Saturday 30 January 2021

झाकोळलेली शताब्दी...!

डॉ. आंबेडकर यांनी बहिष्कृत, अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी चालवलेल्या 'मूकनायक' पाक्षिकाची शताब्दी आज रविवारी ३१ जानेवारीला संपन्न होतेय. तर प्रबोधनकार ठाकरे यांच्या 'प्रबोधन' पाक्षिकाची शताब्दी १६ ऑक्टोबरपासून सुरू आहे. पण शासनस्तरावर मात्र या दोन्ही समाजसुधारकांच्या या नियतकालिकांबाबत अनास्था दिसून आली. कोरोनाचा काळ हे कारण दाखवलं जात असलं तरी मूकनायक आणि प्रबोधनाचा जागर करणं सहज शक्य होतं. शासनाला शक्य नव्हतं तर असा जागर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मागे उभं राहणं कर्तव्य होतं पण तेही फारसं झालं नाही. त्यामुळं शताब्दी साजरी करणारे मूकनायक आणि प्रबोधन ह्या दोन्ही नियतकालिकांचा जागर झाकोळला गेला. डॉ.बाबासाहेबांच्या आणि प्रबोधनकारांच्या अनुयायांनी त्यांच्या क्षमतेने तो जागर केलाय. हे इथं नोंदवावं लागेल! सुरवातीला अभिजनांच्या वाड्यामधे कोंडलेली मराठी पत्रकारिता संघर्ष करत चालत चालत बहुजनांच्या उंबरठ्यावर आली आणि पुढे दलितांच्या वस्तीत गेली. हीनबंधू, जागरूक, जागृती, विजयी मराठा कैवारी, हीतमित्र, प्रबोधन, मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशी खऱ्या अर्थानं बहरली, फुलली आणि आधुनिक महाराष्ट्राला दिशादर्शक ठरली. या सर्वांमध्ये 'मूकनायक' आणि ‘प्रबोधन’ची भूमिका आणि वेगळेपण विशेष उठून दिसते"
--------------------------------------------------------
डॉ.आंबेडकर हे जसे समाजसुधारक होते तसेच ते 'सव्यसाची पत्रकार' होते. डॉ. आंबेडकर यांचा जन्म १८९१ चा आणि त्यांचं महानिर्वाण १९५६ चं! ६५ वर्षाचं आयुष्य बाबासाहेबांना लाभलं. डॉ.आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना करून भारतीय समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला. यापूर्वीचा कालखंड बाबासाहेबांच्या विद्यार्थीदशेचा होता. डॉ.आंबेडकर यांचा पत्रकारितेचा प्रवास ‘मूकनायक’पासून सुरू झाला. नंतर बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारतपर्यंत तो सुरूच राहिला. आंबेडकर यांच्या पूर्वी दलितांचा कैवार घेणारी १९८८ मधलं विटाळ विध्वंसक, १९०९ मधलं सोमवंशीय मित्र अशी नियतकालिकं, पाक्षिकं होती. पण बाबासाहेब यांनाही सामाजिक-राजकीय ध्येयवादासाठी हातात वृत्तपत्र असावं असं वाटत होतं; त्यामुळंच ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केलं होतं. पण त्याचं सातत्य त्यांना टिकवता आलं नाही. या अंकातच, ‘अस्पृश्यांवर होणा-या अन्यायावर उपाय सुचविण्यासाठी आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी वर्तमानपत्रासारखी भूमी नाही’ अशी भू्मिका त्यांनी मांडली. त्यानंतर ३ एप्रिल १९२७ रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक काढलं. हे पाक्षिक चालवताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पाक्षिक बंद करण्यात आलं. दोन वर्षात या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक प्रकाशित झाले. ‘बहिष्कृत भारत’मधून डॉ.आंबेडकर यांनी १४५ स्फुटलेख व ३३ अग्रलेख लिहिले. ही सर्वच लेखनसंपदा मराठी भाषेचं भूषण आहे. पत्रकार डॉ.