Sunday 10 January 2021

संक्रात: देवाचा दिवस

"आगामी काळ हा ज्ञानाधिष्ठित विज्ञानाचा असणार आहे. माणसाची जात, धर्म त्याचं ज्ञान ठरवणार, पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडतंय, याचा अनुभव येतोय. भावनेचं विज्ञान असतं. त्यानुसार त्या फुलविता, विझविता, आणि वांझोट्याही ठेवता येतात. भावनेचं विज्ञान असतं, मात्र विज्ञानाला भावना नसते. विज्ञान ज्याला कळतं ते त्याचं होतं. त्यासाठी ज्ञान हवं, बुद्धीची चमक हवी. ती भावनेच्या वरचढ हवी. अशा दृष्टीनं पाहिलं की लक्षांत येतं. सध्या खूप अंधार आहे. धर्म, जात, संस्कृतीच्या अहंकारी अस्मितांना, देवभक्तीच्या भाबड्या भावनांना आपण नव्या सहस्रकात घेऊन गेल्यानं ते अधिक गडद होताहेत."
--------------------------------------

ही संक्रात प्रत्येकवर्षी १४ जानेवारीलाच येते. विज्ञान आणि धार्मिकता यांचा अजोड संयोग! संक्रातीचं वर्णन प्रत्येकजण आपल्या सोयीनं करतो. ती कशी आहे, कशावर स्वार होऊन येते आहे याची वर्णनं ज्योतिषशास्त्री नेहमीप्रमाणे करताहेत. त्यानुसार उद्याची दुनिया कशी असेल, याबाबतही भाकीत केलं जातंय. उद्याच्या दुनियेची कल्पना आजकालच्या दुनियेवरून करता येईल. आजची दुनिया ओरडणाऱ्यांच्या भूलथापांना फसलेल्या रडणाऱ्यांची आहे. कालची दुनिया यापेक्षा भिन्न नव्हती. भविष्याची वाट भूतकाळातूनच निर्माण होते. हा निसर्गनियम मानायचा, तर उद्याचा दुनियेचं चित्र रंगविण्यासाठी कल्पनाशक्ती शिणवायची आवश्यकता नाही. माणसाला नव्याची आस असावी, पण त्यासाठी सत्याचा घास घेण्याची बदमाशी नसावी. काळ हा नेहमीच दुटप्पी असतो, त्यावर स्वार झालात, तर तो तुम्हाला आपल्यालाही पुढे नेणार. त्याच्याकडे पाहात राहाल, तर मात्र तो तुमचा काळ होणार. गेल्यावर्षीच्या कालखंडावर कुणी, कसा आपला ठसा उमटविला, याची भारंभार चर्चा वाचायला, ऐकायला मिळेल. आगामी काळ हा ज्ञानाधिष्ठित विज्ञानाचा असणार आहे. माणसाची जात, धर्म त्याचं ज्ञान ठरवणार, पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडतंय, याचा अनुभव येतोय. भावनेचं विज्ञान असतं. त्यानुसार त्या फुलविता, विझविता, आणि वांझोट्याही ठेवता येतात. भावनेचं विज्ञान असतं, मात्र विज्ञानाला भावना नसते. विज्ञान ज्याला कळतं ते त्याचं होतं. त्यासाठी ज्ञान हवं, बुद्धीची चमक हवी. ती भावनेच्या वरचढ हवी. अशा दृष्टीनं पाहिलं की लक्षांत येतं. सध्या खूप अंधार आहे. धर्म, जात, संस्कृतीच्या अहंकारी अस्मितांना, देवभक्तीच्या भाबड्या भावनांना आपण नव्या सहस्रकात घेऊन गेल्यानं ते अधिक गडद होताहेत. हे सोयीस्कररित्या विसरलं जातेय की, भारताच्या उभारणीत अनेकांचा, असंख्याकाचा ध्येय-ध्यास कारणी लागतोय. कित्येकांनी त्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केलाय. रक्त सांडलंय, परंतु अशा असंख्याच्या त्यागामागच्या, कार्यक्रमागच्या ध्येयाला मर्यादा होत्या. काहींसाठी त्या काळच्या होत्या, तर काहींसाठी त्या विचारदृष्टीच्या होत्या अशा मर्यादा छत्रपतींच्या, महात्माजींच्या आणि आंबेडकरांच्या ध्येयकार्याला नव्हत्या. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता हे या त्रिमूर्तींचे ध्येय होते. ते दृष्टीपथात नसताना त्यांनी जाहीर केलं होतं आणि हयातीत आपली ध्येयपूर्ती केली. भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीचं सार या त्रिमूर्तींच्या ध्येयवादात होतं म्हणूनच ती राष्ट्रउभारणी घडवणारी राष्ट्रसुत्रे झाली. ही सूत्रे आणि त्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेली झुंज केवळ गतकाळातच नाही, तर यापुढच्या काळातही जेव्हा जेव्हा माणव्य रक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी ढाल-तलवार बनणारी आहे.

