Saturday 3 April 2021

पवार-शहांची 'प्रफुल्ल' भेट...!

"राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड या मंत्र्यांचा राजीनामा, पाठोपाठ सचिन वाझेंचं प्रकरण उदभवलं. महाविकास आघाडी सरकार सैरभैर झालं. परमबीरसिंग यांच्या गृहमंत्र्यावरच्या आरोपानं तर अस्वस्थ बनलं. तीनही पक्ष एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. अशाप्रकारे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद इथं झालेल्या गुप्त भेटीनं शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या. केवळ राजकीय विरोधकच नव्हे तर राजकीय शत्रू असलेल्या भाजप नेत्यांची भेट पवार घेताहेत यावरून राज्यातल्या सत्तेला धोका निर्माण होतो आहे की काय अशी शंका व्यक्त केली गेली. कारण या भेटीबाबत अमित शहा संधिग्ध उत्तर देतात तर पवार याबाबत मौन बाळगून राहतात त्यावेळी ही शंका अधिकच बळावते. पवारांच्या आजवर वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्याबद्धल जो अविश्वास निर्माण झालाय त्याला बळकटी मिळते. आज पवार रुग्णालयात आहेत. ते जेव्हा सार्वजनिक जीवनात परततील आणि पत्रकारांना सामोरं जातील तेव्हा त्यांच्या या भेटीबद्धलचं मळभ दूर होईल आणि सहकारी पक्षांच्या मनातला संशय दूर होईल!"
-----------------------------------------------------------------


'सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात...!' असं सूचक आणि संधिग्ध वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद इथं गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक 'दिव्य भास्कर' या गुजराती दैनिकानं प्रकाशित केली होती. अहमदाबादमधील उद्योगपती अदानी यांच्या शांतिग्राम फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीचे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, या गुजराती दैनिकात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी आलीय. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कथित भेटी मागचा नेमका अर्थ आणि हेतू काय हे पाहू या! बंगालच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात व्यस्त असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा अहमदाबाद इथं येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मध्यरात्री भेट घेतात. यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे अशी शंका व्यक्त होतेय. या भेटीचं वृत्त गुजराती वृत्तपत्रात छापून आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र अशी भेट झाल्याचं नाकारलंय. मात्र अमित शहांनी या वृत्ताचा इन्कार केलेला नाही. 'सगळ्या राजकीय गोष्टी सार्वजनिक चर्चेसाठी नसतात' असं सूचक आणि संधिग्ध वक्तव्य अमित शहा यांनी केलंय. त्यामुळं या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व पक्षाचे राजकीय नेते सतत एकमेकांना भेटत असतात, त्यात गैर असं काही नाही. त्यात लपविण्यासारखं काही नसतं त्यावेळी ते उघड भेटतात. पण ज्या भेटी उघड होऊ नये असं वाटत असतं तेव्हा लपून-छपून गुप्तपणे भेटतात. अहमदाबाद इथं झालेली ही भेट याच प्रकारची म्हणायला हवीय! शरद पवार आणि अमित शहा यांच्या या कथित बैठकीला महत्त्व प्राप्त होतंय, कारण २०१४ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देऊ केला होता. हा इतिहास विसरता येत नाही.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीची निर्मिती होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर चर्चा करत होती. त्याचवेळी दुसरीकडं भाजपबरोबरही त्यांची चर्चा सुरू होती. अजित पवारांचा गट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करत होता. ही चर्चा शरद पवार यांच्या आशिर्वादानं होत होती की नाही यासंदर्भात वेगवेगळ्या थिअरीज मांडण्यात आल्या. फडणवीस यांनी राजू परुळेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती, सत्तावाटपबाबत चर्चा झाली होती मात्र गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला हवं होतं ते द्यायला भाजपनं नकार दिल्यानं बोलणी फिसकटली. भाजपच्या अनेक दिग्गजांनी असं सांगितलं होतं की २०१९ मध्ये सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देऊन शरद पवारांनी भाजपला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी नको होते एवढ्या एकाच अटीवर ही बोलणी फिस्कटली. समजा, फडणवीसांना वगळून जर इतर कुणाला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्या सरकारला पाठिंबा देईल. आता हे सगळं घडेल का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. असं असलं तरीही हा प्रश्न उतरतोच शरद पवार जे करू शकत नाहीत असं वाटतं तसंच ते का करतात? वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांच्याबाबत अशी शक्यता का वर्तवली जाते? पण एक नक्की की राष्ट्रवादीचा एक गट त्यावेळी भाजपबरोबर चर्चा करत होता. ही पार्श्वभूमी पाहता, शरद पवारांची गोपनीय बैठक अमित शहांबरोबर होत असेल तर त्याला राजकीय महत्त्व आहे. या बैठकीच्या बातमीमुळं नक्कीच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काँग्रेसचे अनेक नेते शरद पवारांकडे संशयाने बघत होते. आता ते अधिक संशयाने बघतील. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून त्याच्या स्थिरतेबद्धल प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. कथित पवार-शहा बैठकीच्या बातमीनंतर शिवसेना आणि काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडं अधिक संशयाने पाहू लागतील. नेमकी ही बातमी छापून आली त्याचवेळी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात संजय राऊत यांच्या सदरातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीमधलं अंतर वाढतंय. त्यांचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडं ही भेट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार या भेटीबद्धल काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार खासगी जेट विमानानं मुंबईहून अहमदाबादला आले होते. त्यानंतर उद्योगपती अदानी यांच्या शांतिग्राममधील गेस्ट हाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आलाय.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आता ढवळून निघालंय. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आलीय. एटीएस, एनआयए करत असलेल्या तपासात या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळतेय. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीरसिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईतल्या बार, डान्सबार यांच्याकडून शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचा आरोप आयुक्तांनी केलाय. महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केलं होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्यानं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. पवारांनी मोदी यांना बारामती इथे कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. मात्र शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं पहिल्यांदाच चर्चेत येतं आहे. शरद पवार व अमित शाह यांच्यात अहमदाबाद इथं भेट झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटीचं खंडन करण्यात आलं असलं तरी, भाजपकडून ही भेट झाली असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. या भेटीनंतर राजकीय समीकरणे बदलतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून द्यायला सुरुवात झाली आहे. मात्र, या कथित भेटीच्या चर्चेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगालमध्येही राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

