Saturday 10 April 2021

बंगभूमीवरील समरांगण...!

"बंगभूमीवर लढलं जाणारं युद्ध हे समुद्रमंथनाप्रमाणे आहे. ज्यातून अमृत आणि विष दोन्ही निघणारं आहे. हे समुद्रमंथन केवळ नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठीच नव्हे तर भाजपेयींसाठी आणि तृणमुल काँग्रेससाठीही अस्तित्वाचं आहे. वंगभूमीतल्या यशपयशानं एकाला 'सत्तासंजीवनी'चं अमृत मिळणार आहे तर दुसऱ्याला 'सत्तास्वप्नभंगा'चं विष! आज सत्ताभ्रष्ट होऊ नये यासाठी आवेशानं ममतादीदीं रणांगणात लढताहेत! त्यासाठीची त्यांची चौफेर फटकेबाजी सुरु आहे, तर ममतादीदींना मोदी-शहांनी सर्वबाजूनं घेरलेल्या प्रचारयुद्धात अभिमन्युच्या त्वेशानं ममतादीदी चक्रव्यूहात शिरल्यात. आगामी काळात वंगभूमी ही सत्तासंपादनासाठीचं समरांगण बनेल. सत्तासुत्रे यापुढील काळात कुणाच्या हाती जाणार आहेत? मोदी की ममतादीदी? हे ठरणारं असल्यानं या निकालावर देशातले आगामी राजकारण कसे असेल, यासाठी देशभरातल्या राजकीय निरीक्षकांच लक्ष बंगालच्या घडामोडींकडं लागलेलं आहे!"
-----------------------------------------------------

आज बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडालीय. आठपैकी तीन टप्प्याचं मतदान झालंय. महिनाभर चालणाऱ्या निवडणुकीचा निकाल २ मेला लागणार आहे. याकाळात बंगालमधलं वातावरण अधिकच गंभीर होणार आहे. बंगालमध्ये जेव्हा सीपीएम- डाव्यांचं सरकार होतं त्यांचा बोलबाला होता, दबदबा होता. तेव्हा त्यांची घोषणा होती....
*तुमार नाम आमार नाम... व्हिएतनाम... व्हिएतनाम...!* डाव्यांना 'कम्युनिझम' विचार हा केवळ देशातच नाही तर जगात पोहोचवायचा होता. डाव्यांचा बोलबाला करायचा होता. पण ते त्यांना फारसं जमलं नाही! त्यांनी आयडियालॉजीशिवाय काहीच काम केलं नाही.
त्यानंतर शेतकऱ्याच्या जमिनी वाचविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी ममता बॅनर्जींनी आंदोलन उभं केलं. तेव्हा त्यांची घोषणा होती....
*तुमार नाम आमार नाम... नोंदीग्राम... नोंदीग्राम...!*
या आंदोलनानंतर टाटांचा नॅनो कार प्रकल्प आणि पाठोपाठ डाव्यांचं सरकार दोन्हीही बंगालच्या बाहेर फेकलं गेलं!
आज भारतीय जनता पक्ष बंगालमध्ये फुलफोर्सनं घुसलाय. त्यासाठी त्यांची घोषणा आहे...
*तुमार नाम आमार नाम...जोय श्रीराम...जोय श्रीराम...!*
भाजपेयींच्या या घोषणेनं ममतादीदी व्यथित झाल्या असल्या तरी बंगालमधली ही निवडणूक 'आयडियालॉजी'ची नव्हे तर ती 'आयडेंटिटी'ची ठरतेय!
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत थोडंसं यश मिळाल्यानं भाजपेयींचा प्लॅन आहे साराच्या सारा बंगाल बळकावयाचा बंगालमध्ये सत्ता मिळवणं हे इतकं सहजसाध्य आहे का? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 'रवींद्रनाथ टागोर' रूप कमला येईल का? की ममता दीदींचं 'मा, माटी, मानूष' हे तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी जादू करील काय? या दोघांच्या झगड्यात 'डावे-काँग्रेस-आयएसएफ' यांची आघाडी किंगमेकर तर बनणार नाही ना!