आंबेडकर यांची 'पत्रकार' म्हणून ओळख निर्माण करण्यास ‘बहिष्कृत भारत’ची भूमिका इथं महत्त्वाची आहे. तशीच श्रेष्ठकोटीचा निबंधकार, भाष्यकार, तत्त्वचिंतक, मानवतावादी विचारवंत, द्रष्टा असे अनेक पैलू त्यांच्या या पाक्षिकातील लिखाणातून अधोरेखित होत जातात. एका माणसाच्या ठायी आर्थिक, सामाजिक, राजकीय, पाश्चिमात्य तत्त्वज्ञान यांना कवेत घेणारा आवाका त्यांचा होता. असं असतानाच जातीयवादाविषयी प्रचंड चीड त्यांना होती. तत्कालीन पांढरपेशांची वृत्तपत्रे त्यांच्याच समांतर चालणा-या दलित वृत्तपत्रसृष्टीची दखल घेत नाहीत. किंबहुना दलितांविषयींचे विषय या वृत्तपत्रांत त्यांना वर्ज असतात. हे ओळखूनच आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ यातून आपल्या आवेशी, सत्यान्वेषी मांडणीतून दलितांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम नेटानं केलेलं आहे. आंबेडकर यांचे शिक्षण इंग्रजीतून झालंय. त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं. आयुष्यातील उमेदीची वर्षे शिक्षणासाठी परदेशात घालवण्यामुळं त्यांचा मराठीशी तितकासा संबंध नव्हता, पण दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी पत्रव्यवसायाची कास धरली. त्यांची मराठी ही साजूक तुपातली नव्हती, पण मांडणीतील आग्रहीपणा, युक्तिवाद, ओजस्वीपणा वाखाणण्याजोगा होता. ज्यांच्यासाठी म्हणून हे पत्र चालवण्यात येत आहे. त्यांना ती भाषा कळावी यासाठी ते सुबोध पद्धतीनं आपला विचार मांडण्याचा प्रयत्न करीत. ‘बहिष्कृत भारत’सह त्यांचे अन्य पाक्षिकांतले अग्रलेख वाचल्यास याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. डॉ.आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीला ख-या अर्थानं प्रारंभ झाला तो महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनातून! मानवमुक्ती, समानतेसाठी लढविल्या गेलेल्या या आंदोलनात आपल्या पक्षाची बाजू अधिक ठामपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी ‘बहिष्कृत भारत’मधून केलाय. आपला समतेसाठीचा लढा किती योग्य आहे, हे मांडताना त्यांनी अतिशय संयत भू्मिका घेतली होती. ‘बहिष्कृत भारत’मधील त्यांचे लेख, स्फुटलेख हे तत्त्वचिंतनाची डूब असणारं, नवा विचार मांडणारं, मानवतेचा पुरस्कार करणारं, स्त्री-पुरुष भेदापलीकडं समानतेच्या दृष्टीनं पाहण्यासाठी उद्युक्त करतात. रोटी, बेटी आणि लोटीबंदी यांच्या तटबंद्या तुटल्याशिवाय समानता अशक्य आहे, असा प्रागतिक विचारही ते मांडतात. डॉ.आंबेडकर यांचा पत्रकार हा पैलू आताशा बाहेर येत आहे. या पैलूंवर विविध कोनांतून लिखाण झाल्यास आंबेडकर यांच्यातील 'सव्यसाची पत्रकार' अधिक झळाळून उठेल
*बहुआयामी प्रबोधनकारांचे घणाघाती लेखन*
कट्टर सुधारणावादी, अस्सल सत्यशोधक, परखड वक्ते, सामाजिक समस्यांचा निर्भीडपणे पंचनामा करणारे साहित्यकार, पत्रकार, इतिहासकार, नाटककार, चरित्रकार, चित्रकार, संगीतकार, सतारवादक, नट ! अस्पृश्यता आणि अंधश्रद्धांवर कठोर प्रहार करणारे, देव-वेद प्रामाण्य झुगारणारे, भट- भिक्षुकशाही नाकारणारे, दैव-ज्योतिष झिडकारणारे, धर्म चिकित्सक ! संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील बिनीचे सेनानी, 'ऊठ मराठ्या ऊठ'ची हाक देत 'शिवसेना'चं बारसं करणारे! माणूस एक, ओळख अशा अनेक! तरीही या विविध ओळखींची ओळख एकच- 