Saturday, 20 July 2019

राज ठाकरेंची नवी 'शिदोरी'...!


"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं असं म्हटलं जातं, पण कधी कधी परिस्थिती आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. जणू अशीच अवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांची झालीय. ज्या सोनियांना परकीय असल्यानं प्रधानमंत्री होऊ देणार नाही असं बजावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची ही 'सावली' थेट सोनियांच्या दिल्ली दरबारी गेली! कधीकाळी मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी सरसावलेले राज ठाकरे हेच मोदींना देशाच्या राजकीय पटलावरून दूर सारायला निघाले होते. राज ठाकरे यांनी आपली राजकीय कारकीर्द आणि वाटचाल ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारीक वारसानं, विचारांच्या शिदोरीनं चालवली होती. पण गेल्या काही दिवसांतील त्यांच्या राजकीय हालचाली पाहता, ती बाळासाहेबांच्या विचारांची शिदोरी कुठंतरी संपल्याचं जाणवतंय. कुण्या नव्याची 'शिदोरी' त्यांनी सोबत घेतल्याचं जाणवतंय. नाही तर बाळासाहेबांप्रमाणेच सतत डाव्यांची हेटाळणी करणाऱ्या राज यांना तीच विचारसरणी आता प्रातःस्मरणीय झालीय. हे कुणाच्या 'मैत्री' चं द्योतक म्हणायचं?"
--------------------------------------------------
*लो* कसभेच्या निकालावर राज ठाकरे यांनी 'अनाकलनीय' असा शेरा मारत आपलं ट्विटर-मौन सोडलं होतं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरेंचा डिजिटल प्रचार धडकी भरवणारा होता. पण भाजपच्या विजयानंतर तो टिंगलीचा विषय केला गेला. महिन्याभरानंतर राज यांनी तब्बल १४ वर्षांनी दिल्ली पहिली. अटलजींचा काळ आणि मोदींची राजवट यात खूप फरक त्यांना जाणवला. त्यांच्यातही बदल झाल्याचं प्रसिद्धी माध्यमांना जाणवलं. निवडणूक आयोगाची भेट घेऊन आगामी निवडणूक ही मतपत्रिकेवर घेण्यात यावी, अशी विनंती करायला आल्याचं सांगितलं. पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही असं लक्षांत आल्यावर 'न्यूजसेन्स' असलेल्या राज यांनी थेट युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींचं घर गाठलं. त्यांचा काय संवाद झाला ते समजलं नाही, पण राज यांच्या सोनिया भेटीनं राज्यातले काँग्रेसजन पार गोंधळून गेले. कदाचित त्यांचा आघाडीत जाण्याचा मार्ग सुकर व्हावा हा राज यांचा मानस असावा. राज यांनी मनसेची स्थापना करताना ज्या विचारसरणीची कास धरली होती. ती शिवसेनेची, मराठी माणसांची, मराठी वैभवतेची, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीची होती. मनसेची प्रारंभीची वाटचाल त्याच मार्गावर झाली. खुद्द बाळासाहेबांनी आपला फोटो वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतर त्यांची छबी वापरणं त्यांनी थांबवलं. पण शिवसेनेची तीच 'खल्लखटाक' संस्कृती सुरूच ठेवली होती. राज्यात सेना-भाजपचा वाढता प्रभाव पाहता आपल्याला त्याच विचारसरणीवर मतं मिळणार नाही. अस्सल उपलब्ध असताना नक्कलला कोण विचारणार? असं लक्षांत येताच त्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलं. नव्यानं वाटचाल सुरू झाली. शिवसेनाप्रमुख प्रारंभीच्या काळात समाजवादी विचारांशी जवळीक साधणारे होते. त्यातूनच त्यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. त्यामुळं शिवसेनेची विचारसरणी प्रबोधनकारांची दिसत होती. पण शिवसेनेला मिळालेला मोठा जनाधार लक्षांत येताच बाळासाहेबांना ग.वा.बेहेरे, दि.वा.गोखले, विद्याधर गोखले यासारख्या संघ विचारांच्या कावेबाज पत्रकारांनी घेरलं. सततच्या सानिध्यानं बाळासाहेब प्रबोधनी विचारांपासून दूर जात 'हिंदुत्ववादी' बनले. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती अशी! इथं नेमकं उलटं घडलं; राज ठाकरे यांना जसे पुरोगामी शरद पवार भेटले तसेच डाव्या विचाराचे 'मैत्री' या मेळघाटात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अनिल शिदोरे भेटले. त्यांनी मनसे अकादमीची धुरा स्वीकारली आणि मनसेत वैचारिक बदल घडवला. शिवाय त्यांच्या सततच्या सानिध्यानं कदाचित राज यांना शिदोरेंची डावी विचारसरणी भावली असेल. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्ववादी विचारांना विरोध करायला सुरुवात केलीय. त्यातूनच शरद पवारांच्यानंतर थेट सोनियांची भेट घेते झाले!