या भेटीचे अनेक राजकीय कंगोरे काढले जात आहेत. खास करून या कथित भेटीच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ आहे. भारतीय जनता पक्षाकडून शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याचे थेट कोणीही नाकारत नाही. तिथेच या भेटीमुळे येत्या काळात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतील, असे संकेत देखील काही भाजप नेत्यांकडून देण्यात आली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर, थेट दिल्लीचे पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील, त्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, असे म्हटले आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांनी "आगे-आगे देखो होता है क्या", असे म्हणत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युती येणाऱ्या काळात पाहायला मिळेल असेच जणू संकेत त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोणतीच भेट गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाली नाही. केवळ अमित शाह व शरद पवार यांची कथीत भेट झाली असल्याचे चित्र तयार करून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उद्योगपती अडाणी यांच्या घरी असलेला लग्नसोहळ्याला जाणार होते. मात्र, रविवारी २८ मार्च असलेल्या या लग्नसोहळ्यात शरद पवारांना जाता येणार नसल्याने ते एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी २७ मार्च अहमदाबादमध्ये गेले होते. मात्र, तेव्हाही शरद पवार व अमित शाह यांची भेट झाली नाही. कारण, अमित शाह हे २७ मार्चला गुजरातमध्ये नव्हते, तर शरद पवार हे २७ मार्चच्या सायंकाळी अहमदाबादमधून निघाले होते. त्यामुळे ही भेट झाली का? यावर शंका उपस्थित केली जातेय. पण भेटीची जी वेळ सांगितली जातेय ती मध्यरात्रीची असल्यानं त्यावेळी शहा हे अहमदाबाद इथं होते. हे लक्षात घ्यायला हवं!