'प्रबोधनकार'! ही त्यांना कुणी दिलेली पदवी नाही ; तर ती जनताजनार्दनाची बौद्धिक मशागत करीत कमावलेली अमीट ओळख आहे. ही ओळख आता १००व्या वर्षात वाटचाल करतेय. प्रबोधनकारांना नव्वद वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५; तर निधन २० नोव्हेंबर १९७३ला झालं आजकालच्या आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांत वय वर्षं नव्वद हे दीर्घायुष्य राहिलेलं नाही. प्रबोधनकारांचा काळ सर्वच दृष्टीने अवघड होता. आर्थिक ओढाताण, स्थलांतरं, आजारपण, अपत्य वियोग, सनातन्यांनी केलेली अवहेलना, तत्त्वासाठी तुटलेले मैत्रीसंबंध यांसारखे अनंत घाव सोसत प्रबोधनकारांनी वयाची नव्वदी गाठली. तिथंवरचा प्रवास 'माझी जीवनगाथा'त शब्दबद्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर  त्यांनी वयाच्या पस्तिशीत 'प्रबोधन' हे पाक्षिक जे दर १५ दिवसांनी प्रकाशित होतं ते सुरू केलं. 'प्रबोधन'चा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ रोजी प्रकाशित झाला. त्यानंतर अनेक अडचणींशी सामना करीत १९३० पर्यंत प्रकाशित होणाऱ्या या पाक्षिकानं केशव सीताराम ठाकरे हे ‘प्रबोधनकार’ झाले. या ओळखीचे यंदाच्या १६ ऑक्टोबरपासून शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. महात्मा फुले यांच्या विचारानं वाढ-विस्तार झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचं थेट समर्थन करणाऱ्या या ग्रंथात के.सी.ठाकरे यांची लेखणी मुळावर घाव घालणारी वज्रमूठ झाली आहे. ते लिहितात, ‘त्या ब्राह्मणेतर चळवळीच्या पुरस्कर्त्यांवर नानाप्रकारचे गलिच्छ आरोप करून, त्यांची भ्रूणहत्या करण्यासाठी भटी कंबर कसल्या आहेत. एरवी, वाटेल त्या बऱ्या-वाईट गोष्टींचं बेळगावी लोणी पुणेरी तत्त्वज्ञानाच्या कढईत उकळवून, त्यातून निश्चित प्रमेयाचे राष्ट्रीय तूप काढणाऱ्या बृहस्पतींना, या ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीच्या शक्तीचा अंदाज येऊ नये; यात शुद्ध ढोंगापेक्षा आणखी दुसरा कोणताही मुद्दा नाही. न्यायाच्या मंदिरात बचावाच्या पुराव्याचे भांडे चाटून पुसून झाले म्हणजे अट्टल आरोपी जसा डोके बिघडल्याचे किंवा स्मृतिभ्रंश झाल्याचे ढोंग करतो, त्याच मासल्याचा हा ढोंगीपणा आहे. परंतु ढोंगाचे सोंग आणले म्हणून न्यायदेवता ज्याप्रमाणे खुनी इसमाला बेधडक फासावर लटकवल्याखेरीज सोडत नाही. त्याप्रमाणे ब्राह्मण- ब्राह्मणेतर चळवळीबद्दल गाढ अज्ञान दाखवणाऱ्या शहाण्यासुर्त्या ढोंगी बृहस्पतींना अखेर त्या चळवळीच्या प्रलयाग्नीत भस्मसात व्हावं लागेल! ही धमकी नव्हे, हे सत्य सत्त्व आहे. ही कादंबरीची गप्प नव्हे, ही इतिहासाची साक्ष आहे. ही पुणेरी हस्तदंती नव्हे, आत्मविश्वासाच्या तडफेची ही सडेतोड निर्भीड जबानी आहे. अज्ञानी लोकांना पाप-पुण्याच्या जरबेखाली गुलामापेक्षा गुलाम बनवणाऱ्या भिक्षुकशाहीचा हा बहुरूपी आडपडदा नव्हे! दीन दुनियेला गुलामगिरीतून वर खेचून काढण्यासाठी तळतळणाऱ्या हृदयाच्या कळकळीने अस्तन्या वर सारून भिक्षुकशाहीला चारी मुंड्या चीत करणाऱ्या क्षत्रियांचा हा इतिहासप्रसिद्ध कोदण्डाचा टणत्कार आहे.’ प्रबोधनकारांच्या या टणत्काराची आवश्यकता आजही प्रभावी आणि परिणामकारी ठरावी, इतकी भिक्षुकशाही आणि त्याच्या रखवालदारांची वळवळ सत्ताबळानं वाढली आहे.