*मनसेचे निवडणुकीत यशापयश*
राज यांच्या शिवसेना त्यागानंतरची त्यांची आणि त्यांच्या मनसेची वाटचाल प्रारंभी अतिशय आक्रमक झाली. तेरा आमदार, लोकसभेत चांगली मते, अनेक महापालिकांमध्ये नगरसेवक, नाशिक महापालिकेत सत्ता अशी स्थिती २००९ ते २०१२ मध्ये होती. काँग्रेस विरोधी वातावरण, आक्रमक शैलीची तरुणांची संघटना याचा फायदा मनसेला झाला. मात्र, संघटनात्मक बांधणीत राज ठाकरे कमी पडल्याचं दिसलं. मोदी यांचं नेतृत्व देशपातळीवर आलं, अन्‌ काँग्रेस विरोधी वातावरणाचा लाभ उठवित विकासाचा नारा देत ते केंद्रात सत्तेवरही आलं. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा देताना सहा मतदारसंघात निवडणूक लढविली. मात्र, तोपर्यंत मतांचं धृविकरण झालं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती या लढाईत मनसेला स्थान मिळालं नाही. त्यावेळी मनसे युतीत सहभागी होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, विधानसभेला चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले. आघाडी विरोधाचा फायदा, तसेच मोदी लाट यामुळं भाजप सर्वांत मोठा पक्ष बनला. पुढे दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेनाही त्यांना मिळाली. लोकसभेपाठोपाठ झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचा धुव्वा उडाला. मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला, आतातर तोही पक्ष सोडून गेलाय. महापालिका निवडणुकांमध्ये चार नगरसेवकांचा प्रभाग ही कल्पना भाजपनं अंमलात आणली, आणि त्यात भाजपनं सर्वांधिक, तर त्या पाठोपाठ शिवसेनेनं अनेक महापालिकांत यश मिळविलं. मनसेचे नगरसेवक अगदी बोटावर मोजण्याएवढेच आले. भाजपनं गेल्या पांच वर्षांत शिवसेनेलाच सत्तेत फारसा वाटा दिला नाही, त्यामुळे मनसेनं दिलेल्या पाठिंब्याचा विचारही त्यांनी केला नाही. मनसे हळूहळू आकसत गेली. गेल्या चार वर्षांत युतीतील वाद, देशातील राजकीय वातावरण याचा फायदा घेत मनसे पुन्हा आक्रमक भूमिका निभावण्याच्या तयारीला लागली. मोदी लाटेत भाजपचे १२२ आमदार, तर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले. युती आणि आघाडीच्या लढतीत गेल्या वेळच्या चौरंगी लढती आता दुरंगी होतील. लोकसभा निवडणुकीचे पडसाद त्यावर पडतील. युतीच्या आमदारांची संख्या घटण्याची शक्‍यता दिसत नाही. आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचण्यास अंतर्गत वाद अडचणीचे ठरतील. त्यांना विरोधीपक्षाचा दर्जा तरी राखता येईल का? अशी स्थिती निर्माण झालीय. या परिस्थितीत निर्माण होणारी विरोधीपक्षांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसे करील. कोणाला बहुमत न मिळाल्यास आणि मनसेला काही जागा मिळाल्यास, त्यांना राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांची वाटचाल सुरू झाली आहे.