स्वराज्य, स्वातंत्र्य, समता या तीन तत्वांची गुंफण झाल्याशिवाय लोकशाहीची पूर्तता होत नाही. स्वराज्यात स्वातंत्र्य हवं, स्वातंत्र्यात समता हवी, अन समतेचं स्वराज्य हवं. स्वराज्य, स्वातंत्र्य, आणि समता या तत्वांची थोरवी जशी परस्परांवर अवलंबून आहे. तसंच शिवाजीमहाराज, महात्मा गांधी, आणि डॉ. आंबेडकर यांचं अमीट ऐतिहासिक कार्यही परस्परांच्या जीवनकार्यावर आधारलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात हेच विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून भजलं, पुजलं जातं. ते गैर आहे. या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या-मयंत्याच्या वेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा लागतो. ही सर्वच भारतीयांसाठी शरमेची गोष्ट आहे. जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या फाजील अहंकारामुळे या शरमिंद्या करणाऱ्या गोष्टी अजूनही अस्मिता जागविणाऱ्या वाटतात. मुंजीपासून मयतापर्यंतची कर्मकांडही संस्कृतीची प्रसादचिन्हं ठरतात. दिवसभर अशुभ व्यवहार करून सांजवातीला शुभंकरोती म्हटलं, सोयीनं सत्यनारायण घातला किंवा दिवसभर गिर्हाईकांना मापात पाप करून लुबाडून संध्याकाळी गोरक्षण समितीला रुपाया देऊन धर्मरक्षकांच्या तोऱ्यात मिरवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सध्या अशांचाच सुकाळ आहे. धंद्याचा धर्म करण्याऐवजी धर्माचा धंदा बनविला जातोय, त्यासाठी कोणत्याही पातळीवर येण्याची तयारी चालविली आहे. यातून निष्पन्न काय होऊ शकत, हे सारं तुम्ही आम्ही सहजपणे समजण्याइतपत शहाणे आहोत. आपल्यात लढण्याचं, प्रतिकार करण्याचं त्राणच राहिलेलं नाही. अशा गलितगात्र झालेल्या, गर्भगळीत झालेल्याला संक्रात कशावर बसून आली आहे. अन ती आपलं काय भलं वाईट करणार, याची चिंताच नको. जसं निवडणुकीत आपण सगळ्यांचंच सगळ्या पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत करतो, अगदी तसंच सगळ्या सणावारांचं स्वागत करतो. इतकं की, आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणणंच योग्य ठरेल. असो. मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याची शपथ आपण घालीत असतो. पुराणांचा आधार घ्यायचा, तर पौष महिन्यात येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या दिवशी देवांचा दिवस आणि दानव-राक्षसांची रात्र सुरू होते. असं म्हणता येईल. देवलोकात रात्र असतानाच दानवांना या अंधारात आपली काही कृत्ये करायला अधिक सोपं जात असावं; परंतु विज्ञानाला देव आणि दानव या गोष्टी मंजूर नाहीत. पण त्यांना एक गोष्ट मान्य आहे की, सूर्य नावाच्या एका अति तापलेल्या ग्रहामुळे पृथ्वीवरचं जीवन शक्य आहे. ही ती गोष्ट!

जोतिबांच्या दृष्टीने बघायचं तर मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करतो. बारा राशीमधून भ्रमण करणारा सूर्य जानेवारी महिन्यात आपलं आवर्तन पूर्ण करून पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे मकर राशीत प्रवेश करतो. असं ज्योतिष्याशास्त्राचं म्हणणं आहे. खगोलशास्त्रांनी त्याच्याही पुढं झेप घेतलीय. त्यांनी पृथ्वीचा गोल आकार आणि तिची सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याची कक्षाही शोधून काढलीय. ही कक्षा लंबवर्तुळाकार आहे. म्हणून पृथ्वी आपल्या भ्रमणकक्षेत कधी सूर्याच्या जवळ तर कधी लांब जात असते. पृथ्वी सूर्याच्या जवळ असते तेव्हा दिवस मोठा असतो. ती सूर्यापासून दूर असते तेव्हा रात्री मोठ्या असतात. सूर्य तसा स्थिर आहे. दिवसभरात तो आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. हे घडतं पृथ्वीच्या पूर्वेकडे फिरण्याचा गतीमुळे. अशाप्रकारचे सूर्याचा भासमार्ग तयार होतो. त्याला भारतीय प्राचीन वैज्ञानिकांनी उत्तरायण आणि दक्षिणायन असं नांव दिलंय. उत्तरायणाची सुरुवात झाली की, सुर्य मकर वृत्तापासून उत्तरेकडे सरकायला लागतो. मग भीतीदायक वाटणाऱ्या लांबचलांब रात्री लहान होऊ लागतात. आणि दिवस मोठे होऊ लागतात. असे दिवस मोठे होण्याची प्रक्रिया खरं तर २२-२३ डिसेंबरलाच शिरू झालेली असते; परंतु सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रमणाचा...! देवाचा दिवस उघडण्याचा क्षण म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा असायलाच हवा. त्यातच पृथ्वीवरच्या जीवनाचा प्रमुख आधार आणि प्रकाशाची देवताही सुर्यच. त्यामुळं भारतीयच नव्हे तर इतर अनेक परंपरांनी सूर्याला आपली आद्यदेवता मानलीय. भारतीयांनी तर नवग्रहस्तोत्रात सूर्याची प्रार्थना करताना
जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतीम...
तदापी सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं
अशी सूर्याची प्रार्थना केलीय. इतकंच नव्हे तर ग्रहपीडांपासून मुक्त होण्यासाठी याच परंपरेत आद्य लोकांचा रक्षण करणारा ग्रह म्हणून त्यांनी सूर्याची 'पीडांहरतु मे रवी:' अशी विनवणी केलीय.