भाजपेयींना असं वाटतं की, आपली सत्ता इथं आली तर बंगालमध्ये 'अच्छे दिन आने वाले हैं।' बंगालमधल्या घडामोडी बाहेरून पाहणाऱ्याला असं वाटेल की, २०१९ मधल्या लोकसभा निवडणूकीत भाजपेयींनी जे यश मिळवलं याचा अर्थ त्यांना इथं सत्ता मिळेल. पण असं थोडंच आहे का की, लोकसभेतलं यश हे विधानसभेत मिळेल! परंतु जमिनी वास्तविकता ही आहे की, इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हळूहळू काम करीत आलीय. संघाच्या शाखा इथं वाढल्यात. अनेक लोक संघाशी जोडले गेलेत. राज्य भाजप अध्यक्ष दिलीप घोष हे संघाचंच प्रॉडक्ट् आहेत. त्यामुळं इथं संघीय आणि भाजपेयीं एकत्रितरित्या सत्ता मिळवण्यासाठी काम करताहेत. घोषबाबूंचं वक्तव्य अनेकदा अडचणीचं ठरतंय. 'बंगालच्या विकासात बंगालींपेक्षा बाहेरून आलेल्यांनी दिलेलं योगदान मोठं आहे...!' याशिवाय 'ममतादीदींनी साडीऐवजी बरमुडा घालून फिरावं....!' असं असलं तरी सत्तेसाठीचं मैदान तयार केलं गेलंय. २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली होती मात्र बंगालमध्ये सारंकाही शांत होतं. तेव्हा भाजपेयींकडं कार्यालये होती ना उमेदवार ना कोणतीही व्यूहरचना होती. त्यामुळं भाजपेयींना असं जाणवलं की, आपल्या 'आत्मनिर्भर' नेत्यांकडून सत्तेचा सोपान गाठता येणार नाही. तेव्हा त्यांनी प्रस्तावित तृणमूल काँग्रेस फोडायला सुरुवात केली. त्यांनी हात घातला तो ममतादीदींच्या उजव्या हाताच्या नेत्याला मुकुल रॉय यांना पक्षात घेतलं. पाठोपाठ दुसरा हात समजला जाणारा शुभेन्दू अधिकारी, सुमोन चॅटर्जी यांना पक्षात घेतलं. ही सारी मंडळी शारदा चिटफंड, नारदा स्टिंग यासारख्या कोट्यवधींच्या घोटाळ्यात अडकलेले होते. अशांना भाजपच्या 'वॉशिंग मशीन' मध्ये टाकून शुद्ध केलं अन भाजपच्या वरिष्ठ पदांवर विराजमान केलं! त्यामुळं त्यांच्यावर टीका करताना बीजेपी ही बीजेपी राहिलेली नाही तर ती 'बीजमूल' बनलीय! पण वस्तुस्थिती अशी आहे की, भाजपेयींनी जो फॉर्म्युला इतर राज्यात वापरला आणि सत्ता मिळवलीय. इतर पक्षातले वजनदार नेते आपल्या पक्षात घेऊन त्यांच्यातल्या टॅलेंटचा वापर करून सत्ता हस्तगत केलीय.