*राज्यातील ५०-६० मतदार संघावर प्रभाव*
गेल्या दहा-बारा वर्षांत वेगवेगळ्या निवडणुकीत मनसेचा थोडाफार प्रभाव सुमारे पन्नास-साठ मतदारसंघांत पडलेला आहे. तिथंच त्यांनी लक्ष केंद्रीत करायचं ठरविलंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसनं विरोध केला होता. ते प्रामुख्यानं मुंबईतल्या उत्तरप्रदेशी नेतृत्वानं. मात्र, राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी वक्ता त्यांना आता प्रचारासाठी हवाय. केंद्रातील सत्ता निश्‍चित झालीय. विधानसभेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय. लोकसभा निवडणुकीतच अनेकांनी विधानसभेचे मतदारसंघ बांधण्यास सुरवात केलीय. लोकसभेला पाठिंबा म्हणजे विधानसभेला पाठिंबा आहे, असे नाही, विधानसभेचे त्यावेळी ठरविण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात स्पष्ट केलं होतं. मनसेची विधानसभेची तयारी सुरू झालीय. संघटनात्मक बांधणी भक्कम केल्यास आणि चांगले स्थानिक उमेदवार रिंगणात उतरविल्यास, मनसेला यश मिळेलही.
*विरोधीपक्षांची भूमिका बजावता येईल*
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधीपक्षाची पोकळी जाणवतेय. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात लढण्याची उमेद राहिलेली दिसत नाही. अशावेळी  वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे या दोघांचं नेतृत्व राज्यात सध्या रिकामी असलेली विरोधी पक्षाची जागा त्यांच्या पक्षांना मिळवून देऊ शकतात. या दोन्ही नेतृत्वांचा पूर्वेतिहास, राजकीय वैचारिक वारसा आणि स्वभाव पाहता, ते म्हणणार की, विरोधी पक्षासाठी निवडणूक होत नाही. सत्ताधारी होण्यासाठीच निवडणूक लढवली जाते. त्यात यशस्वी झालो नाही तर विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागते. लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतांनी जरी एकच जागा मिळाली असली तरी वंचित बहुजन आघाडी राजकीय चर्चेच्या मुख्यस्थानी आलीय. त्यांच्यावर भाजपची ‘बी टीम’ असा आरोप केला जातो. गंमत म्हणजे विरोधी पक्ष म्हणून शून्य कामगिरी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवाचं खापर वंचित बहुजन आघाडीवर फोडत ‘बी टीम’चा सिद्धान्त अनेकांनी अधोरेखित केलाय. योगायोग पहा २००९ साली असाच आरोप मनसेवर त्यावेळी पराभूत झालेल्या युतीनं केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं की, ‘मग २००४ साली का हरले हे, तेव्हा मनसे नव्हती!’ तेच आता आंबेडकर विचारताहेत की,“२०१४ साली वंचित नव्हती, तरी का पराभूत झाले?" याचा अर्थ वंचित व मनसे यांच्याकडे आज काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जनतेसमोर जाण्यासाठी आजच्या घडीला आवश्यक ते राजकीय चरित्र व चारित्र्य आहे. आणि त्यामुळेच हे दोन्ही पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे मित्रपक्ष म्हणून आघाडीत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत, तशा वावड्या उठत आहेत किंवा आघाडीला पर्याय नाही असं दर्शवलं जातंय. पण आघाडीत जायची गरज वंचित किंवा मनसेला खरोखरच आहे? त्यातून फायदा कुणाचा होणार? याचं उत्तर अखिलेश यादव नीट देऊ शकतात! एकदा त्यांनी काँग्रेसशी आघाडी करून तोंड पोळून घेतलं, नंतर ताक फुंकून पीत मायावतींशी आघाडी करून आगीतून फुफाट्यात. तेच तेजस्वी यादवचं आणि चंद्राबाबूंचं! अशा स्थितीत वंचित आणि मनसे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणं श्रेयस्कर. मतदारांना दोन नवे विकल्प मिळतील. निवडणुका चौरंगी, पंचरंगी झाल्या तरी बेहत्तर, पण या पक्षांना त्यांच्या विस्ताराची शक्यता तर निश्चित तपासता येईल.