मकर राशीत उत्तरायण सुरू होतं तेव्हा आपल्याकडं हिवाळ्याची थंडी असते. या थंडीमुळे त्वचा सुकते आणि ओलाव्याचा अंश कमी झाल्यानं त्वचा तडतडते. कधी हाताच्या तळव्याची सालटे निघू लागतात. तर पायाच्या भेगा पडण्याचं प्रमाण वाढतं. वातावरणाचं तपमान कमी झाल्यानं माणसाचं शरीर संतुलित राहण्यासाठी शरीरातली उष्णता अधिक प्रमाणात उत्सर्जित करीत असते. अशावेळी त्वचेमधील तेलाचं प्रमाण कायम राखण्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांची गरज भासते. त्याचबरोबर शरीरातून उत्सर्जित होणारी अधिक प्रमाणातली उष्णता भरून काढण्यासाठी आहारात थोडे अधिक उष्ण पदार्थही लागतात. लोकमानसामध्ये आपल्या परंपरेनं या दिवसामधला मकरसंक्रांतीचा दिवस उत्सवाचा म्हणून रुजवला असावा. तिळगुळ इतरांना देताना आपल्यालाही तिळाची स्निग्धता इतरांकडून मिळणारच म्हणून ही रूढी, प्रथा कायम केली गेली असावी. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाप्रमाणेच बाजरीची भाकरी आवश्यकच. कारण ज्वारी किंवा गव्हापेक्षा ती अधिक उष्ण. गुल तर ऊष्णतेचं प्रतीकच. कारण उन्हाळ्यात गुळ अधिक प्रमाणात आहारात घेतला तर निश्चितच घोळणा फुटणार. मकर राशीत प्रवेश करणाऱ्या सूर्याचं महत्व इथंच संपत नाही. पृथ्वीच्या पोटातून कधीतरी लाव्हाच्या रूपानं बाहेर पडणारी थोडीशी उष्णता आणि चंद्राची भरती-ओहोटी घडवून आणणारा ऊर्जा परिणाम सोडला, तर पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव -निर्जीवातील ऊर्जाही यांना त्या रूपानं सूर्यापासून मिळालेली असते. सूर्याचं असं नियंत्रण असल्यामुळेच सूर्याला प्रमुख देवतेचं स्थान मिळालं खरं; परंतु सूर्याची उपासना करणाऱ्या अनेक जमातींमध्ये माणसाचं प्रभुत्व दाखविण्यासाठी अनेक चालीरीतीही प्रचारात आणल्या गेल्या. काही जमातींमध्ये सूर्याचा घड घेणाऱ्या राक्षसाला पळवून लावण्यासाठी सूर्याच्या दिशेनं बाण मारण्याची प्रथा आहे. सूर्य मानवी शरीरावर अधिकार गाजवत असतो तो दिवस आणि रात्र यांच्या ताल-लयबध्दतेनं सूर्योदय झाला की, माणूस ताजातवाना होऊन कामाला सुरुवात करतो जसजसा मावळतो तशी मानवातली ऊर्जा कमी होत जाते. सुर्याच्याच तालावर माणूस काम आणि विश्रांती घेत असतो. सूर्याच्या या लयबद्धतेतच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची पुनःपुन्हा होणारी आवर्तन माणसाला जन्म आणि पूर्वजन्म यासारखं तत्वज्ञान सहजपणे समजावून देत असतात. ही मकरसंक्रांतीच्या निमित्तानं उत्तरायणाचा प्रारंभ आणि सूर्य याची वैज्ञानिक माहिती! देवाचा दिवस उगवण्याचा पर्वकाळ म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी स्निग्ध तीळ आणि उष्ण गूळ वाटून आरोग्यरक्षण करीत असतानाच या दिवसाची उत्सवमूर्ती असलेल्या सूर्याला म्हणू या....तमसो मा ज्योतिर्गमय!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...