ममतादीदींची प्रतिमा ही साधी, स्वच्छ, साफसुधरी आहे. जसं मनमोहनसिंग यांचं होतं. त्यांच्यापक्षातले लोक एका स्केममधून दुसऱ्या स्केममध्ये घुसत असत. सर्वात मोठं स्केम हे शारदा चिटफंडचं आहे. यापेक्षा बंगालच्या लोकांना खुपतं आहे ते 'कटमनी'चं! कोणतंही सरकारी काम असो त्यात इथले स्थानिक नेते कटमनी म्हणजे आपला हिस्सा ठेवत असत. भाजपेयींचा प्रचार केवळ या कटमनीवरचं अवलंबून आहे. तेच त्यांचं लक्ष्य बनलंय. ममतादीदींवर भाजपेयींचा आणखी एक आरोप आहे की, ते मुस्लिमांचं तुष्टीकरण करतात. राज्यातल्या मुस्लिमांकडं विशेष लक्ष देतेय. भाजपेयींनी याला एक धर्मसंकट बनवलंय. यात त्यांनी 'सीएए' आणि 'एनआरसी'ला जोडून टाकलंय. बांगलादेशी घुसखोर बंगालचं भवितव्य धोक्यात आणताहेत. ही वाळवी लागलीय. यांना भाजप हुसकून लावेल. असं अमित शहांनी म्हटलंय. यामुळं मतांचं ध्रुवीकरण होणार आहे. याचा त्यांना फायदाही मिळू शकतो. इकडे मतका कम्युनिटीचा खास विशेष दबदबा राहिलाय. ही मंडळी जेव्हा पूर्व बंगाल बनलं तेव्हा तिकडून इकडं आले आहेत. त्यांना ममतादीदींनी जमीन दिलीय, रेशनकार्ड दिलंय, मतदानाचा अधिकार दिलाय. पण त्यांना अद्याप नागरिकत्व मिळालेलं नाही. अमित शहांनी सीएए मुळं त्यांना नागरिकत्व मिळेल असं आश्वासन दिलंय. हे आश्वासन त्यांना भाजपकडं वळवू शकतं.
ममतादीदींचा एक भाचा आहे आकाश बॅनर्जी आणि दुसरा आहे सध्या चर्चेत असलेला अभिषेक बॅनर्जी. यावरून भाजपेयींनी ममतादीदींना घेरलंय की, दीदींनी 'परिवारवाद' पोसलाय. नुकतंच सीबीआयनं अभिषेकच्या घराचा दरवाजा ठोठावलाय. त्यांच्या पत्नीची चौकशीही केलीय. ममतादीदींपूर्वी ३० वर्षे इथं डाव्यांचं-सीपीएमचं राज्य होतं. पण सीपीएमचा दिल्लीत फारसा प्रभाव कधी पडलाच नाही. त्यामुळं बंगालला विशेष पॅकेज मिळालेलं नाही. तृणमूल काँग्रेस एनडीएचा साथी असतानाही फारसं काही बंगालला मिळालं नाही. परिवर्तन झालं नाही. त्यामुळं भाजपेयीं आता म्हणतात की आम्ही 'असोल परिवर्तन' घडवून आणू. केंद्राप्रमाणे राज्यात भाजपचं राज्य आलं तर 'अच्छे दिन येतील!' गेल्या विधानसभा निवडणुकीत ममतादीदींना इथल्या प्रसारमाध्यमांनी भरपूर साथ दिली होती. आता मात्र भाजपेयीं आयटी सेलनं त्याचा ताबा घेतलाय. अमित शहांनी त्यांना बजावलं आहे की, दरेक तासाला ५० लाख मेसेजेस जायलाच हवेत. यावरून आपल्या लक्षात येईल की, कशाप्रकारे प्रचारयुद्ध इथं सुरू आहे. भाजपेयींच्या या व्यूहरचनेला छेद देणं एखाद्या राष्ट्रीय पक्षाला शक्य आहे पण प्रांतिक पक्षाला हे शक्य नाही.

भाजपेयींच्या मेळाव्यात अमित शहा यांनी भाषण करताना, 'ही अस्तित्वाची लढाई आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला अन देशावर दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य आलं, आज तशीच वेळ आलीय....तेंव्हा जागे व्हा,लढ्याला सिद्ध व्हा,' असं म्हटलं होतं. पण ती लढाई पंजाबात झाली होती. आज मात्र ती बंगालच्या रणभूमीत 'बंगभूमीत' खेळली जातेय.  २५० वर्षांपूर्वी प्लासीची लढाई हिंदुस्थानचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरली होती. आता तीच बंगभूमी म्हणजेच बंगालमधील निवडणुका ह्या नव्या लढाईचं, सत्तासंघर्षाचं कारण ठरलंय. प्लासीच्या त्या युद्धात एकेकाळी इथं सिराज उदौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह होते. आताच्या या सत्तासंघर्षाची ही लढाई मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री  यांच्यात आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपेयीं यांच्यात आहे. ममतादीदी आणि नरेंद्र मोदी यांच्यात आहे. फक्त नावं बदललीत. युद्धाचा प्रकार बदललाय. मैदानही तेच आहे अन हे युद्ध देखील त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक असं आहे! पण या युद्धात, निवडणुकीतील यशापयश ठरविणाऱ्या युद्धाचा प्रारंभ झाला होता तो फक्त १५ पैशाच्या sms पासून!

