Tuesday 27 September 2022

*' रणकंदन मुंबई'साठीचं...!*

"दसरा मेळावा शिवतीर्थावर व्हावा यासाठी शिवसेनेला न्यायालयात झगडावं लागलं. शिवसेनेला दमवणं मुंबई महापालिका निवडणुकांपर्यंत चालेल. आज शिवसेनेला शिवतीर्थ मिळालं तरी खरी कसोटी पुढंच आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालयातला झगडा शिवसेनेला आणखी दमवणारा आहे. महापालिका निवडणुकीत दमलेल्या शिवसेनेला भाजपच्या चाणक्यासह शिंदेंसेना आणि मनसे यांच्याशी लढावं लागणार आहे. यावेळी शिवसेनेबरोबरच मराठी माणसांचीही कसोटी आहे. शिवसेनेनं अमित शहांचं आव्हान स्वीकारल्याचं म्हटलंय. मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीचं आंदोलन झालं तेव्हा समोर गुजराती मोरारजी होते; आज त्यांचे वारस शहा मुंबईसाठी सर्वशक्तीनिशी उभे ठाकलेत अन त्यांच्या साथीला मराठी फितूर राजकारणी आहेत! मुंबईसाठीचं रणकंदन हे इतिहासाची पुनरावृत्ती ठरणार आहे!"
--------------------------------------------- -
*अ*खेर न्यायालयानं शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यायची परवानगी शिवसेनेला दिलीय. महाराष्ट्राच्या राजकारणावर या निमित्तानं घोंघावणार वादळ काही काळापुरतं का होईना शमलंय! शिवसेनेत उभी फूट पडली. सत्तेचा हव्यास आणि लोभानं ज्या शिवसेनेच्या वटवृक्षाखाली ही मंडळी रुजली, वाढली आणि सशक्त झाली त्यांनीच त्या वटवृक्षावर कुऱ्हाड चालवलीय. त्यासाठी शत्रूंशी संधान साधून घाव घातलाय. ज्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर गेली ५६ वर्षे जोमाने होत होता त्यालाच आडकाठी आणण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला. सत्तेचा दबाव टाकला गेला. न्यायालयानं पोलीस, महापालिका आणि सरकारला फटकारलंय! यंदा शिवसेनेच्या फुटीनंतर हा मेळावा होतो आहे त्यात पक्षप्रमुख काय बोलतात याचीच उत्सुकता आहे! महाराष्ट्रात २०१४ साली भाजपचा मुख्यमंत्री झाला. त्यानंतर मुंबईतली अनेक केंद्रीय कार्यालये अहमदाबादला वा दिल्लीला हलवली. गोदीतलं काम कमी केलं गेलं आणि ते गुजरातमधल्या गोदीतून सुरु झालं, जेएनपीटी बंदराचं महत्व कमी करण्यासाठी केंद्रानं सुरतजवळ मोठ्या खर्चानं नवं बंदर उभारलं, मुंबई बंदराकडं येणारी जहाजं तिकडं वळवलीत, आंतरराष्ट्रीय 'हिरे व्यापार' सुरतला नेलाय, मुंबईतलं मुख्य पासपोर्ट ऑफिस दिल्लीला हलवलंय, देशाचं मुख्य पोस्ट ऑफिस दिल्लीला नेलंय, रिझर्व बँकेचा गव्हर्नर आता दिल्लीत बसू लागलाय, अनेक मोठे उद्योग गुजरातला गेलेत, धुळे-नंदुरबार भागातले महाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातकडं वळवलंय. अशा अनेक घटना आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस वा भाजपनं त्याला आक्षेप वा विरोधही केलेला नाही. किंबहुना त्यांच्या पाठिंब्यानंच मुंबईला कमकुवत करण्याचं कारस्थान केलं गेलंय. आता भाजपला एकहाती सत्ता हवीय. यासाठीच त्यांचा जीव तडफडतोय. मराठी साम्राज्यात सूर्याजी पिसाळ-खंडोजी पिसाळ जसे होते तसंच मुंबईसाठी मराठी माणसंच भाजपच्या हाती लागलीत. मुंबई मिळविण्यातल्या आपल्या मार्गातला मोठा अडथळा 'शिवसेना' आहे. तेव्हा शिवसेनेला रसद पुरवणारी मुंबई शिवसेनेकडून खेचून घेणं हाच भाजपचं अजेंडा आहे. पण शिवसेनेला मुंबईत पराभूत करणं तेवढं सोपं नाही याचीही जाणीव शहांना आहे. