षित राहिली मात्र शंकरराव मोरे, मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, दिनकरराव जवळकर, लोकशाहीर पिराजीराव सरनाईक प्रभृती आणि त्यांचे खंदेबल्लळ सहकारी यांनी सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित केली, गतिमान केली आणि खेड्यापाड्यांतल्या, तळागळातल्या माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचा आणि रूजविण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी ती उभ्या महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रचंड रणसंग्रामात, सर्वांगीण सामाजिक क्रांतीऐवजी देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम राहिला. त्यामुळं सत्यशोधक चळवळ विस्कळीत झाली तशीच स्वातंत्र्योत्तर काळात, ‘आता स्वातंत्र्य प्राप्त झालं, उद्दिष्ट साध्य झालं म्हणजे दुसऱ्या कुठल्या उद्दिष्टाची निकड उरली नाही!’, अशी बहुजन समाजानं समजूत करून घेतली. समोरची उद्दिष्टेही वेगवेगळी झाली. शिवाय मोठ्या प्रमाणात ब्राह्मणेतर समाज विविध राजकीय पक्षांत विभागला गेला. अशा काही महत्त्वाच्या कारणांमुळं सत्यशोधक चळवळ नुसती मंदावली असंच नाही, तर थंडावलीही, अशी इतिहासाची नोंद आहे. मात्र इतिहासाकडं पाठ करून ती पुन्हा उसळी मारून फोफावू लागली, ती धारदार विचारांनी दृढ असलेल्या, कडेलोट झाला तरी मागे हटणार नाही या जिद्दीनं पेटलेल्या, त्या त्या कालपरिस्थितीतल्या नव्या-जुन्या, छोट्या-मोठया कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाच्या अभंग निष्ठांवर ! सांप्रत जाणवणारं तिचं अस्तित्वही याच ज्वलजहाल आधारावर उभं आहे.

महात्मा फुले यांच्यापासून (१८७३) आजतागायत (२००८) सत्यशोधक चळवळीचं गतिमान, वाढतं यश, निरनिराळे उपक्रम, कार्यकम हाती घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर निर्भर आहे. कालमानानुसार त्यात बदल, काही सुधारणा संभवत असल्या तरी, छोट्यामोठया सभा, शेतकऱ्यांचे मेळावे, शेतकरी, कामकरी, कष्टकऱ्यांच्या संघटना, स्पृश्य-अस्पृश्य-महिला अशा ‘शूद्रातिशूद्र’ समाजघटकासाठी शाळा उघडणं, परिवर्तन शिबिरं आयोजित करणं, नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती, दुष्काळ, महापूर या संकटांच्यावेळी पुनर्वसन शिबिरं आयोजित करणं, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची, पुलांची कामं घेणं, निबंध लिहून त्याचं वाचन करणं, छोट्या छोट्या पुस्तिका लिहिणं, सभा, संमेलनं अधिवेशनं भरवून बहुजन समाजाला ब्राह्मणेतर समाजाला आणि सरकारला परखडपणे काही गोष्टी सुनावून कृती करायला भाग पाडणं आणि छोटी छोटी नियतकालिके काढून त्याव्दारा प्रभावी आणि प्रवाही प्रचार करणं, असे या लोकप्रबोधनकार्याचं सर्वसाधारण स्वरूप राहिलं आहे. लोकशाहीमधल्या लोककल्याणाच्या संस्थांमध्ये प्रवेश करणं, त्यांची स्थापना करणं आणि मोठ्या प्रमाणात ग्रंथव्यवहाराचे प्रकाशन करणं, हे त्याचं कालसुसंगत असे दोन पदर आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या 'महात्मा फुले समता प्रतिष्ठान', ‘एक गाव, एकपाणवठा’ किंवा ‘देवदासींचे पुनर्वसन’, यांसारख्या चळवळी, भाई माधवराव बागल विद्यापीठ (कोल्हापूर) या स्वयंसेवी विद्यासंकुलातर्फे शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी यासारख्या दुबळ्या घटकांसाठी सातत्यानं राबवले जाणारे विधायक उपक्रम, महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानच्या वतीनं मागासवर्गीय आणि तत्सम यांच्या उद्धारार्थ छेडली जाणारी आंदोलनं आणि केले जाणारे संघटन अशा संस्था आणि त्यांचे उपक्रम हे सत्यशोधक चळवळीचेच आविष्कार आहेत. वानगीदाखलची ही यादी पुरेशी ठरावी.

कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाटयानं काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्यावतीनं तिच्या ध्येय, उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचं हे महायान सुरू होतं. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्धीसाठी हा सारा खटाटोप, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची महात्मा फुले यांनी स्थापना केली. मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक सम

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...