भाजपेयींना आता बंगाल, बंगाली भाषा यावर विशेष प्रेम आल्याचं दिसतंय. प्रधानमंत्री तर बंगालीभाषेतून भाषणाची सुरुवात करताहेत. निर्मला सीतारामन यांनी तर रवींद्रनाथ टागोर, बिरसा मुंडा यांची आठवण काढताहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस कुणाचे यावर लढाई सुरू आहे. बंगाली संवेदनशील असल्यानं त्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळं भाजपेयींवर 'बाहेरचे' म्हणून टीका केली जातेय. स्थानिक आणि बाहेरचे असा वाद इथं उदभवलाय. भाजपेयीं हे नागपूर आणि दिल्लीचे म्हणजेच बाहेरचे आहेत. हा मुद्दा तृणमूल काँग्रेसनं लावून धरलाय. ही भावनिक मुद्दयावरची चाल ५६ इंच छातीपेक्षा परिणामकारक ठरतेय. १० वर्षाची इन्कनबन्सी असताना आम्हीच सत्ता जिंकू असं कसं ममतादीदीं म्हणतेय? एकमेकांचे कट्टर शत्रुत्व निर्माण झालेल्या मोदी आणि ममतादीदी यांच्यात विलक्षण साम्य आढळतं. नरेंद्र मोदी हे सर्वसाधारण कुटुंबातून आले. त्यांचे वडील वडनगर रेल्वेस्थानकावर चहा विकत. तिथं नरेंद्र मोदीही चहा विकत असं सांगितलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ प्रचारक म्हणून भाजपत ते सक्रिय बनले. महामंत्री म्हणून ख्यातकीर्त झाल्यानं त्यांना गुजरातच्या बाहेर जाणं भाग पडलं. पुन्हा त्यांनी आपल्या बळावर सत्तेच्या राजकारणात येऊन देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं. स्वतः निर्माण केलेलं गुजरात मॉडेल देशातील लोकांपुढे ठेऊन प्रधानमंत्री होण्यापर्यंतची त्यांनी मजल मारलीय. तशाचप्रकारे ममतादीदींची पार्श्वभूमी देखील निम्नमध्यमवर्गीय अशीच आहे. वडील स्वातंत्र्यसैनिक होते. पण त्याचं निधन लवकर झाल्यानं  कुटुंबाची सारी जबाबदारी ममतादीदींवर आली. त्यावेळी त्यांनी दूध विकण्याचा व्यवसाय केला. त्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ममतांनी देखील मोदींप्रमाणे आपल्या परिवाराला, नातेवाईकांना आपल्यापासून, लाईटलाईमपासून दूर ठेवलंय. मोदींनी आपल्या पत्नीचा त्याग करून आपलं जीवन राजकारणाला समर्पित केलंय. ममता या देखील आजीवन अविवाहित राहिल्यात. काँग्रेसच्या नेत्या म्हणून त्या डाव्यांच्या विरोधात लढत होत्या. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळं त्यांना दोनदा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. शेवटी कंटाळून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. डाव्यांच्या विरोधात लढून त्या मुख्यमंत्री बनल्या.

मोदी आणि ममतादीदीं यांच्यात खूप गोष्टी साम्य आढळतं. नरेंद्र मोदी जितके जिद्दी समजले जातात तितक्याच ममता बॅनर्जी यादेखील हट्टी असल्याचं दिसून आलंय. मोदी हे त्यांच्या विरोधकांना कधी माफ करत नाहीत. वेळ आली की, त्याचा काटा काढतात. तर ममता या देखील जुनी शत्रूता कायम लक्षांत ठेऊन वागतात. मोदी सत्ता अत्यंत कडक शिस्तीनं राबवतात. तर ममता हाती हंटर घेऊन सत्ता कशी चालवावी हे चांगलंच जाणतात. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पक्षांत पर्याय नाही, किंबहुना तो तयार होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर ते दोघेही आपापल्या प्रांतात खूपच लोकप्रिय आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक असले तरी स्वातंत्र्यानंतरचा इतिहास असा आहे की, बंगालमध्ये कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ अन भाजपेयींना समर्थन मिळालेलं नाही. तिथल्या लोकांनी तिथं त्यांना स्वीकारलंच नाही. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करण्यात माहीर असलेल्या अमित शहा यांनी मुरशिदाबाद, २४ परगणा इथं झालेल्या जातीय दंगलीचा राजकीय फायदा घेण्याची व्यूहरचना आखली होती. ममतांनी देखील भाजपचा अश्वमेघ रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. पण निवडणुकीचे निकाल ममतांच्या काहीसा विरोधात लागला आणि भाजपेयींनी ४२ पैकी १८ जागा जिंकल्या पण भाजपेयींचं हे यश खूप महत्वाचं होतं. जिथं एक तृण देखील हाती लागत नव्हतं तिथं नंदनवन फुलण्यासारखं हे यश असं भाजपेयीं समजतात त्यामुळं त्यांनी इथं लक्ष केंद्रीत केलंय. बंगालमधली ही फलद्रूपता पाहून भाजपेयींनी इथं गेली साडेचार वर्षे सतत आक्रमकता कायम ठेवलीय. त्यामुळं मोदी आणि ममता यांच्यातील वैमनस्य याकाळात  आणखीनच वाढीला लागलं.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...