*मनसे-वंचित यांचं अस्तित्व दिसलं*
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचाराचा बार फुसका ठरला, असं म्हटलं गेलं. पण नीट विचार केला, तर राज ठाकरेंचा घणाघाती मोदी विरोध झाला नसता तर आज युती ४८ जागांवर जिंकून आली असती. वंचितमुळे आघाडीच्या १०-१२ जागा कमी झाल्या असं एक विश्लेषण केलं जातंच आहे. कारण वंचितचे उमेदवार होते. राज ठाकरेंचा प्रभाव झाला की नाही हे कसं ठरवणार? कारण त्यांचे उमेदवारच नव्हते. साहजिकच मोदींचे पराक्रम पाहून त्यांना पराभूत करण्यासाठी राज ठाकरेंनी पर्याय कोणते ठेवले? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित!
आणि या तिन्ही पक्षांना आज जी काही मतं पडलीत, त्यात राज ठाकरेंचा हस्ते-परहस्ते प्रभाव आहे. भाजप-सेना नको, पण मग काँग्रेस-राष्ट्रवादीही नको असं वाटणाऱ्या काही लोकांनी वंचितला मतं दिली. पण ज्यांना काही कारणासाठी वंचितही नको होती त्यांना मात्र मनसेचा पर्याय नव्हता!
*मनसेची दुसरी फळीच निर्माण झाली नाही*
राज ठाकरे आणि तेरा वर्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं समीकरण मांडलं तर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागणारे निकालातून राज ठाकरे यांच्या इंजिनला नवीन दिशा असेल किंवा इंजिन कारशेडमध्ये दिसेल. महाराष्ट्रात युतीच्या जागा कमी झाल्या तर, त्याचे सारे श्रेय राज यांना मिळणार आहे. ही  विधानसभा निवडणूक राज ठाकरे यांच्यासाठी फार महत्वाची आहे. जर यावेळी त्यांची गणितं जुळून नाही आली तर मात्र पुन्हा संधी कठीणच आहे. कारण त्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत राजकारणाचे संदर्भ बदलेले असतील.
राज ठाकरे यांचा पक्ष आज महाराष्ट्रात नावालाच उरला आहे. सातत्यानं त्यांचे निवडून आलेले आमदार-नगरसेवक फोडले जाताहेत. पण काही वर्षांपूर्वी वाशी येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात पक्षफुटीवर भाष्य करताना ते म्हणाले होते, की "एक कार्यकर्ता जरी राहिला तरी मी त्यातून लाख निर्माण करेन."  त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादातून असं नक्की होऊ शकेल हे जाणवतंय. राज ठाकरे यांना आपलं शक्तिस्थळ माहितीय. राजकारणाची उत्तम जाण, उत्कृष्ट वक्तृत्व, पॉलिटिकल टायमिंगमध्ये त्यांचा देशात मोजक्या लोकांत गणना होतेय. मग आजही त्यांना यश का नाही मिळालं याचं कारण काय हा प्रश्न उरतोच. याबाबत एका प्रसंगाची आठवण करून द्यावीशी वाटते. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर, शरद पवार यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालविण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं! असा टोमणा मारला होता. एका अर्थानं त्यांना असं म्हणायचं होते की, पक्ष चालविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण राज ठाकरे यांनी हा वडीलकीचा सल्ला त्यावेळी फारसा गांभीर्याने घेतला नाही. आता मात्र त्यांच्याच सल्ल्यानं त्यांची वाटचाल सुरु आहे असे त्यांचे विरोधक आरोप करताहेत. त्यांना सुरुवातीला चांगलं यश मिळालं, पण नंतर ते टिकवून ठेवता आलं नाही. त्यासाठी अनेक कारणं असतील पण राज ठाकरे यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज ठाकरे हेसुद्धा एक उत्तम कलाकार आहेत. कलाकार कोणाचा गुलाम होत नाही. अगदी कोणा व्यक्तीचा, वेळेचा आणि वेळापत्रकाचाही नाही. पण यावर सुद्धा मात करता आली असती. त्यांची दुसरी फळी अगदीच सुमार होती. याबाबतीत शिवसेनाप्रमुख मात्र नशीबवान होते. त्यांच्याकडे सक्षम व निष्ठावंत वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी इ. नेते होते. ते फर्डे वक्ते होते. पण राज ठाकरे यांची आजही हीच मोठी समस्या आहे. त्यावर मात केलीच पाहिजे आता तशी संधी सुद्धा येणार आहे.