*सामाजिक विषमतावादावर प्रहार*
सामाजिक, वैचारिक जाणिवेनं ओतप्रोत असलेले त्यांचे अग्रलेख केवळ सम्यक क्रांतीची दिशाच नव्हे, तर माणसाला प्रतिष्ठा, सन्मान बहाल करण्याचं काम करतात. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी प्रभावीपणे केलं. शिक्षण विचारही त्यात अंतर्भूत होता. यासंदर्भात बाबासाहेब म्हणतात, की मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं, शक्‍य तितक्‍या लवकर सुरू व्हावं. डॉ. आंबेडकरांनी सनातनी धर्म, जातीव्यवस्थेला ठोस युक्तिवाद आणि बिनतोड प्रतिपादन यांनी हादरे दिले. जातिधर्माच्या विषमतावादी धोरणावर त्यांनी प्रहार केला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रीय भाषा आणि ग्रंथलेखनाची भाषा वेगळी आहे. वृत्तपत्रीय मराठी भाषा उपरोधिक आहे. त्यात दृढनिश्‍चयी प्रतिपादन आहे. ही भाषा अलंकृत असली तरी बोजड नाही. त्यात वाक्‌प्रचार, म्हणी, दृष्टांत, सुविचार अशा विविधरंगी मराठी भाषेचा प्रयोग करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पाक्षिक, वृत्तपत्रातील मराठी भाषा समृद्ध होती, यात शंका नाही.  ‘मूकनायक’मधील लेखांची भाषा सहज, सोपी होती. ती जनसामान्यांची भाषा होती. दंभस्फोट करणारी ही भाषा समाजाला दिशादर्शक होती. त्यामुळेच जनसामान्यांचं परिवर्तन करता आलं. पौराणिक दाखले देत त्यातील कथांचा वापर करताना खरं-खोटं तपासून पाहिल्याशिवाय सांगत नव्हते. अशा या मराठी-इंग्रजी वैभवशाली संपन्नतेची साक्ष बाबासाहेबांनी आपल्या लिखाणात अधोरेखित केली आहे. ‘मूकनायक’ पाक्षिकातील पत्रव्यवहारही वाचनीय असे. वर्तमानातील घडामोडींवर भाष्य करणारं लिखाण त्यात प्रसिद्ध होत असे. ‘मूकनायक’मुळे त्यावेळच्या अस्पृश्‍य, बहिष्कृत समाजाला नवी उमेद मिळाली, त्यांना झळाळी आली. त्या मूकनायक पत्रकारितेची आजच्या पत्रकारितेशी तुलना करताना मन अगदी खिन्न होतं. "एक जात म्हणजे एक मजला असून या मजल्याला शिडी नाही. गुणवान असूनही खालच्या मजल्यावरील व्यक्तीला वरच्या मजल्यावर प्रवेश नाही आणि अपात्र असूनही वरच्या मजल्यावरील व्यक्तीला खालच्या मजल्यात ढकलण्याची कुणाची हिंमत नाही......, असं सामाजिक आकलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 'मुकनायक' च्या पहिल्या अग्रलेखात मांडलं होतं. तेव्हा ब्राह्मणेतर वृत्तपत्रं असली तरी त्यात दलितांच्या प्रश्नांना फारसं स्थान नव्हतं. ही खंत असल्यानं बाबासाहेबांनी 'मूकनायक' सुरू केलं. आजच्या पत्रकारितेतही दलित-वंचितांना फारसं स्थान नसल्याची अपराधी भावना आहे. पीडितांच्या चेहऱ्यावरील एक रेषाही बदलण्याचा प्रयत्न तळातही दिसत नाही.