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झालीच नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या भेटीच्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जातात, असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भेटीचा चर्चेनंतर शिवसेना काही गोंधळात असलेली पाहायला मिळाली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होताच शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली असेल तर, त्यात नवल नाही. हे दोन्ही नेते देशातील मोठे नेते असून वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या भेटी होत असतील तर त्यामध्ये गैर काय? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आधी केला. मात्र, काहीवेळा नंतरच अमित शाह आणि शरद पवार यांची गुजरातमध्ये भेट झालीच नाही, अशा प्रकारचे ट्विट करून या भेटीच्या वृत्ताचा खंडन त्यांनी केलं. तर तिथेच महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी देखील या भेटीचे वृत्त खोटे असून अशा प्रकारची कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पहिल्या-दुसऱ्या चरणात मतदान झाले असून अजून सहा चरणाचे मतदान बाकी आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार हे एक एप्रिलला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. एक एप्रिल ते तीन एप्रिल असे तीन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून ममता बॅनर्जी यांसह तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांसाठी ते सभा तसेच रोड शो करणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे सध्या हा दौरा जवळजवळ रद्दच झाला असल्याचे राष्ट्रवादीतील सुत्रांकडून सांगण्यात येतेय. शरद पवार सारखे नेते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी गेले तर, याचा कुठे ना कुठे फटका भाजपला नक्कीच बसला असता. पण, खुद्द शरद पवार जर अमित शाह यांची भेट घेतात अशा प्रकारचे चित्र जर भाजपाकडून तयार करण्यात आले तर याचा नक्कीच फायदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला होऊ शकतो हे देखील भाजपला माहित आहे. त्यामुळे अमित शाह आणि शरद पवार यांची गुजरातमध्ये भेट झाली आहे असं चित्र भाजपकडून रंगवण्यात येत आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी देशातल्या साऱ्या विरोधी पक्षाला पत्र पाठवून एकत्र येण्याचं आवाहन केलंय. त्याचवेळी देशातले एक वरिष्ठ विरोधीपक्षनेते शरद पवार भाजपच्या अमित शहांची भेट घेतात. हे त्यांच्याबद्धलच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे!

अनेकदा अनेक प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरीतच राहतात. २०१९ मध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोनिया गांधींची मनधरणी केली जात होती. त्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याशिवाय शक्य नव्हता. मात्र ही बाबही तेवढीच खरी आहे की त्याचवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपबरोबरही चर्चा सुरू होती. हे तेव्हा बाहेर आलं जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे शपथविधी झाला. हे सरकार ७२ तासांचं ठरलं यात शंका नाही मात्र यामुळे राष्ट्रवादीला हे मान्य करावं लागलं की भाजपसोबत चर्चा झाली होती. पहाटेचा शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तो दिवस उजाडण्याच्या एक दिवस आधीपर्यंत तेच नवाब मलिक हे सांगत होते की आम्ही भाजपसोबत कोणतीही चर्चा नाही. चंद्रकांत पाटील यांनीही त्यावेळी हे सांगितलं नव्हतं की अशी काही चर्चा झाली आहे. या कथित बैठकीची बातमी मात्र एका दिवसातच बाहेर आली. याचा अर्थ आपल्यासोबत असलेल्या पक्षांना गर्भित इशारा देण्यासाठी तर नव्हता ना? की अजूनही काहीही होऊ शकतं. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. मात्र शरद पवार हा राजीनामा घ्यायला तयार नाहीत त्या पार्श्वभूमीवर जी बातमी समोर आली आहे ती काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांचं टेन्शन वाढवणारी आहे. अर्थात यापूर्वी जेव्हा जेव्हा सत्तास्थापनेची वेळ आली आहे तेव्हा शरद पवारांनी काँग्रेस हाच पर्याय निवडला आहे. गांधी परिवारासोबत मतभेद असले तरीही शरद पवारांनी काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण केलं आहे. २०१९ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांनी राजकारणाचं केंद्र स्वतःभोवती ठेवलं. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा वेगळा प्रयोग त्यांनी करून दाखवला. आता त्यांनी वयाच्या ज्या काळात करिअरच्या संधीकाळात जातात त्यावेळेस हा प्रयोग यशस्वी करून पवारांनी स्वतःच्या करिअरला नवी उभारी दिली आहे. अशा परिस्थितीत भाजपसोबत जाऊन आत्तापर्यंत ते जे करू शकतील अशी शंका उपस्थित करणाऱ्यांचा त्यांच्यावरील आक्षेप हे ते आपल्या कृतीने खरा साबित करतील का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...