*स्थान निर्माण करण्याची शेवटची संधी*
तेरा वर्षात राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते यांना टोल नाका आंदोलन, मराठी पाट्या अशा काही गोष्टी वगळता, नवीन सकारात्मक उपक्रम देऊन राज्यपातळीवर ३६५ दिवस गुंतवून ठेवता आलेलं नाही. तसंच सगळ्याच शहरात आणि गावात कुठल्याच पक्षात जागा नसलेले अनेक टुकार कायम नवीन पक्षाच्या प्रतिक्षेत असतात. अशा अनेक प्रवृतींनी त्याकाळात मनसेचा ताबा घेतलाय. त्यांनी मनसेच्या नावानं दुकानदारी सुरु केलीय. त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 'ब्लु प्रिंट'नुसार नवनिर्माण करायला आलेले कार्यकर्ते पुन्हा माघारी फिरलेत. त्यामुळे जे उरलेले आता कुठेच जागा नाही, तर हेच काय वाईट आहे. अशा प्रवृतीना शोधून, त्यांच्या जागा रिकाम्या करणं हे मोठे आव्हान असणारंय. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय पोकळीत, राज ठाकरे यांना स्थान निर्माण करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी आता नवीन कार्यकर्त्यांचे रोप लावून त्याची वाट बघणं, आत्मघातकी ठरेलं. त्यासाठी युती होणार नाही या आशेनं अनेक सेना -भाजपच्या मातब्बर नेत्यांनी विधानसभा निवडूणुकीची तयारी केली होती. त्यांची शोध मोहीम घेऊन योग्य त्यांना मनसेनं उमेदवार केलं पाहिजे.  सेना-भाजपच्या जागावाटपात दोन्ही पक्षाचे  उमेदवार वैचारिक जवळकीनं मनसेसोबत येऊ शकतात. शरद पवार यांनी ज्याप्रमाणे छगन भुजबळ, गणेश नाईक इ.नेते आपल्या पक्षात सामावून घेतलं, त्यांना टिकवून ठेवलं. तशी कला राज ठाकरे यांनी आता अवगत करायला हवीय. सेना -भाजपनं जशी मनसेची फोडाफोडी केली त्याची परतफेड करण्याची ही वेळ आलीय.

चौकट.....
*फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घ्यावी*
महाराष्ट्रात सगळ्याच पक्षात मुख्य पदावर अनेक वर्षे ठराविक नेते जागा अडवून बसले आहेत. त्यामुळे दुसरी फळी संधीच्या अभावी निराश आहेत. त्यांना जाणीवपूर्वक मनसेत आणले पाहिजे. त्यांना कामाची संधी दिली पाहिजे. राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मांडले पाहिजेत. त्यामुळे बहुजन तरुणांना एक आशावादी नेतृत्व मिळेल. मुस्लिम तरुणांनासुद्धा काही विधायक कार्यक्रम मनसेनं दिला पाहिजे. सुशिक्षित मुस्लिम युवकांसाठी मनसे हा योग्य पर्याय ठरू शकतो. फक्त मनसेच्या झेंडयात निळा, हिरवा रंग असून चालणार नाही. त्या वर्गाला योग्य संदेश गेला पाहिजे. एक राज्यव्यापी अधिवेशन घेऊन नव्याने भूमिका मांडली पाहिजे. राज ठाकरे यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली पाहिजे, असं आज महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटतंय. महाराष्ट्राचे हित जपणारा पहिला प्रादेशिक नेता सत्तेत यावा असं शहरी आणि ग्रामीण जनतेला वाटतंय. मोदी-शाह यांच्या समोर देशातील सगळेच नेते शेपूट घालून बसले असताना राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका घेतली ती प्रत्येक मराठी माणसाला भावून गेलीय. महाराष्ट्र वाट बघतो आहे, एका नवीन दमदार नेतृत्वाची, मराठी हितासाठी सर्वसमावेशक स्वच्छ भूमिका मांडणारा. जरी चूक झाली तर दुरुस्त करणारा. आडपडदा न ठेवता पडद्यावर जाहीर पोलखोल करणारा, त्या राज ठाकरे यांची नव्याने वाट पाहतो आहे.

हरीश केंची
९४२२३१०६०९

2 comments:

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...