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मुंबई भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडलं होतं. पण त्यात यश आलं नाही. शिवसेना फोडल्याशिवाय ती कमकुवत होणार नाही, आपला हेतू साध्य होणार नाही हे जाणून शहा मैदानात उतरलेत. त्यांना शिंदेंसेना-मनसे मदत करतेय. शिवसेना दुबळी करायची, तिची शक्ती संपवायची. मुंबई ताब्यात घ्यायची वा केंद्रशासित करायची. शिवसेना आणि मराठी माणूस यांचं मुंबईवरचं वर्चस्व संपवायचं हे त्यांचं ध्येय राहिलंय. भाजपचा, गुजरातींचा डाव आहे. हिंदुत्वाचा बनाव करुन 'कट' रचण्यात आलाय. लोकांची दिशाभूल केली जातेय. १९६० साली जे जमलं नाही त्याचा 'बदला' आता घेतला जातोय. मुंबईनगरी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले. त्यावेळी स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, इतर भाजपनेते उपस्थित होते. या दौऱ्यात अमित शहांनी मुंबई भाजपची बैठक घेतली. या बैठकीत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. शहा म्हणाले, "राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली पाहिजे!" ते पुढे म्हणाले, "भाजपनं कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटलं नाही. शिवसेनेनंच युती तोडली. शिवसेनेनं आपल्या जागा पाडून आपल्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही जनतेचा विश्वासघात केलाय!" शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि नंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. या सत्तांतरानंतर पहिल्यांदा अमित शहा मुंबईत आले. या सत्तांतराचा आनंद अमित शहा यांची देहबोली दौऱ्यात दिसून येत होती. शिंदे यांचं बंड, ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन काढून घेणं, भाजप शासित राज्यात सुरत, गुवाहटी आणि गोवा इथं आसरा घेणं आणि शेवटी भाजपसोबत सत्ता स्थापन करणं हे सारं काही पडद्यामागेच्या रणनितीनुसार होतं. या राजकीय खेळीचे खरे सूत्रधार अमित शहाच होते. त्यामुळं शहा यांच्या या यशस्वी राजकीय खेळीनंतर त्यांचा हा पहिला दौरा होता आणि म्हणूनच तो राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला. फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थान 'सागर' बंगल्यात शहा तब्बल दोन तास थांबले. इथं शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. तसंच, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची भाषा केली. राज्यात भाजपकडून सुरू झालेली तयारी पाहता भाजप यावेळी मुंबई आणि संभाजीनगर महापालिका निवडणुकीकडं विशेष लक्ष देत आहे. कारण या दोन्ही महापालिका शिवसेना आणि ठाकरेंसाठी बालेकिल्ले आहेत. या किल्ल्यांना खिंडार पाडण्याची तयारी भाजपकडून सुरू झालीय. ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना बॅकफूटवर गेली असली तरी महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना बाऊन्सबॅक करू शकते, याची जाणीव भाजपलाही आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत मुंबई काबिज करायची, हा उद्देश आहे. भाजपची नेतेमंडळी आपली सर्व शक्ती पणाला लावतील, यात शंका नाही. आता शिवसेनेला महाराष्ट्रातून संपवायचं असेल, तर हाच तो क्षण आहे जर मुंबई महापालिकेतून शिवसेनेला बाहेर काढलं नाही, तर मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग पुढे जोमानं महाराष्ट्रात सुरू होईल. २०१७ साली अगदी काठावर जागा मिळाल्यानं भाजपची मुंबईची सत्ता हुकली होती. आता जेव्हा कधी मुंबईची निवडणूक होईल, तेव्हा पूर्ण ताकद भाजप लावेल. यातून शिवसेना आणि मुंबई महापालिका हे गणित बदलायचा भाजपचा मानस स्पष्टपणे दिसून येतो. त्याचीच सुरुवात एकनाथ शिंदेंना फोडून, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून केली गेलीय.