*प्रबोधनकारांचे विचार आजही परिणामकारक*
प्रबोधनकारांच्या तडफेनंच 'सत्यशोधक पत्रकार' म्हणून मुकुंदराव पाटील, खंडेराव बागल, श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जवळकर, भगवंतराव पाळेकर, शामराव देसाई यांनी पत्रकारिता केली. पण त्यांच्या कार्याची 'नाही चिरा, नाही पणती' अशी स्थिती आहे. या साऱ्यानीच मानसिक, सामाजिक विकासाला अडसर ठरणाऱ्या देव-धर्माच्या, रूढी- परंपरेच्या खुळचट बेड्या तोडण्यासाठी या पत्रकारांनी प्राणाची बाजी लावली. त्यासाठी अनंत यातना सोसल्या. त्याची चांगली फळं पुढच्या पिढीला तरी मिळतील,अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही. ह्याचं कारण 'प्रबोधन'कार सांगतात, ‘गेल्या चार-पाचशे वर्षांचा खुद्द महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर समाजाचा सामाजिक इतिहास किंचित लक्षपूर्वक पाहिला तर, सारासार विचार करून आपले नैतिक बळ वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी, 'ज्याची त्याची उडी स्वतःचे नाक कापून दुसऱ्यास अपशकून करणाऱ्या ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याची नक्कल करण्याकडे फार! ब्राह्मण अर्थशून्य मंत्रजागराचा कोलाहल करू लागले की, केली यांनी सुरुवात तसल्याच अर्थशून्य शंखध्वनीला!’ प्रबोधनकारांनी केलेलं हे सामाजिक विश्लेषण कुणाच्या द्वेषापोटी केलेलं नाही. जे आहे, ते सांगितलं. ते समजून घेण्याऐवजी प्रबोधनकारांच्या जयंती-मयंतीला त्यांचा पुतळा आपल्याच झेंड्यांनी झाकण्याची स्पर्धा प्रबोधनकारांच्या वारसदारांच्या सेनांमध्ये लागते. आपलं ध्येय स्पष्ट करताना 'प्रबोधन'कार लिहितात, ‘'प्रबोधन' जितका कट्टा नवमतवादी आहे ; तितकाच तो पक्का स्वराज्यवादीही आहे. जितका राष्ट्रीय वैभवाचा महत्त्वाकांक्षी आहे ; तितकाच तो सामाजिक व धार्मिक गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांचा कट्टा द्वेष्टा आहे. महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या कोणत्याही पक्षाचा प्रबोधन सांप्रदायिक नाही ; अथवा त्यांच्या मतांचा मिंधा गुलाम नाही. 'प्रबोधन' सत्याचा भोक्ता आहे. जेथे जेथे सत्य दिसेल, तेथे तेथे 'प्रबोधन'चा माथा अत्यंत उमाळ्याने सर्वांच्या आधी विनम्र होईल.’' यातील प्रत्येक शब्दाशी 'प्रबोधन'कार आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. म्हणूनच 'प्रबोधन'च्या सोट्यासारख्या चालणार्या लेखणीच्या तडाख्यातून विचारस्नेही राजर्षि शाहूदेखील सुटले नाहीत. 'प्रबोधन'कारांनी महात्मा फुले यांचा विचार आणि शाहूराजांचा स्नेह भरभरून आपलासा केला होता. प्रबोधनकारांचे विचार हे मानसिक प्रगतीला चालना देणारे आहेत. प्रत्येक तरुण पिढीला मार्गदर्शक आहेत. प्रत्येक गोष्टीचा विचार कसा करावा आणि आपण स्वयंसिद्ध कसं व्हावं, याचं आत्मबळ देणारे आहेत. अत्याधुनिक विज्ञानाचं प्रतीक असलेला 'कॉम्प्युटर' वापरण्याचा प्रारंभही फुलं वाहून, नारळ वाढवून करणाऱ्या आजच्या तरुणांना तर प्रबोधनकारांच्या विचारांची नितांत गरज आहे. प्रबोधनकारांचे ९०-१०० वर्षांपूर्वीचे विचार आजही आवश्यक वाटावेत; ही अभिमानाने सांगण्यासारखी बाब नाही. तथापि, स्वतःला हायफाय, सुधारणावादी, कट्टर धर्म-राष्ट्रवादी म्हणवणाऱ्यांनी आपल्या भूमिकेचा कस पाहण्यासाठी प्रबोधनकारांचे विचार आवश्यक वाचावेत.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...