मनसेची भाजपशी युती होणार का? हा प्रश्न सतत उपस्थित होतोय. मनसेनं आपली राजकीय भूमिका हिंदुत्ववादाकडं नेली, पक्षाच्या झेंड्यात बदल केले आणि त्याही पुढं राज सातत्यानं भाजपच्या नेत्यांना भेटत राहीले. महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांच्या दौऱ्याआधी फडणवीस, आशिष शेलार, एकनाथ शिंदे यांनी राज यांना भेटले. या भेटी राजकीय नव्हत्या, असं जरी दोघांकडून सांगितलं जात असलं तरी मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप युती किंवा मनसेची नेमकी भूमिका काय राहील? हे शहा यांच्या दौऱ्यात स्पष्ट होईल असं सांगीतलं गेलं पण त्यावर काही घडलं नाही. मात्र राज ठाकरेंची थेट अमित शहांसोबत बैठक झाली नसली, तरी मनसेबाबत अमित शहा यांच्याशी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. शहा यांनी मुंबई भाजपच्या घेतलेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुखांवर जोरदार निशाणा साधला. वर अमित शहा यांची या बैठकीतली वक्तव्यं नमूद केली आहेत. त्याप्रमाणे, अमित शाह हे उद्धव ठाकरेंना कडाडून विरोधाच्या भूमिकेत दिसून आले. पुढे जाऊन राज्यात पुन्हा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली जाऊ शकते. त्यामुळं मुंबई महापालिकेत शक्य तितकं शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा उद्देश असू शकतो. भाजप आणि उद्धव ठाकरेंमधला कडवटपणा येत्या निवडणुकीच्या काळात पराकोटीला गेलेला दिसून येईल. दोन-अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जे सरकार होतं, ते अनेक पद्धतीनं पाडण्याचा प्रयत्न झाला. पण तसं काही झालं नाही. शेवटी त्यांनी शिवसेनाच फोडली. यावरून त्यांचा राग शिवसेना आणि त्यातही उद्धव ठाकरेंवर आहे. जर फक्त सरकार बनवायचं असतं, तर काँग्रेस-राष्ट्रवादीलाही फोडलं असतं. पण त्यांनी शिवसेनेलाच निशाणा बनवला. 'उद्धव वजा शिवसेना' असं करण्याचंच भाजपनं ठरवल्याचं दिसतं. आता मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत. ते कोणती नवी समीकरणं जुळवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण अमित शाह या मुंबई दौऱ्यात नेमके काय निर्णय घेऊन गेलेत आणि काय रणनिती आखून गेलेत, हे स्पष्ट होईल.

मुंबई जिंकण्याची भाजपची ईर्षा कधीच लपून राहिली नाहीये. ती नेहमीच, विशेषतः २०१७ पासून, अधिक त्वेषानं मांडली गेलीय. पण यंदाचं महत्व म्हणजे अमित शहा यांनी महापालिका निवडणुकीची सगळी सूत्रं आपल्या हाती घेतलीत. शहा यांची प्रतिमा भाजपचे चाणक्य अशी आहे. ते एखाद्या निवडणुकीची जबाबदारी विजयानंच पूर्ण करतात असं म्हटलं जातं. यंदा मिशन मुंबई तर शहांनी वैयक्तिक मिशन केल्याचं चित्रं आहे. त्यासाठी महाराष्ट्रात घडून आलेल्या सत्तांतरामागे त्यांचं प्लॅनिंग असल्याचं म्हटलं गेलं. त्यांच्या परवानगीशिवाय मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. एवढंच काय पालकमंत्री देखील मुख्यमंत्री शिंदेंना नेमता आलेले नव्हते. त्यांच्या मंजुरीनंतरच त्यांच्या नेमणुका झाल्यात. आता, ते स्वतः 'मिशन मुंबई महापालिका'साठी मुंबईत येऊन गेले. शिवाय उद्धव ठाकरेंसोबत शहांनी वैयक्तिक शत्रुत्व घेतलंय असं दिसतंय. भाषणातून ते जाणवलंय. 'उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा' इथपासून ते 'धोक्याचं राजकारण चालत नाही' इथपर्यंत त्यांनी उद्धव यांच्यावर थेट टीका केली. शिवसेनेनं शहांवर शब्द मोडल्याचा आरोप केला होता. पण या सगळ्यांकडं फडणवीस कसं पाहतात हेही महत्वाचं आहे. मागच्या मुंबई निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं आणि ८२ नगरसेवक निवडून आणले होते. सध्या भाजप महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते तेच आहेत. त्यांच्याच हाती सारी सूत्रं होती पण आता शहा सगळी सूत्रं हाती घेतांना दिसताहेत.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...